आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१ जून, दिवस १५२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ६२६ ते ६५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १८१३ ते १८२४
“१ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १ jun
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १८१३ ते १८२४ चे पारायण आपण करणार आहोत.
१ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ६२६ ते ६५०,
626-11
दैवे चिंतामणी लेईजे । की हे ओझे म्हणौनि सांडिजे ? । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणौनि ? ॥626॥
सुदैवाने चिंतामणी अंगावर घातला गेला की, त्याचे ओझे होते म्हणून जसा टाकून द्यावा किंवा कामधेनू आपल्याच्याने पोसवत नाही, म्हणून तिला हाकून द्यावे ?
627-11
चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा । पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ॥627॥
चंद्र घरी चालत आला असता, तुझ्यापासून आम्हाला उष्णता होते, म्हणून येथून जा असे म्हणावे किंवा सूर्य घरी आला असता, सावली पाडतोस, म्हणून दूर हो, असे म्हणावे काय ?
628-11
तैसे ऐश्वर्य हे महातेज । आजि हाता आले आहे सहज । की एथ तुज गजबज । होआवी का ? ॥628॥
त्याप्रमाणे अत्यंत तेजात्मक असे हे माझे विश्वरूप ऐश्वर्य आज अनायासे तुझ्या हाती आले असताना, तुझा जीव एवढा व्याकूळ का व्हावा ?
629-11
परि नेणसीच गावढिया । काय कोपो आता धनंजया । आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ॥629॥
हे गावंढळ अर्जुना ! पण तू हे काही जाणत नाहीस. तुझ्यावर काय रागावू ! तू शरीर सोडून शरीराच्या छायेला आलिंगन देऊ पाहतोस ना !
630-11
हे नव्हे जो मी साचे । एथ मन करूनिया काचे । प्रेम धरिसी अवगणियेचे । चतुर्भुज जे ॥630॥
हे विश्वरूप माझे खरे स्वरूप असताना तू खरे समजत नाहीस. येथे विश्वस्वरूपाचे विषयी मनात भीती बाळगतोस आणि माझे कनिष्ठ असे जे चतुर्भुज रूप, त्यावर प्रेम करतोस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
631-11
तरि अझुनिवरी पार्था । सांडी सांडी हे व्यवस्था । इयेविषयी आस्था । करिसी झणे ॥631॥
अरे अर्जुना ! अजून तरी माझ्या चतुर्भुजस्वरूपाची आस्था सोड आणि या विश्वरूपाची उपेक्षा करू नकोस.
632-11
हे रूप जरी घोर । विकृति आणि थोर । तरी कृतनिश्चयाचे घर । हेचि करी ॥632
हे माझे विश्वरूप भयंकर विक्राळ व अमर्याद असले, तरी भगवंताचे खरे स्वरूप हेच होय; असाच त्याविषयी निश्चय कर.
633-11
कृपण चित्तवृत्ति जैसी । रोवोनि घाली ठेवयापासी । मग नुसधेनि देहेसी । आपण असे ॥633॥
घो️ कृपण पुरुष, ज्याप्रमाणे आपले चित्त धनापाशी रोवून ठेवतो व मग नुसत्या देहाने आपण बाहेर असतो.
634-11
का अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळा । पक्षिणी अंतराळा- । माजी जाय ॥634॥
किंवा पंख न फुटलेल्या व घरट्यात रहाणार्या पिलापाशी जीव ठेवून, जशी पक्षिणी बाहेर फिरते,
635-11
नाना गाय चरे डोंगरी । परि चित्त बांधिले वत्से घरी । प्रेम एथ िचे करी । स्थानपती ॥635॥
किंवा गाय डोंगरावर चरत असते, पण तिचे चित्त घरी असलेल्या वत्साकडे लागलेले असते त्याप्रमाणे तू आपले प्रेम या एका विश्वरूपाच्या ठिकाणीच राहू दे.
636-11
येरे वरिचिलेनि चित्ते । बाह्य सख्य सुखापुरते । भोगिजो का श्रीमूर्तींते । चतुर्भुज ॥636॥
बाकी वरवर चित्ताने, बाहेर सख्यभक्तीचे सुख भोगण्याकरिता, या माझ्या चतुर्भुज मूर्तीवर प्रेम कर.
637-11
परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा । जे इये रूपीहूनि सद्भावा । नेदावे निघो ॥637॥
पण अर्जुना ! वारंवार सांगायचे हे की, या माझ्या विश्वरूपावरून आपले प्रेम निघू देऊ नकोस, हे माझे विश्वरूप विसरू नकोस.
638-11
हे कही नव्हतेचि देखिले । म्हणौनि भय जे तुज उपजले । ते सांडी एथ संचले । असो दे प्रेम ॥638॥
हे केव्हा पूर्वी पाहिलेच नव्हते, म्हणून ते पाहिल्याबरोबर तुला भीती उत्पन्न झाली. ते भय सोड आणि येथे प्रेम संचले राहू दे.
639-11
आता करू तुजयासारखे । ऐसे म्हणितले विश्वतोमुखे । तरि मागील रूप सुखे । न्याहाळी पा तू ॥639॥
विश्वरूप भगवंतांनी ‘तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. माझे मागील चतुर्भुजरूप आनंदाने पाहा. ‘ असे म्हटले.
संजय उवाच ।
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा
स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।
आश्वासयामास च भीतमेनं
भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥11. 50॥
अर्थ संजय म्हणाला, असे वचन बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वत:चे (पूर्वीचे) रूप दाखवले. पुन: सौम्यस्वरूपधारी होऊन त्या महात्म्याने भयभीत अर्जुनाला धीर दिला. ॥50॥
श्रीकृष्णरूप पाहून अर्जुन आश्वस्त झाला.
640-11
ऐसे वाक्य बोलतखेवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हे ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥640॥
असे वाक्य तोंडातून निघाल्याबरोबर, भगवान मनुष्यासारखा देहधारी झाला, हे मोठेसे आश्चर्य नव्हे. पण भगवंताला अर्जुनाचे जे प्रेम होते, त्या प्रेमाचेच आश्चर्य वाटते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
641-11
श्रीकृष्णचि कैवल्य उघडे । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढे । हाती दिधले की नावडे । अर्जुनासि ॥641॥
खरोखर पाहता, भगवान श्रीकृष्ण उघडे म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारे, अद्वैत पूर्णब्रह्म होय. त्यातही आणखी भगवंतांनी आपले विश्वरूपासारखे सर्वस्व अर्जुनाच्या हातात दिले; पण अर्जुनाला ते आवडले नाही.
642-11
वस्तु घेऊनि वाळिजे । जैसे रत्नासि दूषण ठेविजे । नातरी कन्या पाहूनिया म्हणिजे । मना न ये हे ॥642॥
ज्याप्रमाणे एखादी वस्तू घेऊन ती टाकून द्यावी किंवा चांगल्या रत्नास दूषण ठेवावे अथवा मुलीला पाहून ‘ही पसंत नाही’ असे म्हणावे.
643-11
तया विश्वरूपायेवढी दशा । करिता प्रीतीचा वाढू कैसा । सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसि देवे ॥643॥
(त्याप्रमाणे) आपल्या श्रीकृष्णस्वरूपाची विश्वरूपा एवढी व्यापकदशा करण्यात अर्जुनाविषयी भगवंताच्या ठिकाणी कशी प्रीतिची वाढ झाली पहा, भगवंतांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा शेवट – म्हणजे सर्वनामरूपासह पूर्ण ब्रह्मच आहे हा अनुभव आणून दिला.
644-11
मोडोनि भांगाराचा रवा । लेणे घडिले आपलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥644॥
सोन्याचा रवा वितळवून आपल्या आवडीप्रमाणे अलंकार केल्यावर, मनाला आवडला नाही, तर तो पुनः आटवून टाकावा.
645-11
तैसे शिष्याचिये प्रीती जाहले । कृष्णत्व होते ते विश्वरूप केले । ते मना नयेचि मग आणिले । कृष्णपण मागुते ॥645॥
येथेहि शिष्याच्या प्रेमाप्रमाणे झाले. पूर्वी असलेल्या कृष्णस्वरूपाला भगवंतांनी विश्वरूप केले, पण ते अर्जुनाच्या मनाला आवडले नाही; म्हणून पुनः पूर्वीचेच श्रीकृष्णरूप धारण केले.
646-11
हा ठाववरी शिष्याची निकसी । सहाते गुरु आहाती कवणे देशी ? । परि नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥646॥
संजय म्हणतो, शिष्याने दिलेला त्रास येथपर्यंत सहन करणारे गुरु कोणत्या स्थळी आहेत ? पण भगवंताला अर्जुनाविषयी कसे विलक्षण प्रेम आहे, हे सांगता येत नाही.
647-11
मग विश्वरूप व्यापुनि भोवते । जे दिव्य तेज प्रगटले होते । तेचि सामावले मागुते । कृष्णरूपी तये ॥647॥
मग संपूर्ण नामरूपात्मक जगताला व्यापून सभोवार जे दिव्य तेज पसरले होते, ते संपूर्ण पुनश्च श्रीकृष्णस्वरूपाचे ठिकाणी साठवले गेले.
(वर सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप व विश्वरूप या दोघांचा येथे बीजवृक्षाप्रमाणे संबंध दाखवून, बीज व वृक्ष दोन्हीही, ज्याप्रमाणे एकरूप व सत्य असतात, त्याप्रमाणे विश्वरूप व श्रीकृष्णरूप ही दोन्हीही एकरूप व सत्य म्हणजे अनध्यस्तविवर्तरूप किंवा मायारहितविवर्तरूप आहेत हेच येथे दाखविले आहे. )
648-11
जैसे त्वंपद हे आघवे । तत्पदी सामावे । अथवा द्रुमाकारु साठवे । बीजकणिके जेवी ॥648॥
ज्याप्रमाणे त्वंपद तत्पदार्थाचे ठिकाणी ऐक्य पावते अथवा संपूर्ण वृक् छोट्याशा बीजात साठविला जातो,
649-11
नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा । श्रीकृष्णे योगु हा तैसा । संहारिला तो ॥649॥
किंवा ज्याप्रमाणे स्वप्नातील कल्पित पसारा, जीवाची जागृतदशा गिळून घेते, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपाचे ठिकाणी आपल्या योग ऐश्वर्याचा उपसंहार केला.
650-11
जैसी प्रभा हारपली बिंबी । की जळदसंपत्ती नभी । नाना भरते सिंधुगर्भी । रिगाले राया ॥650॥
ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज, सूर्यादिक बिंबाचे ठिकाणीच लोप पावते किंवा पाण्याने भरलेले मेघ, आकाशात नाहीसे होतात किंवा संपूर्ण भरती समुद्रातच नाहीशी होती.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १५२ वा, १, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८१३ ते १८२४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १८१३
नव्हे ब्रम्हज्ञान बोलता सिद्ध । जव हा आत्मबोध नाही चित्ती ॥१॥
काय करिसी वाया लटिकाचि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥धृपद॥
मीच देव ऐसे सांगसी या लोका । विषयांच्या सुखा टोंकोनिया ॥२॥
अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी मरोनिया ॥३॥
तुका म्हणे जरि राहील तळमळ । ब्रम्ह ते केवळ सदोदित ॥४॥
अर्थ
केवळ भराभर बोलण्याने ब्रम्हज्ञान होत नाही ; जोपर्यंत वृत्तीत आत्म्याचा ब्रम्हरूपाने निःसंदिग्ध अपरोक्ष साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत ‘ ब्रम्हज्ञान झाले ‘ असे म्हणता येत नाही. अनुभवावाचून खोटे पाल्हाळ काय करावयाचे आहे ? कारण, आपली विद्वत्ता दाखविणे म्हणजे केवळ श्रम आहेत. वैषयिक सुखावर दृष्टी ठेवून ‘ मीच देव आहे ‘ असे खोटेच पुढे बसलेल्या या भोळ्या श्रोत्यांना सांगतोस ; आणि त्यांना फसवितोस. आपण उपवासी राहून दुसर्याला मात्र अमृताची गोडी सांगतोस, हे आश्चर्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुझ्या चित्तातील संसाराची तळमळ थांबली, तर तू सर्वकाळ अखंड ब्रम्हरूप आहेसच. त्यासंबंधी व्यर्थ वाचाळपणा करण्याचे काय कारण आहे ?
अभंग क्र. १८१४
गंगाजळा पाही पाठी पोट नाही । अवगुण तो काही अमृतासी ॥१॥
रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥धृपद॥
कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणी काय चाले ॥२॥
परिस चिंतामणि आणिकाचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥३॥
तुका म्हणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ॥४॥
अर्थ
गंगेच्या पाण्याला पाठ व पोट नाही ते सर्व दृष्टीने सारखेच आहे व पवित्र आहे त्याप्रमाणे अमृताच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अवगुण नाही. रवी, दिपक आणि हिरा या तिघांनाही अंधाराची माहिती नाही या उलट ते सर्व अंधाराचा नाश करतात. कापराचे कितीही कांडन केले तरी त्यातून कधी कोंडा निघतो काय आणि सागरांमध्ये काहीही मिळवले तरीही त्याचा काही उपयोग होतो काय. परीस आणि चिंतामणी याला कशाचाही स्पर्श जरी झाला तरी त्यांच्यामध्ये बदल होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्याप्रमाणेच संत आहेत ते सर्वत्र गगनाप्रमाने व्यापलेले आहेत असे जाणून घ्यावेत.
अभंग क्र. १८१५
परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपागु ॥१॥
काय तयाहूनि जालासी बापुडे । फेडिता साकडे माझे एक ॥धृपद॥
कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिले ते ॥२॥
चंदनांच्या वासे वसता चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥
काय त्याचे उणे जाले त्यासी देता । विचारी अनंता तुका म्हणे ॥४॥
अर्थ
परीस लोखंडाला सोने करीत नाही काय ? निश्चिंतच करतो तो लोखंडाचे लोखंड पण ही नाहीसे करतो. मग देवा तू त्याच्यापेक्षाही हिन झाला आहेस काय ? मी तुला एखादे संकट सांगितले तर तु ते पूर्ण करत नाहीस. कल्पतरू आपल्या मनात जे असेल ती लगेच इच्छा पूर्ण करतो आणि चिंतामणी तर खडा आहे, आपण ज्याचे चिंतन करू ते लगेच तो पुरवतो. चंदनाच्या सहवासातच कोणतेही वृक्ष किंवा कोणतेही काष्ट राहिले तरी ते चंदनाप्रमाणे सुगंधित होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा परीस, चंदन, चिंतामणी, कल्पतरू यांना स्वतःचे गुण दुसऱ्याला देताना त्यांचे स्वतःचे काही नुसकान झाले आहे काय, हे अनंता त्यांना तु विचारून पहा.
अभंग क्र. १८१६
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥
कोण हित तेणे देखिले आपुले । आणीक पाहिले सुख काई ॥धृपद॥
धान्ये बीजे जेणे जाळोनि सकळे । पेरितो काऱ्हाळे जिरे बीज ॥२॥
मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडराने जाय घेउनि लोका ॥३॥
विषाचे अमृत ठेवूनिया नाम । करितो अधम ब्रम्हहत्या ॥४॥
तुका म्हणे त्यास नाइके सांगता । तया हाल करिता पाप नाही ॥५॥
अर्थ
जो मूर्ख सुगंधी पुष्पवाटिका व मधुर फळाचे वृक्ष तोडून बाबळीचे रक्षण करतो, त्याने आपले हित कशात पाहिले आणि आपले सुखही त्याने कशात पाहिले आहे ? जो सर्व प्रकारचे धान्याचे बीजे जाळून कार्हाळे आणि जीरे या बीजांची पेरणी करतो, मागे झालेल्या संतांनी जी परमार्थाची चांगली वाट निर्माण केली ती वाट सोडून देऊन जो लोकांना आड रानाने घेऊन जातो. आणि जो विषाचे नाम ‘अमृत ” आहे असे म्हणतो व ते घेऊन दुसऱ्याला देतो. तो ब्रम्ह हत्या सारखे पातक करतो असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा मूर्ख मनुष्यला कितीही समजावून सांगितले चांगला उपदेश केला तरीही ते ऐकत नाही मग अशाची आपण कितीही फजिती केली कितीही हाल केले तरी त्यापासून पाप लागत नाही.
अभंग क्र. १८१७
संसाराच्या भेणे । पळो न लाहेसे केले ॥१॥
जेथे तेथे आपण आहे । आह्मी करावे ते काये ॥धृपद॥
एकातींसी ठाव । तिही लोकी नाही वाव ॥२॥
गावा जातो ऐसे । न लगे म्हणावे ते कैसे ॥३॥
स्वप्नाचीये परी । जागा राहे तव घरी ॥४॥
तुका म्हणे काये । तुझे घेतले म्या आहे ॥५॥
अर्थ
देवाने, मी संसाराच्या भीतीने कोठे पळून जाऊ नये असे मला परिपूर्ण केले आहे. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे तो हरीच व्यापून उरलेला असतो मग आता त्यामुळे आम्ही काय करावे ? तिन्ही लोकांमध्ये जरी फिरून पाहिले तरीही एकांत आता कोठे ही राहिला नाही. मी गावाला जातो असे देखील म्हणता येत नाही व म्हणावे तरी कसे कारण सर्वत्र हा नारायणच आहे. स्वप्नामध्ये कितीही फिर फिर फिरलो तरी जाग आल्यावर घरीच असतो अगदि त्याप्रमाणे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझे काय घेतले आहे की मला तू तुझ्याच रूपाने नटवले व सर्वत्र मलाच केले आहेस.
अभंग क्र. १८१८
आपण काय सादर । विशी आम्हा का निष्ठुर ॥१॥
केले भक्त तैसे देई । तुझे प्रेम माझ्याठायी ॥धृपद॥
काय पंगतीस कोंडा । एकातासी साकर मांडा ॥२॥
काय एकपण । पोता घालूनि गाठी खूण ॥३॥
काय घ्यावे ऐसे । त्या आपण अनारिसे ॥४॥
तुका म्हणे मधी । आता तोडू भेद बुद्धी ॥५॥
अर्थ
देवा तुम्ही तुमच्या इतर भक्तांच्या उद्धारा बाबतीत किती उत्साही असता परंतु आमच्या बाबतीतच तुम्ही असेही निष्ठुर का आहात ? तु तुझ्या भक्तांच्या हृदयामध्ये जसे तुझे प्रेम दिले आहे त्याच प्रकारचे प्रेम माझ्या हृदयातही तु द्यावे. पंक्तीत बसून कोंडा वाढायचा आणि एकातात बसून साखर मांडा खायचा हे तुमचे वागणे बरोबर आहे काय ? एकीकडे तुमच्या पदरात असलेल्या धनाला तुम्ही गाठ मारायची आणि दुसरीकडे आपण एकच आहोत असे म्हणायचे हे तुमचे वागणे बरोबर आहे काय देवा ? जसे तुम्ही भक्तांकडून प्रेम घेता तसेच तुम्हीही भक्तांना प्रेम दिले पाहिजे देवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता यामागे झाले ते झाले परंतु आता यापुढे आपल्या दोघामधील भेद बुद्धी आपण तोडून टाकू.
अभंग क्र. १८१९
चित्त तुझ्या पायी । ठेवुनि जालो उतराई ॥१॥
परि तू खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥धृपद॥
आम्ही सर्वस्वे उदार । तुज देऊनिया व्यवहार ॥२॥
इंद्रियांची होळी । संवसार दिला बळी ॥३॥
न पडे विसर । तुझा आम्हा निरंतर ॥४॥
प्रेम एकासाठी । तुका म्हणे न वेचे गाठी ॥५॥
अर्थ
देवा मी तुझ्या पायी माझे चित्त ठेवून तुझ्या उपकार उतराई झालो आहे. परंतू हे केशी राजा तू खोटा आहेस कारण मला तुझा अंतकाळ खरच कळतच नाही. आम्ही सर्वस्व उदार झालो आहोत आमचे सर्व व्यवहार आम्ही तुला दिले आहेत. आम्ही आमच्या इंद्रियांची होळी केली आणि तुझ्यासाठी संसारही बळी दिला आहे. देवा तुझा विसर आम्हाला केव्हाही पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही केवळ तुझ्यावरच प्रेम करतो बाकी कुठेही आम्ही पहात देखील नाही.
अभंग क्र. १८२०
आम्ही पतित म्हणोनि तुज आलो शरण । करितो चिंतन दिवस रात्री ।
नाही तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्ती ॥१॥
आम्हा न तारावे तुम्ही काय करावे । सांगीजोजी भावे नारायणा ॥धृपद॥
अन्याय कोणाचा अंगीकार करणे । तया हाती देणे लाज तेचि ।
काय ते शूरत्व मिरवूनि बोलणे । जनामाजी दावणे बळरया ॥२॥
पोह्या अन्नछत्र घालूनिया घरी । दंडितो बाहेरी आलियासी ।
नव्हे कीर्ती काही न मानेचि लोका । काय विटंबणा जैसी तैसी ॥३॥
प्रत्यक्षासी काय द्यावे गा प्रमाण । पाहाता दर्पण साक्ष काई ।
तुका म्हणे तरी आम्हा का न कळे । तरलो किंवा आम्ही नाही ॥४॥
अर्थ
देवा आम्ही पतित आहोत म्हणूनच तुला शरण आलो आहोत त्यामुळे आम्ही तुझे चिंतन रात्रंदिवस करीत आहोत. देवा जर आम्ही पतीत नसतो तर तुझी भिड आम्ही चित्तात का धरली असती ? देवा हे नारायणा तुम्ही जर आमचा उद्धार करणार नाही तर मग तुम्ही आमचे काय करणार ते खरे सांगा. ज्याने आमचा अंगीकार करून दुसऱ्याच्या हाती आम्हाला दिले अशी ज्याची चूक आहे, त्याची ही लाजिरवाणी चूक त्यानेच स्वीकारावी. देवा अहो तुमची दीनानाथ, पतितपावन म्हणून ब्रिदे आहे, केवळ त्याचेच तुम्ही भूषण जगामध्ये मिरवता शुर व्यक्तीने केव्हा ही शुरत्वाच्या गप्पा मारू नये त्याचे भुषण मिरवून उगाच बरळु नये. घराबाहेर पाणपोया अन्नछत्र घालतो आणि बाहेर आलेल्या भुकेल्यांना तहानलेल्यांना परत हाकलूनही लावतो याला काय अर्थ आहे काय ? जर असे त्याने केले तर त्याची कीर्ती जगामध्ये होणार नाहीये लोकांना तो पटायचा नाही आणि त्याने असे करणे म्हणजे ती एक प्रकारची विटंबना नाही काय ? तुकाराम म
अभंग क्र. १८२१
काग बग रिठा मारिले बाळपणी । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥
तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥धृपद॥
गोवर्धन गिरी उचलिला करी । गोकुळ भीतरी राखियेले ॥२॥
वधुनि भौमासुरा आणिल्या गोपागना । राज्य उग्रसेना मथुरेचे ॥३॥
पांडव जोहरी राखिले कुसरी । विवरा भीतरी चालविले ॥४॥
तुका म्हणे हा भक्तंचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥५॥
अर्थ
ज्याने बाळपणीच काग, बग, रिठासुर मारले आणि सर्व दैत्यांची खानच बुडून टाकली. तो नंदाचा नंदन मला दाखवा कारण तो मला फार आवडतो. ज्यावेळी इंद्राने अतिवृष्टी करून गोकुळात संकट निर्माण केले त्यावेळी या श्री कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन गिरी पर्वत उचलून संपूर्ण गोकुळाचे रक्षण केले. ज्याने सोळा सहस्र राजकन्या पळवून नेल्या अशा भैमा सुराला या श्री कृष्णाने मारून टाकले व त्या सोळा सहस्त्र राजकन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला व मथुरेचे राज्य त्याने उग्रसेनाला देऊन टाकले. ज्यावेळी पांडव लाक्षागृहात मध्ये झोपले होते त्यावेळी दुर्योधनाने त्या लाक्षागृहात आग लावली व या श्रीकृष्णाने कौशल्यतेने सर्व पांडवांना भुयारातून बाहेर काढून त्यांचे रक्षण केले. तुकाराम महाराज म्हणतात हा नारायण भक्तांचा कृपाळू आहे आणि दुष्टांचा काळ आहे.
अभंग क्र. १८२२
तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥
तरि हो का शतखंड । पडो झडोनिया रांड ॥धृपद॥
काही इच्छेसाठी । करिल वळवळ करंटी ॥२॥
तुका म्हणे कर । कटी तयाचा विसर ॥३॥
अर्थ
हे देवा हे पांडुरंगा माझी जिव्हा म्हणजेच जीभ तुझ्याशिवाय कोणाला आपली म्हणेल ? तुझ्याशिवाय इतर कोणाचे नांव घेईल ? परंतु तुझ्या शिवाय तिने जर इतर गोष्टी केल्या किंवा काही इच्छेसाठी तिने जर वळवळ केली तर ती करंटी आहे हे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात जो कटेवर कर ठेऊन उभा आहे अशा या श्रीहरीचा जर तिला विसर पडला तर या रांडेचे शत खंड होवोत, अशी ही करंटी जिव्हा झडून जावो हेच माझे तुझ्याकडे मागणे आहे.
अभंग क्र. १८२३
आम्हा सर्वभावे हे चि काम । न विसंभावे तुझे नाम ॥१॥
न लगे करावी हे चिंता । तरणे करणे काय आता ॥धृपद॥
आसनी भोजनी शयनी । दुजे नाही ध्यानी मनी ॥२॥
तुका म्हणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥३॥
अर्थ
आता आम्हाला एकच काम राहिले आहे आणि ते म्हणजे सर्वभावाने तुझे नाम घेणे आणि त्याचा कधीही विसर पडू न देणे. ते म्हणतात आता आम्हाला कसलीही चिंता करावी लागत नाही तसेच या भवसागरातून कसे तरुन जायचे किंवा त्यासाठी काय प्रयत्न करायचे याचा देखील विचार करावा लागत नाही. ते पुढे म्हणतात आम्हाला तर प्रत्येक समयी म्हणजेच आसनी, भजनी आणि शयनी देखील ध्यानी मनी तुझाच विचार असतो, तुझ्याच नामाचा जप चालू असतो, तुझ्या शिवाय इतर कोणताही विषय आमच्या मनाला शिवत देखील नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा, हे नारायणा तुझ्या नामाने किंबहुना तूच या संसारातील सर्व बंधनातून मला मोकळे केले आहेस, मला चिकटलेल्या सर्व उपाध्या तू तोडल्या आहेस.
अभंग क्र. १८२४
नव्हे काही कवणाचा । भाव जाणवला साचा ॥१॥
म्हणोनि तुझ्या पायी । जीव ठेविला निश्चयी ॥धृपद॥
शरीर जायाचे कोंपट । याची काय खटपट ॥२॥
तुका म्हणे वायाविण । देवा कळो आला सीण ॥३॥
अर्थ
या संसारामध्ये माझा कोणाशीही काहीही संबंध नाही हा सत्य भाव मला समजला आहे. म्हणूनच देवा मी तुझ्या पायी निश्चयाने जीव ठेवला आहे. शरीर हे एक प्रकारचे खोपटच आहे ते कधी ना कधी जाणार आहे मग त्याच्यासाठी एवढी खटपट करण्याची काय गरज आहे ? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा या संसारांमध्ये मी जे काही खटपट करत आहे ती व्यर्थ आहे हे मला चांगले कळून आले आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.















