“१७ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १७ March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १७ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ९०१ ते ९१२ चे पारायण आपण करणार आहोत.
१७ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी ५१ ते ७५,
51-7
ऐसा नियतु का कंदर्पु । जो भूता या बीजरूपु । तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥51॥
योग्यांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात :- अशा नियमाने राहाणारा व प्राणिमात्रास बीजभूत असा काम, तो मी आहे.
52-7
हे एकैक किती सांगावे । आता वस्तुजातचि आघवे । मजपासूनि जाणावे । विकरले असे ॥52॥
हे एकेक तुला कोठवर सांगावे ! तर वस्तुमात्र म्हणून जे काही आहे, ते सर्व माझ्यापासून विस्तार पावले आहे असे समज.
ये चैव सात्त्विका भावा । राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेतितान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥7. 12॥
53-7
जे सात्त्विक हन भाव । का रजतमादि सर्व । ते ममरूपसंभव । वोळख तूं ॥53॥
जे सात्विक किंवा रजतमादि भाव आहेत, ते सर्व माझ्या रूपापासुनच उत्पन्न झाले आहेत हे ओळखुन ठेव.
54-7
हे जाले तरी माझांठायी । परी ययामाजी मी नाही । जैसी स्वप्नींचा डोही । जागृती न बुडे ॥54॥
ते जरी माझ्यापासून झाले आहेत, तरी मी त्यांच्यात नाही. ज्याप्रमाणे स्वप्नीच्या डोहांत जागृती बुडत नाही;
55-7
नातरी रसाचीचि सुघट । जैसी बीजकणिका तरी घनवट । परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारे ॥55॥
किंवा ज्याप्रमाणे बी (दाणा) रसाने पुर्ण भरलेले असते; परंतु त्याचेपासुन अंकुर फुटून लांकूड बनल्यावर,
56-7
मग तया काष्ठाचा ठायी । सांग पा बीजपण असे काई । तैसा मी विकारी नाही । जरी विकारला दिसे ॥56॥
मग त्या लांकडाचे ठिकाणी बिज असते का सांग बरे ? त्याचप्रमाणे सात्विकादि सर्व भाव जरी माझ्याचपासून उत्पन्न झाले आहेत, तरी त्यामध्ये मी नाही.
57-7
पै गगनी उपजे आभाळ । परी तेथ गगन नाही केवळ । अथवा आभाळी होय सलिल । तेथ अभ्र नाही ॥57॥
खरोखर, आकाशात जे ढग उत्पन्न होतात, त्यात शुद्ध आकाश नसते; किंवा ढगांत जे पाणी असते, त्या पाण्यात ढग नसतात;
58-7
मग तया उदकाचेनि आवेशे । प्रगटले तेज जे लखलखीत दिसे । तिये विजूमाजी असे । सलिल कायी ॥58॥
नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज (वीज) जे चकचकीत दिसते, त्या वीजेमध्ये पाणी असते काय ?
59-7
सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमी काय अग्नी आहे । तैसा विकारू हा मी नोहे । जरी विकारला असे ॥59॥
अग्नीपासुन जो धुर उत्पन्न होतो, त्या धुरांत अग्नी आहे का सांग बरे ? त्याचप्रमाणे, हे भाव जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, तरी ते म्हणजे मी नव्हे.
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ॥7. 13॥
60-7
परी उदकी जाली बाबुळी । ते उदकाते जैसी झाकोळी । का वायाचि आभाळी । आकाश लोपे ॥60॥
तथापि, पाण्यापासूनच उत्पन्न झालेले गोंडाळ पाण्याला झांकून टाकते, किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थ लोपले जाते;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-7
हा गा स्वप्न हे लटिके म्हणो ये । परी निद्रावशे बाणले होये । तव आठव काय देत आहे । आपणपेया ॥61॥
असे पहा की, स्वप्न हे खोटे आहे, परंतु निद्रेच्या योगाने ते खरे भासते, त्या वेळेस ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का ?
62-7
हे असो डोळ्यांचे । डोळाचि पडळ रचे । तेणे देखणेपण डोळ्यांचे । न गिळिजे कायि ॥62॥
अथवा डोळ्यातील पाण्याने उत्पन्न झालेला वडस दृष्टि बंद करीत नाही का ?
63-7
तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली । की मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ॥63॥
त्याचप्रमाणे, माझ्याच ठिकाणी प्रतिबिंबित झालेली सत्व, रज व तम या गुणांनी युक्त अशी माझी सावली (माया) पडद्याप्रमाणे माझ्याच स्वरूपाच्या आड येते.
64-7
म्हणऊनि भूते माते नेणती । माझीच परी मी नव्हती । जैसी जळीची जळी न विरती । मुक्ताफळे ॥64॥
म्हणून प्राणी मला जाणत नाहीत, आणि माझ्याचपासून उत्पन्न झालेले असुन ते मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे पाण्यापासूनच उत्पन्न झालेली मोत्ये पाण्यात मिसळत नाहीत;
65-7
पै पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेचि पृथ्वीसि मिळे जरी मिळविजे । एऱ्हवी तोचि अग्निसंगे सिजे । तरी वेगळा होय ॥65॥
अथवा मातीचा घट करुन तो (कच्चेपणी) तसाच मातीस मिळविला असता मिळतो, परंतु तोच विस्तवांत भाजल्यावर निराळा बनतो,
66-7
तैसे भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परी मायायोगे जीव- । दशे आले ॥66॥
त्याचप्रमाणे, सर्व भूतजात हे माझेच अवयव आहेत; परंतु मायेच्या योगाने जीवपणाला पावले,
67-7
म्हणोनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममताभ्रांती । विषयांध झाले ॥67॥
म्हणून माझ्यापासून उत्पन्न झाले असुन मद्रूप होत नाहीत, माझेच असुन मला ओळखीत नाहीत, व ” मी ” आणि ” माझे ” या भ्रांतीने विषयांध झालेले आहेत.
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥7. 14॥
न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ॥7. 15॥
68-7
आता महदादि हे माझी माया । उतरोनिया धनंजया । मी होइजे हे आया । कैसेनि ये ॥68॥
तेव्हा आता; धनंजया, ही महत्तत्वादि माझी माया तरुन मद्रूप व्हावे, ह्या गोष्टीचा अनुभव कसा यावा
69-7
जिये ब्रह्माचळाचा आधाडा । पहिलिया संकल्पजळाचा उभाडा । सवेचि महाभूतांचा बुडबडा । साना आला ॥69॥
कारण) जी मायानदी निर्गुण ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यात असतांनाच प्रथम तिच्या ठिकाणी संकल्परूप जलाचा उगम होऊन पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला
70-7
जे सृष्टीविस्ताराचेनि वोघे । चढत काळकलनेचेनि वेगे । प्रवृत्ति निवृत्तीची तुंगे । तटे सांडी ॥70॥
जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने कर्म व मोक्ष यांचे उंच काठ ओलांडुन पुढे चालली आहे;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-7
जे गुणघनाचेनि वृष्टिभरे । भरली मोहाचेनि महापुरे । घेऊनि जात नगरे । यमनियमांची ॥71॥
जी सत्त्वादि-गुणरूपी मेघांच्या वृष्टिने भरुन भ्रांतिरूप महापुराने यमनियमरूपी शहरे वाहून नेत आहे.
72-7
जे द्वेषाचा आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजी प्रमदादि तळपत । महामीन ॥72॥
जिच्यात द्वेषरूपी भोवरे असुन जी मत्सररूप वळणाने वहात आहे; जिच्यात उन्मत्तपणा इत्यादि मोठाले मासे तळपत आहेत;
73-7
जेथ प्रपंचाची वळणे । कर्माकर्मांची बोभाणे । वरी तरताती वोसाणे । सुखदु:खांची ॥73॥
जिच्यात प्रपंचरूपी भेदांची वळणे असुन कर्माकर्माच्या पुरामध्ये सुखदुःखरुपी केरकचरा तरंगत येऊन कडेला लागत आहे;
74-7
रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीवफेन संघाटा । सैंघ दिसे ॥74॥
रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात, व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो किंवा जीमधील विषयसुखरुपी बेटावर कामरुपी लाटा आदळून त्या ठिकाणी जीवसमुदायरुपी फेस पुष्कळ दिसत आहे;
75-7
अहंकाराचिया चळिया । वरी मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मीचिया आकळिया । उल्लाळे घेती ॥75॥
अहंकार रुपी ओघाने व विद्या, धन आणि सामर्थ्य या तीन मदांच्या उकळ्यांनी ज्या ठिकाणी विषयतरंगांच्या लाटा उसळत आहेत,
दिवस ७६ वा, १७, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९०१ ते ९१२
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
सार्थ तुकाराम गाथा ९०१ ते १०००
सार्थ तुकाराम गाथा 901 ते 1000
अभंग क्र. ९०१
संतांच्या धीक्कारे अमंगळ जिणे । विश्वशत्रु तेणे सांडी परि ॥१॥
कुळ आणि रूप वाया संवसार । गेला भरतारी मोकलिता ॥धृपद॥
मूळ राखे तया फळा काय उणे । चतुर लक्षणे राखो जाणे ॥२॥
तुका म्हणे सायास तो एके ठायी । दीप हाती तई अवघे बरे ॥३॥
अर्थ
संतानी ज्याचा धिक्कार केला आहे त्याचे जिने अमंगळ आहे व तो सर्व विश्वाचा शत्रू आहे. जर एखाद्या पतीने त्याच्या पत्नीचा त्याग केला असेल तर तिचे कुळ व रूप हे संसारिक दृष्ट्या व्यर्थ आहेत. झाडाच्या मुळाचे जर रक्षण केले तर मग झाडाला चांगली फळे येण्यास काय उणे असते. त्याप्रमाणे आपल्या हिताच्या गोष्टी रक्षण करणे व सांभाळ करणे याला चातूर म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात अंधारामध्ये हातात दिवा असावा म्हणजे जेथे प्रयत्न करायचा तेथे त्या योग्य ठिकाणी प्रयत्न करवा.
अभंग क्र. ९०२
ओले मूळ भेदी खडकाचे अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥
नव्हे ऐसे काही नाही अवघड । नाही कईवाड तोच वरि ॥धृपद॥
दोरे चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासे सेवनी विष पडे ॥२॥
तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव । जठरी बाळा वाव एकाएकी ॥३॥
अर्थ
एखाद्या झाडाचे मूळ ज्या प्रमाणे अंग भेदते त्या प्रमाणे जर आपण चंगल्या प्रकारे अभ्यास केला तर त्या च्या जीवावर कोणतेही कार्य सिद्धीस नेता येते. येथे काहीही अवघड नाही फक्त जो पर्यंत आपण त्या विषयी आभ्यास करत नाही तो पर्यंत गोष्ट अवघड वाटते. आहो साध्या दोऱ्याच्या घर्षणाने मोठ्या दगडाला चीर पडते आणि जर आपण थोडे थोडे हळू हळू विष खाल्ले तरी ते पचनी पडते. तुकाराम महाराज म्हणतात गर्भाशया मध्ये बाळाला बसण्या साठी एकेकी जागा असते का बाळ नऊ महिने बसेल एवढी जागा हळूहळू होतेच.
अभंग क्र. ९०३
अमर आहा अमर आहा । खरे की पाहा खोटे हे ॥१॥
न म्हणा देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥धृपद॥
कैचा धाक कैचा धाक । सकिळक हे आपुले ॥२॥
देवचि बरे देवचि बरे । तुका म्हणे खरे तुम्ही ॥३॥
अर्थ
अहो तुम्ही अमर आहात तुम्ही अमर आहात हे खरे आहे कि खोटे हे तुम्हीच पहा. हा पंच भुताचा देह माझा नाही असे म्हणाल तर मग तुम्हाला भरवसा कळेल. अहो सगळे काही आपणच आहोत मग भय कशाचे ? तुकाराम महाराज म्हणतात तुम्हीच तर देव आहात बरे फक्त तुम्हचे तुम्ही मूळ स्वरूप ओळखा म्हणजे तुमचे लक्षात येईल.
अभंग क्र. ९०४
काम नाही काम नाही । जालो पाही रिकामा ॥१॥
फावल्या त्या करू चेष्टा । निश्चळ दृष्टा बैसोनि ॥धृपद॥
नसत्या छंदे नसत्या छंदे । जग विनोदे विव्हळतसे ॥२॥
एकाएकी एकाएकी । तुका लोकी निराळा ॥३॥
अर्थ
मला कुठल्याही प्रकारचे काहीही कर्तव्य नाही बाकी काही काम नाही आता मी पूर्ण पणे रिकामा आहे. जे काही घडत आहे ते सर्व प्रारब्धाने घडते व मी ते फक्त निश्चळ बसून पाहण्याचे काम करत आहे. लोकांना नसते छंद लागले आहेत म्हणजे हा देह म्हणजे मी आहे व या देहा संबंधी असलेले लोक या छंदा मुळे सर्व जगाला दुखाणे त्रास होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात पण मी मात्र एकटाच आहे सर्वाना पासून निराळा आहे.
अभंग क्र. ९०५
हाती घेऊनिया काठी । तुका लागला कलेवरा पाठी ॥१॥
नेऊनि निजविले स्मशानी । माणसे जाळी ते ठाकणी ॥धृपद॥
काढिले ते ओढे । मागील उपचाराचे पुढे ॥२॥
नाही वाटो आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥३॥
याजसाठी हे निर्वाण । केले कसियेले मन ॥४॥
तुका म्हणे अनुभव बरा । नाही तरी हस्तपाय चोरा ॥५॥
अर्थ
मी हातात विवेकरुपी काठी घेऊन या पंचमहा भुताच्या देहाला मारण्या साठी त्याच्या मागे लागलो आहे. मी या देहाला ज्या ठिकाणी माणसे जळतात म्हणजे स्मशानी नेऊन निजविले आहे. या देहाने मला यामागे अनेक प्रकारचे सुख दुख भोगावयास लावले म्हणून मी त्याचा सूड घेत आहे. मला कसलेही भय वाट नाही कारण मी माझे सुख व दुख देवाला अर्पण केला आहे. याच साठी मी मनाचा विवेकाने निग्रह करून देहाचे निर्वाण केले आहे. अहंकाराला संपविले पाहिजे आणि हे जमत नसेल तर मग हे देवा निदान माझ्या हातून वाईट कर्म हि घडू देऊ नका.
अभंग क्र. ९०६
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरीरूप ॥१॥
प्रेमेछंदे नाचे डोले । हारपले देहभाव ॥धृपद॥
एकदेशी जीवकळा । हा सकळा सोयरा ॥२॥
तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळे ॥३॥
अर्थ
अहो हरी कीर्तन चांगले आहे चांगले आहे कारण हरी कीर्तन करणार्यांचे अंग हे हरी रूपाचा होतात. म्हणून त्या हरी कीर्तनत प्रेमाने आंनदाने नाचावे दोलावे मग तुमचा देह भाव आपो आप नाहीसा होईल. जीव दश हि मर्यादित असते परंतु हरी हा सर्व व्यापक आहे. तुकाराम महाराज म्हणतात द्वैत रुपी भय गेले कि त्या वेळेला फक्त देवच उरतो.
अभंग क्र. ९०७
न बोलेसी करा वाचा । उपाधीचा संबंध ॥१॥
एका तुमच्या नामाविण । अवघा सीण कळतसे ॥धृपद॥
संकल्पाचे ओढी मन । पापपुण्य सवेचि ॥२॥
तुका म्हणे नारायणी । पावो वाणी विसावा ॥३॥
अर्थ
मला कोणाशीही काहीही बोलण्याचा प्रसंग येऊ देऊ नका कारण हा सर्व उपाधीचा प्रकार आहे. आहो नारायण तुमच्या नामाविना सर्व काही व्यर्थच आहे हे मला कळले आहे. अन्य विषय कडे मन जर नेले तर पाप पुण्य होते. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून हे नारायण माझ्या वाणीला तुझ्याच ठिकाणी विसावा घेऊ दे.
अभंग क्र. ९०८
प्रारब्धा हाती जन । सुख सीण पावसे ॥१॥
करिता घायाळांचा संग । अंगे अंग माखावे ॥धृपद॥
आविसा अंगे पीडा वसे । त्यागे असे बहु सुख ॥२॥
तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥३॥
अर्थ
प्रारब्धा मुळेच लोक सुख दुख भोगतात. जखमी माणसाला जरी आपण उचलले तरी तरी त्याच्या रक्ताने आपले अंग माखले जाते. अपेक्षा धरली तर पिडाच होते म्हणून कोणतीही अपेक्षा न धरता आपेक्षाचा त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात सर्व प्रकार पाहून माझा जीव भय भीत झाला आहे म्हणून या उपाधीच्या बाहेर मी पडलो आहे.
अभंग क्र. ९०९
आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह ते पाप कैसे नव्हे ॥१॥
आपुला आपण करावा विचार । प्रसन्न ते सार मन ग्वाही ॥धृपद॥
नावे रूपे अंगी लाविला विटाळ । होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध ॥२॥
अंधळ्यासी नये देखण्याची चाली । चाले ऐसी बोली तुका बोले ॥३॥
अर्थ
विविध प्रकारच्या विषयांमुळे बुद्धीवर पडदा पडतो व बुद्धीचा लोप होतो आणि संदेह उत्पन्न होणे म्हणजे एक प्रकारचे पापच नाही काय ? त्यामुळे आपण स्वतः याविषयी विचार करून पाहावा आणि मन प्रसन्न ठेवावे मन प्रसन्न असणे हेच सर्व गोष्टीचे सार असून मन प्रसन्न आहे किंवा नाही या गोष्टीविषयी देखील मनच साक्षी आहे. आपले मन मुळात हाच निर्मळ शुद्ध बुद्ध होते परंतु नाम वर रूप यांनी युक्त असलेला देह याला “मीपणाचा” विटाळ लागला. तुकाराम महाराज म्हणतात आंधळ्या मनुष्याला स्वतः व्यवस्थित चालता येत नाही डोळस मनुष्य त्याला जसं चालवेल तसे तो चालतो त्याप्रमाणे संत आपल्याला जसे मार्गदर्शन करतील आपण तसे वागावे कारण आपण अंध आहोत व संतांना डोळे आहेत.
अभंग क्र. ९१०
जळो आता नांव रूप । माझे पाप गाठींचे ॥१॥
संताचिया चरणरजे । उतरू ओझे मातीचे ॥धृपद॥
लटिक्यांचा अभिमान । होता सीण पावविते ॥२॥
तुका म्हणे अरूपींचे । सुख साचे निनावे ॥३॥
अर्थ
माझे नांव रूप पाप हे सर्व जाळून जाओ. या देहाला मी मी म्हंटले पण हि मातीच आहे पण आता यासंतांना शरण जाऊन त्यांच्या चरण रजाने मी पानाचे ओझे उतरून जाओ. खोट्या गोष्टीचा अभिमान धरला कि व्यर्थ शीण होतो. तुकाराम महाराज म्हणतात खरे स्वरूप सुख म्हणजे अरुपाचे म्हणजे आत्म्याचे व नाम तसेच रूप रहित असण्याचे आहे.
अभंग क्र. ९११
निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥१॥
जटा राख विटंबना । धीर नाही क्षमा मना ॥धृपद॥
शृंगारिले मढे । जीवेविण जैसे कुडे ॥२॥
तुका म्हणे रागे । भलते चावळे वाउगे ॥३॥
अर्थ
आपल्या पोटासाठी आपल्या कडून अनेकांची निंदा स्तुती होते व आपल्या अनेक प्रकारची सोंगे आपल्याला दाखवी लागतात. ज्याच्या मनात धीर नाही क्षमा नाही त्या माणसाने जरी जटा अंगाला राख फासले तर ते शरीराची विटंबना आहे. ज्या प्रमाणे प्रेताला अनेक प्रेकारची वस्त्रे व शृंगार घाले तर ते व्यर्थ असते त्या प्रमाणे दांभिक माणसाचे परमार्थ व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात रागात तो दांभिक माणूस भलते सलते चावाळतो बोलतो त्या वेळी त्याची सत्य परिस्थिती समोर येते.
अभंग क्र. ९१२
भिक्षा पात्र अवलंबणे । जळो जिणे लाजिरवाणे । ऐसियासी नारायणे । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥
देवा पायी नाही भाव । भक्ती वरी वरी वाव । समर्पीला जीव । नाही तो हा व्यभिचार ॥धृपद॥
जगा घालावे साकडे । दीन होऊनि बापुडे । हेचि अभाग्य रोकडे । मूळ आणि अविश्वास ॥२॥
काय न करी विश्वंभर । सत्य करिता निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥३॥
अर्थ
देवाच्या नवा खाली जे भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागतात त्यांचे जिणे लाजिरवाणे असते त्यांच्या जगण्याला आग लागो अश्या माणसाची नारायण कायम उपेक्षा करतो. अश्या माणसांना हरीच्या चरणावर विश्वास नसतो त्यांची भक्ती म्हणजे हि वरवरची आहे जो पर्यंत हरी चरणावर दृढ श्रद्धा ठेऊन त्याच्यावर जीवन अर्पण केले जात नाही तो पर्यंत अश्या माणसांची भक्ती म्हणजे एक प्रकारचा व्यभिचार आहे. देवाच्या नवा खाली दिन होऊन जागा पुढे जगापुढे साकडे घालणे हे एक प्रकारचे अभाग्य आहे असे करण्याचे कारण त्याचा देवावर दृढ विश्वास नसणे. तुकाराम महाराज म्हणतात आहो हा विश्वंभर काय करू शकत नाही ? फक्त तुम्ही सत्य निर्धार करून या नारायणाचे चरण कमल दृढ धरा हेच सर्व सार आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

