“२५ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २५ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २५ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२५ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी २६ ते ५०,
26-10
तेचि षष्ठामाजी प्रगट । आसनालागोनि स्पष्ट । जीवात्मभाव एकवट । होती जेणे ॥26॥
ज्या योगाने जीवात्मभावाचे ऐक्य होते, तेच योगतत्व सहाव्या अध्यायात आसनादि अंगासह स्पष्ट करून सांगितले.
27-10
तैसी जे योगस्थिती । आणि योगभ्रष्टा जे गती । ते आघवीचि उपपत्ती । सांगितली षष्ठी ॥27॥
त्याचप्रमाणे योग्यांना प्राप्त होणारी स्थिती व योगभ्रष्टांना प्राप्त होणारी गती, हे संपूर्ण वर्णन सहाव्या अध्यायात सांगितले आहे.
28-10
तयावरी सप्तमी । प्रकृतिपरिहार उपक्रमी । करूनि भजती जे पुरुषोत्तमी । ते बोलिले चाऱ्ही ॥28॥
त्यानंतर सातव्या अध्यायात प्रकृतिनाश कसा करावयाचा, याचा उपक्रम करताना, भगवंताच्या भजन करणार्या चार भक्तांचे वर्णन केले.
29-10
पाठी सप्तमींची प्रश्नसिद्धी । बोलोनि प्रयाणसमयसिद्धी । एवं ते सकळवाक्यअवधि । अष्टमाध्यायीं ॥29॥
नंतर सात प्रश्नांची उत्तरे देऊन, मरणकाळी जी काळशुध्दी पाहिजे, तिचे वर्णन केले. याप्रमाणे आठव्या अध्यायातील भगवद्वाक्याची समाप्ती झाली.
30-10
मग शब्दब्रह्मी असंख्याके । जेतुला काही अभिप्राय पिके । तेतुला महाभारते एके । लक्षे जोडे ॥30॥
जेवढे असंख्यात शब्दब्रह्म म्हणजे वैदिक वाङ्गमय आहे, त्यातून जो काही निष्कर्ष निघतो, तितका सर्व एक लक्ष श्लोक संख्या असलेल्या महाभारतातून मांडलेला आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-10
तिये आघवाचि जे महाभारती । ते लाभे कृष्णार्जुनवाचोक्ती । आणि जो अभिप्रावो सातेशती । तो एकलाचि नवमी ॥31॥
आणि संपूर्ण महाभारतात जे सांगितले आहे, ते सर्व कृष्णार्जुन संवादभूत गीतेत सांगितले असून, या सातशें श्लोक रूपी गीतेचा जो मथितार्थ आहे, तो एकट्या नवव्या अध्यायात आहे.
32-10
म्हणौनि नवमीचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मग मी वाया । गर्व का करू ? ॥32॥
म्हणून नवव्या अध्यायातील अभिप्रायावर एकदम मत देण्याचे वेदाला देखील भय वाटते, तेथे मी व्यर्थच कशाला अभिमान वागवूं.
33-10
अहो गूळासाखरे मालयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे । परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥33॥
गुळ, साखर, राब हे एका उसाच्या रसाचेच घनीभूत प्रकार असले तरी त्यांच्या गोडीची रुची जशी निरनिराळी असते (त्याप्रमाणे येथील अध्याय एका ब्रह्माचेच प्रतिपादन करीत असले तरी त्यांच्या प्रतिपादनाची गोडी निरनिराळी आहे. )
34-10
एक जाणोनिया बोलती । एक ठाये ठावो जाणविती । एक जाणो जाता हारपती । जाणते गुणेशी ॥34॥
काही अध्याय ब्रह्म जाणून त्याविषयी बोलतात, तर काही अध्याय तेथल्या तेथे दुसर्याला परब्रह्मवस्तूची जाणीव करून देतात. काही अध्याय परब्रह्माला जाणण्याकरिता गेले असता जाणिवेसह लय पावतात.
35-10
हे ऐसे अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्यपण नवमाचे । तो अनुवादलो हे तुमचे । सामर्थ्य प्रभू ॥35॥
असे गीतेचे अध्याय आहेत. पण हा नववा अनिर्वाच्य आहे. त्याचे वर्णन करवत नाही, पण त्याचा अनुवाद केला गेला हे, महाराज श्रीगुरुनाथा ! तुमचेच सामर्थ्य होय.
36-10
अहो एकाचि शाटी तपिन्नली । एकी सृष्टीवरी सृष्टी केली । एकी पाषाणी वाऊनि उतरली । समुद्री कटके ॥36॥
अहो श्रीगुरुराया ! एकाच्या (वसिष्ठाच्या) छाटीने प्रकाश देण्याची कामगिरी केली. एकाने (विश्वामित्राने) सृष्टिसारखी प्रतिसृष्टि उत्पन्न करून दाखविली. एकाने (नीलवानराने) समुद्रात दगड तरवून त्यावरून सैन्य उतरविले.
37-10
एकी आकाशी सूर्याते धरिले । एकी चुळीचि सागराते भरिले । तैसे मज मुकयाकरवी बोलविले । अनिर्वाच्य तुम्ही ॥37॥
एकाने (मारूतीने) आकाशांतील सूर्याला धरले. एकाने (अगस्ति ऋषीने) संपूर्ण समुद्र एकाच चुळीने पोटात सांठविला, त्याप्रमाणे मज मुक्याकडून तुम्ही या अनिर्वाच्य अशा नवव्या अध्यायातील विषय प्रगट करविला.
38-10
परि हे असो एथ ऐसे । राम रावण झुंजिन्नले कैसे । राम रावण जैसे । मीनले समरी ॥38॥
पण हे असो, ज्याप्रमाणे श्रीराम व रावण युध्द कसे झाले असे विचारल्यास श्रीराम रावणासारखे झाले असे म्हणावे लागते (त्याला त्याचाच दृष्टांत द्यावा लागतो. दुसरा दृष्टांतच नाही असा भाव. )
39-10
तैसे नवमी कृष्णाचे बोलणे । ते नवमीचियाचि ऐसे मी म्हणे । या निवाडा तत्त्वज्ञु जाणे । जया गीतार्थु हातीं ॥39॥
त्याप्रमाणे येथे नवव्या अध्यायातील भगवान श्रीकृष्णाचे बोलणे नवव्या अध्यायातील बोलण्यासारखेच आहे. त्याला दुसर्या अध्यायाचा दृष्टांत देता येत नाही, असे मी म्हणतो. व हा माझा निर्णय बरोबर आहे किंवा नाही हे, ज्याच्या दृष्टीसमोर गीतार्थ आहे ते तत्वज्ञ पुरुष जाणतात.
40-10
एवं नवही अध्याय पहिले । मिया मतीसारिखे वाखाणिले । आता उत्तरखंड उवाइले । ग्रंथाचे ऐका ॥40॥
याप्रमाणे पहिल्या नऊ अध्यायांचे यथामति व्याख्यान मी केले आहे. येथून ग्रंथाच्या उत्तरखंडाचे क्रमप्राप्त अख्यान श्रवण करा.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-10
जेथ विभूति प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ॥41॥
जेंथे या अध्यायात भगवान अर्जुनाला आपल्या प्रधान व गौण विभूती आता सांगणार आहेत, ती कथा अत्यंत रसभरीत शब्दाने मी तुम्हाला निरूपण करणार आहे.
42-10
देशियेचेनि नागरपणे । शांतु शृंगाराते जिणे । तरि ओंविया होती लेणे । साहित्यासि ॥42॥
(ज्या देशी मराठी भाषेत मी, ती कथा निरूपण करणार आहे. ) त्या मराठी भाषेच्या सौंदर्यामुळे त्यात प्रतिपादिलेला शांतरस, श्रृंगाररसाला देखील फिका पाडील, तेव्हा माझ्या ओव्या साहित्यालाहि अलंकाराप्रमाणे सुशोभित करतील.
43-10
मूळ ग्रंथीचिया संस्कृता । वरि मऱ्हाठी नीट पढता । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हे न चोजवे ॥43॥
गीता ग्रंथाच्या मूळच्या संस्कृत भाषेवर माझी केलेली मराठी भाषेतील टीका नीट पडताळून पाहता, मी काढलेला अभिप्राय योग्य आहे असे मान्य झाल्यास, मूळ कोणते हे निवडता येणार नाही.
44-10
जैसे अंगाचेनि सुंदरपणे । लेणिया आंगचि होय लेणे । तेथ अळंकारिले कवण कवणे । हे निर्वचेना ॥44॥
ज्याप्रमाणे अत्यंत सुंदर शरीरावर घातलेल्या अलंकाराला ते शरीरच लेणे होते म्हणजे शोभा आणते, मग कोणी कोणाला शोभा आणली हे सांगता येत नाही.
45-10
तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सोकासनी । शोभती आयणी । चोखट आइका ॥45॥
त्याप्रमाणे मूळ गीता ग्रंथाची संस्कृत भाषा व माझ्या टीकेची मराठी भाषा ह्या दोन्ही एक भावार्थरूप पालखींत बसून कशा चातुर्याने शोभतात, हे लक्ष देऊन ऐका.
46-10
उठावलिया भावा रूप । करिता रसवृत्तीचे लागे वडप । चातुर्य म्हणे पडप । जोडले आम्हा ॥46॥
चित्तात स्फुरलेल्या भावार्थाचे स्पष्टीकरण करतांना किंवा तो व्यक्त करतांना, त्याला रसभरित भाषेचा पाऊस लागेल व त्यामुळे आजच्या जगात या अशा भाषेने आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असे चातुर्य म्हणेल.
47-10
तैसे देशियेचे लावण्य । हिरोनि आणिले तारुण्य । मग रचिले अगण्य । गीतातत्त्व ॥47॥
तसे मराठी भाषेचे सर्व सौंदर्य एकत्र करून रसाला तारूण्य आणले व मग त्या योगाने अमर्याद अशा गीता तत्वाची मराठी भाषेत रचना केली.
48-10
जो चराचर परमगुरु । चतुर चित्तचमत्कारु । तो ऐका यादवेश्वरु । बोलता जाहला ॥48॥
जो चराचर ब्रह्मांडाचा आद्यगुरु, थोर जाणत्याच्याहि चित्ताला आश्चर्यचकित करून सोडणारा, असा तो यादवांचा राजा भगवान श्रीकृष्ण पुढे बोलू लागला.
49-10
ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसे बोलिले श्रीहरी तेणे । अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणे । धडौता आहासि ॥49॥
श्रीनिवृत्तिनाथांचे ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले, की अर्जुना ! सर्वच गोष्टी ऐकतांना तू अंतःकरणाने योग्य असतोस म्हणजे एकाग्र चित्ताने ऐकतोस.
श्रीभगवानुवाचः
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥10. 1॥
50-10
आम्ही मागील जे निरूपण केले । ते तुझे अवधानचि पाहिले । तव टाचे नव्हे भले । पुरते आहे ॥50॥
अर्जुना ! मी मागे जे निरूपण केले, ते तुझे चित्त एकाग्र आहे किंवा नाही हे पाहण्याकरिताच होते, पण ते अर्धवट नसून पूर्ण एकाग्र होते, हे कळून आले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ११५ वा, २५, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १३६९ ते १३८०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १३६९
मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरू । लाज नाही धरू प्रीती कैशी ॥१॥
मागिलां पुढिलां एकी सरोवरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥धृपद॥
आन दिसे परी मरण चि खरे । सांपळा उंदिरे सामाविली ॥२॥
तुका म्हणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसो आली ॥३॥
अर्थ
ज्यांचे नवरे मेले आहे त्या स्त्रिया लेकरू व्हावे अशी इच्छा करतात. त्यांना त्याविषयी मोह धरावा याची त्यांना लाज कशी वाटत नाही. पती जिवंत असताना केलेला व्यवहार, गेल्यानंतर केलेला व्यवहार जर सारखाचं होऊ लागला तर त्या स्त्रियांचे वागणे म्हणजे काळाच्या पेटीवर बसून काळाच्या खांद्यावर जाण्यासारखे कृत्य आहे. उंदीर जसा आपले घर समजून बिळात शिरतो, पण त्यात त्याचे त्यात खरे मरण असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळी विषयापासून मन परत येते त्याच वेळेस आत्मज्योति आपल्याला दिसून येते.
अभंग क्र. १३७०
निष्ठुर मी जालो अतिवादागुणे । हे का नारायणे नेणिजेल ॥१॥
सांडियेली तुम्ही गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हाती ॥धृपद॥
सांपडूनि संदी केली जीवेसाठी । घ्यावयासि तुटी कारण हे ॥२॥
तुका म्हणे तुज काय म्हणो उणे । नाही अभिमाने चाड देवा ॥३॥
अर्थ
मी अतिगुण, अतिवादी या गुणामुळे निष्ठुर झालो आहे हे नारायणाला काही समजत नाही काय ? नारायण मुळे मी सर्व गोत्रजांसी संबंध तोडून टाकला आणि कर्माच्या हाताने मी माझे डोके फोडले. देवा तुम्ही मला या संसारात जन्माला घालून या देहाला “मी” असे म्हणायला लावले आणि त्यामुळे संसाराला माझा जीव मी अर्पण केला व त्यामुळे अनेक दुःख मी भोगु लागलो आहे. त्याचा अर्थ तुम्ही माझी उपेक्षा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात पण देवा यात तुझा तरी काय दोष आहे म्हणा, मी तर खरा अभिमान आहे आणि ज्याच्या अंगी अभिमान असतो त्याची आवड तुला नसते देवा.
अभंग क्र. १३७१
माझे माझ्या हाता आले । आता भले सकळ ॥१॥
कशासाठी विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥धृपद॥
जाली तया दुःखे तुटी । मागिल पोटी नसावे ॥२॥
तुका म्हणे शुद्धकुळ । तेथे मळ कशाचा ॥३॥
अर्थ
माझे आत्मस्वरूप माझ्या हाती आले त्यामुळे सर्व काही भले झाले. आता मी विषमतेला कशासाठी थारा देऊ कारण त्याने अंतकरण विटाळत असते. पूर्वी झालेल्या दुःखाचा आत्मज्ञानामुळे विसर पडला त्यामुळे मागील दुःखाची मनात आठवण न झालेलीच चांगली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आत्मज्ञानामुळे माझे कुळ शुद्ध झाले मग तेथे कशाचा मळ राहिला आहे ?
अभंग क्र. १३७२
समर्थपणे हे करा संपादणी । नसतेचि मनी धरिल्याची ॥१॥
दुसऱ्याचे येथे नाही चालो येत । तरि मी निवांत पाय पाहे ॥धृपद॥
खोटियाचे खरे खरियाचे खोटे । मानले गोमटे तुम्हासी ते ॥२॥
तुका म्हणे तुम्हा सवे करिता वाद । होईजे ते निंद्य जनी देवा ॥३॥
अर्थ
देवा आम्हा भक्तांचा उद्धार तुम्हाला करायचा नसेल तर निदान आमच्यासाठी घेतलेल्या सोंगाची संपादनी तरी कर. तुझ्या भक्तांचा उद्धार दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही ते त्यांना जमणारही नाही त्यामुळे मी तुझ्या पायाकडे डोळे लावून एक सारखा पाहत आहे. खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणे हे तुम्हाला चांगले जमते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्याशी मी वाद करत बसणार नाही कारण तुमच्याशी जो कोणी वाद करतो तो लोकांमध्ये नींद्य ठरतो.
अभंग क्र. १३७३
तुम्हा आम्हासवे न पडावी गाठी । आलेति जगजेठी कळो आता ॥१॥
किती म्हणो आता वाईटा वाईट । शिवो नये वीट आल्यावरी ॥धृपद॥
बोलिल्याची आता हेचि परचित । भीड भार थीत उडवीली ॥२॥
तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणे ते किती कोठे देवा ॥३॥
अर्थ
हे जगजेठी आता यापुढे तुमची व माझी गाठ पडू नये कारण तुम्ही कसे आहात ते मला चांगलेच समजले आहे. एखाद्या वाईट गोष्टीला किती वेळ वाईट म्हणावे, एखाद्या गोष्टीचा वीट आला असेल तर त्याला स्पर्श देखील करू नये. देवा मी तुमच्याविषयी वाईट बोलतोय कारण त्याविषयी मला अनुभव आला आहे आणि त्याच कारणामुळे मी तुमच्याशी कोणतीही भीडभाड ठेवली नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या वाईट वागणुकीची मला आता चांगलीच अनुभूती आली आहे आणि तू तुझे दुर्गुण कितीदा आणि कोठे झाकून ठेवणार आहे ?
अभंग क्र. १३७४
सकळ सत्ताधारी । व्हावे ऐसे काय हरी ॥१॥
परि या कृपेच्या वोरसे । कुढावया चेचि पिसे ॥धृपद॥
अंगे सर्वोत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥२॥
तुका म्हणे दाता । तरि हा जीव दान देता ॥३॥
अर्थ
हे हरी तू सर्वसत्ताधारी आहेस तरी तू असे का झालास ? देवाने प्रेमपान्हा सोडण्याऐवजी नुसताच कुढत बसलेला आहे. हा देव अंगाने सर्वोत्तम आहे, सर्व काम आहे, आत्मतृप्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात जर हा दाता असता तरी आम्हाला जीवदान दिले असते.
अभंग क्र. १३७५
कोणापाशी द्यावे माप । आपे आप राहिले ॥१॥
कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥धृपद॥
एके दाखविले दाहा । फाटा पाहा पुसून ॥२॥
तुका म्हणे सरले वोझे । आता माझे सकळ ॥३॥
अर्थ
आता कोणाकडे संचित कर्माचा हिशोब द्यावा कारण सर्वकाही आपोआप क्षीण झालेले दिसते आहे. आता कशासाठी खटाटोप करायचा दूर काय आणि जवळ ते काय ? एकाच्या आकडे पुढे शून्य दाखविला तर दहाचा आकडा तयार होतो आणि एकाच्या आकड्या खालचा फाटा पुसला की दोन्ही शून्य होते. तुकाराम महाराज म्हणतात आता त्याचप्रमाणे माझे अहंमतेचे ओझे संपलेले आहे म्हणजे मी माझ्या देहाचा देहभाव नाहीसा केलेला आहे.
अभंग क्र. १३७६
नभोमय जाले जळ । एकी सकळ हरपले ॥१॥
आता काय सारासारी । त्याच्या लहरी तयात ॥धृपद॥
कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपणा ॥२॥
तुका म्हणे कल्प जाला । अस्त गेला उदय ॥३॥
अर्थ
महाप्रलय झाला की सर्व आकाश जलमय दिसते पृथ्वी सकट पृथ्वीवरील सर्व जलाशयच होते. जिकडेतिकडे पाणीच असते आता यापुढे कोणत्याही पाण्याच्या हालचाली होतील काय ? पाण्याच्या लाटा त्याच्या पोटात मिसळणार तिथे नद्या ओढे याचे पाणी कसे मिसळणार कारण सर्व पाणी एक झालेले असते आणि पाण्याने आपण होऊन आपल्यालाच कोंडून टाकलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की कल्पांत झाला की चंद्र सूर्य यांचा उदय अस्त देखील नाहीसा होतो तात्पर्य एकदा की आत्मज्ञान झाले की सर्व भेद हरवून जातात.
अभंग क्र. १३७७
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥
कारण ते सत्ता शिरी । कोण करी अव्हेर ॥धृपद॥
वाहिले ते सुने खांदी । चाले पदी बैसविले ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरे । करुणाकरे रक्षीले ॥३॥
अर्थ
राजा ज्या प्रकारचे नाणी तयार करतो ते पैसे म्हणून व्यवहारात चलनात येतात. एवढेच काय तर चमड्यावर जरी राजाने मुद्रा छापली तर ते देखील पैसे म्हणून चालतात. राज्याची सत्ता सर्वावर असते त्यामुळे त्याचा अव्हेर कोणी करू शकतो काय ? राजाच्या लाडक्या कुत्र्याला जरी राजाने खांद्यावर वागविले किंवा सिंहासनावर बसविले तर त्या कुत्र्याची देखील सत्ता चालते. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे करुणासागर विश्वंभराने माझे रक्षण केले आता त्यामुळे त्याची माझ्यावर कृपा आहे व या कारणामुळे माझी सत्ता सर्व जगावर चालते.
अभंग क्र. १३७८
आम्ही देव तुम्ही देव । मध्ये भेव अधीक ॥१॥
कैवाडाच्या धावा लागे । मागे मागे विठ्ठले ॥धृपद॥
भेडसाविले हाके नादे । वोळखी भेदे मोडिली ॥२॥
तुका म्हणे उभा राहे । मागे पाहे परतोनि ॥३॥
अर्थ
लोकांनो तुम्ही आम्ही देव आहोत परंतु मध्ये संसाराचे भय निर्माण झाल्यामुळे जीवच राहिलो आहोत. निर्धारवंत संतांच्या मागे मागे तुम्ही धाव घ्या कारण ते जेथे जेथे असतात तेथे विठ्ठल त्यांच्या मागेमागे असतो. काळ आपल्याला आरोळी देऊन हाक मारत आहे आणि आपण भयभीत होत आहोत कारण आपण आपली ओळख विसरलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात अरे जीवा तू थोडा शांत उभा राहा आणि उपाधी पासून बाजूला हो मागे फिरून पहा मग तुला लक्षात येईल की तू जीव नसून ब्रम्ह आहेस.
अभंग क्र. १३७९
हीन शुर बुद्धीपासी । आकृतीसी भेद नाही ॥१॥
एक दांडी एक खांदी । पदी पदी भोगणे ॥धृपद॥
एकाऐसे एक नाही । भिन्न पाही प्रकृती ॥२॥
तुका म्हणे भूमी खंडे । पीक दंडे जेथे ते ॥३॥
अर्थ
हा हीन, हा शूर हा भेद बुद्धी पाशी आहे पण मूळ आकृतीला भेद नाही. एक मनुष्य पालखीत असतो तर त्याच पालखीच्या दांड्याला काही मनुष्य आपल्या खांद्यावर वाहत असतात या प्रकारे ते सर्व माणसे पदोपदी वेगवेगळे भिन्नभिन्न भोग भोगत असतात. जगामध्ये एकासारखे एक असे काहीच नाही परंतु कार्य, प्रकृती मात्र भिन्न भिन्न आहे. तुकाराम महाराज म्हणतात जगात पृथ्वी सर्वत्र एक सारखिच आहे असे वाटते परंतु प्रत्येक ठिकाणी पीक वेगवेगळे प्रमाणामध्ये येते म्हणजे काही ठिकाणी जास्त येते तर काही ठिकाणी कमी यावरून असे सिद्ध होते की भूमीतही भेद आहे.
अभंग क्र. १३८०
काय बोलो सांगा । याउपरी पांडुरंगा ॥१॥
काही आधारावाचून । पुढे न चले वचन ॥धृपद॥
वाढे ऐसा रस । काही करावा सौरस ॥२॥
भक्तीभाग्यसीमा । द्यावा जोडोनिया प्रेमा ॥३॥
कोरड्या उत्तरी । नका गौरवू वैखरी ॥४॥
करी विज्ञापना । तुका प्रसादाची दाना ॥५॥
अर्थ
हे पांडुरंगा यानंतर आता मी कोणत्या गोष्टीवर प्रतिपादन करू ते तुम्ही सांगा. देवा तुमच्या आणि वेदाच्या आधारा वाचून मला पुढे काही प्रतिपादन करता येणार नाही. त्यामुळे देवा आता माझ्या वचनांमध्ये रसाळपणा वाढेल असे तुम्ही करा. देवा मी केलेल्या काव्यरूपी अभंगांमध्ये भक्ती व भाग्य अलोट प्रमाणात वाढेल असे तुम्ही करा व त्यात तुमचे प्रेम द्यावे. माझ्या वाणीला फक्त कोरड्या शब्दाने गौरवु नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा नेहमी कृपा प्रसादाची दान तुम्ही मला द्या अशी विनंती मी तुम्हाला करत आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

