महर्षी अगस्त्यऋषी संपूर्ण चरित्र भाग ६, (२६ ते ३०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

Maharishi Agastya Rishi! !

महर्षी अगस्त्य ऋषी ! !

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – २६.

         अगस्त्यांबरोबर दक्षिण द्विग्विजया करितां शिष्य शंख,ब्राम्हणवर्ग आणि इतर आश्रमातील शिक्षण पूर्ण झालेले स्नातक यांचा जत्था विंध्याचलाच्या पायथ्याजवळ येऊन मुक्काम केला.’रेवा’ जिचं नामकरण “नर्मदा” असं जमदग्नींनी केलेल्या नदीकाठी राहुट्या पडल्या.चुली पेटल्या.रात्रीच्या जेवणाची सिध्दता सुरु झाली.

          अस्ताला जाणार्‍या सूर्याकडे दृष्टी लावून अगस्त्यऋषी बसले होते,तेवढ्यात गुरे हाकलत जाणार्‍या गुराखी मुलांवर त्यांचे लक्ष गेले.आणि एकदम म्हणाले, सांपडला मार्ग!परमेश्वर कोणत्याही माध्यमातून आपल्याला दिशा दाखवतो. फक्त संकेत आपल्याला ओळखतां यायला हवा.गेल्या चार दिवसांपासून आपल्याला मार्ग सांपडत नव्हता. भगवान महादेवाने त्या गुराखी पोराच्या माध्यमातून आपल्याला मार्ग दाखवला.

          नंतर त्या गुराखी मुलासोबत त्याच्या वस्तीवर जाऊन तेथील लोकांना ज्ञानाचे धडे देऊ लागले.राहावे कसे?एका पुरुषाने एकाच स्रीबरोबर राहून कुटुंब कसे स्थापित करावे?मांसभक्षणा ऐवजी शेतीतून धान्य कसे पिकवावे? स्वच्छता कशी ठेवावी? इत्यादी अनेक धडे देऊन,अन्याय,अत्याचार न करतां गुणागोवांदाने कसे राहावे? हे सर्व अनेक उदाहरणे देऊन,त्या वस्तीत परिवर्तन आणण्यास सुरुवात केली.आणि अगस्त्यांच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला.

        तिथून निघतांना बरोबरच्या ब्राम्हणांना म्हणाले,कोणतेही परिवर्तन एका दिवसांत होत नसते.त्यासाठी अफाट कष्ट,तप करावं लागलं.आज केवळ बी पेरले.फसल यायला उचित समय द्यावा लागतो.

        गेल्या दोन-तीन वर्षात विंध्यपर्वता तील वन्य जमातीला संस्कतीचे धडे देऊन त्यांच्यात कुटुंबव्यवस्था रुजवली. नरमांसभक्षण पूर्णपणे नष्ट झालं.मासां ऐवजी शेतीचा पर्याय निर्माण करुन दोनच वर्षात कृषी कशी करावी?धान्य कसे पिकवावे?धान्याची साठवणूक कशी करावी?अन्न कसं शिजवून खावं हे सर्व शिकवून त्यांच्यात संस्कृती कार्यान्वित केली.आता असंच दिव्याने दिवा लावत जायचय…..

           प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी  काशी नरेशांनी वाराणसीत “इंद्रध्वज” महोत्सवा चं आयोजन केले.जलधारांच्या रुपाने इंद्रदेव कृषी आणि जलाशय समृध्द करतो या श्रध्देने शरदऋतूत नभरुपी इंद्रा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘इंद्रध्वज’ महोत्सव साजरा करण्यात येतो या निमित्याने काशीराजाने इतर मान्यवरांंसह अगस्त्य,वसिष्ठ,च्यवन,भृगू, विश्वामित्र,भरद्वाज या ऋषींना निमंत्रित केले.तसेच रानावनांत तप करीत असलेल्या ऋषींनाही अगत्याने निमंत्रित केले होते.कृतज्ञता व्यक्त करण्याची दुसरी मान्यता अशी होती की,देवांवर असुर वरचढ झाल्याने अनेक ठीकाणी इंद्राला पराभव पत्कारावा लागला.मग इंद्राने विष्णूदेवाची भेट घेतल्यावर इंद्राला दिव्यध्वज दिला.तो ध्वज इंद्राने आपल्या रथावर फडकवला व असुरांचा पराभव झाला.ही वार्ता चेदीराज वसूला कळल्या वर,सुएझ कालव्याकाठी चेदीचं असलेलं राज्य मोडकळीस आल्याने वसूराजा हत बल झाला होता.इंद्रव्वजामुळेच देवांचा विजय झाला हे समजल्यावर त्याने इंद्राकडे त्या ध्वजाची मागणी केली. त्याचा परीणाम म्हणा की,दिवस पालटले म्हणून असेल चेदीराज्य भरभराटीस आले.इंद्रदेवांमुळेच आपले दिवस पालटले या दृढ भावनेने त्याने इंद्रध्वज महोत्सव सुरु केला.कालांतराने त्याचा प्रसार आर्यराज्यामधे होऊन तिथेही हा उत्सव साजरा होऊ लागला.

       या उत्सवानिमित्याने राजासह सारे प्रजाजन आनंदाने सहभागी होत असे.  नृत्य,नाटक,शस्रकौशल्य,मल्लांच्या दंगली,अप्सरांचं नृत्यगायन असे विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन होत असे. नाट्यशाळेत “समुद्रमंथन” नाटक ऐन रंगात आले होते.सारे निमंत्रित मान्यवर    ऋषीवर समुद्रमंथन नाटक पाहण्यात मग्न झाले होते.नाटकाच्या शेवटी समुद्र मंथन होऊन देव-असुरात तह झाला. मंदारपर्वतीय श्रेष्ठींनी उभयपक्षात तह घडवून चौदा रत्न निघाली.महादेवांनी कालकूट विष आपल्या कंठात धारण केले.इंद्राकडे ‘उच्चैश्रवा’ नामक अश्व आणि ऐरावत आला.नंतर कामधेनू, कल्पवृक्ष,कौस्तुभमणी,रंभा,लक्ष्मी, वारुणी,चंद्रमा,शारंग धनुष्य,शंख,गंधर्व अमृत यांचे वाटप होऊन नाटक संपले. शेजारी बसलेल्या वसिष्ठांना अगस्त्य म्हणाले,वास्तवात देवासुर वाद अशा मंथनातून संपुष्टात आले तर? तर आपल्याला कांही कामच उरणार नाही.

              क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

           दि. १३-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – २७.

        नाटक संपल्यावर राजाच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.नृत्यशाळेत अप्सरांचा नृत्य कार्यक्रम सुरु होता.इकडे मंत्रणाकक्षात  येऊन प्रथम अगस्त्यांनी व वसिष्ठांनी तिथे आधीच असलेल्या,विश्वामित्र,भृगू आणि भरद्वाजांच्या चरणांवर डोके टेकले. गदगदल्या स्वरांत विश्वामित्र अगस्त्यांना म्हणाले,यापुढे अम्हाला नमस्कार नाही करायचा  हं…!तुमचे कर्तृत्व महान आहे. सागर प्राशन केला,कालकेयाचा नाश केला,आतां विंध्याला नमवत आहांत. तुमचे कार्य सागरासारखे विशाल,अथांग तर आहेच,पण विंध्याचलासारखं उतुंगही आहे.तुमच्या या कार्यापुढे अम्हीच नत मस्तक …हे काय ऋषीवर?आपलं कार्य तर केवढं श्रेष्ठ?आपण साक्षात ज्ञान.. ब्रम्हपदी पोहोचलेले ब्रम्हर्षी,भविष्यशास्रा चा गाढा अभ्यास…पण त्याहीपेक्षा तुमचं कार्य मोठं आहे अगस्ती.सागराला नमवण आणि विंध्याला झुकवणं हे आव्हानात्मक काम आहे.

        गुरुवर्य!मी केवळ विंध्यातील लोकांना विचारांची दिशा दिली एवढच! त्यावर भृगूऋषी म्हणाले,मांदार्य,नागरी जनांकडेही दुर्लक्षून चालणार नाही. नागरीलोक सुसंस्कृत असल्यामुळे आणि क्षिक्षण,वाचन,परंपरा,श्रवण शिवाय संगीत,कला,साहित्य अशा प्रतिभेशी संलग्नित असल्यामुळे त्यांच्या व्यासंगा ला केवळ बुध्दीपूर्वक सांगड घालणं एवढच काम उरत…

        मधेच विश्वामित्र म्हणाले,माझं परि भ्रमण काशी,अयोध्या,मिथिला इत्यादी राज्यातून होत असतांना आर्यवर्तात आपल्या अपेक्षेप्रमाणे राज्यव्यवस्था प्रस्थापित झाली आहे.देवांप्रमाणेच शासनव्यवस्था या राजांमधे असल्यामुळे, तेथील प्रजा राजाला देव मानतो.इक्ष्वाकु कुळानं मात्र आपली दैदीप्यमान परंपरा जपून ऋषीविचारांवर जोपासलेली राज्य व्यवस्था सर्वश्रेष्ठ आहे.अयोध्येचे वर्णन करीत विश्वामित्र म्हणाले,अजिंक्य नगरी म्हणजे अयोध्या! ती मनूनिर्मित सुंदर नगरी भरभराटीस आणण्यासाठी रघू, अज,दिलीप आणि दशरथ या इक्ष्वाकू अर्थात रघूकुलाचे तप कारणीभूत आहे. तेथील कौटुंबिक,सामाजिक रीतीरिवाज,  लोकाचार स्वयंशासीत आहे.अयोध्येत सामुदायिक उत्सवही होतात.इंद्रध्वज महोत्सव विशेष लोकप्रिय आहे.या उत्सवात क्रीडा,नर्मविनोद,सहभोजन, नाटक,गायन,शर्यती इत्यादी उपक्रम राबवले जातात.

        तसेच अनेक कलागुणांची जोपासना केली जाते.तेथील शिक्षण व्यवस्थाही उत्तम आहे.विद्यादान करणार्‍या गुरुंना,आचार्यांना अतिशय मान दिल्या जातो.अयोध्येत या वसिष्ठांनी विद्यालय चालवलं आहे.आज ते इक्ष्वाकु कुळाचे राजर्षी आहेत.जी संस्कृतता, समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आजवर ऋषी झटले त्याचं साक्षात दर्शन अयोध्येत घडत आहे.परंतु विंध्य,दंडकार ण्य आणि दक्षिण प्रांत अजूनही या संस्कृतीपासून वंचित आहे.राक्षस विघ्न आणतात.नरभक्षक टोळ्या अजूनही अस्तित्वात आहेत.विंध्य नमवल्यावर दक्षिण सागरा पर्यत जाण्याचा माझा मानस आहे.मांदार्य म्हणाले!उद्या इथून निघण्यापूर्वी याच विषयावर चर्चा करायचीय असे म्हणून विश्वामित्रासह  सारे ऋषी अपापल्या कुटीरकडे निघाले,

        वाराणसीत ‘इंद्रध्वज’महोत्सव यथा सांग संपन्न झाल्यावर,काशीराजाने ऋषी मंडळींची विशेष सभा आयोजित केली. त्यात मांदार्य,शाकल्य,विश्वामित्र,वसिष्ठ, गौतम आणि भरद्वाज असं ऋषीमंडळ काशीराजाच्या मंत्रणाकक्षात  जमलं होतं भृगू ऋषी पहाटेच गेले होते.बैठकीला सुरुवात होताच,गौतमऋषींनी सद्य परिस्थितीचं साद्यंत वर्णन करीत म्हणाले, पत्नीसह मी दंडकारण्यात राहण्याचं धाडस केलं पण अरण्यात फार मोठी आव्हानं,नरभक्षक टोळ्या,वाटमारे तसेच अनेक राक्षसांनी ते अरण्य व्यापले आहे. हे राक्षस छुप युध्द खेळतात.तेथील छुप्या जागा त्यांना माहित असल्यामुळे त्यांचे वर सरळ सैन्य नेऊन त्यांना मारणं अवघड आहे.शिवाय त्यांना रावणाकडून वेळोवेळी शक्ती प्राप्त होते.मग आतां काय करावं?

        आपल्याला अशा योध्याची प्रतिक्षा आहे,जो अस्रवेत्ता आहे,ज्याची ऋषीय कार्यावर अढळ निष्ठा आहे,जो शत्रूसमोर अविचल उभा राहु शकेल,जो सैन्य सहाय्याशिवाय एकटा अरण्यात जाऊन,छुप्या शत्रूंना मारुं शकेल.अशी व्यक्ती देवाच्या रुपात अवतार घेऊन लवकरच येत आहे.म्हणजे? भरद्वाज म्हणाले…देवांनी परशुराम अवतार पाठवला.त्यांनी वैदिक कार्याबरोबरच शस्रनिष्ठाही जोपासली.आर्यवर्तात एकही शत्रू उरला नाही.आर्यवर्तातील त्यांच काम आटोपल्यावर,त्यांचे गुरु कश्यपांना, परशुरामांनी दक्षिणेकडे जावं असे वाटले नवीन अवताराबद्दल वसिष्ठ सांगू लागले, परशुराम हे ब्राम्हकुळातील,त्यांच्या जोडी ला क्षत्रियकुळातील अवतार आला तर, भावी कार्यासाठी फार उपयुक्त होईल. राक्षस आणि रावणासारख्या प्रबळ शक्ती चा पूर्ण विनाश करण्यासाठी या क्षत्रिय अवताराची देवेंद्रांना आवश्यकता वाटली येत्या कांही दिवसांतच अवतरण होईल. पण कोण?कुठे?च्यवनऋषींनी प्रश्न केला

               क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

         दि.  १४-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – २८.

           वसिष्ठऋषी पुढे सांगू लागले… ब्रम्हदेवांनी रावणाशी करार केल्याप्रमाणे  व दिलेल्या ‘वरा’ नुसार, रावण देव, गांधर्व,यक्ष,राक्षस यांचेपासून तो भयमुक्त होता.पण दिलेल्या वरा मधे मनुष्याचा उल्लेख नसल्याने याचाच फायदा देवांनी घ्यायचे ठरविले.त्याचवेळी वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली,राजा दशरथाने अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले.ऋष्यश्रृंग ऋषी यज्ञाचे उध्वर्यू होते.त्यांनी संमत्रक कर्म  करुन अग्निला आव्हान केले.त्याचवेळी राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ सुरु केला त्यावेळी तिथे दिव्य पायस असलेले सुवर्ण कलश घेऊन एक महापुरुष उपस्थित झाला पायसचा कलश राजाला  दिला.पायस राजाच्या राण्यांनी कौसल्या,सुमित्रा,कैकयी यांनी सेवन केल्यावर,राजाला पुप्रप्राप्ती होणार होती देवांचा अंश मानवरुपात जन्माला घालून त्याच्या हातून रावणवध व्हावा,या योजने ने विष्णूदेवाने,ते दिव्य पायस दशरथ राजाकडे पाठवले.हे पायस स्वतःच्या पासून विष्णूंनी तयार केले होते.

       त्या पायसचा परिणाम,पुढच्या वसंत ऋतुत विष्णूंचा अवतार जन्म घेईल त्याचबरोबर,या नव्या अवताराला सहाय्य भूत होतील अशा वीरांची ..किन्नर,नाग, वानरं,ऋक्ष,यज्ञ आणि विद्याधर यांची उत्पत्ती करण्याचीही योजना विष्णूंनी योजली.म्हणजे आतां ऋषीय कार्याला अवताराची जोड मिळणार तर?

          रावणानं प्रचंड भौतिक प्रगती केली.त्याच्याकडे पुष्पक विमानाबरोबरच “धानु-मानोरा ही देखील विमानं आहेत. ही विमानं आकाशातून वेगवान आक्रमण करुन शत्रूला सळो की पळो करुन सोडत लंकेत जाऊन त्याच्याशी एकही राजा युध्द करु शकत नव्हता,एकतर सागरी  मार्गाने जाणं कठीण,दुसरं म्हणजे माताली गावाजवळ एका पर्वतावर त्याने वेधशाळा उभारली होती तिथून तो लंके वर नियंत्रण ठेवू शकत होता,त्यामुळे शत्रू आल्याचे त्याला लगेच समजत असे. त्याच्या विनाशासाठी विष्णूंनी आपला वंश पाठविण्याची योजना केली.

         वसिष्ठ म्हणाले ही सुवार्ता देण्या साठीच आज इथे उपस्थित झालोय. महर्षी विश्वामित्रांना याची आधीच कल्पना होती.ते म्हणाले,या नव्या अवताराचे सहाय्य कसे घ्यायचे याचे नियोजन करावे लागेल.काळ झपाट्याने सरकतोय,नियोजन आणि त्याची अंमल बजावणी करेस्तोवर एक तप कसे निघून जाईल,कळणारही नाही.महत्वाचे म्हणजे जे ऋषी तळहातावर शिर घेऊन राक्षसां ची दहशत असूनही यज्ञ करीत आहे त्यांना या वार्तेने दिलासा मिळेल. विश्वामित्र म्हणाले एक तपानंतर त्या राज पुत्रांना अयोध्येत भेटायला जाईल,तोवर वसिष्ठऋषी त्यांना योग्य शिक्षण देऊन तयार करतीलच.उत्साहाने मांदार्य म्हणाले,आतां विनाविलंब विंध्य पार करुन दक्षिणेत उतरावं लागेल.

         आजपर्यंत जे कोणालाही जमले नाहि ते विंध्यपर्वतरांगेतील कार्य,कुषी सुधारणा, परस्पर स्नेह भावना,कुटुंब व्यवस्था वृधींगत करुन परिवर्तन घडवून आणले. विंध्यचलाला वाकवणारा, “नगाः इति अगाः। अगाः पर्वताः।” म्हणून आज पासून मंदार्याचे नांव बदलवुन ते “अगस्ती” ऋषी म्हणून ओळखल्या जातील.

         ब्रम्हगिरी पर्वतरांगांमधे अगस्त्य ऋषींंनी,नुकत्याच एका छोट्या आश्रमा ची स्थापना केली.विंध्याला नमवून आतां ते दण्डकारण्याच्या सीमेवर आले होते. येतांना वाटेत ‘कोळ’ नामक जमातीमधे संस्कृती रुजवली.गेल्या एक तपापासून ओंकारेश्वरापासून संपूर्ण विंध्यपर्वत रांग वैदिक विचारांनी प्रेरित करुन सगळीकडे

आर्य संस्कृती रुजवली.असंख्य स्नातक आणि ब्राम्हण अगस्त्यांच्या मार्गदर्शना खाली विंध्याचलात सतत कार्यरत होते.  यज्ञसंस्थेतून वैदिक संस्कृतीचं मुळ तिथं रुजवलं .अनेक आश्रम निर्माण केलीत. वैदिक शिक्षणाबरोबरच पशुसंवर्धन,कृषी जल असे विविध उपक्रम तिथे राबवले गेले व जात आहेत.अनेक ऋत्विज, आचार्य,विद्यार्थी,पुरोहित विंध्य ओलांडून  दक्षिणेत स्थायिक होऊ लागले.

          पर्वताच्या पायथ्याशी आधीच गौतमऋषी आलेले होते.हे दोन ऋषी परस्पर सहकार्याने दक्षिण सागरापर्यंत संस्कृती रुजवण्याचे काम सात्यत्याने करीत होते.दंडकारण्यात वानर,जटायू बरोबरच नरभक्षक राक्षसांचा  फार मोठा संचार होता.रावणाने फितवलेले हे राक्षस  ऋषी संस्कृतीचे कट्टर विरोधक व देवांचे शत्रू होते.त्यांचे एकच काम..एकसंघ मानवसमुदाय निर्माण करणार्‍या व यज्ञात विघ्न आणून त्यांना ठार करणे. पूर्वीसुध्दा वसिष्ठाश्रम,च्यवनाश्रम, भरद्वाजाश्रमात जाऊन तेथील ब्राम्हणांना ठार केले होते.

              क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

          दि. १५-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – २९.

           तरीसुध्दा जीवाची पर्वा न करतां

ऋषी,ब्राम्हणांनी प्रचंड तप करुन,प्रसंगी  आत्मसमर्पन करुन आर्यवर्ताच्या सीमा वाढवत होते.जंबुद्वीप अर्थात दंडकारण्य प्रदेश आर्यवर्तात जोडल्या जात होत्या. सीमा वाढत होत्या.एवढ्यात त्यांना गौतमऋषींनी स्थापन केलेल्या त्र्यंबकेश्वर  मंदिराच्या पलिकडील बाजूने रावणाशी युध्दात झालेली पराभूत विशाल देवसेने ची पलटन उत्तरेकडे जातांना दिसली. हे वृत्त कळल्यावर अगस्त्यऋषी गौतमऋषीं च्या आश्रमात गेले.त्यांचे स्वागत करुन गौतमऋषी म्हणाले,काल दक्षिणेकडे  झालेल्या देव- दैत्य युध्दात रावणपुत्र मेघनादने इंद्राचा पराभव केला.पुढे म्हणाले,एक दिवस इंद्राने अहिल्येवर अधिक्षेप केल्यावर,मी संतापून दोघांनाही शाप दिला.इंद्राला शाप देत म्हटले,तूं वृषण रहित म्हणजेच वीर्यहीन होऊन वीरता गमावशील आणि अहिल्येला शिळावत् होशील,तिने उःशाप मागीतल्यावर, सांगीतले,एक दिवस महानयोध्दा राम येऊन तुझा उध्दार करेल.आणि मी कठोर साधनेसाठी हिमालयाकडे निघून गेलो.कांही काळानंतर ऋषीमंडळांच्या विनंतीवरुन परत येऊन दंडकारण्यात वास्तव्य केले.नंतर ब्रम्हगिरी पर्वतातील जमातींना

कृषीशास्र शिकवले पण पाण्याची समस्या निर्माण झाल्यावर बरंच संशोधन केल्यावर ब्रम्हगिरीवर एका जलस्रोताचा शोध लागला.त्या जलस्रोचा उगम हुडकुन आपल्या सहाकार्यांच्या मदतीने एका नदीत रुपांतर केले तीच नदी “गोदावरी” म्हणून प्रसिध्द झाली.एक आदर्श समाज त्या परिसरात घडवला.हे महान कार्य बघायला साक्षात त्र्यंबकेश्वर अवतरले होते.

       अगस्त्य त्यांची प्रशंसा करीत म्हणाले,आपण कृषीत एवढं संशोधन केलं,इथल्या पर्वतीय जमातींना कृषीमंत्र देऊन,त्यांना प्रोत्साहित केले,समृध्दी आणली.गौतम म्हणाले  आपण तर संपूर्ण विंध्याचलच बदलवून टाकला.नर भक्षक संपविले,त्यांच्यात सुपरिवर्तन झालं म्हणून तर आज राज्यव्यवस्था शांततेत नांदत आहे.ऋषींच्या कार्यामुळे आर्यवर्तातील सामान्य प्रजा समृध्द आहे, सुसंस्कृत जीवन जगत आहे.हे कार्य करतांना कितीतरी ब्राम्हण,ऋषींनी आपल्या आहुत्या दिल्यात,आणि जे जगले त्यांच्या पदरी उपेक्षाच आली ना?

       दोन तपापूर्वी इक्ष्वाकु कुळात दशरथ राजाची थोरली पत्नी कौशल्या च्या पोटी विष्णूचा अवतार जन्माला आला.दुसरी राणी सुमेत्राच्या पोटी लक्ष्मण व शत्रृघ्न आणि कैकयीच्या पोटी भरत जन्माला आले.हे सारेच पुत्र परमेश्वराचे अंश,थोरला राम तर सद्गुणां चा पुतळाच!ताटीका वधानंतर रामाच्या अनेक गुणांची आर्यवर्तात चर्चा होती. आत्मसंयमी,तेजस्वी,धैर्यवान,जितेंद्रिय, उत्तम वक्ता,वेदवेदांताचं  तत्व जाणणारा, धनुर्वेदात श्रेष्ठ योध्दा असूनही,धर्मपालन करणारा वैदिक धर्मरक्षक,सागरासारखा प्रशांत,हिमालयाप्रमाणे उतुंग व्यक्तीमत्वा चा,चंद्रासम शितल होता.पण क्रोधवश झाल्यावर,प्रलयकाळाच्या अग्निप्रमाणे भासत.अशाच दैवी योध्याची प्रतिक्षा होती.ठरल्याप्रमाणे विश्वामित्र दशरथ राजाकडे जाऊन राम-लक्ष्मणाची मागणी केली.पण राजाची इच्छा नसल्यामुळे वसिष्ठांनी समजावल्यावर दोन्ही पुत्रांना त्यांच्याबरोबर पाठवले.

          महर्षी विश्वामित्रांबरोबर अनेक अरण्यातून फिरतांना राम-लक्ष्मणांना ऋषींच्या अस्थिंचे ढीगारे,अनेक उध्वस्त आश्रम दिसले.विश्वामित्रांच्या आज्ञेने जुलमी ताटीकेचा वध रामाने केल्यावर तीर्थयात्रा करत मिथिलेला पोहोचले.तिथे जनककन्या सीतेशी रामाचा विवाह संपन्न झाला.नंतर सारे अयोध्येस परतले.

          आतां प्रतिक्षा होती राम दक्षिणेत येण्याची….

       अगस्त्य पुढे म्हणाले,दंडकारण्य म्हणजे राक्षसांच आगरच!रामाला अयोध्येबाहेर पाठवायची राजा दशरथा ची मुळीच इच्छा नव्हती.पण रावणाने  देवांचा पराभव करुन,उत्कल प्रांतापर्यंत चं क्षेत्र प्रभावित केलं.त्याचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य रामाशिवाय कोणातच नाही.त्यासाठी अयोध्येत रामाचा राज्या भिषेक होणार,ब्रम्हदेवांच्या अनुमतीने  इंद्रदेव सुनियोजित षडयंत्र रचणार, त्या मुळे रामाला दंडकारण्यात यावंच लागेल.

            क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

             दि.  १६-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – ३०.

‌       ब्रम्हगिरी परिसरांत विशाल आश्रम स्थापून प्रवरा नदीच्या खोर्‍यातील वन्य जमातीचे लोकं  विविध प्रकारची धान्य पिकवून शेती

करुं लागले.आणि स्वयंपाकीची अनुभूती त्यांना मिळाली.तपश्चर्येतून केलं जाणारं भगवद्कार्य आणि निसर्गाशी राखलेल्या सहचर्याने समृध्दी आणि तृप्ती सारे आश्रमीय उपभोगु लागले.

        त्यादिवशी आश्रमात अभ्यास नसल्यामुळे,अगस्त्य,पुरोहित व कांही स्नातक एका वन्य वस्तीत कार्यार्थ गेले होते.१०-१२  वानप्रास्थी व चारच स्नातक आश्रमात होते.पैकी,दोघे धान्य गोळा करीत होते.दत्ता नावांचा शिष्य चिंचेच्या झाडावर एकदम वर जाऊन चिंचा पाडीत असतांना,मारीच राक्षस आश्रमाकडे येतांना दिसल्याबरोबर,बाकी च्यांना सावधानतेचा इशारा दिला व तो आणि बाकीचे तीघे आश्रमा संरक्षणार्थ मिळेल त्या शस्रांनिशी त्याचा प्रतिकार करण्यास आश्रमाबाहेर उभे राहिले.सारे आश्रमीय लपून बसले.मारीच राक्षस मोठमोठी झाडे उपटत,कापणीला आले ल्या पिकांची नासधूस करत आश्रमाकडे येत असलेले पाहून,दत्ताने त्याच्या दिशेने भराभर तीर सोडले,दुसर्‍यांना पाषाणांचा वर्षाव,तर तिसरा गोफणीतून दगडांचा मारा करु लागला,पण त्याच्यावर फारसा परिणाम होत नव्हता.

          गौरंगाची शिखा पकडून त्याला फरफटत नेऊ लागला.गौरंग त्याचा प्रतिकार करुं लागला.बाकीचेही त्याच्या सुटकेसाठी मारीचवर दगडांचा मारा करु लागले,एक दगड त्याच्या वर्मी लागल्याने कर्णकटू आवाजात ओरडत घनदाट अरण्याकडे पळून गेला.जखमी गौरंगाला उचलून आश्रमकुटीत नेऊन त्याच्यावर उपचार सुरु केले.दक्षिण भारतातीला  आव्हाने अद्याप संपली नव्हती व संपणारही नव्हते,ऋषीय यज्ञकार्याला समर्थ संरक्षण लाभेपर्यंत….

        गौरंगची विचारपूस व सांत्वना देत अगस्त्य म्हणाले, आतां हा आश्रम मंत्रतंत्र व सिध्दीने प्रभावित केलेला आहे त्यामुळे मारीच परत इकडे फिरकणार नाही.वास्तविक मारीच इकडे येण्यास मीच कारणीभूत आहे.आर्यवर्तात सरयू नदीच्या दक्षिणेकडे मलद आणि कुरुष हे दोन मोठे प्रदेश होते.वृत्रासुराला मारल्या नंतर,देव आणि इंद्राने तेथील पवित्र जलाने पापक्षालन विधी करुन,तो अस्पर्शित प्रदेश सुशोभित केल्यावरही, सुकेतु यक्षाची कन्या ताटीकेच्या उपद्रवा मुळे तिथे वास्तव करुं शकले नाही सज्जन सुकेतुने साधना करुन त्याला ताटीका नावांची सुंदर कन्या प्राप्त झाली.तिचा विवाह जंभपुत्र सुंदशी करुन दिला. त्याच्यापासून तिला मारीच नावांचा पुत्र झाला. मी सांस्कृतिक कार्य करत दक्षिणे कडे जात असतां हा सुंद माझ्या संपर्कात आला.त्याला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला पण व्यर्थ,उलट सर्वांना त्रासदायक होऊन,ऋषीय कार्याला हानी पोहचवू लागल्यामुळे त्याचा वध करावा लागला.

           त्यामुळे ताटीका संतापून,ती व मारीच मला मारायला आले.मी जरी ऋषीय जीवन स्विकारले असले तरी मी एक समर्थ योध्दा,व अनेक सिध्दी प्राप्त आहेत हे त्या दोघांना माहीत नव्हते. त्यांचा प्रतिकार करीत,मी त्यांना शाप दिला.मारीच राक्षस होईल व ताटीकेला , तुझं हे सुंदर रुप नष्ट होऊन चेहरा विद्रूप व देह अक्राळ विक्राळ होऊन नरभक्षक होशील.ही एका सिध्द ऋषीची शापवाणी तिचा परिणाम तर होणारच!त्यामुळे राक्षस बनलेले मातापुत्र,मी जिथे तप करी तिथे ही दोघं माझं कार्य उध्वस्त करुं लागले.धनधान्य व वनश्रीने नटलेला समृध्द मलद आणि कुरुष प्रदेश या माता पुत्राने उध्वस्त केला.रामाने ताटीकेचा वध केल्यामुळे,आतां परत कांही ऋषी कार्यरत झाले.मारीच मात्र माझा सूड घेण्यासाठी दंडकारण्यात आला आहे. कोणत्याही संकटावर मात करुन,पुन्हा समर्थपणे उभा राहतो,व्रतापासून विचलित होत नाही,प्रसंगी प्राणही पणाला लावतो,त्यालाच ऋषी म्हणतात ना? एवढे बोलून अगस्त्यांनी ॐ कार म्हटल्यावर सारे जण आपापल्या कार्यास्तव निघून गेलेत.

अगस्त्यांनी सुतेष्ण या शिष्याला बोलावून त्याला म्हणाले,तुझं वेदअध्ययन व अनेक शास्र,शस्रविद्या अवगत झाली.आतां सर्जनशील कामे, व भगवद्कार्य करण्या साठी उत्तरेकडे जाऊन,गौतमऋषींचे थंडावलेल्या कार्याला गती देण्यासाठी नवीन आश्रमाची स्थापना कर,त्यासाठी मदतीला शास्र शस्रसज्ज वीस युवकही सोबतीला असतील.कांही दिवसांतच राम,लक्ष्मण,सीता या वनात येत आहेत तोवर या दंडकारण्यात ऋषीय कार्य प्रस्थापित व्हायला हवय! आणि  हो..दोन दिवसात भगवान परशुराम इथे येत आहेत त्यांच्या उचित स्वागतासाठी सर्व तयारी नीट कर.जशी आज्ञा आचार्य म्हणून त्यांना वंदन करुन सुतेष्ण कुटीतून बाहेर निघून पडला.

              क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                       

महर्षीं अगस्त्यऋषी सर्व भाग पहा

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading