Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

२८ मे, दिवस १४८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५२६ ते ५५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १७६५ ते १७७६

28 MAY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI 1

28 MAY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI 1

“२८ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २८ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २८ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १७६५ ते १७७६ चे पारायण आपण करणार आहोत.
२८ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५२६ ते ५५०,

526-11
इये चराचरी जी भूते । सर्वत्र देखे तयाते । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥526॥
ही स्थावर जंगम जी भूते आहेत, ती सर्वत्र पाहू लागला व पुनः पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.
527-11
ऐसी रूपे तिये अद्भुते । आश्चर्ये स्फुरती अनंते । तव तव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥527॥
भगवंताची अद्भूत आश्चर्यानेयुक्त अशी असंख्य रूपे जो जो पाहू लागला, तो तो तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.
528-11
आणिक स्तुतिही नाठवे । आणि निवांतुही न बैसवे । नेणे कैसा प्रेमभावे । गाजोचि लागे ॥528॥
आणखी काय स्तुती करावी, हे त्याला आठवत नव्हते आणि मौनही धरून राहवेना. प्रेमभावाने तो कसा नमस्ते नमस्ते असा घोष करू लागला, हे मला समजत नाही.
529-11
किंबहुना इयापरी । नमन केले सहस्रवरी । की पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥529॥
किंबहुना याप्रमाणे हजारो वेळा त्याने नमन केले व पुनः हे श्रीहरी ! माझ्या समोर असणार्‍या तुला नमस्कार असो, असे म्हणू लागला.
530-11
देवासि पाठी पोट आथि की नाही । येणे उपयोगु आम्हा काई । तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥530॥
देवाला पाठ व पोट आहे किंवा नाही, या विचाराचा आम्हाला काय उपयोग ?तरी पाठीमागे असणार्‍या तुला, भगवंता ! नमस्कार असो !
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

531-11
उभा माझिये पाठीसी । म्हणौनि पाठीमोरे म्हणावे तुम्हासी । सन्मुख विन्मुख जगेसी । न घडे तुज ॥531॥
माझ्या पाठीशी उभा आहेस, म्हणून तुला पाठमोरे म्हणायचे, एरव्ही तू जगाच्या सन्मुख किंवा विन्मुख होऊ शकत नाहीस.
532-11
आता वेगळालिया अवयवा । नेणे रूप करू देवा । म्हणौनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥532॥
आता तुझ्या वेगवेगळ्या अवयवाचे वर्णन मी करू शकत नाही; म्हणून सर्वरूप व सर्वात्मक असलेल्या तुला नमस्कार असो.
533-11
जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमित विक्रमा । सकळकाळी समा । सर्वरूपा ॥533॥
अगाध सामर्थ्य संपन्न व अगाध पराक्रम असणार्‍या, सर्वकाळी, सर्व देशात एकरूप, एकसारखा असणार्‍या तुला, भगवंता ! नमस्कार असो.
534-11
आघविया आकाशी जैसे । अवकाशचि होऊनि आकाश असे । तू सर्वपणे तैसे । पातलासि सर्व ॥534॥
ज्याप्रमाणे सर्व आकाशात पोकळीच आकाशरूप होऊन आहे, त्याप्रमाणे सर्व नामरूपाने तू सर्व झाला आहेस.
535-11
किंबहुना केवळ । सर्व हे तूचि निखिळ । परी क्षीरार्णवी कल्लोळ । पयाचे जैसे ॥535॥
पण क्षीरसमुद्रावर जसे दुधाचे तरंग उठावेत, त्याप्रमाणे हे सर्व तूच केवळ नटला आहेस.

536-11
म्हणौनिया देवा । तू वेगळा नव्हसी सर्वा । हे आले मज सद्भावा । आता तूचि सर्व ॥536॥
म्हणून देवा ! या सर्व नामरूपाहून तू वेगळा नाहीस. आता सर्व तूच आहेस, हे माझ्या पूर्ण प्रत्ययाला आले.
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं
हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं
मया प्रमादात्प्रणयेन वापि । 11. 41 ।

अर्थ तुझा हा महिमा न जाणणार्‍या मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा, अरे यादवा, अरे सख्या, इत्यादी जे तुला बोललो ॥11-41॥
537-11
परि ऐसिया तूते स्वामी । कहीच नेणो जी आम्ही । म्हणौनि सोयरे संबंधधर्मी । राहाटलो तुजसी ॥537॥
पण, महाराज ! सर्व नामरूपाने तूच नटला आहेस, असे आम्ही पूर्वी कधी जाणत नव्हतो, म्हणूनच तुझ्याशी सोयरेपणाच्या नात्याने वागलो.
538-11
अहा थोर वाउर जाहले । अमृते संमार्जन म्या केले । वारिके घेऊनि दिधले । कामधेनूते ॥538॥
हाय हाय ! माझे फार अनुचित वर्तन झाले, मी अमृताने सडा संमार्जन केले. कामधेनूला देऊन तिच्याबद्दल मी शिंगरू घेतले.
539-11
परिसाचा खडवाचि जोडला । की फोडोनि आम्ही गाडोरा घातला । कल्पतरू तोडोनि केला । कूंप शेता ॥539॥
प्रत्यक्ष परिसाचा खडक प्राप्त झाला असतांना, आम्ही तो फोडून घराच्या पायर्‍यात घातला आणि कल्पतरूच्या डाहाळ्या तोडून शेताला कुंपण केले.
540-11
चिंतामणीची खाणी लागली । तेणे करे वोढाळे वोल्हांडिली । तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणे ॥540
चिंतामणीची खाण लागली असता, ओळखता न आल्यामुळे तिची उपेक्षा केली जावी, त्याप्रमाणे तुमच्याशी अति सलगीने वागून तुमची प्राप्ती व्यर्थ दवडली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

541-11
हे आजिचेचि पाहे पा रोकडे । कवण झुंज हे केवढे । एथ परब्रह्म तू उघडे । सारथी केलासी ॥541॥
प्रत्यक्ष आजचीच गोष्ट पहा. हे युध्द काय आहे आणि कितीसे आहे; पण तू स्पष्ट परब्रह्म असूनही तुला मी सारथी केला.
542-11
यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा । ऐसा वणिजेसाठी जागेश्वरा । विकलासि आम्ही ॥542॥
आणि जगन्नाथा ! या कौरवांच्या घरी तडजोड करण्याकरीता आम्ही तुला पाठविले. या प्रमाणे आम्ही आपले शुल्लक व्यवहार देखील तुझ्याकडून करविले.
543-11
तू योगियांचे समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख । उपरोधु जी सन्मुख । तुजसी करू ॥543॥
योगी लोक तुझ्याच ठिकाणी समाधी लावून सुख भोगतात; पण मी मूर्ख, हे कसे म्हणून जाणत नव्हतो आणि तुझ्या तोंडावर तुझी थट्टा करीत असे.

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि
विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं
तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥11. 42॥

अर्थ आणि क्रीडा, शयन, आसन, (मंडाळीमध्ये बसणे), भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असतांना किंवा (लोकांच्या) देखत तुझा उपहास करण्याकरता जो तुझा अपमान केला त्याबद्दल हे अप्रमेया (ज्याच्या प्रभावाचे अथवा स्वरूपाचे प्रमाण करता येत नाही) अच्युता मला क्षमा कर. ॥11-42॥
544-11
तू या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदी । तेथे सोयरीकीचिया संबंधी । रळी बोलो ॥544॥
तू या विश्वाचा आदिकारण असतांना, तु ज्या सभासदांमध्ये बसत होतास, त्या सभासदांच्या समोर सोयरिकीच्याच नात्याने तुझ्याशी चेष्टा करीत होतो.
545-11
विपाये राउळा येवो । तरि तुझेनि अंगे मानु पावो । न मानिसी तरी जावो । रुसोनि सलगी ॥545॥
कदाचित तुमच्या मंदिरात मी आलो तर, तुमच्याकडून सत्कार करून घेत असे. जर मानाने तसे वागविले नाही, तर अत्यंत सलगीमुळे मी तुमच्यावर रुसूनही जात होतो.

546-11
पाया लागोनि बुझावणी । तुझ्या ठायी शारङ्गपाणी । पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्ही ॥546॥
हे शार्ङ्गपाणि भगवंता ! खरोखर तुझ्या पाया पडून व क्षेमकरिता तुझी याचना करून, तुझे सांत्वन केले पाहिजे, अशा प्रकारची वागणूक माझ्याकडून फार झाली.
547-11
सजणपणाचिया वाटा । तुजपुढे बैसे उफराटा । हा पाडु काय वैकुंठा ? । परि चुकलो आम्ही ॥547॥
सोयरेपणाच्या नात्याने तुझ्याकडे पाठ करून बसत असे, भगवंता ! हे योग्य होते काय ?पण आम्ही चुकलों.
548-11
देवेसि कोलकाठी धरू । आखाडा झोंबीलोंबी करू । सारी खेळता आविष्करू । निकरेही भांडो ॥548॥
देवा ! तुमच्याबरोबर दांडपट्टा खेळलों, आखाड्यात तुमच्याशी झोंबाझोंबी केली. सोंगट्या खेळतांना खोटे दान देत असू आणि हातघाईवर येऊन, तुमच्याशी भांडतही असूं.
549-11
चांग ते उराउरी मागो । देवासि की बुद्धि सांगो । तेवीचि म्हणो काय लागो । तुझे आम्ही ॥549॥
जी चांगली वस्तु असेल, ती बळजबरीने मागत असू. सर्वज्ञ अशा तुला शहाणपण सांगत असू त्याचप्रमाणे केव्हा ‘आम्ही तुझे काय लागतो’ असेहि म्हणत असूं.
550-11
ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनी न समाये । जी नेणताचि की पाये । शिवतिले तुझे ॥550॥
असे त्रैलोक्यात मावणार नाही इतके अपराध माझ्याकडून झाले आहेत; पण देवा ! हे सर्व अज्ञानामुळे घडले आहेत, हे तुझ्या पायाला स्पर्श करून सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १४८ वा, २८, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १७६५ ते १७७६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १७६५
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥
आम्ही भांडारी देवाचे । द्यावे घ्यावे माप वाचे ॥धृपद॥
उगवू जाणो मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥२॥
तुका म्हणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥३॥
अर्थ

आम्ही परमार्थ रुपी दुकान टाकले आहे. आणि ज्याला जसा माल पाहिजे आहे तसा येथे उपलब्ध आहे. आम्ही देवाचे खजिनदार आहोत व आम्ही आमच्या मुखाने हरी नामाचे माप देतो व घेतो. आम्ही प्रत्येकाचे मन स्पष्टपणे जाणू शकतो आणि ज्याला हरिनाम संपत्तीची प्राप्ती झाली नाही त्याला ती प्राप्त करून देण्याचे कामही आम्ही करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या दुकानात जो जसा मोल देईल त्या प्रकारचा खरा, खोटा माल आम्ही त्याला देतो अर्थात ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश करतो.
अभंग क्र. १७६६
सादाविले एका । सरे अवघिया लोका ॥१॥
आता आवडीचे हाती । भेद नाही ये पंगती ॥धृपद॥
मोकळी च पोती । नाही पुसायाची गुंती ॥२॥
तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥३॥
अर्थ

मी सर्व लोकांना आग्रह करून सांगितले आहे, की आमच्या दुकानांमध्ये ज्याला जसा मला आवडतो तसा त्याच्या हातात मिळेल इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्ही करत नाही. आम्ही आमच्या परमार्थाच्या दुकानांमध्ये परमार्थाने भरलेलले पोते बांधून न ठेवता मोकळे ठेवले आहे मग त्यातील माल कोणीही घ्यावा कोणालाही विचारण्याची काहीच गुंतागुंत येथे नाही. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थाच्या व्यवहारांमध्ये कोणताही माल कोणास देण्यास आमचा हात अगदी सरळ आहे.
अभंग क्र. १७६७
तडामोडी करा । परि उत्तम ते भरा ॥१॥
जेणे खंडे एके खेपे । जाय तेथे लोभे वोपे ॥धृपद॥
दाविल्या सारिखे । मागे नसावे पारिखे ॥२॥
मागे पुढे ॠण । तुका म्हणे फिटे हीण ॥३॥
अर्थ

लोकहो तुमच्याजवळ असलेल्या इंद्रियाचे किडूक-मिडूक जे काही असेल ते सर्व हरीला द्या आणि त्याबदल्यात हरी कडून चांगला उत्तम प्रकारचा परमार्थिक माल भरून घ्या. या हरी ने दिलेला माल असा आहे की ज्याने तुम्ही एकाच जन्मामध्ये अनेक जन्माचे येरझार खंडित कराल तुम्ही जिथे जाल तिथे या मालाला मोठी किंमत राहील. परमार्थामध्ये तुम्ही सुरुवातीला जशी सात्विक वागणूक दाखवली आहे तसीच कायमस्वरूपी असावी नंतर वागणुकीत बदल करू नये. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर परमार्थामध्ये चांगल्याप्रकारे राहाल तर तुमचे मागचे संचित कर्म, पुढे होणारे कर्म याचे सर्वाचे ऋण फिटुन जाईल अर्थात तुम्ही मुक्त व्हाल.
अभंग क्र. १७६८
नसावे ओशाळ । मग मानिती सकळ ॥१॥
जाय तेथे पावे मान । चाले बोलिले वचन ॥धृपद॥
राहो नेदी बाकी । दान ज्याचे त्यासी टाकी ॥२॥
होवा वाटे जना । तुका म्हणे साठी गुणा ॥३॥
अर्थ

जो कोणाचाही निंदा करत नसतो त्याला सगळे लोक चांगले म्हणतात. तो जेथे जाईल तेथे तेथे त्याला मानसन्मान मिळतो आणि तो जसे बोलेल तसेच लोक वागतात. तो कोणाचीही बाकी ठेवत नाही आणि जर एखाद्याची बाकी राहिली तर त्याचे तो पटकन दान देऊन टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या याच गुणामुळे लोकांना त्याची आवड लागते.
अभंग क्र. १७६९
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥
विष ते अमृत अघाते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥धृपद॥
दुःख ते देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्नीज्वाळा ॥२॥
आवडेल जीवा जीवाचे परी । सकळा अंतरी एक भाव ॥३॥
तुका म्हणे कृपा केली नारायणे । जाणियेते येणे अनुभवे ॥४॥
अर्थ

ज्याचे चित्त शुद्ध आहे त्याचे शत्रू देखील मित्र होतात व त्याला वाघही खात नाही व साप काही करत नाही. त्याला विष जरी दिले तरी त्याचे अमृत होईल त्याच्यावर आघात जरी कोणी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यामुळे त्याचे हित होईल त्याच्या हातून अकर्तव्य जरी घडले तरी धर्मनीती प्रमाणे कर्तव्य घडल्यासारखे होईल. दुःख देखील त्याच्या साठी सुखाचे फळ घेऊन येईल त्याच्यासाठी अग्निज्वाला देखील शीतळ होतील. अशा मनुष्या विषयी सर्वाना “हा आपल्या प्राणापेक्षाही आपल्याला प्रिय आहे” असे वाटेल आणि सगळ्यांच्या अंतरंगात त्याच्याविषयी एक विध भक्तिभाव निर्माण होईल. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचा अनुभव ज्या माणसाला येईल त्याने हे जाणून घ्यावे “नारायणाने आपल्यावर कृपा केलेली आहे” व निश्चिंत व्हावे.
अभंग क्र. १७७०
लाज वाटे मज मानिती हे लोक । हे तो नाही एक माझे अंगी ॥१॥
मोजुनि झिजलो मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥धृपद॥
कोमळ कंटक तीक्षण अगरी । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥
चित्रींचे लेप शृंगारिले निके । जीवेविण फिके रूप त्याचे ॥३॥
तुका म्हणे दिसे वाया गेलो देवा । अनुभव ठावा नाही तेणे ॥४॥
अर्थ

माझ्या अंगी असा एकही गुण नाही की ज्यामुळे लोकांनी मला मान-सन्मान द्यावा त्यामुळे जेव्हा लोक मला मानसन्मान देतात त्यावेळी मला खूप लाज वाटते. मापा मध्ये वस्तूचे मोजमाप केले जाते आणि हळूहळू ते माप देखील झिजत असते त्याप्रमाणे मी परमार्थ करत आहे, खरेतर हे देव कार्य आहे यामध्ये मला विनाकारणच मोठेपणा मिळत आहे परंतु अशा मोठेपणाला आग लागो. कोवळा काटा दिसण्यास अतिशय तीक्ष्ण वाटतो तजेलदार वाटतो परंतु त्या काट्याला तीक्ष्णता नसते तो पोचट असतो त्यामध्ये कडकपणा नसतो. भिंतीवरील चित्रे अतिशय उत्तम प्रकारे काढलेले असते परंतु त्याच्यामध्ये सजीवपणा नसल्यामुळे ते फीके असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्याप्रमाणे मला तुझा अनुभव नाही त्यामुळे मी देखील वाया गेलो आहे असेच मला दिसते आहे.
अभंग क्र. १७७१
बोलविसी माझे मुखे । परी या जना वाटे दुःख ॥१॥
जया जयाची आवडी । तया लागी ते चरफडी ॥धृपद॥
कठीण देता काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥
खाऊ नये तेचि मागे । निवारिता रडो लागे ॥३॥
वैद्या भीड काय । अतित्याई जीवे जाय ॥४॥
नये भिडा सांगो आन । पथ्य औषधाकारण ॥५॥
धन माया पुत्र दारा । हे तो आवडे नरका थारा ॥६॥
तुका म्हणे यात । आवडे ते करा मात ॥७॥
अर्थ

देवा तुला जे वाटत आहे, ते माझ्या मुखाने तू मला बोलण्यास भाग पाडत आहे, परंतु या बोलण्याने काही लोकांना दुःख वाटत आहे. देवा ज्याला ज्या गोष्टीची आवड असते तो त्याच्यासाठीच तो धडपड करत असतो त्याप्रमाणे लोकांना या विषयाची आवड आहे त्यासाठीच ते धडपड करत आहेत. वैद्याने रोगी मनुष्याला कडू कढा करून दिला तर तो मूर्ख रोगी आपले तोंड मिटुन बसतो आणि तो कढा घेत नाही. तो रोगी मनुष्य जे खाऊ नको म्हटले नेमके तो तेच मागतो आणि त्याला जर हे खाऊ नको असे सांगितले तर तो रडू लागतो. वैद्याला कसली भिड आली रोगी मनुष्य बरा होण्यासाठी तो कडू काढा करून देणारच आहे आणि तो रोगी मनुष्य काढा नको म्हणतो या कारणामुळे तो जीवाला मुकतो. वैद्याने कोणत्याही भिडात पडून नये आणि वेगळे काही औषध सांगू नये कारण पथ्यच औषधाला साहाय्य करत असतात. धन, माया, पुत्र, घरदार याची आवड करणे म्हणजे नरकाच्या ठिकाणी आपला थारा निश्चिंत करणे असेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात लोक हो मी तुम्हाला चांगले व वाईट हे दोन मार्ग सांगितले आहेत मग तुम्हाला जे आवडेल ते करा कारण देवच माझ्या मुखाने बोलत आहे.
अभंग क्र. १७७२
पतिव्रते आनंद मनी । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनी ॥१॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भले जगी ॥धृपद॥
सुख पुराणी आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥
शूरा उल्हास अंगी । गांढया मरण ते प्रसंगी ॥३॥
शुद्ध सोने उजळे अगी । हीन काळे धावे रंगी ॥४॥
तुका म्हणे तोचि हिरा । घनघाये निवडे पुरा ॥५॥
अर्थ

‘व्यभिचार करणे वाईट आहे’ असे ऐकताच जी पतिव्रता आहे ती मनापासून आनंदते परंतु शिंदळीच्या (व्यभिचारिण स्त्री) मनाला अशी वचने, असे शद्ब खोचक वाटतात आणि तिला ऐकताना देखील त्रास होतो. तसेच पुराणश्रवण करताना आचारशील व्यक्तीला सुख आणि समाधान लाभते परंतु दुराचारी व्यक्तीला ते दुःख देऊन जाते, त्यांचा जीव घुसमटतो. त्याप्रमाणेच शूर व्यक्ती रणांगण नजरेस पडताच उल्हसित होतो, त्याला रोमांच भरून येते परंतु फक्त शूर पणाच्या वार्ता करणाऱ्या पण मूळचा भित्र्या माणसाला मरण जवळ आल्यासारखे वाटते. शुद्ध सोने देखील आगीतून गेले असता उजळते परंतु हींन मिश्रित खोटा धातू काळवंडतो, त्याचे रूपच पालटते.
तुकाराम महाराज म्हणतात नुसते खोटे शब्द आणि देखावा ह्यांना आग लागो, मनाचा शुद्धपणा हा खरा सर्वात भला. कारण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्याची कसोटी घेतलीच जाते आणि मग खरे काय ते जगासमोर येतेच ज्याप्रमाणे खरा हिरा कितीही घाव घातले असता फुटत नाही, तो आहे तसाच अखंड राहतो.
अभंग क्र. १७७३
चालिती आड वाटा । आणिका दाविती जे नीटा ॥१॥
न मनी तयांचे उपकार । नाही जोडा तो गंव्हार ॥धृपद॥
विष सेवूनि वारी मागे । प्राण जाता जेणे संगे ॥२॥
बुडता हाक मारी । ठाव नाही आणिका वारी ॥३॥
तुका म्हणे न करी हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥४॥

अर्थ
स्वतः आडवाटेने गेल्यामुळे ज्याला त्रास होतो व आपल्याला झालेला हा त्रास दुसऱ्याला होऊ नये याकरता जो चांगला मार्ग दाखवतो, मग त्याचे (चांगला मार्ग दाखविणारा) जो उपकार मानत नाही या जगामध्ये त्याच्यासारखा दुसरा महामूर्ख नाही असे समजावे. एखाद्या व्यक्तीने विष घेतले आणि ते त्याच्या प्राणावर बेतले, आणि मग त्याने इतराला समजून सांगितले कि, असले व्यवहार तुम्ही करू नका याने त्रास होतो तर त्याचेही उपकार मानावेत. स्वतः पाण्यात बुडत असताना जो दुसर्‍याला सांगतो की तुम्ही इथे येऊ नका पाणी येथे खूप खोल आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशावेळी तो मनुष्य कसाही असला तर तुम्ही हेक्कड पणा करू नका त्या व्यक्तीचे चांगले गुण घेऊन अवगुण बाजूला टाका.
अभंग क्र. १७७४
कुळाचे दैवत ज्याचे पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरी ॥१॥
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाही । करी भलते ठायी दास तुझा ॥धृपद॥
पंढरीस कोणी जाती वारकरी । होईन त्यांचे घरी पशुयाति ॥२॥
विठ्ठलचिंतन दिवसरात्री ध्यान । होईन पायतन त्याचे पायी ॥३॥
तुळसीवृंदावन जयाचे अंगणी । होइन केरसुणी त्याचे घरी ॥४॥
तुका म्हणे हाचि भाव माझ्या चित्ती । नाही आणिका गती चाड मज ॥५॥
अर्थ

ज्याचे कुळदैवत पंढरीनाथ आहे मी त्याच्या घरी दासीचा पुत्र देखील होऊन राहील. देवा मला शुद्ध जाती, शुद्ध कुळ किंवा शुद्ध वर्णाची आवड नाही मला तू कोणत्याही जातीत कोणत्याही कुळात व कोणत्याही वर्गात जन्माला घाल परंतु तुझा दास करून घे देवा. जे कोणी वारकरी होऊन पंढरीस जाईल त्यांच्या घरी मी पशु देखील होऊन राहील. जे कोणी विठ्ठलाचे चिंतन रात्रंदिवस करतील विठ्ठलाचे ध्यान करतील त्यांच्या पायातील पायताण होऊन मी राहील. ज्यांच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन आहे त्यांच्या दारातील केरसुनी देखील मी होईल. तुकाराम महाराज म्हणतात देवा हीच एक इच्छा माझ्या मनात आहे इतर कोणत्याही गोष्टीची आवड माझ्या मनात नाही.
अभंग क्र. १७७५
चंदनाचे गावी सर्पाच्या वसति । भोगिते ते होती द्वीपातरी ॥१॥
एका ओझे एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥धृपद॥
क्षीराची वसति अशुद्ध सेवावे । जवळी ते जावे भोगे दुरी ॥२॥
तुका म्हणे ऐसी बुद्धि ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥३॥
अर्थ

चंदनाच्या वनांमध्ये सर्पाची वस्ती असते परंतु जे खरच चंदनाच्या सुगंधाचा भोग घेणारे इच्छुक असतात ते लांब राहत असले तरी तेथे येऊन त्याचा सुगंध घेतात. देवा एकाने एखाद्या मालाचे ओझे वाहावे व त्याच मालाचा आनंद दुसऱ्याने घ्यावा असे घडणे म्हणजे केवळ संचिताचे भोग आहेत. गाईच्या स्तनामध्ये गोचीड चिटकलेला असतो परंतु गाईचे दूध ते पीत नाही रक्त पिते आणि दूर असलेले लोक त्या गाईचे शुध्द दूध पितात व भोग घेतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा ज्याच्याजवळ चांगली वस्तू आहे त्याचा वापर त्याला करता येत नाही अशी ज्याची बुद्धी जड आहे त्यापेक्षा मग दगड बरा आहे देवा.
अभंग क्र. १७७६
अवघिया चाडा कुंठीत करूनि । लावी आपुलीच गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना ।
करूनिया देशधडी । मीतूपणापासाव गुंतलो मिथ्या । संकल्प तो माझा तोडी ।
तुझिये चरणी माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवी पिंडी रे रे ॥१॥
माझे साच काय केले मृगजळे । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुके खेळती कवतुके । काय त्यांचे साचपण ॥धृपद॥
वेगळाल्या भावे चित्त तडातोडी । केलो देशधडी मायाजाळे । गोत वित्त माय बाप बहिणी सुत ।
बंधुवर्ग माझी बाळे । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळे ।
जाणोनिया त्याग सर्वस्वे केला । सांभाळी आपुले जाळे ॥२॥
एका जवळी धरी आणिका अंतरी । ती काय सोयरी नव्हती माझी । एकाचे पाळण एकासी भांडण ।
चाड कवणिये काजी । अधिक असे उणे कवण कवण्या गुणे । हे माव न कळेचि तुझी ।
म्हणोनि चिंतनी राहिलो श्रीपती । तुका म्हणे भाक माझी ॥३॥
अर्थ

देवा सर्व विषयाबद्दलची माझी आवड आता नाहीशी करून मला तू तुझीच आवड लाव. देवा माझ्या मनातून तू आशा, मनस, तृष्णा, संकल्पना या सर्व काढून देशो धडीला लाव. देवा मी ‘मी तू ” पणाच्या व्यर्थ जाळ्यांमध्ये गुंतलो आहे आता तो भ्रम तु तोडून टाक देवा. अरे देवा माझे मन व बुद्धी तुझ्या चरणी स्थीर होऊ दे तूच माझ्या देहामध्ये वास्तव्य करीत आहे असाच अनुभव मला येऊ द्यावा. माझे खरे स्वरूप काय आहे ते या भवसागरातील मृगजळाने माझ्यापासून लपवून ठेवले आहे आणि मी व्यर्थ वर्ण जाती कुळ याचा अभिमान धरून राहिलो आहे. लहान मुले भातूकलीचा खेळ खेळतात परंतु हा त्यांचा खेळ खरा आहे काय ? वेगवेगळ्या भावनेने माझ्या चित्ताची ताडातोड केली असून मायाजाळणे मला देशो धडीला लावले आहे. त्या भावना म्हणजे गोत, वित्त, माय, बाप, बहीण, मुलगा, बंधुवर्ग माझे बाळे. एकदा कि काळ जवळ आला की मग हे एकमेकांशी संबंध ठेवत नाहीत. देवा आता हे सर्व जाणूनच मी सर्वस्वाचा त्याग केला आहे त्यामुळे तुमचे मायाजाळ तुम्ही आवरून टाकावे. तुकाराम महाराज म्हणतात मी एकाला जवळ करतो तर दुसऱ्याला अंतर देतो मग दूर केलेले माणसे माझे सोयरे सज्जन नाहीत काय ? तसेच मी एकाचे पालन करतो दुसर्‍याशी भांडण करतो तर हे कशासाठी ? देवा मी एका बरोबर असे व दुसऱ्या बरोबर वेगळे असे कोणत्या कारणामुळे वागतो कोणत्या गुणामुळे असे मी दुसऱ्या बरोबर वागतो ही तुझी माया काही मला कळत नाही. त्यामुळेच हे देवा हे श्रीपती मी तुझेच चिंतन करून तुझ्या पायी स्थिर झालो आहे त्यामुळे तू माझी एवढी विनंती पूर्ण कर.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version