Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

५ एप्रिल, दिवस ९५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ११२९ ते ११४०

5 APRIL NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

5 APRIL NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“५ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ५ Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ५ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ११२९ ते ११४० चे पारायण आपण करणार आहोत.


५ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ५१ ते ७५,

51-9
परि भोगाचिये ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभे ठेलेचि सुखा भरे । ऐसे सुलभ आणि सोपारे । वरि परब्रह्म ॥51॥
परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील कांठावर उभे असतांही चित्त आनंदयुक्त होते, असे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म होय.
52-9
पै गा आणिकही एक याचे । जे हाता आले तरी न वचे । आणि अनुभविता काही न वेचे । वरि विटेहि ना ॥52॥
खरोखर या ज्ञानात आणखीही गुण आहेत, ते हे की, हे प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही; हे अनुभव घेतल्याने कमी होत नाही, तसेच जवळ असते, परंतु विटतही नाही.
53-9
येथ जरी तू तार्किका । ऐसी हन घेसी शंका । ना येवढी वस्तु हे लोका । उरली केवि पा ॥53॥
हे चतुर अर्जुना, आता, तू जर अशी शंका घेशील की, एवढी अप्रतिम वस्तु असता लोकांना मिळाल्याशिवाय कशी राहिली ?
54-9
एकोत्तरेयाचिया वाढी । जे जळतिये आगी घालिती उडी । ते अनायासे स्वगोडी । सांडिती केवि ॥54॥
जे लोक एकोत्रा व्याजाकरिता जळत्या आगीतही उडी घालण्यास मागेपुढे पहात नाहीत, ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकुन देतील ?
55-6
तरि पवित्र आणि रम्य । तेविचि सुखोपायेचि गम्य । आणि स्वसुख परि धर्म्य । वरि आपणपा जोडे ॥55॥
तरी पवित्र आणि रमणीय, तसेच सुख देणारे, जाणण्यास सुलभ, अति सुखकारक, धर्माला पूर्ण अनुकूल व आपले ठिकाणीच प्राप्त होणारे,


56-9
ऐसा अवघाचि सुरवाडु आहे । तरी जनाहाती केवि उरो लाहे । हा शंकेचा ठाव कीर होये । परि न धरावी तुवा ॥56॥
अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असतांही लोकांच्या हाती लागल्याशिवाय हे कसे राहिले, ही शंका घेण्यास जागा आहे खरी; परंतु तू अशी शंका घेऊ नको.

अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥9. 3॥

57-9
पाहे पा दूध पवित्र आणि गोड । पासी त्वचेचिया पदराआड । परि ते अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ॥57॥
पहा, गाईचे दूध हे पवित्र असून गोड आहे; तसेच अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आंतच आहे; परंतु त्याचा त्याग करून गोचीड रक्तच सेवन करीत नाही का ?
58-9
का कमलकंदा आणि दर्दुरी । नांदणुक एकेचि घरी । परि परागु सेविजे भ्रमरी । जवळिला चिखलुचि उरे ॥58॥
किंवा कमळाचा कांदा व बेडूक हे एकेच ठिकाणी वास्तव्य करतात, परंतु कमळांतील मकरंदाचे सेवन भ्रमर करतात व बेडकांच्या वाट्याला चिखलच राहतो !
59-9
नातरी निदैवाचा परिवरी । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । का दरिद्रे जिये ॥59॥
अथवा, दुर्दैव्याच्या घरी मोहरा वगैरे अगणित द्रव्य पुरलेले असूनही तो तेथे बसून उपास काढून दरिद्रावस्था भोगतो
60-9
तैसा हृदयामध्ये मी रामु । असता सर्वसुखाचा आरामु । की भ्रांतासी कामु । विषयावरी ॥60॥
त्याचप्रमाणे; मनुष्याच्या सर्व सुखाचे विश्रांतिस्थान असा मी ” राम ” मनुष्याच्या ह्रदयात असता त्या अज्ञानी पुरूषाची विषयावर वासना असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


61-9
बहु मृगजळ देखोनि डोळा । थुंकिजे अमृताचा गिळिता गळाळा । तोडिला परिसु बांधिला गळा । शुक्तिकालाभे ॥61॥
पुष्कळसे मृगजळ दृष्टीस पडून तोंडात असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, किंवा शिंप मिळाली असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा,
62-9
तैसी अहंममतेचिये लवडसवडी । माते न पवतीचि बापुडी । म्हणोनि जन्ममरणाची दुथडी । डहुळिते ठेली ॥62॥
त्याचप्रमाणे ज्यांचे मनावर अहंममतेचा पगडा बसलेला आहे, ते बिचारे मला प्राप्त होत नाहीत. म्हणून जन्ममरणांच्या दोन्ही तिरांच्या मध्येंच बुचकळ्या खात बसतात
63-9
एऱ्हवी मी तरी कैसा । मुखाप्रती भानु का जैसा । कही नसे न दिसे ऐसा । वाणीचा नव्हे ॥63॥
येरव्ही मी कसा आहे म्हणशील, तर सुर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाराला तोंडासमोर दिसतो, त्याचप्रमाणे आहे, परंतु त्याच्यात जी एक उणीव आहे, की तो केव्हा दिसतो व केव्हा दिसत नाही, ती मात्र माझ्यात नाही.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ॥9. 4॥

64-9
माझेया विस्तारलेपणाचेनि नांवे । हे जगचि नोहे आघवे । जैसे दूध मुराले स्वभावे । तरि तेचि दही ॥64॥
माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार कोणता म्हणशील, तर हे सर्व जगच नव्हे का ? ज्याप्रमाणे, दूध सहज जरी थिजले तरी तेच दही;
65-9
का बीजचि जाहले तरु । अथवा भांगारचि अळंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । ते हे जग ॥65॥
किंवा बीजाचाच वृक्ष होतो, अथवा सुवर्णाचे अलंकार होतात, त्याचप्रमाणे, निर्गुण असा जो एकटा मी, त्या माझा जो विस्तार तेच हे जग होय.


66-9
हे अव्यक्तपणे थिजले । तेचि मग विश्वाकारे वोथिजले । तैसे अमूर्तमूर्ति मिया विस्तारले । त्रैलोक्य जाणे ॥66॥
हे स्वरूप अव्यक्त असते. तेव्हा निराकार असते, तेच मग सृष्टीच्या रूपाने विस्तार पावून आकाराला येते. याप्रमाणे, निर्गुण असून साकार झालेला जो मी, त्यानेच हे त्रैलोक्य मांडले असे जाण.
67-9
महदादि देहाते । इये अशेषेही भूते । परि माझा ठायी बिंबते । जैसे जळी फेण ॥67॥
महात्तत्त्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते खरोखर माझ्यापासूनच उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे पाण्यापासून फेंस उत्पन्न होतो,
68-9
परि तया फेणांआंतु पाहता । जेवी जळ न दिसे पंडुसुता । नातरी स्वप्नीची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥68॥
परंतु त्या फेसाच्या आत पाहू गेले असता पाणी दिसत नाही, किंवा अर्जुना, स्वप्नात जीवाचे अनेक रूपे धारण करणे ज्याप्रमाणे जागे झाल्यावर नाहीसे होते,
69-9
तैसी भूते इये माझा ठायी । बिंबती तयांमाजी मी नाही । इया उपपत्ती तुज पाही । सांगितलिया मागा ॥69॥
त्याप्रमाणे, ही भूते जरी माझ्या ठिकाणी भासली, तरी त्यांचे ठिकाणी मी नाही. हे उत्पादन तुला मागे सांगितलेंच आहे. (अध्याय 7 श्लोक 12)
70-9
म्हणऊनि बोलिलिया बोलाचा आतिसो । न कीजे यालागी हे असो । तरी मजाआंत पैसो । दिठि तुझी ॥70॥
म्हणून, बोललेल्या गोष्टींचा पाल्हाळ करु नये. तेव्हा ते राहू दे. परंतु तुझ्या दृष्टीचा प्रवेश माझ्या अंतर्यामी होऊ दे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥9. 5॥

71-9
आमचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहो । तरी मजमाजि भूते हेही वावो । जे मी सर्व म्हणऊनि ॥71॥
मायेच्या पलीकडील माझे जे स्वरूप, ते जर कल्पनेशिवाय पाहू लागलास, तर माझे ठिकाणी सर्व भूते आहेत असे जे तुला सांगितले, ते सर्व मिथ्या आहे असे तुला भासेल; कारण सर्व मीच आहे.
72-9
एऱ्हवी संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळे । भूतभिन्न ऐसे देखे ॥72॥
एरव्ही, संकल्परूप संध्याकाळचे वेळेस ज्ञानरूप डोळे अज्ञानरूप अंधकाराने काही वेळ ग्रासले जातात; म्हणून त्या झांजडीत, मी अखंड असता भूते मजहून निराळी दृष्टीस पडतात.
73-9
तेचि संकल्पाची सांज जै लोपे । तै अखंडितचि आहे स्वरुपे । जैसे शंका जातखेवो लोपे । सापपण माळेचे ॥73॥
त्याच संकल्परूपी संध्याकाळचे वेळेचा लोप झाला म्हणजे, ज्याप्रमाणे नीळमण्याच्या माळेवर कवड्या सापाचा झालेला सर्व भास, शंका दूर होण्याबरोबर नाहीसा होतो, त्याप्रमाणे मी अखंड आहे असा दिसतो.
74-9
एऱ्हवी तरी भूमीआतूनि स्वयंभ । काय घडेया गाडगेयांचे निघती कोंभ । परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले की ॥74॥
येरव्ही जमिनीतून घागर, मडकी वैगेरेचे कोंब स्वतःसिद्ध निघतात काय ? परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात.
75-9
नातरी सागरीचा पाणी । काय तंरगाचिया आहाती खाणी । ते अवांतर करणी । वारयाची नव्हे ॥75॥
किंवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी का आहेत ? तर ते कृत्य वाऱ्याशिवाय इतराचे नव्हें;

दिवस ९५ वा, ५, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ११२९ ते ११४०
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. ११२९
गोहो यावा गावा । ऐसे नवस करी आवा ॥१॥
कैचे पुण्य तिये गाठी । व्रते वेची लोभासाठी ॥धृपद॥
वाढावे संतान । गृही व्हावे धनधान्य ॥२॥
मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥३॥
तुका म्हणे मोल । देउन घेतला सोमल ॥४॥
अर्थ

पती बाहेरगावी गेला असेल तर सुखरूप घरी यावा यासाठीच पत्नी नवस करते पण ते व्रत ती लोभासाठी करते त्यामुळे तिच्या ठिकाणी पुण्य राहत नाही. संतान वाढवावे घरांमध्ये धनधान्याची वाढ व्हावी यासाठी लोक यज्त्रयाग असे कर्म करतात. हे असे केले तर परीस देऊन त्याच्याबदल्यात गारगोटे मागितल्या सारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात सोमल नावाचे विष भरपूर द्रव्य देऊन विकत घ्यावे तसेच मूर्ख मनुष्य सकाम बुद्धीने व्रत करतात आणि ते व्यर्थ वाया घालवितात.
अभंग क्र. ११३०
जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥
बुका लावू नये भाळा । माळ घालू नये गळा ॥धृपद॥
तटावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
अर्थ

जेथे कीर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये. तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये. आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये. आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये कीर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघानाही नरक प्राप्त होते.
अभंग क्र. ११३१
लंकेमाजी घरे किती ती आइका । सांगतसे संख्या जैसीतैसी ॥१॥
पाच लक्ष घरे पाषाणांची जेथे । सात लक्ष तेथे विटबंदी ॥धृपद॥
कोटि घरे जेथे काशा आणि तांब्याची । शुद्ध कांचनाची सप्त कोटी ॥२॥
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगाते कवडी गेली नाही ॥३॥
अर्थ

हे लोक हो लंकेमध्ये रावणाची घरे किती होती ती जशीच्या तशी तुम्हाला मी सांगतो ते तुम्ही ऐका. पाच लक्ष घरे पाषाणाची, सात लक्ष घरे विटे बंदी होती, कोटी घरे काशाची होती आणि तांब्याची व कांचनाची सात कोटी घरी होते. तुकाराम महाराज म्हणतात सांगायचे तात्पर्य एवढेच की ज्या रावणाची एवढी संपत्ती होती तो रावण मेल्यानंतर त्याच्या संपत्तीमधील एक कवडी देखील त्याच्या बरोबर घेऊन गेला नाही.
अभंग क्र. ११३२
व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी । विश्वासतिचे मनी राघोबाचा ॥१॥
ऐसी ही पापिणी वाहीली विमानी । अचळ भुवनी ठेवियेली ॥धृपद॥
पतितपावन तिही लोकी ठसा । कृपाळू कोवसा अनाथांचा ॥२॥
तुका म्हणे धरा विठोबाची सोय । आणिक उपाय नेणो किती ॥३॥
अर्थ

गणिका नावाची वैश्या म्हणजे व्याभिचारी स्त्री होती तिला पोपट खूप आवडायचा. तिने एक पोपट पाळला त्या पोपटाचे नांव तिने ‘राघोबा ” असे ठेवले आणि तिच्या जीवनाच्या अंत काळी तिने त्या पोपटाला फक्त राघोबा या नावाने हाक मारली पण तिने पोपटाला रागोबा म्हटले तर देवा तू तिला जे अचल भवन ‘वैकुंठ ” आहे तिथे घेऊन गेला. म्हणूनच हे हरी तुझी कीर्ती दीनानाथ, पतितपावन, अनाथांचा आश्रय म्हणून सर्वत्र पसरलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे लोकांनो तुम्ही कोणत्याही उपायानी का होईना विठोबाचे पाय धरा, असे अनेक उपाय आहेत की त्याने विठोबा रायाचे पाय धारण करता येईल त्याची गणती ही करता येणार नाही.
अभंग क्र. ११३३
गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषे । जळामाजी नक्रे पीडिलासे ॥१॥
सुह्रदी सांडिले कोणी नाही साहे । अंती वाट पाहे विठो तुझी ॥धृपद॥
कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया दोघाजणा तारियेले ॥२॥
तुका म्हणे नेले वाहुनी विमानी । मी ही आईकोनी विश्वासलो ॥३॥
अर्थ

गजेंद्र नावाचा एक हत्ती आपल्या परिवारासह एका सरोवरात जलक्रीडा करत होता. त्यावेळी त्या गजेंद्र चा पाय एका नक्राने म्हणजे मगरीने धरला आणि त्यांचे हजारो वर्ष युद्ध चालू होते शेवटी तो गजेंद्र युद्ध करून करून जर्जर झाला. नंतर त्याचे सर्व नातेसंबंधी त्याला संकटात सोडून निघून गेले शेवटी त्या गजेंद्राने तुझी वाट पाहिली त्याने तुला आर्ततेने हाक मारली. हे कृपेच्या सागरा नारायणा त्यावेळी तू धावत जाऊन त्या गजेंद्र चा व नक्राचा उद्धार केला. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा देवा तु त्या दोघानाही विमानात बसून नेले ही कथा मी पुराणात ऐकली आहे त्यामुळेच तुझ्याविषयी माझा विश्वास दृढ झाला आहे.
अभंग क्र. ११३४
कै वाहावे जीवन । कै पलंगी शयन ॥१॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥धृपद॥
कै भौज्य नानापरी । कै कोरड्या भाकरी ॥२॥
कै बसावे वाहनी । कै पायी अनवाणी ॥३॥
कै उत्तम प्रावर्णे । कै वसने ती जीर्णे ॥४॥
कै सकळ संपत्ती । कै भोगणे विपत्ती ॥५॥
कै सज्जनाशी संग । कै दुर्जनाशी योग ॥६॥
तुका म्हणे जाण । सुख दुःख ते समान ॥७॥
अर्थ
अहो कधी आपल्या प्रारब्धानुसार डोक्यावर पाणी वाहण्याची वेळ आली तर पाणी देखील वहावे तर कधीकधी सुखाने पलंगावर झोपावे. जशी वेळ येईल त्याप्रमाणे बदल करून घ्यावे. कधीकधी विविध प्रकारचे पंचपक्वान्न खावे तर कधीकधी प्रारब्धाने कोरड्या भाकरी मिळाल्या तर त्या देखील खाव्यात. कधी चांगल्या प्रकारच्या वाहनात (बैल गाडी घोडे हत्ती) बसून फिरावे तर कधी अनवाणी पायी देखील जाण्याची वेळ आली तर चालावे. प्रारब्धानुसार आपल्याला जर चांगल्या प्रकारचे वस्त्र मिळाले तर कधी ते घालावे तर कधीकधी जीर्ण फाटलेले वस्त्र देखील घालण्याची वेळ आली तर घालावे. कधी संपत्तीचा भोग घ्यावा तर कधी विपत्तीचा देखील भोग घ्यावा. कधीकधी संत सज्जनांची संगती मिळते तर कधी कधी दुर्जनांशी गाठ भेट पडते. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानी लोक तेच जाणावे की ज्यांना सुख आणि दुःख हे सर्व समान आहे. क
अभंग क्र. ११३५
उंचनिच नेणे काही भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनिया ॥१॥
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी ॥धृपद॥
चर्म रंगू लागे रोहिदासासंगे । कबिराचे मागे शेले विणी ॥२॥
सजन कसाया विकु लागे मांस । माळा सावत्यास खुरपू लागे ॥३॥
नरहरी सोनारा घडु फुंकू लागे । चोख्यामेळ्या संगे ढोरे ओढी ॥४॥
नामयाची जनी सवे वेची सेणी । धर्मा घरी पाणी वाहे झाडी ॥५॥
नाम्यासवे जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥६॥
अर्जुनाची रथीहोय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ॥७॥
गौळियांचे घरी अंगे गाई वळी । द्वारपाळ बळीद्वारी जाला ॥८॥
यंकोबाचे ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥९॥
मिराबाई साठी घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥१०॥
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची । हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी ॥११॥
पुंडलिकासाठी अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१२॥
अर्थ

भक्त उच्च जातीचा आहे की नीच जातीचा आहे हे काहीही भगवंत पाहत नाही तर त्याची शुद्ध भक्तिभाव पाहूनच देव त्याचे कार्य करण्यास तत्पर असतो. विदुर दासीपुत्र आहे तरी देवाने त्याच्या घरी कण्या खाल्ल्या आणि दैत्याच्या म्हणजे हिरण्यकश्यपूचा घरी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. रोहिदासांच्या मागे कातडे रंगू लागला तर कबीरांच्या मागे शैले विनवू लागला. सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला तर सावतामाळी बरोबर त्यांचा मळा खुरपु लागतो. नरहरी सोनार यांच्याबरोबर भट्टी फुकून सोने घडू लागला तर चोखा महारा बरोबर त्यांची मेलेली ढोरे ओढू लागला. नामदेवांची दासी जनी हिच्याबरोबर गौर्‍या वेचु लागला. आणि धर्मराजाच्या घरी पाणी वाहून त्याची घरे झाडली, नामदेवा सोबत जेवण्यासाठी देवाने कोणताही संकोच धरला नाही आणि ज्ञानदेवा साठी याने भिंत चालवली. अर्जुनाच्या रथावर हा देव सारथी म्हणून स्वार झाला आणि गरीब सुदाम्याचे पोहे याने आवडीने सेवन केले. नंदराजाच्या घरी याने गायी वळल्या आणि बळीराजाच्या दाराचा हा भगवंत द्वारपाल झाला. एकनाथांच्या घरी भक्तीचे ऋण फेडण्या करिता त्याने गंगेचे पाणी कावडीने आणले आणि अंबरीश राजासाठी देवाने दहा गर्भवास सोसिले. ज्यावेळी मिराबाई ला विष दिले गेले त्यावेळी तिला जगविण्यासाठी देवाने स्वतःला ते विष प्राशन केले आणि दामाजीपंतांच्या हुंडीची भरपाई करण्याकरता देवच पाडेवार झाला. गोरोबाकाकांच्या बरोबर गाडगे तयार करू लागला आणि त्यासाठी डोक्यावर मातीही वाहू लागला आणि नरहरी मेहत्याची हुंडी देवाने स्वतः भरली. तुकाराम महाराज म्हणतात भक्त पुंडलिकासाठी हा देव अजूनही तिष्ठत उभा आहे ही त्याची कथा धन्य आहे.
अभंग क्र. ११३६
भेटीलागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझे मन वाट पाहे ॥धृपद॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धावूनि श्रीमुख दावी देवा ॥४॥
अर्थ

देवा तुझ्या भेटीची मला आस लागली आहे. मी तुझी वाट रात्रंदिवस पाहत आहे. पौर्णिमेचा चंद्र म्हणजे चकोराचे जीवनच आहे त्यामुळे तो चकोर चंद्र उगवण्याची वाट पाहत असतो, त्याप्रमाणे देवा मी तुझी वाट पाहत आहे. सासरी गेलेल्या मुलीने दिवाळीच्या वेळेस माहेर कडुन कोणीतरी बोलावण्याची जशी वाट पहावी त्याप्रमाणे माझे मन पंढरीची वाट पाहत आहे. जसे भूक लागल्यानंतर लहान मुले शोक करते ते फक्त त्याच्या मातेचीच वाटत पाहते. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे हे देवा आम्हाला तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे आणि त्यामुळे तू लवकर धावत आमच्याकडे ये आणि आम्हाला तुझे श्रीमुख दाखवायचं.
अभंग क्र. ११३७
आले संत पाय ठेविती मस्तकी । इहउभयलोकी सरता केलो ॥१॥
वंदीन पाउले लोळेन चरणी । आजि इच्छाधणी फिटईल ॥धृपद॥
अवघी पूर्व पुण्ये जाली सानुकूळ । अवघेचि मंगळ संतभेटी ॥२॥
तुका म्हणे कृतकृत्य जालो देवा । नेणे परि सेवा डोळा देखे ॥३॥
अर्थ

संत घरी आले आणि मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले त्यामुळे मी इहलोकात आणि परलोकात धन्य झालो. मी संतांचे पाऊले वंदीन त्यांच्या चरणावर लोटांगण घेईन कारण संतांच्या दर्शनाने माझ्या सर्व इच्छांची तृप्ती झाली आहे. आता माझे सर्व पूर्वपुण्य अनुकूल झाले कारण संतांच्या भेटीने सर्व मंगलमय झाले. तुकाराम महाराज म्हणतात देवा संतांच्या दर्शनाने मी आज कृतकृत्य झालो संतांची सेवा कशी करावी हे मला कळत नाही परंतु संतांचे दर्शन मला आज माझ्या डोळ्यांनी झाले.
अभंग क्र. ११३८
करी धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगो काय नेणा देवा ॥१॥
रूप डोळा देखे सदा सर्वकाळ । संपादितो आळ प्रपंचाचा ॥धृपद॥
नेमून ठेविली कारया कारणी । आमुचि ते वाणी गुण वदे ॥२॥
मनासी उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाही लोभ जीवा धन धान्य ॥३॥
उसंतितो पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशी ओढे ॥४॥
तुका म्हणे ऐसे करितो निर्वाण । जीव तुम्हा भिन्न नाही माझा ॥५॥
अर्थ

देवा हा देह पोसण्याकरता मी संसाराचे व्यवहार करतो आहे. पण तुमच्या पाया विषयी मला किती प्रीती आहे हे तुम्हाला मी वेगळे सांगायला हवे काय ते तुम्हाला कळत नाही काय देवा ? तुझे रूप मी माझ्या डोळ्याने पाहात आहे आणि संसाराचे सोंग करण्याची संपादनी मी करत आहे. देवा आम्ही आमच्या वाणीला संसारात कामापुरते बोलायचे असे सांगितले आहे आणि तुमचे गुणगान आमची वाणी सतत करत असते. तुमच्या दर्शनाचे माझ्या डोळ्याला उत्कंठा आहे. परंतु मला धनधान्य मिळावे ही तळमळ मुळीच नाही बर का देवा. मी कसातरी हा प्रपंच चालवत आहे परंतु माझ्या जीवनसूत्र ची दोरी तुझ्या हातात असल्यामुळे ती तुझ्याकडेच ओढ घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी असा निर्वाण करतो की माझा जीव तुमच्याहून भिन्न नाही.
अभंग क्र. ११३९
का रे माझी पोरे म्हणसील ढोरे । मायबाप खरे काय एक ॥१॥
का रे गेले म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ गेलियाचा ॥धृपद॥
का रे माझे माझे म्हणसील गोत । न सोडविती दूत यमाहाती ॥२॥
का रे मी बळिया म्हणविसी ऐसा । सरणापाशी कैसा उचलविसी ॥३॥
तुका म्हणे न धरी भरवसा काही । वेगी शरण जाई पांडुरंगा ॥४॥
अर्थ

अरे माझी पोरी, माझे गुरेढोरे असे काय म्हणतोस ? ज्यांनी तुला जन्म दिले आहे ते आईबाप तरी तुझे आहेत काय ? कोणी जर गेले तर तू व्यर्थ तळमळ आक्रोश का करतोस, अरे माझे हे आप्त, गोत्र असे‌ म्हणत तु बसलास, हेच लोक तुला तुझ्या अंतकाळी यमाच्या हातून सोडणार नाहीत. तू स्वतःला मी फार बलवान आहे असे का म्हणून घेतो आणि तू जर खरच बलवान आहेस तर मग तुला मेल्यावर सरणावर उचलून का ठेवावे लागते ? तुकाराम महाराज म्हणतात अरे तू स्वतः विषयी काहीच भरवसा धरु नकोस त्यामुळे तू लवकरात लवकर पांडुरंगाला शरण जा.
अभंग क्र. ११४०
अगा करुणाकरा करितसे धावा । या मज सोडवा लवकरि ॥१॥
ऐकोनिया माझी करुणेची वचने । व्हावे नारायणे उतावीळ ॥धृपद॥
मागे पुढे अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायी भाव वाट पाहे ॥२॥
उशीर तो आता न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥३॥
उरले ते एक हेचि मज आता । अवघे विचारिता शून्य जाले ॥४॥
तुका म्हणे आता करी कृपादान । पाउले समान दावी डोळा ॥५॥
अर्थ

हे करूणाकरा मी तुझा मनापासून धावा करत आहे त्यामुळे तुम्ही लवकर धावत‌ या आणि मला या भवसागरातून सोडवा. माझी करूण वचने ऐकून माझ्या भेटीकरिता उतावीळ व्हावे. देवा मी मागेपुढे पाहिले तर मला तुमच्या वाचुन सर्व ओस दिसले त्यामुळे मी तुमच्या चरणावर माझा भक्तीभाव अर्पण करून आता तुमची वाट पाहत आहे. विठ्ठला मायबापा तुम्ही आता माझ्या भेटी करता थोडा देखील उशीर करू नका माझ्यासाठी आता तुमच्या भेटीवाचुन काहीच उरले नाही. आणि या जगाविषयी श्युन्य मत माझे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुम्ही एवढेच करा की तुमचे विटेवरचे समचरण मला लवकर दाखवा.


येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version