महर्षी अगस्त्यऋषी संपूर्ण चरित्र भाग ५, (२१ ते २५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

Maharishi Agastya Rishi! !

महर्षी अगस्त्य ऋषी ! !

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग -२१.

       अगस्त्यऋषी पुढे म्हणाले,वृध्दत्व लांबवण्यासाठी मी सोमरस घेतलेला नाही.अतिदीर्घे जिविते को रमेत” या वचनावर माझी श्रध्दा आहे.ध्येयाविना दीर्घायुष्य ही शिक्षाच असते.पण माझं ध्येय उदात्त असून निश्चित आहे.त्यासाठी पुष्कळ तप करावी लागणार आहे.अरण्यें पिंजून काढावी लागणार आहे.आर्यवर्ता तील आव्हाने अजून संपलेली नाही. त्या साठी तपाची गति आणि व्याप्ती वाढवावी लागणार आहे.यानंतर पुन्हा शस्र उचलणार नाही असं ठरवलं तरी, देवांनी अनेक दिव्य शस्रास्र दिली आहेत. ती शस्रास्र संस्कृती प्रस्थापन कार्यात लढणार्‍या एखाद्या विर योध्याच्या नक्की कामी येईल.

       संस्कृती प्रस्थापन कार्यात केवळ राक्षसच आड येत नाही तर रुढीही आड येतात.राक्षसांविरुध्द शस्र काम करतात पण रुढीतून समाज बाहेर काढणे येवढे सोपं नाही.सुशिक्षित व्यक्तीसुध्दा रुढी बाहेर जात नाही.एवढच काय,देवही क्वचित रुढीग्रस्त होतात.पूर्वी सोमयागा च्या वेळी बळी देण्याची प्रथा,मी महत् प्रयासाने बदलली.अनेक उदाहरणे देऊन बळी देणे कसे निशिध्द आहे हे त्यांच्या गळी उतरवले.व शेवटी बळीच्या जागी नारळ फोडण्याची युक्ती घडवून आणण्याचं भाग्य मला लाभलं. ॐ कार चा ध्वनी करुन अगस्त्यांनी सभा विसर्जित केली.

        सारे गेल्यावर,सुभद्रादेवी त्यांच्या जवळ येऊन म्हणाल्या,वत्सा,अरे हे मिळालेलं तारुण्य असच वाया घालवाय च कां?अखंड तपाचरण सुरुच आहे की.. अरे! हे तर अविरत करतोसच,पण विवाह?माते! याचा मी कधी विचारही केला नाही.स्वतः विवाह न करतां, समाजात कुटुंबव्यवस्था करीत जातोस हे योग्य वाटते कां?पण मी पण जर कुटुंबा त,संसारात अडकलो तर, माझे हातून हे कार्य कसे होईल?उलट तुझ्या कार्याला गती येईल.आदर्श संसार करुनही तपाचरण करता येतो हा वस्तुपाठ समाजाला देतां येईल.स्री च सामर्थ्य, कर्तुत्व किती महान असते हे मी सांगायला हव कां? तुझा संसार तुझी पत्नी सांभाळणार नाही कां?आज तूं आर्यवर्तात आश्रमांची जी साखळी निर्माण केली,त्यातील व्यवस्थेसाठी तुला वेळ द्यावा लागतो,त्यापेक्षा हे कार्य तुझी पत्नी सहज करुं शकेल.व तुला त्या कार्यापासून मोकळा होऊन तुझ्या कार्या चा वेग वाढवू शकशील.अरे,प्रत्येक वैदिक ऋषीने विवाह केला आहे.अत्री- अनुसया,वसिष्ठ-अरुंधती,ऋचिक-सत्यवती, अरे!पतीच्या कार्यापाठी स्रीची शक्ती असेल तर,त्या कार्याला एक प्रकारची बैठक प्राप्त होते.जीवन सुगंधीत होते. अगस्त्यांना पटत असल्यामुळे सुभद्रा देवीचा विरोध करतां येत नव्हता.माताजी,मी नक्की विचार करेन.फारवेळ विचारात घालवू नको,म्हणून काठी टेकवत त्या आपल्या कुटीरकडे निघून गेल्या.

         कालकेयाच्या संहारानंतर पश्चिम किनारपट्टीवरचे जनजीवन पुन्हा सुरळीत केल्यानंतर अगस्त्यांना साधनेची नितांत आवश्यकता वाटू लागली.पण यावेळी त्यांनी वेगळ्या पध्दतीने साधना करायचे ठरविले.तीर्थस्थळांना भेट देत,तिथल्या निसर्गरम्य परिसरांत राहून ध्यानधारणा करायची आणि प्रत्येक तीर्थस्थळां मधील मानव समूह तपाचराने जोडत जायचे. त्यानुसार प्रथम हिमालयातील तीर्थस्थळां ना भेटी दिल्या.नंतर पूर्वी जिथे तपाचरण करुन आश्रम उभारला होता,त्या पुष्कर तीर्थाजवळ आले.अगस्त्य पुष्करतीर्थी आल्याची वार्ता ब्रम्हदेवांना कळल्यावर ते अगस्तींच्या भेटीस आले असतां त्यांच्या त गहन चर्चा झाली.त्या चर्चेचा सार म्हणजे…केवळ प्रेमाने माणसं जोडणं उपयोगाचं नाही तर,समान जीवनपध्दती, विचारपध्दती,उपासनापध्दती आचरणात आणणारा समूह निर्माण व्हायला हवा. त्यासाठी विविध प्रकारचे शिक्षण देणार्‍या प्रणाल्या,आश्रमशाळा स्थापन झाल्या पाहिजे.आश्रम उभारणीसाठी देवांचे आर्थिक सहाय्य आणि ऋषींनी निर्माण केलेल्या राज्यव्यस्थांचे सहकार्य  मिळेल.गुरुकुलं संपूर्ण भारत वर्षात एक सारखं शिक्षण देणारी,अनेक वैदिक ऋषींच्या सहकार्याने स्थापित करायचे ठरले.तेवढ्यावरच अगस्त थांबले नाही तर, पुढील कार्याचे नियोजन करुन अगदी थोड्या अवधीत पुष्कर तीर्थातील आश्रमाचं रुपांतर मोठ्या गुरुकुलात केले.तिथे कुलपती नेमून ते गंगोत्रीला गेले.तिथल्या रुद्रयाग कुटीच रुपांतर आश्रमशाळेत केलं.सर्व विषयांचे शिक्षण देणार्‍या आचार्यांची नियुक्ती करुन उत्तराधीकारीही नेमला.परत आपल्या काशी आश्रमी येण्यापूर्वी वाटेतील वसिष्ठाश्रमात आपल्या कनिष्ठ बंधूस भेटायला येत असल्याची वार्ता उत्तरे कडील ऋषींना कळल्यामुळे,अत्री,गौतम व भरद्वाज आपल्या शिष्यांसह वसिष्ठ आश्रमात दाखल झाले.

                क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  अगस्त्यऋषी !!!

भाग – २२.

        प्राशन केलेला सागर,कालकेय संहार,गाजवलेला पराक्रम,अविश्रांत केलेली तपश्चर्या,मिळवलेल्या अनेक सिध्दी या सर्वांमुळे अगस्त्यऋषी विषयी पुज्यभाव निर्माण झाल्याने त्यांचे दर्शन घेण्यास सारा आर्यवर्त उत्सुक झाला होता.त्यामुळेच ते वसिष्ठाश्रमात येण्याची कुणकुण लागताच ऋषीं आपल्या शिष्यां सह तातडीने वसिष्ठाश्रमात आले होते. दुसर्‍या  दिवशी आश्रमाच्या सभागृहात सर्व जमल्यावर,अगस्त्यांचे कनिष्ठ बंधू वसिष्ठांनी त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेत सांगायला सुरुवात केली. प्रथम हिमवान प्रदेश आणि नंतर संपूर्ण  आर्यवर्तात अविरत भ्रमण करुन,प्राचिन ऋषींनी स्थापन केली असलेली यज्ञ संस्था खिळखिळी झालेली,यज्ञाचे विपरित अर्थ रुजवलेले त्यांना आढळल्यावर,त्यांनी मानवोध्दारासाठी तपाचरण आरंभून,प्रत्यक्षात चार तपांचं कार्य त्यांनी अविश्रांत खपून दोन तपातच पूर्ण केलं.या काळात असंख्य नरभक्षक जमातीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं.युध्दसंस्थेत बुध्दीनिष्ठ विचार, संस्कृतिहीन लोकांनी सर्वसमवेशक ऋषीय अर्थ समजावून परमेश्वराच्या अस्तितावाची जाणीव करुन दिली. “मारुन खाऊ नकोस,चोरुन खाऊ नकोस  स्वतः पेरुन खा,” हा ऋषीय विचार त्यांच्या मनी रुजवला.या विचारांना एवढी गती दिली की,मारुन,चोरुन खाणारे रानटी लोक शेती करुं लागले. त्यासाठी खान्यायोग्य वनस्पती,धान्य यांवर संशोधन करुन,शेतीला महत्व प्राप्त करुन दिले.संस्कृतिहिनांना एकत्रीत आणण्यासाठी मंदिरांची स्थापना केली.

      शेतीबरोबरच कुटुंबव्यवस्था, सांस्कृतिक विचारधारणेची परंपरा निर्माण होण्यासाठी शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना केली.ते युगप्रवर्तक,तपस्वी, सिध्द आहेतच.तसेच शस्रनिपुणही आहेत.त्याचमुळे कालकेय दानवांचा संहार करुं शकले.वसिष्ठांनी त्यांच्या कार्याबद्दल सांगीतल्यावर अगस्त्यानी मोजक्या शब्दात देव-दानव युध्दाविषयी सांगून,पुढील कार्याची दिशा सांगीतली.

        ज्ञानवृध्द अत्रीऋषी,भरद्वाजऋषी उतारवयातही निरपेक्ष भावनेने ईश्वरीय कार्य करीत आहेत.नर्मदातीरी जमदग्नी ऋषींनी अफाट कार्य केले आहै.गौतम ऋषी दंडकारण्यात जाण्याच्या तयारीत आहेत.आपल्याला या कार्याची व्याप्ती दक्षिण सागरापर्यत वाढवत न्यायचीय!

        नर्मदापरिसर,पश्चिम सागर परिसर संकटमुक्त झाला आहे.शेकडो वर्षाच्या तपांनंतर वायव्य प्रांतापर्यत आर्यांची राज्यमंडळं तयार होऊन, पुरु,जनकादी राजांनी उत्तम राज्यव्यवस्था स्थापन केल्या.पूर्वी आर्यवर्तात पाण्याची कमतरता,म्हणून भगीरंथांनी हिमवान प्रदेशातून गंगेला खाली आणले.पाणी अडवलं म्हणून इंद्रदेवांना वृत्रसुराला मारावं लागलं.ब्रम्हदेवांनी पाणी प्रश्ना वरुन राक्षस कुळाला प्राचिन मेलुहा देशा तील दक्षिणेकडच्या प्रांतामधील सरोवरं, तलाव यांचा सांभाळ करण्याचे अधिकार दिले होते.देवांकडून  “वर”प्राप्त करुन,राक्षस, असुर देवांवरच उलटत होते.सामंज्यस्य टिकवण्यासाठी देव सतत प्रयत्नशील असत.असुरांना लंकाद्वीप,शस्रास्र देवांनी दिले,पण देवांचं दान देवांवरच उलटवत होते.पाताळातल्या असुरांना तंत्रज्ञान, अनेक प्रकारची शस्रे,विद्या देऊन तिथे वसाहत करण्याचा प्रयत्न देवांनी केला. पण असुरही देवांवर उलटले होते.

          आतां आपल्यापुढे सर्वात मोठे आव्हान आहे.जिथे जिथे मानवता स्थापन झाली,तिथे गुरुकुलांची व्यवस्था करणें,दंडशक्ती व सहिष्णूतता या दोन्हीं चा समन्वय साधायला हवा.अशा तर्‍हेने विचार मांडल्यावर,कांही प्रश्नोत्तरे होऊन सभा विसर्जित झाली.

         संध्याकाळचे सर्व कार्यक्रम आटोप ल्यावर,वसिष्ठांच्या कुटीत दोघे भाऊ बोलत बसले.अगस्त्यांनी आपल्या येण्या चे प्रयोजन सांगत म्हणाले,मला भगवान शिवांनी दृष्टांत देऊन,दक्षिणेकडे जायला सांगीतले.तिथे महर्षी विश्वामित्रांचे लक्ष

आहेच.आम्ही सतत संपर्कात असतोच. नंतर बरीच गुढचर्चा झाली.दुसर्‍या दिवशी अगस्त्य आपल्या काशीश्राश्रमात पोहोचले तेव्हा एक धक्कादायच बातमी त्यांची प्रतिक्षा करीत होती.

       संध्याकाळची प्रार्थना,भोजन आटोपल्यावर,सर्वजण सभास्थानी जमा झाल्यावर,अक्षयने काशीनरेशाकडून दूत आल्याची बातमी अगस्त्यांना दिली, रावण नामक राक्षसाने दक्षिण सागरातून येऊन,भारतवर्षावर आक्रमण केले. किष्किंध राज्याचा अधिपती वालीने रावणाशी कडवी झुंज दिली.अखेर दोघां मधे संधी झाली.भारतावर आक्रमण करण्यापूर्वी रावणाने देवांचा धनपती कुबेरला हाकलून,त्या नगरीवर रावणाने कब्जा केला.कुबेरचं पुष्पक विमानही हिरावून घेतले.म्हणजे आतां संघर्ष अटळ आहे.त्यासाठी आर्यवर्तातील संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी,माझ्यासारख्या अनेक ऋषी,तपस्वींना विंध्य ओलांडून दक्षिणेकडे जावेच लागेल.आपले आवडते आचार्य अगस्त्यऋषी आश्रम सोडून जाणार या विचारानेच सारे आश्रमीय कासाविस झालेत,

          क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

          दि.  १२-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – २३.

          अगस्त्यऋषींनी आश्रमांची सारी व्यवस्था लावून,व कुलपतीसह सर्व पदाधिकार्‍यांना त्यांची कामे सोपवून   निघाले ते परत न येण्यासाठीच!आचार्य कुटीकडे जातांना अक्षयला म्हणाले, अक्षय,भोजनोत्तर प्रगाथा व शंख ला घेऊन ये,महत्वाचे बोलायचेय!रात्रीच्या निरव शांततेत आचार्यांच्या कुटीत तिघां सोबत आचार्यांचे विचारमंथन सुरु झाले.

अक्षय व प्रगाथाने इथला आश्रम व आर्य वर्तात स्थापलेल्या आश्रमांचा अधून मधून आढावा घेणे,प्रत्येक पदाधिकारी आपले कार्य नीट करतात की नाही यावर सुभद्रामातेच्या मार्गदर्शनाखाली बारीक लक्ष ठेवायचे.शंख मात्र तो गृहस्थाश्रमात प्रवेश करेपर्यत माझ्यासोबत राहिल.

        भावनावश झालेल्या तिन्ही शिष्यां च्या पाठीवर प्रेमाने थोपटत म्हणाले, मुलांनो!असुरी शक्ती दिवसेंदिवस प्रबळ होत चालली.तीला वेळीच आवरले नाही तर,आजपर्यत उभारलेले कार्य मातीमोल होईल.ऋषींनी प्रचंड तप करुन स्थापले ली संस्कृती लयाला जाईल.भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ही भावना ठेवून कर्तव्यकर्म केले की,ईश्वर शक्तीची अनुभूती येते.

          अयोध्येमधे वसिष्ठऋषी राजगुरु म्हणून कार्यरत आहेत.वृध्द विश्वामित्रही नव्या जोमाने कार्य करीत आहेत.मलाही विंध्य नमवून दंडकारण्यात जाऊन लंकेश्वर रावणाचा निःपात करण्याच्या कार्याला सहाय्यभूत व्हायचेय.नेहमी प्रमाणे शंखाने प्रश्न उपस्थित केलाच. आचार्य!हा रावण नेमका कोण?आणि येवढा बलाढ्य कसा झाला?तिघांचीही जिज्ञासा शमवत, आचार्यांनी सांगायला सुरुवात केली…फार पूर्वी एका प्रजापती चा पुत्र,पुलस्त्य नावाचा ब्रम्हर्षी देवराज्या जवळ राहत होता.गुरुगृही राहून कठोर तपसाधना करुन ब्रम्हर्षी पदाला पोहचले “ब्रम्हदेव” पद देवराज्यात सर्वश्रेष्ठ मानलं जात.हे ब्रम्हदेव अत्यंत धार्मिक,सर्वज्ञ, शीलवान असून त्यांच्या शब्दाला व पदा ला देवराज्यात सर्वाधिक मान असे. त्यांचा शब्द अंतिम ठरत असे.ज्ञानाच्या बाबतीत पुलस्त्यऋषी ब्रम्हदेवाच्या बरोबरीचे होते.पुढे अधिक वेदाध्याय आणि तपश्चर्या करण्यासाठी ते राजश्री तृणबिंदूच्या आश्रमात रहायला गेले. एकदा तृणबिंदूची कन्या,कांही ऋषी कन्या व अप्सरा क्रीडा करत असल्यामुळे आश्रमात असलेल्या पुलस्त्यांनां उपद्रव होऊ लागला,तेव्हा पुलस्त्य म्हणाले, या पुढे ज्या कन्येमुळे माझ्या कार्यात विघ्न येईल तीला गर्भधारणा होईल.इतर कन्या घाबरुन निघून गेल्यात,पण तृणबिंदूच्या कन्येने न ऐकतां त्यांच्या कार्यात विघ्न आणल्याबरोबर ती गर्भवती झाली.यथा योग्यवेळी विश्रवा नावाचा पुत्र झाला. हा विश्रवा आपल्या पित्याप्रमाणेच गुणसंपन्न असल्यामुळे,अल्पावधीतच “मुनी” म्हणून विख्यात झाले.महर्षी  भरद्वाजांनी देववर्णीनी नांवाच्या आपल्या कन्येशी विश्रवांचा विवाह लावून दिला. देववर्णिला विश्रवापासून वैश्रव नावाचा पुत्र झाला.वैश्रवनेही पैतृक परंपरेनुसार घोर तपश्चर्या केली.केवळ वायूभक्षण व जलपान करुन यौगिक क्रीया करूं लागला.तप करुन त्यांनी एकविचारी मानवसंघ निर्माण केला.त्यांच्या तपाने ब्रम्हदेव संतुष्ट होऊन,यमदेव,इंद्रदेव, व वरुणदेव या त्रिदेवांकडे असलेलं देव राज्यातील सर्वात मोठ पद वैश्रवणांना दिलं,तसच पुष्पक विमानही दिलं.पण भूमी दिली नसल्याची खंत त्यांनी आपले पिता विश्रवांजवळ बोलून दाखवल्यावर ते म्हणाले,फार पूर्वीच देवांनी दक्षिण सागरातील त्रिकुट पर्वतावर इंद्राच वास्तव्य होतं,म्हणून विश्वकर्म्यान तिथे सुंदर नगरी निर्माण केली होती.ती आपल्याला पूर्वीच मिळाली आहे,तिथे जाऊन वास्तव्य कर!वैश्रवमुनी लंकेत जाऊन समाधानाने राहू लागले.पूर्वी इंद्राचं तिथे वास्तव्य होतं त्यावेळी एलाचार्य नांवाचे तपस्वीऋषी तिथे कार्य रत होते.त्यांच्याच नावावरुन त्या नगरी ला “एल” नाव पडलं.कालांतराने ‘एल’ वरुन एलंक आणि पुढे लंका असा अपभ्रंश झाला.त्याच लंकेत वैश्रव राहू लागले.मधून मधून पुष्पक विमानाने देवराज्यात आपल्या पित्याला भेटायला जात.

        त्याचवेळी राक्षसकुलात जन्मलेल्या सुकेश नावाच्या धार्मिक राजाला देववती नावांच्या पत्नीपासून माल्यवान,माली आणि सुमाली असे तीन पुत्र झाले.राक्षस  कुळात जन्मलेले हे तीन पुत्र देव आणि सामान्य जनांना त्रास देऊ लागले.या तीन पुत्रांनी राक्षसकुळाची परंपरा खंडीत केली.त्यांचे पूर्वज धार्मिक होते.ब्रम्हपद, लोकपाल पद त्यांना सन्मानाने प्राप्त झाली होती.ती परंपरा तोडून देवांविरुध्द कारवाया करायला सुरुवात केली.माली व सुमाली देवांना अतिशय त्रास देऊ लागले.त्यांचं वास्तव्य केमेत देशाच्या खाली असलेल्या देशात होतं.त्यावेळी ‘सुर्य’ देशात चहुबाजुंनी युध्दसदृष्य स्थिती होती.त्यामुळे या नव्या आव्हाना चा प्रतिकार करण्यासाठी देवांजवळ वेळ नसल्यामुळे समापोचाराने घ्यावे म्हणून चार ब्रम्हदेव, त्या तिघांची भेट घेऊन म्हणाले,तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, आम्हीही तुमच्या आड येणार नाही.

                  क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

            दि.  १२-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – २४.

         अशाप्रकारे देव-राक्षसांमधे अनाक्रमाचा तह झाला.देवांची पडती बाजू व नाजुक स्थिती ओळखून राक्षस आणखी निर्भय होऊन देवांना पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली.देवांकडून वारेमाप भौतिक सुखाची अपेक्षा करुं लागले.एक दिवस माली व सुमाली देवांचा स्थापत्य विशारद (इंजिनिअर) विश्वकर्माकडे जाऊन म्हणाले,मेरुपर्वत,हिमवान प्रदेश किंवा मंदर पर्वताजवळ इंद्राच्या अमरावतीप्रमाणे मोठी व सुंदर वास्तु उभारुन दिली तर आम्ही देवांना त्रास देणार नाही.

         विश्वकर्मा त्यांना म्हणाला,दक्षिण सागरकिनार्‍यावर अतिभव्य त्रिकुट पर्वतावर मी इंद्रदेवांसाठी सुंदर वास्तु उभारली होती.त्या लंका नगरीची तटबंदी व कमानी सुवर्णाच्या आहेत,तिथे वास्तव्य करुं शकतां….तिथे वैश्रव राहत  होता,पण तो देवराज्यात जात येत असल्यामुळे या तिघांना ती नगरी आयती च कायमस्वरुपी मिळाली होती.जेव्हा अशा लोकांना आयत सर्व मिळते तेव्हा ते भोगवादी बनतात.पूर्वजांच्या कमाईवर मौजमजा करणं एवढाच उद्योग उरतो. सात्विक,सज्जनांना क्लेश देण्यात त्यांना भूषण वाटत.असे लोक सुखाचे नवनवीन मार्ग शोधून समाजाला वेठीस धरुन अनन्वित अत्याचार करतात.

        देवांकडून सर्भ भौतिक सुविधा घेऊन हे कृत्यघ्न राक्षस देवांवरच उलटले देवांची राज्यपध्दती उलथवून त्यांचं राज्य बळकावलं.निर्वासित झालेल्या देवांना उरुवासी विष्णूने आधार दिला.पुढे देवांनी सर्व शक्तीनिशी राक्षसांवर आक्रमण करुन त्यांना पृथ्वीखाली पाताळात घालवून दिले.लंका पुन्हा ओस पडली.एकदा सुमालीने,धनपती कुबेरला विमातून जातांना बघीतलं आणि मनी कुबेरासारखे गुणसंपन्न पुत्र व्हावे अशी इच्छा निर्माण झाल्याने,पुत्रप्राप्तीसाठी, आपली कन्या कैकसीला विश्रवाऋषी कडे पाठवले.कालांतराने कैकसीला रावण,कुंभकर्ण,विभिषण आणि कन्या शुर्पणखा विश्रावाऋषी पासून प्राप्त झाले

            अगस्त्य म्हणाले,तुम्हाला पुृर्व इतिहास समजल्याशिवाय रावण कोण? त्याच्या महात्वाकांक्षा काय हे समजले नसते.

           या चार मुलांपैकी विभीषण हा एकटाच धर्मात्मा होता.बाकीचे दोघे उन्मत्त राक्षस होते.शुर्पणाखाही कमी नव्हती.यांनी कीतीतरी ऋषी,तपस्वींना ठार मारले तरी कुंभकर्णाला समाधान नव्हते.रावणाच्या महत्वाकांक्षा तर अमर्याद होत्या.

          आपला सावत्रभाऊ वैश्रवण म्हणजेच कुबेर,याच्यापेक्षा आपण श्रेष्ठ,  या भावनेने प्रेरित होऊन,रावणाने गोकर्ण आश्रमात जाऊन वेदाभ्यास केला.तप साधना करुन अनेक सिध्दी प्राप्त केल्या. रावणाच्या उग्र तपामुळे राक्षसबळ वाढते बघून देव चिंतित झाले.एके दिवशी रावणाला भेटायला ब्रम्हदेव मालीदेशात गेले.दोन्ही पक्षात वाटाघाटी होऊन,सुपर्ण नाग,यक्ष,दैत्य,दानव, राक्षस आणि देव देवतां कडून रावणाचा वध होणार नाही असे ठरले.याप्रमाणे ब्रम्हदेवांशी करार करुन “वर” घेतल्यावर रावण पुन्हा पाताळात गेला.त्याचवेळी सुमाली रावणाला भेटला व उरुराज विष्णूविषयी रावणाचं मन कलूषित करत म्हणाला, आपल्याला देवांनी लंकानगरी वास्तव्या साठी दिली होती.पण सध्या तिथे तुझा सावत्रभाऊ वैश्रवण म्हणजेच धनपती कुबेर राहतो.म्हणजे लंकानगरी आपली राक्षसांचीच आहे तर?

         रावणाने तात्काळ प्रहस्ताला कुबेर कडे पाठवून लंकानगरी राक्षसांना परत करण्याविषयी सूचना केली.कुबेराने संघर्ष टाळण्यासाठी प्रचंड धनासहित लंकेचं राज्य रावणाला देऊन,स्वतः कैलासपर्वत परिसरात रहायला गेला. भविष्यात कुबेर लंका परत मागेल या भितीने,थेट कुबेर,यक्ष,किन्नरांवर आक्रमण करुन कुबेराचा पराभव केला व पुष्पक विमान पळवून आणलं.त्याच वेळी महादेवांना आव्हान करुन कैलास पर्वत कंपित केला.महादेवांकडून ‘चंद्रहास’ हे दिव्य शस्र मिळवलं.इक्ष्वाकू वंशीय अनरण्य राजालाही पराभूत करुन इक्ष्वाकूंचं वैर ओढवून घेतलं.

         युध्दात आपल्याला सहज विजय मिळेल या भावनेने, प्रगत देवांना पराभूत करुन संपूर्ण पृथ्वीचा अधिपती होण्याची तो स्वप्न पाहू लागला.आपल्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी त्यानं देवलोकांवर आक्रमण केलं.रावणाच्या राक्षस शक्तीपुढे यमदेव, वरुणदेव,मरुतदेव,आणि इंद्रालाही नमावं लागलं.पाताळातील बळीराजासह पृथ्वी वरचे जवळ जवळ सर्वच देव,दानव, असूर रावणापुढे नमले, आणि रावण ‘एळ’ आणि ‘मू’  या दोन राज्याचा स्वामी झाला.’एळ’ चा अर्थ सप्त…सात आणि ‘मू’ चा अर्थ त्रय म्हणजे तीन असा होतो. म्हणजे संपूर्ण एळ अर्थात लंका आणि  दक्षिण भारतातील तीन राज्य रावणाच्या अधिपत्याखाली आली.प्रत्येक राज्यातून त्याला दहा मुकुट प्रदान करण्यांत आल्या मुळे तो ‘दशानन’ बनला.अशाप्रकारे रावण एळ म्हणजेच लंकेतल्या सप्त लोकांचा आणि सप्तसागराचा अधिपती बनला.

              क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

        दि.  १३-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग -२५.

          आचार्य अगस्त्य पुढे सांगु लागले, रावण हा अजिंक्य तर आहेच,पण महा पराक्रमी वैज्ञानिक,गणित,आयुर्वेद, शल्य चिकित्सक, तसेच खगोलशास्र,संगीत कला,ज्योतिष्यशास्र अशा अनेक कलां मधे त्याला प्राविण्य प्राप्त आहे.त्याने   अर्कप्रकाशम्,कुमारतंत्र,नाडीप्रकाश, उड्डीतंत्र इत्यादी ग्रंथही लिहिलेत.युध्दा तील डावपेच आणि व्यूहरचना तो भूमीतीच्या आधारे करतो.जेवढा तेजस्वी तेवढाच निष्ठूर आहे.पृथ्वीपती होण्या साठी पाताळातील भोगवती नगरीतील वासुकीचा पराभव केला.तक्षकाची प्रिय भार्या पळवून आणली.परस्रीयांंचं हरण करणं त्याचा आवडता छंद!अमाप शक्ती व मायावी अस्रे त्याच्याकडे आहेत.

         दैवी संस्कृती स्थापतात म्हणून ऋषींनी अतिकष्टानं उभारलेल्या यज्ञ शाळांचा तो विनाश करत आहे.ऋषी कुळात जन्मूनही तो ब्रम्हघातकी,वैदिक धर्माचा उच्छेद करणारा,प्राणीमात्रांनाही आक्रोश करायला लावणारा निर्दय पुरुष आहे.त्याच्याच सारखा महाबलाढ्य व क्रूर कुंभकर्णही आहे.मारीच,शुक,सारण, सहोदर,प्रहस्त असे एकापेक्षा एक महा बलाढ्य सेनानी त्याच्याकडे आहेत.कुबेर,यम,वरुण यांचा त्यानं पराभव केला.तसेच दुष्यंत,सुरथ,गाधी, गय,पुरुखा या आर्यराजांचाही त्याने पराभव केला पण कार्तविर्य सहस्रार्जुन आणि वाली या दोन राजांना मात्र नमवू शकला नाही.मग त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध बांधले.निवातकवच दानवांंशीही त्याचे सख्य आहे.तो भारतवर्षासाठी मात्र अतिशय धोक्याचा आहे.

           मग आता काय करायच आचार्य भगभद्कार्याची व्याप्ती आणि वेग वाढवणं एवढच…भोगी लोकांऐवजी ऋषीविचार आणि सात्विक जीवनपध्दती व्यक्तीव्यक्तीमधे भिनवून सात्विक लोकांचा एक तृप्त,प्रशांत समाज निर्माण करण्यासाठीच पुष्कळ तप करावं लागणार आहे.

         समापन करत आचार्य म्हणाले,हे महाकठीण कार्य करण्यासाठी,काटेरी मार्गावरुन विंध्याचल,दंडकारण्यातला खडतरा मार्ग मला पादाक्रांत करायचा आहे शंख!शिव याचा अर्थ शिवतत्व!एक चिरंतर,सर्व व्यापक,तरीही अव्यक्त असं तत्व.या संपूर्ण विश्वाला ते व्यापून आहे. सर्जन कार्यापासून संंहराकापर्यत कोणते ही गुणविशेष त्या तत्वाला चिकटवले जातात.तशी प्रतिमा तयार होते.आणि विभिन्न देवदेवता आकाराला येऊन त्यांची कार्य ठरतात.शिवतत्व ज्ञानस्वरुप आहे.मी त्याच ज्ञानस्वरुप तत्वाचा उपासक आहे.रावणाची शिवशक्तीही अद्भूत आहे.लंकेच्या पूर्वेला तिरुकोण मलाई इथे त्याने एक  कोणेश्वर नामक भव्य शिवमंदिर बांधलं.प्रतिदिन शिवपूजे साठी विमानातून तो तिथे जातो.

        ही संपूर्ण सृष्टी पंचमहाभुतांनी व्याप्त आहे.सृष्टीतील प्रत्येक घटक आपापलं कार्य व्यवस्थित पाडत असतो. उत्पत्ती,स्थिती आणि लय होत असतांना ही कोणत्याही घटकांत खंड पडत नाही. एकमेकांमधे सहचर्य ठेवून परस्परांना पुष्टी देत राहतो.थोडक्यात या सृष्टीत निसर्गाकडून जी कार्ये सहज होतात त्या प्रत्येक कार्याला देवाची उपमा दिली गेली.अग्नी,वरुण,मरुत,इंद्र वगैरे नामाभिधानं लाभली.ब्रम्हदेवांनी सृष्टीची रचना करतांना प्रत्येक पदभाराला तशीच नांवं दिली..म्हणजे इंद्र,मरुत,अग्नी ही व्यक्तीगत नांव नसून पद आहेत तर? ‘दिव’ या संस्कृत धातूपासून ‘देव’ हा शब्द आला.देव म्हणजे साक्षात तेज!प्रत्येक पदसिध्द व्यक्तीनं आपलं कार्य तेजःपुंज, प्रकाशमान करावं करावं या हेतूने विविध पदांचा अधिपती देव ब्रम्हदेवांनी आखून दिलेल्या नियमानुसार आपापला पदभार सांभाळतो.इंद्रदेवांचा सर्वांवर अंकुश असतो.स्वयंशासन प्रणालिवर अधिक भर असतो.

      अवाढव्य शरीरयष्टी आणि प्रचंड शक्ति हे राक्षसांचे निसर्गदत्त गुण.समाज व्यवस्था करतांना नद्या,सरोवर,जलस्रोत्र यांच्या संरक्षणाचं दायित्व राक्षसांवर सोपवल.रक्षण करते म्हणून रक्षस “राक्षस” बनले.सर्व प्रकारचे शास्र ज्यांना अवगत ते ऋषी.अशाप्रकारे गुणांनुसार कार्यवाटप करुन ब्रम्हदेवांनी एक स्वावलंबी सयंशासीत व्यवस्था बनवली. पण जेव्हा व्यक्तीगत महत्वाकांक्षा आणि अविवेकी विद्रोह व्यक्तीच्या मनात निर्माण होतो तेव्हा ती व्यक्ती समाजाचे मन कलुषित करुन विषवल्ली रुजवते. रावण हे असचं विषवृक्षाचं विषारी फळ आहे.वेळीच नायनाट करण्यासाठी दोन शक्तींची नितांत आवश्यकता आहे.एक यज्ञीय व दुसरी दंडशक्ती.सध्या आपण यज्ञिय शक्तीचा वापर करणार आहोत. ॐ कार म्हणून चर्चेला विराम दिला. प्रणाम करुन तिन्ही शिष्य निघून गेल्या वर आचार्य ध्यानावस्थेत गेले.जीव-शिव एकरुप झाले.

              क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                     

महर्षीं अगस्त्यऋषी सर्व भाग पहा

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading