“७ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 7 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ७ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३७२१ ते ३७३२ चे पारायण आपण करणार आहोत.
७ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ५५१ ते ५७५ ,
551-18
जे गा ज्ञान ऐसे । गुणग्रहे तामसे । घेतले भवे पिसे । होऊनिया ॥551॥
जे ज्ञान तमोगुणरुपी ब्रह्मराक्षसाचा संचार झाल्यामुळे वेड्याप्रमाणे फिरते; 551
552-18
जे सोयरिके बाधु नेणे । पदार्थी निषेधु न म्हणे । निरोविले जैसे सुणे । शून्यग्रामी ॥552॥
जे शरीरसंबंधाची अडचण बाळगीत नाही; व पदार्थाच्या ठिकाणी निषेधपणा ओळखत नाही; जसे ओसाड गावात सोडले कुत्रे स्वेच्छेने वागते; 552
553-18
तया तोंडी जे नाडळे । का खाता जेणे पोळे । तेचि येक वाळे । येर घेणेचि ॥553॥
त्याच्या तोंडात सापडत नाही अथवा जे खाल्ले असता तोंड भाजते तीच वस्तू ते टाकते, बाकी सर्व वस्तू त्याजपाशी खपतात, 553
554-18
पै सोने चोरिता उंदिरु । न म्हणे थरुविथरु । नेणे मांसखाइरु । काळे गोरे ॥554॥
उंदीर सोन्यासारखी पदार्थ नाश करीत असता चांगले अथवा वाईट हे तो जाणत नाही, अथवा मांस खाणारा हा मांसाचे ठिकाणी काळे व गोरे हा भेद जाणत नाही; 554
555-18
नाना वनामाजी बोहरी । कडसणी जेवी न करी । का जीत मेले न विचारी । बैसता माशी ॥555॥
किंवा रानास वनवा लागल्यावर त्यास जसा कसलाच विचार राहात नाही अथवा प्राणी जिवंत मेलेला याचा विचार न करता माशी वाटेल त्यावर बसते; 555
556-18
अगा वांता का वाढिलेया । साजुक का सडलिया । विवेकु कावळिया । नाही जैसा ॥556॥
अरे कावळ्यास जसे अन्न ओकलेले किंवा वाढलेले, साजूक किंवा सडलेले हा विचार नसतो, 556
557-18
तैसे निषिद्ध सांडूनि द्यावे । का विहित आदरे घ्यावे । हे विषयांचेनि नांवे । नेणेचि जे ॥557॥
तसे अपवित्र वस्तूचा त्याग करावा, अथवा शास्त्रांत सांगितलेल्या गोष्टींचा आदराने स्वीकार करावा, हे विषयांच्या भरात जे ज्ञान जाणत नाही, 557
558-18
जेतुले आड पडे दिठी । तेतुले घेचि विषयासाठी । मग ते स्त्री-द्रव्य वाटी । शिश्नोदरा ॥558॥
जी जी वस्तू दृष्टीस पडेल, त्या त्या वस्तूचा उपभोग घेते; आणि मग स्त्री असल्यास शिश्नास व द्रव्य असल्यास उदरास वाटून देते; 558
559-18
तीर्थातीर्थ हे भाख । उदकी नाही सनोळख । तृषा वोळे तेचि सुख । वाचूनिया ॥559॥
उदकाच्या ठिकाणी हे तीर्थ किंवा हे अपवित्र ही ज्यास ओळख नसते, परंतु त्यापासून तहान भागते एवढेच सुख जे मानते, 559
560-18
तयाचिपरी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिंद्य । तोंडा आवडे ते मेध्य । ऐसाचि बोधु ॥560॥
त्याचप्रमाणे भक्ष्य व निंद्यानिंद्य यांचा जे विचार करीत नाही, परंतु आपल्यास जे आवडेल तेच पवित्र आहे, असा ज्याचा निश्चय झालेला असतो, 560
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
561-18
आणि स्त्रीजात तितुके । त्वचेंद्रियेचि वोळखे । तियेविषयी सोयरिके । एकचि बोधु ॥561॥
आणि स्त्रीजात म्हणून जेवढी आहे तीजविषयी भोग्य विषय एवढीच त्याची ओळख आहे व तिच्या ठिकाणी आप्तपणा करण्याविषयी जे तत्पर असते; 561
562-18
पै स्वार्थी जे उपकरे । तयाचि नाम सोयिरे । देहसंबंधु न सरे । जिये ज्ञानी ॥562॥
हे पहा, आपल्याला जे उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत, व देह संबंध ज्यांच्याशी झालेले आहेत, ते सोयरे आहेत असा बोध नाही, अशी ज्या ज्ञानाची समजूत असते, 562
563-18
मृत्यूचे आघवेचि अन्न । आघवेचि आगी इंधन । तैसे जगचि आपले धन । तामसज्ञाना ॥563॥
मृत्यूला सगळेच आपले खाद्य आहे असे वाटते, अग्नीला सगळेच इंधन वाटते, तसे या तामस ज्ञानाला सर्व जगत हे आपले धन आहे असे वाटते. 563
564-18
ऐसेनि विश्व सकळ । जेणे विषयोचि मानिले केवळ । तया एक जाण फळ । देहभरण ॥564॥
याप्रमाणे सर्व जग हे उपभोगाकरिताच निर्माण केले आहे अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली आहे, त्यास भरणा शिवाय दुसरा पुरुषार्थच नसतो; 564
565-18
आकाशपतिता नीरा । जैसा सिंधुचि येक थारा । तैसे कृत्यजात उदरा- । लागिचि बुझे ॥565॥
आकाशातून पडलेल्या पाण्यास समुद्र हा एक जसा थारा आहे, त्याप्रमाणे जे ज्ञान कोणतेही कृत्य केले तरी ते पोटासाठीच आहे असे समजते; 565
566-18
वाचूनि स्वर्गु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती । इये आघवियेचि राती । जाणिवेची जे ॥566॥
स्वर्ग किंवा नरक यांच्या प्राप्तीकरीता विहित व निषिद्ध आचरण हेच कारण होय, या जाणिवेची ज्या ज्ञानाला मुळीच ओळख नसते; 566
567-18
जे देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाणप्रतिमा । ययापरौती प्रमा । ढळो नेणे ॥567॥
देहाच्या तुकड्यासच आत्मा हे नाव आहे व ईश्वर ही दगडाचीच मूर्ती आहे यापलीकडे ज्याच्या बुद्धीची धाव नसते; 567
568-18
म्हणे पडिलेनि शरीरे । केलेनिसी आत्मा सरे । मा भोगावया उरे । कोण वेषे । ॥568॥
आणि ते असे म्हणते की, हे शरीर पडल्यावर आत्मा केलेल्या कर्मा सह नाश पावतो; मग कर्माची फळे भोगावयास या मृत्यूलोकी कोणत्या रूपाने आत्मा राहातो ? 568
569-18
ना ईश्वरु पाहाता आहे । तो भोगवी हे जरी होये । तरी देवचि खाये । विकूनिया ॥569॥
किंवा पाहू गेल्यास ईश्वर आहे असे दिसत नाही, तथापि तो कर्माची फळे भोगवीतो म्हणून जर म्हणावे, तर एखादा देवाच्या सोन्यारूप्याच्या मूर्ती विकून खातो त्याची वाट काय ? 569
570-18
गावीचे देवळेश्वर । नियामकचि होती साचार । तरी देशीचे डोंगर । उगे का असती ? ॥570॥
गावातील प्रमुख देव जर कर्माबद्दल शासन करतील म्हणावे, तर त्या मूर्तीच्या ज्या डोंगरातील दगडांच्या तयार केलेल्या असतात, ते डोंगर स्वस्थ का बसतात. 570
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
571-18
ऐसा विपाये देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे । आणि आत्मा तव म्हणिजे । देहातेचि ॥571॥
याप्रमाणे कदाचित देव आहे असे मानले, तरी तो दगडाचीच मूर्ती आहे असे समजते आणि आत्मा म्हणजे देहच आहे असे समजते. 571
572-18
येरे पापपुण्यादिके । ते आघवेचि करोनि लटिके । हित मानी अग्निमुखे । चरणे जे का ॥572॥
याशिवाय पाप किंवा पुण्य ही सर्व लटकी आहेत अग्नि पेटल्यावर पुढे येणार्या सर्व जिनसांचे भक्षण करतो, त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगण्यास मिळेल, तिचा भोग घेण्यातच हित आहे असेही समजते 572
573-18
जे चामाचे डोळे दाविती । जे इंद्रिये गोडी लाविती । तेचि साच हे प्रतीती । फुडी जया ॥573॥
चर्मचक्षूंनी जे जे पदार्थ दृष्टीस पडतील व इंद्रिये ज्या विषयांची गोडी लावतील, त्याच गोष्टी खर्या आहेत असा त्याचा पक्का अनुभव आहे, 573
574-18
किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था । धूमाची वेली वृथा । आकाशी जैसी ॥574॥
किंबहुना पार्था, आकाशात धुराचे लोट व्यर्थ जातात, त्याप्रमाणे ज्याची बुद्धी अशा रीतीने वाढतच जाते; 574
575-18
कोरडा ना वोला । उपेगा आथी गेला । तो वाढोनि मोडला । भेंडु जैसा ॥575॥
बरुंतील भेंड कोरडे किंवा ओले असले तरी मोठे वाढल्यावरही कशाच्या उपभोगास येत नाही, 575
दिवस ३११ वा. ७, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३७२१ ते ३७३२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३७२१
अनंत ब्रम्हांडे उदरी । हरी हा बाळक नंदा घरी ॥१॥
नवल केवढे केवढे । न कळे कान्होबाचे कोडे ॥धृपद॥
पृथ्वी जेणे तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥
विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥
तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥
अर्थ
अनंत ब्रम्हांडज्याच्या उदरामध्ये आहे, असा हा श्रीकृष्ण नंदाघरि बालरूप घेऊन खेळतो आहे. या बालहारीचे मोठे नवल आहे, याचे कोढे काही केल्या सुटत नाही. जो सर्व पृथ्वीला तृप्त करो त्याला सगुण रुपात, गोकळात यशोदा भोजन देते. हा कमलापति सर्व विश्वाला व्यापूण राहिला आहे; परंतु गौळणी याल सगुण रुपात आपल्या कडेवर घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, हा मोठा नटधारि आहे गोपिणी संगे सर्व सुख भोग भोगुनही आपण ब्रम्हचारी राहिला आहे, हे केवढे आच्छर्य आहे ! .
अभंग क्र. ३७२२
कृष्ण गोकुळी जन्मला । दुष्टा चळकाप सुटला ॥१॥
होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥धृपद॥
सदा नाम वाचे । गाती प्रेमे आनंदे नाचती ॥२॥
तुका म्हणे हरती दोष । आनंदाने करिती घोष ॥३॥
अर्थ
कृष्ण गोकुळात जन्माला आहे, हे ऐकून दृष्ट कंसाला चळकाप सुटला. कृष्णनाचा अवतार झाला आणि सर्व लोक आनंदी झाले. ते सारखे मुखाने त्याचे नांव घेऊ लागले व आनंदाने नाचू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाने कृष्णचे नामघोष केल्याने सर्व दोष नाहीस होतात.
अभंग क्र. ३७२३
मेळउनि सकळ गोपाळ । काही करिती विचार ॥१॥
जाऊ चोरू लोणी । आजि घेऊ चंद्रधणी ।
चला वेळ लावियेला अझुणी । एकाकरिता गडे हो ॥धृपद॥
वाट काढिली गोविंदी । मागे गोपाळांची मांदी ॥२॥
अवघाचि वावरे । कळो नेदी कोणा फिरे ॥३॥
घर पाहोनि एकाताचे । नवविधा नवनीताचे ॥४॥
रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥५॥
बोलो नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥६॥
जोगवल्या वरी । तुका करितो चाकरी ॥७॥
अर्थ
कृष्णने सर्व गोपाळ सवंगडिंना गोळा केले. सारे मिळून विचार करू लागले. गोपाळांनो, चला, गौळणीच्या घरी जाऊन मन तृप्त होईपर्यंत लोणी चोरून खाऊ. मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात ? विलंब का लावतात ? लवकर चला. कृष्णने वाट धकविलि. त्याच्या मागे सारे गोपाल निघाले. जो देव आपले स्वरुप दिसून देत नाही, तोच देव सर्वत्र सांचार करत आहे. स्वेच्छेने सर्व प्रकारचे खेळ खेळत आहे. ज्या ठिकाणी नवविधि भक्तीचे नवनीत आहे, असे एकाताचे घर पाहू. त्याने स्वतः माजघरात शिरुण भांड्याचा शोध घेतला. नवविधा भक्तीच्या लोण्याने भरलेली भांडी गोपाळांकडे दिली. खाताने तो कुणालाही बोलू देत नव्हता. ‘गप्प रहा’ असे सांगत होता, भक्तिरूपि लोणी खा आणि त्यावर ज्ञानरूपी दूध प्या. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिरूपि लोणी मीही खाल्ले आहे आणि मी भगवंताची सेवाहि करीत आहे.
अभंग क्र. ३७२४
का रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागे झाले काई । एका ते का नेणसी ॥१॥
केलासी फजित । मागे पुढे ही बहुत । लाज नाही नित्य । नित्य दंड पावता ॥धृपद॥
वोला खोडा खिळ गाढी । ऐसा कोण तये काढी । धावेल कापडी । तुझी आधी वोढाळा ॥२॥
चाले चाल धावे । मी ही येतो तुजसवे । तुका म्हणे जव । तेथे नाही पावली ॥३॥
अर्थ
अरे इंद्रिय रुपी गायी तु का चुकलेल्या आहेस आता तुझी ओळती आली आहे त्यामुळे तू लवकर जावे. मागे काय झाले आहे हे तुला माहित नाही काय ? अरे मागे कित्येक लोकांची फजिती झाली आहे अशीच तुझी देखील मागेपुढे खूप फजिती झाली आहे होणार आहे. अरे काळ तुला नित्य दंड करीत आहे तरी देखील तुला अजूनही लाज वाटत नाही. अरे जन्ममरण रुपी ओला खोडा व त्यामध्ये अज्ञानाची खिळ ही गाढ रोवली गेली आहे आणि त्याला काढेन असा कोण आहे ? तुझी कापडी गाय विषयांच्या पाठीमागे सैरावैरा धावत जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात चल लवकर धावत चल आणि सैराट इंद्रिय रुपी गाई ताब्यात घे आणि त्यांना परमार्थाकडे हरिभक्ती कडे लाव मी ही तुझ्या बरोबर येतो, जोपर्यंत तुझे श्रवण आणि रसना रुपी गाय विषयाच्यापर्यंत पोहोचली नाही तोपर्यंत त्यांना तू ताब्यात घ्यावे.
अभंग क्र. ३७२५
कंठी धरिला कृष्णमणी । अवघा जनी प्रकाश ॥१॥
काला वाटू एकमेका । वैष्णवा निका संभ्रम ॥धृपद॥
वांकुलिया ब्रम्हादिका । उत्तम लोका दाखवू ॥२॥
तुका म्हणे भूमंडळी । आम्ही बळी वीर गाढे ॥३॥
अर्थ
कृष्णनामरूपि मणी आम्ही आमच्या गळ्यात धारण केलेला आहे. त्यामुळे सर्वत्र प्रकाश पसरलेला आहे. हा एकयकाला आता सर्वाना आम्ही मोठ्या उत्साने सर्वाना वाटून टाकू. ब्रम्हादिक असे उत्तमलोक आहेत, तेथिल़ लोकांना आपण हा काला दाखवुन वाकुल्या दाखवु. तुकाराम महाराज म्हणतात या विश्वात आम्ही वैष्णव वीर, बलवान आहोत.
अभंग क्र. ३७२६
पाहाता गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥
करिती नामाचे चिंतन । गडी कान्होबाचे ध्यान ॥धृपद॥
आली द्यावी डाई । धावे वळत्या मागे गाई ॥२॥
एके ठायी काला । तुका म्हणे भाविकाला ॥३॥
अर्थ
गोवळी पाहत होते आणि कृष्णदेव त्यांचे उष्टे खात होते. कान्होबाचे सवंगडी त्याच्या नामाचे चिंतन करीत होते. आपल्यावर आलेला डाव खेळावा आणि गाईंचे रक्षण करावे. तुकाराम महाराज म्हणतात, हरी व तुम्ही सर्वजन एका ठिकाणी काला करा.
अभंग क्र. ३७२७
पैल आली आगी कान्हो काय रे करावे । न कळे ते कैसे आजि वांचो आम्ही जीवे ॥१॥
धाव रे हरी सापडलो संधी । वोणव्याचे मधी बुद्धि काही करावी ॥धृपद॥
अवचिता ज्वाळा येता देखिल्या वरी । परतोनि पाहता आधी होतो पाठमोरी ॥२॥
सभोवता फेर रीग न होय पळता । तुका म्हणे जाणसी ते करावे अनंता ॥३॥
अर्थ
एक दिवस कान्होबाबरोबर सर्व गोपाळ रानात गाई चरत असताना अचानक रानात वनवा पेटला आणि सारे गोपाळ घाबरुन कान्होबाला म्हणाले हे कृष्णा पलीकडे पाहा सर्वत्र आग लागली आहे आता आम्ही आमच्या जीवाला कसे वाचवावे ते काही काय आम्हाला कळत नाही. हे हरी तू आमच्या मदतीला लवकर धाव या वनव्यात आम्ही सापडलो आहोत व त्या वनव्यामध्ये काय करावे याविषयी आमची बुध्दीच चालत नाही. मी थोडया वेळापूर्वी पाहिले तर त्या ज्वाळा आपल्यापासून खूप दूर अंतरावर होत्या परंतू अचानक मी पाठीमागे वळून पाहिले तर त्या ज्वाळा अगदी आपल्याजवळ जवळ येताना मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आपल्याला या वनव्याने चारही बाजूने घेरले आहे आता पुढे पळून जाण्यासही जागा राहिली नाही यावेळी हे अनंता काय करावे हे तुलाच कळते आहे. ”
अभंग क्र. ३७२८
भिऊ नका बोले झाकुनिया राहा डोळे । चालवील देव धाक नाही येणे वेळे ॥१॥
बाप रे हा देवाचा ही देव कळो । नेदी माव काय करी करवीतो ॥धृपद॥
पसरूनि मुख विश्वरूप खाय ज्वाळ । सारूनिया संधी अवघे पाहाती गोपाळ ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागे भ्यालो वायाविण । कळो आले आता या सांगाते नाही शिण ॥३॥
अर्थ
कान्होबा सवंगडयांना म्हणाला, की तुम्ही भीउ नका. आपल्यावर हे आगिचे संकट विश्वात्मक शक्ति निवारेल. घाबरुन जाऊ नका. डोळे मिटुन स्वस्त रहा. बाप रे ! हा तर देवाचाहि देव आहे. काय करील आणि काय घडवून आनेल हे तर कोणालाच समाजु देणार नाही. त्याने विश्वरूप दाखवले आणि वनव्याचा अग्नी भक्षण करू लागला. बाकीचे सारे गोपाळ बोटांच्या फटीतून पाहत होते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विनाकारं घाबरलो होतो. या कान्होबाच्या सहवसात असल्यावर कसलिहि भीति वाटत नाही, कसलाही शीन होत नाही. हे आज कळुन आले.
अभंग क्र. ३७२९
नेणती तयासि साच भाव दावी हरी । लाज नाही नाचे पावा वाजवी मोहरी ॥१॥
चला रे याच्या पाया लागो आता । राखिले जळता महा आगीपासूनि ॥धृपद॥
कैसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखो पोळला तुज तोंडी कोठे अंगी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही का रे करिता नवल । आमची सिदोरी खातो त्याचे आले बळ ॥३॥
अर्थ
ज्यांना हरिचे स्वरुप समजले नव्हते त्यांना हरी नं ते दाखविले. लाज न बाळगता पुन्हा मुरली वाजवित तो नाचू लागला. सर्व सवंगडी म्हणाले. ” चला रे. आपण कृष्णच्या पाया पडुया. त्याने आपल्याला आगीपासून वाचविले आहे. कृष्णा, एवढी मोठी आग तू कशी गिळूण टाकलीस ? तुझ्या अंगाला, तोंडाला कुठे भाजले, पोळलेले दिसत नाही. एक गोपाळ म्हणाला, गडयांनो, अरे तुम्ही सारे त्या कृष्णाचे इतके नवल का करतात ? मला तर अजिबात नवल वाटत नाही. अरे तुकाराम महाराज म्हणतात हा कृष्ण आपली शीदोरी खातो ना, म्हणून त्याच्या अंगी अग्नी भक्षण करण्या इतकी शक्ति आली आहे.
अभंग क्र. ३७३०
त्यांनी धणीवरी संग केला हरीसवे । देऊनि आपुले तोचि देईल ते खावे ॥१॥
न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हाचि निर्धार त्याला ॥धृपद॥
कान्होबा तू जेवी घासोघासी आळविती । आरुष गोपाळे त्यांची बहु देवा प्रीती ॥२॥
तुका म्हणे आता जाऊ आपुलिया घरा । तोय वांचविले ऐसे सांगो रे दातारा ॥३॥
अर्थ
गोपाळ तृप्त होईपर्यंत श्रीकृष्णच्या संगतीत राहिले; आपले सर्वस्व त्याला दिले व तो जे देईल, तेच ते सारे खात होते. हरीने त्यांचे ऋण ठेवले नाही. त्यांच्या प्रेमासाठी तो भुकेला होता. खुप दिवस त्यांची सांगत घडावि, असा श्रीकृष्णचा निर्धार होता. कृष्णा, तू जेव ना. असे प्रत्येक घास घेत असतांना गोपाळ त्याला आळवित होते. बोबडे बोल बोलाणाऱ्या गोपाळांवर त्याचे खुप प्रेम होते. तुकाराम महाराज म्हणतात, आता आपण आपल्या घरी जाउया आणि या कृष्णने आम्हाला वाचविले, असे आपण सर्वाना सांगुया.
अभंग क्र. ३७३१
घ्या रे भोंकरे भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडा दुरी । असेल ते तयापे ॥१॥
येथे द्यावे तैसे घ्यावे । थोडे परी निरे व्हावे । सांगतो हे ठावे । असो द्या रे सकळा ॥धृपद॥
माझे आहे तैसे पाहे । नाही तरी घरा जाये । चोरोनिया माये । नवनीत आणावे ॥२॥
तुका म्हणे घरी । माझे कोणी नाही हरी । नका करू दुरी । मज पाया वेगळे ॥३॥
अर्थ
भगवंत सवंगडयांना म्हणाले, अरे बाबांनो, भोकाराचे लोणचे आणि दहिभात शिदोरि घ्या रे. ज्याच्या जवळ ताक असेल ते दूर फेकावे. येथे जसे द्यावे तसे मिळते. थोडेसे जरी असेल तरी चांगले असले पाहिजे. हे जे मी तुम्हाला सांगतो ते ध्यानात ठेवा. माझ्याजवाळ हे जसे आहे तसे तुमच्या जवळचे शुद्ध आहे का हे तुम्ही पहा. नसेल तर घरी जा हे आईला समजून येणार नाही, अश्या प्रकार लोणी घेऊन या. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी, घरी माझे कोणीही नाही. तुम्ही मला तुमच्या पायापासून दूर लोटू नका.
अभंग क्र. ३७३२
काल्याचिये आसे । देव जळी जाले मासे । पुसोनिया हासे । टिरीसांगाते हात ॥१॥
लाजे त्यासि वाटा नाही । जाणे अंतरीचे ते ही । दीन होता काही । होऊ नेदी वेगळे ॥धृपद॥
उपाय अपाय यापुढे । खोटे निवडितो कुडे । जोडुनिया पुढे । हात उभे नुपेक्षी ॥२॥
ते घ्या रे सावकाशे । जया फावेल तो तैसे । तुका म्हणे रसे । प्रेमाचिया आनंदे ॥३॥
अर्थ
काला खावून नदीच्या पाण्यात गोपाल हात धुतिल तेव्हा तरी त्या काल्याचे उष्टे आपल्याला मिळेल. या आशेने स्वर्गातील देव पाण्यात मासे बनून राहिले. हे त्यांचे कपट हरीने ओळखले, हरीने व सर्व गोपाळांनी उष्टे हात टिरीला (ढुंगनाला) पुसले आणि हसले. जे लाज धरून दूर बसले होते, त्यांना काल्यातील वाटा मिळाला नाही. हरी सर्वाच्या मनातील जाणतो. जे त्याच्या चरणी दिन होतात, त्याना आपल्यापासून दूर होउ देत नाही. त्याच्यापुढे उपाय हे अपाय होतात. खोटे कूड़े निवडून तो बाजूला काढतो. जे त्याच्यापुढे हात जोडून उभे राहतात त्यांची तो उपेक्षा करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या वाट्याला जे येईल, ते त्याने सावकाश घ्यावे आणि कृष्णच्या प्रेमरसात आनंदाने राहावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

