Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१२ मार्च, दिवस ७१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ४२६ ते ४५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ८४१ ते ८५२

“१२ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १२ March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १२ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ८४१ ते ८५२ चे पारायण आपण करणार आहोत.

१२ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ४२६ ते ४५०,

426-6
आंगी योगाचे होय बळ । तरी मन केतुले चपळ ।
काय महदादि हे सकळ । आपु नोहे ॥426॥
जर योगसाधनांचे बळ अंगात असेल, तर मनाच्या चंचलतेची काय बिशाद आहे ? महत्तत्वादिक स्वाधीन होत नाहीत काय ?
427-6
तेथ अर्जुन म्हणे निके । देवो बोलती ते न चुके ।
साचचि योगबळेसी न तुके । मनोबळ ॥427॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, ” देवा आपण जे म्हणता ते खरे आहे; खरोखर योगबलापुढे मनाचे बल टिकणार नाही.
428-6
तरी तोचि योगु कैसा केवी जाणो । आम्ही येतुले दिया याची मातुही नेणो ।
म्हणोनि मनाते जी म्हणो । अनावर ॥428॥
तरी तो योग कसा आहे व कशा रीतीने जाणावा त्याची गोष्ट इतके दिवस आम्हास माहीत नव्हती; म्हणून मन हे अनावर आहे असे आम्ही म्हणत होतो.
429-6
हा आता आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादे पुरुषोत्तमा ।
योगपरिचयो आम्हा । जाहला आजी ॥429॥
पुरुषोत्तमा, तुमच्या प्रसादाने आमच्या सगळ्या जन्मांत आज योगाचा परिचय आम्हास झाला.

अर्जुन उवाच –
अयतिः श्रध्दयोपेतो योगात् चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिध्दि कां गतिं कृष्ण गच्छति ॥6. 37॥
कच्चित् नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मणः पथि ॥6. 38॥
एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्दते ॥6. 39॥

430-6
परि आणिक एक गोसाविया । मज संशयो असे साविया ।
तो तू वाचूनि फेडावया । समर्थु नाही ॥430॥
परंतु, हे प्रभो, आणखी एक संशय सहज उत्पन्न झाला आहे, तो फेडण्यास आपल्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

431-6
म्हणोनि सांगे गोविंदा । कवण एकु मोक्षपदा ।
झोंबत होता श्रध्दा । उपायेविण ॥431॥
म्हणून गोविंदा, मला सांग की, कोणी एक मनुष्य मोक्षप्राप्तीकरता भक्तियुक्त अंतःकरणाने उपायाशिवाय इच्छा करीत होता.
432-6
इद्रिंयग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटा लागला ।
आत्मसिद्धीचिया पुढिला । नगरा यावया ॥432॥
इंद्रियरूपी गावाहून निघून मोक्षरूपी गावास जाण्याकरिता तो भक्तिरूप मार्गाला लागला
433-6
आत्मसिद्धी न ठकेचि । आणि मागुते न येववेचि ।
ऐसा अस्तु गेला माझारीचि । आयुष्यभानु ॥433॥
तोच मोक्ष प्राप्त होत नाही, आणि परतही येववत नाही, अशा स्थितीत त्याचा आयुष्यरूपी सुर्य मध्येच मावळला;
434-6
जैसे अकाळी आभाळ । अळुमाळु सपातळ ।
विपाये आले केवळ । वसे ना वर्से ॥434॥
सहज अकाली आलेला लहान पातळ ढग ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टीही करीत नाही,
435-6
तैसी दोन्ही दुरावली । जे प्राप्ती तव अलग ठेली ।
आणि अप्राप्तीही सांडवली । श्रध्दा तया ॥435॥
त्याप्रमाणे, ज्याला दोन्ही अंतरली, म्हणजे मोक्षप्राप्ति तर दुरच राहीली, आणि श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारासही तो मुकला

436-6
ऐसा वोलांतरला काजी (दोंला अंतरला) का जी ।
जो श्रध्देचाचि समाजी । बुडाला तया हो जी । कवण गति ॥436॥
असा दोन्ही गोष्टींना जो मुकला, परंतु भक्तीत निमग्न झाला, त्याला कोणती गति प्राप्त होते

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥6. 41॥


441-6
ऐसे कवतिक हे कैसे । जे शतमखा लोक सायासे ।
ते तो पावे अनायासे । कैवल्यकामु ॥441॥
अरे हे कौतुक पहा, ज्या लोकांची प्राप्ती व्हावयास शंभर यज्ञ करणार्‍या इंद्रालाहि सायास पडतात, ते या मोक्षेच्छू पुरूषाला अनायासे प्राप्त होतात.
442-6
मग तेथिचे जे अमोघ । अलौकिक भोग ।
भोगितांही सांग । काटाळे मन ॥442॥
मग तेथील निष्फळ न होणारे व अनुपम असे भोग भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो.
443-6
हा अंतरायो अवचिता । का वोढवला भगवंता ।
ऐसा दिविभोग भोगिता । अनुतापी नित्य ॥443॥
तेथ दिव्य भोग भोगत असता तेथे त्यास सुख मिळत नाही, व ” हे भगवंता, हे भोगाचे विघ्न माझ्यामागे का लागले ? ” असा तो सतत पश्चाताप करीत असतो.
444-6
पाठी जन्मे संसारी । परि सकळ धर्माचिया माहेरी ।
लांबा उगवे आगरी । विभवश्रियेचा ॥444॥
नंतर तो फिरून मृत्युलोकी जन्म पावतो, पण सर्व धर्माचे माहेरघर अशा कुलात जन्म पावतो. आणि शेत कापल्यावर पडलेल्या भातगोट्याचे शेत जसे जोराने फोफावते, तशी त्याच्या ऐश्वर्याची वृद्धी होते.
445-6
जयाते नीतिपंथे चालिजे । सत्यधूत बोलिजे ।
देखावे ते देखिजे । शास्त्रदृष्टी ॥445॥
जे कुल नीतिमार्गाने चालणारे, सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि शास्त्र रीतीने वागणारे,

446-6
वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु ।
सारासारविचारु । मंत्री जयाते ॥446॥
ज्या कुलात वेद नित्य जागृत असतो व स्वधर्माचे आचरण हा ज्याचा कुलाचा व्यवसाय आणि सारासार विचार हाच मंत्री.
447-6
जयाचा कुळी चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता ।
जयाते गृहदेवता । आदि ऋध्दि ॥447॥
ज्या कुलात चिंतेने ईश्वरास वरिले, ज्या कुलात ईश्वरावाचून दुसर्‍या कशाचेही चिंतन होत नाही, आणि ज्याला संपत्ती हिच गृहदेवता आहे.
448-6
ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी ।
तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ॥448॥
असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखाची समृद्धी आहे, अशा कुलात तो योगभ्रष्ट पुरूष सुखाने जन्म घेतो.

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदिदृश्यम् ॥6. 42॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥6. 43॥

449-6
अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्य श्रोत्री ।
महासुखक्षेत्री । आदिवंत ॥449॥
अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे, व अध्यात्मसिद्धांतांत निष्णात, आणि परब्रम्हरुप गावाचे वतनदार
450-6
जे सिद्धांताचिया सिंहासनी । राज्य करिती त्रिभुवनी ।
जे कूंजते कोकिल वनी । संतोषाचा ॥450॥
जे एकमेवाद्वितीय या सिद्धांतात नेहमी निमग्न राहून त्रिभुवनाचे राज्य करतात, आणि संतोषरूप वनांत कोकिळेसारखा मधुर ध्वनि करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ७१ वा, १२, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ८४१ ते ८५२
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ८४१
आम्ही जाणो तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥
फांकु नेदू चुकाविता । नेघो थोडे बहु देता ॥धृपद॥
बहुता दिसाचे लिगाड । आले होत होत जड ॥२॥
तुका म्हणे आता । नेघो सर्वस्व ही देता ॥३॥
अर्थ

देवा आम्हाला तुझा फसविण्याचा हेतू माहीत आहेत त्यामुळे आम्ही तुझे पाय घट्ट धरलेले आहे. देवातू आम्हाला काहीतरी उगाच थोडेफार देऊन आमची एक चुकवाचूक करू लागला तर आम्ही तुला हालू देणार नाही. हे हरी आम्ही तुझी सेवा फार दिवसापासून करत आहोत आता त्या कर्जाचे लिगाड फार जड झालेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात तू ते कर्ज फेडण्या करण्याकरिता आम्हाला सर्वस्व दिले सर्व काही जरी दिले तरी ते आम्ही घेणार नाही.
अभंग क्र. ८४२
ऋण वैर हत्या । हे तो न सुटे नेंदिता ॥१॥
हे का नेणा पांडुरंगा । तुम्ही सांगतसा जगा ॥धृपद॥
माझा संबंध तो किती । चुकवा लोकाची फजिती ॥२॥
तुका म्हणे याचि साठी । मज न घेता नये तुटी ॥३॥
अर्थ
देवा एखाद्याचे घेतलेले ऋण म्हणजे कर्ज एखाद्याशी घेतलेले वैर आणि एखाद्या जीवाची केलेली हत्या हे या जन्मी जरी नाही तरी कोणत्यातरी जन्मी भोगावेच लागते. हे पांडुरंगा हे तुम्हाला माहित नाही का हे शास्त्र तर तुम्हीच लोकांना सांगताना ? देवा माझा तुमच्याशी संबंध तरी किती आहेपण लोकांमध्ये तुमची जी फजितीहोणार आहे ती फजिती तुम्ही चुकवा. तुकाराम महाराज म्हणतात याच कारणासाठी मला तुमच्याकडून कोणतेही नुसकानीचे घेणे परवडत नाही.
अभंग क्र. ८४३
नाही मागितला । तुम्हा मान म्या विठ्ठला ॥१॥
जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हाती ॥धृपद॥
नाही केला पोट । पुढे घालूनि बोभाट ॥२॥
तुका म्हणे धरूनि हात । नाही नेले दिवाणात ॥३॥
अर्थ

हे विठ्ठला मी तुमच्याकडे काही मान मागितला नव्हता. असे असूनदेखील मला लोकांकाडून सन्मान मिळतो आहे तो देऊन माझी तुम्ही फजिती का करतात ? माझे पोट भरत नाही म्हणून मी तुमच्या नावाचा बोभाटा कधीही या जनमानसात केलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे असूनदेखील मी कधीही तुमचा हात धरून संतांच्या कचेरीत मी तुम्हाला कधी नेले नाही.
अभंग क्र. ८४४
तू पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिका त्याहुनि ॥१॥
म्हणोनि तुझ्या दारा । न येती ठकती दातारा ॥धृपद॥
तुझी ठावी नांदणूक । अवघा बुडविला लौकीक ॥२॥
तुका म्हणे ज्याचे घेसी । त्यास हेचि दाखविसी ॥३॥
अर्थ

देवा तू त्या पाढऱ्या स्फटिक मन्याप्रमाणे आहेस आणि तुझ्याकडे जो कोणी येईल तुम्ही त्यालाही तू तुझ्याप्रमाणेच त्या पाढऱ्या स्फटिक मन्याप्रमाणे करतोस. तू मोठा दातारा आहेस पण ठकविणारा आहे त्यामुळे तुझ्या दारात कोणी येत नाही. देवातुझी वागणूक आम्हाला चांगलीच माहित आहे तुझ्या अशा वागण्यामुळे तुझा लौकिक तू बुडविला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू ज्याच्याकडून सेवा रुपी कर्ज घेतो त्याला ही माझ्याकडे काही नाही असे दाखवितोस.
अभंग क्र. ८४५
बोलतो निकुरे । नव्हती सलगीची उत्तरे ॥१॥
मागे संतापले मन । परपीडा ऐकोन ॥धृपद॥
अंगावरी आले । तोवरी जाईल सोसिले ॥२॥
तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथे ठेवा ॥३॥
अर्थ
देवा मी तुझ्याजवळ आता अतिशय निकराने म्हणजे तळमळीने बोलत आहे माझे हे बोलणे सलगीचे म्हणजे प्रेमाचे बोलणे नाही. कारण तू तुझ्या भक्तांशी ज्या प्रमाणे वागत आहे ते एकूण माझे मन संतापले आहेत. देवा माझ्यावर संकट आले जोपर्यंत मला सहन होईल तोपर्यंत मी ते सहन करीन पण दुसऱ्याला होत असलेले दुःख मला सहन होत नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझ्या दाराशी येथेच ओरडत तुला ठेवायचे असेल तर तुला तुझ्या भक्ताची ज्ञानदेवाची शपत आहे.
अभंग क्र. ८४६
बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठविता चित्ती काय नव्हे ॥१॥
आणिका उपाया कोण वाटी मन । सुखाचे निधान पांडुरंग ॥धृपद॥
गीत गावो नाचो छंदे वावो टाळी । वैष्णवाचे मेळी सुखरूप ॥२॥
अनंत ब्रम्हांडे एके रोमावळी । आम्ही केला भोळी भावे उभा ॥३॥
लटिका हा केला संवसारसिंधु । मोक्ष खरा बंधु नाही पुढे ॥४॥
तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलो निश्चिंत त्याच्या बळे ॥५॥
अर्थ
लक्ष्मीचा पती हा बुद्धीचा जनिता आहे मग त्याला जर चित्ता आठविले तर मग काय साध्य होणार नाही ? पांडुरंग हाच सर्व सुखाचे निदान आहे त्यामुळे त्याच्यावाचून दुसर्‍या ठिकाणी आम्ही आमच्या मनाची वाटणी का व कोणी करावी ? आम्ही वैष्णवांच्या मेळ्यांमध्ये सुखाने या हरीचे गीत गाऊ आनंदाने नाचू आणि त्या सुख छंदांमध्ये ताली वाजवू. ज्याच्या एका रोमा वर अनंत ब्रह्मांड आहेत असा हा आमचा विठ्ठल परमात्मा त्याला आम्ही आमच्या भक्तिभावाच्या जोरावर विटेवर उभा केलेला आहे. आम्ही आमच्या भक्तीच्या जोरावर हा संसार सिंधू व्यर्थ ठरविला आहे त्यामुळे आम्हाला मोक्ष आणि बंध राहिलाच नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे आम्ही अंकित म्हणजे दास झालेलो आहोत त्याच्याच बळावर आम्ही निश्चिंत झालो आहोत.
अभंग क्र. ८४७
न लगे मायेसी बाळे निरवावे । आपुल्या स्वभावे ओढे त्यासी ॥१॥
मज का लागला करणे विचार । ज्याचा जार भार त्याचे माथा ॥धृपद॥
गोड धड त्यासी ठेवी न मगता । समाधान खाता नेदी मना ॥२॥
खेळता गुंतले उमगूनी आणी । बैसोनिया स्तनी लावी बळे ॥३॥
त्याच्या दुःखेपणे आपणा खापरी । लाही तळी वरी होय जैसी ॥४॥
तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागो नेदी ॥५॥
अर्थ

मुलाचे रक्षण करावे असे आईला कधीही सांगावे लागत नाही तिचा स्वभावच प्रेमाचा असल्याने ती आपोआपच बाळाचे रक्षण करते बाळाचे रक्षण करण्यास ओढ घेते. जो विश्वाचा जनिता ज्याने मला जन्माला घातले त्याच्याच माथ्यावर माझे सर्व जड भार आहे, मग मला कुठलाही विचार करण्याची काहीही गरज नाही. जर घरात आईने गोड धोड पदार्थ केले तर ते पदार्थ आई मुलासाठी जतन करून ठेवते मुलाला सोडून खाणे हे आई समाधानकारक नसते त्यात आईचे समाधानही होत नाही. बालक जर खेळात गुंतलेले असेल तर आई त्याला शोधून आणते आणि आई त्याला खाऊ घालते. जर मुलाला दुःख झाले तर आई त्यांच्या दुखत असते तर जर एखाद्या खापरीत जश्या लाह्या तडतडत असतात, त्या प्रमाणे आईचे चित्त त्या मुला बद्दल तडफडत असते. तुकाराम महाराज म्हणतात मुलांना कसल्याही प्रकारचे आघात त्रास होऊ नये या साठी ती माऊली आपला देह भाव विसरत असते आणि त्या मुलांना जपत असते.
अभंग क्र. ८४८
ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धी । पाहा श्रुतीमधी विचारूनि ॥१॥
जयासी नावडे हरीनाम कीर्तन । आणीक नर्तन वैष्णवाचे ॥धृपद॥
सत्य त्याचे वेळे घडीला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥२॥
तुका म्हणे येथे मानी आनसारिखे । तात्काळ तो मुखे कुष्ट होय ॥३॥
अर्थ –

ज्याला हरिनाम, कीर्तन आणि वैष्णवाचे नृत्य आवडत नाही, तो ब्राह्मणच नाही. श्रुतीमध्ये म्हणजेच वेदांमध्येच हे लिहिले आहे. हरीनाम, कीर्तन न आवडणारा मनुष्य ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो खरोखर ब्राह्मण असणे शक्य नाही. त्याच्या मातेने अंत्यजाशी व्याभिचार करूनच त्याल जन्माला घातले असले पाहिजे. तुकोबा म्हणतात की, अशा माणसाचे मुख तात्काळ कुष्टाचे होईल.
अभंग क्र. ८४९
ब्राम्हण तो याती अंत्यज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥
रामकृष्णनामे उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ॥धृपद॥
शांति क्षमा दया अळंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ॥२॥
तुका म्हणे गेल्या षडऊर्मी अंगे । सांडुनिया मग ब्राम्‍हण तो ॥३॥
अर्थ

एखाद्या नीच जातीच्या अंत्यजाचा व्यक्ती असेल व तो शुध्द मनाने राम नाम हरीनाम उच्चारीत असेल त्या सावळ्या हरीचे रूप मनात स्मरण करीत असेल तर त्याला नीच कुळातील न मानता त्यालाही उच्च कुळातील समजावे. शांती, क्षमा, दया हे अळंकार त्याच्या जवळ असतात म्हणून तो कोणत्याही प्रसंगी भंगत नाही कोणत्याही प्रसंगाला धैर्‍याने सामोरे जातो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंगातून गर्व गेला असेल मग तो ब्रम्ह्न उच्च कुळी समजावा.
अभंग क्र. ८५०
एक करिती गुरु गुरु । भोवता भारु शिष्यांचा ॥१॥
पुंस नाही पाय चारी । मनुष्य परी कुतरी ती ॥धृपद॥
परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविले ॥२॥
तुका म्हणे निर्भर चित्ती । अधोगती जावया ॥३॥
अर्थ

असी कित्येक लोक आहेत कि जे आपल्या भोवती शिष्यांचा समुदाय गोळा करतात व स्वतःला गुरु गुरु असे म्हन्विण्यात धन्यता मानतात अश्या या खोटे पणाने भरलेल्या माणसांना मनुष्य न मानता शेपूट नसलेले चार पायाचे कुत्रे समजावे. असेहे कुत्रे परस्त्री गमन, मद्य, पान खाणे, पसंद करतात. तुकाराम महाराज म्हणतात या अश्या माणसांना आपण पुढे अधोगतीला जाणार आहोत यांची काळजी वाटत नाही.
अभंग क्र. ८५१
एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरी ॥१॥
पाप न लगे धुंडावे । लागेल तेणे तेथे जावे ॥धृपद॥
काही दुसरा विचार । न लगे करावाचि फार ॥२॥
असत्य जे वाणी । तेथे पापाचीच खाणी ॥३॥
सत्य बोले मुखे । तेथे उचंबळती सुखे ॥४॥
तुका म्हणे दोन्ही । जवळीच लाभहानी ॥५॥
अर्थ

एका पुरुषाला दोन बायका असतील तर त्याच्या घरामध्ये पाप वसत असते. पाप कोठेही शोधायची गरज नाही. ज्याला पाप शोधायचे असेल त्याने तेथे जावे. या संबंधीत दुसरे काही करायची गरज नाही. नेहमी जो खोटे बोलतो त्याच्या मुखात पाप निर्माण करणारी खाण आहे. जे नेहमी सत्य बोलतात त्यांच्या ठिकाणी सुख हे उचंबळून राहत असते. तुकाराम महाराज म्हणतात सत्य आणि असत्य हे दोन्ही आपल्या जवळ असते सत्याने वागले तर लाभ होतो आणि असत्याने वागले तर हानी होते.
अभंग क्र. ८५२
जळते संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥१॥
माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळा मनी ध्याय ॥धृपद॥
नेदी कर्म घडो । कोडे आडराणे पडो ॥२॥
तुका म्हणे मळ । राहो नेदी ताप जाळ ॥३॥
अर्थ

धर्म नीती मध्ये असे सांगितले आहे कि देवाच्या चिंतनाने सर्व संचित कर्म जाळून जाते. म्हणून माझ्या विठोबाचे चरणकमल नित्य स्मरावे. असे केले तर त्यामुळे तुमच्या हातून कोणतेही पाप कर्म होणार नाही. कोणत्याही प्रकारे तुम्ही कुमार्गाला जाणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या अंतःकरणात कुठल्याही अविद्येचा मळ राहणार नाहीत, कुठल्याही प्रकारचे त्रिविध ताप राहणार नाहीत, फक्त तुम्ही माझ्या विठोबाचे चरण कमल स्मरण करत जा.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version