Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१३ मे, दिवस १३३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १५८५ ते १५९६

13 MAY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI 1

13 MAY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI 1

“१३ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १३ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १३ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १५८५ ते १५९६ चे पारायण आपण करणार आहोत.
१३ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १५१ ते १७५,

151-11
तरी इयेही विषयींचे काही । एथ सर्वथा सांकडे नाही । सुखे आवडे ते माझिया देही । देखसी तू ॥151॥
तर त्याबद्दल हि काही संकट वाटण्याचे कारण नाही, या माझ्या शरीरात जे तुला आवडेल ते सुखाने पाहून घे.
152-11
ऐसे विश्वमूर्ती तेणे । बोलिले कारुण्यपूर्णे । तव देखत आहे की नाही न म्हणे । निवांतुचि येरु ॥152॥
या प्रमाणे ते विश्वरूप श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर, अर्जुन आपले रूप पहात आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले, तर तो स्वस्थ बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला.
153-11
एथ का पा हा उगला ? । म्हणौनि श्रीकृष्णे जव पाहिला । तव आर्तीचे लेणे लेइला । तैसाचि आहे ॥153॥
पहात असताना भगवंताच्या लक्षात आले की, अर्जुन विश्वरूप पाहण्याच्या आहेत जसा गुंगलेला होता तसाच दृष्टीस पडला.

न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥11. 8॥

अर्थ केवळ या तुझ्या दृष्टीने मला पहाण्यास तू समर्थ नाहीस. याकरता मी तुला दिव्य दृष्टि देतो. आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा. ॥11-8॥
(ज्ञानदृष्टि पुढे चालू)
154-11
मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सापडे । परी दाविले ते फुडे । नाकळेचि यया ॥154॥
मग मनात म्हणतात, याची उत्कंठा अजून कमी झालेली नाही व याला विश्वरूपदर्शनाने आनंदही झालेला नाही, कारण त्याला दाखवलेले विश्वरूप दिसलेच नाही.
155-11
हे बोलोनि देवो हासिले । हासोनि देखणियाते म्हणितले । आम्ही विश्वरूप तरी दाविले । परी न देखसीच तू ॥155॥
असे म्हणून देव हसले आणि अर्जुनाला म्हणाले, ” आम्ही तुला विश्वरूप दाखविले, परंतु तू तर ते पहातच नाहीस. “


156-11
यया बोला येरे विचक्षणे । म्हणितले हा जी कवणासी ते उणे ? । तुम्ही बकाकरवी चांदिणे । चरऊ पहा मा ॥156॥
वया भगवंताच्या बोलण्याला त्या बुध्दिमान अर्जुनाने असे उत्तर दिले की, अहो देवा ! हा उणेपणाचा दोष कुणाकडे आहे ? तुम्ही बगळ्याकडून चंद्राच्या प्रकाशांतील अमृतकण चरवू पाहता काय ?
157-11
हा हो उटोनिया आरसा । आंधळिया दाऊ बैसा । बहिरियापुढे हृषीकेश गाणीव करा ॥157॥
अहो ह्रषीकेशा ! तुम्ही आरसा स्वच्छ करून तो आंधळ्याला दाखवू पाहतिं किंवा बहिर्‍यापुढे गायन करता !
158-11
मकरंदकणाचा चारा । जाणता घालूनि दर्दुरा । वाया धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥158॥
फुलांतील मधाचा चारा जाणूनबुजून बेडकाला घालून वाया घालविता ! मग हे शारंगधरा ! कोणावर रागावतां ?
159-11
जे अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिले । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटले । ते तुम्ही चर्मचक्षूंपुढे सूदले । मी कैसेनि देखे ॥159
जे विश्वरूप इंद्रियाने दिसण्याजोगे नाही, केवळ ज्ञानदृष्टीच्या आटोक्यातील आहे, असे शास्राचे म्हणने आहे, ते विश्वरूप तुम्ही माझ्या चर्मचक्षुंपुढे मांडले, मग मी कसा पाहणार ?
160-11
परी हे तुमचे उणे न बोलावे । मीचि साहे तेचि बरवे । एथ आथि म्हणितले देवे । मानू बापा ॥160
पण तुमचा दोष काढू नये. तो मी आपल्याकडे घेणे बरे. या अर्जूनाच्या बोलण्यावर भगवान म्हणतात, बा अर्जुना ! तुझे म्हणणे मला मान्य आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


161-11
साच विश्वरूप जरी आम्ही दावावे । तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे । परी बोलत बोलत प्रेमभावे । धसाळ गेलो ॥161॥
खरेच आहे, जर आम्ही तुला विश्वरूप दाखवायचे, तर आगोदर विश्वरूप पाहण्याचे सामर्थ्य तुला द्यायला पाहिजे; पण अर्जुना ! प्रेमाच्या अवेशात विचार सुचला नाही.
162-11
काय जाहले न वाहता भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे । तरी आता माझे निजरूप देखिजे । ते दृष्टी देवो तुज ॥162॥
काही झाले तरी मशागत न करता जमिनींत पेरलेला वेल नाश पावतो, असो. आता ज्या दृष्टीने तुला माझे विश्वरूप पाहता येईल, ती दृष्टि देतों.
163-11
मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनिया अनुभवा । माजिवडा करी ॥163॥
मग त्या दृष्टीच्या सहाय्याने माझा संपूर्ण ऐश्वर्ययोग पाहून तो अनुभवांत दृढ कर.
164-11
ऐसे तेणे वेदांतवेद्ये । सकळ लोक आद्ये । बोलिले आराध्ये । जगाचेनि ॥164॥
वेदान्तविचाराने कळणारा, सर्व सृष्टीच्या पूर्वी कारणरूपाने असणारा व सर्व जगाचे आराध्य दैवत असा जो परमात्मा, तो याप्रमाणे बोलला.

संजय उवाच
एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥11. 9॥

अर्थ संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, महायोगैश्वर्यसंपन्न हरि याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखवता झाला. ॥11-9॥
(संजय म्हणाला अर्जुन दैववान 165-)
165-11
पै कौरवकुलचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जे श्रियेहूनि त्रिजगती । सदैव असे कवणी ? ॥165
संजय म्हणतो, हे कौरवांच्या कुळात उत्पन्न झालेल्या सार्वभौमराजा धृतराष्ट्रा ! मला वारंवार याचेच आश्चर्य वाटते की, या त्रैलोक्यात श्रीलक्ष्मीपेक्षा भाग्यवान दुसरी कोणती स्री आहे ?


166-11
ना तरी खुणेचे वानावयालागी । श्रुतीवाचूनि दावा पा जगी । ना सेवकपण तरी आंगी । शेषाच्याचि आथी ॥166॥
किंवा आत्मस्वरूपाची खुणेने ओळख पटवून देणारा वेदाशिवाय जगात दुसरा कोण आहे ? किंवा खरे सेवकपण भगवंताची अखंड शय्या होऊन राहणार्‍या शेषाच्याच ठिकाणी आहे.
167-11
हा हो जयाचेनि सोसे । शिणत आठही पहार योगी जैसे । अनुसरले गरुडा{ऐ}से । कवण आहे ? ॥167॥
ज्याचा ध्यास लागून योग्याप्रमाणे आठहि प्रहर अविश्रान्त सेवा करणारा गरूडासारखा दुसरा कोण आहे ?
168-11
परी ते आघवेचि एकीकडे ठेले । सापे कृष्णसुख एकंदरे जाहले । जिये दिवूनि जन्मले । पांडव हे ॥168॥
पण ते सर्व बाजूला राहिले आणि सांप्रत पांडव जन्मले त्या दिवसापासून यांचेच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण सुख एकवटून राहिलें.
169-11
परी पाचाही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना । कामुक का जैसा अंगना । आपैता कीजे ॥169॥
जसा कामासक्त पुरुष स्रियेच्या स्वाधीन होतो, तसा श्रीकृष्ण हा, त्या पांचांहि पांडवांमध्ये खरोखर अर्जुनाच्या सर्वस्वी स्वाधीन झाला.
170-11
पढविले पाखरू ऐसे न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले । कैसे दैव एथे सुरवाडले । ते जाणो न ये ॥170॥
तसा शिकविलेला पक्षीही शिकवणार्‍यांचे स्वाधीन होऊन बोलणार नाही किंवा करमणुकीकरतिं पाळलेले हरिणहि असे स्वाधीन होऊन चालणार नाही. अर्जुनाचे थोर भाग्य कसे उदयाला आले ते समजत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


171-11
आजि हे परब्रह्म सगळेच । भोगावया सदैव याचेचि डोळे । कैसे वाचेनि हन लळे । पाळीत असे ॥171॥
श्रीकृष्णरूपाने प्रगट झालेले संपुर्ण परब्रह्म सर्वदा भोगण्याकरिता याचेच डोळे होते. अर्जुनाच्या बोलण्याचे भगवान कसे लळे पाहतो, पहा !
172-11
हा कोपे की निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये । नवल पिसे लागले आहे । पार्थाचे देवा ॥172॥
अर्जुन रागावला तर भगवान मुकाट्याने सहन करतत, अर्जुन रुसला तर स्वतः भगवान त्याला समजवितात, असे काही अर्जुनाचे विलक्षण वेड श्रीभगवंताला लागले आहे.
173-11
एऱ्हवी विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानिता जाहले । भाट ययाचे ॥173॥
संपूर्ण विषयवासना जिंकून जन्माला आले, असे जे समर्थ शुकादिक मुनी, ते देखील या भगवंताच्या विषयभोगादि लीलांचे वर्णन करणारे भाट झाले.
174-11
हा योगियांचे समाधिधन । की होऊनि ठेले पार्थाआधीन । यालागी विस्मयो माझे मन । करीतसे राया ॥174॥
खरोखर योगियांचा समाधिरूप ठेवा होय, पण तोच अर्जुनाच्या स्वाधिन होऊन राहिला; म्हणून राजा धृतराष्ट्रा ! माझ्या मनाला याचेच वारंवार आश्चर्य वाटते.
(योगी जो निर्गुण, निराकार स्वरूपाचे ठिकाणी अत्यंत कष्टाने चित्त स्थिर करून, समाधि साधतात, तेच स्वरूप, भक्ताच्या परमप्रेमामुळे सगुण साकार होऊन, भक्ताच्याच सर्वस्वी स्वाधीन होऊन राहते. असे परमप्रेमरूपभक्तीचे आश्चर्यकारक कौतुक आहे, असा भाव माऊलींनी सूचित केला आहे. )
175-11
तेवीचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथे कौरवेशा । श्रीकृष्णे स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥175॥
पुनः संजय आपणच म्हणतो, हे कौरवांच्या स्वामी धृतराष्ट्रा ! येथे आश्चर्य करण्याचे कारणच नाही. भगवान श्रीकृष्णांनी आपला म्हणून ज्याचा अंगीकार केला, त्याचा भाग्योदय होत असतो.

दिवस १३३ वा, १३, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५८५ ते १५९६
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १५८५
गुरुशिष्यगण । हे तो अधमलक्षण ॥१॥
भूती नारायण खरा । आप तैसाचि दुसरा ॥धृपद॥
न कळता दोरी साप । राहू नेंदावा तो काप ॥२॥
तुका म्हणे गुणदोषी । ऐसे न पडावे सोसी ॥३॥
अर्थ

एखादया मनुष्याने गुरु व्हावे आणि त्याने दुसऱ्याला शिष्य करुन घ्यावे हे अधमपणाचे लक्षण आहे. सर्व भूतमात्रांमध्ये एक नारायण खरा आहे त्यामुळे जसे आपण आहोत तसेच दुसराही आहे. दोरी पडली की दोरीचे ज्ञान न होता सर्पाचा भास होतो व त्यामुळे भय उत्पन्न होते आणि ते भय नाहीसे करुन घ्यायचे असेल तर दोरीचे ज्ञान करुन घेणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “लोकांचे गुणदोष पाहण्याच्या छंदात पडू नये सर्वत्र एक नारायणच आहे हा विचार करावा. ”
अभंग क्र. १५८६
अंगीकार ज्याचा केला नारायणे । निंद्य ते हि तेणे वंद्य केले ॥१॥
अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली ॥धृपद॥
ब्रम्हहत्याराशी पातके अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥२॥
तुका म्हणे येथे भजन प्रमाण । काय थोरपण जाळावे ते ॥३॥
अर्थ

ज्याचा अंगीकार नारायणाने केला ते जगात निंदनीय जरी असले तरी त्याने त्यांना वंदय केले. उदाहरण दयायचे म्हटले तर अजामेळ भिल्ल शबरी गणिका वेश्या हे जरी पापी होते तरीही तुम्ही त्यांना तारले त्यांना वंदय केले हे तर प्रत्यक्ष पुराणात सांगितलेले आहे. ब्रम्हहत्याची रासच ज्याच्या हातातून घडली ज्याने अनेक महापातके केले अशा वाल्मिकीचा देखील तुम्ही उध्दार केला त्याला सर्वत्र वंदय केले. तुकाराम महाराज म्हणतात, “या नारायणाने या सर्वाचा अंगीकार केला कारण येथे केवळ तुझे नाम भजन प्रमाण आहे बाकीचा मोठापणा काय जाळायचा आहे काय ? ”
अभंग क्र. १५८७
अविट हे क्षीर हरीकथा माउली । सेविता सेविली वैष्णवजनी ॥१॥
अमृत राहिले लाजोनि माघारे । येणे रसे थोरे ब्रह्मानंदे ॥धृपद॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥
सर्व सुखे तया मोहोरती ठाया । जेथे दाटणी या वैष्णवांची ॥३॥
निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत । धरूनिया प्रीत गायनाची ॥४॥
तुका म्हणे केली साधना गाळणी । सुलभ कीर्तनी होऊनी ठेला ॥५॥
अर्थ

हरीकथा माऊली हे कधीही न नाशणारे दूध आहे आणि वैष्णवजन याच दुधाचे सेवन करतात आणि पुन्हा पुन्हा भूक लागली की तेच सेवन करत असतात. या हरीकथा माऊलीच्या ब्रम्हानंदरुप दुधापुढे अमृत देखील मागे राहिले आहे. कोणी कितीही पतित पातके असोत ते हरीकथा पंगतीत बसले की पंगती पावन होतात आणि देवासारखे चतुर्भूज होतात. जेथे वैष्णवाचे दाटने म्हणजे गर्दी असते तेथे सर्व प्रकारचे सुख मोहोरत असतात. हरीकथा गायनाची आवड या देवाला असल्यामुळे तो निर्गुण असलेल्या देवाने सगुण गुणवंत रुपाचे सोंग घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या देवाने सर्व साधनांची गाळणी करुन हरीकथा हे एक साधन सर्वश्रेष्ठ ठरवले आहे व त्यामुळेच हरीकथा कीर्तनामध्ये हा देव प्राप्त होणे सोपे झाले आहे. ”
अभंग क्र. १५८८
धनवंता घरी । करी धनचि चाकरी ॥१॥
होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावेचि घर ॥धृपद॥
रानी वनी द्वीपी । असती ती होती सोपी ॥२॥
तुका म्हणे मोल । देता काही नव्हे खोल ॥३॥
अर्थ

धनवंताच्या घरी धनच त्याची चाकरी करतो. घरी बसल्या बसल्याच त्याचा सर्व व्यवहार आपोआप होतो घर सोडून कोठेही त्याला जावे लागत नाही. धनवंत माणसाला कोणतीही वस्तू लागत असेल मग ती रानात वनात परदेशात कोठेही असो तरी ती धनाच्या जोरावर मिळणे सोपे असते. तुकाराम महाराज म्हणतात, “धनवंताला कोणतीही वस्तू लागू दया त्या वस्तूची जर भरपूर किंमत दिली तर ती मिळणे अवघड नाही. ”
अभंग क्र. १५८९
हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥
केला ॠणी नारायणा । नव्हे क्षण वेगळा ॥धृपद॥
घालोनिया भार माथा । अवघी चिंता वारली ॥२॥
तुका म्हणे वचनासाठी । नाम कंठी धरियेले ॥३॥
अर्थ

हरीच्या ठिकाणी अनन्य भक्तीभाव ठेवला की मोठे भाग्य होते आणि त्याविषयी माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो, “भक्तीभावाच्या जोरावर मी नारायणाला ऋणी केले आहे आणि त्यामुळे तो माझ्यापासून एक क्षणभर देखील वेगळा राहात नाही. मी माझ्या सर्व योगक्षेमाचा भार त्याच्या माथ्यावर घातला असून त्यामुळे माझी सर्व चिंताच नष्ट झाली आहे. ” तुकाराम महाराज म्हणतात, “वेदशास्त्रात पुराणात तसेच पूर्वीच्या संतांनी सांगितले आहे की, हरीचे नाम घेतल्याने हरी तुमचा ऋणी होईल त्यामुळे मी कंठात हरीनाम धारण केले आहे. ”
अभंग क्र. १५९०
देव आहे सुकाळ देशी । अभाग्यासी दुर्भीक्ष ॥१॥
नेणती हा करू साटा । भरले फाटा आडराने ॥धृपद॥
वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥२॥
तुका म्हणे मन मुरे । मग जे उरे तेचि तू ॥३॥
अर्थ

देव सर्वत्र आहे सर्व देशामध्ये व्यापलेला आहे आणि त्यामुळे सर्वत्र सुकाळ आहे पण अभागी मनुष्याला देव दुर्भिक्ष आहे असे वाटते म्हणजे त्याची समजूत अशी असते की देव कोठेच नाही. देव सर्वत्र आहे असे जे मानत नाही ते भ्रमाच्या जाळयात गुंतून आड रानात भटकत राहात असतात देवाने हे विश्वरुपी घर वसविले आहे व त्यामध्ये तो राहातोही परंतू त्याचा शोध आजपर्यंत कोणालाही घेता आला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यावेळी तुझे मन मरते म्हणजे तुझ्या मनाची वृत्ती नष्ट होते त्यावेळी जे स्वरुप उरते तेच तुझे खरे सत्य स्वरुप आहे व देवाचेही तेच खरे सत्य स्वरुपच आहे. ”
अभंग क्र. १५९१
खुंटोनिया दोरी आपणियांपाशी । वावडी आकाशी मोकलिली ॥१॥
आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ते ॠण बुडो नेणे ॥धृपद॥
बीज नेले तेथे येईल अंकुर । जतन ते सारे करायाची ॥२॥
तुका म्हणे माझी निश्चिंतीची सेवा । वेगळे नाही देवा उरो दिले ॥३॥
अर्थ

दोरी खुंटीला बांधली व वावडी आकाशात मोकळी जरी सोडून दिली तरी दोरीमुळे ती वावडी आपल्यापाशी परत येत असते. जो मालाचे रक्षण करतो त्याचा माल चोरी जात नाही त्याप्रमाणे जेवढे कर्ज दयायचे असेल त्याच किमतीची वस्तू गहाण ठेवून कर्ज दिले तर त्याचे पैसे बुडत नाही. शेतामध्ये बीज नेले ते पेरले तर अंकुर येणार परंतू त्याचे त्या अंकुराची फलप्राप्ती होण्याकरीता त्याचे जतन करणे हे मुख्य सार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमची सेवा मी निश्चिंत मनाने करत आहे आणि त्या सेवेमुळेच मी तुम्हाला व मला वेगळे उरु दिले नाही. ”
अभंग क्र. १५९२
शाहाणपणे वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥
कैसे येथे कैसे तेथे । शहाणे ते जाणती ॥धृपद॥
यज्ञमुखे खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥२॥
तुका म्हणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥३॥
अर्थ

वेद इतका शहाणा आहे तरी देखील त्याने हरीचे वर्णन करण्याविषयी मौन धरले आहे परंतू त्या ताक पिणाऱ्या गोपी प्रत्यक्ष हरीविषयी हरीसोबत राहून त्याचा सुख भोगत आहेत. येथे असे कसे आणि तेथे तसे कसे हे फक्त शहाणे संतच जाणतात. यज्ञाव्दारे देवाला प्राप्त करुन घेण्यासाठी देवाला संतोष करण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात परंतू त्यामध्येही देव चूक काढतो परंतू भिल्लीणीचे उष्टे बोरे सुध्दा त्याला गोड वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाला प्राप्त करुन घेण्याचे एकच वर्म आहे ते म्हणजे देवाविषयी श्रध्दायुक्त भक्तीभाव असणे आणि भक्तीभावावीण कोणतेही कर्म देवाच्या प्राप्तीसाठी केले तरी ते व्यर्थ क्षीणच होतात. ”

अभंग क्र. १५९३
मजुराचे पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥
या रे या रे हातोहाती । काम माती सारावी ॥धृपद॥
रोजकीर्द होतो झाडा । रोकडाचि पर्वत ॥२॥
तुका म्हणे खोल पाया । वेचो काया क्लेशेसी ॥३॥
अर्थ

परमार्थाची इमारत बांधणारे आम्ही मजूर आहोत आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला हा देव प्रेमरुपी मोल भरपूर प्रमाणात देतो आणि सर्वाना प्रेमरुपी मोल देऊनही त्या दात्याच्या भांडारामध्ये भरपूर प्रेमरुपी मोलाचा साठा जसाच्या तसा राहातो. जेवढे कोणी परमार्थिक मजूर असतील ते सर्व येथे या आणि सर्व संसारावरची माती बाजूला सारण्याचे काम करा. येथे रोज जमाखर्चाची नोंद होत असते त्यामुळे जो कोणी जेवढी सेवारुपी मजूरी करेन तेवढे त्याला प्रेमरुपी मोल मिळेल आणि एवढे मोल वाटून देखील त्या दात्याजवळ पर्वताएवढे प्रेमरुपी मोल शिल्लकच राहाते. तुकाराम महाराज म्हणतात, “या परमार्थरुपी इमारतीचा खूप शरीरकष्ट करून पाया खोल नेऊ. ”
अभंग क्र. १५९४
स्मशानीच आम्हा न्याहालीचे सुख । या नावे कौतुक तुमची कृपा ॥१॥
नाही तरी वाया अवघे निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥धृपद॥
झाडे झुडे जीव सोइरे पाषाण । होती तई दान तुह्मी केले ॥२॥
तुका म्हणे आता पाहे अनुभव । घेईन हाती जीव पांडुरंगा ॥३॥
अर्थ

देवा स्मशानामध्ये मला चितेवर जरी झोपवले तरी मला गादीवर झोपल्यासारखे वाटावे मग हेच कार्य कौतुक आणि हीच तुमची खरी कृपा आहे असे मी समजेन. नाहीतर केवळ देह तादात्मे सुटावे असे शब्द वापरणे म्हणजे केवळ पोकळ बडबड करणे हे व्यर्थ होय. ज्यावेळी सर्व झाडे झुडपे जीव पाषाण हे सोयरे होतील त्यावेळेस तुमचे माझ्यावर कृपादान झाले असे मला वाटेन. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पांडुरंगा मी माझा जीव माझ्या हातात धरुन एवढीच वाट पाहात आहे की मला हा अनुभव केव्हा येईन. ”
अभंग क्र. १५९५
आमची जोडी ते देवाचे चरण । करावे चिंतन विठोबाचे ॥१॥
लागेल तरी कोणी घ्यावे धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥धृपद॥
उभारिला कर प्रसिद्ध या जगे । करू केला त्याग मागे पुढे ॥२॥
तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न । ऐसे देऊ दान एक वेळा ॥३॥
अर्थ

आमचा सर्वात मोठा लाभ म्हणजे विठोबाच्या चरणाचे चिंतन करणे होय. ज्याला हा लाभ प्राप्त करुन घ्यायचा असेल त्याने त्याच्या आवडीनुसार जितका पाहिजे तितका घ्यावा. जगामध्ये या लाभाची प्रसिध्दी करण्याकरताच मी माझे हात उभारुन सर्वाना सांगतो आहे आणि यामागेही मी सर्वस्वाचा त्याच्यामुळेच त्याग केला आहे व पुढेही करीन. तुकाराम महाराज म्हणतात, “परमार्थामधले दारिद्रय ज्यामुळे कायमचे नष्ट होईल अशा प्रकारचेच दान आम्ही सर्वाना एकदम देऊन टाकू. ”
अभंग क्र. १५९६
दधिमाजी लोणी जाणती सकळ । ते काढी निराळे जाणे मथन ॥१॥
अग्नी काष्ठामाजी ऐसे जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥धृपद॥
तुका म्हणे सुख मळीण दर्पणी । उजळिल्यावाचूनि कैसे भासे ॥२॥
अर्थ

दह्यामध्ये लोणी आहे हे सर्व लोक जाणतात परंतू दह्याचे मंथन करण्याचे ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाच ते लोणी काढता येते. काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी आहे हे सर्वाना माहित आहे परंतू त्याचे मंथन केल्यावाचून घर्षण केल्यावाचून अग्नी लाकडाला कसा जाळू शकेन ? तुकाराम महाराज म्हणतात, “दर्पणाला म्हणजे आरशाला स्वच्छ केल्याशिवाय मुखाचे प्रतिबिंब कसे दिसेल ? त्याप्रमाणे आत्मा देहात आहे परंतू त्याचे मंथन केले तरच आत्म्याचे ज्ञान होते. ”

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version