“११ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ११ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ११ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १२०१ ते १२१२ चे पारायण आपण करणार आहोत.
११ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २०१ ते २२५,
201-9
ते पाहाटेवीण पाहावित । अमृतेवीण जीववित । योगेवीण दावित । कैवल्य डोळा ॥201॥
ते साधू पहांट झाल्याशिवाय जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञान करून देतात; अमृताशिवाय प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करतात; व योगसाधनाशिवाय धडधडीत डोळ्यांसमोर मोक्ष दाखवितात.
202-9
परि राया रंका पाड धरु । नेणती सानेया थोरा कडसणी करु । एकसरे आंनदाचे आवारु । होत जगा ॥202॥
परंतु राजात व रंकात अंतर मानीत नाहीत, व लहान थोर जाणीत नाहीत. याप्रमाणे जगाला सरसकट आनंदाचे माहेरघर होतात.
203-9
कही एकाधेनि वैकुंठा जावे । ते तिही वैकुंठचि केले आघवे । ऐसे नामघोषगौरवे । धवळले विश्व ॥203॥
वैकुंठास जाणारा क्वचितच आढळतो; परंतु ह्या साधूंनी सर्व जगच वैकुंठ केले. अशा माझ्या नामभजनाच्या योग्यतेने सर्व जग पवित्र केले.
204-9
तेजे सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हे किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥204॥
त्या साधूंचे तेज सूर्याप्रमाणे निर्मल आहे. परंतु त्या सूर्यातही तो अस्तास जातो हा दोष आहे, चंद्रासारखे म्हणावे, तर तो एखादे वेळेसच पूर्ण असतो.
205-6
मेघ उदार परि वोसरे । म्हणऊनि उपमेसी न पुरे । हे निःशंकपणे सपांखरे । पंचानन ॥205॥
परंतु हे साधू नेहमी पूर्णत्वास पावलेले आहेत. यांचे औदार्य मेघाप्रमाणे म्हणावे, तर तो ओसरतो; म्हणून उपमा देण्यास योग्य होत नाही. तर हे साधू निःशंकपणे पंख असणाऱ्या सिंहाप्रमाणे होत.
206-9
जयांचे वाचेपुढा भोजे । नाम नाचत असे माझे । जे जन्मसहस्त्री वोळगिजे । एकवेळ मुखासि यावया ॥206॥
ज्या माझ्या नांवाचा मुखाने एकदा उच्चार होण्याकरिंता सहस्त्र जन्म माझी सेवा करावी लागते, ते माझे नांव ज्यांच्या वाचेपुढे कौतुकाने नाचत असते, (ज्या माझ्या नांवाचा असा महिमा आहे, )
207-9
तो मी वैकुंठी नसे । एक वेळ भानुबिंबीही न दिसे । वरी योगियांचीही मानसे । उमरडोनि जाय ॥207॥
तो मी वैकुंठलोकीही नसतो, एखादे वेळी सूर्यमंडळातही दिसत नाही; इतकेच नव्हे तर, योग्यांच्याही मनाचे उल्लंघन करून जातो,
208-9
परि तयापाशी पांडवा । मी हारपला गिंवसावा । जेथ नामघोषु बरवा । करिती ते माझे ॥208॥
परंतु, हे पांडवा; जरी मी कोठे सापडलो नाही, तरी जे माझ्या नांवाचा सतत घोष करतात, त्यांच्याजवळ सापडायचाच.
209-9
कैसे माझा गुणी धाले । देशकाळाते विसरले । कीर्तनसुखे झाले । आपणपाचि ॥209॥
ते माझ्या गुणांनी इतके तृप्त झालेले असतात की, ते देशकालाला विसरून नामसंकीर्तनाच्या योगे आपल्या ठिकाणीच सुखी झालेले असतात.
210-9
कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध । माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥210॥
कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद या शुद्ध नांवांच्या कवितेने आत्मानात्मविचार करुन ते सतत नामस्मरण करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-9
हे बहु असो यापरी । कीर्तित माते अवधारी । एक विचरती चराचरी । पांडुकुमरा ॥211॥
हे पंडुकुमरा, अशा प्रकारे आणखी पुष्कळ तऱ्हांनी माझे गुणानुवाद वर्णन करीत कोणी जगतांत हिंडतात.
212-9
मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राणा मना । पाढाऊ घेउनी ॥212॥
अर्जुना, मग दुसरे कित्येक पंचप्राण व मन यांना अंतर्यामी जिंकून जयपत्र मिळवितात.
213-9
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामांची मांडिली । वाहाती यंत्रे ॥213॥
बाहेरून यमनियमांचे कुंपण लावून, आत मूळबंधाचा कोट तयार करतात, व त्यावर प्राणायामरूप सतत चालू असणाऱ्या तोफा ठेवतात.
214-9
तेथ उल्हाट शक्तीचेनि उजिवडे । मन पवनाचेनि सुरवाडे । सतरावियेचे पाणियांडे । बळियाविले ॥214॥
मग कुंडलिनी ऊर्ध्वमुख होऊन, तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे – सतराव्या कलेचे तळे स्वाधीन करुन घेतात.
215-9
तेव्हा प्रत्याहारे ख्याति केली । विकारांची संपिली बोहेरिली । इंद्रिये बांधोनि आणिली । हृदयाआंतु ॥215॥
त्या वेळी प्रत्यहार हा मोठ्या पराक्रमाने कामक्रोधादि विकारांचा, परिवारासह फडशा करतो ? आणि इंद्रिये बांधून ह्रदयात आणतो.
216-9
तव धारणावारु दाटिले । महाभूतांते एकवटिले । मग चतुरंग सैन्य निवटिले । संकल्पाचे ॥216॥
इतक्यात धारणारूप घोडेस्वार हल्ला करून पंचमहाभूतांचे ऐक्य करतात, व संकल्पाचे चतुरंग सैन्य (मन, बुद्धि, चित्त व अहंकार) नाहीसे करतात.
217-9
तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचे निसाण वाजत । दिसे तन्मयाचे झळकत । एकछत्र ॥217॥
नंतर जयजयकार शब्द होतो; ध्यानरूपी नौबद वाजू लागून एकरूपतेचे छत्र चमकूं लागते.
218-9
पाठी समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा । पट्टाभिषेकु देखा । समरसे जाहला ॥218॥
मागाहून समाधिरूप लक्ष्मीचा अखंड -आत्मानुभवरुपी राज्यसुखाच्या ब्रह्मरूप ऐक्यतेने पट्टाभिषेक होतो.
219-9
ऐसे हे गहन । अर्जुना माझे भजन । आता ऐके सांगेन । जे करिती एक ॥219॥
हे अर्जुना, असे जे माझे कठीन भजन, ते कोण करतात हे तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे भजन करणारे कोण आहेत ते ऐक.
220-9
तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतु अंबरी । तैसा मीवाचूनि चराचरी । जाणती ना ॥220॥
वस्त्राच्या दोन्ही पदरांपर्यंत जसा आडवा व उभा भरलेला तंतुच असतो, त्याप्रमाणे माझ्याशिवाय हे जगत् दुसरे कशानेही व्यापलेले नाही, अशी त्यांची समजूत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-9
आदि ब्रह्मा करुनी । शेवटी मशक धरुनी । माजी समस्त हे जाणोनी । स्वरुप माझे ॥221॥
ब्रह्मदेव एका बाजूस व दुसरे बाजूस चिलीट धरून मध्ये माझ्या स्वरूपाशिवाय दुसरे काही नाही असे ते समजतात.
222-9
मग वाड धाकुटे न म्हणती । सजीव निर्जीव नेणती । देखिलिये वस्तू उजू लुंटिती । मीचि म्हणोनि ॥222॥
मग लहान व मोठे, सजीव व निर्जीव असा भेद न धरता जी जी वस्तु दृष्टीस पडेल ती मद्रूपच आहेत.
223-9
आपुले उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे । एकसरे व्यक्तिमात्राचेनि नांवे । नमूचि आवडे ॥223॥
अशा सरळ भावाने ते जीवमात्राला नमस्कार करतात. आपला मोठेपणा विसरून, पुढे येणारी वस्तु योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे न जाणता सरसकट सर्व वस्तूंला नमस्कार करणे हेच त्यांना आवडते.
224-9
जैसे उंची उदक पडिले । ते तळवटवरी ये उगेले । तैसे नमिजे भूतजात देखिले । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥224॥
ज्याप्रमाणे पुष्कळ उंचीवरून पडणारे पाणी एकदम सहज तळाशी येते, त्याप्रमाणे, जो प्राणी दृष्टीस पडेल त्यास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच बनतो.
225-9
का फळलिया तरुची शाखा । सहजे भूमीसी उतरे देखा । तैसे जीवमात्रा अशेखा । खालावती ते ॥225॥
किंवा फळाने भरलेल्या झाडाची खांदी जशी सहज भुईला लावल्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे प्राणीमात्रापुढे ते नमस्कार घालतात.
दिवस १०१ वा, ११, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२०१ ते १२१२
सार्थ तुकाराम गाथा
(sant tukaram maharaj abhang)
सार्थ तुकाराम गाथा १२०१ ते १३००
सार्थ तुकाराम गाथा 1201 ते 1300
अभंग क्र. १२०१
सुखाचे व्यवहारी सुखलाभ जाला । आनंदे कोंदला मागे पुढे ॥१॥
संगती पंगती देवासवे घडे । नित्य नित्य तेचि साच ॥धृपद॥
समर्थाचे घरी सकळ संपदा । नाही तुटी कथा कासयाची ॥२॥
तुका म्हणे येथे लाभाचिया कोटी । बहु वाव पोटी समर्थाचे ॥३॥
अर्थ
नामसंकीर्तनाच्या सुखकारक व्यवहाराने इतक्या सुखाचा लाभ झाला आहे की मागे पुढे सर्व आनंदच दाटला आहे. आता आम्हाला देवा संगे आणि देवाच्या संगतीत त्याच्या पंक्तीत बसण्याचा योग घडतो आहे आणि हा लाभ मर्यादित काळा पुरता नसून नित्य नित्य म्हणजे रोज रोज लाभत आहे. देव सर्वसमर्थ आहे आणि त्याच्या घरी सर्व संपदा आहे त्यामुळे आम्हाला कशाचीही कमतरता नाही. तुकाराम महाराज म्हणतात समर्थांच्या घरी देवाच्या घरी कोट्यावधी लाभ होतात आणि समर्थांच्या पोटी मोठा वाव (जागा) आहे.
अभंग क्र. १२०२
काय देवे खाता घेतले हातीचे । आले हे तयाचे थोर भय ॥१॥
म्हणता गजरे राम एकसरे । जळती पापे थोरे भयधाकें॥धृपद॥
काय खोळंबले हात पाय अंग । नाशिले हे सांग रूप काय ॥२॥
कोण लोकी सांग घातला बाहेरी । म्हणता हरी हरी तुका म्हणे ॥३॥
अर्थ
अरे तू हरीचे नाम घेत आहे म्हणून, देवाने तु काही खात आहे किंवा खात असताना तुझ्या हातून काही ओढून घेतले आहे काय ? नाही ना मग देवाचे नाम घेण्यासाठी घाबरण्याचे काय कारण ? रामनामाचा जप तु एकदम गर्जून म्हणजे मोठ्या भक्तिभाव पूर्ण श्रद्धेने घेतले तर सर्व पापे नामाच्या भयाने जळून जातात. हरीचे नाम घेत असताना तुझे हात पाय बंद पडतात काय किंवा तुझ्या सौंदर्यामध्ये काही बिघाड होतो काय ? तुकाराम महाराज म्हणतात तु हरी म्हणत असताना कोणीही तुला धर्माच्या बाहेर काढले काय ? ते तरी सांग.
अभंग क्र. १२०३
उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥१॥
नाही दुजा ठाव । काही उत्तम मध्यम भाव ॥धृपद॥
उमटती ठसे । ब्रम्हप्राप्ति अंगी दिसे ॥२॥
भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यासी ॥३॥
अर्थ
जे देवाला शरण जातात त्यांच्या जाती उत्तम आहेत म्हणजे जे हरी भक्त आहेत ते उत्तम जातीचे आहेत याचा अर्थ असा होतो की हरिभक्त उत्तम जातीचे आहेत मग ते कोणत्याही वर्णात जन्माला आलेले असेल तरी काही हरकत नाही. त्यांच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी कधीही उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असा भेदभाव नसतो. जे हरिभक्त हरीला अनन्यगतीने शरण जातात त्यांच्या अंगी वेगवेगळे तेज उमटलेले असते. आणि त्यावरून त्यांना ब्रम्ह प्राप्ती झाली अशी लक्षणे त्यांच्या अंगी उमटलेले दिसतात. तुकाराम महाराज म्हणतात जे असे भाविक आहेत म्हणजे निष्ठावंत हरिभक्त आहेत त्यांना मी नमन करतो आहे.
अभंग क्र. १२०४
भय हरीजनी । काही न धरावे मनी ॥१॥
नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥धृपद॥
चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥
तुका म्हणे मन । असो द्यावे समाधान ॥३॥
अर्थ
हरी भक्तांनी हरी भजन करण्याविषयी कोणत्याही प्रकारचे मनामध्ये भय धरू नये, कारण नारायणा सारखा बलाढ्य सखा सोबत असताना जगाला भिण्याचे कारण काय येते ? त्याकरिता आपले चित्त वित्त देवाला समर्पण करून रहा. तुकाराम महाराज म्हणतात आणि आपले मन समाधानी सुखी असू द्यावे.
अभंग क्र. १२०५
आयुष्य मोजावया बैसला मापारी । तू का रे वेव्हारी संसाराचा ॥१॥
नेईल ओढोनि ठाउके नसता । न राहे दुश्चिता हरीविण ॥धृपद॥
कठीण हे दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायी ॥२॥
राहतील दुरी सज्जन सोयरी । आठवी श्रीहरी लवलाही ॥३॥
तुका म्हणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढे थोर ॥४॥
अर्थ
तुझे आयुष्य मोजण्यासाठी काळ मापारी म्हणून बसलेला आहे. आणि तू अजूनही संसाराच्या व्यवहारांमध्ये गुंतलेला आहे. अरे तो काळ तुला किंवा ओढून येईल ते तुला कळणार देखील नाही त्यामुळे तु हरिभजन करण्याविषयी उदास राहू नकोस. आणि पुढे तुला यम अनेक दुःखाचा जाच करीन, मग त्या प्रसंगी तुला त्यातून कोण सोडिन बरे ? तुझे सज्जन सोयरे सर्व तुझ्यापासून दूर राहतील त्याकरता श्रीहरीची आठवण लवकर कर त्याचे नामस्मरण कर. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू परमार्थ करण्याविषयी किती चुकारपणा करशील पण पुढे जाऊन तुझी फजिती होईल.
अभंग क्र. १२०६
होऊ नको काही या मना आधीन । नाइके वचन याचे काही ॥१॥
हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची ॥धृपद॥
आपुले आधीन करूनिया ठेवा । नाही तरि जीवा घातक हे ॥२॥
तुका म्हणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥३॥
अर्थ
अरे मानवा तू कोणतेही कर्म चांगलेच कर, वाईट कर्मा विषयी तू मनाच्या आधीन होऊ नकोस. आणि त्याचे कोणत्याही प्रकारचे काहीही बोलणे ऐकू नको. मनाने कोणत्याही वाईट कर्माचा अट्टाहास धरला तर तो मोडून टाक. आणि पांडुरंगाशी तू संबंध जोड, तू तुझ्या मनाला आपला अधीन करून ठेवीन नाहीतर हे तुझ्या जीवासाठी घातक होईल. तुकाराम महाराज म्हणतात जे लोक मनाच्या आधीन झाले आहेत त्यांना यम आपल्या बंधनाने बांधून टाकतो.
अभंग क्र. १२०७
नामाविण काय वाउगी चावट । वाया वटवट हरीविण ॥१॥
फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥धृपद॥
मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणे मातलासे ॥२॥
बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाही गोविंदाची आठवण ॥३॥
बळे यम दात खाय तयावरी । जव भरे दोरी आयुष्याची ॥४॥
तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाही नारायण आठविला ॥५॥
अर्थ
अरे तू हरिनाम घे हरिनामा वाचुन व्यर्थ चावट गोष्टी वटवट करणे हे व्यर्थ आहे. अरे तू फुकट लोकांच्या गप्पा गोष्टी करत बसतो आणि जगात श्रेष्ठ राम आहे त्याचे नांव मात्र तुझ्या तोंडात येत नाही. चावट माणसे मिळून तू मद्यपान करतो आणि विषयांच्या गुणाने तू माजतोस. अरे तू चाव्हाट्या वर बसून दुसऱ्यांच्या टवळ्या करत असतो परंतु गोविंदाची आठवण तुला कधीही होत नाही. अशा अविचारी दुराचारी मनुष्यावर यम दात खात असतो. आणि केंव्हा त्या मनुष्याची आयुष्याची दोरी भरेल आणि केव्हा मी त्याला घेऊन जाईल याची वाट यम पाहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये नारायणाचे चिंतन तू जर केले नाहीस तर तुला यमाच्या हातून कोण सोडवेल ?
अभंग क्र. १२०८
संत गाती हरीकीर्त्तनी । त्यांचे घेइन पायवणी ॥१॥
हेचि तप तीर्थ माझे । आणीक मी नेणे दुजे ॥धृपद॥
काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥
संत महंत माझी पूजा । आन भाव नाही दुजा ॥३॥
तुका म्हणे नेणे काही । अवघे आहे संतापायी ॥४॥
अर्थ
जे संत हरिकीर्तन करतात हरि गुण गातात त्यांचे चरण क्षालन करून ते तीर्थ मी प्राशन करणे. हेच माझे तप आणि हेच माझे तीर्थ आहे. या वाचून मी दुसरे काही जाणणार नाही. मी संत महंत यांना माझ्या शरीराची कुरवंडी करून ओवाळीन. मी संत महंताची पूजा करतो या वाचून माझ्या मनात दुसरा भक्तिभावच नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी संत आणि महंत सोडून दुसरे काही जाणत नाही कारण संतांच्या चरणी सर्वकाही आहे.
अभंग क्र. १२०९
जाले भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥१॥
आता वाणी काशासाठी । धीर धरावा च पोटी ॥धृपद॥
आपुल्या संकोचे । म्हणऊनि तेथे टांचे ॥२॥
घेतो खऱ्या मापे । तुका देखोनिया सोपे ॥३॥
अर्थ
आमचे भांडवल म्हणजे विठ्ठल आहे आणि विठ्ठल नामाचे पीक सर्वत्र पिकले आहे. त्यामुळे विठ्ठलनामाचे भांडवल आमच्याकडे भरपूर झाले आहे. आता विठ्ठल नाम घेण्याविषयी कमतरता का करावी ? अंतकरणात धीर धरला पाहिजे फलप्राप्ती पर्यंत विठ्ठलाचे नाम घेण्यात आपली वृत्ती संकुचित असते त्यामुळे विठ्ठलाचे नाम घेण्यात तोटा आहे असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठल नाम सोपे आहे म्हणूनच ते मी माझ्या खऱ्या प्रेमाच्या मापाने घेत आहे.
अभंग क्र. १२१०
शुद्ध ऐसे ब्रम्हज्ञान । करा मन सादर ॥१॥
रवि रसा सकळा शोषी । गुणदोषी न लिंपे ॥धृपद॥
कोणासवे नाही चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥
सत्य तरी ऐसे आहे । तुका पाहे उपदेशी ॥३॥
अर्थ
शुद्ध ब्रम्हज्ञान कसे असते ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही मन सावध करू ऐका. सूर्य पृथ्वीवरील सर्व चांगल्या व वाईट रसांचे शोषण करतो पण तो त्यांच्या गुणदोषानी लिप्त होत नाही. सूर्य कोणाचाही भेदभाव न करता सर्वासाठी सारखाच असतो. तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध ब्रम्ह ज्ञानाचे सत्य म्हणजे अगदी सूर्याप्रमाणे असते, नाही तर खोट्या ब्रम्हज्ञानाला पाहुन तुम्ही फसला म्हणून मी तुम्हाला उपदेश करत आहे.
अभंग क्र. १२११
अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपे । हिंवे तोचि तापे जाउनिया ॥१॥
उदक म्हणे काय या हो मज प्यावे । तृषित तो धावे सेवावया ॥धृपद॥
काय वस्त्र म्हणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥२॥
तुकयास्वामी म्हणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनिया ॥३॥
अर्थ
अग्नी मुद्दामून कोणाला जवळ बोलावत नाही पण ज्याला थंडी वाजली असेल तोच व्यक्ती अग्नीजवळ जातो. पाणी कधी म्हणते काय या आणि मला प्या तर नाही ज्याला तहान लागली असेल तोच पाणी पिण्यासाठी पाण्याकडे धावत जातो. वस्त्र कधी म्हणते काय कि या आणि मला परिधान करा तर नाही सारे जग उलट स्वतः इच्छेने वस्त्राला परिधान करते. तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्याप्रमाणे माझा स्वामी कोणाला म्हणतो का की माझे स्मरण करा तर नाही ज्याला आपल्या उद्धाराची तळमळ असते तोच माझ्या स्वामी पांडुरंगाचे स्मरण करतो.
अभंग क्र. १२१२
भक्ती देवाघरचा सुना । देव भक्तचा पोसणा ॥१॥
येर येरा जडले कैसे । जीवा अंगे जैसे तैसे ॥धृपद॥
देव भक्तची कृपाळु माता । भक्ती देवाचा जनिता ॥२॥
तुका म्हणे अंगे । एक एकाचिया संगे ॥३॥
अर्थ
भक्त देवाच्या घरचा पाळलेला कुत्रा आहे आणि हाच भक्त देवाचे भजन पूजन करतो आणि त्याद्वारेच देवाचे पालन-पोषण करतो. जीव आणि शरीर यांचा जसा तादात्म्य संबंध असतो अगदी त्याप्रमाणे देव आणि भक्तांचा संबंध असतो. देव भक्ताची कृपाळू माता आहे आणि भक्ताने देवाला (निर्गुण-निराकार देवाला) सगुण-साकार बनविले त्यामुळे भक्त हा देवाचा जनिता म्हणजे जन्मदाता आहे. तुकाराम महाराज म्हणतात देव आणि भक्त हे दोन्ही एकमेकांचे संबंधित झालेले असतात त्यामुळे ते नेहमी एकमेकांसोबत राहतात.
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

