Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

६ मार्च, दिवस ६५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी २७६ ते ३०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ७६९ ते ७८०

“६ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 6 March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ६ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ७६९ ते ७८० चे पारायण आपण करणार आहोत.


६ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी २७६ ते ३००,

276-6
घोषाच्या कुंडी । नादचित्रांची रुपडी । प्रणवाचिया मोडी । रेखिली ऐसी ॥276॥
घोषच्या कुडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची अनेक रूपे उमटतात.
277-6
हेचि कल्पावे तरी जाणिजे । परि कल्पिते कैचे आणिजे । तरी नेणो काय गाजे । तिये ठायी ॥277॥
याची कल्पना केली, तर अनाहत नादाचे स्वरूप जाणले जाते. कारण, या अवस्थेत कल्पना करणारे मन तरी कोठून आणावे ? अनाहत चक्राच्या ठिकाणी कशाची गर्जना होते, हे योगी पुरुषाशिवाय इतरांना कळत नाही.
278-6
विसरोनि गेलो अर्जुना । जव नाशु नाही पवना । तव वाचा आथी गगना । म्हणोनि घुमे ॥278॥
हे अर्जुना ! एक गोष्ट सांगावयाची राहून गेली. जोपर्यंत हृदय- आकाशातील प्राणाचा नाश होत नाही, तोपर्यंत नाद असतो, म्हणून तो आकाशात घुमत असतो.
279-6
तया अनाहताचेनि मेघे । आकाश दुमदुमो लागे । तव ब्रह्मस्थानीचे बेगे । फिटले सहजे ॥279॥
त्या अनाहतरूपी मेघागर्जनेने हृदय – आकाश दुमदुम लागते, तेंव्हा ते ब्रम्हस्थानाचे द्वार सहजच उघडले जाते,
280-6
आइके कमळगर्भाकारे । जे महदाकाश दुसरे । जेथ चैतन्य आधातुरे । करुनि असिजे ॥280॥
अर्जुना, ऐक. त्याठिकाणी कमळगर्भाच्या आकारांचे जे दुसरे महादकाश आहे, ज्या ठिकाणी जीवचैत्यन्य सुखासाठी अतृप्त होऊन राहिलेले असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

281-6
तया हृदयाच्या परिवरी । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥281॥
त्या चैत्यण्याला हृदयाकशाच्या माजघरात (हृदयाच्या गुप्तस्थानी) आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. (ती कशी तर, )
282-6
बुध्दीचेनि शाके । हातबोने निके । द्वैत जेथ न देखे । तैसे केले ॥282॥
द्वैत ज्याला पाहणार नाही, असा बुद्धीच्या भाजीसह हातात असलेला उत्तम प्रकारचा नैवद्य अर्पण केला.
283-6
ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहली । ते वेळी कैसी गमली । म्हणावी पा ॥283॥
अशा प्रकारे तिने आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरूपच झालेली असते. तेंव्हा ती कशी दिसते (किंवा कशी भासते) म्हणाल तर,
284-6
हो का जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी । ते फेडुनिया वेगळी । ठेवली तिया ॥284॥
जणू काही ती वाऱ्याची पुतळी असावी व तिने पीतांम्बर नेसलेला असावा आणि नंतर तिने वस्त्र सोडून ठेवावे,
285-6
नातरी वारयाचेनि आंगे झगटली । दीपाची दिठी निमटली । का लखलखोनि हारपली । वीजु गगनी ॥285॥
किंवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याचा प्रकाश एकदम नाहीसा व्हावा अथवा आकाशामध्ये वीज चमकून ती अदृश्य व्हावी,

286-6
तैशी हृदयकमळवेऱ्ही । दिसे सोनियाची जैशी सरी । नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥286॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी हृद्यकमलापर्यंत जणू काही सोन्याची सरी अथवा प्रकाशरुपी पाण्याचा झरा जसा वाहत आलेला असतो, त्याप्रमाणे दिसते.
287-6
मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली का एके वेळे । तैसे शक्तीचे रुप मावळे । शक्तीचिमाजी ॥287॥
मग त्या कुंडलिनीचा प्रकाश रुपी झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरवा, त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते.
288-6
तेव्हा तरी शक्तीचि म्हणिजे । एऱ्हवी तो प्राणु केवळ जाणिजे । आता नाद बिंदु नेणिजे । कला ज्योती ॥288॥
अशी स्थिती झाल्यानंतर तिला शक्ती असेच म्हणतात; परंतु वास्तविक तो प्राणच आहे, असे जाण. परंतु त्या वेळेस त्याला नाद, बिंदू, कला, ज्योती असे चारी धर्म नसतात.
189-6
मनाचा हन मारु । का पवनाचा धरु । ध्यानाचा आदरु । नाही परी ॥289॥
त्या अवस्थेत मनाचा निग्रह, प्राणाचा निरोध, ध्यानाचा प्रयत्न हे काही प्रकार तेथे राहत नाहीत.
290-6
हे कल्पना घे सांडी । ते नाही इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी देखा ॥290॥
प्रारंभीच्या काळामध्ये अमुक घ्यावे, अमुक टाकावे, हा जो संकल्प असतो, तो त्या वेळी त्या अवस्थेत राहत नाही. त्या अवस्थेमध्ये पंचमहाभुतांची पूर्ण आटणी झालेली असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

291-6
पिंडे पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतीचा दंशु । परि दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु ॥291॥
देहानेच देहातील पंचमहाभुतांचा नाश करणे, हे आदिनाथ जे शंकर संप्रदायाचे गुप्त वर्म आहे; परंतु महाविष्णू भगवान श्रीकृष्ण ते वर्म प्रकट करून दाखविले आहे.
292-6
तया ध्वनिताचे केणे सोडुनी । यथार्थाची घडी झाडुनी । उपलविली म्या जाणुनि । ग्राहीक श्रोते ॥292॥
त्या संक्षेपरूपी कापडाच्या गठ्यावरचे दोर सोडून त्यातील कपड्याच्या घड्या साफ करून श्रोते हे गिर्हाईक आहे, असे जाणून उलगडून दाखविले, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी संक्षेपाने जे ध्वनित केले, त्याचेच मी विवरण केले. (असे माऊली म्हणत आहेत)

युञ्जन्नेनं सदाऽत्मानं योगी नियतमानसः ।
शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥6. 15॥
भावार्थ :-

ज्याचे मन निग्रहयुक्त झाले आहे, असा योगी सतत चित्त एकाग्र केल्याने प्रमानंदाची पराकाष्ठा अशी शांती प्राप्त करून घेतो.
293-6
ऐके शक्तीचे तेज लोपे । तेथ देहीचे रुप हारपे । मग तो डोळ्यांमाजी लपे । जगाचिया ॥293॥
अर्जुना ऐक. ज्यावेळी कुंडलिनी शक्तीचे तेज लोप पावते, त्यावेळी देहातील पंचमहाभूतांचे स्वरूप लय पावते. मग तो योगी जगाच्या डोळ्यामध्ये लपून बसतो. तो कोणाच्याही डोळ्याला दिसू शकत नाही.
294-6
एऱ्हवी आधिलाची ऐसे । सावयव तरी दिसे । परी वायूचे का जैसे । वळिले होय ॥294॥
एरवी तो पूर्वी प्रमाणे सावयव दिसत असतो; परंतु जणू काहि पण जणू काही तो वाऱ्याचाच बनविलेला आहे, असा होतो.
295-6
नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा । का अवयवचि नभा । निवडला तो ॥295॥
अथवा केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला, तर काहीच उरत नाही; किंवा आकाशाला जसे अवयव फुटावेत, असे त्याचे अवयव असूनदेखील नसल्याप्रमाणेच असतात.

296-6
तैसे होय शरीर । तै ते म्हणिजे खेचर । हे पद होता चमत्कार । पिंडजनी ॥296॥
याप्रमाणे शरीर बनल्यावर त्याला खेचर म्हणजे गगणामध्ये संचार करणारा म्हणतात. देहधारी लोकांमध्ये अशा प्रकारचे शरीर बनणे म्हणजे एक प्रकारचा चमत्कार आहे.
297-6
देखे साधकु निघोनि जाय । मागा पाउलांची वोळ राहे । तेथ ठायी ठायी होये । हे अणिमादिक ॥297॥
असा साधक योगाचा अभ्यास करून पुढे निघून गेलेला असतो. त्या मार्गावर साधनरूपी पावलांची ओळ मागे राहते. त्या ठिकाणी अणिमादिक (अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इष्टत्व, वाशित्व इत्यादी) सिद्धी प्राप्त होतात. (म्हणजेच साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या सिद्धी प्राप्त होतात)
298-6
परि तेणे काय काज आपणया । अवधारी ऐसा धनंजया । लोप आथी भूतत्रया । देहीचा देही ॥298॥
अर्जुना ! हे लक्षात ठेव की, या सिद्धिशी आपल्याला काय करायचे आहे ? देहातल्या देहातच पृथ्वी, आप, तेज या तिनी भुतांचा लोप होतो.
299-6
पृथ्वीते आप विरवी । आपाते तेज जिरवी । तेजाते पवनु हरवी । हृदयामाजी ॥299॥
पृथ्वीला पाणी नाहीसे करते. पाण्याला तेज नाहीसा करतो व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो.
300-6
पाठी आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारे । मग तोही निगे अंतरे । गगना मिळे ॥300॥
पाठीमागे वायू एकटाच उरतो. तो शरीराच्या आकाराने राहतो. मग तोही काही काळाने हृद्यकाशातून निघून मुर्धन्याकाशात जाऊन मिळतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ६५ वा, ६, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ७६९ ते ७८०
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ७६९
बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥१॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥धृपद॥
बरे जाले देवा बाईल कर्कशा । बरी हि दुर्दशा जन मध्ये ॥२॥
बरे जाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥३॥
बरे जाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥४॥
बरे जाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली ॥५॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥६॥
अर्थ

देवा बरे झाले माझे दिवाळे निघाले आणि दुष्काळानेही मला चांगलाच त्रास दिला आहे ते खूप चांगले झाले. देवा मला पश्चाताप येत आहे आणि त्या पश्चातापाच्या निमित्तानेच मला तुझे चिंतन घडत आहे आणि संसार तर मला ओकलेल्या अन्ना प्रमाणेच वाटत आहे संसाराची मला आता घृणा येत आहे. देवा बरे झाले मला बायको देखील कर्कश मिळाली आणि जगामध्ये देखील माझी दुर्दशा होत आहे हे देखील चांगले झाले. देवा जगामध्ये पावलोपावली माझा अपमान होत आहे हे देखील बरे झाले माझे गुरे-ढोरे धन हे सगळे गेले तेही चांगले झाले. देवा बरे झाले मी लोकलज्जा धरली नाही वेळेच तुला शरण आलो हे फार बरे झाले. देवा मी माझे सर्वस्व तुला अर्पण केले व बायकोचा लेकरांचा त्याग केला हे फार बरे झाले. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी एकादशीव्रत धरले त्या दिवशी उपवास धरला आणि हरीचे भजन करून जागरण केले हे फार बरे झाले.
अभंग क्र. ७७०
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसे मन जाले हावभरी । परती माघारी घेत नाही ॥धृपद॥
बंधनापासूनि उकलली गाठी । देता आली मिठी सावकाश ॥२॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठले । कामक्रोधे केले घर रिते ॥३॥
अर्थ

विठ्ठलाचे नाम घ्यावे, विठ्ठलाला डोळे भरून पाहावा, त्याच्यावर जीव अर्पण करावा. या विठ्ठलाच्या चरणांचि इतकी हाव लागली आहे की आता या प्रपंचाकडे मन माघारी धाव घेत नाही. मी संसाररूपी सागरातून मुक्त झालो आहे त्यामुळे मला विठ्ठलाच्या चरणांची सावकाश मिठी घेता आली आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हृदयात विठ्ठल परिपूर्ण भरलेला आहे त्यामुळे काम आणि क्रोध यांनी माझे हृदय रुपी घर रिते केले म्हणजे खाली केले.
अभंग क्र. ७७१
जग अवघे देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥१॥
आधी आपणया नासी । तरि उत्तरे ये कसी ॥धृपद॥
ब्रम्हज्ञानाचे कोठार । ते या निश्चये उत्तर ॥२॥
तुका म्हणे ते उन्मनी । नाश कारय कारणी ॥३॥
अर्थ

अध्यात्मातील प्रमुख उपदेश म्हणजे संपूर्ण विश्व हेच भगवंताचा लीला विलास आहे. प्रथम अहंकार नाहीसा कर म्हणजे मग, तू खऱ्या कसला लागशील. ”अहम ब्रम्हास्मि” या उपदेशातच सर्व ब्रम्हज्ञानाचे भांडार भरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी कार्य आणि कारण हे भावच नाहीसे होतात तीच उन्मनी अवस्था होय.
अभंग क्र. ७७२
मीचि मज व्यालो । पोटा आपुलिया आलो ॥१॥
आता पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥धृपद॥
जालो बरा बळी । गेलो मरोनि तेकाळी ॥२॥
दोहीकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥
अर्थ

मीच माझ्या पोटी जन्माला आलो आहे, मी ब्रम्ह आहे या भावनेने माझा जन्म माझ्या पोटी झाला आहे. आता माझे नवस पूर्ण झाला आहे सर्व प्रकारची अशा निरसून गेली आहे. मी बलवान (मी ब्रम्ह आहे) झालो आहे तेव्हा माझी “मी देह” आहे हे वृत्ती नाहीशी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी ब्रम्ह असल्यमुळे प्रपंच व परमार्थाकडे साक्षी रूपाने पाहत आहे.
अभंग क्र. ७७३
साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीती मथनाचे ॥१॥
पक्षियासी नाही मारगी आडताळा । अंतराक्षी फळासीचि पावे ॥धृपद॥
भक्तीची जोडी ते उखत्याचि साठी । उणे पुरे तुटी तेथे नाही ॥२॥
तुका म्हणे आले सांचत सांचणी । आजि जाली धणी एकसरे ॥३॥
अर्थ

पुरातन काळापासून ईश्वर प्राप्तीसाठी विविध कलांचा (साधनांचा) वापर केला जात होता त्या सर्वाचे मंथन करून एकच सार काढले आहे ते म्हणजे “भक्ती”. पक्ष्यांना त्यांच्या मार्गात काही अडथळा येत नाही उंचावर असल्यामुळे ते फळाला लवकर भिडतात. तसेच भक्तीचे आहे इतर साधने क्रमाक्रमाने हरीची प्राप्ती करून देतात पण भक्ती हि एक अशी साधना आहे कि तेथे काही कमी पडू देत नाही. भक्ती ने हरीची प्राप्ती लवकर होते. तुकाराम महाराज म्हणतात माझा पुण्याचा साठाच साचत आहे त्यामुळे आज भक्ती प्रकट झाली व हरीची प्राप्ती झाली.
अभंग क्र. ७७४
नाही येथे वाणी । सकळा वर्णी घ्यावी धणी ॥१॥
जाले दर्पणाचे अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥धृपद॥
एका भावाचा एकात । पीक पिकला अनंत ॥२॥
तुका खळे दाणी । करी बैसोनी वांटणी ॥३॥

अर्थ
सर्व प्रकारचे उच नीच साधकांनी ईश्वर लाभाची प्राप्ती करून घ्यावी भक्ती मार्गात कशचीच उणीव नसते भक्ती मार्ग असा असतो अगदी आरश्या प्रमाणे ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला फळ प्राप्त होते प्रतीबिंबासारखे. एक निष्ठ भक्तीभाव असला तर त्याठिकाणी हरी कृपेचे पिक अनंत असते. तुकाराम महाराज म्हणतात मी या भक्तीच्या पिकाचे खळे करून बसलो आहे व ज्याचा जसा भाव असेल त्याला त्या प्रकारच्या लाभाची वाटणी करत आहे.
अभंग क्र. ७७५
ठेविले जतन । करूनिया निज धन ॥१॥
जयापासाव उत्पत्ती । ते हे बीज धरिले हाती ॥धृपद॥
निवडिले वरळा भूस । सार आइन जिन्नस ॥२॥
तुका म्हणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥३॥
अर्थ

हरीच्या प्राप्तीचे नीज धन मी जतन करून ठेवले आहे. ज्यापासून सर्व जगाची उत्पत्ती आहे ते बीजच मी हाती धरले आहे. मी फोलपाट (भुसा) बाजूला सारून हरीची निवड केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो नारायण माझ्या भाग्यात आला हे माझ्या संचिताचे गुण आहे.
अभंग क्र. ७७६
भ्रमना पाउले वेचतातीती वाव । प्रवेशाचा ठाव एका द्वारे ॥१॥
सार ती पाउले विठोबाची जीवी । कोणी न विसंभावी क्षणभरि ॥धृपद॥
सुलभ हे केले सकळा जीवन । फुंकावेचि कान न लगेसे ॥२॥
तुका म्हणे येथे सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचे ॥३॥
अर्थ

सर्व साधनांच्या मागे फिरत राहण्यात भ्रमण करण्यात कायअर्थ आहे हरी कडे जाण्याचे द्वार तर एकच आहे. सर्व गोष्टीचे सार म्हणजे विठ्ठलाचे पाऊले ते आपल्या हृदयात स्थिर करावी कोणीही त्याला एक क्षणभर विसरू नये. हे सर्वात सोपे व उत्तम साधन आहे. यासाठी गुरुकडून कान मंत्र घेणे आवश्यक नाही. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी सर्व इच्छा पूर्ण होत आहे. म्हणजे हरीचे चरणच सर्व विस्ताराचे मूळ खोड आहे.
अभंग क्र. ७७७
काही जाणो नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहाने ॥१॥
भलतिया नावे आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥धृपद॥
अहंकार जातो गौरविता वाणी । सर्वगात्रा धणी हरीकथा ॥२॥
तुका म्हणे उपजे विल्हाळ आवडी । करावा तो घडीघडी लाहो ॥३॥
अर्थ

पांडुरंगाशिवाय दुसरा काही विचार करू नये पांडुरंगा विषयी काही संदेह केला तर त्रास होईल. कोणत्याही नावाने जगाचा पिता विठ्ठलाला आळविले किंवा हाक मारली तरी तो आपल्या मनातील कळवळा जाणून घेत असतो. विठ्ठलाचे नाम आळवले तर आपली वाणी शुद्ध होवून सुरक्षित होवून अहंकार नाहीसा होतो. हरिकथेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या हृदयात पांडुरंगाची आवड कशी निर्माण होईल, याचाच विचार घडोघडी करावा.
अभंग क्र. ७७८
बीजापोटी पाहे फळ । विध न करिता सकळ ॥१॥
तया मूर्ख म्हणावे वेडे । कैसे तुटेल साकडे ॥धृपद॥
दावितिया वाट । वेठी धरू पाहे चाट ॥२॥
पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥३॥
अर्थ

जमिनीची कुठल्याही प्रकारची निगा न करता (नांगरणी, खुरपणी, बि पेरणे इ. ) जो फक्त फळाची अपेक्षा करतो, अशा माणसांना मूर्ख म्हणावे. त्याची पुढील संकटे कशी नाहीशी होतील ? जो मार्ग दाखवितो त्यालाच वेठबीगारीला जो धरतो, असा माणूस निंद्य होय. तुकाराम महाराज म्हणतात पुढे ईश्वर प्राप्ती करून घेण्यासठी शरीराचे रक्षण करावे.
अभंग क्र. ७७९
मातेची जो थाने फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥
वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥धृपद॥
अगी लावी घरा । मग वसती कोठे थारा ॥२॥
तुका म्हणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥
अर्थ

ज्या मातेच्या दुधापासून आपले रक्षण होते त्या मातेचे स्थन फाडणे जसे पापच आहे. त्याप्रमाणे वेदाला जो कोणी निंदितो तो चांडाळ, पापी, अज्ञानी आहे असे समजावे. जो स्वतः आपल्याच घरला आग लावतो तो कुठे विश्रांती घेणार ? तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा वर्म जाणून घेतला पाहिजे इतरांना तर भ्रम नाचवितात.
अभंग क्र. ७८०
वेश वंदाया पुरते । कोण ब्राम्हण निरुते ॥१॥
ऐसे सांगा मजपाशी । संता निरवितो येविशी ॥धृपद॥
असा जी प्रवीण । ग्रंथी कळे शुद्धहीण ॥२॥
तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे ॥३॥
अर्थ

आचार भ्रष्ट असलेले ब्राम्हणाने परिधान केलेला वेश म्हणजे फक्त त्यांना नमस्कार करण्यापुरता आहे. मग ते ब्राम्हण आहेत का ? संताना हा प्रश्न मी विचारीत असून त्यांनी याचे मला उत्तर द्यावे सर्व ग्रंथात तुम्ही प्रवीण आहात तुम्हाला चांगले आणि वाईट कळते. तुकाराम महाराज म्हणतात सत्य लोपले कि पाप अपोआप घडते.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version