ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग ७, (२५ ते २८)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! ऊर्मिला !!!

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -२५.

      शांतपणे राजगुरु वसिष्ठ म्हणाले, शोकग्रस्त विधवेवर ओझं न टाकण्याची

परंपरा आहे.राजा जनकाची ज्ञानी कन्या, उर्मिला ही राजघराण्यातील राजस्नुषा राज्यातील घडामोडीविषयी बोलू शकते. मुख्य म्हणजे राजाचे पुत्रं आणि त्यांच्या पत्नी उपस्थित नसल्यामुळे तिच्यावरच जबाबदारी येते.तुर्तास तुम्ही शोकगृहात असणे अपेक्षित आहे.राजगुरुच्या स्पष्टोक्तीमुळे ती तिच्या कक्षात निघून गेली.त्यानंतर सुमंत आणि इतर मंत्रीगण जबाली,मार्कंडेय,गौतम,कश्यप आणि कात्यायन विद्वान उपस्थीत होते.आमच्यावर राज्या कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येऊ नये म्हणून,सुमंत उर्मिलाला म्हणाले,तुम्ही राज्यकारभारात लक्ष घालावे.सद्य स्थितीत घडणार्‍या घटनांची  इतंभूत माहिती आम्ही वेळोवेळी कळवत जाऊ.

         उर्मिलाला वास्तव्याची जाणीव झाली.केवळ राजप्रासादाचीच नाही तर राजकीय घडामोडीकडे लक्ष देण्याचे कार्य तिच्यावर येऊन पडले.यासंबंधी शांताशी बोलल्यावर तिने राज्यासंबंधी कांहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला.ती आईच्याच तैनातीत जास्त असायची. जेव्हा ती आपल्या कक्षाकडे निघाली तेव्हा तिला एकटेपणाची जाणीव झाली. गेले कांही दिवसांपासून कौटुंबिक आणि राजकीय कर्तव्ये लिलया हाताळत आहे. तिला आईचे शब्द आठवले.तूं जर आपलं घर व्यवस्थित सांभाळू शकलीस तर जग जिंकू शकशील.किती खरे होते. तिला आईची तीव्र आठवण झाली.आणि कक्षात पोहोचल्यावर डोळ्यावर विश्वास बसेना.समोर आई उभी होती.ती धावत जाऊन आईच्या कुशीत शिरली.कधी आलीस?आणि तात? तुझे तात अंतिम विधीपूर्वी येतील.राम,सीता,लक्ष्मण वनवासाला गेल्याचे कळल्याबरोबर निघाले.तूं इथे कां एकटी राहिलीस? लक्ष्मणाने बरोबर कां नाही नेले?तूं त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न नाही केलास? तुझ्या हक्कासाठी ठामपणे कां उभी राहिली नाहीस? माते,मी आणि सीताने समान तत्व आचरणांत आणलं.आम्ही आमचा धर्म राखला.रामांना वनवासात जाणे भाग होते,सीता पाठोपाठ गेली.बंधू सेवा धर्म लक्ष्मणाला योग्य वाटला म्हणून ते भावाच्या मागून गेले.आणि मी इथे राहायचं मान्य केलं कारन माझा तोच धर्म आहे.इथली काळजी घ्यायला माझ्या शिवाय दुसरं कुणी नव्हतं.तूं आणि तातांनी आमच्यावर हेच संस्कार केलेत ना? योग्य असेल तर पतीला डोळसपणे पाठींबा द्या,चुकत असेल तर त्यांना योग्य मार्गावर आणा.मग लक्ष्मणाचं कांही चुकलं कां? रामांना त्यांची जास्त गरज आहे.मी गेले असते तर,त्यांच चित्त विचलित झालं असतं.माते,प्रत्येकाने आपला धर्म पाळला,तूं कष्टी होऊ नकोस

         सुनयनाने उर्मिलेला जवळ घेत म्हणाली,मी नेहमीच तुझ्याशी कठोर वागत आले.कदाचित तुझ्याकडून जास्त अपेक्षा असेल,कदाचित तूं माझ्या रक्ता मासांची आहे म्हणूनही…सीता पोटची नव्हती आणि मांडवी श्रुतीका आईविहिन असल्यामुळे त्या तिघींबाबत अधिक मवाळ होते.त्यांचेवर माझा अधिकार नव्हता.तुझ्यात जगात निभाव लागण्यास आवश्यक गुण असल्यामुळे मी निश्चिंत होते.शिवाय त्या तिघींची तूं काळजी घेतली,त्यांना कशाची उणीव भासू दिली नाहीस म्हणूनही कदाचित…माते,तूं लहानपणी मला हे समजावून सांगीतले होतेस,त्यामुळे तुझ्या प्रेमाबद्दल कधीही मला शंका आली नाही,

          उर्मिला,तूं अंतर्बाह्य प्रगल्भ असल्यामुळे कनवाळूपणे वागतेस.असो. खरं म्हणजे तुला मिथिलेला नेण्यासाठी आले होते.पण.. मला काय पहायला मिळाले,माझी चिमुरडी लेक आज उमदी स्री झाली आहे.दुःखाचा कडेकोट झाला तरी खचून न जाता खंबीरपणे उभी आहे आलेली परिस्थिती योग्य प्रकारे हाताळले ली बघून मला तुझा अभिमान वाटतो की मी तुझी माता आहे.

         राजा दशरथांच्या अंतिम संस्कारा नंतरच सुनयना मिथिलेला परत जायचे ठरविले.भरत-शत्रृघ्न कधी पोहचतात याची सार्‍यांना प्रतिक्षा होती.पित्याचा अचानक मृत्यु किंवा भावाचा वनवास यामागचे कारण भरताला कोण सांगेल हा विचार उर्मिलाच्या मनी आला.दिवस सरतां भरत,शत्रृघ्न नगरीत प्रवेशले.सर्वी कडे त्यांना स्तब्धता दिसली.स्वागताला कुणीही सामोरं गेले नाही.दोघेही पित्याच्या कक्षेकडे जातांना उर्मिलाने बघितले…

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. १९-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                 भाग -२६.

         दशरथ राजांच्या कक्षेकडे गेलेले भरत,शत्रृघ्न त्याच पावली परत फिरुन कैकयीच्या महालाकडे जातांना दिसले. जागोजागी मंगल तोरणांची अर्धवट सजावट होऊ घातलेल्या राज्यभिषेक व झालेला अपमृत्यू लक्षात येत होता.

           उर्मि,काय झाल?सगळीकडे एवढी भयाण शांतता कां?गवाक्षात उभी असलेली उर्मिला गर्रकन वळली तर, तिच्या कक्षाच्या दारात श्रुतकीर्ती व तिच्या मागे शत्रृघ्न उभा होता.तिथे सुनयनाला बघून कीर्तीला अतिशय आश्चर्य वाटले.श्रुतकीर्तीला बघून आतां पर्यंत दबलेल्या भावना उफाळून आल्या. दोघीही अलिंगनात बध्द झाल्यात.मांडवी कुठेय? ती भरतांबरोबर माता कैकयीला भेटायला गेली आहेत.उर्मि,नेमकं काय घडल?आम्ही नगरात प्रवेश केला तर, स्वागतासाठी कुणी पुढे आलं नाही.उलट जे कोणी समोर आले,त्यांच्या डोळ्यांत निर्भत्सनाच दिसली.विशेषतः भरत आणि मांडवीला बघून…प्रासादातही आमच्या स्वागताला कुणी सामोरे आले नाही.उर्मि,सांग लवकर माझा जीव टांगणीला लागलाय.असं वाटते,कांही तरी भयंकर विपरित घटना घडली असावी….राम,सीता,लक्ष्मण दिसत नाही कुठे आहेत ते?

          उर्मिलाने त्यांना थोडक्यात पण स्पष्ट सर्व सांगीतल्यावर कीर्ती स्तब्ध झाली.शत्रृघ्नचा चेहरा संतापाने लाल झाला.त्याचे हे रुप पाहून उर्मिलाला लक्ष्मणाची आठवण झाली.तर हे सारं त्या दुष्ट मंथरापायी झालं..मी तिला सोडणार नाही म्हणून शत्रृघ्न झपाट्याने निघून गेला.आतां मंथरेचे इथले दिवस संपल्यातच जमा आहे.

       उर्मिऽऽ मांडवीने आर्त,व्याकुळ स्वरात हाक मारत म्हणाली,लवकर चल,

भरतांचा स्वतःवरील ताबा सुटला आहे. कैकयीच्या महालात काय घडले असेल याची कल्पना मांडवीच्या चेहर्‍याकडे पाहताच उर्मिलाच्या लक्षात आले.मांडवी बरोबर कैकयीच्या कक्षात प्रवेश केल्या वर तिथलं दृष्य बघून तिचा थरकाप उडाला.संगमरवरी प्रासादात भरताने स्वतःला जमीनीवर झोकून डोके आपटत होता.उर्मिलेच्या काळजाचा ठोका चुकला.ती व मांडवी भरताच्या दिशेने धावल्या.उर्मिलेला तिथं बघून संतापाने कैकयी कडाडली,तुम्ही दोघींचे इथे येण्याचे धाडसच कसे झाले?माते,भरता ला काय झाले?त्याला नुकतेच सारं सांगीतले…तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.मी त्याची माता,बघेन..माता?

माता नाहीस,वैरीण,हत्यारी आहेस,कसे बसे शब्द भरताच्या तोंडून निघाले.तुला माता म्हणायची सुध्दा लाज वाटते.आतां आयुष्यभर हा कलंक मला मिरवावा लागेल.असे म्हणून भरत सरकत असल्याचे बघून उर्मिला दोघांच्यामधे येऊन उभी राहिली.मांडवीने त्याला घट्ट धरुन ठेवले.आवेगाने ओरडत भरत म्हणाला,मी रामाचे राज्य,सिंहासन स्विकारेल असं वाटलच कसं?हे नारी,तूं मलाही स्वतःबरोबर दोषी केलेस.त्याच्या शब्दांच्या भडीमाराने कैकयी थक्क झाली.कठोर चर्या करुन त्याला खडसाव त म्हणाली,अरेऽ तूं मलाच दुषणं देतोस, परंतु तूं इथे नसल्याचा फायदा घेऊन तुला तुझ्या हक्कापासून वंचित केल्या जात होते.कोणत्या हक्काबद्दल बोलतेस  तातांनी मातामहांना दिलेले वचन?बदललेली परिस्थिती पाहतां,आता ते सुध्दा अशी मागणी करणार नाही.तातां नी वचन दिले तेव्हा ते निपुत्रिक होते. आम्हा चौघांच्या जन्मानंतर वारसाहक्का ने राम जेष्ठ असल्यामुळे त्याचाच हक्क राजसिंहासनावर आहे.आजपर्यंत तुला सुध्दा स्विकार होते.अचानक तू अशी कां वागलीस?कशाची हाव आहे तुला?

          योग्यवेळी मी भानावर आले. तूं मातुलगृही गेल्यावर घाईघाईने रामाचा अभिषेक करण्याचे प्रयोजन काय?ते ही मला न सांगता,विश्वासात न घेता..तू जर तातांना विचारले असतेस तर तुला समर्पक उत्तर मिळाले असते.त्यांच वय झालेलं,वारंवार दुःस्वप्ने पडत होते.दिवसें दिवस प्रकृती ढासळत असल्यामुळे धास्तावलेले,कोणत्याही क्षणी मृत्यु येईल याचे भय वाटल्यामुळे त्यांनी सर्वांनुमते निर्णय घेतला.तूं त्यांची पत्नी असून,कसा अविश्वास दाखवलास?तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे सर्वांची आयुष्य उध्वस्त झालीत.तूं माझी माता असूच शकत नाही.

        भरताच्या अशा बोलण्याने आवाक् झालेली उर्मिबा संतापून म्हणाली,भरताऽ तुम्ही आपल्या मातेशी एवढ्या उध्दटपणे कसे बोलूं शकता?तिने मला कलंक लावला.जगाला तोंड कस दाखवू?हिच्या मुळे माझे दोन्ही भाऊ वनात गेले.त्यांच्या मातांना कोणत्या तोंडाने समोर जाऊ? त्यांच दुःख कसं कमी करु?हिच्या स्वार्थी आणि अविचारी महत्वाकांक्षेपायी तुला १४ वर्षे पतीविरह सहन करावा लागणार कसा तुझ्या समोर उभा राहू?त्याच्या मुखावरिल विवशता बघून उर्मिलेला अतिशय दुःख झाले.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. २०-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                  भाग -२७.

        माझे दोन्ही भाऊ तातांचे दोन बाहू, नेत्र होते.त्यांना नगरातून बहीष्कृत केल्या वर बिनबोभाट हे राज्य मी करेन असे तुला वाटलेच कसे?मी सुध्दा रामाजवळ वनवासात जाणार… नाही तू अयोध्या सोडून नाही जाऊ शकत..मी नक्की जाणार,माझ्या कुटुबियांना भोगायला लावलेलं दुःख तुला भोगायला लावेन. त्याचा प्रत्येक शब्द तिच्या काळजांत चरे पाडत होते.कैकयीची भयान अवस्था उर्मिलेला पाहवत नव्हती.

         आजवर शांत, संयमी,सौम्य असलेल्या भरताचं हे रुप तिला अनोखं होतं.सूड,तिरस्कार,वेदनेने तो पेटलेला होता.एरवी मार्दवशील भरत संतापला की,किती निष्ठूर होऊ शकतो याबद्दल लक्ष्मणाने केलेली टिप्पणी तिला आठवली.भरताऽ तुम्ही अयोध्या सोडून गेलात तर तुमचे भाऊ परत येणार आहेत का?त्यातून तुम्ही मातेला वेदना देण्याच्या नादात पत्नीलाही वेदना देत नाही कां?जे माझ्या नशीबी आलं ते निदान मांडवीच्या तरी नशीबी नको ना यायला.मांडवी म्हणाली,मातेने जे केलं ते तुमच्या हिता च्या दृष्टीने केलं,त्यामागे त्यांना मिळाले ला चुकीचा सल्ला कारणीभूत आहे.पण माझ्या भावांना माझी नितांत आवश्यक ता आहे.हळुवार सौम्य शब्दात उर्मिला म्हणाली, भरताऽ आधीच राज्यात अराजकता माजण्याची भीती निर्माण झाली आहे.शत्रू संधीची वाट बघत आहे. तुम्ही गेलात तर अयोध्येचं रक्षण कोण करेल?भरताऽ तुम्हाला इथेच राहून पित्याच्या आज्ञेनुसार राज्यकारभार चालवावा लागेल.

         कैकयीने कृतज्ञतेने उर्मिलाकडे बघितले.सर्वांनी किती विनवले होते?स्वतःच्या हाताने पतीला मरणाच्या दाढेत ढकलं होतं.स्वपुत्राकडून तिरस्कार,नकार धिक्कार मिळाल्याने कैकयी अगतिक झाली होती.ज्या पुत्रासाठी एवढं घृणास्पद कृत्य केलं,तोच पुत्र तिची अवहेलना करीत होता.यामुळे तिच्या वाट्याला निव्वळ अपकीर्ती आली होती.

         उर्मिलाचे बोलणे ऐकून भरताने शांतपणे विचार केला.तिच्या बोलण्यात तथ्य आहे हे तिला पटले.स्वतःला सावर त तो सयंतपणे म्हणाला,पिताश्रींनी राज्य करण्याचा आदेश दिला,रामाला १४ वर्षे वनवासात पाठवलं… राज्य करील पण, माझ्या पध्दतीने…त्यासाठी एकच मार्ग आहे,रामाला परत आणून,राज्य त्याच्या सुपूर्द करणे.माझ्या पित्याचे अंतिम संस्कार झाल्यावर रामाला परत आणून सिंहासन त्याला परत करेन.जा..भरता जा..कैकयी म्हणाली, पुत्रा त्यायोगे तुझा गेलेला सन्मान,आदर,विश्वास प्रजेकडून प्राप्त होईल.माते,एकवेळ गेलेला सन्मान शेकडो सस्कृत्य केली तरी परत मिळणार नाही.केवळ माझं जगणं सुसह्य व्हावं म्हणून…माझ्या दोन्ही मातांना सोबत…. पुत्रा,मी सुध्दा…नाही ..तूं नाही…तुझा पुत्र म्हणून जन्माला आलो हे माझं दुर्देव!

तूं केलेल्या पापाचं प्रायश्चित मलाच घ्यायच आहे.अजच्या नंतर मी तुझा पुत्र नाही,तूं माझी माता नाहीस.हे ऐकताच ती हुंदके देत रडू लागली.आजवर प्रबळ असणारी महाराणी कैकयी तिच्याच पुत्रा च्या हातून उध्वस्त होत होती.तिचा सन्मान स्वाभिमान सारच हिरावल्या गेलं होतं.फारच विदारक दृष्य होतं.

          यापुढे कोणीही आपल्या कन्येचे नांव कैकयी ठेवणार नाही.भरताने निष्ठूर पणे शाप दिला व तडक निघून गेला. निदान आता तरी शांताचा त्याचेवर विश्वास बसेल असे उर्मिलाला वाटत होते

          अचानक जोरात किंकाळी आली म्हणून सर्वांनी वळून पाहिले तर,शत्रृघ्न मंथरेच्या केसांना धरुन फरफटत आणतां ना दिसला.त्याने तिला भरताच्या पायावर ढकलले,त्याने हात उगारल्यावर भरत त्याला सावध करत म्हणाला,नाही..स्री वर हात उगारुं नये,रामाला आवडणार नाही.आणि तू हा अपराध करावास एवढी तरी तिची पात्रता आहे कां?मला तर तिचं मस्तक उडवायची इच्छा होत आहे.कैकयी तिला वाचवत म्हणाली, शत्रृघ्ना,असं करुं नकोस,ती मला माते समान आहे.

         कोणती माता?ती? जे अर्धसत्य किंबहुना असत्य सांगीतलं ती?आमच्या पेक्षा तिच्यावर तुझं जास्त प्रेम आहे का? भरता,हिला आतांच्या आतां हाकलून दे, नाही तर मी तिला संपवतो.पण तिने दायी म्हणून लहानपणी त्याचं केललं संगोपन आठवून शुध्द मनाचा भरत तिला कठोर शासन करुं शकणार नाही हे मंथरा पुरते ओळखून असल्यामुळे ती योग्य ठीकाणी आली होती.

         कठोर आवाजांत उर्मिला म्हणाली, भरता अधी तिला बाहेर काढा,ताटीकाही स्री होती तरी रामाने तिचा वध केलाच ना

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि.  २०-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                  भाग – २८.

       उर्मिला म्हणाली! ही विषवल्ली आहे.आपल्या प्रत्येकाला ती भ्रष्ट करीत आहे.आणि त्यात ती यशस्वीसुध्दा होत आहे.तुमच्या मातेचं अंतःकरण हिनेच मलिन केलं आहे.या सार्‍या कारस्थाना मागे  हीच आहे.प्रासादातील प्रत्येकाचे मन कित्येक काळापासून कलुषित करीत आहे,याला मांडवीने सुध्दा दुजोरा दिला. ही अत्यंत विखारी आहे.हीच्या आहारी जाऊन,माझ्या प्रिय बहिणींबद्दल दुराग्रह करुन त्यांच्यापासून दुरावली.हीला आतांच इथून घालवा.मांडवीच्या बोलण्याला पुष्टी देत उर्मिला म्हणाली हिने आम्हा बहिणींशी असेच वर्तन केलं. तुम्हा भावांमधे फूट पाडण्याचे प्रयत्न केले,पण तिला साध्य झाले नाही.यापूर्वी आधीच नाजूक असलेल्या संबंधात हिने तिन्ही मातांच्या मनामधे दरी निर्माण केली.सर्वात आधी तुमची माता बळी पडली. माता कैकयी तुमच्या कधीच लक्षात आलं नाही?कुठली माता स्वतः च्या हाताने स्वतःचं कुटुंब उध्वस्त करायला लावेल?

         कैकयी मंथरेसमोर येऊन म्हणाली, मी तुला मातेच्या ठायी समजून,सर्वांचा विरोध पत्करुन तुझी बाजू घेत राहिली, तुझ्यावर निरतिशय प्रेम केलं,कारण मला माता नव्हती.तूं शरीराने जेवढी कुरुप तेवढीच मनाने घृणास्पद अशी कुब्जा आहेस.तुझ्या रक्ताने माझे हात रंगण्या आधी तूं इथून चालती हो..

         उर्मिला संतापाने म्हणाली,नाही माता कैकयी..इतक्या सहजा सहजी हिची सुटका होता कामा नये.खरंतर हिला मृत्युदंडच द्यायला हवा,पण..इथून दूर कुठे पाठवलं तर,तिथल्या लोकांची मने नासवून त्यांच्या आनंदाला चूड लावेल.हिच्यासाठी एकच योग्य जागा आहे अंधार कोठडी.१४ वर्षानंतर सह्रदयी राम करेल तिची मुक्तता.मंथरेने उर्मिलाची खूप क्षमायाचना केली पण, रक्षकांना बोलावून मंथरासह तिच्या हेरांनाही आंधारकोठडीत रवाना केले. प्रसंगी उर्मिला किती कठोर होऊ शकते हे मांडवी प्रथमच बघत होती.उर्मिलाची

कर्तव्यतत्परता पाहून सारेच आवाक झालेत.

          मंथरेला रक्षक घेऊन गेल्यावर, गंभीरपणे उभ्या असलेल्या भरताला सहज स्वरात उर्मिला म्हणाली,भरता! मधे अनेक अडथळे आल्यामुळे आधीच दोन्ही मातांना भेटायला विलंब झाला.त्या उत्कटतेने वाट बघत आहे.त्यांची भेट घ्या नंतर शत्रृघ्नला म्हणाली,गुरु वसिष्ठांना निरोप द्या,आजच अंतिम संस्कार करायचे आहे आणखी उशीर नको.मृत सम्राटाचा अंत्यविधी त्यांच्या दोन कनिष्ठ पुत्रांच्या हस्ते पार पडला.पित्याचा मृत्यु आणि बंधूंचा वनवास,दोघांनाही दुःख आवरेनासे झाले.त्यांची मोठी बहिण शांताने त्यांचे सांत्वन केल्यावर तिच्या कुशीत शिरुन भरत ढसाढसा रडला. सिंहासनाचा अव्हेर करुन भरताने शांता च्या नजरेत भरताने आपले नैतिक मुल्य वाढवले.

           भरताने राज्यकारभारात लक्ष घालायला सुरुवात केली.कैकयीने स्वतः ला कोंडून घेतले.कौसल्याची प्रकृती तोलामासा झाली होती.तिला सतत नैराश्याचे झटके येत होते.सुमित्रा तिची योग्य काळजी घेत होती.प्रत्येक राणी आपल्या दुःखात चुर होती.उर्मिलाचीही अवस्था वेगळी नव्हती.लक्ष्मणाच्या आठवणीने ती गलबलून जात असे.

        उर्मिऽऽ !हाकेसरशी ती भानावर आली.मांडवी आणि कीर्ती तिच्या कक्षात आल्या होत्या.त्याच्यामुळे तिचं जीवन थोडं तरी सुसह्य झाल होतं.या..ग!मांडवी ला आवेग असह्य झाला,म्हणाली,तू नसतीस तर भरताला मी कसं सांभाळलं असतं?ते अगदी उन्मळून पडले होते. ऊर्मि,कैकयी माता तुझ्याशी इतकी वाईट वागली तरी तूं शांत कशी?तुझी अवस्था किती बिकट झाली असेल?तो भयप्रद प्रसंग,ताण,धक्का,भीषणता एकटीने कसा सहन केला ग?लक्ष्मण,सीतावर तुझे सर्वाधिक प्रेम,त्यांचा विरह कसा स्विकारलास?एवढं सारं सोसून खंबीर पणे उभी आहेस.कसं जमत उर्मि तुला? उर्मिला म्हणाली,मांडवी सध्या भरताला तुझी नितांत गरज आहे.राम नसल्यामुळे ते दिशाहीन झाले असतील,त्यांना बाहेर काढण्यासाठी तुला खंबीर व्हावं लागेल.

        औशाचे चौदा दिवस संपले.शत्रृघ्न च्या मदतीने उर्मिला राज्यकारभाराकडे लक्ष देऊ लागली.सर्व मंत्री व गुरुजनांना राजसभेत पाचारण करुन,सयंतपणे उर्मिला म्हणाली,महाराज दशरथांच्या आदेशा नुसार भरताने राज्यकारभाराची सुत्रे हाती घ्यावी.राज्य राजाशिवाय जास्त दिवस रिक्त नसावे.भरताच्या राज्या भिषेकाची सिध्दता करावी.सर्वांनी सहमती दर्शवली.

          भरत म्हणाले,हे सिंहासन माझे नाही.मला ते स्विकारण्याचा आग्रह करुं नये.सर्वांना वाटते मी या कटात सामील आहे.सर्वांचा विश्वास प्राप्त करणे महत्वाचे आहे.रामाला परत आणून त्याला सिंहासनावर बसवल्यानंतरच मी राजचिन्हांकित वस्राभुषणे धारण करीन.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि  २०-१-२०२२.

ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading