“२९ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २९ March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २९ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १०४५ ते १०५६ चे पारायण आपण करणार आहोत.
२९ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १५१ ते १७५,
151-8
ऐसे जे हे शरीर । ते ते न पवतीचि पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझे ॥151॥
ते हे शरीर, मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुनः प्राप्त होत नाही.
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥8. 16॥
152-8
एऱ्हवी ब्रह्मपणाचिय भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे । परि निवटलियाचे जैसे । पोट न दुखे ॥152॥
येरव्ही, ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्यांना सुद्धा (ब्रह्मदेवाला सुद्धा) पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत; परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही
153-8
ना तरी चेइलियानंतरे । न बुडिजे स्वप्नीचेनि महापूरे । तेवी माते पावले ते संसारे । लिंपतीचि ना ॥153॥
किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नातल्या महापुरांत कोणी बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्याप्रत पावले, ते संसाराने लिप्त होत नाहीत.
154-8
एऱ्हवी जगदाकाराचे सिरे । जे चिरस्थायीयांचे धुरे । ब्रह्मभुवन गा चवरे । लोकाचळाचे ॥154॥
येरव्ही, चौदा भुवनांचे शिखर, जे सप्त चिरंजीवामध्ये अग्रभागी असणारे, व त्रैलोक्यरूप पर्वताचे मस्तक जे ब्रह्मभुवन,
155-8
जिये गावीचा पहारू दिवोवरी । एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी । विळोनि पांती उठी एकसरी । चवदा जणांची ॥155॥
ज्या ब्रह्मलोकाच्या एक प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, व एका दिवसात एकदम चौदा इंद्रांचा निकाल लागतो;
सहस्त्रयुगपर्यंतमहर्यद् ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्त्रान्ता तेऽहोरात्रविदो जनाः ॥8. 17॥
156-8
जै चौकडिया सहस्त्र जाये । तै ठायेठावो विळुचि होये । आणि तैसेचि सहस्त्र भरिये पाहे । रात्री जेथ ॥156॥
चार युगे हजार वेळा जातील, तेव्हा ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस होतो; आणि तशीच हजार चौकड्यांची जेथे रात्रही आहे.
ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस गणित
कलियुग : 4, 32, 000. वर्ष
द्वापारयुग, + 8, 64, 000. = 12.96000. वर्ष
त्रेतायुग, +12, 96, 000. = 25, 92, 000. वर्ष
सत्ययुग, + 17, 28, 000. = 43, 20, 000. वर्ष
. एकूण 43, 20, 000/ त्रेचाळीस लक्ष वीस हजार चार युगाचे एकूण वर्ष होतात.
युगे 4×वर्ष 1000 = 43, 20, 000/ त्रेचाळीस लक्ष वीस हजार.
1 चतुर्युग म्हणजे 43, 20, 000/ मानवी वर्ष
43, 20, 000×1000 (चतुर्युग) = 4, 32, 00, 00, 00/ 4 अब्ज 32 कोटी मानवी वर्ष
आणि तेव्हढीच रात्र म्हणजे
4, 32, 00, 00, 00/×2 = 8, 64, 00, 00, 000/ म्हणजे 8 अब्ज 64 करोड मानवी वर्ष हा ब्रम्हदेवाचा 1 दिवस म्हणजे अहोरात्र आहे,
8, 64, 0000000/.(8 अब्ज 64 करोड.)
30 दिवसांचा महिना, 12 महिन्याचे १ वर्ष, आणि असे 100 वर्ष ब्रम्हदेवाचे आयुष्य आहे.
असे 100 वर्ष ब्रम्हदेवाचे आयुष्य आहे. ब्रम्हदेवाचे १ महिना ३६० दिवसाचा आहे.
३६०(वर्ष)×100 = 36, 000×8, 64, 00, 00, 000 =
8, 64, 00, 00, 000/×100 = 8, 64, 00, 00, 00, 000/ म्हणजे
ब्रम्हदेवाचे एकूण आयुष्य
8, 64, 00, 00, 00, 000/ 8 खर्व 64 अब्ज मानवी सौर वर्ष एव्हढे ब्रह्मदेवाचे आयुष्य आहे. (म्हणजे ब्रम्हदेवाचे 100 वर्ष झाले)
157-8
येवढे अहोरात्र जेथिचे । तेणे न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गीचे । चिरंजीव ॥157॥
एवढा दिवस व रात्र जेथे आहे, तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत, ते मरत नाहीत व त्या दिवसरात्री पाहतात. ते स्वर्गलोकीचे चिरंजीव होत.
158-8
येरा सुरगणांची नवाई । विशेष सांगावी तेथ काई । मुद्दल इंद्राचीचि दशा पाही । जे दिहाचे चौदा ॥158॥
येरव्ही, जेथे मुदली इंद्राचीच दशा अशी आहे की, एका दिवसात चौदा इंद्र होतात, तेथे देवगणांची काय प्रतिष्ठा वर्णन करावी ?
159-8
परि ब्रह्मयाचियाहि आठा पहारांते । आपुलिया डोळा देखते । जे आहाति गा तयाते । अहोरात्रविद म्हणिपे ॥159॥
परंतु ब्रह्मदेवाच्याही आठ प्रहराला जे आपल्या डोळ्यांनी पाहतात, त्यांना (ब्रह्मदेवाचे) दिवस व रात्र जाणणारे असे म्हणतात.
अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥8. 18॥
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥8. 19॥
160-8
तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे । ते वेळी गणना केही न समाये । ऐसे अव्यक्ताचे होये । व्यक्त विश्व ॥160॥
त्या ब्रह्मदेवाचा दिवस ज्या वेळेस उगवतो, त्या वेळेस निराकाराचे साकार विश्व अशा रीतीने उत्पन्न होते की, त्याची मोजदाद करवत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-8
पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे । पाठी तैसाचि मग पाहाटे । भरो लागे ॥161॥
पुढे त्या दिवसाचे चार प्रहर संपल्यावर हे विश्व नाहीसे होते; आणि पुनः पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे भरू लागते.
162-8
शारदीयेचिये प्रवेशी । अभ्रे जिरती आकाशी । मग ग्रीष्मांती जैशी । निगती पुढती ॥162॥
शरत्कालाच्या आरंभी आकाशातील अभ्रे नाहीतशी होतात, आणि तिच पुनः ग्रीष्मऋतूचे शेवटी जशी उत्पन्न होतात
163-8
तैसी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी । मिळे जव सहस्त्रावधी । निमित्त पुरे ॥163॥
त्याचप्रमाणे, ब्रह्मदेवाच्या दिवसाचे आरंभी ह्या भूतसृष्टीचा समुदाय एकत्र होतो, व तो चार हजार युगे वेळ जात तोपर्यंत असतो.
164-8
पाठी रात्रीचा अवसरू होये । आणि विश्व अव्यक्ती लया जाये । तोही युगसहस्त्र मोटका पाहे । आणि तैसेचि रचे ॥164॥
मागाहून ब्रह्मदेवाचे रात्रीचा समय झाला असता हे विश्व निराकारांत लय पावते; तेही पूर्वोक्त काल गेल्यावर उदयकाली पूर्ववत् होते.
165-8
हे सांगावया काय उपपत्ति । जे जगाचा प्रळयो आणि संभूति । इथे ब्रह्मभुवनीचिया होती । अहोरात्रमाजी ॥165॥
अशा रीतीने विश्वाची रचना होते. हे सांगण्याचा कोणता उद्देश म्हणशील, तर या ब्रह्मदेवाच्या दिवसात आणि रात्रीत जगाची उत्पत्ति आणि लय होतो.
166-8
कैसे थोरिवेचे मान पाहे पा । हो सृष्टिबीजाचा साटोपा । परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहला ॥166॥
त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे म्हणून पाहू गेले तर, तो ब्रह्मदेव सृष्टीच्या बिजाचे भंडार आहे, पण तोही जन्ममरणाला अग्रेसर झाला.
167-8
एऱ्हवी त्रैलोक्य हे धनुर्धरा । तिये गावीचा गा पसारा । तो हा दिनोदयी एकसरा । मांडतु असे ॥167॥
हे धनुर्धरा, येरव्ही ही त्रैलोक्यसृष्टि सत्यलोकाचा पसारा असुन ब्रह्मदेवाचा दिवस उगवण्याबरोबर हा एकसारखा मांडला जातो.
168-8
पाठी रात्रीचा समो पावे । आणि अपैसाचि सांटवे । म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे । साम्यासि ये ॥168॥
मागाहून रात्रीचा समय झाला असता तो आपोआप अव्यक्तांत लय पावतो, व हे पंचभूतादिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सहज जेथल्या तेथे लय पावते.
169-8
जैसे वृक्षपण बीजासि आले । की मेघ हे गगन जाहाले । तैसे अनेकत्व जेथ सामावले । ते साम्य म्हणिपे ॥169॥
ज्याप्रमाणे झाड हे बिजरूपात सामावते, किंवा मेघ हे आकाशात लीन होतात, त्याप्रमाणे, ज्या ठिकाणी पुष्कळ वस्तुंचा समावेश होतो, त्याला ‘ साम्य ‘ असे म्हणतात.
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥8. 20॥
170-8
तेथ समविषम न दिसे काही । म्हणोनि भूते हे भाष नाही । जेवि दूधचि जाहालिया दही । नामरूप जाय 170॥
त्या साम्यात न्युनाधिक काही दिसत नाही, म्हणून ते भूत हे नांव पावत नाही. ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्याचे (दुधाचे) नांव व रूप ही नाही तशी होतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-8
तेवि आकारलोपासरिसे । जगाचे जगपण भ्रंशे । परि जेथ जाहाले ते जैसे । तैसेचि असे ॥171॥
त्याप्रमाणे, आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जगपण नाहीसे होते; परंतु ज्याच्यावर हे झाले आहे, त्या ठिकाणी ते जसेच्या तसेच असते,
172-8
तै तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारा वेळी तेचि व्यक्त । हे एकास्तव एक सूचित । एऱ्हवी दोनी नाही ॥172॥
तेव्हांच त्याला ‘अव्यक्त’ असे म्हणतात आणि साकार होतो त्यालाच ‘ व्यक्त ‘ म्हणतात. ही एकाला एक दाखविणारी आहेत. परंतु पाहुं गेले असता दोन्ही नाहीत.
173-8
जैसे आटलिया स्वरूपे । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारू हारपे । जे वेळी अळंकार होती ॥173॥
ज्याप्रमाणे रूपे आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात, पुढे त्याचे दागिने बनल्यावर ती लगड नाहींशी होते;
174-8
ही दोन्ही जैशी होणी । एकी साक्षीभूत सुवर्णी । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूच्या ठायी ॥174॥
ही दोन्ही रुपांतरे जशी एका रुप्यावरच होतात, त्याचप्रमाणे, व्यक्त व अव्यक्त हे दोन्ही विकार ब्रह्माच्याच ठिकाणी होतात.
175-8
ते तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोही भावाअतीत । अनादिसिध्द ॥175॥
ते ब्रह्म तर व्यक्त नाही आणि अव्यक्तही नाही, उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही; परंतु या दोन्ही स्थितीच्या पलीकडले अनादिसिद्ध असे आहे.
दिवस ८८ वा, २९, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १०४५ ते १०५६
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग – १०४५
भक्ती तो कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥
जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥धृपद॥
कामावले तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥
अर्थ नाही टाका तपासा
अभंग – १०४६
पापी म्हणो तरि आठवितो पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥
ऐशा विचाराने घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥धृपद॥
एकवेळ जेणे पुत्राच्या उद्देशे ॥ घेतल्याचे कैसे नेले दुःख ॥२॥
तुका म्हणे अहो वैकुंठनायका । चिंता का सेवका तुमचिया ॥३॥
अर्थ
देवा मी पापी आहे असे लोक म्हणतात, बरे ठिक आहे मी पापी आहे पण मी तर रोज तुमची चिंतन करतो मग ते पाप जायला पाहिजे या लोकांच्या म्हणण्यानुसार माझे पाप अजूनही गेलेले नाही मग देवा माझे पाप तुमच्या नामा पेक्षा प्रबल आहे की काय ? अशा प्रकारचे विचार घालून माझ्या मनाची कोणी करून हे चक्रपाणी तुम्ही निजला आहात की काय ? पण देवा त्या महापापी अजामिळाने तुमचे केवळ एकदा नांव घेतले तेही त्याच्या पुत्राच्या निमित्ताने तरीही तुम्ही त्याचे लगेच दुःख घालविले त्याचा कोणत्याही अधिकार न पाहता त्याचा उद्धार कसा केला ? देवा मी तर त्याच्या इतका पापी नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी तर तुमचा भक्त आहे आणि तुमच्या सेवकाला इतका विचार करण्याची वेळ येते हे योग्य नाही.
अभंग – १०४७
उगविल्या गुंती । ऐशा मागे नेणो किती ॥१॥
ख्यात केली अजामेळे । होते निघाले दिवाळे ॥धृपद॥
मोकलिला प्रायिश्चती । कोणी न धरिती हाती ॥२॥
तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही मागे कित्येक भक्तांना या भवसागरातून मुक्त केले याची गणती ही करता येत नाहीये. अजामिळाने धर्माचे कोणतेही पालन केले नाही तरी त्याला मोक्ष मिळाला त्याचे धर्माच्या नावाने दिवाळे निघाले होते तरी त्याला मोक्ष तुम्ही दिला व त्याने एवढी कीर्ती केली की त्याची तुलना करता येणार नाही. त्याचे एवढे पाप होते की त्याला प्रायश्चित्त म्हणून काहीच उरले नव्हते आणि कोणीही त्याचा उद्धार करण्यास तयार नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात त्या आजामिलाने फक्त एकदा नारायणा असा नामोच्चार केला तेही त्याच्या मुलाच्या निमित्ताने व त्याची वैकुंठाची वाट मोकळी झाली असा देवा तुझ्या नामाचा महिमा आहे.
अभंग – १०४८
सरळी ही नामे उच्चारावी सदा । हरी बा गोविंदा रामकृष्ण ॥१॥
पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊ येती ॥धृपद॥
अवघे चि लाभ बैसलिया घरा । घेती भाव धरा एके ठायी ॥२॥
शेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती म्हैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥३॥
तुका म्हणे सुखे पाविजे अनंता । हे वर्म जाणता सुलभचि ॥४॥
अर्थ
राम कृष्ण हरी गोविंद सरळ प्रांजळ मनाने उच्चारावित. हरिकथा म्हणजे पुण्य पर्वकाळ आहे व त्या कथेमध्ये सर्व तीर्थे एवढेच काय पण समुद्र देखील स्नान करण्यात येतो या हरिनामा वर दृढ विश्वास ठेवला तर लाभ घरी बसल्या बसल्या येतात. शेळ्या-मेंढ्या, म्हशी, गाय यांची पुष्कळ सेवा करावी लागते पुष्कळ उठाठेव करावी लागते पण हरिनाम रुपी कामधेनूची सेवा करण्यात कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही हरिनामाचे सोपे वर्म जाणले तर तुम्हाला त्या अनंताची प्राप्ती आपोआपच होईल.
अभंग – १०४९
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
तयाच्या चिंतने तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥धृपद॥
देव इच्छी रज चरणींची माती । धावत चालती मागे मागे ॥२॥
काय त्या उरले वेगळे आणीक । वैकुंठनायक जया कंठी ॥३॥
तुका म्हणे देवभक्तंचा संगम । तेथे ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥
अर्थ
जो सर्वकाळ अच्युता चे नाम आपल्या वाणीने घेतो त्याचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत आहे. आणि त्याचे सतत नाम घेणाऱ्या वैष्णवाचे स्मरण जरी केले तरी कितीही दोष असले तरी त्यांचा नाश होतो. आणि तो मनुष्य हा भवसमुद्र तरुन जातो व त्याच्या सर्व पापाच्या राशी जळून जातात. देव सुद्धा त्या पवित्र वैष्णवांच्या पायाची रज म्हणजे माती आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करतो व त्याच्या मागे मागे सारखा फिरत असतो. त्या वैष्णवांच्या कंठामध्ये सदासर्वकाळ वैकुंठ नायकाचे नाम आहे व मग वैष्णवांच्या मध्ये आणि देवा मध्ये कोणता फरक उरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात गंगा आणि यमुना यांचा संगम झाला की तेथे सरस्वती गुप्त रूपाने असते तसेच देव आणि भक्त यांचा संगम झाला की तेथे नामरूपी त्रिवेणी संगम आपोआप तयार होतो.
अभंग – १०५०
पाप ताप दैन्य जाय उठाउठी । जालिया या भेटी हरीदासांची ॥१॥
ऐसे बळ नाही आणिकाचे अंगी । तपे तिर्थे जगी दान व्रत ॥धृपद॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनी त्यांचे माथा ॥२॥
भव तरावया उत्तम हे नांव । भिजो नेंदी पाव हात काही ॥३॥
तुका म्हणे मना जाले समाधान । देखिले चरण वैष्णवाचे ॥४॥
अर्थ
पाप, ताप, दैन्य हे हरिदासांच्या दर्शनाने तसेच त्यांची भेट झाली की क्षणात नाहीसे होतात. या जगामध्ये तीर्थ, दान, तप, व्रत असे अनेक साधने आहेत पण वैष्णव सारखे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते. जे हरी भक्त हरी कीर्तनामध्ये आनंदाने नचतात त्यांच्या चरणाची माती शंकर म्हणजे साक्षात भगवान महादेव आपल्या मस्तकाला लावतात आणि त्यांना वंदन करतात. हे वैष्णव म्हणजे हा भवसागर तरुन जाण्याकरता उत्तम प्रकारची नौका आहे त्या नावे मध्ये जो कोणी बसून जातो त्याचे हात व पाय देखील ते वैष्णव भिजू देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवाचे चरण पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटते.
अभंग – १०५१
येणे बोधे आम्ही असो सर्वकाळ । करू हेनिर्मळ हरीकथा ॥१॥
आम्ही भूमीवरी एक दैवाचे । निधान हे वाचे सापडले ॥धृपद॥
तरतील कुळे दोन्ही उभयता । गाता आइकता सुखरूप ॥२॥
न चळे हा मंत्र न म्हणे यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥३॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । साठवीला हाव हृदयात ॥४॥
अर्थ
हरिकथा करणे हे भाग्याचे लक्षण आहे असे समजून आम्ही निर्मळ मनाने हरिकथा करू. या पृथ्वीवर आम्हीच एक भाग्यवान आहोत कारण आम्हाला विठ्ठलनामाचे निदान सापडले आहे. विठ्ठलाचे नाम गाईले ऐकले तर माता आणि पिता या दोन्ही कुळाचा उद्धार होतो. विठ्ठल नामजप करण्याकरिता वर्णन मात्र चुकण्याची भय नाही. कोणत्याही कुळांमध्ये किंवा जाती मध्ये जन्म घेतला तरी त्या गोष्टीचा प्रश्नच नाही कोणत्याही देश कालाची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला हा माझ्या विश्रांतीचे स्थान असून मी त्याला जबरदस्तीने माझ्या हृदयात साठवीन.
अभंग – १०५२
बहुता जन्मीचे संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरीभक्त । कृपावंत मानसी ॥१॥
म्हणवी म्हणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मने विठ्ठली ॥धृपद॥
असे भूतदया मानसी । अवघा देखे हृषीकेशी । जीवे न विसंबे त्यासी । मागे मागे हिंडतसे ॥२॥
तुका म्हणे निर्वीकार । शरणागता वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तया जन्म चुकले ॥३॥
अर्थ
ज्याच्या जवळ अनेक जन्मीचे संचित आहे ज्याचे चांगले संचित आहे तोच मनुष्य खरा कृपावंत व निस्सीम हरिभक्त आहे असे समजावे. सर्वभावे विठ्ठलाला शरण जाण्याचा ध्यास धरणाऱ्या व्यक्तीच्या दासाचा ही दास विठ्ठल स्वतःला समजतो. जो भक्त विठ्ठलाला काया वाचा मनाने शरण गेलेला असतो, जे भक्त भूतमात्रांना विषयी दया धरतात आणि सर्वत्र हा ऋषिकेश आहे असे पाहतात अशा भक्तांना हा ऋषिकेश मनापासून कधीही विसरत नाही आणि त्याच्या मागे मागे सारखा फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात हा देव निर्विकार आहे आणि शरण आलेल्या भक्तांना हा वज्र पंजर आहे जे जे नर त्याला अनुसरतात त्यांची जन्म-मरणाची फेऱ चुकले आहेत.
अभंग – १०५३
तारू लागले बंदरी । चंद्रभागेचिये तिरी ॥१॥
लुटा लुटा संतजन । अमुप हे रासी धन ॥धृपद॥
जाला हरीनामाचा तारा । सीड लागले फरारा ॥२॥
तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥
अर्थ
चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर नावाचे बंदर आहे व त्या ठिकाणी विठ्ठल रुपी जहाज लागले आहे. हे संतांनो त्या विठ्ठलनाम रुपी जहाजामध्ये परमार्थ धनाच्या पुष्कळ राशी आहेत त्या तुम्ही लुटा या विठ्ठलनाम रुपी जहाजाला हरिनाम रुपये मोठे शिड लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात या हरिनाम रुपी जहाजा मध्ये ओझे वाहणारा मी एक हमाल आहे.
अभंग – १०५४
आळवीन स्वरे । कैशा मधुरा उत्तरे ॥१॥
ये वो ये वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दे गे ॥धृपद॥
पसरूनि चोची । वचन हे करुणेची ॥२॥
तुका म्हणे बळी । आम्ही लडिवाळे आळी ॥३॥
अर्थ नाही टाका तपासा
अभंग – १०५५
सकळीकांचे समाधान । नव्हे देखिल्यावाचून ॥१॥
रूप दाखवी रे आता । सहस्त्रभुजांच्या मंडिता ॥धृपद॥
शंखचक्रपद्मगदा । गरुडासहित ये गोविंदा ॥२॥
तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयना ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला तुला प्रत्यक्ष पाहिल्यावर वाचून माझे समाधान होणारच नाही. सहस्रभुजानी मंडित असलेल्या हे हरी तुम्ही मला तुमचे तेच रूप दाखवा. हे गोविंदा तुम्ही शंख, चक्र, गदा सहित गरुडावर विराजित होऊन माझ्याकडे धावत यावे. तुकाराम महाराज म्हणतात हे कान्हा तुला पाहण्याकरता माझ्या नयनांना भूक लागलेली आहे.
अभंग – १०५६
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥
तुझे रूप माझे मनी । राहो नाम जपो वाणी ॥धृपद॥
ब्रम्हांडनायका । विश्वजनांच्या पाळका ॥२॥
जीवींचिया जीवा । तुका म्हणे देवदेवा ॥३॥
अर्थ
हे पतितपावन, दीनानाथा नारायना तुझे रूप माझ्या चित्तात नेहमी राहो आणि तुझे गुण माझ्या वाणीत नेहमी येवो. हे ब्रम्हांड नायका विश्वाच्या पालका, तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देवाचे ही देव आहात आणि जीवाचे ही जीव आहात.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

