“३१ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 31 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३१ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३६३७ ते ३६४८ चे पारायण आपण करणार आहोत.
३१ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ३७६ ते ४००,
376-18
कर्म होतचि असे तेव्हांही । परी ते होणे नव्हे पाही । तो अन्यायो गा अन्यायी । हेतु होय ॥376॥
तेव्हाही कर्म हे घडतच असते; पण बाबा रे, ते घडणे नव्हे; ते पाप कर्म असून पापकर्माला हेतू आहे. 376
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ॥18. 16॥
377-18
एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा । आता एथे पाहे पा आत्मा । सापडला असे ? ॥377॥
अशा प्रकारे, हे सुमहिमा, कर्माच्या पांच कारणास पांच हेतू आहेत. तर आता या ठिकाणी आत्मा हा कर्मास कारण आहे काय, सांग बरे ? 377
377-18
भानु न होनि रूपे जैसी । चक्षुरूपाते प्रकाशी । आत्मा न होनि कर्मे तैसी । प्रकटित असे गा ॥378॥
ज्याप्रमाणे सूर्य हा स्वत: विषय न होता नेत्रादी पांच इंद्रियांचे विषय प्रगट करतो, त्याप्रमाणे आत्मा कर्मे न होता करणाराकडून ती ती प्रकाशित करतो; 378
379-18
पै प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा । दोहीते प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो ॥379॥
हे बघ अर्जुना, आरसा व प्रतिबिंब ही दोन्ही आपण न होता पाहणारा जसा दोहिला प्रकाशित करतो; 379
380-18
का अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता । तैसा आत्मा कर्मकर्ता । न होनि दावी ॥380॥
किंवा हे पंडुसुता, सूर्य हा दिवस व रात्र यास कारणीभूत असून ज्याप्रमाणे त्यापासून अलित असतो, त्याप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जरी कर्म होते, तरी तो कर्मकर्ता नाही असे दाखवितो. 380
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-17
परी देहाहंमान भुली । जयाची बुद्धि देहीचि आतली । तया आत्मविषयी जाली । मध्यरात्री गा ॥381॥
परंतु मीपणाच्या भ्रमाने ज्याची बुद्धी देह हाच मी अशी पक्की खात्री झाली आहे, त्याला आपल्या स्वरूपाची मध्यरात्र झाली आहे. 381
382-18
जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केले परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥382॥
ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्म हे सर्व देहालाच मानले आहे, त्याला आत्म कर्ता आहे अशी बुद्धी होणे अगदी साहजिक आहे. 382
383-18
आत्माचि कर्मकर्ता । हाही निश्चयो नाही तत्वता । देहोचि मी कर्मकर्ता । मानितो साचे ॥383॥
आत्मा हा कर्म कर्ता आहे असाही पक्का निश्चय जो करीत नाही, तो खरोखरच देहालाच कर्मकर्ता असे मानतो. 383
384-18
जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु । हे आपुली कही मातु । नायकेचि कानी ॥384॥
कारण मी आत्मा कर्मातीत असून सर्व कर्मांना साक्षीभूत आहे, अशी स्वस्वरूपाची गोष्ट तो कारणानेही कवी ऐकत नाही; 384
385-18
म्हणौनि उमपा आत्मयाते । देहचिवरी मविजे एथे । विचित्र काई रात्रि दिवसाते । डुडुळ न करी ? ॥385॥
म्हणून सर्वव्यापक असा जो आत्मा, तो देहच होय असे तो मानतो. काय चमत्कार पहा, की घुबड हे आपले डोळे झाकून घेऊन दिवसालाच रात्र म्हणत नाही काय ? 385
386-18
पै जेणे आकाशीचा कही । सत्य सूर्यु देखिला नाही । तो थिल्लरींचे बिंब काई । मानू न लाहे ? ॥386॥
हे पहा, ज्याने आकाशातील खऱ्या सूर्यास कधी पाहिले नाही, तो डबक्यातील पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबास सूर्य समजत नाही काय ? 386
387-18
थिल्लराचेनि जालेपणे । सूर्यासि आणी होणे । त्याच्या नाशी नाशणे । कंपे कंपू ॥387॥
डबक्यात पाणी साचले म्हणजे सूर्य जन्मास आला असे म्हणतो, तेच पाणी वाऱ्याने हालले म्हणजे सूर्यास कंप सुटला असे म्हणतो आणि डबके कोरडे पडले म्हणजे सूर्याचा नाश झाला असे समजतो, 387
388-18
आणि निद्रिस्ता चेवो नये । तव स्वप्न साच हो लाहे । रज्जु नेणता सापा बिहे । विस्मो कवण ? ॥388॥
आणि निजलेला जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत त्याला स्वप्न खरे भासते; यालाही दोरी आहे हे कळत नाही, तो तिला समजून भितो, यात नवल ते कोणते ? 388
388-18
जव कवळ आथि डोळा । तव चंद्रु देखावा की पिवळा । काय मृगीही मृगजळा । भाळावे नाही ? ॥389॥
जोपर्यंत काळी झालेली आहे, तोपर्यंत चंद्राचा रंग पिवळा दिसतो. अरे, मृगजलाला भुलू नये, तर मग कोणी भुलावे ? 389
390-18
तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे । जो वाराही टेको नेदी सिवे । केवळ मौढ्याचेनिचि जीवे । जियाला जो ॥390॥
त्याप्रमाणे शास्त्र व गुरू याची नावे उच्चारल्याबरोबर तो त्याचा वाराही आपल्या शिवेस लागू देत नाही. कारण तो मूर्खपणाच्या जोरावर वाचलेला असतो, 390
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-18
तेणे देहात्मदृष्टीमुळे । आत्मया घापे देहाचे जाळे । जैसा अभ्राचा वेगु कोल्हे । चंद्री मानी ॥391॥
अभ्रे चालत असली म्हणजे ज्याप्रमाणे कोल्हे हे चंद्र चालतो असा त्याचेवर आरोप करतात, त्याप्रमाणे त्याने देहात आत्मा आहे, अशा दृष्टीने आत्म्याला देहरूप जाळे घातले आहे. 391
392-18
मग तया मानणयासाठी । देहबंदीशाळे किरीटी । कर्माच्या वज्रगाठी । कळासे तो ॥392॥
मग अर्जुना, त्याच्या या समजुतीने देहरूपी बंदीशाळेत कर्माच्या बळकट गाठीने तो बंदिवान होतो
393-18
पाहे पा बद्ध भावना दृढा । नळियेवरी तो बापुडा । काय मोकळेयाही पायाचा चवडा । न ठकेचि पुंसा । ॥393॥
अरे, हे पहा, बिचारा राघो (पोपट) नळीवर वर बसलेला असतो, तो मी बांधला गेलो आहे, अशा दृढ कल्पनेने आपल्या मोकळ्या पायाचा पंजा मोकळा असूनही ती नळी सोडत नाही,
394-18
म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपी । तो प्रकृतीचे केले आरोपी । तो कल्पकोडीच्या मापी । मवीचि कर्मे ॥394॥
म्हणून निर्मळ अशा आत्मस्वरूपावर जो देहाने केलेल्या कर्माचा आरोप करतो, तो कल्प कोटीपर्यंत कर्मातच गुंडाळला जातो. येथून पुढच्या श्लोकास अवतरण देतात.
395-18
आता कर्मामाजी असे । परी तयाते कर्म न स्पर्शे । वडवानळाते जैसे । समुद्रोदक ॥395॥
आता कर्म करीत असूनही ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही, जसा वडवानळ हा समुद्रात असूनही त्याला समुद्र स्पर्श करीत नाही,
396-18
तैसेनि वेगळेपणे । जयाचे कर्मी असणे । तो कीर वोळखावा कवणे । तरी सांगो ॥396॥
तसे जो अलिप्तपणे कर्म करीत असतो, तो खरोखर कसा ओळखावा, ते सांगतो. 396
397-18
जे मुक्ताते निर्धारिता । लाभे आपलीच मुक्तता । जैसी दीपे दिसे पाहता । आपली वस्तु ॥397॥
मुक्ताच्या स्वरूपाविषयी विचार करू लागले असता आपली स्वाभाविक असणारी मुक्तता आपल्यास प्राप्त होते. जसे दिव्याच्या उजेडाने पाहू लागल्यावर आपली वस्तू आपल्याला दिसते; 397
398-18
नातरी दर्पणु जव उटिजे । तव आपणपया आपण भेटिजे । का तोय पावता तोय होईजे । लवणे जेवी ॥398॥
अथवा आरसा स्वच्छ करू लागले असता आपले स्वरूप त्यात आपणास दिसते किंवा मिठ पाण्यात घातले असते त्याचे पाणी होते; 398
399-18
हे असो परतोनि मागुते । प्रतिबिंब पाहे बिंबाते । तव पाहणे जाउनी आयिते । बिंबचि होय ॥399॥
फार काय; प्रतिबिंब मागे परतून आपल्या बिंबाला जो पाहू लागते तो त्याचे पाहणेपणही जाऊन ते सहजच बिंबच बनते. 399
400-18
तैसे हारपले आपणपे पावे । तै संतांते पाहता गिंवसावे । म्हणौनि वानावे ऐकावे । तेचि सदा ॥400॥
तसे संतांच्या स्थितीचा विचार केला असता आपले हरवलेले स्वरूप आपल्यास मिळते; म्हणून संतांचे नेहमी वर्णन करावे व त्यांचेच गुण नेहमी श्रवण करावे. 400
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३०४ वा. ३१, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६३७ ते ३६४८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३६३७ (पाईकाचेअभंग)
एकाच स्वामीचे पाईक सकळ । जैसे बळ तैसे मोल तया ॥१॥
स्वामिपदी एका ठाव उंच स्थळी । एक ती निराळी जवळी दुरी ॥धृपद॥
हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥२॥
पाईकपणे तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या वाव ॥३॥
तुका म्हणे मरण आहे या सकळा । भेणे अवकळा अभये मोल ॥४॥
अर्थ
एकाच स्वामीचे सर्व शिपाई असतात परंतू ज्या सेवकाची जशी योग्यता असेल तसे मोल त्याला मिळते. त्याप्रमाणे देवाचे जे सेवक आहेत त्यांचे भक्ती, ज्ञान, वैराग्य पाहून स्वामी त्यांना योग्य तो मोल देतो. व स्वामी सेवकाचा अधिकार पाहून आपल्या उच्च आसनावर किंवा योग्यतेप्रमाणे जवळ दूर ठेवून सेवकाला मोल देत असतात. हीन कर्म करणारा सेवक असेल तर स्वामी त्याला हीन स्थान देतो आणि उच्च कर्म करणारा सेवक असेल तर स्वामी त्याला उच्च पद देतो. जो खरा सेवक आहे तो त्याच्या सेवेने सर्वत्र मान्य होतो आणि जे भित्रे आहेत युध्दाच्या प्रसंगी पळून जाणारे आहेत केवळ वरवर शूराच्या गप्पा मारणारे आहेत ते सर्वापासून वेगळे निवडले जातात. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व सेवकांना मरण तर आहेच परंतू जो युध्दाच्या प्रसंगी भितो त्याला अवकळा होते आणि जो भित नाही त्याला मोल मिळते. ”
12:24
अभंग क्र. ३६३८ (पाईकाचेअभंग)
प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठी एक जैसे तैसे ॥१॥
आगळे पाऊल आणिकासी तारी । पळती माघारी तोडिजेती ॥धृपद॥
पाठीवरी घाय म्हणती फटमर । नीधडा अंगे शूर मान पावे ॥२॥
घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥३॥
तुका म्हणे नव्हे बोलाचे कारण । कमाईचा पण सिद्धी पावे ॥४॥
अर्थ
प्रजेमध्ये शिपाई निवडला जातो व शिपायामध्येही एक सर्वश्रेष्ठ शिपाई निवडला जातो काही शिपाई पोटाकरता सेवक होतात मग ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला मोल मिळते. युध्दाच्या प्रसंगी ज्या शूर शिपायाचा पाऊल युध्द करण्यासाठी नेहमी पुढे असतो तो सर्वापेक्षा वेगळा असून तो इतरांनाही तारतो आणि जे भित्रे शिपाई असतात ते माघारी पळतात व शत्रूच्या हाताने तोडले जातात. जे शूर शिपाई असतात ते शत्रूच्या पाठीवर पाय देवून त्यांना मारतात व अशा निधडया शिपायालाच खरा मान प्राप्त होतो. देहावर सर्व वार सहन करुन शत्रूचे सर्व हरण करतो तोच खरा शूर शिपाई होय. तुकाराम महाराज म्हणतात, “केवळ वरवर युध्दाच्या गप्पागोष्टी मारुन उपयोग होत नाही तर युध्दाच्या वेळी मी हे असे काही युध्द करीन की सर्व पाहात राहातील असा पण (शपथ) जो करतो त्याचाच पण सिध्दीला जात असतो. ”
12:24
अभंग क्र. ३६३९ (पाईकाचेअभंग)
जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायी ॥१॥
धरितील पोटासाठी हतियेरे । कळती ती खरे वेठीचींसी ॥धृपद॥
जीताचे ते असे खरे घायडाय । पारखिया काय पाशी लोपे ॥२॥
तुका म्हणे नमूं देव ह्मुण जना । झालियांच्या खुणा जाणतसो ॥३॥
अर्थ
जो खरा जातवान सेवक आहे तोच खऱ्या सेवकाला ओळखतो व त्याच्या एकाच्याच ठिकाणी त्याचा आदरही असतो. मग इतर सर्व शिपाई पोटासाठी हत्यार हातात धरतात त्यांनाही हे कळते की आपण केवळ बिगाऱ्यासारखेच काम करत आहोत. जे खरे जातीचे शिपाई आहेत त्यांनाच इतर शिपायाचे धाय डाय कळत असतात कारण ते खरे पारखे आहेत आणि जे खरे परीक्षक आहेत त्यांच्यापुढे ते कसे लपले जातील ? तुकाराम महाराज म्हणतात, “सर्वत्र एक देव आहे सर्व लोकांमध्ये देव आहे हे आम्ही ओळखले आहे त्यामुळे आम्ही सर्व लोकापुढे नतमस्तक होऊ आणि या लोकांमध्येही कृतार्थ जे झाले आहेत त्यांचे लक्षण आम्ही ओळखू कारण आम्ही खरे परीक्षक आहोत. ”
12:24
अभंग क्र. ३६४० (सीताशोक)
रामा वनवास । तेणे वसे सर्व देश ॥१॥
केले नामाचे जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥धृपद॥
वनांतरी रडे । ऐसे पुराणी पवाडे ॥२॥
तुका म्हणे ॠषिनेम । ऐसा कळोनि का भ्रम ॥३॥
अर्थ
श्रीरामचंद्रांनी दंडकारण्यामध्ये वास केला त्या निमित्ताने तेथे खूप लोकांची वस्ती झाली आहे. त्यांनी आपल्या पितृआज्ञेचे पालन करुन आपल्या नामाचे रक्षण केले समर्थ कधीही आपण दिलेले वचन मोडत नाही त्याचे रक्षण करतो. सीतेकरता श्रीराम वनामध्ये रडत होते असे पोवाडे पुराणात आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “काही लोक म्हणतात की सीतेसाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र वनामध्ये रडत होते पण वाल्मिकी ऋषींनी जसे रामायण लिहिले तसेच वर्तन प्रभूंना करणे गरजेचे होते हे तुम्हाला सर्व माहित असतानाही प्रभू रडत होते याविषयी भ्रम का धरता ? ”
12:24
अभंग क्र. ३६४१ (सीताशोक)
राम म्हणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउली ॥१॥
धन्यधन्य ते शरीर । तीर्थ व्रतांचे माहेर ॥धृपद॥
राम म्हणे करिता धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥२॥
राम म्हणे ग्रासोग्रासी । तोचि जेविला उपवासी ॥३॥
राम म्हणे भोगी त्यागी । कर्म न लिंपे त्या अंगी ॥४॥
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे तो जीवन्मुक्त ॥५॥
अर्थ
वाटेने चालत असताना मुखाने “राम राम” असे उच्चार केला तरी पावलापावली यज्ञ केल्याचे पुण्य घडते. आणि जे शरीर रामनामाचे उच्चार करते ते शरीर धन्य आहे व सर्व तीर्थांचे व व्रतांचे ते शरीर माहेरच आहे. कोणताही कामधंदा करताना जो मुखाने “राम राम” असे म्हणतो त्याला नेहमी सुखाची समाधी लागते. जो प्रत्येक घासाघासाला रामनामाचा उच्चार करतो तो जेवलेला असला तरी देखील त्याला उपवास घडतो. कोणत्याही प्रकारचा भोग करताना किंवा त्याग करताना जो मुखाने रामनामाचा उच्चार करतो त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे कर्म लागत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे जो रामनामाचा जप नित्य करतो तो जीवनमुक्त होतो. ”
12:24
अभंग क्र. ३६४२ (सीताशोक)
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥
तो हा न करी ते काई । का रे लीन व्हा ना पायी ॥धृपद॥
शीळा मनुष्य झाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥२॥
वानरा हाती लंका । घेवविली म्हणे तुका ॥३॥
अर्थ
जड दगडाला देखील जो पाण्यावर तारत आहे, अहो मग तो राम काय एक करु शकत नाही मग तुम्ही लोक त्याच्या पायावर लीन का होत नाहीत ? जी अहिल्या गौतम ऋषींच्या शापाने शिळा होऊन पडली होती तीच अहिल्या प्रभू श्रीराम मार्गाने चालत असताना त्यांच्या चरणस्पर्शाने पुन्हा मनुष्य झाली. तुकाराम महाराज म्हणतात, “प्रभू रामचंद्रांनी वानरांच्या मदतीने आपल्या हाती लंका घेतली. ”
12:24
अभंग क्र. ३६४३ (सीताशोक)
राम म्हणता रामचि होईजे । पदी बैसोन पदवी घेईजे ॥१॥
ऐसे सुख वचनी आहे । विश्वासे अनुभव पाहे ॥धृपद॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवी ॥२॥
तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगे ॥३॥
अर्थ
राम म्हटले की मनुष्य रामच होतो त्यामुळे राम नाम उच्चार करुन रामाच्या पदी बसून रामाचीच पदवी मनुष्याने घ्यावी. खरोखरच रामनामामध्ये अशा प्रकारचे सुख आहे की मनुष्य त्याच्याच पदवीवर आरुढ होतो त्यामुळे तुम्ही देखील विश्वास ठेवून अनुभव घेऊन पाहा. रामरसाची चव जर एकदा घेतली तर त्या रसापुढे इतर कोणतेही रस कोणालाही आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “रामरसाची चव मी चाखून पाहिलेली आहे आणि त्याचा अनुभव मला आलेला आहे व तोच अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. ”
12:25
अभंग क्र. ३६४४ (सीताशोक)
रामराम उत्तम अक्षरे । कंठी धरिली आपण शंकरे ॥१॥
कैसी तारक उत्तम तिही लोका । हळाहळ शीतळ केले शिवा देखा ॥धृपद॥
हाचि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥२॥
जुन्हाट नागर नीच नवे । तुका म्हणे म्या धरिले जीवे भावे ॥३॥
अर्थ
“रामराम” ही अक्षरे अतिशय उत्तम आहेत भगवान शंकराने स्वत: आपल्या कंठामध्ये ही दोन अक्षरे धरली आहेत. हे रामनाम त्रिभूवनात लोकांना तारणारी उत्तम साधन आहे ज्यावेळी भगवान शंकराने मंथनामध्ये निघालेले हलाहल विष प्राशन केले त्यावेळी त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला व त्यांनी रामनाम जप करुन दाह शीतल केला. हाच मंत्र भगवान शंकरांनी पार्वतीला केला व तिच्या गर्भादी योनी चुकल्या. तुकाराम महाराज म्हणतात, “रामनाम हे अतिशय अनादी असून सुंदर व नित्य नवे आनंद देणारे आहे त्यामुळे मी जीवेभावे माझ्या कंठात ते धारण केले आहे. ”
12:25
अभंग क्र. ३६४५ (सीताशोक)
राम म्हणता तरे जाणता नेणता । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥
राम म्हणता न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥धृपद॥
राम म्हणे तया नये जवळी भूत । कैचा यमदूत म्हणता राम ॥२॥
राम म्हणता तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणता राम ॥३॥
तुका म्हणे हे सुखाचे हे साधन । सेवी अमृतपान एका भावे ॥४॥
अर्थ
जो मनुष्य मुखाने रामनाम घेतो मग तो ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो कोण हीन असो किंवा कोणत्याही जातीचा असो त्याचा उध्दार होतोच. रामनाम घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सायास, कष्ट करावे लागत नाही रामनामाचे उच्चार केले असता महादोषही जळून जातात. मुखाने राम म्हटले तर जवळ भूतही येत नाही आणि यमदूतही येत नाहीत. मुखाने रामनाम घेतले की भवसिंधू तरुन पार जाता येते आणि जन्ममरणाचे येरझार चुकतात. तुकाराम महाराज म्हणतात, “हे लोकहो रामनाम हेच सुखाचे साधन आहे व तेच नामामृतपान एकनिष्ठ भक्तीभावाने सेवन करा. ”
12:25
अभंग क्र. ३६४६ (सीताशोक)
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥
अवघे लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापिले सर्वत्र बाहेरी भीतरी आत ॥धृपद॥
अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥२॥
तुका म्हणे ऐक्या भावे रामेसी भेटी । करूनि घेई आता संबंधेशी तुटी ॥३॥
अर्थ
हे भूपती रावणा पलीकडे राम वानरसेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आला आहे असे रावणाचे दूत रावणाला सांगत आहेत व त्याला म्हणत आहेत तू अजूनही का असावधपणे झोपलेला आहेस ? अरे त्या रामाचे दूत म्हणजे वानर सर्व लंकेत घुसले आहेत प्रत्येकाच्या घरात बाहेर ते व्यापून उरले आहेत. अरे तुझे अतिशय प्रिय आणि शूरवीर असे योध्दे यांनी मारले आहे त्यामुळे तू प्रभू श्रीरामचंद्रांना शरण तरी जा किंवा युध्दासाठी तयार तरी व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, “आणि पुढे ते सेवक रावणाला म्हणतात की आता तू एकनिष्ठेने प्रभू रामचंद्रांना शरण जा आणि सर्व संसारीक संबंध टाक म्हणजे झाले. ”
12:25
अभंग क्र. ३६४७ (सीताशोक)
समरंगणा आला । रामे रावण देखिला ॥१॥
कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनिया रणी ॥धृपद॥
प्रेमसुखाचे संधान । बाणे निवारिती बाण ॥२॥
तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥३॥
अर्थ
युध्द करण्यासाठी रावण युध्दभूमीवर आला त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रानी रावणाला पाहिले. आता ते दोघे आपले नांव बाजूला सारुन रणांगणामध्ये युध्द भूमीमध्ये एकमेकांना कसे भिडतील ते पाहा. खरोखर त्या दोघामध्ये प्रेमसुखाचे संधान आहे त्यामुळेच दोघानीही एकमेकांवर बाणे चालवून त्याचे निवारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या स्वामी रघुनाथाने खरे वर्म जाणून युध्दामधे मोठा पराक्रम केला आहे. ”
12:26
अभंग क्र. ३६४८ (सीताशोक)
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥
लंकाराज्ये बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥धृपद॥
औदार्याची सीमा । काय वर्णु रघुरामा ॥२॥
तुका म्हणे माझा दाता । रामे सोडविली सीता ॥३॥
अर्थ
प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करुन त्याचा भवसागरातील सर्व उपाधींचा संबंधच तोडून टाकला. लंकेच्या राज्यावर बिभिषणाला बसविले व त्याची तेथे चिरकाल स्थापना केली. हे रघुरामा तुझ्या औदार्याची सीमा काय वर्णन करावी. तुकाराम महाराज म्हणतात, “माझा दाता प्रभू श्रीरामचंद्र याने सीतामातेला लंकेतून सोडविले. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

