Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

३१ मे, दिवस १५१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ६०१ ते ६२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १८०१ ते १८१२

31 MAY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI 1

31 MAY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI 1

“३१ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३१ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ३१ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १८०१ ते १८१२ चे पारायण आपण करणार आहोत.
३१ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ६०१ ते ६२५,

601-11
जैसा परिमळ जाहला मरगजा । का आनंदासि निघालिया भुजा । ज्याचे जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥601॥
ज्याच्या अंगाचा सुगंध म्हणजे जणू काय मरगजाला प्राप्त झालेला सुगंध होय. भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत. ज्याच्या गुडघ्याचे सौंदर्य मदनाला प्राप्त झाले आहे.
602-11
मस्तकी मुकुटाते ठेविले । की मुकुटा मुकुट मस्तक झाले । शृंगारा लेणे लाधले । आंगाचेनि जया ॥602॥
मस्तकावर मुकुट ठेवल्याने मस्तकाला शोभा आली नसून, भगवंताचे मस्तकच मुकुटाला शोभा आणीत आहे. शृंगाराने भगवंताचे अंग अलंकृत केले नसून, भगवंताच्या अंगानेच शृंगाराला अलंकृत केले आहे.
603-11
इंद्रधनुष्याचिये आडणी । माजी मेघ गगनरंगणी । तैसे आवरिले शारङ्गपाणी । वैजयंतीया ॥603॥
आकाशात उठलेला मेघ, जसा इंद्रधनुष्याने वेढलेला दिसतो, तसा वैजयंतीमाळेने भगवान वेढलेला दिसतो.
604-11
आता कवणी ते उदार गदा । असुरा देत कैवल्य पदा । कैसे चक्र हन गोविंदा । सौम्यतेजे मिरवे ॥604॥
असुरांचा प्राण घेऊन त्यांना मोक्ष देणारी तुझ्या हातातील कशी ती उदार गदा आहे आणि गोविंदा ! तुझ्या हातातील सुदर्शन चक्रही, सौम्यतेजाने कसे युक्त दिसत आहे.
605-11
किंबहुना स्वामी । ते देखावया उत्कंठित पा मी । म्हणौनि आता तुम्ही । तैसया होआवे ॥605॥
किंबहुना प्रभो ते असे तुझे रूप पाहण्याकरिता मला अत्यंत उत्कंठा लागली आहे, म्हणून तू तसाच चतुर्भुज हो.

606-11
हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे । आता होताति आंधले कृष्णमूर्तीलागी ॥606॥
हा विश्वरूपाचा आनंद भोगून माझे डोळे तृप्त झाले. आता ते, तुझे पूर्वीचे श्रीकृष्णस्वरूप पाहण्याकरिता आतुर झाले आहेत.
607-11
ते साकार कृष्णरूपडे । वाचूनि पाहो नावडे । ते न देखता थोडे । मानिताती हे ॥607॥
त्या साकार श्रीकृष्णस्वरूपावाचून माझ्या डोळ्याला दुसरे काही पाहणे आवडत नाही. श्रीकृष्णस्वरूप न पाहता हे विश्वरूप देखील माझ्या डोळ्यांना कमी प्रतीचे वाटते.
608-11
आम्हा भोगमोक्षाचिया ठायी । श्रीमूर्तीवाचूनि नाही । म्हणौनि तैसाचि साकारु होई । हे सांवरी आता ॥608॥
आता तुझ्या भक्तांना भोग म्हणजे दृष्ट परमानंद व मोक्ष म्हणजे विदेहमुक्ति- या दोहोंकरिता, तुझ्या सगुण साकार मूर्तीवाचून दुसरे काही लागत नाही; म्हणूनच आता विश्वरूपाचा उपसंहार कर व सगुण श्रीकृष्णरूपाने प्रगट हो.

श्रीभगवानुवाच ।
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं
रूपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं
यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्॥11. 47॥

अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होऊन मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले. हे माझे (रूप) तुझ्याखेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही ॥11-47॥
609-11
या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला । म्हणे ऐसा नाही देखिला । धसाळ कोणी ॥609॥
अर्जुनाचे हे म्हणणे ऐकून, विश्वरूप भगवंताला आश्चर्य वाटले आणि भगवान म्हणाले, अर्जुना ! तुझ्यासारखा अविचारी दुसरा कोणी मी पाहिला नाही.
610-11
कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी । मा भेणे काय नेणो बोलसी । हेकाडु ऐसा ॥610॥
अरे ! केवढी ही थोर वस्तू तुला प्राप्त झाली, त्याच्या लाभाचा संतोष तुला होत नाही आणि त्या रूपाच्या दर्शनाने भयभीत होऊन, एखाद्या दुराग्रही माणसाप्रमाणे, हे काय बोलत आहेस, कळत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

611-11
आम्ही सावियाचि जै प्रसन्न होणे । तै आंगचिवरी म्हणे देणे । वाचोनि जीव असे वेचणे । कवणासि गा ॥611॥
खरोखर, आम्ही जेव्हा प्रसन्न होतो, तेव्हा सर्व आपल्या शरीरासह त्यांच्या स्वाधीन होतो. प्रसन्नतेवाचून असा जीवभाव, आम्ही कोणाकरिताच वेचत नसतो.
612-11
ते हे तुझिये चाडे । आजि जिवाचेचि दळवाडे । कामऊनिया येवढे । रचिले ध्यान ॥612॥
पण आमच्या ठिकाणी असलेले सर्व सामर्थ्य वेचन जे हे आम्ही विश्वरूपाचे ध्यान प्रगट केले, ते तुझी इच्छा पूर्ण करण्याकरिताच केले.
613-11
ऐसी काय नेणो तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगी ॥613॥
तुझे अत्यंत प्रेम लागून आमची प्रसन्नता कशी वेडी झाली हे समजत नाही; म्हणून सर्वापासून गुप्त अशा विश्वरूपाचीही जगात ध्वजा उभारिली.
614-11
ते हे अपारा अपार । स्वरूप माझे परात्पर । एथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥614॥
ते हे माझे विश्वरूप, सर्व आकाशादिक अमर्याद वस्तूपेक्षाही अमर्याद असून मायेच्याही पलीकडे आहे व येथूनच हे कृष्णादिक अवतार होतात.
615-11
हे ज्ञानतेजाचे निखिळ । विश्वात्मक केवळ । अनंत हे अढळ । आद्य सकळा ॥615॥
हे विश्वरूप, संपूर्ण केवळ ज्ञानतेजाचेच विश्वात्मक झाले आहे. हे अनंत, अढळ असून सर्व ब्रह्मांडाचे मूळ होय.

616-11
हे तुजवाचोनि अर्जुना । पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना । जे जोगे नव्हे साधना । म्हणौनिया ॥616॥
अर्जुना ! तुझ्यावाचून कोणी ते पाहिले नाही व ऐकलेही नाही; कारण ते साधनेने प्राप्त होण्याजोगे नाही.

न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।
एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर॥11. 48॥

अर्थ हे कुरुकुलश्रेष्ठा, वेदपठन, यज्त्रयागादि, शास्त्रपठन, दान, श्रौतस्मार्तादि कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्यलोकांमधे तुझ्यासशिवाय दुसर्‍या कोणालाही दिसणे शक्य नाही. ॥11-48॥
617-11
याची सोय पातले । आणि वेदी मौनचि घेतले । याज्ञिकी माघौते आले । स्वर्गौनिया ॥617॥
या स्वरूपापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले, यज्ञही स्वर्गापासूनच मागे फिरले.
618-11
साधकी देखिला आयासु । म्हणौनि वाळिला योगाभ्यासु । आणि अध्ययने सौरसु । नाही एथ ॥618॥
याच्या प्राप्तीकरिता कराव्या लागणार्‍या योगाभ्यासात अत्यंत कष्ट आहेत. असे पाहून, साधकांनी योगाभ्यासाचा मार्ग सोडला आणि वेदशास्त्राध्ययनानेही हे प्राप्त होत नाही.
619-11
सीगेची सत्कर्मे । धाविन्नली संभ्रमे । तिही बहुतेकी श्रमे । सत्यलोकु ठाकिला ॥619॥
पूर्ण झालेली सत्कर्मे देखील या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता लगबगीने धावली, पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने कसातरी सत्यलोक गाठला.
620-11
तपी ऐश्वर्य देखिले । आणि उग्रपण उभयांचि सांडिले । एक तपसाधन जे ठेले । अपारांतरे ॥620॥
तपांनी विश्वरूपात्मक ऐश्वर्य पाहिले व या विश्वरूपाच्या दर्शनापुढे आपल्या उग्रपणाची काही मात्रा चालत नाही हे जाणून, त्याने उभ्या उभ्याच आपले उग्रपण टाकून दिले. याप्रमाणे तपरूपसाधनापासूनही हे विश्वरूप फार दूर राहिले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

621-11
ते हे तुवा अनायासे । विश्वरूप देखिले जैसे । इये मनुष्यलोकी तैसे । न फावेचि कवणा ॥621॥
तुवा अनायासे- म्हणजे केवळ माझ्या कृपेने जसे विश्वरूप पाहिलेस, तसे या मृत्यूलोकात कोणालाच प्राप्त झाले नाही.
622-11
आजि ध्यानसंपत्तीलागी । तूचि एकु आथिला जगी । हे परम भाग्य आंगी । विरंचीही नाही ॥622॥
आज या विश्वरूपाच्या ध्यानसंपत्तीकरिता तूच एक जगात भाग्यवान निघालास, हे परमभाग्य ब्रह्मदेवालाही प्राप्त झाले नाही.

मा ते व्यथा मा च विमूढभावो
दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं
तदेव मे रूपमिदं प्रपश्य॥11. 49॥
अर्थ हे माझे अशा प्रकारचे भयानक रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस. तू भ्रांतचित्त होऊ नकोस. गतभय व प्रीतियुक्त अंत:करण होऊन पुन: तू माझे पूर्वीचे रूप पहा. ॥11-49॥
623-11
म्हणौनि विश्वरूपलाभे श्लाघ । एथ िचे भय नेघ नेघ । हे वाचूनि अन्य चांग । न मनी काही ॥623॥
म्हणून या विश्वरूपाच्या प्राप्तीने आपल्याला धन्य समज. विश्वरूपाच्या दर्शनाची भीती बाळगू नकोस व या विश्वरूपावाचून दुसरे काही चांगले आहे, असे मनातही आणू नकोस
624-11.
हा गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला । मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजैल म्हणौनि ? ॥624॥
अमृताने भरलेला समुद्र, अकस्मात प्राप्त झाला असता, त्याच्यात बुडून प्राण जाईल, कोणी त्याचा त्याग केला आहे का ?
625-11
नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु । ऐसे म्हणौनि अव्हेरु । करणे घडे ॥625॥
किंवा सोन्याचा पर्वत दृष्टीस पडला असता, एवढा थोर पर्वत नेता येत नाही, म्हणून त्याची उपेक्षा करावी काय ?

दिवस १५१ वा, ३१, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८०१ ते १८१२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १८०१
म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनिया अवघी चिंता । मग जाऊ एकाता
भजन करू । संसारसंभ्रमे आशा लागे पाठी । तेणे जीवा साटी होईल तुझ्या ॥१॥
सेकी नाडसील नाडसील । विषयसंगे अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोही ॥धृपद॥
शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाही कदा अराणूक । करिती तडातोडी
आत बाह्यात्कारी । ऐसे जाती चारी दिवस वेगी ॥२॥
मोलाची घडी जाते वायाविण । न मिळे मोल धन देता कोंडी ।
जागा होई करी हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥३॥
अर्थ

मानवा तू असे म्हणशील की मी आता या संसारातून निश्चिंत होईल आणि संसाराची सर्व चिंता मी बाजूला सारीन, मग मी एकातात जाईन व हरीचे भजन करीन. असे तू जर म्हटला तरच तुझा परमार्थ होईल, नाही तर तू जर संसार खरा मानला तर तो भ्रम तुझ्या पाठीमागे आशेच्या, इच्छेच्या रूपाने लागेल आणि त्यांच्या आशेच्या, इच्छेच्या पाठीमागे पळून पळून तुझ्या जीवनाचा अंत होईल. अरे शेवटी तु ह्या संसार भ्रमातच गुंतून राहशील. अरे तू विषया संगेच गुंतून राहसील आणि शेवटी या भवडोहात पडशील. अरे हे शरीर आणि सर्वकाही मायेचे स्वरूप आहे यामध्ये तुला कधीही विश्रांती मिळणार नाही. अरे तुझ्या आयुष्यात तुझ्या अंर्तबाह्य विकारच तुझी ताडातोड करतील आणि याच्यातच तुझे आयुष्याची चार दिवस वेगाने निघून जातील. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो व्यर्थ वाया जात आहे कितीही पैसे धन-दौलत दिले तरी गेलेला क्षण तुला परत मिळणार नाही. अरे तू जागा हो आणि स्वतःच्या हिताचा उपाय कर स्वत:च्या हितासाठी प्रयत्न कर एकदा की वेळ निघून गेली तर तू केवळ हाय हाय क

अभंग क्र. १८०२
पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥१॥
कनवाळू कृपाळू भक्तंलागी मोही । गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई ॥धृपद॥
भक्तंच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणे जन्म दाहा घेतले ॥२॥
प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥
उपमन्याकारणे कैसी धावसी लवलाही । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायी ॥४॥
कौरवी पाचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणी वस्त्रे कैसी जाली माऊली ॥५॥
दुर्वास पातला धर्मा छळावया वनी । धावसी लवलाही शाखदेठ घेऊनि ॥६॥
कृपाळू माउली भुक्तीमुक्तीभांडार । करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥७॥
अर्थ

हे जिवाच्या जिवलगा पांडुरंगा तु माझ्याकरता लवकर धावत यावे. हे विठाई तु कनवाळू कृपाळू आहेस भक्तासाठी तु लवकर मोहित होणारी आहेस त्यामुळेच गजेंद्राने तुला हाक मारली तर तु त्याच्या मदतीला लगेच धावत गेलीस. हे विठ्ठला तु भक्तांचा कैवार करण्यासाठी खूप कष्ट घेतोस अंबरिष राजा साठी तु दहा जन्म घेतलेस. देवा तु प्रल्हादासाठी स्तंभातून अवतार घेतलास आणि त्याच्या करता तु हिरण्यकश्यपु सारख्या दैत्याचा वध केला आणि भक्त प्रल्हादाला तु प्रेमाचा पान्हा पाजलास. देवा तु उपमन्यू करता कसा लवकर धावून आलास त्याला दुधाचा सागर देऊन तुझ्या प्रेमाचा पान्हा पाजलास. कौरवांच्या सभेमध्ये ज्यावेळी पाचाळीला ओढून आणले त्यावेळीला तिचे वस्त्रहरण करण्यात आले परंतु माझी विठाबाई माऊली तिची लज्जा रक्षण करण्याकरता स्वतः वस्र रूपाने तिच्या अंगावर येऊन राहिली. धर्मराजा वनवासात असताना दुर्वास ऋषी आपले

अभंग क्र. १८०३
कवणाचे कारण न लगेचि काही । सर्वी सर्वाठायी तू मज एक ।
कायावाचामन ठेविले तुझ्या पायी । आता उरले काई न दिसे देवा ॥१॥
कवणा पाषाणासी धरूनिया भाव । कवणावरी पाव ठेवू आता ।
म्हणऊनि निश्चिंत राहिलो मनी । तू चि सर्वा खाणी देखोनिया ॥धृपद॥
जळे जळ काय धोविले एक । कवण ते पातक हरले तेथे ।
पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समर्पीली ॥२॥
पितरस्वरूपी तू चि जनार्दन । सव्य ते कवण अपसव्य ।
तुका म्हणे जीत पिंड तुझे हाती । देऊनि निश्चिंती मानियेली ॥३॥
अर्थ

देवा आता मला कोणाशी काय कारण व कोणाची मला काहीही गरज नाही कारण सर्व ठिकाणी तूच व्यापून उरलेला आहे याचा मला अनुभव आला आहे. देवा मी माझे काया-वाचा-मन हे तुझ्या पायी ठेवले आहे आता काही उरले आहे असे मला दिसत नाही. आता मी देव समजून कोणत्या पाषणाच्या ठिकाणी भक्तिभाव धरू, जर सर्व पाषाण देव ठरवावे तर मी पाय कुठे ठेवू ? देवा सर्व ठिकाणी तुझेच स्वरूप आहे हे मी ओळखले आहे त्यामुळेच मी निश्चिंत मनाने समाधानी होऊन राहिलो आहे. हा देह पंचमहाभूतांचा आहे त्यामध्ये पाणी ही आहे मग या पाण्याला तीर्थाच्या ठिकाणी जाऊन तीर्थाच्या पाण्याने धुतले तर कोणते पातक जाणार आहे ? मी पापपुण्य वासना हे सर्व काही अविद्ये सह तुला समर्पण केले आहे देवा. तीर्थ स्वरूप तुच आहेस जनार्धन तूच पिता आहेस मग मी सव्य अपसव्य कशासाठी करेन ? तुकाराम महाराज म्हणतात मी हा माझा जीव रुपी पिंड तुझ्या हाती दिला आहे व निश्चिंत झालो व मी समाधान मानले आहे.

अभंग क्र. १८०४
सिणलो दातारा करिता वेरझारा । आता सोडवी संसारापासोनिया ॥१॥
न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसे खोडा हाडांचिया ॥धृपद॥
मायबापे माझी जीवाची सांगाती । ती देतील हाती काळाचिया ॥२॥
पडताळूनि सुरी बैसली सेजारी । यमफासा करी घेऊनिया ॥३॥
पाठी पोटी एके लागली सरसी । नेती नरकापाशी ओढूनिया ॥४॥
जन साह्यभूत असे या सकळा । मी एक निराळा परदेशी ॥५॥
कोणा काकुलती नाही कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥
तुका म्हणे मज तुझाची भरवसा । म्हणऊनि आशा मोकलिली ॥७॥
अर्थ

हे दातारा मी या जन्ममरणाच्या येरझारा करुन करुन फार शीणलो आहे आता मला तू या संसारापासून सोडव. माझ्या पूर्वच्या संचित कर्माचा झाडा पाडा काही होत नाही त्याची बाकीच राहते त्यामुळे माझ्या या देहाच्या हाडाला जन्ममरणाचा खोडा घातला आहे. माझे मायबाप हे माझ्या या जन्मीच्या जीवाचे सांगाती आहेत ते देखील मला काळाच्या हाती देतील. यम सुरी पाजळून आणि काळाचा फासा हातात घेऊन माझ्या शेजारीच बसला आहे. यम माझ्या शेजारीच बसला असल्यामुळे त्याने हातात घेतलेली सुरी माझ्या पाठीपोटी लागली आहे व त्याने घेतलेला काळाचा फासा मला ओढून मला नरकाकडे नेत आहे. आणि या सर्व गोष्टीला हे सर्व लोक देखील साहाय्य होत आहेत आणि या सर्वामध्ये मीच एकटा निराळा परदेशी आहे येथे मी तरी काय करणार आहे ? हे हरी कृपाळूवा तुझ्यावाचून इतर कोणीही मला काकूळतीला येणार नाही. कोणीही माझ्यावर दया करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला तुझ्यावाचून कोणावरही भरवसा नाही त्यामुळेच मी सर्व लोकांवरची आशाच सोडून देतोय. ”

अभंग क्र. १८०५
देवाचा भक्त तो देवासी गोड । आणिकासी चाड नाही त्याची ।
कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघिया हाती अंतरला ॥१॥
निष्काम वेडे म्हणतील बापुडे । अवघिया साकडे जाला कैसा ।
माझे ऐसे तया न म्हणत कोणी । असे रानी वनी भलते ठायी ॥धृपद॥
प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी ।
कंठी तुळसीमाळा बैसोनि निराळा । म्हणती या चांडाळा काय जाले ॥२॥
गाता शंका नाही बैसे भलते ठायी । शिव्या देती आई बाप भाऊ ।
घरी बाइल म्हणे कोठे व्याली रांड । बरे होते शंड मरता तरी ॥३॥
जन्मोनि जाला अवघिया वेगळा । म्हणोनि गोपाळा दुर्लभ तो ।
तुका म्हणे जो संसारा रुसला । तेणेचि ठाकिला सिद्धपंथ ॥४॥
अर्थ

जो देवाचा खरा भक्त आहे जो देवाशी एकरूप आहे त्याच भक्ताची देवाला आवड आहे देवाला इतरांची देवाला आवड नाही. कारण तो भक्त कोणाचाही सोयरा किंवा सांगाती म्हणजे सोबती नसतो तो सर्वात पासूनच अंतरलेला असतो. तो भक्त वेडा आहे, निष्काम आहे, बापुडा आहे असे लोक म्हणत असतात आणि याच्या पासून आम्हाला संकट आहे असे देखील लोक म्हणतात. तो भक्त रानावनात कोठेही राहत असला तरी हा माझा कोणी नातेवाईक किंवा कोणी सखा सोबती आहे असेदेखील त्याच्याविषयी कोणीही म्हणत नाही. तो प्रातःकाळी स्नान करून अंगाला विभूती लावतो भस्म लावतो आणि हे पाहून सर्व लोक त्याची निंदा करतात. तो कंठा मध्ये तुळशी माळ घालून सर्वापासून वेगळा बसलेला असतो तरीदेखील लोक म्हणतात की या चांडळाला नेमके काय झाले आहे ? तो कोठे असला की हरीचे गीत गाताना त्याला भान राहत नाही व तो हरीचे गीत गाणं चालू करतो आणि ते पाहून त्याचे आई, बाप, भाऊ त्याला �

अभंग क्र. १८०६
कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके कैसी सरी ॥१॥
लोखंडाचे अंगी लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥धृपद॥
तुका म्हणे मी न वजे यातीवरी । पूज्यमान करी वैष्णवांसी ॥२॥
अर्थ

ज्या मातीमध्ये कस्तुरी मिसळलेली असेल त्या मातीची तुलना दुसऱ्या कोणत्याही मातीची कशी करता येईल ? ज्या लोखंडाच्या अंगाला परिसाचा स्पर्श झाला असेल त्या लोखंडाची इतर धातूशी कशी बरोबरी करता येईल ? तुकाराम महाराज म्हणतात मी वैष्णवांची केवळ भक्ती पाहतो मी त्यांच्या जातीकडे कधीही लक्ष देत नाही वैष्णव कोणत्याही जातीचा असो ते सर्वत्र पूज्यमान आहेत त्यामुळेच मी सर्व वैष्णवाचा आदर करतो.

अभंग क्र. १८०७
अनुहात ध्वनि वाहे सकळा पिंडी । राम नाही तोंडी कैसा तरे ॥१॥
सकळा जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥धृपद॥
ज्ञान सकळांमाजी आहे हे साच । भक्तीविण तेच ब्रम्ह नव्हे ॥२॥
काय मुद्रा कळल्या कराव्या सांगता । दीप न लगता उन्मनीचा ॥३॥
तुका म्हणे नका पिंडाचे पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥४॥
अर्थ

योगाभ्यासाने सर्व हृदयात अनाहत ध्वनी एकसारखा होत असला तरी, ” रामनाम ” तोंडात नसेल तर तो कसा तरून जाईल ? सर्व जीवामध्ये परमेश्वराची व्याप्ती आहे, ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा आपल्याशी तो अभिन्न आहे, असे ज्ञान झाल्याशिवाय कोणीही कसा तरेल ? अर्थात अभेदाने साक्षात्कार झाल्यावाचून तरावयाचा नाही. सर्व लोकात ज्ञान आहे, हे खरे. परंतु सगुण भक्तीवाचून ते ज्ञान ‘ ब्रम्‍हज्ञान ‘ होत नाही. कदाचित ब्रम्‍हज्ञान झाले तरी ते ब्रम्‍हज्ञान ‘ ब्रम्‍हस्वरूप ‘ होत नाही. वृत्तीरूपाने राहते. खेचरी भूचरी मुद्रा स्वतःला कळल्या आणि कशा कराव्यात हेही लोकांना सांगता आले, तरी पण उन्मनीचा दीप हृदयात उजळल्याशिवाय तो कसा तरेल ? तुकाराम महाराज म्हणतात, देहाचे पोषण ज्यात आहे, अशा चार्वाकमताची स्थापना करू नका, कारण, त्यामुळे नारायणाची प्राप्ती होणार नाही.

अभंग क्र. १८०८
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगे व्यापूनिया ॥धृपद॥
मज मूढा शक्ती कैचा हा विचार । निगमादिका पार बोलावया ॥२॥
राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबड्या उत्तरी हेचि ध्यान ॥३॥
तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगे भार घेतला माझा ॥४॥
अर्थ

हे संतजन हो मी जे काही बोलत आहे ते माझे शब्द नसून प्रत्यक्ष पांडुरंगाचे शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ देखील मला कळत नाही आणि जरी बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही माझ्यावर रागवू नका ही विनंती मी तुम्हाला करत आहे. हे माझे शब्द नसून माझ्या संपूर्ण अंगामध्ये व्यापून उरलेला जो पांडुरंग आहे त्याचे हे शब्द आहेत. मी तर मुर्ख आहे आणि वेदाचा विचार करण्या एवढी शक्ती माझ्या मध्ये कशी असणार. मी तर माझ्या मुखाने केवळ राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी असे बोबडे शब्दाने बोलत असतो आणि त्याचे चिंतन मी नेहमी करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मला तर केवळ गुरुकृपेचा आधार आहे आणि पांडुरंगाने माझा योगक्षेमाचा भार घेतला आहे.

अभंग क्र. १८०९
देवासी लागावे सकळांसी पोसावे । आम्हा न लगे खावे काय चिंता ॥१॥
देवा विचारावे लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघे भले ॥धृपद॥
देवासी उत्पत्ती लागला संहार । आम्हा नाही फार थोडे काही ॥२॥
देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥३॥
तुका म्हणे आम्ही भले देवाहून । विचारिता गुण सर्वभावे ॥४॥
अर्थ

देवाला सगळ्यांचे पालन-पोषण करण्याची चिंता असते परंतु आम्हाला तर काय खावे, काय नाही याची देखील चिंता करण्याची गरज नाही. देवाला तर सर्व लोकांचे पापपुण्य विचारात घ्यावे लागते परंतु आम्हाला तर सर्व लोक चांगले आहेत. देवाला तर संहार आणि उत्पत्ती हे काम मागे लागले आहेत परंतू आम्हाला तर थोडेफार देखील काहीच काम नाही. देवाच्या पाठीमागे तर चांगलांच काम धंदा लागलेला आहे परंतु आम्ही तर सदा सर्वदा रिकामेच आहोत. तुकाराम महाराज म्हणतात जर दोघाच्याही गुणाचा विचार केला तर देवापेक्षा आम्ही भले आहोत की.

अभंग क्र. १८१०
घेईन मी जन्म याजसाठी देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥
हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालू लोटांगण महाद्वारी ॥धृपद॥
आनंदे निर्भर असो भलते ठायी । सुखदुःख नाही चाड आम्हा ॥२॥
आणीक सायास न करी न धरी आस । होईन उदास सर्व भावे ॥३॥
मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी । होय सांगो ऐसी तुका म्हणे ॥४॥
अर्थ

देवा मी जन्म घेईन तर केवळ तुझी चरण सेवा साधण्याकरीताच. मग मी हरिनाम कीर्तन करीन संतांची पूजन करीन आणि महाद्वारात लोटांगण घालीन. आम्ही जिथे कुठे राहू तेथे आनंदाने समृद्ध राहु. सुख आणि दुख यांची आवड तर आम्हाला राहिलीच नाही. तुझी चरण सेवा करण्यावाचून इतर कोणतेही कष्ट मी करणार नाही आणि कशाचीही इच्छाही धरणार नाही आणि मग या संसारापासून मी सर्वभावे उदास होऊन राहील. तुकाराम महाराज म्हणतात अहो मोक्ष तर आमच्या घरी काम करणारी दासीच आहे तिला आम्ही जसे काम सांगू तसे काम ती करते.

अभंग क्र. १८११
देवा तुज मज पण । पाहो आगळा तो कोण ॥१॥
तरी साच मी पतित । तूच खोटा दिनानाथ ।
ग्वाही साधुसंत जन । करूनि अंगी लावीन ॥धृपद॥
आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छंद ॥२॥
न चले तुझे काही त्यास । आम्ही बळकाविले दोष ॥३॥
दिशा भरल्या माझ्या मने । लपालासी त्याच्या भेणे ॥४॥
तुका म्हणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥५॥
अर्थ

देवा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे ते पाहूया. देवा अरे मी तर खरोखर पतित आहे पण तू खोटा दीनानाथ आहेस. कारण या गोष्टीला स्वतः साधुसंत जनच साक्षी आहेत आणि त्यांच्याद्वारे मी हा दोष सिद्ध करून तुझ्या अंगी लगीन देवा. देवा आम्ही तर भेदाभेद धरला परंतु तुला तर त्याचा छंद नाही. अरे आमच्या मध्ये तर काम, क्रोध असे अनेक दोष आहेत पण तझ्या पुढे त्याचे काहीही चालत नाही. माझे मन तर दाही दिशांकडे पाहत आहे आणि त्या मनाला आवरण्याच्या भीतीनेच तु कुठेतरी लपून बसला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माझे चित्त तुझ्यातील व माझ्यातील नीतिचा विचार करीत आहे.

अभंग क्र. १८१२
लापणिक शब्दे नातुडे हा देव । मनिचा गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥
अंतरिचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणे लागे ॥धृपद॥
तुका म्हणे जरी आपुले स्वहित । तरी करी चित्त शुद्ध भावे ॥२॥
अर्थ

अहो कपटी शब्दाने बोलून देवाचे प्राप्ती केव्हाही करून घेता येत नाही तर त्याकरता जो मनातील गोड भाव आहे तो शुद्ध चित्ताने बोलावा. संवाद करणाऱ्या व्यक्तीचे अंतरंगातील भेद परमानंद जाणत असतो. तुकाराम महाराज म्हणतात जर तुला आपले स्वतःचे हीत करून घ्यायचे असेल तर तुझे चित्त भक्तिभावपूर्वक शुद्ध कर.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version