आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

महर्षी अगस्त्यऋषी संपूर्ण चरित्र भाग ८, (३६ ते ४०)
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
Maharishi Agastya Rishi! !
महर्षी अगस्त्य ऋषी ! !
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग -३६.
आणि कांही क्षणांतच लोपमुद्रा निद्राधिनसुध्दा झाली.सारं अवचितच घडले होते.कारण समजत नव्हते.ते सिध्द ऋषी भूमीवर तृणासन घालून ध्यानस्थ बसले,पण आज त्यांचे ध्यान लागेना.अनंत विचारांचा कल्लोळ मनांत उठला होता.मन शांत झाल्याशिवाय ध्यान लागणार नाही हे जाणून मग त्यांनी ही शय्या जवळ केली.विचारांच्या गर्तेत कधीतरी त्यांचा डोळा लागला.पहाटे जाग आली तेव्हा मन शांत,प्रसन्न झाले होते.तृणासनावर बसून ध्यानमग्न झाले. लाडकं दैवत भगवान महादेवांना आवाहन केलं.थोड्याच वेळात अंतर्दृष्टी समोर भगवान साकारले.विचारांनीच विचारांची देवाणघेवाण झाली.महादेव म्हणाले,लोपमुद्रेची मागणी योग्य आहे.ती तूं पूर्ण करायलाच हवीस!अन्य कांही जाणण्याचा सध्या तरी प्रयत्न करुं नकोस.तीच्या इच्छापूर्तीकरितां त्वरीत कार्यरत हो!
भगवान महादेवांनी लोपमूद्रेच्या बाजूने कल दिला,म्हणजे यात नक्कीच कांही तरी सद्हेतू असेल.इश्वराला नक्की काय साधायचय?अचानक मला व्रता पासून परावृत्त करण्यांत काय हेतू?वास्तविक ते भविष्यवेत्ता होते ते सहज जाणू शकले असते,पण कालकुपीत दडलेलं भविष्य त्यांनी जाणून घेतलेनाही
त्यारात्री लोपमुद्रेने राजमातेला शोभेल असे धन एखाद्या राजाकडून आणण्याची अट घातली,महादेवांनीही तसा संकेत दिला.त्यानुसार अगस्त्यऋषी प्रथम श्रृतर्वा राज्याकडे गेले.त्यांच यथोचित स्वागत झाल्यावर,अगस्त्यांनी आपल्या येण्याचे प्रयोजन राजाला सांगीतल्यावर,राजाने पूर्ण राज्याचा आय व्यय आणि इतर व्यवहार अगस्त्यांपुढे ठेवून राजा म्हणाला,यातून जी शिल्लक उरेल ती आपली…राज्यकारभारात होणारा आय- व्यय सम असल्याचं आढळल्याने,श्रृतर्वा राजाकडून द्रव्य घेणे उचित न वाटल्याने,श्रृतर्वा राजास सोबत घेऊन ते व्रध्ताश्व राजाकडे गेले, तिथेही हीच परिस्थिती..मग या दोन राजां समवेत पुरुकुत्स,महाधनाध्दा आणि त्रसदास्य राजांकडे गेले असतां सारखीच परिस्थिती..शेवटी दुसर्या कुणाकडे जाण्यापेक्षा हे पांचही राजे, त्यांचे मंत्री व निवडक सेना सोबत घेऊन दैत्यराजा इल्वालच्या मणिमती नगरीजवळ येऊन पोहचले.
मणिमती नगरीकडे निघण्यापूर्वी अगस्त्यांनी अंतर्ज्ञानाने सारं कांही जाणल होतं.लोपमुद्राच्या विचित्र अटीचं रहस्यही त्यांना कळलं होतं.अगस्तऋषी येत असल्याचे कळल्यावर,दैत्यराजा इल्वालने आपले प्रधान,कांही मंत्री त्यांना ओवाळण्यासाठी नटून थटून कांही स्रीया मणिमती नगरीच्या प्रवेशदाराजवळ आरतीचे तबक घेऊन स्वागतासाठी उभे होते.हे बघून अगस्त्यांच्या शेजारीच रथात बसलेल्या व्रध्नाश्व राजा म्हणाला, महर्षी!इल्वालनं स्वागताची तयारी तर जय्यत केलेली दिसतेय!
होय,पण हा राजा दैत्य,कालकेय वंशातला,समुद्रमार्गे येऊन इथे स्थिरावला बाह्य देखावा मनुष्याला भुलवतो.सावध रहायला हवय!
नगरीजवळ आल्यावर सारे रथा तून उतरून पायउतार झाले.सर्वांचे यथासांग पाद्यपुजन झाले.सारेजण राज प्रसादाकडे निघाले.राजप्रासादाकडे जातांना पांचही राजे चकित होऊन सभोवतालचे विविध दृष्य नेत्रात साठवत होते.अगस्त्यांना कांही गम्य नव्हते.सूर्य देशात असतांना यापेक्षा अनेक पटीने सुंदर देवराज्य उपभोगले होते.तिथेच लहानाचे मोठे झाले होते.आर्यवर्तात काशी,मिथिला,अयोध्यासारख्या अति सुंदर नगरीतील स्वयंशासीत राज्य व्यवस्था अनुभवली होती.त्यापुढे हे मणिमतीचे काय महत्व वाटणार?इल्वाल कडे धनाची मागणी कशी करायची या विचारांत ते गढून गेले.
राजप्रसादाच्या भव्य दाराशी पोहोचताच स्वतः इल्वाल राजानं त्या सर्वांच यथोचित स्वागत करुन सर्वांना अंतःपुरात घेऊन गेला.इल्वाल जेव्हा अगस्त्यांच्या समोरा आला त्यावेळीच त्यांना अंतर्ज्ञानाने त्यांचं खरं रुप लक्षात आलं,त्याचं काळकुट्ट अंतःकरण उमजलं
शेवटी इल्वाल हा दानव होता.देव आणि क्षत्रियांचा रावणाप्रमाणेच कट्टर विरोधक आर्य राजांना लढाईत हरवणे शक्य नसल्यामुळे, राजाचा किंवा क्षत्रियांचा काटा काढण्याची कुटील नीती तो अनेक वर्षापासून अवलंबत होता.वरपांगी गोड बोलून राजांना किंवा क्षत्रियांना भोजना करितां निमंत्रित करुन,त्यांच्या भोजनात एकप्रकारची औषध मिसळत असे. यथावकाश पोटात वातवृध्दी होऊन शेवटी अंत होत असे.याप्रमाणे त्याने कित्येकांचा बळी घेतला होता.आज तर त्याला प्रतिशोध घेण्याची मोठी पर्वणीच प्राप्त झाली.पांच राजे त्यांच्या लवाजमा सह व नावाजलेला ऋषी त्याच्या प्रासादात होते.त्याचा असूरी आनंद मनात मावेनासा झाला.
अंतःपुरात पंगती बसल्या.सुवर्ण थालीत विविध पदार्थ वाढल्या गेले. जेवायला सुरुवात करणार तोच,अगस्तीं नी त्या राजांना थांबवत कानांत कुजबजत म्हणाले,तुमच्या ताटात जे वृषभाचे मांस आहे ते सर्वांनी माझ्या ताटात टाका.संभ्रमित राजांनी त्यांच्या सुचनेप्रमाणे केले.इल्वाल संशयाने पाहत आपला डाव फसतो की काय या विचारात पडला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ३०-११-२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ३७.
अगस्त्यऋषींच्या सांगण्यानुसार पांचही राजांनी आपापल्या ताटातील वृषभ मांस त्यांच्या ताटात ठेवून जेवण्या स सुरुवात केली.मी आयुष्यात कधीही मांसाहार केलेला नाही पण आज हे मांस खाणार,असं म्हणून त्यांनी ते सर्व मांस फस्त केलं.इल्वाल आश्चर्याने बघत होता. थोडं जरी मांस पोटात गेलं की,लगेच परिणाम दिसतो,पण अगस्त्यांनी एवढं सारं मांस भक्षण करुनही त्यांचेवर कांही ही परिणाम झाला नाही हे बघून,बल्लवा चार्य औषध घालायला विसरला की काय हे विचारायला तो तावातावाने मुदपाक गृहाकडे जायला निघाला असतां,त्याला थांबवत,खूप प्रदीर्घ नाद करत अपानवायू सोडत त्याला म्हणाले,अरे इल्वाला! मी एक सिध्द ऋषी!तु घातलेलं विष माझेवर काय परिणाम करणार?ऋषींचे बोलणे ऐकून आपल्याला विषप्रयोगाने मारण्या चा कट बघून संतापाने पांचही राजांनी शस्र उपसले.त्याचवेळी सेवकांच्या वेशातील देव सैनिकांनीही शस्रे काढली.इल्वालच्या शरिररक्षकांनी सुध्दा शस्रे उपसले. एकच कल्लोळ झालेला पाहून,संतापाने इल्वाल म्हणाला,माझ्या राज्यात येऊन माझेवरच शस्र उपसतां?
श्रृतर्वाराजा म्हणाला,आजपर्यत तू अनेक क्षत्रिय राजांना फसवून घात केलास,त्याचीच शिक्षा द्यायला आलो आहोत.इल्वालने अगस्त्यांना विचारले, ऋषीवर,आपण इथे काय अपेक्षेने आलात?ते म्हणाले!मी वास्तविक व्यक्तीगत कामासाठी,अन्य कोणताही हेतू मनी न बाळगता आलो होतो.आम्हा आर्यांची नीती,अतिथी देवो भव। अशी आहे.अतिथीच्या भोजनांत विष कालवण्याची नाही.तुझा कुटील हेतू मी अंतर्ज्ञानाने जाणला आणि कधी नव्हे ते आज ,या राजांचे प्राण वाचवण्यासाठी ते विषयुक्त मांस भक्षण केले.उत्पन्न होणारे वातपित्त पोटातच जाळून टाकले.हे राजे माझ्याकरितां इथे आलेत,त्यांना संपवण्याचा तुझा डाव होता.त्याची भरपाई म्हणून तूं प्रत्येकाला एक सहस्र गायी आणि सुवर्ण, व मला वीस सहस्र गायी आणि तितकेच सुवर्ण,आणि एक
सुवर्ण रथ,दोन वेगवान अश्व दे…इल्वाल म्हणाला,ऋषीवर!एवढे अवास्तव द्रव्य देणे शक्य नाही…तेवढ्यात प्रतिहारी धावत येऊन,महाराज घात झाला.संपूर्ण मणिमती नगरी देवसेना व आर्यसेनेने घेरली असून आपल्या सैन्यांनी शस्रे खाली ठेवले.रडवल्या स्वरात इल्वाल ऋषींना म्हणाला,आपण माझा घात केला.व्रध्नाश्व उसळून म्हणाले,षंडयंत्र रचून आम्हाला संपवण्याचा डाव तूं टाकलास.अनेक ब्राम्हण,क्षत्रियांना धोक्याने मारलेस,देवांविरुध्द कट केलेस, आर्यांशी विनाकारण शत्रूत्व केलेस …
विनाकारण? इल्वाल संतापून म्हणाला,आमचा कालकेय वंश देवांनी नष्ट केला आम्हाला देशोधडीला लावले…
त्याचक्षणी इंद्रांनी देवांसह प्रवेश केला व इल्वालचे बोलणे कानावर पडल्याने इंद्र त्वेषाने म्हणाले,आम्ही सूर्यदेशात शांततेत राहून आमच्या कार्यात मग्न होतो,पण तुझे पुर्वज वृत्रासुराला पाहवलं नाही आणि आमच्याशी उघड उघड वैर धरले.आमचा उत्कर्ष तुम्हा असुरांना पाहवला नाही.सतत आर्यवर्ताला उपद्रव देत राहिला.त्याच कर्माचे हे फळ आहे. सर्व देवसेना व आर्यराजांनी तुझी मणिमती नगरी वेढली आहे.हे राज्य आतां आमचं झाल.आपला असा भिषण अंत बघून कळवळून अगस्त्यऋषींचे पाय धरत जीवदानाची भिक मागू लागला.
अगस्त्यांनी विशिष्ट अभिप्रायाने इंद्रांकडे बघितले.परस्परांचे संकेत एकमेकांना समजले.मग त्याला उठवत ऋषी म्हणाले,तुला जीवदान मिळेल पण हे राज्य तुझं राहिलेलं नाही.आणि इंद्रांच्या सशस्र सैनिकांनी इल्वालला बंदी बनवून घेऊन गेल्यावर,अगस्ती म्हणाले, देवराज!फार मोठं षडयंत्र रचलं आपण. होय, इल्वाल नमवण्याकरितां, लोपमुद्रेला प्रेरणा देऊन,हेतूपुरस्पर आपल्याला इथे येण्याची व्यवस्था करावी लागली.शांतपणे अगस्त म्हणाले,लोपमुद्रे ची ती विचित्र अट ऐकली,तेव्हाच संशय आला होता,पण महादेवांनी कौल दिल्यामुळे….
ऋषीवर!दक्षिण आतां मुक्त झाली. आतां दक्षिण सागर तेवढा राहीला.या नगरीत आपण वास्तव्य करुन ही नगरी सुस्थितित आणावी… हसून अगस्त्य म्हणाले,देवराज! मी पडलो एक ऋषी, राज्य चालवणे माझं काम नाही.हे दायित्व माझ्या सोबत आलेल्या राजांवर सोपवू या!पण या नगरीजवळच आश्रम उभारुन राहावं ही इंद्रांची विनंती त्यांनी मान्य केली.
सर्व व्यवस्था लावण्याकरितां इंद्र आणि कांही देव मणिमतीत थांबणार होते.अगस्त्य मात्र लोपमुद्रेला दिलेल्या वचनानुसार आवश्यक तेवढं धन घेऊन, इंद्रदेव,देव आणि सहकारी राजांचा निरोप घेऊन,इल्वालच्या वेगवान अश्व जोडलेल्या सुवर्णरथातून आपल्या शिष्यांसह त्वरीत आपल्या आश्रमाकडे निघाले.लोपमुद्रा त्यांच्या प्रतिक्षेत होतीच
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-१२-२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ३८.
आतां तरी संतुष्ट झालीस ना?ती कांहीशी लज्जित स्वरात म्हणाली,देवा! यात इंद्रदेवाचा हात होता हे आपण जाणले असणारच!माझा कांही प्रमाद…
प्रमाद कसला मुद्रे?तुला प्रेरणा देणारा देवराजच होते हे मला पूर्वीच कळलं होत त्यांनी अशाच प्रकारे,इक्ष्वाकू कुळातील कैकयीला प्रेरणा देऊन,वृध्द दशरथाच्या मायापाशातून रामाला बाहेर काढले.पण तरीही मी आपली क्षमा…त्यांचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतच,ते इंद्राबद्दल विचार करीत होते.स्वतः अगस्त्य पूर्वाश्रमीचे “देव” होते,त्यावेळी त्यांचा नित्य संपर्क इंद्राशी असल्यामुळे,इंद्रपदा ची महती जाणून होते.शून्यात बघत म्हणाले,त्यावेळी इंद्राचे व माझे संबंध बिघडलेले होते तरी पण इंद्र हा श्रेष्ठच असतो हे मान्य होते.मुद्रे!इंद्रपद सहजतः कुणालाही मिळत नाही.त्यासाठी १०० अश्वमेध यज्ञ,प्रचंड तप करावं लागतं.’तप म्हणजे ईश्वरीय कार्यासाठी झिजणं, संस्कृतीहीन लोकांपर्यंत यज्ञादी ईश्वरीय विचार पोहचवण्यासाठी तन,मन,धन कारणी लावावं लागतं.अशा सर्व गुण संपन्नव्यक्तीलाच इंद्रपद दिल्या जाते.देव राज्यातील तो एक अलिखित नियम आहे.सहेतूक किंवा निर्हेतूक भावनेने जर एखादा ऋषी ब्रम्हचर्याचं पालन करुन अखंड तप करत असेल तर अश्या व्यक्ती चा विचार इंद्रपदासाठी केल्या जाऊ शकतो.
मग देवराज्यातील चार ब्रम्ह अर्थात ब्रम्हदेव अशा तपस्व्यांची परीक्षा घेण्या साठी त्यांच्याकडे अप्सरा पाठवतात,मोह जालात अडकून तो ब्रम्हचर्य व्रतापासून ढळतो,त्याचा तपोभंग होतो.विश्वामित्रांचं असच झाल…
देवा!पुरे झालं इंद्रपुराण.आतां आपण कशाची प्रतिक्षा करताय?तीला जवळ घेत म्हणाले,प्रतिक्षा संपली.त्या साठीच तर तुला ताबडतोब या मणिमती आश्रमात घेऊन आलोय.इल्वालाचा पराभव केल्यानंतर अगस्त्यांनी आवश्यक तेवढं धन घेऊन,आपल्या जन स्थानातील आश्रमात जाऊन तिथली सर्वी व्यवस्था लावली.इंद्राच्या इच्छेनुसार मणिमती व वातापी या दोन्ही नगरी जवळ अगस्त्यांनी एक मोठा आश्रम स्थापन केला.आश्रमाची रुपरेषा,वास्तूंची संरचना,विविध अनुष्ठानासाठी भूमी, कुटीरांची निर्मिती,शेतीचे नियोजन, गोशाळेची व्यवस्था इत्यादी अनेक उपक्रमात ते स्वतः जातीने लक्ष घालत. तितकीच कार्यरत लोपमुद्राही त्यांच्या समवेत असायची.तिथल्या दानवी वृत्तीनं नासलेल्या सामाजिक परिस्थितीला वळणावर आणून परिवर्तन घडवायचे होते,वेदविचार रुजवायचे होते.त्यादिवशी कामे लवकर आटोपल्यामुळे रात्रीचा एकांत वेळ त्यांना जास्त मिळाला.मुद्रे प्रतिक्षेचा काळ आतां संपला.दोन तपःपुत जीव परस्परांच्या मिठीत घट्ट अडकले.त्या दोघांच्याही अंतरंगातलं तेज जोम,वेग कुटीतील अंधकारातच अधिक प्रगटणार होते….
पेदियाल पर्वत,तामीळ प्रांतातील आपल्या आश्रमातील मोठ्या कक्षात अगस्त्य आपल्या शिष्यांसह कार्यमग्न असतांनाच त्यांचा नऊ वर्षाचा इध्मावाह पुत्राने प्रवेश करुन,मातेने भोजणास बोलावल्याचा निरोप सांगीतला.या नऊ वर्षात बर्याच घडामोडी घडल्या होत्या. इध्मवाहच्या जन्मानंतर वर्षभरातच दक्षिण भारतात मोठा दुष्काळ पडला होता.अथक प्रयासाने अगस्त्यांनी रुजवलेली शेती निष्पभ होऊ लागली. शेतकरी व त्यांची मुलं अन्नपाण्यावाचून तडफडत होती.त्यावर त्यांनी पुष्कळ विचारमंथन केले पण मार्ग सांपडेना. आणि एके दिवशी ध्यानस्थ असतांना त्यांना ब्रम्हगिरीला जाण्याचा संदेश मिळाला.तिथे गेल्यावर, ब्रम्हगिरी ते तामीळ प्रांतापर्यंत उताराची जागा पाहून खोदाईचं नियोजनबध्द काम सुरु केले. भारतवर्षातून असंख्य स्थापत्यविशारद, वास्तुविशारद,भूस्तरशास्रज्ञ या देवकार्या त निरपेक्ष भावनेने सहभागी झाले.
ब्रम्हगिरीवर उगम पावलेला जलस्तोस्र वातापि,मणिमती नगरांमधून तामीळप्रांतापर्यंत आणण्यात आला. गंगोत्री प्रमाणेच ब्रम्हगिरीवरच उगमस्थान कावेराऋषी म्हणून नावारुपाला आलं. आणि तामीळ प्रांतापर्यंत येणारी नदी कावेराऋषीची कन्या,कावेरी नांवाने ओळखल्या जाऊ लागली.ही कावेरी नदी दुष्काळ भागाला वरदान ठरली.पुन्हा सगळीकडे सुखसमृध्दी नांदू लागली. अगस्त्यऋषींचं तपःकार्य फलद्रुप झालं.
पण अनार्य दानवांना हे सुपरिवर्तन पाहवलं नाही.एक शूरपक्ष नावाचा दानव देवकार्याला नेहमीच उपद्रव देत असे. इंद्रांशी नेहमीच स्पर्धा करीत असे.त्याचा उपद्रव जास्तच वाढल्यामुळे,देवांना पुन्हा अगस्तीऋषींचं सहाय्य घ्यावं लागलं. दक्षिणेत शूरपक्षाशी त्यांच घनघोर युध्द झालं.अस्रसिध्द,मंत्रसिध्द त्या महान ऋषीसमोर शूरपक्षाचा कितीसा टिकाव लागणार?अखेर शरण आला,इतकेच नव्हे तर अगस्त्यांच्या तपःकार्यातही सहभागी झाला.जवळजवळ संपूर्ण दक्षिण अगस्त्यांनी दानवमुक्त केला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-१२-२०२१.
!!! अगस्तऋषी !!!
भाग – ३९.
अगस्तऋषींनी कावेरी प्रमाणेच ताम्रवर्णी आणि सुवर्णमुखी अशा दोन नद्यांचे उगम शोधून शेतकर्यांच्या पाण्या ची सोय केली.दक्षिणेकडे सरकत त्या महान तपस्व्याने मलयगिरी आणि वेदरण्यात शिरकाव करुन प्रचंड तपःकार्य केले.प्राचिन काळापासून तिथे नांदत असलेल्या तामीळ लोकांशी प्रेमाचे संबंध जोडले.ऋषीय संस्कृतीचा प्रसार करतांना त्यांना भाषेची अडचण जाणवल्याने वृध्द अगस्त्यांनी तामीळ भाषा अवगत व अभ्यास करुन त्या पुरातन भाषेचं व्याकरणही सिध्द केलं.सध्या ते पेदियल पर्वत तामीळ प्रातांत वाखेस्तव्यास होते.तिथेच त्यांनी स्थापलेल्या आश्रमात नाडीग्रंथाचे कष्टमय कार्य सुरु केले होते.
तेवढ्यात मुरुगन नावाच्या त्यांचा पट्ट शिष्याने येऊन सांगीतले,आचार्य! लंकेहून कांही दूत आलेत.पुलस्त्य पौत्र रावण आपली भेट घेऊ इच्छितात.ठीक आहे.त्यांची अभ्यागत कक्षात राहण्याची व भोजनाची व्यवस्था कर!शिष्यांच्या मुद्रा चिंताग्रस्त झाल्या.आचार्य,आपण शस्रसज्ज होऊन सावध रहायला हवय! घाबरायचे कारण नाही.तो मला गुरुपद देऊ इच्छितो.
त्याचवेळी पेदियल पर्वत चढून शंख,गौरांग आपल्या दोन सहकार्यांसह अगस्त्यऋषींच्या अतिशय देखण्या ऋषी सदनासमोर येऊन अश्वावरुन पायउतार होऊन अंगणात उभ्या असलेल्या आपल्या गुरुदेवांना दंडवत घातला.रात्री भोजनानंतर शंख आणि गौरांग अगस्त्यां च्या कुटीत बसले.अगस्त्यांसह लोपमुद्रा ही येऊन बसली.लोपमुद्रेने विचारले, शंखा,जनस्थानात आश्रमांची काय स्थिती आहे? सुभद्रादेवी कश्या आहेत? गुरुमाते,आचार्यानी ठरवून दिल्याप्रमाणे सर्व व्यवस्था होत आहे.सुभद्रादेवी मात्र खुप थकल्यात.अलिकडे त्या कुटीबाहेरही फारशा पडत नाहीत.
लोपमुद्रेचीही चाळीसी उलटली होती.गेल्या अनेक वर्षापासून ती आपल्या पतीच्या बरोबरीने तपःकार्यात सहभागी असल्यामुळे कार्यातील सर्व बारकावे माहित झाले होते.भिन्न विचारी लोकांना एकत्रीत,एका सुत्रात बांधून भारतवर्षातल्या सर्व अगस्त्याश्रमाचं व्यवस्थापन तीच्या मार्गदर्शन व नियोजनाखाली होत होते.कित्येकदा ती स्वतः त्या आश्रमातून परिभ्रमण करीत असे.अगस्त्य म्हणाले,पत्नीरुपातील स्री पतीच्या कार्याच्या पाठीशी असली की, कार्याला गती येते.कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्याला स्रीशिवाय पुर्णत्व येऊच शकत नाही.
अगस्त्यऋषींनी भारतभर असंख्य ठीकाणी असंख्य आश्रमाची स्थापना केली होती.त्या प्रत्येक आश्रमीयांनी आसपासच्या प्रदेश परिसरात वैदिक विचार पेरले होते.आश्रमाशी संलग्नीत अगनित उपासना केंद्रेही गावोगावी,वनप्रदेशात स्थापली होती.लहान आश्रमातून एक सहस्र,तर काशीसारख्या मोठ्या आश्रमातून ३०-४० सहस्र विद्यार्थी वैदिक शिक्षण घेत होते,सोबतच व्यवसायिक शिक्षणही मिळत होते. कित्येक विद्यार्थ्यांनी नगरांमधूनही पाठशाळा सुरु केल्या होत्या.अरण्य वासीयांनी ऋषीकर्म आचरणांत आणून शेती करणे सुरु केले होते. संपूर्ण विंध्याचल,मध्य भारतवर्षात भरपूर शेती उत्पन्न होऊ लागले.आर्य वर्तातील मोठमोठ्या नगरांतून कृषी मालाला मागणी येत असल्यामुळे एके काळच्या नरभक्षकांचे वंशज आतां कृषीप्रधान व समृध्द झाले होते.
अगस्त्याश्रमातून शिकून बाहेर पडलेले लक्षावधी विद्यार्थी संपूर्ण भारत वर्षात ऋषीय संस्कृतीचा प्रसार करत अविरत भ्रमण करुन,एक आचार,एक विचार,सुखी,समृध्द समाज अस्तित्वात आणत होते.हे सर्व व्यवस्थापन अगस्त्य आणि लोपमुद्रेने ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे होत होते.विद्यार्थ्यांकडून मिळत असलेल्या गुरुदक्षिणा व देवांचे सहाय्याने सर्व आश्रमांचा आय- व्यय चालत होता.अनेक गोशाळा स्थापित करुन,गायींचे दूध विनामुल्य वितरित होत असे.आणि आतां तर पुरातन तामीळ संस्कृतीशी संबंध जुळवुन मृतप्राय होत असलेली तामीळभाषा व्याकरणबध्द करणे सुरु होते.आपली भाषा टिकली तरच संस्कृती टिकून राहते त्या दृष्ट्या ऋषीने जाणले होते.
शंखाने सर्व अगस्त्याश्रमांचा आढावा थोडक्यात सांगून म्हणाला, आणि आता आपण नाडीग्रंथासारखं महान कार्य करत आहात… त्याला थांबवत अगस्त्य म्हणाले,एवढ्या वरच आपल्याला थांबतां येणार नाही. या विश्वातील प्रत्येक संस्कृतीहीना पर्यंत हे कार्य न्यायचे आहे,त्यासाठी एक वैशिक कार्यक्रम यज्ञीय कर्म करणार्या तपस्वीं करितां आखत आहे.योग्यवेळी सर्वांना सूचना मिळतीलच.वृध्दत्वातही युवकांना लाजवील अशी त्यांची कार्यतत्परता पाहुन त्यांचे दोन्ही शिष्य मनोमन नतमस्तक झाले.
नाडीग्रंथ सिध्द करणार्या या दृष्ट्या ऋषीला फार पुढच्या युगात जे प्रदेश,कंबोडिया,मलेशिया,नेपाळ,जावा, इंडोनेशिया नांवाने प्रसिध्द पावणार असणार्या या प्रदेशात त्यांच्या कार्याचा प्रसार होणार असल्याचे त्यांना दिसत होते.
बरं तूं नुकताच या मलयगिरी आश्रमात येऊन गेलास,मग एवढ्या तातडीने येण्याचे प्रयोजन काय?आचार्य, आपण सर्व जाणता!तरीही तुझ्या मुखातून ऐकायचेय!
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २-१२-२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ४०.
शंख सांगू लागला,आचार्य! रावण भगिनी शुर्पणखा आपल्या दोन मुलींसह सध्या दंडकारण्यात तळ ठोकून असल्या मुळे मारीचाला बळ मिळाले.शिवाय खर दूषण हे तीचे दोन सहकारी असल्यामुळे इतर राक्षसही प्रबळ झाले.त्यामुळे यज्ञांचा मोठ्या प्रमाणावर विध्वंश सुरु झाला.ऋषींचे बळीसत्र पुन्हा गती घेऊ लागले.गौरांग म्हणाला,आपल्या जनस्था नातल्या आश्रमांना जरी धोका नसला तरी,ऋषींनी कष्टाने उभारलेल्या कार्याला मात्र धोका होऊ शकतो.
रावण उद्या मला भेटणार आहे, तेव्हा याविषयी बोलेन त्याच्याशी पण उपयोग होणार नाही.देवांशी त्याचे हाडवैर आहे.देव आणि वैदिक आर्य संस्कृतीचा तो कट्टर विरोधक आहे.इंद्रावर विजय मिळवल्यामुळे व महादेवांच्या वरांमुळे तो उन्मत्त बनला आहे.दैवी संस्कृती उखडून त्याला भोगवादी आसुरी संस्कृती या भारतवर्षात रुजवायची आहे त्याने उत्कल प्रांतापर्यत मजल मारली आहे.किष्कींधेत वालीशी तह करुन त्याला आपलसं केल आहे.दंडणारण्यांत पाय रोवून आर्यवर्तातील यज्ञीय कार्याला उखडण्याखेरीज त्याला जम बसवतां येणार नाही म्हणून राक्षसांना बलवान करुन तिथे त्याला असुरी संस्कृती रुजवायची आहे.केवळ युध्दानेच नव्हे तर राजकिय डावपेच खेळून संपूर्ण भारतवर्ष गिळंकृत करायचय!त्या अनुषंगानेच तो माझ्या भेटीस आलेला आहे.
चिंता करु नका बाळांनो!ऋषीय कार्य उखडणं येवढं सोपं नाही.दोन्ही शिष्य आचार्यांना व लोपमुद्रेला प्रणाम करुन बाहेर पडले.आतां त्यांना रावण भेटीची उत्सुकता होती.
आश्रमातल्या मंत्रणाकक्षातील उच्चासनावर बसलेल्या अगस्त्यासमोर दाणदाण पावलं टाकीत रावण आपल्या राक्षसगणांसह येऊन त्यांचे चरणस्पर्श करुन,बरोबर आणलेल्या सुवर्ण थालीत अनेक प्रकारचे रत्न,वैदूर्य मण्यांच्या माला,रत्नजडीत सुवर्ण बाहुभुषणं,कर्ण भुषणं,विविधप्रकारच्या मौतिकमाला, हिर्यांचे अंगुलीत्राणांचा उपहार त्यांच्या समोर ठेवले.ते सर्व बघून,ऋषी म्हणाले, मला या सार्यांचा काय उपयोग?देव राज्यात असतांना असं वैभव माझ्या पायाशी होत,आणि आजही गरज भासली तर देव भागवतात.विश्र्वायसुता, मी कुणाकडूनही विणाकारणअसं दान घेत नाही.आणि जेव्हा गरज भासली
तेव्ही मी ते स्वकर्तृत्वार मिळवले आहे.
होय गुरुदेव!आपला पराक्रम,कार्य, महान आहे.आपण स्वयंसिध्द आहात,हे ऐकून,शिवाय आपल्या दोघांचे महादेव हे एकच दैवत असल्यामुळे आपल्या भेटीस आलो आहे.आपल्याला मी गुरु मानतो.
माझे शिष्यत्व पत्करायचे असेल तर हे धन परत घे.ठीक आहे गुरुवर्य!असे म्हणून त्यांच्या समोर दर्भासनावर बसला
त्याचे विशिष्ट दृष्टीने अवलोकन करीत असतां,भूत भविष्य जाणणार्या या सिध्याच्या दृष्टीसमोर भावी प्रसंग तरळले.सीताहरण,लंकादहण,रामरावण युध्द आणि रावणाचा अंत दिसला. आणखी चार वर्षाने त्याचा अंत आहे हे ही त्यांना उमजले.गुरुवर्य मला आपले मार्गदर्शन हवय!तूं स्वतःच एवढा ज्ञानवंत प्रकांड पंडित असतांना मी तुला काय मार्गदर्शन करणार?तरीही सांगतो,देवांशी वैरत्व सोड,ऋषींना अभय दे,आणि दंडकारण्यात बहिण शुर्पनखाला कशाला पाठवले?रावण हात जोडून म्हणाला,ज्या वेळी देवांसमोर अजिंक्य झालो,वैर तेव्हाच संपले.देवांनीच माझ्या पूर्वजांना पाताळात ढकलून दिले होते,त्याचा मी प्रतिशोध घेतला इतकेच.आतातरी तू सामंज्यासने वागावेस.रावणाने त्यांना आपल्या वैभवशाली लंकेत येण्याची लालूच दाखवली,पण त्यांनी स्पष्ट नकार दिला.भेट तिथेच संपली,रावण निघून गेला.
रात्री लोपमुद्रेला सारा वृतांत कथन केल्यावर तीने विचारले,पण आला कश्या साठी.माझा पुर्वेतिहास उकरुन मी देवां विरुध्द द्रोह करावा यासाठी.माझ्या सहाय्याने त्याला संपूर्ण भारतवर्षात पाय रोवतां यावे या कुटील हेतूने मला गुरुपद
देऊन,भौतिक समृध्दीचं प्रलोभन दाखवल.मुद्रा,आतां कार्यपूर्तीची वेळ समीप आलीय!इथलं कार्य लवकर मार्गी लावून आणि आचारसंहितेत बसवून हा पेदियाल पर्वत सोडून दंडकारण्यात व जनस्थानातील आश्रमांकडे निघायला हवय!अवताराचे तिथे आगमन होत आहे
दंडकारण्यातील अगस्त्याश्रम होम शाळेत अगस्त्यऋषींकडे घाईने गौरंगाने प्रवेश करत सांगीतले,राम,लक्ष्मण,सीता आश्रमाकडे आलेत.त्यांचे उचित स्वागत व पाद्यपुजा करुन त्यांचे आवागमन करायला सांगीतले व ते स्वतः त्यांना सामोरे गेलेत.त्यांना बघून राम तत्परतेने पुढे येउन त्यांचे चरणस्पर्श केले.लक्ष्मण, सीतेही रामाचे अनुकरण केले.त्या सिध्द ऋषीसमोर तीघेही विनयाने उभे राहिलेत जवळपास एक तप त्यांनी वनात व्यतीत केला,हे त्यांच्याकडे बघून कुणाच्याही लक्षात आले असते.
तिघांचेही स्वागत करुन ऋषी त्यांना आपल्या समवेत होमशाळेत घेऊन आले.त्यांना बसायला आसनं दिलीत.वैश्वदेव करुन शिष्यांसह तिघांना अर्ध्यदान दिले.फळं,पुष्पं देऊन त्यांचा सत्कार केला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.





