आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग ६, (२१ ते २४)
राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! ऊर्मिला !!!
!!! उर्मिला !!!
भाग -२१.
मग मला सोबत कां नाही नेत? अगऽ मी जात आहो ते रामाचा अंगरक्षक सैनिक म्हणून…आणि सैनिक युध्दभूमी वर पत्नीला नेत नसतो.वनवास सोपा नाही.राम सीताला बरोबर नेत आहे कारण तिचे रक्षण करण्यास तो समर्थ आहे.मी त्याचा रक्षक म्हणून जात आहे. पती म्हणून तुझे संरक्षण करुं शकेन कां ही शंका आहे.अयोध्याच्या भावी राजा, राणीचे रक्षण करणे हेच माझं एकमेव ध्येय आहे.अयोध्येच्या भवितव्याचं संरक्षण हे माझं कर्तव्य आहे,माझा जन्म त्यासाठी…शिवाय दंडकारण्यात असूरां चा निवास आहे.तिथल्या ऋषीमुनींचा वध करुन त्यांची तपश्चर्या भंग करत, त्यांनी दंडकारण्य आपल्या अधिपत्या खाली घेतले आहे.तुला आठवते ना?मागे सीताचे रुप घेऊन बाणासूर आला होता. कोणीही त्याला ओळखु शकले नव्हते. अशा परिस्थितीत तुला तिथे नेऊन तुझा जीव धोक्यात कसा घालू?दोन्ही दरडीवर पाय ठेवल्या नाही ना जात?तुला इजा होण्याच्या नुसत्या कल्पनेनेही मी वेडावतो.तुझ्यापासून दूर राहून विरह सोसेन.रामाने म्हटल्याप्रमाणे,अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याचे नियतीला मान्य नसून असूरांचा नायनाट करणं हीच आमची नियती असेल.
माझ्या भवितव्याचं काय,असं किंचाळून उर्मिलेला विचारावेसे वाटले, पण कळवळून म्हणाली,तुमच्याशिवाय कोणीच नाही हो..मला तुमची फार गरज आहे…त्यांनी तिला आवेगाने घट्ट मिठीत आवळले.मिऽलाऽ आपल्यासाठी हा विरहाचा क्षण अतिशय कठीण होत आहे.सोपा कर ग…सोपा कर..त्यांच्या व्याकुळ बोलण्याने ती भानावर आली. त्यांना सोडावच लागणार होते.जायलाच हवय!स्वतः कणखर,कठोर होणे भाग होते.प्रेमाचं रुपांतर तिरस्कारात करायला वेळ लागत नाही.आणि तिने तेच शस्र वापरायचे ठरविले.डोळ्यातून दोन मोती निखळले.तिचा वनवास फक्त १४ वर्षानी संपणार होता.डोळ्यातील ते मोती सौभाग्यालंकार म्हणून जपून ठेवत डोळे कोरडे केले.आतल्या कक्षात गेली.सगळा नववधूसारखा साजश्रृंगार करुन बाहेर आली.उर्मिलेचे हे रुप बघून लक्ष्मण अचंबित झाले.विचारले,मिऽलाऽ हे काय काय असणार?हेच माझं जीवन!तुम्हाला माझ्या प्रेमापेक्षा भाऊ जास्त प्रिय,माझा साधा विचारही केला नाही.तुमच्याबरोबर यायच नाही या कल्पनेनं मी सुटकेचा निःश्वास टाकला.बघा..बघा..माझ्याकडे मी राजकन्या,आरामदायी आणि भरभराटीचं जीवन जगण्याची मला संवय!या सर्वाचा त्याग करुन जंगली कंद मुळे खात अनवाणी पायांनी जंगलात हिंडत,गवताच्या शय्येवर झोपायला मी वेडी खुळी वाटले का?हे सर्व ऐकून,रुप
पाहून लक्ष्मण थक्क झाले.तिच्या लक्षात आले,त्यांना दुखवण्यात,आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण करण्यात सफल झालोय,ह्रदयातून दुःखाची तीव्र कळ निघाली.मी जेवढं मनापासून तुझ्यावर प्रेम केलं,आतां तेवढाच तिरस्कार वाटतो आपल्या दोघांत न संपणारी दरी तूं निर्माण केलीस.तीने निमुटपणे ऐकुन घेतले,महत् प्रयासाने स्वतःला व अश्रूला आवरुन धरले होते,तोच शब्द कानावर आले,उर्मिला!नेहमीप्रमाणे “मिला” न म्हणतां आज एकांतात पहिल्यांदाच पूर्ण नावाने हाक मारली.म्हणाले,ठीक,होऊ दे तुझ्या मनाप्रमाणे….
उर्मिला म्हणजे मनमोहिनी,जीथे मन मिळतात!उर्मिला म्हणजे उत्कटते च्या लहरी…आणि या क्षणी मात्र उत्कट ता तिच्या कणाकणातून निघून जात होत्या.चैत्यन्य ओसरत होते.मनात केवळ वेदनेच्या लाटा धडका मारत होत्या.तिचा आत्मा जणूं देहातून ओरबडून बाहेर काढला.चैतन्यहीन शरीर..एकटीच ताठ उभी होती.
लक्ष्मणाला अतिशय दुःख झालं. जिच्यावर आपण प्राणापलिकडे प्रेम केलं…आतां पुढील जीवन रामाच्या चरणी अर्पण करायचे या दृढ निश्ययाने बाजुच्या कक्षात जाऊन अंगावरील रेशमी वस्रालंकार,मुकुट काढून,वल्कलं धारण केले व चकार शब्दही न उच्चारता
कक्षाबाहेर निघून गेले.उर्मिलेला हेच तर हवं होत..आनंद आणि दुःख अशा दोन्ही संमिश्र भावना डोळ्यातून वाहून गेल्या. अंगावरचे भरजरी वस्रेलंकार उतरवले.. एका वस्रानिशी ती पुढच्या आयुष्याला प्रारंभ करणार होती.आतां खरी सुरुवात झाली तिच्या वनवासाची…
उर्मिलेला सतत आयुष्यभर एकच प्रश्न सतावत राहिला…लक्ष्मण कां तिच्या बाह्य रुपाला फसला?कां तिच्यावर विश्वास दाखवला नाही?कां वाटले नाही की,माझी मिला अशी असूंच शकत नाही?की, आपण जसं त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण व्हावा म्हणून असे वागलो, कदाचित ते ही…नाही..नाही.. त्यांच्या डोळ्यात ते दिसलं नाही.तिने जे दाखवलं तेच त्यांनी बघितलं.कां तिचं मन वाचु शकले नाही?खर तर तिने दोघां साठीही सोपं केलं होत.चौदा वर्षे एकमेकांच्या प्रेमात व्याकुळ होण्यापेक्षा तिरस्कारात काढणं अधिक सहज झालं असतं.प्रेमाऐवजी तिरस्कार करणं सोपं जाणार होतं कां?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग -२२.
आपल्या पतीला व बहिणीला निरोप द्यायला येणार नाहीस?निरुपायाने उर्मिला उठली.चल कैकयीच्या महालात. तिथेच तिघेही राजाचा निरोप घ्यायला गेले आहेत.असं म्हणून सुमित्राने तिला जवळ घेतले.उर्मिलाची मनःस्थिती अत्यंत वाईट असली तरी,जाणे भाग होते कैकयीच्या कक्षातील दृष्य बघून ती आवाक् झाली.तिथल्या अंधूक प्रकाशा ला नजर सरावल्यावर तिला दिसले, वर्तुळाकार भव्य मंचकावर राजा गलित गात्र अवस्थेत पडलेले,डोळे खोल गेलेले, नैराश्याची भावना पुरेपुर भरलेली,स्वतः चे पद,अभिमान,लज्जा विसरुन ते धाय मोकलून रडत होते.एक सामर्थ्यशाली राजा निष्प्रभ होऊन पुत्राच्या कुशीत रडत असल्याचे दृष्य बघून कोणाचाही जीव गलबलला असतां.उलट कैकयी ठामपणे उभी होती.
आपल्या शोकग्रस्त पित्याचे सांत्वन करण्याचा राम प्रयत्न करीत होते वृध्द राजा कळवळून याचना करीत होते, पुत्रा नको रे जाऊस…माझ्या पाताळयंत्री पत्नीला मी दिलेलं वचन पाळणे तुला बंधनकारक नाही.एक राजपुत्र म्हणून तूं माझ्या राजाज्ञेला आव्हान देऊन राज सिंहासन हस्तगत करुं शकतोस.तसच कर पुत्रा..
हे ऐकताच त्वेषाने कैकयी म्हणाली, एका न्याय्य राजा आणि पित्याकडून छान अप्रतिम सल्ला दिल्या जात आहे. आणि महाराज!कोणत्या हक्काबद्दल बोलताय?भरताच्या अनुपस्थितीत रामा ला राजसत्ता देणं,रघुवंश्याच्या दैदिप्यमान इतिहासाला हे शोभून दिसते का?आणि तू ग सीता?अजुन राजवस्रात च?तुलाही वल्कल नेसूनच जावं लागेल. उर्मिला गप्प नाही बसू शकली,ती म्हणाली,सीतेने कांहीही परिधान केले तरी काय फरक पडणार आहे?अरण्यांत ही ती रामाची राणीच असेल.कैकयी संतापून कांही बोलण्याअधीच कठोर स्वरात राम म्हणाले,माते, सत्ता किंवा सिंहासन मिळण्याची हाव मला कधीच नव्हती.मी फक्त पित्याचा आशिर्वाद घेण्यास इथे आलोय!उर्मिला,सीतेला वल्कल नेसवं!मंथरा हातात वल्कलं घेऊन उभीच होती.तिच्याकडे जळजळी त कटाक्ष टाकत वल्कलं हिसकावून घेतली व बाजुच्या कक्षात नेऊन नेसण्यास मदत केली.
उर्मिला,तुझ्या मनातील आक्रदंन मला कळत कां नाही?तुझ्यावरच्या दृढ विश्वासानेच लक्ष्मण इतका कठोर निर्णय घेऊ शकले तसेच तूं खंबीरपणे या कुटुंबा ला सांभाळशील या तुझ्यात असलेल्या सामर्थ्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.ही चौदा वर्ष आपणा सर्वांचीच परीक्षा आहे.
सीता तुला एक विनंती आहे, लक्ष्मणासमोर यापुढे माझा विषय काढू नकोस.त्यांना माझी आठवण येईल असे कांही करुं नकोस.सीता गदगदलेल्या स्वरात तिचा हात घट्ट धरुन म्हणाली, माझ्या वनवासापेक्षा तुझा राजप्रसादाती ल वनवास अधिक दुष्कर होणार आहे. उर्मिलाच्या डोळ्यांंत अश्रू तराळले.पण या क्षणी तिला कमजोर होऊन चालणार नव्हते.सीतेला घट्ट मिठी मारत म्हणाली, सीता तूं खूप साधी आहेस.कशावर व कोणावरही पटकण विश्वास टाकतेस. वरच्या रुपाला भाळू नकोस.अरण्याचं विश्व वेगळे आहे.नीट रहा.स्वतःला जप! जा..सीता..जा…सुरक्षित जा व तशीच सुरक्षित परत ये… जा…
उर्मिला मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे. माझ्या वृध्द माता पित्यांना तुझ्या स्वाधीन करुन जात आहे.तूं विलक्षण स्री आहेस.तुझ्या शौर्य व धैर्याला तोड नाही. मी मात्र तुझ्या पतीला तुझ्यापासून दूर करुन सहवासाला वंचित करत आहे. मला क्षमा कर!उर्मिला क्षमा कर!रामाचे शब्द ऐकून ऊर्मिला अतिशय संकोच पावली.स्वतःला सावरत म्हणाली, नाही रामजी!तुम्ही माझ्या पतीला उच्च धेय्य पूर्तीसाठी नेत आहात.ते नेहमीच तुमची सावली बनून राहतील.तिच्या डोळ्यातील न ओघळणारे अश्रू मात्र नेमके रामाला दिसले.
प्रासादाबाहेर अस्वस्थ प्रजाजन उभे होते.नवीन दिवस नवीन विरह घेऊन आला होता.वृध्द राजाने,वनवासात कोण तीही उणीव भासू नये म्हणून सुमंताला तशी तयारी करण्यास सांगीतल्यावर राम ठामपणे नकार देत म्हणाले,या राज वैभवाची मला आतां आवश्यकता नाही. वल्कले नेसलो तेव्हाच सत्ता,संपती आरामाचा त्याग केला.माझ्या गरजा आतां कमीत कमी असतील.फक्त तुमचा आशिर्वाद असू देत.विरहाच्या तीव्र वेदना सोसणार्या या तीन निस्वार्थी स्रीया.. माता कौशल्या,माता सुमित्रा आणि उर्मिला आमच्या अनुपस्थितीत तुमची सेवा करतील.इतके बोलून रामांनी राजाचे चरणस्पर्श केला.रामाचे अनुकर ण लक्ष्मण,सीताने केले.रामाला ऊठवून ह्रदयाशी धरत दशरथ म्हणाले,माझ्या प्रिय पुत्रा,रामा,मला खात्री आहे,अरण्या तही तू आपल्या कुळाचे नांव उंचावशील, गौरवाने परत येशील.कौशल्येने तीघांना पंचारतीने ओवाळले.कीर्तिवंत होऊन परत या.नंतर राम सीताने कैकयीचे चरण स्पर्श केला.लक्ष्मणाची इच्छा नसतांना रामाच्या इशार्याने तिच्या पायांना ओझरता स्पर्श केला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-१-२०२२.
!!! उर्मिला !!
भाग -२३.
सुमंतांनी रथ सज्ज केला.राम सीता लक्ष्मण रथारुढ झालेत.रथ त्यांना दंडकारण्याजवळ नेऊन सोडणार होता. चौदा वर्षाच्या वनवासाला सुरुवात झाली कौशल्येने दिलेलं शिदोरीचं गाठोडं सीता ने रथात धनुष्यबाणामधे ठेवले.सीताने रामाला विचारले हे धनुष्यबाण कशास्तव शक्ती प्रदर्शनासाठी? अग! गरजुंचं संरक्षण करण क्षत्रिय कर्तव्य आहे.वनात क्रूर असूरांचं वास्तव्य आहे.तिथल्या ऋषींना सतत उपद्रव असतो.त्यांच्या संरक्षणासाठी या शस्रांचा उपयोग होईल. आणि आवश्यकता भासली तर आपलंही….
रथ सुरु झाला.हजारो शोकाकुल अयोध्यावासी रथामागुन निघाले.त्यांना हात जोडत विनम्रपणे थांबायला सांगीत ले.सुमतांनी मोठ्या कौशल्याने रथ गर्दी तून बाहेर काढला.उर्मिला सज्जातून पाहत होती.क्षितिजावर धूळीचे लोट दिसत होते.तेवढ्यात प्रासादातून किंकाळी ऐकू आली.तिचे सासरे दशरथ खाली कोसळले होते.त्यांचा लाडका पुत्र त्यांना सोडून गेला होता.त्यांना सावरण्या साठी कैकयी धावली असतां,राजा संतापून उद्गारले,हे विखारी स्रीये,मला स्पर्श सुध्दा करु नकोस.याक्षणापासून मी तुझा त्याग केला आहे.हे पापी चांडाळणी तू आजपासून माझी पत्नी नाहीस. कैकयी जागीच थबकली.
कौसल्येऽऽ त्यांची कारुण्यपूर्ण हाक ऐकून कौसल्या धावली.मला तुझ्या कक्षात घेऊन चल.माझा मृत्युसमय जवळ आलाय!कौसल्याऽऽ माझा रामऽ रामाऽऽ तूं कुठे आहेस?तो वयोवृध्द राजा ढसाढसा रडू लागला.माझा राम नाही.. माझ्या जीवनातील प्रकाशच नाहीसा झाला.चलतांना ते अडखळू लागले. त्यांचा तोल जातसा बघून उर्मिलाने त्यांना सावरले.त्यांच्या इच्छेनुसार त्यांना कौसल्याच्या कक्षात नेऊन निजवले. कित्येक प्रहर ते बेशुध्द होते.
अवघ्या कांही प्रहरांत कित्येक घडामोडी घडल्या.उर्मिलेला सारं स्वप्नवत वाटत होतं.सकाळी ती युवराज्ञीपदाच्या अभिषेकासाठी सीतेला तयार करत होती अवघ्या कांही प्रहरापूर्वी ती लक्ष्मणाच्या मिठीत होती…कांही क्षण ती तशीच डोळे गच्च मिटून बसून राहिली.डोळे उघडले तर तिच्यासमोर अंधकारमय नवीन जग उभं होतं.म्हटलं तर सारं जागच्या जागीच होत.पण सगळं कसं बदलून गेलं होतं.
बर्याच वेळानंतर राजा शुध्दीवर आल्याबरोबर माझा राम कुठेय?रामा तू कुठे आहेस?मला कांहीच कसे दिसत नाही?राजा दृष्टी गमावून बसले.हुंदके देत कौसल्या म्हणाली,जिथे मी स्वतःचेच सांत्वन करु शकत नाही तिथे राजाचं कसं करु?अशा विमनस्क कौशल्येला सुमित्राने मोठ्या धीराने सावरलं.सौम्य शब्दात समजावत म्हणाली,कौशल्याताई तूं कशाचा शोक करीत आहेस?अग! तो अरण्यात जाऊन तपस्व्याचं जीवन जगणार आहे.होऊ शकते त्याच्या हातून महान कार्य घडणार असेल हे लक्ष्मणाला दिसल असावं म्हणूनच त्याने रामाच्या पावलावर पाऊल टाकले.सीतेची काळजी तो घेईल.माझ्या धैर्यवान पुत्रांचा मला अभिमान आहे.
जरा उर्मिलाकडे बघ.अजून तिची हळदही निघाली नाही.नवविवाहित असून,पती लक्ष्मणाचा विरह तिला १४ वर्से सहन करायचा आहे.तू एका अद्वितिय पुत्राची माता आहेस व जेष्ठ सुध्दा!तेव्हा पतीला उभारी दे,इतर स्रीयां च्या पाठी उभी रहा.असं कोसळणं अयोध्येच्या महाराणीला,महानायकाच्या मातेला शोभत नाही.
त्या संपूर्ण दिवसभरात राजा दशरथ वारंवार बेशुध्द होत होते.नजर गेली,इच्छाशक्ती नष्ट झाली,मन विषण्ण झाले,पण कैकयीबद्दलचा संताप आणि तिरस्कार शमत नव्हता,भेटायला स्पष्ट नकार दिला.अत्यंत कठोर शब्दात तीची निर्भत्सना केली.तरी तिने आत्मसंयम दाखवला.तिने शक्य तेवढ्या लवकर अयोध्येला परतावं असा निरोप भरताला पाठविण्याची सुमंताला आज्ञा केली.
लक्ष्मणाच्या विरहात उर्मिला व्याकुळ असली तरी कैकयीत झालेला कायापालट पचनी पडत नव्हता.तिचं रामावरचं प्रेम,मायेची उब अचानकच कशी नाहीशी झाली?यातही कांही राजकीय डाव असेल का?तिचं एकंदर चरित्र पाहतां,ती सत्तालोभी असावीसी वाटत नव्हती.मग हे तिने कशासाठी केल कां इतकी भ्रष्ट झाली असेल?राजकीय सत्ता मिळण्यासाठी इतकं परिवर्तन व्हावं का?मनानं अत्यंत कनवाळू असलेल्या व्यक्तीला दुष्ट करण्याची नैसर्गिक क्षमता केवळ एकाच व्यक्तित आहे…मंथरा!पण कैकयी सारखी धूर्त,हुशार,राजकारणपटू मंथरेच्या सांगण्यात जाईल इतकी लेची पेची ती असेल का?यांत नक्कीच कांही तरी गोम असेल?उर्मिलाचे डोके विचार करुन थकून गेले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग -२४.
गेल्या चार दिवसांपासून राजांनी अन्नपानी त्यागले.त्यांची प्रकृती क्षणा क्षणाला खालावत होती.कैकयीला कक्षात येण्यास बंदी होती.केकय नगरीहू न भरतालाला आणायला दूत रवाना झाले होते.घडलेल्या घटनेबद्दल भरताला चकार शब्दही कळणार नाही अशी सक्त ताकिद देण्यात आली होती.राजाची प्रकृती वेगाने ढासळत होती.अर्धवट ग्लानीत ते सतत रामाला बोलवत होते.. अशा अवस्थेत सुमित्राने निर्णय घेतला. सुंमत अजून परतले नसल्यामुळे,मुनी वसिष्ठांना शांताला बोलावून घेण्यास सांगीतले.सहा दिवसांनी सुमंत एकटेच परत आलेले बघून राजाची उरली सुरली जगण्याची इच्छा नष्ट झाली.सुमंत एकटे आलेले बघून इतके वर्ष मनांत साठलेला संताप कौशल्याच्या मुखावाटे पडला. ती आपला पती मृत्युपंथाला लागला आहे हे ही विसरली.कौशल्येच्या वाक् तांडनामुळे उर्मिलेसह सर्वच हादरले.भकास व अश्रू भरल्या नजरेने मोठ्या कष्टाने राजा म्हणाले,कौसल्या,माझ्या चुकीमुळे तुला ह्या वेदना सोसाव्या लागत आहे.मला मिळालेला शाप खरा ठरणार..मला क्षमा कर!क्षमा कर!
राजाचा विकल,विव्हल आवाज ऐकून कौसल्या भानावर आली.पश्चाताप दग्ध स्वरात पतीला माफी मागू लागली. महाराज कोणत्या शापाबद्दल आपण बोलत आहात?मग राजा दशरथाने त्यांच्या तरुणपणी शिकारीला गेले असतां,प्राणी समजून आवाजावर लक्ष्य वेध करण्यात निपून अशी कीर्ती होती, त्यानुसार मी बाण सोडला.पण तो प्राण्या ऐवजी,असाहाय्य,आंधळ्या मातापित्यां चा आधार असलेल्या पुत्राला लागून त्याचा मृत्यु झाला.त्याच्याशिवाय जगण्या त अर्थ नाही असे वाटून, आम्ही जसे पुत्राच्या वियोगात प्राण सोडत आहोत, तशीच वेळ तुझ्यावर येईल असा शाप देऊं त्यांनी प्राणत्याग केला.त्यांचा तो शाप खोटा कसा ठरणार?बोलतांना राजा ला अतिशय कष्ट पडत होते.त्यांची अशी अवस्था बघून,उर्मिला स्वतःला आवरुं नाही शकली.ती तडक कैकयीकक्षात जाऊन,म्हणाली,माते तुम्ही राजाचे प्राण अजूनही वाचवू शकतां.रामाला परत आणण्यासाठी रथ घेऊन सुमंतला पाठव ल्याची राजांना खात्री द्या.त्यांचा जीव वाचेल,आपलं कुटुंब उध्वस्त होण्यापासू न वाचेल.कैकयीवर तिच्या विनवणीचा कांहीही परिणाम झाला नाही.उलट अतिशय थंड स्वरांत विचारले,त्या दोन राण्यांनी पाठवले की,तुझा पती परत यावा म्हणून एवढा आटापिटा चालवला उर्मिलाचा संताप उफाळून आला. म्हणाली,तुम्हाला महात्वाकांक्षेने अंध केले आहे.लक्ष्मण जसे बंधूप्रेमास्तव रामां च्या मागे गेले,तसंच भरतांचही रामावर निर्वाज्य प्रेम आहे,ते कधीच सिंहासन स्विकारणार नाही.तुमचा तिरस्कार करेल पित्याच्या मृत्युचा ठपका ठेवेल.पतीचा वध करणारी स्री म्हणून जग तुमच्याकडे बोट दाखवेल.
माते,मी इथे तुमच्याशी भांडायला आले नाही.माझ्या उर्मटपणा,धृष्टतेबद्दल क्षमा मागते.भरत कधीही राजमुकुट स्विकारणार नाही.याक्षणी राजांना वाचव ण्याची निकड लक्षात घेऊन त्यांना सांगा रामाला परत बोलावले आहे.त्यांना धीर द्या.फार उशीर होण्याआधी…उर्मिलाने हात जोडत कैकयीला याचना केली. कैकयीने तिच्या दिशेने पाऊल उचलले, उर्मिलाची आशा पल्लवीत झाली.तेवढ्या एक दासी धापा टाकत येऊन राजाचा काळ झाला हे कसबस सांगून निघून गेली.
अयोध्या नगरीत आणि प्रासादात अराजकता माजण्याची भीती निर्माण झाली.कौसल्या सती जाण्याचा हट्ट करीत होती.एकही पुत्र हजर नसल्यामुळे राजाचा अंत्यसंस्कार कसा होणार?अखेर राजाचा मृत देह तेलात बुडवून ठेवण्यात आला.
लक्ष्मणाला जाऊन सप्ताह लोटला पण त्यांच्या विरहाचे दुःख करण्याइतका अवधीही उर्मिलेला मिळाला नाही.ती भांबावली.एकाचवेळी तिला अनेक व्यवधानं सांभाळावी लागत होती.तिचा अधिकांश वेळ कौसल्याप्रासादात जात होता.आधी राजाच्या आजारामुळे व आतां ठाव सोडल्यामुळे.आताही कौसल्या अर्धवट शुध्दीत होती.थोडीही जाग आली की,राम आणि दशरथांच्या नावाचा अखंड विलाप सुरु होई.सुदैवाने शांता आल्यामुळे तिला थोडं सहाय्य मिळालं होतं.कैकयीने स्वतःच्या महालात कोंडून घेतले होते.ती भरताच्या येण्याची आतुरतेने वाट बघत होती.भरताच्या राज्यभिषेकाची करत असलेली तयारी पाहून शांता म्हणाली,प्रथम भरत आल्या वर पिताजींचा अंतिम संस्कार होईल, त्या नंतर भरत निर्णय घेईल.कैकयी म्हणाली,राजाची
विधवा हयात असतांना,मंत्री किंवा राज पुरोहितांनी तिला वगळून,काल आलेल्या नवीन पोरींशी चर्चा करावी हे बरोबर आहे का?शांतपणे राजगुरु म्हणाले….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-१-२०२२.










