Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

२३ ऑक्टोबर, दिवस २९६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३५४१ ते ३५५२

23 OCTOBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

23 OCTOBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“२३ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 23 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २३ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३५४१ ते ३५५२ चे पारायण आपण करणार आहोत.
२३ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १७६ ते २००,

176-18
म्हणौनि फळी लागु । सांडोनि देहसंगु । कर्मे करावी हा चांगु । निरोपु माझा ॥176॥
म्हणून फलाविषयी आशा सोडून व मी कर्ता हा अभिमान सोडून कर्मे करावी, अशी उत्तम प्रकारची माझी आज्ञा आहे. ॥176॥
177-18
जो जीवबंधीं शिणला । सुटके जाचे आपला । तेणे पुढतपुढती या बोला । आन न कीजे ॥177॥
जो जन्ममृत्युचा येरझारा करिता करीता त्रासून गेला आहे व आपली त्यापासून सुटका कशी होईल, या काळजीत आहे त्याला वारंवार सांगणे आहे कि. त्याने या आज्ञेचे उल्लंघन करू नये. ॥177॥

नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥18. 7॥
178-18
नातरी आंधाराचेनि रोखे । जैसी डोळा रोविजती नखे । तैसा कर्मद्वेषे अशेखे । कर्मेचि सांडी ॥178॥
एखादा मनुष्य अंधारातून चालत असता धक्का बसल्यावर त्याबद्दलचा राग डोळ्यांवर काढून डोळ्यात नखे बोचतो, त्याप्रमाणे कर्मे जन्मबंधास कारण आहे, म्हणून त्यांच्यावर रागावून जो ती सर्व कून देतो, ॥178॥
179-18
तयाचे जे कर्म सांडणे । ते तामस पै मी म्हणे । शिसाराचे रागे लोटणे । शिरचि जैसे ॥179॥
॥त्याच्या त्याच्या कर्मत्यागस मी तामस त्याग म्हणतो याप्रमाणे अर्धशिशी उठल्यावर रागाने आपले शिरच कापतो. ॥179॥
180-18
हा गा मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये । की तेचि खांडणे आहे । मार्गापराधे ॥180॥
अरे, वाट जरी वाईट असली तरी पायांनीच चालून संपवली पाहिजे, पण त्या वाटेच्या वाईट पणाबद्दल पाय तोडावी की काय ? ॥180॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


181-18
भुकेलियापुढे अन्न । हो का भलतैसे उन्ह । तरी बुद्धी न घेता लंघन । भाणे पापरा हल्या ॥181॥
भूक लागलेल्या मनुष्यापुढे अति कढत अन्न ठेवले आणि त्याला ते सहन न होऊन त्याने त्याने ते लाथेने झुगारून दिले, तर त्याला लंगनच करावे लागणार ! ॥181॥
182-18
तैसा कर्माचा बाधु कर्मे । निस्तरीजे करितेनि वर्मे । हे तामसु नेणे भ्रमे । माजविला ॥182॥
त्याप्रमाणे कर्माचे युक्तीने आचरण केले असता कर्माचा दोष नाहीसा होतो. हे तो तामस मनुष्य भ्रमिष्ट झाला असल्यामुळे त्याला समजत नाही. ॥182॥
183-18
की स्वभावे आले विभागा । ते कर्मचि वोसंडी पै गा । तरी झणे आतळा त्यागा । तामसा तया ॥183॥
तो आपल्या धर्माप्रमाणे आपल्यास करावयाची जे कर्म ते टाकून देतो, तेव्हा तु त्या तामस मनुष्याप्रमाणे कर्म त्यागाच्या स्वाधीन होऊ नको, ॥83॥
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥18. 8॥
184-18
अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे । परी करितया उमजे । निबरपणा ॥184॥
अथवा, आपला अधिकार काय आहे हे जाणतो व आपली विहित कर्म कोणतेही त्यास माहीतच आहे परंतु ती कर्मे करण्याच्या क्लेशास भिऊन जो त्यांजविषयी कंटाळा करतो; ॥184॥
185-18
जे कर्माची ऐलीकड । नावेक दिसे दुवाड । जे वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी ॥185॥
कर्माचा आरंभ क्षणभर कठीण दिसतो खरा जशी शिदोरी नेते वेळेस जड लागते. ॥185॥


186-18
जैसा निंब जिभे कडवटु । हिरडा पहिले तुरटु । तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ॥186॥
जसा लिंब खाताना जिभेला कडू लागतो व हिरडा तुरट लागतो, तसा कर्माच आरंभ कठीण वाटतो; ॥186॥
187-18
का धेनु दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग । भोजनसुख महाग । पाकु करिता ॥187॥
किंवा काय मारकट असली, शेवंतीच्या झाडाला काटे आहेत स्वयंपाक करतेवेळेस भोजनाचे सुख नसते ॥187॥
188-18
तैसे पुढतपुढती कर्म । आरंभीच अति विषम । म्हणौनि तो ते श्रम । करिता मानी ॥188॥
तसे कर्म आरंभी तेवढेच अतिकठोर असते, म्हणून ते करण्याचे श्रम होतात; असे तो समजतो. ॥188॥
189-18
येऱ्हवी विहितत्वे मांडी । परी घालिता असुरवाडी । तेथ पोळला ऐसा सांडी । आदरिलेही ॥189॥
बाकी कर्माचा आरंभ यथाविधि करतो; पण कढत वस्तू हातात घेऊन हात भाजतात ती टाकून द्यावी, त्याप्रमाणे त्या कर्माचरणापासून श्रम होऊ लागल्यावर ती कर्मे मध्येच टाकतो; ॥189॥
190-18
म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुती भाग्यविशेखी । मा जाचू का कर्मादिकी । पापिया जैसा ? ॥190॥
आणि म्हणतो की, भाग्य म्हणून माझे महतभाग्य म्हणून देहासारखी उत्तम वस्तू लाभली असता, पाप्यायाप्रमाणे कर्माचे आचरण करू मी आपल्याच त्रास का करून घ्यावा ? ॥190॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


191-18
केले कर्मी जे द्यावे । ते झणे मज होआवे । आजि भोगू ना का बरवे । हातीचे भोग ? ॥191॥
कर्माचे आचरण करून त्यापासून मिळणारे जे भोग त्यांची गरज नाही; तर आज जे आपल्यास ऐश्वर्य प्राप्त झाले आहे, त्याचा उपभोग का घेऊ नये ? ॥191॥
192-18
ऐसा शरीराचिया क्लेशा । भेणे कर्मे वीरेशा । सांडी तो परीयेसा । राजसु त्यागु ॥192॥
अशाप्रकारे अर्जुना, शरीरास क्लेश होतील या भीतीने जो कर्मे टाकून देतो, त्याला राजस त्याग असे म्हणतात, ॥192॥
193-18
येऱ्हवी तेथही कर्म सांडे । परी तया त्यागफळ न जोडे । जैसे उतले आगी पडे । ते नलगेचि होमा ॥193॥
त्याठिकाणी ही कर्मत्याग होतो; परंतु त्याला कर्म त्यागाचे फळ मिळत नाही, ज्याप्रमाणे उतू आलेले तूप आगीत पडले, तरी त्याला होमाची योग्यता प्राप्त होत नाही. ॥93॥
194-18
का बुडोनि प्राण गेले । ते अर्धोदकी निमाले । हे म्हणो नये जाहले । दुर्मरणचि ॥194॥
किंवा एखाद्याचा पाण्यात बुडून प्राण गेला असता त्याने जलसमाधी घेतली असे म्हणता येत नाही, तर त्याचे ते अपघाताचे मरण असे म्हटले पाहिजे, ॥194॥
195-18
तैसे देहाचेनि लोभे । जेणे कर्मा पाणी सुभे । तेणे साच न लभे । त्यागाचे फळ ॥195॥
त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवून ज्याने कर्मांवर पाणी सोडले, त्याला कर्म त्यागाचे फळ खास मिळत नाही. ॥195॥


196-18
किंबहुना आपुले । जै ज्ञान होय उदया आले । तै नक्षत्राते पाहले । गिळी जैसे ॥196॥
किंबहुना ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, त्याला सुर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे नक्षत्राचे तेच लोपते, ॥196॥
197-18
तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया । तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी ॥197॥
त्याप्रमाणे अर्जुना, ज्या कर्मत्याग पासून ज्ञानासह क्रियांचा लोप होतो, त्यापासून मोक्षप्राप्ती होते ॥197॥
198-18
ते मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाही अर्जुना । म्हणौनि तो त्यागु न माना । राजसु जो ॥198॥
अर्जुना, ती मोक्षप्राप्ती अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता होत नाही, म्हणून तो खरा कर्मत्याग नसून राजस त्याग होय. ॥198॥
199-18
तरी कोणे पा एथ त्यागे । ते मोक्षफळ घर रिघे । हेही आइक प्रसंगे । बोलिजेल ॥199॥
तर कोणत्या त्यागा पासून मोक्षप्राप्ती आपल्या घरी चालत येते, तेही प्रसंगानुरोधाने तुला सांगतो, ते ऐक. ॥199॥

कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन ।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥18. 9॥
200-18
तरी स्वाधिकाराचेनि नांवे । जे वांटिया आले स्वभावे । ते आचरे विधिगौरवे । शृंगारोनि ॥200॥
तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज आपल्या वाट्यास आलेली कर्म, ते साहित्यासह गौरवाने यथाविधि आचरण करितो; ॥200॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २९६ वा. २३, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३५४१ ते ३५५२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

अभंग क्र. ३५४१ (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
का माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणे ॥१॥
कैसा कंठूनिया राहो संवसार । काय एक धीर देऊ मना ॥धृपद॥
नाही निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसा काही ॥२॥
तुका म्हणे एक वेचूनि वचन । नाही समाधान केले माझे ॥३॥
अर्थ
हे माझ्या मायबापा तुम्ही माझ्यावर विसर का पाडला आहे माझा असा कोणता गुण आहे की ज्यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा करत नाहीत ? या संसारामध्ये मी कसे कंठून राहू आणि माझ्या मनाला धीर तरी कसा देऊ ? आम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करु नये अशी वार्ता तुमच्याकडून अजूनही आम्हाला पोहोचली नाही त्यामुळेच माझ्या मनाला धीर धरवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही एक शब्द देखील खर्च केला नाही व माझे समाधान केले नाही. ”
12:02
अभंग क्र. ३५४२ (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
काही माझे कळो आले गुणदोष । म्हणऊनी उदास धरिले ऐसे ॥१॥
नाही तरी येथे न घडे अनुचित । नाही ऐसी रीत तया घरी ॥धृपद॥
कळावे ते मना आपुलिया सवे । ठायीचेहे घ्यावे विचारूनी ॥२॥
तुका म्हणे मज अव्हीरीले देवे । माझीया कर्तव्ये बुद्धीचिया ॥३॥
अर्थ
माझे काही गुणदोष देवाला कळून आले आहे की काय म्हणूनच तो माझ्याविषयी असा उदास राहिला आहे ? नाहीतर देवाकडून असा अनुचित प्रकार घडलाच नसता भक्तांविषयी उदासिनता धरावी अशी रीत देवाच्या घरची नाही आपल्यामध्ये काय गुणदोष आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे आणि माझ्यामध्ये काय गुणदोष आहेत हे जर मला कळले तर त्याचा मी समूळ नाशच करेन. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या बुध्दीचा काहीतरी दोष असावा त्यामुळेच देवाने माझा अव्हेर केला असेल. ”
12:02
अभंग क्र. ३५४३ (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
नव्हे धीर काही पाठवू निरोप । आला तरी कोप येऊ सुखे ॥१॥
कोपोनिया तरी देईल उत्तर । जैसे तैसे पर फिरावूनि ॥धृपद॥
नाही तया तरी काय एक पोर । मज तो माहेर आणीक नाही ॥२॥
तुका म्हणे असे तयामध्ये हित । आपण निवांत असो नये ॥३॥
अर्थ
आता देवाकडे पुन्हा निरोप पाठवण्याविषयी मला धीर निघवत नाहीये आणि पुन्हा निरोप पाठवल्याबद्दल देवाला राग आला तर येऊ दयावा. रागाच्या निमित्ताने हा होईना देव मला काहीतरी उत्तर तरी देईल आणि जसे देईन तसे उत्तर देवोत आणि जर पटले तर ठिक नाही पटले तर पुन्हा देवाला निरोप पाठवता येईल. देव कोणा कोणाच्या निरोपाचे उत्तर देईल त्याला पोर आहे काय परंतू असे जरी असले तरी मला तर माहेर तेवढेच एक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “परंतू आपण मात्र निवांत बसून सारखे त्याला निरोप पाठवत राहावे यामध्येच आपले खरे हित आहे. ”
12:02
अभंग क्र. ३५४४ (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
आता पंथ पाहे माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखे ॥१॥
काय करू आता न गमेसे झाले । बहुत सोसिले बहु दिस ॥धृपद॥
घर लागे पाठी चित्ता उभे वारे । आपुले ते झुरे पाहावया ॥२॥
तुका म्हणे जीव गेला तरी जावो । धरिला तो देव भाव शुध्द ॥३॥
अर्थ
आता मी पाठवलेल्या माझ्या माहेरच्याकडे निरोपाची वाट पाहात राहीन मागे प्रपंचाच्या कामाचा कितीही राडा पडो कितीही त्याचा भोगवाटा होवो तो खुशाल होऊ देईन. आता काय करावे या संसारामध्ये मला आता राहावेसे वाटत नाही कारण या संसारामध्ये मी खूप दिवसापासून खूप त्रास सहन केला आहे. घर पाठीमागे लागले आहे चित्ताला उभे वारे सुटले आहे प्रिय मायबापाना पाहाण्यासाठी मन झुरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाविषयी जो शुध्दभाव मनामध्ये धरला आहे तो तसाच टिकून राहो मग जीव गेला तरी जावो त्याविषयी अजिबात चिंता नाही. ”
12:03
अभंग क्र. ३५४५ (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
विनवीजे ऐसे भाग्य नाही देवा । पायाशी केशवा सलगी केली ॥१॥
धीटपणे पत्र लिहिले आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥धृपद॥
जेथे देवा तुझा न कळेचि पार । तेथे मी पामर काय वाणू ॥२॥
जैसे तैसे माझे बोल अंगीकारी । बोबडा उत्तरी गौरवितो ॥३॥
तुका म्हणे विटेवरी जी पाउले । तेथे म्या ठेविले मस्तक हे ॥४॥
अर्थ
हे देवा तुझ्या पायाजवळ विनंती करावी एवढे देखील भाग्य माझे नाही परंतू हे केशवा तरी देखील मी तुझ्या पायाशी सलगी केली आहे. देवा मी धीटपणाने परंतू आवडीने तुम्हाला पत्र लिहिले आहे तुमचा अंत:पार माझ्या अल्पबुध्दीला कळत नाही. अहो देवा जेथे वेदाला तुमचा अंत:पार कळत नाही तेथे मी पामराने तुमच्याविषयी काय वर्णन करावे. देवा मी ज्या शब्दाने तुमचे गौरव करील ते शब्द जसे असतील तसे तुम्ही त्याचा अंगीकार करा बोबडया शब्दाने का होईना परंतू मी तुमचे गुण गौरव करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “विटेवर जी पाऊले आहेत त्या पावलांवर मी मस्तक ठेवले आहे. ”
12:03
अभंग क्र. ३५४६ (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनी ॥१॥
पातकांच्या रासी नासितोसी नामे । जळतील कर्मे महा दोष ॥धृपद॥
सर्व सुखे तुझ्या वोळंगती पायी । रिद्धी सिद्धी ठायी मुक्तिचारी ॥२॥
इंद्रासी दुर्लभ पाविजे ते पद । गीत गाता छंद वाता टाळी ॥३॥
तुका म्हणे जड जीव शक्तीहीन । त्यांचे तू जीवन पांडुरंगा ॥४॥
अर्थ
देवांच्याही देवा गोपिकांच्या पती तुझी त्रिभूवनामध्ये तू उदार आहे अशी ख्याती आहे. देवा तुझ्या नामाने तू अनेक पातकांच्या राशी नाहीशा करुन कर्मे व महादोष जाळून टाकतोस. देवा सर्व सुखे तुझ्या पायाजवळ लोटांगण घेतात आणि रिध्दी सिध्दी व चारही मुक्ती तर तुझ्या पायाच्या ठिकाणीच आश्रय घेतात. इंद्रादेवाला जे पद दुर्लभ आहे ते पद हरीचे नाम गीतात गाताना व त्या छंदामध्ये टाळी वाजविल्यानंतर प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू जड जीवाचा व शक्तीहीन असलेल्या जीवाचे जीवन आहेस. ”
12:03
अभंग क्र. ३५४७ (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
काय झाले नेणो माझिया कपाळा । न देखीजे डोळा मूळ येता ॥१॥
बहु दिस पाहे वचनासी वास । धरिले उदास पांडुरंगा ॥धृपद॥
नाही निरोपाचे पावले उत्तर । ऐसे तो निष्ठूर न पाहिजे ॥२॥
पडिला विसर किंवा काही धंदा । याहूनि गोविंदा जरूरसा ॥३॥
तुका म्हणे आले वेचाचे साकडे । देणे घेणे पुढे तोही धाक ॥४॥
अर्थ
माझ्या माहेराहून पंढरीहून मला मूळ येताना दिसणार नाहीये हेच माझ्या नशिबी आहे काय माहित माझ्या नशिबाला नेमके झाले तरी काय तेही मला काही कळनासे झाले आहे. पाडूरंगाकडून काहीतरी निरोपाची वाट येईन अशी मी अपेक्षा धरुन बसलो आहे परंतू पाडूरंगानेच माझ्याविषयी उदासिनता धरलेली आहे. मी कितीही पाडूरंगाला उत्तर पाठविले तरी त्याच्याकडून काही मला उत्तर येत नाही परंतू हे पाडूरंगा इतकेही पाडूरंगाने निष्ठूर नसावे. मला काही उत्तर न पाठवायचे कारण म्हणजे पाडूरगाला माझा विसर पडलाय काय कि काही महत्वाचे काम त्याच्याकडे आले आहे हे मला काही कळेनासे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे नुसते तुला निरोप पाठवले तर त्याचे उत्तर पाठवण्याचे साकडे तुला वाटते आहे तर मग पुढे देण्याघेण्याचा धाक तर तुला वाटतच असेल असे मला वाटते. ”
12:03
अभंग क्र. ३५४८ (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
एवढा संकोच तरि का व्यालासी । आह्मी कोणांपाशी तोंड वासू ॥१॥
कोण मज पुसे सिणले भागले । जरी मोकलिले तुह्मी देवा ॥धृपद॥
कवणाची वाट पाहो कोणीकडे । कोण मज ओढे जीवलग ॥२॥
कोण जाणे माझे जीवीचे साकडे । उगवील कोडे संकटाचे ॥३॥
तुका म्हणे तुह्मी देखिली निश्चिंती । काय माझे चित्ती पांडुरंगा ॥४॥
अर्थ
तुझ्याजवळ आम्ही निरोप पाठवला आणि त्या निरोपाविषयी तुला उत्तर दयायचे तर इतका संकोच तुला वाटतच होता तर आम्हाला तू जन्मालाच का घातलेस तुझ्यावाचून देवा आम्ही कोणापुढे तोंड वासावे ? देवा अरे तू जर आमचा असा त्याग केलास तर आम्ही थकलो त्रासलो तर तुझ्यावाचून आमची दुसरी कोण विचारपूस करणार आहे. देवा मी कोणाची वाट कोणीकडे पाहू मला प्रेमाने जवळ ओढून घेईल असा जिवलग कोण आहे ? देवा माझ्या जीवाचे साकडे कोण जाणून घेईल कोण माझ्या संकटाचे कोडे सोडवील ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा माझ्या चित्तामध्ये निश्चिंती आहे असे तुम्हाला वाटले आहे की काय ? ”
12:04
अभंग क्र. ३५४९ (पंढरीसजाणाऱ्यावारकऱ्यांबरोबरदेवासपत्र)
देई डोळे भेटी न धरी संकोच । न घली काही वेच तुजवरी ॥१॥
तुज बुडवावे ऐसा कोण धर्म । अहर्नीशी नाम घेता थोडे ॥धृपद॥
फार थोडे काही करूनि पातळ । त्याजमध्ये काळ कडे लावू ॥२॥
आहे माझी तेचि सारीन सिदोरी । भार तुजवरी नेदी माझा ॥३॥
तुका म्हणे आम्हा लेकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥४॥
अर्थ
देवा माझ्या डोळयांना तू भेट दे याविषयी काही मनामध्ये तू संकोच धरु नकोस तुझ्या दर्शनावाचून दुसरा कोणताही खर्चाचा भार मी तुझ्यावर घालणार नाही. देवा आम्ही तुला बुडवावे हा कोणता धर्म झाला अरे रात्रंदिवस आम्ही तुझे नाम घेतो हे काय थोडे झाले आहे ? देवा थोडे फार पातळ तुझ्या नामाचे कालवण करु तेच आम्ही सेवन करु आणि त्यामध्येच काळ कडेला लावू. देवा माझ्या प्रारब्धाची शिदोरी जशी असेल तशी मी भोगून ती बाजूला सारीन परंतू त्याचा भार मी तुझ्या माथ्यावर सोपवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आईबापाना भेटण्यासाठी आम्हा लेकरांची तळमळ असते अशीच आम्हा लेकरांची जात आहे. ”

अभंग क्र. ३५५० (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
सीण भाग हरे तेथींच्या निरोपे । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥
इंद्रियांची धाव होईल कुंटित । पावेल हे चित्त समाधान॥धृपद॥
माहेर आहेसे लौकिकी कळावे । निढळ बरवे शोभा नेदी ॥२॥
आस नाही परी उरी बरी वाटे । आपले ते भेटे आपणासी ॥३॥
तुका म्हणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊ नेदी ॥४॥
अर्थ
देवाने पाठविलेल्या निरोपाने माझा सर्व शीणभार हरणार आहे आणि देवाचे रुप पाहिले की माझी काही इच्छाच मागे राहाणार नाही. इंद्रियांचे सर्व धावाधाव कुंठीत होईल आणि चित्त समाधानी पावेल. देवा तू मला माझ्या निरोपाचे उत्तर पाठव आणि लोकांना कळू दे की मला देखील माहेर आहे मला असे मोकाट टाकणे हे शोभणारे नाही. देवा मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही परंतू आपलीच माणसे आपल्याला जर भेटली तर मग बरे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला तुमच्याविषयी अवीट आवड आहे त्यामधे तातडीने खंड पडेल असे काही तुम्ही होऊ देऊ नका. ”
अभंग क्र. ३५५१ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
धरितो वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाही आला ॥१॥
तळमळी चित्त घातले खापरी । फुटतसे परी लाहीचिया ॥धृपद॥
प्रकार ते काही नावडती जीवा । नाही पुढे ठावा काळ हाती ॥२॥
जातो तळा येतो मागुता लवकरी । वोळशाचे फेरी सापडलो ॥३॥
तुका म्हणे बहु करितो विचार । उतरे डोंगर एक चढे ॥४॥
अर्थ
देवा मी तुझ्या प्राप्तीची खूप वासना मनामध्ये धरतो परंतू मला फळ काही मिळत नाही यावरुन असे लक्षात येते की तुझ्या प्राप्तीचा काळ अजून आलेला नाही. देवा माझे चित्त तापलेल्या खापरामध्ये धान्य टाकल्यावर जशा लाह्या फुटतात अगदी तसे तळमळत आहे. देवा तुझ्या प्राप्तीवाचून मला दुसरे कोणतेही भोग आवडत नाहीत आणि तुझी भेट केव्हा होईल हे मला माहित नाही काळ तर माझ्या हातात नाही. देवा मला तुझी प्राप्ती केव्हा होईल या विचारचक्रात माझा जीव सापडला आहे तुझ्या भेटीची आशा संपली की मन निराशेच्या तळाला जाते व पुन्हा भेटीची आशा निर्माण झाली की मन परत माघारी येते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुझ्या भेटीविषयी खूप विचार करत आहे जशा एखादा डोंगर उतरावा आणि दुसरा चढावा अगदी त्याप्रमाणे. ”
12:04
अभंग क्र. ३५५२ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
का माझे पंढरी न देखती डोळे । काय हे न कळे पाप यांचे ॥१॥
पाय पंथे का हे न चलती वाट । कोण हे अदृष्ट कर्म बळी ॥धृपद॥
का हे पायावरी न पडे मस्तक । क्षेम का हस्तक न पवती ॥२॥
का या इंद्रियांची न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हा कीर्ती ॥३॥
तुका म्हणे कई जाऊनि मोटळे । पडेन हा लोळे महाद्वारी ॥४॥
अर्थ
माझे डोळे पंढरी या क्षेत्राला का पाहात नाहीत काय माझ्या डोळयांचे पाप आहेत ते मला काही समजत नाही. माझे पाय पंढरीची वाट का बरे चालत नाही असे कोणते यांचे अदृष्ट आणि बलवत्तर पाप आहे हे मला काही समजेना. माझे मस्तक विठोबाच्या पायावर का पडत नाहीत माझे दोन्ही हात विठोबाला क्षेम आलिंगन देण्यासाठी का पुढे होत नाहीत ? माझ्या इंद्रियांची वासना पूर्ण का होत नाही का बरे माझी वाणी विठोबाचे किर्ती वर्णन करुन पवित्र होईना ? तुकाराम महाराज म्हणतात, “केव्हा माझ्या देहाचे मोटाळे पंढरीला जाऊन पडेल आणि केव्हा ते महाद्वारामधे लोळण घेईल ? ”


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version