महर्षी अगस्त्यऋषी संपूर्ण चरित्र भाग ४, (१६ ते २०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

Maharshi Agastya Rishi All Character

दुसर्‍या दिवशी रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर अगस्त्यांनी अक्षय व शंखला बोलावून विचारले,तुम्ही दोघे इथे आला होता ना?त्यामुळे तुम्हाला दिव्यत्वाचे अवचित दर्शन घडलं.मी शिव रुप झालो होतो तेव्हा तुम्ही इथं आल्याचे ज्ञान झाले.अक्षय म्हणाला,आचार्य!आपण सिध्द आहात हे मी मागेच,जाणले होते,जेव्हा आपण पूर्वेकडील अरण्यात यज्ञ केला होता व घायाळ झालेल्या रानटी युवकांना राहुटीत नेऊन त्वरीत बरं केलं त्यावेळी ……….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

Maharishi Agastya Rishi! !

महर्षी अगस्त्य ऋषी ! !

!!!  अगस्त्यऋषी !!!

भाग  – १६.

         दुसर्‍या दिवशी रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर अगस्त्यांनी अक्षय व शंखला बोलावून विचारले,तुम्ही दोघे इथे आला होता ना?त्यामुळे तुम्हाला दिव्यत्वाचे अवचित दर्शन घडलं.मी शिव रुप झालो होतो तेव्हा तुम्ही इथं आल्याचे ज्ञान झाले.अक्षय म्हणाला,आचार्य!आपण सिध्द आहात हे मी मागेच,जाणले होते,जेव्हा आपण पूर्वेकडील अरण्यात यज्ञ केला होता व घायाळ झालेल्या रानटी युवकांना राहुटीत नेऊन त्वरीत बरं केलं त्यावेळी आणि काल रात्री तर आम्हाला साक्षात दिव्य अनुभव आला.

        आचार्य!आपल्याला अडचण नसेल तर,ह्या सिध्दी आपल्याला कश्या प्राप्त झाल्या हे गूढ जाणून घ्यायला उत्सुक आहोत.सांगतो,पण इतरांशी या विषयी मुळीच बोलायचे नाही.आम्ही वचन देतो. मग आचार्यांनी सिध्दीसंदर्भातील पूर्व पिठीका थोडक्यात विशद करुन सांगू लागले…पूर्वी वसिष्ठाश्रम सोडल्यावर, वैदिक संस्कृती प्रस्थापनेचं कार्य करीत जेव्हा हिमवानाकडे निघालो,तेव्हा आपल्या तप साधनेला तपाची जोड देण्याची नितांत आवश्यकता वाटू लागली.तपा शिवाय केलेली साधना फलद्रुप होऊ शकत नाही.दोन्हीचा मेळ साधावाच लागतो,तेच निष्कामकर्म योगाचं रहस्य आहे.साधनेसाठी गंगोत्रीला जाऊन तिथे कुटी उभारली.मिळतील ती कंदमुळे, फलाहार करुन एकभुक्त राहु लागलो. थंडी वार्‍यापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने अनेक यौगिक क्रीया तिथल्या योग्याकडून आत्मसात केल्या.उरलेला वेळ ध्यानधारणेत व्यतीत करुं  लागलो. साधनाची गति इतरांपेक्षा अधिक असल्याने अल्पकाळातच फल प्राप्ती झाली.भगवान महादेव प्रसन्न होऊन अनेक सिध्दी दिल्यात.तसेच अलौकिक विद्या आणि गूढ तंत्रही मिळाले.अंतिमा, लाघिमा,गरिमा,प्राकाम्य अशा अनेक सिध्दी अनायसे मिळाल्यात.सिध्दीपासून जसे फायदे आहेत,तसे तोटेही आहेत. सिध्दी जर स्वार्थासाठी वापरल्या तर सिध्दीतील धारणाशक्ती कमी होते किंवा सोडून जातात आणि मग सिध्द हा नावा पुरताच राहतो.

        शंख म्हणाला,आचार्य!या विश्वात अनेक अतर्क्य गोष्टी आहेत,पण आम्हाला केवळ सिध्दीचं स्वरुप जाणण्याची इच्छा आहे.ऐका तर मग..

तुम्हाला हे चमत्कारिक किंवा अतिरंजित कथेप्रमाणे वाटेल,पण सत्य आहे…सिध्द प्राप्त व्यक्ती केवळ हस्तस्पर्शाने एखाद्या रोग्याला बरं करुं शकतो किंबहुना सिध्दाच्या केवळ सानिध्याने किंवा दृष्टी क्षेपानंही एखाद्याचा विकास होऊ शकतो त्याच्या नुसत्या स्पर्शाने जीवनांत क्रांती म्हणजेच विचारात परिवर्तन घडून येते. सिध्द व्यक्ती पाण्यावरुन चालू शकतो. आकाशगमन करुं शकतो.एकाचवेळी दोन ठीकाणी उपस्थित राहू शकतो.दूरचं जाणू,पाहू शकतो शकतो.दीर्घ काळ जिवंत राहू शकतो.जसा एखादा जादूगार हालचलाखी आणि नजरबंदी करुन प्रेक्षकांना थक्क करतो तसं या सिध्दीचं नसते.या सिध्दीमागे एक शास्र,एक विद्या आहे.

       प्रत्येक शरीरांतर्भूत ही विद्या प्राप्त करण्याची व्यक्त अव्यक्त साधनं देवानं दिली आहेत,एवढच नाही तर नवीन जन्मणार्‍या जीवामधेनेही या यंत्रनेची अव्यक्त अशी व्यवस्था केली आहे.पण जसा काळ उलटला तसा व्यक्तीला या अंगभूत शक्तीचा विसर पडत गेला.दृष्य विश्वात मनुष्य इतका रमला की,स्वतःमधे असलेल्या या अव्यक्त सिध्दीचा विसर पडला आणि बाह्य भोगाकडे आकृष्ट झाला.आणि तिथेच व्यक्तीची फसगत होते.आचार्य! ही सिध्दी जाणण्यासाठी, करण्यासाठी कश्याक्रारची साधना करावी लागते?प्रगाथा,सिध्दी मिळवण्याकरितां साधनेची मुळीच आवश्यकता नाही.तुम्ही जे यज्ञेय कार्य करतांहात तेच अध्यात्म आहे.साधना ही परमेश्वर ओळखण्या साठी करायची असते.पण तुम्ही सिध्द होण्यापेक्षा तपस्वी व्हावं असं मला वाटते ज्यांच्यापर्यत सांस्कतिक विचार पोहोचले नाही,जे अत्यंत हीन,प्राणशशून्य जीवन जगत आहे,त्यांच्या पर्यत तुम्हाला ऋषी विचार नेणे,हेच महान तप आहे.सिध्दी आपोआप तुमच्याकडे चालून येईल.

      त्यांना सिध्दीची चुणूक दाखवण्या साठी अगस्त्यांनी डोळे मिटले.दुसर्‍याच क्षणी सांगू लागले…देवसेना निघाली. काशी राजाचं सैन्य,पुरु व अयोध्येची सेनापथकं निघाली.ज्या अश्रमाकडे मी स्नातक पाठवले होते,ते पोहोचले. मी दिलेला गुप्त संदेश घेऊन असंख्य ब्राम्हण,तपस्वी पश्चिम सागराकडे निघाले आणि कालकेय दानव आपल्या मोठ्या आरमारासह सागरात एकत्रीत झाले आहेत.त्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपण प्रस्थान करणार आहोत.तिकडे जाण्यासाठी उद्या काशीराजाचा वेगवान रथ येत आहे.

              क्रमशः

संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – १७.

         भारतवर्षाला व देवराज्याला त्रास दायक ठरलेल्या कालकेय दानवांचा संपूर्ण नाश करण्यासाठी आदल्या दिवशीच वेगवान रथ,शामकर्ण रथ, वायव्येकडून आणलेले महाकाय वृषभ, उंट इत्यादी अनेक वाहनासह पश्चिम सागरकिनार्‍यावर सेना जमा झाली.पुरु, काशी,अयोध्या,मिथिला या राज्यांचेही सैन्य देवसेनेला येऊन मिळाले.या निर्णायक युध्दासाठी देवांनी कुठल्याच शस्र,अस्रांची उणीव ठेवली नव्हती.शस्रां मधे धर्मचक्र,कालचक्र,विष्णूचक्र आणि अत्यंत उग्र असं इंद्रचक्र होतं.विशाल ढालींसह धनुष्यबाण खड्गं,भाले,मोदकी

शिखरी नामक उज्वल गदा अशी विविध शस्रे होती.अस्रांमधे…वज्रास्र,अग्नेयास्र, वायव्यास्र,हयाशिरोस्र,क्रौंचास्र,गांधर्वास्र, पैनाकास्र,नारायणास्र,शैवास्र,शूलवत् अस्र,ऐषिकास्र,ब्रम्हशिरोस्र,अशा विविध अस्रांनी  सज्ज होऊन देवसेना निर्णायक युध्दात उतरली होती.संहाराचे कमी अधिक परिणाम करणारे प्रस्वापन, प्रशमन,सौम्य, वर्षण,शोषण,संतापन, विलापन असे दुर्मिळ अस्रेही देवांनी सज्ज ठेवले होते.

       एवढी प्रचंड लढाऊ साधनं असूनही देवांना कालकेय दानवांचा संपूर्ण निःपात करणे आतांपर्यंत जमले नव्हते.कारण कालकेय दानवाने प्रलोभन आणि दहशत शिवाय सागरकिनार्‍या वरच्या कांही फुटीर स्थानकांच्या सहाय्याने सागरात आपलं आरमार उभं केलं होतं. आणि प्रभुत्व मिळवलं होतं.संकट आलं की,ते आरमारासह समुद्रात दूरवर निघून जात.दुसरं म्हणजे या दानवांनी सागर किनार्‍यावरच्या कांही लोकांना आपलसं करुन त्यांच्यात मिसळून जात.त्यामुळे शस्र चालवणे अशक्य होते.आर्यवर्तातील कोणत्याही राजाकडे स्वतःचं आरमार नसल्यामुळे खोल समुद्रात जाऊन युध्द करणे आजपर्यत जमले नव्हते.त्याचमुळे कालकेयाचं फावलं होतं.गेल्या दोन तीन तपापासून कालकेय दानवांनी राजांपुढे व देवांपुढे आव्हान उभी करत.सागर प्रदेशात  प्रचंड उच्छाद मांडला होता.ते इतके क्रूर नराधम होते की,तपस्वी,ऋषी,ब्राम्हण मुनींना जीवे मारुन खात असे.या प्रलंबित प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावायचे ठरविले तेव्हा ते उरु वासी विष्णूदेवांकडे सहाय्यार्थ गेले होते.

       विष्णूंनी अग्निदेवाच्या कार्याबद्दल इंद्राला विचारले असतां,अभिमानाने इंद्र म्हणाले,देवा!माझ्या हेरयंत्रनेने दिलेल्या माहितीनूसार वसिष्ठ आणि मांदार्य (अगस्त्य) यांनी आर्यवर्तात फार मोठ मोठे कार्य केलेत.मांदार्यांनी अनेक अरण्यामधे यज्ञसंस्था नेऊन मानवता आणि कुटुंब व्यवस्था प्रस्थापित केली. आर्यवर्तातील राजांशी संपर्क साधून त्यांच्या सहाय्याने संस्कृतीचा प्रसार केला त्यावर विष्णू हसून म्हणाले,देवराज! तुमच्या गुप्तहेर यंत्रनेपेक्षा माझी अधिक सक्षम दिसतेय.इंद्रदेव, या ऋषींच्या कार्याची व्याप्ती फार मोठी आहे.मला प्राप्त माहितीनुसार मांदार्याचं कार्य आर्य  वर्तातील काशी,रुद्रप्रयाग किंवा सभोवल तालच्या अरण्यापुरतच सिमित नसुन दीपाने दिप प्रज्वलीत करत जावं त्या प्रमाणे त्यांच कार्य पश्चिम सागरापर्यंत पसरलेलं आहे.सागरतटा पर्यंतच्या प्रत्येक आश्रमाची सुनियंत्रित घडी बसवून तिथे आचार विचारात एकसुत्रता आणली आहे.सततच्या निरपेक्ष संपर्कातून तिथल्या व्यक्ती व्यक्तीच्या अंतकरणातले दीप प्रज्वलीत केले आहे.

परस्परांमधे भावपूर्ण संबंध निर्माण करुन पश्चिमसागरतटापर्यंत एकविचारी मानवसंघ अस्तित्वात आणला.यज्ञसंस्थे द्वारा सहस्रो लोकांना ऋषीय कार्याशी जोडले आहे.ते स्वतः जनसमुदयात जाऊन प्रेमभावनेनं विकासाचा मार्ग दाखवला.भगवान शिवांकडून अनेक अतर्क्य सिध्दीही मिळवल्यात.

          अनेक ऋषींच्या सहाय्याने त्यांनी पश्चिम सागरतटा पर्यंत असलेल्या संस्कृतहीन मानसांना सुस्ंकृत करुन त्यांची जीवनशैली पार बदलवून टाकली. लक्षावधीच्या सुसंस्कृत मानवसंघ मर्यादां ना प्रतिपरमेश्वर मानतात.त्यांच्या एका शब्दावर लोक वाटेल ते दिव्य करायला तयार आहेत.त्यांच्या या विशाल कार्या मुळेच कालकेय दानव बिथरुन संस्कृति प्रस्थापकावर चढाई करुन त्यांना मारतात,खातात.

           विष्णूदेवांनी निक्षून इंद्राला सांगीतले,कालकेय दानव प्रभावित पश्चिम सागर नमवायचा असेल तर, तुम्हाला मर्यादांच्या सहाय्याशिवाय गत्यंतर नाही.दानवरुपी सागराला आटवण्याची शक्ती या त्रिखंडात केवळ मांदार्यातच आहे.तातडीने काशीराष्र्टात येऊन तिथे मांदार्याना भेटीस बोलावले. देवसेनेला सहाय्य करण्याचे आश्वासन देऊन,मांदार्य त्या निर्णायक युध्दाच्या नियोजनात सहभागी झाले.देवसेना प्रचंड शस्रअस्रासह येत असल्याचे कालकेयांना समजल्यामुळे तो खोल सागरांत जाऊन निश्चिंत झाले.त्यांना माहित होते विस्थापित झालेल्या देवसेने जवळ  तेवढे आरमार नाहीय!

                 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

           दि. ११-११-२०२१.

!!!  अगस्तऋषी  !!!

भाग – १८.

‌      देवांना सूर्यदेशातून निघावे लागल्या मुळे संपत्तीचा ओघ संपला होता.भारत वर्षात येऊन कालकेय दानवांविरुध्द एवढ्या मोठ्या युध्दाची सिध्दता करण्या साठी संपत्तीची पडलेली उणीव देवाचा धनपती कुबेरांचे सहाय्य मिळाल्यामुळे शक्य झाले.त्याबदल्यात देवाधिपती इंद्राने दक्षिण सागरातील लंका द्वीप कुबेराला दिले.सगळे राजे,कुबेर,ऋषी व मांदार्य या सर्वांच्या सहकार्याने इंद्रांनी देवसेनेसह युध्दाची सज्जता केली. मंदार्यांना समरयज्ञाचं अध्वर्यू बनविले. मांदार्य सागरकिनारी पोहतांच,सहस्रावधी सागरवासीयांनी त्याच्या नावाचा जयघोष केलेला हा           

अनोखा अनुभव पाहून इंद्रांना अगदी भरुन आले.हात जोडून म्हणाले,आम्ही सर्व देव आपणांपुढे नतमस्तक आहोत. नाही…नाही..अजुनही आपण माझ्या साठी देवराजच आहात.तेवढ्यात कांही तरुण येऊन म्हणाले,आपल्या सूचने नुसार सगळी व्यवस्था झाली.आपले आचमन झाले की….

       सागरीजनांशी मांदार्यांचं असलेलं भावनिक नातं बघून इंद्र हरखून गेले. नंतर सारी देवसेना,राजसेना सागर किनारी जमा झालीत.आणलेली शस्रात्रे उतरवण्यात आली.उत्साहवर्धक पेय दिल्या गेले.विविध प्रकारची चिलखतं, बादूरक्षकं आणि शिरस्राणं सैनिकांनी अंगावर चढवली.असंख्य यांत्रिक होड्या, सर्व प्रकारची शस्रं विशाल नौकेत ठेवून समुद्रात तयारीत उभ्या होत्या.आचमन विधीसाठी इंद्रासह प्रमुख देव प्रतिक्षेत उभे होते.अक्षयने सिध्दता करुन ठेवलेल्या चौरंगावर बसलेल्या मांदार्या जवळ जाऊन इंद्र मोठ्या विनयाने हात जोडून म्हणाले,ऋषीवर! सर्व सिध्दता झाली आहे.सेना सज्ज आहे.

        मांदार्यांनी संपूर्ण सागरावर दृष्टी फिरवली आणि अक्षयने दिलेल्या झारीतून पहिलं आचमन घेतल्याबरोबर चमकून अक्षयकडे बघत म्हणाले,हे पाणी तर गोड आहे.होय,आचार्य!आचमना साठी….नाही… आज मी सागरजलाचच आचमन करणार!सागरच प्राशन करणार  नंतर सागरजलाचं मंत्रोच्चरात तीन वेळ आचमन घेऊन पाणी सोडत म्हणाले, हे सागरा!आज मी तुझ्यावर आक्रमण करणार…क्षमा कर!अनुमती दे!सागराला त्यांनी नमन करतांच वाद्य झडूं लागली. शिंग फुंकल्या जाऊ लागले.गगनभेदी नादानं सारा सागरकिनारा दुमदुमून गेला. आणि एकदम अचानक दक्षिण- उत्तर दिशेने सहस्रावधी नावा समोर येऊन कुणाला कांही कळायच्या आंत समोरचा दृष्य समुद्र पूर्णतः व्यापून टाकला.त्या नावांतून आलेलं सहस्रावधी सैन्य मांदार्यामधे समावून एकरुप होऊन गेले. मांदार्यांनी घडविलेल्या एकविचारी जन सागराचा एक विराट पुरुष अकस्मात समोर अवतिर्ण झाला.आणि त्या विराट मांदार्यांनी दृष्य सागर पूर्णतः व्यापून टाकला.प्राशन केला.आतां सागरजलाचं अस्तित्वच कुठे दिसत नव्हते.मांदार्या समोर सागर जणूं छोट्या थेंबासारखा दिसू लागला.त्यांचे इतक्या वर्षाचे “तप” विराट अविष्काराने सागरात साकारले होते.मती कुंठीत हे दृष्य बघून सारी देव सेना आवाक,आश्चर्यचकित होऊन त्या विराट मांदार्याकडे बघत राहिली.

        एवढ्यात सेनानींचे आदेश घुमले. सहस्र नावामधे देवसेना विभागून दूरवर असलेल्या विराट नौकांवर सज्ज झाली. मांदार्यांच्या एकविचारी नौकाही सज्ज झाल्या.नंतर ते सागरव्यापी प्रचंड आरमार दिलेल्या सूचनेनुसार दक्षिण- पश्चिमेकडे निघाले.देवसैन्याकडे वेगवान नौका होत्या तर सागरीजनांकडे वेगानं जाण्याच कसब असल्यामुळे,पाताळात गेलेल्या बेसावध कालकेय दानवांच्या आरमाराला अल्पावधित गाठणे शक्य झाले.कालकेयाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, देवसेना आपल्याला गाठू शकेल! क्षितीजावर कालकेय दानवांच्या  नौका दिसल्याबरोबर,इंद्रांनी आपल्या सेनेला सज्ज राहण्याचा आदेश दिला. मांदार्यांच्या अनुमतीने आक्रमणाचा आदेश दिला.दोन्हीकडची सेना एकमेकां वर शस्रावर्षाव करु लागली.

         देवांची शिस्तबध्द युध्दनीती, आक्रमणाची विशेष पध्दत,शस्र योजना प्रगत होती. दानवांकडून प्रखर प्रतिकार  देवसैन्याला होत होता.दानवांच्या नौका जलद गतीने दक्षिणेकडे जातांना बघून देवांनी सौम्य अस्रांचा त्यांचेवर प्रयोग केला,पण अपेक्षित परिणाम होत नव्हता  दानवांचे आरमार वेगाने दक्षिणेकडे जातच होते.हे बघून इंद्रांनी प्रलंयकारी अस्रांचा मारा करण्याची आज्ञा दिल्यावर, मांदार्यांनी हरकत घेत म्हणाले,देवराज! या प्रखर अस्रांनी सागरांतील जलचरांना उपद्रव होणार नाही ही दक्षता घ्यावी…. इंद्रांनी पुन्हा सौम्य अस्रांचाच उपयोग करण्याची आज्ञा दिली.दोन्ही सेनांमधील अंतर कमी होऊ लागले.पण त्यांचा संपूर्ण संहार करतां येत नव्हता.कारण  संहारक अस्रांचा प्रयोग करुं नये या मांदार्यांच्या मताचा अनादर करुं शकत नव्हते.सूर्य अस्ताला गेल्यावर,अंधारात  दानवांची शक्ती जास्त प्रबळ होते.हताश इंद्रांनी मांदार्याकडे बघितले.

            क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – १९.

       हताशपणे मांदार्याकडे बघत म्हणाले,ऋषीवर! प्रखर संहारक शस्रांचा मारा केला नाही तर, रात्री या दानवांना जास्त बळ चढते,मग निर्णय कसा लागणार?मंद स्मित करीत मांदार्य म्हणाले,प्रस्वापन अस्र द्या माझेकडे.विना विलंब ते अस्र दिल्याबरोबर मांदार्यानी आपल्या अद्वितिय धनुष्यावर चढवून नेत्र मिटून, शिवतत्वाचं स्मरण केलं.मन आणि अंतर्दृष्टी एक केली.अस्र अभिमंत्रित करुन ते अस्र कालकेयच्या आरमारावर सोडलेले अस्र,आकाशातून चमकत दानवांच्या नौकेपर्यंत जाताच, कालकेय दानवांच्या सर्व नौकांचा वेध घेतला.सार्‍या नौकांच्या ठिकर्‍या व छिन्न भिन्न होऊन आकाशात उडाल्या.असंख्य दानवांचा संहार झाला.जलचरांना धोका न पोहचवता एका अस्राच्या सहाय्याने मांदार्यांनी संहार घडवून आणला.

      मांदार्यांचा तो अद्भूत पराक्रम बघून सारी देवसेना थक्क झाली.सागरपुत्रही आपल्या गुरुंचा अनोखा पराक्रम पाहून थक्क झाले.त्यांच्या जयघोषांनी आकाश दुमदुमुन गेले.त्याचवेळी इंद्राने भावना भेगाने त्यांना कडकडून मिठी मारली.सर्व देवांनी त्यांचे आभार मानले.ऋषीवर!केवळ आपल्यामुळेच आज कालकेय दानवांचा संपूर्ण संहार होऊ शकला.गेली २-३ तपं देवांना सतावणारी आणि मानवतेला कलंक लावणारी वृत्ती सागरात गाडली गेली.देव आपले सदैव ऋणी राहिल.

         मांदार्य मंद पावले टाकीत अश्रूभर ल्या नेत्रांनी नौकेपर्यत गेले.डोळे भरुन आले पण वेगळ्या कारणासाठी.ऋषीय जीवनपध्दती स्विकारल्यानंंतर,मारण्या ऐवजी विचारांनी परिवर्तन करण्यावर त्यांचा भर होता.अश्या तर्‍हेचा संहार त्यांनी कधी केला नव्हता.पण आज देवांं साठी व मानव्यांसाठी दृष्ट शक्तींचा संहार करावा लागला.सागराकडे पाहून,हात जोडून मनोमन म्हणाले,हे सागरा!आज तुझ्यावर मी आक्रमण केले,या धृष्टते बद्दल क्षमा कर!नेत्रातून गळलेले अश्रू सागरांत विलिन झाले.सागराची क्षमा मागून मांदार्य मागे वळले तेव्हा इंद्र म्हणाले,ज्या कारणासाठी मी आपल्याला शाप दिला होता,त्याची पूर्तता आपण आज केली.वसिष्ठांनीही मोठं कार्य करुन देवांना सहाय्य केलं.दोघेही शापमुक्त झाला आहांत.आता दोघेही देवराज्यात येऊन आपला पदभार सांभाळावा ही कळकळीची विनंती करतो.

         देवराज!सागराला मिळालेली नदी पुन्हा मागे फिरत नाही.माझा पुनर्जन्म इथे व्हावा हे विधीलिखित होतं.मी  ऋषी कार्य करावं ही परमेश्वरी इच्छा होती आणि हे कार्य पुढे सुरु ठेवावे हीच माझी जीवननिष्ठा आहे.भारतवर्षात अजुन फार मोठा समुदाय संस्कृतिपासून वंचित आहे तिथे यज्ञीय कार्य करणं माझं कर्तव्य आहे.यातूनच माझी ईशसेवा व देवसेवा होईल.गदगदल्या स्वरात इंद्र म्हणाले,मी आपल्यावर फार मोठा अन्याय…असं म्हणू नका देवराज!उलट आपल्यामुळेच मला संधी मिळाल्याने,ऋषीय कार्य करुन जीवनप्रणालीत फार मोठं परिवर्तन घडून आलं.

      मांंदार्यांनी परत देवपण स्विकारावं असं इंद्राला वाटत होत.पण त्यांचे विचार ऐकून परत आग्रह केला नाही.देवराज! पश्चिम दिग्विजय पार पडला.आतां दक्षिण द्विग्विजय! पुनश्च हरी ॐ…!

        इंद्रांनि संमती दिली,पण तत्पूर्वी प्रायश्चित विधी करायचा!त्यासाठी  कठोर तप करण्यासाठी गंगातीरी जाऊन पापक्षालन करायचेय!देवराज! दक्षिण द्विग्विजय करतांना माझा यज्ञसंस्थेवरच भर राहिल.यापुढे अशी हिंसा कधीच करणार नाही.

      अदृष्य कालपुरुष मांदार्याचा संकल्प ऐकून हसत होता.

        शिबिराच्या दाराशी उभे राहून अगस्त्यऋषी हताशपणे समोरचे दृष्य बघत होते.रावणपुत्र इंद्रजितशी झालेल्या युध्दात दिव्यशक्ती लागून मुर्च्छित लक्ष्मणाला वानरांनी उचलून आणले होते

इंद्रजित अनेक मायावी अस्र सोडून वानर सेनेचा अपरिमित विध्वंस आरंभला होता यामुळे देव आणि ऋषी चिंतित झाले.गेले कित्येक वर्षे राक्षसविनाशासाठी तप केलं होतं.विविध योजना आखल्या होत्या. रावणाचा बिमोड करण्यासाठी रामाने विशाल वानरसेना जमवली होती.महत् प्रयासाने नल-निलने समुद्रावर सेतू बांधून अभेद्य लंकेत प्रवेश केला होता. सध्या सर्व सेना सुवेल पर्वतावर स्थिरावली होती.नियोजन करुन रावणा च्या राजधानीला वेढा घालण्याची योजना आखली होती.वानरांचा अधिपती लंके च्या दक्षिणेकडे व स्वतः राम-लक्ष्मण थेट रावणाशी युध्द करण्यास उत्तर दिशेने आक्रमण करायचे ठरले.त्यानुसार युध्दाला प्रारंभ झाला.दोन्ही कडील सैन्य  आपल्या तुल्यबळांशी युध्द करुं लागले. रामाने मुख्य सहा भयंकर राक्षसांचा वेध घेतला.चहूकडे आरोळ्या किंकाळ्यांचा गदारोळ उठू लागला.दोन्हीकडचे असंख्य सैन्य धाराशयी पडूं लागले.रक्त मासांचा नुसता चिखल झाला होता.

          क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

          दि.  ११-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग -२०.

       संध्याकाळ झाली तरी युध्दाला विराम नव्हता.उलट सूर्यास्तानंतर राक्षसां ना अपरिमित बळ चढत असे.रावणाची मायावी यंत्रणा अंधारात अधिक प्रभावी होत होती.इंद्रजितने देवांकडून मिळवले ली अंतर्धान विद्येचा वापर करुन राम लक्ष्मणांना मूर्च्छित केले तेव्हा हनुमानाने अचाट सामर्थ्याने हिमालयातून द्रोणगिरी पर्वतच उचलून त्यावरच्या संजीवनी वनस्पतींमुळे राम-लक्ष्मण शुध्दीवर आणले.त्रिकुट पर्वतावरील आपल्या महालात बसून,रावण युध्दाच्या खेळ्या रचून शत्रूला जेरीस आणत होता.अनेक अस्र,शस्राने वानरसेनेवर मारा करवित होता.दिवस उलटत होते पण युध्दाचा निर्णय लागत नव्हता.अंतरिक्षातील यंत्रने द्वारे युध्दाच्या सार्‍या घडामोडी त्याला समजत होत्या.हताशपणे इंद्रादी देव बघत होते.शिबिरात वास्तव्य करुन असलेल्या अगस्त्यऋषींना सुध्दा रावण वधाची प्रतिक्षा होती.रावणवध हे ‘देव कार्याचं’ भरतवाक्य ठरणार होतं.रावणा च्या वधानंतरच अगस्त्यांच्या तपःकार्याचं उद्यापन होणार होतं.त्यांच्या तपःसाधनेनं कालकेय दानवांचा नाश केला,पण देवांनाही अजिंक्य रावणाला नमवणं, रामाशिवाय इतर कोणाला शक्य नव्हतं.

    अगस्त्यऋषी विमनस्क मनःस्थितीत आपल्या शिबिरांत बसले असतां,त्यांच्या नेत्रापुढे चलचित्राप्रमाणे,कालकेय वधा पासूनच्या सार्‍या अतर्क्य,अद्भूत घटना तरळू लागल्या.गंगातीरी जाऊन प्रायश्चित विधी आटोपून,अगस्त्य आपल्या शिष्य अक्षय व शंखासह देवरथाने त्यांच्या काशीआश्रमात पोहोचल्यावर,त्यांना बघून आश्रमवासियांना कमालीचा धक्का बसला.चक्रावून,भान हरपून त्याचेकडे बघत राहिले.कारण ते ऐन तीशीतले तरुण दिसत होते.आपल्या वयात झालेले परिवर्तन बघूनआश्रम वासी नक्कीच संभ्रमित होतील ह्याची त्यांना जाणीव होती.

       अगस्त्यऋषी समोर येऊन उभे राहिले तरी त्यांचे पाद्यपुजन करण्याचेही भान कुणाला नव्हते.कांही क्षणांनंतर त्यांना चौरंगावर बसवून पाद्यपुजा केली.त्याचवेळी ७५ वर्षाटी सुभद्रादेवीने पुढे येऊन त्यांना औक्षण केले.या सुभद्रा देवीचं सार्‍या आश्रमवासींयावर मातृवत प्रेम असल्याने,त्या सर्वांच्याच माता बनल्या होत्या.त्या केवळ स्नातक, विद्यार्थींवरच नव्हे तर,अगस्तीवरही त्या प्रेमाने अधिकार गाजवत असत.अगस्त्य मातृप्रेमापासून वंचित असल्यामुळे,एवढे ज्ञानवंत ऋषी असूनही,त्यांच्या जीवना तील मातृपितृ प्रेमाची पोकळी सुभद्रादेवी ने भरुन काढली होती.आतांही औक्षण करत म्हणाल्या,बेटा,केवढा मोठा पराक्रम  गाजवून आलास?तुझ्या तपामुळेच येवढं देवदुर्लभ कार्य तुझ्या हातून घडले आणि प्रेमाने त्यांच्या मस्तकावरुन हात फिरवला.

         संध्याकाळचे आन्हिक आटोपून सारे अंगणांत जमा झाले.अगस्त्य एका उच्चासनावर स्थानापन्न झाल्यावर, कालकेय दानवासंबंधीचा सारा इतिहास सांगीतला.भारत वर्षाला लागलेले असुरी ग्रहन सुटल्याचे ऐकून सार्‍या आश्रम वासीयांना आनंद झाला.पण स्वपराक्रमा  बद्दल कांहीच सांगीतले नाही तेव्हा, अक्षयने बोलण्यास सुरुवात केली.मानवा मानवाला जोडण्याच्या यज्ञात यज्ञीय तपा मुळे सागराला व्यापून टाकणारा मनुष्य सागर निर्माण केला.त्यांच्या सागर व्यापक स्वरुपाप्रमाणेच दानवांना नामशेष केले.कालकेयांना संपूर्ण संपवल्यावर आचार्यांचं ते सागरव्यापक स्वरुप हळूहळू छोटं होत गेलं.मनुष्य सागर सागरांतून बाहेर पडल्यावर सागराचं रुप पूर्ववत झालंं. कालकेय दानवांना मारल्याचं पाप आपल्याहातून झालं या भावनेने गंगेत सार्‍या पापांचं क्षालन होते म्हणून त्यांनी गंगेकाठी कठोर तपःसाधना केली.अक्षयचे बोलणे ऐकून सारे आश्रमीय आपल्या गुरुकडे परमआदराने बघू लागले.

        सुभद्रादेवी म्हणाल्या,तुला हे तारुण्य कसं प्राप्त झालं सांग की,म्हणजे मलाही तो उपाय करता येईल.हसून अगस्त्य म्हणाले,उपाय सांगतो पण तुम्हाला करुं देणार नाही,अन्यथा मला दुसरी माता शोधावी लागेल.त्यांच्या या हास्य परिहासावर सर्वजन खळखळून हसले.अगस्त्य पुढे सांगू लागले…

         युध्दात झालेल्या शक्तीचा र्‍हास भरुन काढण्याकरीतां युध्दानंतर सोम यागाचं आयोजन करण्याचा देवांचा प्रघात आहे.सोमयागाला श्रौतयाग म्हणून ओळखल्या जाते.मी प्रत्यक्ष देवांच्या बाजूने युध्दात भाग घेतल्यामुळे,इंद्रांनी आग्रह करुन हिमवान प्रदेशातील देव राज्यात नेऊन श्रौतकर्मासाठी तब्बल दोन महिने ठेवून घेतले.सोमयागाची सविस्तर माहिती सांगून पुढे म्हणाले, सोमरसासाठी सोमवल्ली महत्वाची आहे त्याचे सेवन केल्यावर शक्तीक्षय त्वरीत भरुन निघतो.नियमित सोमरसाने वृध्दत्व दूर होऊन तारुण्य प्राप्त होते.ही वनस्पती सागरतळाशी मिळते.याचा रस यज्ञस्थळी विधीवत काढल्या जातो.माझे वय काय असेल सांगा बरं.. ३०-३५ च असेल. हसून ते म्हणाले माझी साठी जवळ आलीय! नंतर अनेक तीर्थयात्रा करत अनेक आश्रमांची व्यवस्था लावून काशी राज्यात दोन दिवस थांबून आता इथे आलोय!

             क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

         दि. ११-११-२०२१.

                

महर्षीं अगस्त्यऋषी सर्व भाग पहा

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading