आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग ८, (२९ ते ३२)
राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! ऊर्मिला !!!
!!! उर्मिला !!!
भाग – २९.
भरताचे मनापासूनचे बोलणे ऐकून सर्वांचे मत त्याच्याविषयी प्रतिकुल झाले.उर्मिलेने सुटकेचा निःश्वास सोडला. भरत सुमंताला म्हणाले,उद्याच प्रस्थान करायच्या दृष्टीने तयारी करा.दोन्ही माता, सर्व गुरुवर्य,व तुम्ही माझ्याबरोबर यावं अशी विनंती करतो.राणी कैकयी इथेच थांबेल.सभा संपल्यावर उर्मिला तिच्या प्रासादाकडे निघाली असतां,भरताने तिला अडवत म्हणाले,मला क्षमा कर! कशाबद्दल?तुमच्याबद्दल माझ्या मनांत कधीच अविश्वास नव्हता.जे घडलं त्यात तुमचा सहभाग नव्हता हे जसं मला माहित आहे,तसच लवकरच जगालाही कळेल.रामाप्रती तुमची निष्ठा सर्वश्रुत आहे.उर्मिला,या सार्यात तूं जास्त दुखावल्या गेली आहेस,तेही माझ्या माते मुळे.नाही भरता! रामामागे जाण्याचा निर्णय सर्वस्वी स्वतः लक्ष्मणाचा होता. मातेला दोष देऊ नका.
नाही उर्मिला,या सर्वासाठी मी अपराधी आहे.रामाला परत आणणे माझे एकमेव ध्येय आहे.तो परत नाही आला तर मी ही तिथेच थांबेन.भरत स्वतःची ज्या प्रकारे अवहेलना करीत होता,ते पाहून उर्मिला कळवळली.म्हणाली,तुम्ही कांहीच केले नाही,नका स्वतःवर अन्याय करु.मग राम,लक्ष्मण,सीतानेही अपराध केलेला नाही.कुणी तरी केलेल्या पापाचं मुल्य आपण सारेच चुकवत आहोत,तूंं येणार ना बरोबर?ऐकून लक्ष्मणाची भेट होईल याचा तिला आनंद झाला,पण लगेच भानावर आली.आवंढा गिळत मोठ्या कष्टाने नकार देत म्हणाली,तुम्ही च त्यांना परत आणा.सोबत चलण्याचा आग्रह करुं नका.भरता!तुमच्याप्रमाणेच कैकयीमाता पश्चातापाच्या आगीत होरपळत आहे.तीला सोबत न्या.एक संधी…शक्य नाही.उर्मिला शांतपणे म्हणाली,घेऊन जा भरता!कदाचित तीच रामाचे परत येण्यासाठी मन वळवू शकेल राम परत येईल हे इतके सोपे वाटते का तुला?पित्याला दिलेलं वचन जपनं हाच रामाचा सन्मान आहे.म्हणूनच कैकयी मातेला सोबत न्या.कदाचित…
सर्वांनुमते गुरु वसिष्ठ,तीन राण्या, भरत शत्रृघ्न,या सर्वानी जायचे निश्चित केले.उर्मिला येत असली तरच आपण जाऊ अशी अट सुमित्राने घातल्यामुळे उर्मिलाची द्विधा मनःस्थिती झाली.तिच्या मनात वादळ ऊठलं.तिने स्वतःला सावरत म्हणाली,आतां परत निरोप घेणे मला सहन होणार नाही.परत मला त्या सार्यातून जायला नका हो भाग पाडू! निदान त्याची भेट घेण्यासाठीच चल. पुढील वियोगाचा प्रदीर्घ काळ सहन करण्याचे धैर्य तुला मिळेल.अखेर जाण्यास तयार झाली.
चित्रकुट पर्वतावर चढणारा लवाजमा,भरताच्या रथावर फडकणारा ध्वज,अश्वदल,गजदल,मेणे,अनेक रथ पाहून कुटीबाहेर उभ्या असलेल्या लक्ष्मणाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या इतक्या दुरुनही उर्मिलेला स्पष्ट दिसल्या. त्यांची विचारपध्दती लक्षात घेता,भरत त्यांचा पडाव करण्याकरीतांच येत आहे असा संशय आला असणार.निरपराध भरत व त्यांच्यामधे रक्तरंजित युध्द होणार की काय ही भीती तिच्या मनांत डोकावली.पण क्षणभरच!राम कदापी होऊ देणार नाही याची खात्री होती.
सर्व लवाजमा,तीन राण्यांसह उर्मिलाही रामाच्या कुटीजवळ पोहचले. रामाला पित्याच्या मृत्युची खबर ऐकून अतिशय दुःख झाले.विधवा वेषात राण्यां ना बघून सीता श्वास घ्यायचीच विसरली. समोर पुत्राला बघून कौसल्याने रामाकडे धाव घेतली,त्यांच्या कणखर मिठीत ती धाय मोकलून रडू लागली.लक्ष्मण आपल्या मातेकडे गेले.इतक्या दिवसांत प्रथमच सुमित्रा अश्रू ढाळू लागली.
जेष्ठपुत्र या नात्याने मंदाकिनी नदी तीरी चारही भावांनी मृत पित्याच्या आत्माच्या मुक्तीसाठी यथायोग्य विधी पार पाडल्यावर शोकाकुल मनःस्थितीत सर्वजण कुटीत परत आले.उर्मिलाने सीते ला घट्ट मिठी मारली.सीता म्हणाली, किती एकटी पडलीस ग तू!स्वतःचे दुःख बाजूला ठेवून खंबीरपणे सर्वांना आधार दिलास.पण कधी चकार शब्दही उच्चारला नसशील,निष्कारण तुला विरह यातना भोगाव्या लागत आहे.ती बोलत सीतेशी असली तरी तिचे सारे लक्ष लक्ष्मणाकडे लागले होते.आपण इथे येण्यात चुक तर केली नाही ना?रामाने अयोध्येस परतण्यासाठी त्यांच मन वळव ण्यासाठी सर्वजण आले होते.आपण मात्र केवळ लक्ष्मणाला पहायला आलोय
शत्रृघ्नशी बोलत असणार्या आपल्या पतीकडे तिने बघितले.त्याला बघून एक मासाहून अधिक काळ लोटला होता.निघतांना रथावर आरुढ झाल्यावर एकदाही त्यांनी मागे वळून बघीतले नव्हते.तो त्यांचा शेवटचा निरोप होता कां आपण आलेलं त्यांना आवडलं नसेल कां भेटण्याची इच्छा नसेल का?गेल्या कित्येक दिवसांचा मनावरील ताण सहन करत असल्यामुळे आतां आणखी सहन शक्ती नव्हती तिच्यात….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २०-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग -३०.
लक्ष्मण इकडेच येतांना पाहून, कैकयीमातेची भेट घेते म्हणून सीता लगबगीने उठून गेली.लक्ष्मण समीप आल्यावर उर्मिलेच्या मनात शंका डोकावली ,आपल्याला इथे पाहून चिडले तर नसतील ना?तिला हळूवार आवाजात लक्ष्मण म्हणाले,मी एवढा भयावह दिसतो का?धास्तावून बघत आहेस.हे ऐकताच तिचे गाल आरक्त झाले.धास्ताव ले नाही,पण मी इथे आलेले तुम्हाला आवडले नसावं अशी भीती वाटत होती. असं कां म्हणतेस?उलट तुला बघून खुप आनंद झाला.मिला,तुम्ही सर्वजण कां आलात?रामाला स्वगृही नेण्यासाठी. त्यांचेवर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करणं भरताचं एकमेव ध्येय आहे.राजपद स्विकारायला त्यांनी ठाम नकार दिलाय! लक्ष्मण म्हणाले,मला नाही वाटत राम परत जाईल.पित्याला दिलेलं वचन तो कधीच मोडणार नाही.कैकयीमातेने विनवले तरीही? होय!तुमचं काय? निःश्वास सोडत लक्ष्मण म्हणाले,मिला ज्याचं उत्तर मी देऊ शकत नाही असे प्रश्न विचारु नकोस.तुला इथे अनपेक्षित बघून फार आनंद झाला.तुला डोळे भरुन पाहू दे मिला.तूं जेवढी सुंदर आहेस,तेवढीच कणखर व विद्वानही!मला तुझा इतका अभिमान वाटतो की,तुझ्यापुढे खुजा वाटतो.
माता सुमित्रा,भरत,शत्रृघ्न कडून तुझ्याबद्दल सर्व समजले आहे.अचानक कोसळलेल्या विपत्तीमधे तूं कशी ठाम उभी राहून,एखादी खवळलेली सिंहीण जशी इपल्या शावकाचं रक्षण करेल तसचं तूं आपल्या कुटुंबाचं केलस.कर्तव्य दक्ष स्नुषा,धूर्त प्रशासक,चतूर शांतीदूत अशा विविध भूमिका एकाचवेळी पार पाडल्यास.मी मात्र वेदनेशिवाय तुला कांहीच दिले नाही.असं कां म्हणता?तुम्ही जसं तुमचं कर्तव्य पार पाडत आहात तसच माझ!तुम्ही स्वतःचा विचार न करतां,निःस्वार्थपणे राम,सीताची सेवा करतां,मला अभिमान आहे.मिला,तू खरच आलीस?मी स्वप्नात तर नाही ना? मिला,तुझी आठवण येऊ नये म्हणून पराकोटीचे शारिरीक श्रम करतो तरी सुध्दा क्षणभरही विसर पडत नाही.तूं सोबत असल्याची भावना जाणवते. आणि शांत होतो.दैवानं हिरावलेल्या क्षणांची जाणीव होऊन एकमेकांकडे पाहत असतांनाच शत्रृघ्न विशीष्ट चर्चा करण्यासाठी रामकुटीत बोलवायला आला.
रामकुटीत सर्व विराजमान झाल्या वर,रामाने प्रश्न केला,भरता,राजकर्तव्या कडे दुर्लक्ष करुन ससैन्य इथे कां आलास बंधू,तूं राजकर्तव्याचा उल्लेख केलास, पण मी राजा नाही.राजा तूं आहेस.तुला विनंती नव्हे याचना करण्यास आलोय!तूं आमच्यासवे येऊन राजपदाचा स्विकार कर,तो तुझाच अधिकार आहे.
नाही!तातांच्या इच्छेनुसार ते हा अधिकार कुणालाही देऊ शकत होते. आणि त्यांनी तुझी निवड.. त्यांच वाक्य मधेच तोडून भरत म्हणाले,ते सर्व त्यांच्या इच्छेविरुध्द झाले हे तुलाही माहित आहे. राजमुकुट शिरावर घेण्यापासून माझी मुक्तता कर.विश्वासघातकी म्हणून होणार्या संभवणातून मला मोकळं कर! भरताच्या प्रत्येक शब्दागणिक रामाचा निश्चय अधिक दृढ झाला.वनात जशी मला लक्ष्मणाची साथ आहे,तशीच तुला शत्रृघ्नची राज्यकारभारात मिळेल.आपण दोघेही ठरवलेल्या मार्गाने जाऊयात.
शेवटी राजगुरु वसिष्ठ हस्तक्षेप करीत म्हणाले,मी राजगुरु या नात्याने सांगतो,तूं अयोध्येत येऊन सिंहासनाचा स्विकार कर.तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता राजा दशरथांच्या मृत्युमुळे फार मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे.गुरुवर्य!मी पिताश्रींना दिलेले वचन मला पाळावेच लागेल.कैकयी म्हणाली,ते वचन त्यांनी मला दिले होते,ते मी परत घेऊ शकत नाही कां?माझ्या पापाचं परिमार्जन होऊ शकत नाही का?पुत्रा,माझे अपराध पोटात घाल आणि स्वगृही परत चल. माते,मी कोणालाही दोषी समजत नाही. निश्चितच भविष्यात कांही तरी कारण असेल.नियतीने ठरवल्याप्रमाणे मला वागू दे.भरतही तेवढ्याच ठामपणे म्हणाले,जोवर तूं अयोध्येत परत येत नाही,तोवर मी अन्नत्याग करीन.भरताऽ असा बालिशपणा नको करुस.धर्माला अनुसरुन तात्काळ परत जाऊन योग्य प्रकारे राज्य सांभाळ कठोर शब्दात राम म्हणाले.भरत म्हणाले,तातांचे वचनच पाळायचे तर मी वनवास पत्करतो तू राजसिंहासन ग्रहण कर!
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि.२०-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग -३१.
दोघां भावांमधील वाद संपण्याचे चिन्हे दिसेना तेव्हा गुरु वसिष्ठांनी मधला मार्ग काढत म्हणाले,भरत रामाचा प्रतिनिधी म्हणून राज्य सांभाळेल आणि १४ वर्ष वनात राम पूर्ण करेल.शेवटी अनिच्छेने भरतने रामाच्या पादुका मागीतला.त्या सिंहासनावर ठेवून तुझ्या वतीने रामराज्य सांभाळेन आणि तूं येई पर्यंत शरयू नदीच्या तीरावर संन्यस्त जीवन कंठीत नंदीग्रामात वास्तव्य करेन. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे १४ वर्षे संपल्याबरोबर तूं प्रथम माझ्याकडे येशील अन्यथा मी प्राणत्याग करेन…..
हे ऐकून उर्मिला संतापली.जे तिच्या नशीबी आलं तेच मांडवीच्या बाबतीत घडणार.आवेगाने ती कडाडली. भरता, झालं ना तुमच्या मनाप्रमाणे.राम व लक्ष्मणा प्रमाणे तुम्हीही सन्यस्त जीवन जगा.या कालावधीत तुमच्या पत्नीची, कुटुंबाची कांही कां अवस्था होई ना तुम्हा ला काय देणं घेणं.आज इथे सर्वच धर्मा च्या गोष्टी करत आहेत,पत्नीप्रती कांहीच धर्म नाही कां?धर्म फक्त पिता,पुत्र,बंधू बाबतच पाळायचा असतो कां?
उर्मिलेच्या आवेशपूर्ण संतापी बोलणे ऐकून गुरु कश्यप म्हणाले,ही जनकांची राजसभा नाही.तिथे बायका वादविवाद,चर्चा करुं शकतात,तसं इथे होणार नाही.उर्मिलाचा चेहरा संतापाने लाल झाला तरी संयम ठेवत म्हणाली, गुरुदेव!मी फक्त जनकराजाचीच कन्या नाही तर,सुप्रसिध्द इक्ष्वाकू कुळाची सून आहे.त्या नात्याने मी एक प्रश्न विचारते, पत्नीप्रती व मातेप्रती काय धर्म आहे? ते निरुत्तर झाले.म्हणाले,इथे वैयक्तीक चर्चा नको.राजा दशसथांनी पत्नीच्या इच्छेला मान देऊन रामाला १४ वर्षे वनवासात पाठवले.मग रामाऐवजी आपला पुत्र भरतासाठी राज्य मागीतले हे वैयक्तीक नाही का?राजाज्ञेविरुध्द बंड करण्याचे सामर्थ्य लक्ष्मणांत असून देखील ते रामा बरोबर वनवासात गेले.भरतांनी इथे येऊन रामांना परतण्याचा आग्रह करत आहेत हे वैयक्तीक नाही कां?
मी परत परत विचारेन,पत्नी आणि मातेप्रती पुरुषाचे कांहीच कर्तव्य नसतात कां? आपल्या पुत्रांचं दुःख सहन करणे राण्यांच्या नशीबात कां?माता कौसल्याच्या आयुष्यात कोणी शांती व अर्थ देऊ शकेल कां? माता सुमित्राचे मूक अश्रू कुणाला दिसतील कां? माता कैकयीचा दुष्टपणा तेवढा दिसतो पण तीला होणारा पश्चाताप आणि अश्रू कुणालाच दिसत नाही का?राज्य आणि प्रजाजन यांचेबाबतीत न्याय्य भूमिका घेण्याबाबत हे घराणे सुप्रसिध्द आहे, मात्र कुटुंबियांच्या बाबतीत विशेषतः स्रीयांच्या बाबतीत सर्वाधिक क्रौर्याने वागतात.न्याय केवळ आंधळाच नाही तर मुका बहिराही होतो.आज प्रत्येक व्यक्ती माता कैकयीचे वाभाडे काढत आहे,पण जेव्हा तीने आपल्या दोन वरदानांची मागणी केली,तेव्हाकां कोणीच विरोधात उभं राहिलं नाही.दोन राण्या, मंत्रीगण, राजगुरु, आणि सर्व गुरुवर्य,सर्व जेष्ठ मंडळी काय करत होती?कां कोणीच खंडण केलं नाही?रामांनी गृहत्याग करु नये
म्हणून कोणीच कां नाही थांबवले?वनात असुरांच भय,धोका आहे हे माहित असून ही सीताला थांबवण्याचा कां प्रयत्न केला नाही?त्यावर सीता कांही बोलणार हे लक्षात आल्यावर आधीच उर्मिला म्हणाली,तूं म्हणशील हा माझा ऐच्छिक निर्णय होता.राम लक्ष्मणांचही तेच म्हणणं असेल पण,असे निघून गेल्यावर तुमच्या माघारी तुमचे कर्तव्य ज्यांना पार पाडावी लागणार आणि ज्यांना तुम्ही मागे सोडले त्यांचा विचार केला कां?
विवाहात दिलेली वचने जर पाळायची नव्हती तर कां विवाहबध्द झालात?कदाचित तुम्ही सर्वौत्तम राजपुत्र सर्वोत्तम पुत्र,आदर्श बंधू आणि आदर्श राजे असालही,परंतु आदर्श पती मात्र नाही.त्याच त्वेषात उर्मिला म्हणाली, गुरुवर्य कश्यपजी,आपण म्हणालात ते योग्य आहे.अयोध्या मिथिला होऊ शकत नाही.मिथिला स्रीयांना इतकं अनादारानं कधीच वागवत नाही.कोणत्याही क्षणी रडू कोसळेलसे वाटल्याने ती कुटीबाहेर निघून गेली.
मिला थांब!अशी माझ्यापासून पळून जाऊ नकोस.हे ऐकताच त्यांच्या संतापाचा सामना करावा लागेल म्हणून तयार होऊन गर्रकन मागे वळली.कुटी मधे तिचा उद्रेक होत असतांना लक्ष्मण अवाक्षरही बोलले नव्हते.त्यांच्या चेहर्या वरचे हसू बघून ती आवाक् झाली.तुम्ही कां हसतां?मी जे बोलले त्याचा मला मुळीच पश्चाताप नाही.मी हे सर्व मांडवी करितां बोलले,अर्थात त्याचा उपयोग होणार नाही हे जाणून आहे.नाही मिला, मी हसत नाहीय.अखेर तूं व्यक्त झालीस तर!तुझा प्रत्येक मुद्दा मला आवडला. तूं माझी शूरवीर पत्नी आहेस.पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो.असं बोलण्याचं धारिष्ट्य केवळ तुझ्यातच आहे.राज्यभिषे काच्या त्या दिवशी आपल्यात किंचित झालेल्या वादानंतर तूं व्यक्त होण्याची वाट बघत होतो.त्यांच असलेलं आत्यांतिक प्रेम बघून ती कासावीस झाली.ते पुन्हा दूर जाणार होते.पुन्हा हा प्रदीर्घ निरोप ठरणार होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २०-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग -३२.
चौदा वर्ष सातत्याने होऊ घातलेला विरह,मनांत साचलेला संताप,तिरस्कार, चिंता,भ्रमनिरस या सार्यांचा उद्रेक, निचरा झाल्यामुळे उर्मिलाला आतां मोकळं मोकळं वाटत होतं.येणारा हुंदका दाबत म्हणाली,आतां मी अंतर्बाह्य शुध्द झाले.आतां केवळ डोळे मिटून गाढ झोपी जायचय!
घोगर्या आवाजात लक्ष्मण म्हणाले,तुझी झोप माझ्या बरोबर असावीशी वाटते.म्हणजे तुम्ही प्रत्येक रात्री निद्राधीन होतील,तेव्हा दक्ष राहाल. झोपेच्या मोबदल्यात माझी विश्रांती, सहजता आणि प्रेम देते,चालेल मिला! मला ही झोप नेहमीच त्रासदायक वाटते. व्यक्ती कितीही समर्थ असला तरी,झोपे साठी त्याला आडवं व्हावच लागते.हे ऐकून तिला खुदकन हसू आले.तिचे हसू बघून लक्ष्मण म्हणाले,प्रिये,अशीच हसत रहा असे म्हणून वेदनेने पिळवटल्या मुखा ने वळून चालूं लागले.तिने डोळे मिटून घेतले.नैराशग्रस्त भविष्य तिच्यासमोर उभं होतं.तिची प्रदीर्घ झोप आता सुरु झाली होती.
उर्मिला चित्र रंगवित होती. कुंचला झरझर फिरत होता आणि विचार ही!लक्ष्मणाचे विचार तिच्या मनांतून क्षण भरही दूर होत नव्हते.समोरच्या ताटातील एकही घास पोटात गेला नव्हता.राज परिवारात प्रत्येकाचीच अशी अवस्था होती.एकत्र भोजन घेणे भूतकाळात जमा झाले होते.प्रत्येकाने आपल्या कक्षा त कोंडून घेतले होते.नंदीग्रामला जाऊन भरताला तीन महिने झाले होते.मांडवीला त्याच्या निर्णयाने धक्का बसला होता. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवतेवेळी ती उपस्थित नव्हती,त्यामुळे मंत्रीगण नाराज झाले होते.स्वघोषित संन्यास्ततत्व अवलंबवल्यावर भरताने वल्कलं धारण केले होते.त्यावेषात भरताला बघून मांडवीला अतिशय वाईट वाटले.नेमकं दोघांमधे काय झालं हे कोणालाच कळलं नाही मात्र त्या दिवसापासून मांडवीने स्वतःला घट्ट मिटून घेतले.बाह्य जगाशी संबंध तोडून टाकले.तिला या अवस्थेतून बाहेर काढण्याचा कीर्ती व उर्मिलाने आटोकाट प्रयत्न केला,पण व्यर्थ!शत्रृघ्न मात्र सर्वाधिक व्यस्त होता.राज्यकारभारात लक्ष घालणे,रात्री नगरातून फेरफटका मारणं हा त्याचा नित्य परिपाठ होता.तरी वेळात वेळ तीन्ही मातांसाठी काढत होता.
चित्रकुट पर्वताहून रामाची भेट घेऊन आल्यावर कौसल्याची प्रकृती अधिक खालावली.दुःखामुळे प्रत्येकजण हरवल्यासारखा झाला होता.उर्मिलाही दुःखाने थकली होती.पण तिने या दुःखद एकांतातून बाहेर पडण्याचे ठरविले. सकाळी ती उपनिषद,वेदांचा अभ्यास करीत असे.गुरु वसिष्ठासमवेत अध्ययन, नंतर चित्र रंगवण्यात वेळ घालवी.
एक दिवस ती अशीच चित्र रंगवित बसली असतां,तिला विवाहानंतर ची गोष्ट आठवली.दासीने भोजनाचे ताट त्यांच्या कक्षात आणल्यावर,उर्मिलाने विचारले,इथे एकत्र बसून भोजन करण्या चा प्रघात नाही का?लक्ष्मण निर्विकार पणे म्हणाले,आम्ही आपपल्या कक्षातच जेवन घेतो.महाराज मात्र रोज एका राणी बरोबर जेवण घेण्याची संवय ते आवर्जुन पाळतात.छे!असं एकट्याने भोजन करण्याने नैराश्य येते,शिवाय आरोग्या च्या दृष्टीनेही अयोग्य आहे.ती म्हणाली, सकाळचा नास्ता कक्षात व दुपारचे जेवन सर्वांबरोबर घेतले तर…
दुसर्या दिवशी सत्यनारायण पुजे च्या निमित्याने राजकुटुंबातील सर्वांना जोडीने नमस्कार करत,दशरथ राजांचे चरणस्पर्श करीत हळुवार शब्दात म्हणाली,आपण सर्वांनी एकत्र राहू व एकत्रच भोजन करुं असा आशिर्वाद मला द्यावा.त्यांनी तिच्या मस्तकावर हात ठेवत तथास्तु म्हटले आणि उर्मिलाने लगेच अमलांतही आणले.सर्वांना भोजन कक्षात पाहून ती सुखावली.नंतर हसी मजाकही होऊं लागली.वातावरण मोकळं झालं होतं.हळू आवाजात कैकयी तिला म्हणाली,जे मला २५ वर्षात साधलं नाही,ते तूं करुन दाखवलस.सर्व कुटुंब एकत्रीत भोजन करताहेत हे किती नयन रम्य वाटते ना?
त्या दिवसांची आठवण उर्मिलेला आतां नकोशी वाटत होती.तरीसुध्दा पहिल्यासारखं वातावरण करायला हवय दुसर्या दिवशी उर्मिलाने सर्वांना भोजन कक्षात निमंत्रित केलं.कशासाठी बोलावलं हे कोणालाच कळेना.सर्वां समोर थंडगार सरबताचे चषक ठेवत उर्मिला म्हणाली,पूर्वीप्रमाणेच यापुढे आपण सर्वमिळून भोजन करणार आहो हे सांगण्यासाठी बोलावले आहे.गेले दिवस परत येणार आहे कां?संतापून कौसल्या म्हणाली,यासाठी बोलावले का
चित्रकुट पर्वतावर उर्मिलाने उघडपणे केलेला विरोधाबद्दल कौसल्याने अजूनही तिला क्षमा केली नव्हती.त्यादिवसांपासुन तिच्या वागण्यांत आपुलकीचा अभाव आला होता.
आतां माघार घेऊन चालणार नव्हतं.उर्मिला म्हणाली,आपण आयुष्य भर खंत,शोक करत रहायचं कां? राम परत येतील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी तुमच्यात शक्ती हवी ना?माता कैकयी परत भोजनव्यवस्था हाती घ्यावी.सुमित्रा ने ही दुजोरा दिला.मांडवी,कीर्तीनेही संभाषणात भाग घेतल्याने उर्मिला सुखावली.एकमेकांच्या फिरक्या घेत हसत खेळत पुन्हा सर्वांनी एकत्र भोजन घेणे सुरु झाले.पण मांडवी मात्र अजूनही मोकळी झाली नव्हती.नंदीग्रामात जाऊन भरताला वर्षाहून अधिक काळ लोटला होता.उर्मिलाने आटोकाट प्रयत्न करुनही मांडवी कैकयीला क्षमा करायला तयार नव्हती.वियोगाचे खापर ती कैकयीच्या माथी मारत होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-१-२०२२.










