१० फेब्रुवारी, दिवस ४१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ४८१ ते ४९२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१० फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 10 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक १० फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

76-4
तैसा समस्ता या भजना । मी साक्षिभूतु पै अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥76॥
त्याप्रमाणे अर्जुना, मी या सर्व उपसकाचा साक्षी आहे. येथे प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे ज्याला-त्याला फळाची प्राप्ती होत असते.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्यम् ॥4. 13॥
भावार्थ :-

गुण आणि कर्म यांच्या भेदाप्रमाणे मी चार वर्ण निर्माण केले आहेत. या कर्माचा मी व्यवहारदृष्टीने मी जरी कर्ता असलो, तरी मी परमार्थतः अकर्ता व अव्यय (अविनाशी) आहे.
77-4
आता याचिपरी जाण । चार्‍ही आहेती हे वर्ण । सृजिले म्या गुण – । कर्मभागे ॥77॥
आता याप्रमाणे तू जाण की, जे चार वर्ण आहेत, ते गुण व कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केले आहेत.
78-4
जे प्रकृतीचेनि आधारे । गुणाचेनि व्यभिचारे । कर्मे तदनुसारे । विवंचिली ॥78॥
त्या चारही वर्णाच्या कर्माची आपआपल्या प्रकृतिधर्माने आणि गुणांच्या तारतम्याने योजना केली आहे.
79-4
एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहू वर्णी । ऐसी गुणकर्मी कडसणी । केली सहजे ॥79॥
अर्जुना ! हे सर्व लोक वस्तुतः एकच असून गुण आणि कर्म यांच्या योगाने चार वर्णाची व्यवस्था सहजच झाली आहे.
80-4
म्हणोनि आईके पार्था । हे वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागी ॥80॥
म्हणून हे अर्जुना ! ऐक. ही वर्णभेदाची व्यवस्था अशा प्रकारची असल्यामुळे मी त्याचा कर्ता मुळीच नाही.

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥4. 14॥
भावार्थ :-

कर्माच्या फळामध्ये माझी आसक्ती नसते, म्हणून कर्मे मला लिप्त करू शकत नाहीत, असे जो मला तत्वतः जाणतो, तोसुद्धा कर्माने बध्द होत नाही.
81-4
हे मजचिस्तव जाहले । परी म्या नाही केले । ऐसे जेणे जाणितले । तो सुटला गा ॥81॥
हे सर्व व्यवस्थापन माझ्यापासून झाले आहे, परंतु हे मी केलेले नाही; अरे अर्जुना, हे ज्याने जाणले तत्वतः ओळखले, तो कर्मबंधनापासून मुक्त झाला.

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥4. 15॥
भावार्थ :-

मी कर्म करून देखील अकर्ता आहे, असे जाणून पूर्वीच्या मुमुक्षूनी कर्म केले आहे. म्हणून तूदेखील पूर्वीच्या लोकांप्रमाणे कर्म कर.

82-4
मागील मुमुक्षु जे होते । तिही ऐशियाचि जाणोनि माते । कर्मे केली समस्ते । धर्नुधरा ॥82॥
हे अर्जुना ! पूर्वीच्या काळी जे मुमुक्षु होते, त्यांनी मी अकर्ता आहे, हे जाणले आणि त्यानुसारच सर्व कर्मे केली.
83-4
परी ते बीजे जैसी दग्धली । नुगवतीचि पेरली । तैशी कर्मेचि परि तया जाहली । मोक्षहेतु ॥83॥
परंतु भाजलेले बी जरी पेरले, तरी ते उगवत नाही; त्याप्रमाणे ती कर्मे खरी; परंतु त्याना कर्मबंधनातून सोडविण्याला तीच कारण झाली.
84-4
एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडे सज्ञाना । योग्य नोहे ॥84॥
या बाबतीत अर्जुना, आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, हा कर्माकर्माचा विचार विद्वान मनुष्याने देखील आपल्या इच्छेप्रमाणे करणे योग्य नाही. (जाणत्या विद्वान पुरूषासदेखील आपल्या बुध्दीने करता येईल असा नाही.

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥4. 16॥
भावार्थ :-

कर्म कोणते आणि अकर्म कोणते, या विषयात विद्वान लोक देखील मोहित होतात. ते कर्मतत्व मी तुला उत्तम प्रकारे सांगेन. ते जाणून तू संसारातील दुखापासून मुक्त होशील.

85-4
मर्म म्हणिजे ते कवण । अथवा अकर्मा काय लक्षण । ऐसे विचारिता विचक्षण । गुंफोनि ठेले ॥85॥
कर्म ज्याला म्हणतात, ते कोणते ? अथवा अकर्माचे लक्षण काय ? असा विचार करीत असताना विद्वान लोकदेखील भ्रमामध्ये गुंतून गेले.


86-4
जैसे का कुडे नाणे । खर्‍याचेनि सारखेपणे । डोळ्यांचेहि देखणे । संशयी घाली ॥86॥
ज्याप्रमाणे खोटे नाणे हे खऱ्या नाण्यासारखे भासत असल्यामुळे संशय निर्माण होतो. वस्तुतः डोळ्याला होणारे ज्ञान प्रत्येक्ष यथार्थ असते, तरीपण ते संशय निर्माण करते.
87-4
तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमे । गिंवसिजत आहाति कर्मे । जे दुजी सृष्टि मनोधर्मे । करू शकती ॥87॥
त्याप्रमाणे फक्त मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य अंगी असलेले महापुरुषदेखील ” आम्ही कर्मातीत झालो आहोत ” अशा भ्रमाणे युक्त होऊन बरोबर कर्माच्या पाशामध्ये सापडले जातात.
88-4
वाचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणोनि आता तेचि परियेसी । सांगेन तुज ॥88॥
कर्मा – अकर्मा विषयी चांगले चांगले विद्वान दूरदर्शी देखील मूढ बनतात. तर मग मूळचेच अज्ञानी आहे, त्या बिचाऱ्या मूर्खाची काय कथा ? म्हणूनच मी तुला आता तोच विषय सांगतो, तरी त्याचे श्रवण कर.

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥4. 17॥
भावार्थ :-

कर्म, विकर्म, अकर्म (सामान्य, विशेष किंवा विहित, व निषिद्ध कर्म) म्हणजे काय, हे जाणले पाहिजे. कारण कर्माची गती गहन आहे.
89-4
तरी कर्म म्हणजे स्वभावे । जेथ विश्वाकारु संभवे । ते सम्यक आधी जाणावे । लागे एथ ॥89॥
तर ज्याच्या योगाने स्वभावतः (आपोआप) या विश्वाला आकार निर्माण होतो, त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी त्याच कर्माचे प्रारंभी यथार्थ ज्ञान करन घेतले पाहिजे.
90-4
मग वर्णाश्रमासि उचित । जे विशेष कर्म विहित । तेही वोळखावे निश्चित । उपयोगेसी ॥90॥
मग वर्ण व आश्रम यांना जे कर्मविशेष म्हणून सांगितले आहे, त्याची देखील उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


91-4
पाठी जे निषिद्ध म्हणिपे । तेही बुझावे स्वरूपे । येतुलेनि येथ काही न गुंफे । आपैसेचि ॥91॥
नंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात, त्याचेही यथार्थ स्वरूप समजून घ्यावे. याप्रमाणे कर्माचे स्वरूप जाणून घेतले, म्हणजे माणूस कर्माने बध्द होत नाही.
92-4
एर्‍हवी जग हे कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परि ते असो आइके चिन्ह । प्राप्ताचे गा ॥92॥
एरवी हे जग कर्माच्या अधीन आहे. असा कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना, ते राहू दे, आता ब्रम्हज्ञानी (कृतकृत्य) पुरुषाची लक्षणे सांगतो, ती ऐक.
कर्मण्य कर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥4. 18॥
भावार्थ :-

जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि जो अकर्मात कर्म पाहतो, तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी व सर्व कर्मे करणारा आहे.
93-4
जो सकळकर्मी वर्तता । देखे आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥93॥
सर्व कर्मे करीत असताना आपण कर्मे करीत नाही, हे जो जाणतो आणि कर्माच्या फळाची अपेक्षा धरत नाही,
94-4
आणि कर्तव्यतेलागी । जया दुसरे नाही जगी । ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥94॥
आपल्याखेरीज कर्तव्य करण्याला जगात दुसरे काहीचं नाही, अशा नैष्कम्यर्यतेचा खरा बोध ज्याला झालेला असतो,
95-4
परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी तो इही चिन्ही जाणावा । ज्ञानिया गा ॥95॥
तरी तो उत्कृष्टपणे कर्माचे आचरण करीत असताना दिसतो, तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे, असे जाणावे.


96-4
जैसा का जळापाशी उभा ठाके । तो जरी आपणपे जळामाजि देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहे ॥96॥
जसे एखादा मनुष्य जलाशया जवळ उभा राहिलेला असतो, (पाण्यातील आपले स्वतः चे प्रतिबिंब) जरी आपण पाण्यात आहोत; असे पाहत असतो. तरी पण आपण त्या प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे (आपण पाण्यात नाही), असे तो निश्चितपणे जाणतो,
97-4
अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जाता देखे वेगे । तेचि साचोकारे जो पाहो लागे । तव रुख म्हणे अचळ ॥97॥
अथवा नावेत बसून मनुष्य जात असतो, त्याला किनाऱ्यावरील झाडे भरभर चालली आहेत, असे दिसते; पण खरी वस्तुस्थिती तो ज्या वेळी पाहतो, त्यावेळी झाडे स्थिर आहेत, असे तो म्हणतो.
98-4
तैसे सर्व कर्मी असणे । ते फुडे मानूनि वायाणे । मग आपणपे जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥98॥
त्याप्रमाणे आपले सर्व कर्मात असणे, हे निश्चितच मिथ्या आहे. (आपले आचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे, हे जाणुन), हे मानून मग आपण कर्मरहित आहोत हे तो जाणतो.
(ब्रम्हज्ञानी पुरुष)
99-4
आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे । जैसे न चलता सूर्याचे चालणे । तैसे नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीचि असता ॥99॥
आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो स्थिर आहे, चालत / फिरत नाही.
त्याप्रमाणे कर्म करीत असताना ते (मी कर्म करीत आहे, ही भावना समूळ पणे नष्ट पावणे) कर्म आपण करीत नाही, असे जो जाणतो, तो आपले नैष्कम्यर्य जाणतो.
100-4
तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसे जळी जळामाजी न बुडे । भानुबिंब ॥100॥
ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले दिसते, पण त्यावरून (सूर्य) बिंब पाण्यात बुडाले असे होत नाही. त्याप्रमाणे वरून तो मनुष्यासारखा दिसतो; परंतु आतून परब्रम्हाशी एकरूप झालेला असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ४१ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४८१ ते ४९२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 481
सांगता हे नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥१॥
आवडीने सेवन करू । जीवीचे धरू जीवीच ॥धृपद॥
उपमा या देता लाभा । काशा शोभा सारिखी ॥२॥
तुका म्हणे नुचली डोई । ठेविली पायी संतांचे ॥३॥
अर्थ
संतांच्या कृपेने मला लाभ झाला त्याचे सुख कसे सांगू, ते मला सांगता ही येत नाही त्यांच्या किर्तीचे वर्णन करण्यासाठी माझे मुख देखील कमी पडत आहे. आता त्यांच्या कृपेचा जो लाभ झाला आहे त्याचे आवडीने सेवन करू आणि तेच चित्तामध्ये दृढ धरून ठेवु. हा जो लाभ झाला आहे, त्याला कशाची उपमा देता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या चरणावर मी मस्तक ठेवले आहे. ते आता ते उचलणार नाही.
अभंग क्र. 482
आपुलाला लाहो करू । केणे भरू हा विठ्ठल ॥१॥
भाग्य पावलो या ठाया । आता काया कुरवंडी ॥धृपद॥
पुढती कोठे घडे ऐसे । बहुता दिसे फावले ॥२॥
तुका म्हणे झाली जोडी । चरण घडी न विसंभे ॥३॥
अर्थ
आता आपणच लाहो म्हणजे त्वरा करून चांगला हा विठ्ठल रुपी चांगला माल भरू. माझे भाग्य उदयाला आले त्यामुळे मी या ठिकाणी पोहोचलो आता मी माझ्या शरीराची कुरवंडी करून विठ्ठला वरून वळून टाकीन. कारण असा लाभ पुन्हा कोठे मिळणार आहे ? फार दिवसांनी हा लाभ झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यांना मी घटका भरही विसंबणार नाही.
अभंग क्र. 483
उजळले भाग्य आता । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शने हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥धृपद॥
संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटी साठवू ॥२॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सापडला ॥३॥
अर्थ
माझे भाग्य उजळले कारण मला संतांचे दर्शन झाले त्यामुळे माझी सर्व चिंता नाहीशी झाली. आणि संतांच्या दर्शना मुळेच पद्मनाभ असा जो हरी त्याचा मला लाभ झाला. मी आपल्या संपुष्ट अशा हृदयरूपी पेटीत देवाला साठवून किंवा सुरक्षित ठेवीन. तुकाराम महाराज म्हणतात देवरूपी ठेवा हा तर माझ्याठीकाणी पहिल्या पासूनच होता, पण तो माझ्या शुध्द भावनेने सापडला.
अभंग क्र. 484
आम्हासी आपुले नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्याने ॥१॥
न कळता आला खोळंबा मारगा । जगी जालो जगा बहुरूपी ॥धृपद॥
कळो आले बरे उघडले डोळे । कर्णधार मिळे तरी बरे ॥२॥
तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥३॥
अर्थ
आम्हाला आमचे संचित कर्म आवडतच नाही त्यामुळे आम्हाला आमचाच कळवळा येत आहे आणि आमचे चित्त चरफडत आहे. मला माझ्या अज्ञानामुळे अनेक प्रकारचे परमार्थ मार्ग मध्ये खोळंबे आलेआणि जसे जग असेल तसे या प्रकारचे मी सोंग घेऊ लागलो म्हणजे बहुरूपी झालो. हे सारे कळून आले विचारांची दृष्टी घडली आणि आता. असे वाटत आहे कि, या भाव नदीतून पार करणारा नावाडी मिळाला तर किती चं होईल. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायण, जर हि करून आपण ऐकत असाल, तर आमच्या करता धावत या.
अभंग क्र. 485
बरगासाठी खादले शेण । मिळता अन्न न संडी ॥१॥
फजित तो केला लाहे । ताडण साहे गौरव ॥धृपद॥
ओठाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥२॥
तुका फजीत करी बुच्चा । विसरे कुच्चा खोडी तेणे ॥३॥
अर्थ
एका मूर्ख मनुष्याला दुष्काळामध्ये खाण्यासाठी अन्न मिळेना म्हणून त्याने कदान्न खाण्यास सुरुवात केली दुष्काळ निवारण झाले तरी कदान्न खाण्याचे काही सुटेना अशा मूर्खाला कितीही मार दिला त्याची कितीही फजिती केली तरी त्याला काही वाटत नाही. ओढाळ, जनावराला नासधूस करणे आवडते, कचरा खाणे आवडते. त्याची खोड आपल्या आपण जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे निलाजरे कोडगे लोक आहे, त्यांची चागली फजिती केली, तरच ते आपली खोड विसरतात.
अभंग क्र. 486
धाव घाली आई । आता पाहातेसी काई ॥१॥
धीर नाही माझे पोटी । झालो वियोगे हिंपुटी ॥धृपद॥
करावे सीतळ । बहु जाली हळहळ ॥२॥
तुका म्हणे डोई । कई ठेवीन हे पायी ॥३॥
अर्थ
हे विठाई ये तू माझ्याकडे लवकर धाव घे तू काय पाहत आहेस ? हे विठाबाई आता माझ्या पोटी धीर नाही राहिला तू माझ्या मला भेटण्यासाठी लवकर माझ्याकडे धावत ये तुझ्यावियोगाने मी हिंपुटी म्हणजे कष्टी झालो आहे. मला अतिशय ताप होतो आहे तो शांत कर. तुकाराम महाराज म्हणतात माझे डोके तुझ्या पायावर कधी ठेवीन असे मला झाले आहे.
अभंग क्र. 487
तुम्हा ठावा होता देवा । माझे अंतरीचा हेवा ॥१॥
होती काशाने सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥धृपद॥
नसते सांभाळिले । जरि तुम्ही आश्वासिले ॥२॥
तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सांवाधावा ॥३॥
अर्थ
देवा माझ्या अंतःकरणातील सर्व इच्छा तुम्हाला माहित होती. हे वैकुंठनायका, माझी सुटका कशाने होईल ? तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता, तर माझी सुटका झालीच नसती. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपाळू देवा, माझी सुटका करण्यासाठी तुम्ह्नी धावाधाव केली हे फार बरे झाले.
अभंग क्र. 488
देऊ ते उपमा । आवडीने पुरुषोत्तमा ॥१॥
पाहाता काशा तू सारिखा । तिही लोकांच्या जनका ॥धृपद॥
आरुष हे वाणी । गोड करूनि घेता कानी ॥२॥
आवडीने खेळे । तुका पुरवावे सोहळे ॥३॥
अर्थ
ते पुरुषोत्तमा तुला आवडीने जरी मी एखादी उपमा द्यायचे म्हटले तरी. हे त्रैलोक्यजनका त्रैलक्यामध्ये तू कोणा सारखा आहे हे पाहण्यास केले तर तेही समजत नाही. माझी वेडी भाबडी भाषा तुम्ही गोड मानून ऐकता. त्यातच मला धन्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या आधारने मी आंनदाने रहातो माझे लाड तुम्हीच पुरवावे.
अभंग क्र. 489
दर्शनाची आस । आता न साहे उदास ॥१॥
जीव आला पायांपाशी । येथे असे कलिवरेसी ॥धृपद॥
काहीच नाठवे । ठायी बैसले नुठवे ॥२॥
जीव असता पाही । तुका ठकावला ठायी ॥३॥
अर्थ
देवा आता मला तुमच्या दर्शना शिवाय जमणारच नाही त्याविषयी उदासीनता धरणे मला शक्य नाही मला तुमच्या दर्शनाची आस लागलेली आहे इच्छा आहे. माझा जीव तुमच्या पाया पाशी आला आहे आणि माझ्या देह हि येथेच आहे. मला दुसरे काहीच आठवत नाही. आणि बसल्या जागेवरून उठवतहि नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या पायाजवळ माझा जीव अर्पण केला समर्पित केला तरीही मला तुमचे दर्शन होईना म्हणूनच मला असं वाटत आहे की मी फसलो गेलो आहे.
अभंग क्र. 490
भोगावरी आम्ही घातला पाषाण । मरणा मरण आणियेले ॥१॥
विश्व तू व्यापक काय मी निराळा । काशासाठी बळा येऊ आता ॥धृपद॥
काय सारूनिया काढावे बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवू ॥२॥
केला तरी उरे वादचि कोरडा । बळे घ्यावी पीडा स्वपनीची ते ॥३॥
अवघेचि वाण आले तुम्हा घरा । मजुरी मजुरा रोजकीर्दी ॥४॥
तुका म्हणे काही नेणे लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥५॥
अर्थ
आता आम्ही सर्व भोगावर मी त्याचा दगड टाकला असून मरणालाच मरण आणले म्हणजे सर्व अज्ञान दूर झाले. देवा तू विश्वव्यापक आहेस मग मी तुझ्या पासून वेगळा कसा होईल व तुझी प्राप्ती करून घेण्यासाठी मी आता अंगात वेगळे कोणते बळ आणु ? आणि वेगळे काही मिळवायचे आहे. असा खटाटोप का करू ? आतून बाहेर काय टाकू ? आणि बाहेरचे काय गुण अंगात आणू ? कितीही चर्चा केली, तरी ती शिल्कच ठरते. देवा माझ्या जवळ जो काही माल होता पाप-पुण्याची शिदोरी होती ती सर्व तुमच्याजवळ तुमच्या घरी आणून टाकली आहे आता मला मजुराला फक्त दररोजची काय रोजची मजुरी होत असेल तेवढीच द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात मी काही लाभ हानी जाणत नाही जो या देहाचा धनी असेल तो या देहरूपी वाड्याचे रक्षण करील.
अभंग क्र. 491
का हो येथे काळ आला आम्हा आड । तुम्हापाशी नाड करावया ॥१॥
का हो विचाराचे पडिले साकडे । काय ऐसे कोडे उपजले ॥धृपद॥
का हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटी धरिले देवा ॥२॥
पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल ते बळ नाही आता ॥३॥
काय जाले देणे निघाले दिवाळे । की बांधलासि बळे ॠणा पायी ॥४॥
तुका म्हणे का रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनि ॥५॥
अर्थ
अहो देवा तुमची आणि माझी भेट होण्याच्या वेळी हा काळ भेटीच्या आडवा तरी का आला असेल ? देवा अहो मला भेट देण्याविषयी तुम्ही इतका विचार का करतात आणि मला वेळ देण्याविषयी तुम्हाला असे कोणते संकट निर्माण झाले आहे ? अशी कोणती अडचण आली आहे, आम्हाला भेटावे असे तुम्हाला का वाट नाही ? आमच्या विषयी मनात दुजाभाव धरला काय ? आमचे पाप वाढले आहे की काय किंवा तु दुर्बळ झाला आहेस की काय किंवा मागे जसे तुझ्या अंगी बळ होते तसे बळ तुझ्या अंगी आता राहिले नाही की काय ? तुम्हाला देणे झाले म्हणून तुमचे दिवाळे निघाले काय ? कि सावकाराने ऋण वसूल करण्यासाठी तुम्हाला बांधून ठेवले आहे ? तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझा आणि माझा ठेवीचा व्यवहार तू वेगळा केलास आणि आता कोठे गुंतलास ?
अभंग क्र. 492
काय देह घालू करवती कर्मरी । टाकु या भितरी अग्नीमाजी ॥१॥
काय सेवू वन शीत उष्ण तहान । साहो की मौन धरुनी बैसो ॥धृपद॥
काय लावू अंगी भस्म उधळण । हिंडू देश कोण खुंट चारी ॥२॥
काय त्यजू अन्न करूनि उपास । काय करू नाश जीवित्वाचा ॥३॥
तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा देई भाव पांडुरंगा ॥४॥
अर्थ
देवा आता तुमची माझी भेट होण्यासाठी मी माझ्या देहावर करवत चालवून घेऊ का, का माझ्या शरीराला अग्नीमध्ये टाकून देऊ ? वना मध्ये जाऊन, शीत उष्ण, तहान याचे ताप सहन करू कि मौन घेऊन बसू, कि सर्व अंगाला भस्म फासू ? देशांतराला जाऊ कि चारी दिशा फिरू ? अरे देवा मग मी अन्नत्याग करू ठीक आहे कि माझ्या जीवाचं नाश करून घेऊ ? तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या भेटी करिता काय उपाय करू ते सांग ?

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading