ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग १०, (३७ ते ४०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


      URMILA राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! ऊर्मिला !!!

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -३७.

        त्यादिवशी उर्मिला पित्याचे चरण स्पर्श करीत असतां,राजा जनक म्हणाले, याच दिवसाचं स्वप्न मी गेल्या कित्येक वर्षापासून पाहत होतो.याचकरितां एवढे वर्षे जीवित राहिलो.तिचं पित्याशी वेगळं च नातं होतं.सामान्य नात्याहून अनोख! म्हणजे मी एक दिवस पंडिता होईल असे तुम्हाला वाटत होते?होय पुत्री,तू प्रेमळ होतीस,कल्पना आणि भावनांची निःसंदिग्धताचा वापर कसा करावा याचे तारतम्य तुला अगदी लहानपणापासून होते.तूं मोठी होत गेली तसे पैलू पडत गेले.अयोध्येतील राजगुरुंच्या ज्ञानाचा लाभ घेण्याची मिळालेल्या संधीचा तूं उपयोग केलास,त्यामुळेच आज तूं या पदाला पोहचूं शकली याचा मला कौतुक अभिमान आहे.सहज घडत गेलं.तसही गेल्या वर्षांमधे अध्ययन व चित्रकले शिवाय दुसरं काय होतं आयुष्यात?

       तर मग याच श्रेय लक्ष्मणाला द्यायला हव,ते वनात गेले नसते तर,तुला हे ज्ञान संपादन करतां आले नसते.तुझ्या तील वेगळेपणा बघूनच ते तुझ्या प्रेमात पडले.अग्नीची ओळख अग्निलाच पटू शकते.तुला विचारांच आणि कृतीचं स्वातंत्र्य देत लहानाचं मोठं केलं.विरहातू न च तुम्ही एकमेकांचे विचार जाणून घेत आहात.एक लक्षात ठेव उर्मि,राम आणि लक्ष्मण एकमेकांचे प्रतिबिंंब आहेत.एक आत्मा दोन शरीरात वसला आहे.मला आनंद आहे.लक्ष्मण वनात गेल्यावर सुरुवातीला उमटलेली उद्वेगाची भावना जाऊन,एक दुराग्रही मुलगी ते सुज्ञ स्री हा प्रवास करुं शकली.जनक पुढे म्हणाले, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीपासून अलिप्त राहतो तेव्हाच भावनावैरविध्या च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचं मुल्य जाणवतं. गेल्या वर्षांनी तुला हेच शिकविले.तूं तपस्वीनी झालीस.उच्च आध्यात्मिक शिक्षण प्राप्त करुन बौध्दीक स्तरावर विलक्षण यशप्राप्ती केलीस.एक पंडिता म्हणून आज तुझ्या समोर मी नतमस्तक होतो.तूं वेदातील ऋचा म्हटल्याने किंवा वेदाध्यायन केल्याने तुझ्यातील विद्वत्ता झळकली नाही तर,तूं सहन केलेली वेदना,वियोग आणि स्विकारलली अलिप्ततेचा हा परिपाक आहे.तुझा विरह हिच तुझी ध्यानधारणा व तुझा आध्यात्मिक पुनर्जन्म असून पतीवरच्या प्रेमामुळेच सर्वांत राहूनही मुक्त होऊं शकलीस.

         तात,मग मांडवीचही आयुष्य माझ्यासारखच…उर्मिला वैयक्तिक क्षमता आणि आकलन शक्तिला अनुसरु न प्रत्येकाला आपलं आयुष्य जगावं लागतं.मांडवीत दुखावल्या गेल्याची भावना आणि संताप इतका तिव्र आहे की,ती त्यातच जळत असल्यामुळे तिला शांती,सुज्ञता,मोक्ष कसा मिळणार?नियती आपल्या वाट्याला आल्यावर तिचा स्विकार कसा करावा हे आपल्या वर अवलंबून असते.पित्याशी सविस्तर चर्चा झाल्याने, सत्य तिच्यासमोर आलं . दुसर्‍या दिवशी आपल्या स्वगृही अयोध्ये कडे प्रयान केले.

          राम,लक्ष्मण,सीतेला परतायला थोडाच अवधी उरला होता.उर्मिलेच्या मनी आशेचे अंकूर फुटले होते.राम येण्या आधी नव्याने राजसभा बांधली होती. त्याचेच ती निरिक्षण करीत असतां,भरत येत असतांना बघून तिला आश्चर्य वाटले व चिंतीतही झाली.गेल्या १३ वर्षात त्यांनी प्रासादात पाऊल ठेवले नव्हते. रामाबरोबरच परत येईम असा दृढनिश्चय भरतांनी केला होता.असे असतां,नंदी ग्रामवरुन भरत आले म्हणजे,नक्कीच कांहीतरी विशेष घडले असावे.कैकयी माते विषयी त्यांना माहित झाले की नाही सांगता येत नाही.भरत कौसल्येच्या महालात पोहोचले तेव्हा तिथे दोन्ही माता होत्या.त्यांच्याकडे पाहतांच कांहीतरी भयंकर घडल्याची जाणीव उर्मिलेला झाली.शत्रृघ्न,कीर्ती,मांडवीही आल्या होत्या.अधिरतेने उर्मिलाने विचारले, भरता काय झाले?

         भरत म्हणाले,दूतांनी आणलेल्या वार्तेनुसार पंचवटी कुटीतून सीतेचे अपहरण झाले.राम,लक्ष्मण कुटीत नाही  हे बघून,ब्राम्हणाच्या वेषात रावणाने येऊन भिक्षा वाढणार्‍या सीतेला खांद्या वर टाकून पुष्पक विमानाद्वारे पळवून नेत असतां,गिधाडराज जटायूने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तो स्वतः जखमी झाल्यावर,राम लक्ष्मण आल्यावर सीता ला कोणत्या दिशेने नेले हे सांगून प्राण सोडले.सध्या सीता रावणाच्या अशोक वाटिकेत आहे.राम लक्ष्मण हे सुग्रीव, हनुमान व वानरसेनेच्या मदतीने लंकेवर चालून जात आहे.कधी घडलं हे? ग्रिष्मात. वार्ता मात्र आतां आली.सीतेवर रात्रदिवस राम लक्ष्मणाचा पहारा असतांना,दिवसा ढवळ्या तिचं अपहरण कसं होऊ शकल?

          हा एक कुटील कारस्थानाचा भाग होता.रावणाचा मातुल मारीचने कांचन मृगाचे रुप घेतलं.सीतेच्या हट्टापायी लक्ष्मणाला सीतेकडे लक्ष द्यायला सांगून राम त्या कांचनमृगाच्या मागे गेले.बरेच  अंतर गेल्यावर रामाने आपल्या बाणाने त्याला टिपल्यावर मरतांना त्याने लक्ष्मण सीता धावऽऽ असा टाहो सीतेने ऐकल्या बरोबर रामाच्या मदतीस जाण्यास सांगीतले.ते ऐकत नाहीसे बघून त्यांंना अपशब्द बोलून जाण्यास भाग पाडले. हीच संधी रावणाने साधली.कौसल्या म्हणाली,पण लक्ष्मणाने रामाची अवज्ञा केलीच कशी?तेव्हा भरत म्हणाले,माते, सीतेचे रक्षण करतांना त्याने प्राणत्याग केला असतां,पण तो रामाची अवज्ञा कधीच करुं शकत नाही.खरं कारण कळे पर्यंत दोषारोपण करणे योग्य नाही.

                 क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                दि.  २१-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                 भाग -३८.

          मांडवीने मधेच विचारले,रावण लंकानरेश,मग त्याने लंका सोडून पंवटीत  कशाला आला?भरत म्हणाले, रामांनी कसं राक्षसांचे निर्दालन केले,ऋषीमुनींना कसं संरक्षण दिलं,शुर्पणखेचे नाक कापल्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यास तिने रावणाला कसं उद्युक्त केले, खर,दुषण सशस्र राक्षस सैन्यासह राम लक्ष्मणावर चालून आल्यावर कसा त्यांचा निःपात केला हे सर्व कथन करुन भरत म्हणाले,चाणाक्ष रावणाने,राम लक्ष्मणाला गुडघे टेकायला लावणे हे सीतेच्या माध्यमातूनच होऊ शकते हे जाणून मारीच राक्षसाच्या सहाय्याने योजना आखली.मारीच रामाचा पराक्रम जाणून असल्यामुळे त्याने रावणाचा बराच विरोध केला,पण सत्तेपुढे शहाण पण चालत नाही त्याप्रणे त्याला रावणा पुढे मान झुकवावी लागली.पण या सार्‍या सांगण्याचा कांहीच परिणाम उर्मिलावर झाला नाही.ती संतापाने म्हणाली,जेष्ठांनी सीतेला जाण्यापासून कां अटकाव केला नाही.त्यावर सुमित्रा शांतपणे समजावत म्हणाली,सीतेने ऐकले नसते.रामाने कमी कां प्रयत्न केले मी तिच्याबरोबर असते तर हे घडलेच नसते.नाही उर्मिला!हा व्यूह अतिशय विचारपूर्वक रचला होता.अन्यथा विचारी अत्यंत वास्तववादी राम चंदेरी ठीपक्यां चा कांचनमृग जो अस्तित्वाच नाही त्याच्या मागे धावला असता?

          आतांपर्यंत मौन असलेल्या कैकयीकडे वळून उर्मिला म्हणाली,माता, तुम्ही तर सारं जाणता,मग सीताहरण त्या भाकिताचा भाग होता का?अंतहीन अशा दुःखात सीता कां ओढल्या गेली? उर्मिला,सीता वनवासात गेली,यामागे नक्कीच कांही संकेत असेल.राम जर रावणाचा वध करणार तर सीता हे निमित्य ठरणार असेल.तूं चिंता करुं नकोस.राम सुरक्षित सीता परत आणेल.

        उर्मिला अंतर्मुख झाली.स्वयंवरांती ल सूड रावणाने उगवला असेल का? शुर्पणखाची विटंबना आणि रामाचा सूड हे कारण असेल का?रावण सीतेला कसं वागवत असेल?हे अंतहीन दुःस्वप्न कधी सरणार?सौख्य वाटावा असा नवा दिवस कधी उजाडणार?

          चौदा वर्षे उर्मिलाने अतिशय विकल आणि नैराश्यात काढली.गेल्या कांही दिवसांपासून विविध वार्ता तिच्या पर्यत येत होत्या.पत्नी विरहात वेडापिसा झालेले राम,सीतेच्या शोधात रानोमाळ भटकत होते.एकाक्ष कबंधाच्या माध्यमा तून रामलक्ष्मण पंपा सरोवराकाठी पोहोचले.तिथे वास्तव्यास असलेल्या सुग्रीव व हनुमानाची भेट झाली.सुग्रीवा चा भाऊ वालीने,त्याचं राज्य व पत्नी बळकावली.सीतेला पुष्पक विमानातून नेतांना सीतेने खाली टाकलेले अलंकार रामाला दाखवतांच ओळख पटली.दोन समदुःखी एकत्र आल्याने त्यांच्यात मैत्री जुळली.सुग्रीवाला त्याची पत्नी व राज्य मिळवून देण्याचे रामाने वचन दिले व सुग्रीवाने संपूर्ण वानरसेनेसह लंकेवर आक्रमण करण्यास मदत देण्याचे कबुल केल.ठरल्याप्रमाणे सुग्रीव-वाली द्वंदयुध्दा त रामाणे वालीचा वध केला.सुग्रीवाला राज्य व पत्नी परत मिळाली.त्याने हनुमानाला सीता शोधार्थ  पाठवले.सीता अशोकवाटीकेत आढळली.आणि हनुमान रामाचा दूत म्हणून तिच्यासमोर प्रगट झाल्यावर त्याच्या समवेत येण्याचे नाकारुन तिने  रामासाठी निरोप दिला, स्वतः रामाने लंकेत येऊन तिला घेऊन जावे.नंतर हनुमानाने लंकादहन केले. हनुमानाने निरोप सांगीतल्यावर,देवांचा वास्तुविशारद विश्वकर्माचा पुत्र नल ने वानरांच्या सहाय्याने अफाट महासागरा वर सेतू बांधला. या सेतूवरुन राम लक्ष्मण वानरसेनेसह लंकेच्या किनार्‍या वर पोहचले.रामाने रावणाविरुध्द युध्द पुकारले.

         उर्मिलाला आज पहाटे पडलेल्या दुःस्वप्नाने अत्यंत अस्वस्थ होती.काय घडले असावे?या विचारांत असतांनाच भरत तिच्या भेटीला आलेले बघून ती चकित झाली.परत कां आले भरत? भरताचे डोळे अश्रूंनी डबलेले होते चेहरा उतरला होता.दुःखद वार्ता उर्मिलाच्या कानावर घालण्यासाठी धीर एकवटून म्हणाले,रावणपुत्र इंद्रजितचा जिवघेणा बाण लक्ष्मणाच्या ह्रदयाजवळ घुसला असून तो बेशुध्द आहे.जगण्याची आशा फार कमी आहे.आणि भरत ढसाढसा रडू लागले.सकाळी पडलेलं ते दुःस्वप्न खरं होतं तर?तिच्या नजरेसमोर विवाहा पूर्वीपासूनचे आतापर्यंतचे सर्व दृष्य चलचित्राप्रमाणे साकार झाले.तिच्या मना ची अत्यंत दोलायमान अवस्था झाली होती.विश्वास ते विस्मरण,मरण्याची आशा ते जगण्याची इच्छा…नाही नाही.. असं होणं शक्य नाही.तिचा एकनिष्ठ पती प्रियकर नक्की परत येईल,नव्हे त्याला मृत्युवर विजय मिळवून यावच लागेल. एकदम सुमित्राचा विचार आला आणि तिच्याजवळ जाऊन म्हणाली,माता घाबरूं नका.राम असल्यावर त्यांचेवर ते संकट येऊच कसं देईल? ते शुध्दीवर येऊन परत युध्दाला उभे राहतील. लक्ष्मणाला कांहीही होणार नाही.ते योध्दा आहे.आपल्या बंधूबरोबर युध्द जिंकून सीतेसह परत येतील मला पूर्ण खात्री आहे.

                   क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
              दि. २२-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                  भाग-३९.

        वरकरणी उर्मिला कितीही धीर दाखवत असली तरी,अंतरंगी ती भय व्याकुळ झाली होती.लक्ष्मण परत येईल या आशेवर गेल्या १४ वर्षातील क्षण न क्षण घालवला होता.लंकेच्या किनार्‍यावर युध्द सुरु होत.त्याचवेळी राजप्रसादातील भिंतीआड प्रत्येकाचं आपलं युध्द सुरुं होत.कांही परिस्थितीशी,देवाशी,ईश्वराशी तर कांही स्वतःशीच युध्द करत होते. प्रत्येकाचं शस्र वेगळं होत…तिरस्कार, रागाने उच्चारलेले शब्द,प्रेम,संयम आणि दृढ विश्वास…या आंतरिक युध्दात कोण जिंकेल?कोण काय गमावणार?गेलेल्या आणि जगलेल्या क्षणांचं मूल्य केवळ स्मृतीत दडलेलं होतं.

        भरताला रामाच्या मदतीला जायला सांगीतल्यावर ते म्हणाले,त्याची कांही गरज नाही.तिथे रावणाचा दुखावलेला भाऊ बिभिषण,एकनिष्ठ हनुमान आहे. हनुमान मोठा पर्वत घेऊन अयोध्येवरुन उड्डाण करतांना,स्वतःचा परिचय देऊन म्हणाला,नेमकी कोणती संजीवनी वनस्पती आहे हे न कळल्यामुळं गंधमाद पर्वतच लक्ष्मणाच्या उपचारासाठी घेऊन जात आहे.वानरवैद्य सुशेष्ण यांनी सांगीतल्यानुसार ही वनस्पती सूर्योदया पूर्वी दिली की,लक्ष्मणाचा धोका टळेल. उर्मिलाला लक्ष्मण वाचण्याची पूर्ण खात्री झाली.आणि झालेही तसेच,लक्ष्मणासह जी वानरसेना बेशुध्द होते ते सर्व शुध्दी वर येऊन खडबडीत बरे झाले व युध्दास सज्ज झाले.लक्ष्मण जिंकेल याबद्दल कोणतीच शंका राहिली नाही.

       शत्रृघ्न म्हणाले,रावणापेक्षा इंद्रजित जास्त शूर आहे.पूर्वीचा मेघनाद असलेला त्याने इंद्रावर विजय मिळवला म्हणून त्याला इंद्रजित नांव मिळाले.इंद्रजितला एकच व्यक्ती मारुं शकते ज्याने प्रदीर्घ काळ ब्रम्हचर्य पालन केलं,ज्याच्या पत्नी ने त्याग केला,जिच्या प्रेमाचं अभेद्य कवच त्याला लाभलं,ती व्यक्ती म्हणजे माझा बंधू लक्ष्मण!पुढे म्हणाला,तुझ्या तपामुळे माझा बंधू वाचला.आम्हा सर्वां ना तूं वाचवलस.आम्ही जरी राज्याची, प्रजेची काळजी घेत असलो तरी,तूं आम्हा सर्वांची काळजी घेत आलीस. कुटुंबाला बांधून ठेवलस.तुझा संयम, चैतन्य आणि आशा हे वरदान या गृहाला मिळालं.ठामपणे उभं राहून स्वतःचे विचार मोकळेपणे मांडलेस,नियम तोडले नाही,पण वाकवले जरुर!तुझ्या दुःखा कडे आम्ही डोळेझाक केली,तरीही तूं आम्हाला सतत सावरत राहिलीस.वर्षोन वर्षे आम्ही एकमेकांप्रती शाशंकता बाळगून,सारं ठीक आहे असा आभास निर्माण करुन वागत होतो,पण तूं आम्हा ला सत्याचा स्विकार करायला शिकवले. खरा उमदेपणा आहे तुझ्यात.तुझ्यामुळे आम्हाला अभिमानाचा अर्थ उमगला. आम्ही सारे तुझे ऋणी आहोत.

         नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रामा ने रावणवध केला.सीता मुक्त झाली.रामा च्या शौर्यकथेने अयोध्यानगरी दुमदुमली. रामाच्या स्वागतासाठी नगरी सजू लागली  आणि अचानक उर्मिलाच्या कानी विश्वास न बसणारी एक विचित्र वार्ता  आली.प्रेम,कर्तव्य आणि निष्ठेच्या पावित्र्याला कलंक लावणारी वार्ता… आपलं पावित्र्य सिध्द करण्यासाठी सीता ला अग्निपरीक्षा द्यावी लागली,हे समजताच उर्मिला स्तंभित झाली.रामाने हे कां घडवले?समाजाच्या नजरेत निर्दौषत्व सिध्द करण्यासाठी,एवढे अग्नि दिव्य,मानहानी करण्याची सक्ती कसे करुं शकले राम?सीता स्वतः रावणाकडे गेली नव्हती.असं असतां,रामाच्या आणि लोकांच्या मनांत आशंका कां?अश्या पतीसाठी,जीने राजमहालातील सुखासीन जीवन घालवण्याऐवजी दीर्घ काळ वनवास पत्करला.

        आणखी पांच दिवसांनी अमावस्ये ला त्यांच आगमन होणार आहे.त्यासाठी आतां वाद बाजूला ठेवून,मांडवी व कीर्ती ला उर्मिला म्हणाली,त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागणे उचित होईल.सर्वकांही पूर्वीसारखं होईल या विचाराने उर्मिला सुखावली

       झालं त्यांचं आगमन.संपूर्ण नगरी व राजवाडा  सुशोभित झाली.तिघांच्या स्वागतासाठी जेष्ठ राणी कौसल्या नदीग्रामला पोहचली.भरताबरोबर त्या

तिघांना रथातून उतरतांना प्रथमदर्शन उर्मिलाला झाले.

        ज्या पायरीवरुन लक्ष्मणाला १४ वर्षापूर्वी निरोप दिला होता,त्याच पायरी वर पंचारतीचं सुवर्ण तबक घेऊन उर्मिला उभी होती.त्यांच्यावरुन नजर हटत नव्हती.इंद्रजितकडून झालेला विषारी बाणाचा व्रण लक्ष्मणच्या छातीवर ठळक पणे तिच्या नजरेत भरला.तिच्याजवळ जात लक्ष्मण म्हणाले,मिलाऽ तुझ्या तपः सामर्थ्याने आज मी तुझ्यासमोर जीवंत उभा आहे.माझ्या आयुष्याचा अर्थ तूंच आहेस.तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून म्हणाले,आतां दुःखद अंत झाला.या आनंदीक्षणी डोळ्यात अश्रू नकोत.शांता ही आपल्या भावांच्या स्वागतासाठी आली होती.सर्वांनी त्यांना औक्षण केले. पुढच्या कांही क्षणातच ते कुटुंबियांच्या प्रेमळ वर्षावात चिंब भिजले.राम कैकयी ला चरणस्पर्श करीत हळूच म्हणाले,माते मी जे साध्य करणे तुला अपेक्षीत होते,ते मी केलं आहे.

                   क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                दि. २२-१-२०२२.

!!!  उर्मिला !!!

              अंतिम भाग -४०.

         कैकयी रामाच्या मस्तकावर हात ठेवत म्हणाली,नियती मोठी विचित्र आहे ती तिच्या इच्छेप्रमाणे कठपुतलीसारखं निचवते.तू फार मोठं कार्य पार पाडलेस. या देशाला एका मोठ्या संकटातून आणि  महाबलाढ्य शत्रूच्या तावडीतून सोडवले.

भरत तिला चरणस्पर्श करायला आले तेव्हा त्यांचे डोळ्यात केवळ आदर आणि ममत्व होतं.पश्चातापदग्ध असल्यामुळे शब्दही उच्चारु शकले नाही.तिने त्यांना मिठीत घेतले.त्या मौन मिठीतून माता- पुत्राचं मन मोकळं झालं.आजवर गमावलेला आणी कमावलेला सर्व हिशोब पूर्ण झाला.भरतासारख्या पवित्र आणि निःस्वार्थी पुत्राची माता म्हणून तिचा सन्मान तिला परत मिळाला.

          नंतर सीता आपल्या कक्षात उर्मिलाला घेऊन गेली.म्हणाली,तुझी आणि लक्ष्मणाची भेट होण्याआधी,तुझ्या शी बोलण्याआधी माझ्याकडून घडलेल्या अक्षम्य अपराधाची कबुली द्यायची आहे. हे ऐकताच उर्मिलाच्या चेहर्‍याचा रंग उडाला.आणखी काय ऐकायला मिळेल याची विचित्र जाणीव झाली.सीते,आतां अंत नको पाहूस,काय सांगायचे ते पटकन सांग,माझा जीव टांगणीला लागलाय!

        सीता धीर एकवटत म्हणाली, उर्मिला,मी लक्ष्मणांची अत्यंत हिडीस शब्दात संभावना केली.त्या कांचनमृगा पायी हे सर्व नाट्य घडले. आणि मग कांचनमृग दिसल्यावर हट्टाने रामाला ते मृग आणायला सांगीतल्यापासून ते रामा ची आर्त किंकाळी ऐकू आल्यावरही मी किती विनवले तरी, लक्ष्मण मदतीला जात नाही तेव्हा त्यांची अतिशय गलिच्छ  शब्दात संभावणा केल्यावर,पिळवटलेला संतापलेल्या चेहराही मला दिसला नाही. तरी निघण्याअधी मला वारंवार बजावलं कुटीभोवती आखलेली रेषा कोणत्याही परिस्थितीत ओलांडायची नाही.हे निक्षून सांगीतल्यावर भिक्षा वाढण्यासाठी रेषा ओलांडली व माझे अपहरण झाले.हे सर्व सांगून,सीता म्हणाली,लक्ष्मणासारख्या अत्यंत पुण्यवान आणि सदाचारी पुरुषा वर मी अतिशय घृणास्पद आळ घेतला. ज्याने सर्व सुखाचा त्याग करुन,निस्वार्थ सेवा करत,पाठच्या भावासारखे रक्षण केले त्याच्याच आत्म्याला क्लेष होईल असे बोलले.त्या पापाचं मला प्रायश्चित मिळालं.येवढे भोग सोसावे लागले.

        सीता तूं उगीच सांगीतले,लक्ष्मणां नी मला कधीच सांगीतले नसते.कां? ते तर तुला प्रत्येक गोष्ट सांगतात ना?गंभीर पणे उर्मिला म्हणाली,तुझ्याचसाठी!माझ्या नजरेत तुझी प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून….आतां तुला माझा तिरस्कार वाटत असेल ना ग?अगऽ आपलं प्रेम एवढं तकलादू आहे का?उर्मिलाने तिचा अपराधबोध कमी व्हावा या हेतूने कुशीत घेत म्हणाली,जे घडायचं ते घडून गेलं,तूं परत मिळाली यापेक्षा आणखी काय हव दोघी बहिणींनी एकमेकींच्या मिठीत अश्रूं ना मोकळी वाट करुन दिली….

        कक्षातील मंचकावर लक्ष्मणाची वाट बघत असतांना चलचित्राप्रमाणे अगदी सुरुवाती पासूनचे प्रसंग डोळ्यासमोर सरकत होते.लक्ष्मणाचा प्रवेश झाल्यावर उर्मिला विचारांच्या गर्तेतून बाहेर आली. सर्व विसरुन त्यांच्या मिठीत विसावली. मिलनाच्या या अनोख्याक्षणी कुठलीही दुःखद आठवण नको होती. हळूहळु ती सावरली.त्यांनी तिला अवधी दिला.किती तरी वेळ दोघे तसेच मिठीत विसावले होते.सौख्य,शांती,समाधानाची अनुभुती दोघांनाही येत होती.चौदा वर्षाचे पारणे फिटत होते.

        यथायोग्यवेळी उर्मिला-लक्ष्मणाला अंगद आणि चित्रकेतू ही दोन मुलं झाली. सीता गर्भार असतांनाच एका धोब्याने आरोप केल्यावरुन रामाने सीताला अरण्यात सोडून देण्याची कामगिरी लक्ष्मणावर सोपवली. ती खंत लक्ष्मणा च्या मनातून शेवटपर्यत गेली नाही. लक्ष्मण जगला तो रामासाठी आणि मृत्यु ही पत्करला तो रामासाठीच! आयुष्यभर ज्याने आपल्या जेष्ठ बंधूची आज्ञा पाळली,त्याने सर्वनाश टाळण्यासाठी अवाज्ञा केली म्हणून मृत्यु स्विकारावा लागला.

         विध्द झालेल्या सीताने स्वतःला भूमातेला अर्पण केले.आपल्या प्रिय बंधूचे जो जीवनभर सावली होऊन राहिला त्याच्या मृत्युचे दुःख रामाला असह्य झाल्याने लव कुश या जुळ्या पुत्रांवर राज्यकारभार सोपवून शरयूनदीमधे जलसमाधी घेतली भरत शत्रृघ्ननेही रामाचे अनुकरण केले.

       रामराज्याची वाटणी झाली.अयोध्ये च्या उत्तर कौशल प्रांतावर लव तर दक्षिण कौशल प्रातांवर कुश राज्यकारभार करुं लागले.भरतपुत्र तक्ष आणि पुष्कल हे गांधार प्रांतावर राज्य करुं लागले. तक्षशिला ही त्यांची राजधानी होती. शत्रृघ्ननाने आपले पुत्र सुबाहू आणि शत्रृघती या दोन पुत्रांना मथुरा आणि विधिशाचं राज्य,आणि लक्ष्मणाने आपले पुत्र अंगद आणि चित्रकेतू यांना करुपदेश हा मिथिला जवळ असलेला भाग दिला.मिथिला त्यांची माता उर्मिलाची जन्मभूमी होती.

       आणि उर्मिला ती मात्र अजूनही उपेक्षित…दुःख अन्याय झेलत “सामान्य” स्री च्या रुपात न थकता,न थांबता अविरत घेतलेला वसा पुढच्या पिढीला देत…कारण अजून तिचा वनवास संपायला ना कुठला राम आला ना लक्ष्मण…

        प्रत्येक पिढीतील ही “उर्मिला” मात्र खंबीर होत चालली आहे.. आयुष्यातील प्रत्येकच लढाई लढायला तिला आतां कुठल्या लक्ष्मणाची गरजच उरली नाही.. स्वतःचा उध्दार करायला  आतां तिला       “राम लक्ष्मणाच्या” देवळांत जावं लागत नाही…

      अशा या त्यागमयी खंबीर “पंडिता” उर्मिलाला कोटी कोटी प्रणाम!

                !! समाप्त !!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. २२-१-२०२२.

ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading