Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

५ नोव्हेंबर, दिवस ३०९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ५०१ ते ५२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३६९७ ते ३७०८

5 NOVEMBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

5 NOVEMBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“५ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 5 November
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ५ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३६९७ ते ३७०८ चे पारायण आपण करणार आहोत.
५ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ५०१ ते ५२५,

501-18
तरी बाहेरीले तियेही । चक्षुरादिके दाहाही । उठौनि लवलाही । व्यापारा सूये ॥501॥
तर नेत्रादि दहाही बाह्येन्द्रियांना उठवून त्यांना तो व्यापार करावयास लावतो; 501
502-18
मग तो इंद्रियकदंबु । करविजे तव राबु । जव कर्तव्याचा लाभु । हातासि ये ॥502॥
नंतर त्या इंद्रिय समुदायाला तोपर्यंत राबवितो, की जोपर्यंत कर्माचे फळ हाती आले नाही ! 502
503-18
ना ते कर्तव्य जरी दुःखे । फळेल ऐसे देखे । तो लावी त्यागमुखे । तिये दाहाही ॥503॥
किंवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे दिसले, तर त्या कर्माचा त्याग करण्याकरिता त्या दहाही इंद्रियांची योजना करितो. 503
504-18
मग फिटे दुःखाचा ठावो । तव राहाटवी रात्रिदिवो । विकणवाते का रावो । जयापरी ॥504॥
मग जसा एखादा राजा वसूल करण्याकरिता आपल्या सेवकांना रात्रंदिवस राबवितो तसा तो ते दुःख नाहीसे होईपर्यंत रात्रंदिवस खटपट करतो. 504
505-18
तैसेनि त्याग स्वीकारी । वाहाता इंद्रियांची धुरी । ज्ञातयाते अवधारी । कर्ता म्हणिपे ॥505॥
अशाप्रकारे कर्माचा त्याग अथवा स्वीकार करण्याकरिता इंद्रियांचे पुढारीपण ज्ञात्याने घेतले, म्हणजे त्यालाच कर्ता असे म्हणतात; 505


506-18
आणि कर्तयाच्या सर्व कर्मी । आउताचिया परी क्षमी । म्हणौनि इंद्रियाते आम्ही । करणे म्हणो ॥506॥
आणि कर्ता हा कर्म करण्याकरिता आऊता प्रमाणे सर्व इंद्रियांना खपवतो. म्हणून आम्ही त्यास करणे म्हणजे क्रियेची साधने असे म्हणतो.
507-18
आणि हेचि करणेवरी । कर्ता क्रिया ज्या उभारी । तिया व्यापे ते अवधारी । कर्म एथ ॥507॥
आणि हे करण्याकरीता कर्ता ज्या ज्या क्रिया उत्पन्न करतो, त्यांनी जे व्यापिले जाते त्यास कर्म असे म्हणतो. 507
508-18
सोनाराचिया बुद्धि लेणे । व्यापे चंद्रकरी चांदणे । का व्यापे वेल्हाळपणे । वेली जैसी ॥508॥
सोनाराच्या बुद्धीने जसे दागिने व्यापिले जातात, चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते, किंवा विस्ताराने जसा वेल व्यापला जातो, 508
509-18
नाना प्रभा व्यापे प्रकाशु । गोडिया इक्षुरसु । हे असो अवकाशु । आकाशी जैसा ॥509॥
अथवा सूर्याच्या प्रभेने जसा सूर्यप्रकाश व्यापला जातो व गोडीने जसा उसाचा रस व्यापला जातो, हे असो, अवकाशाने जसे आकाश व्यापले जाते, 509
510-18
तैसे कर्तयाचिया क्रिया । व्यापले जे धनंजया । ते कर्म गा बोलावया । आन नाही ॥510॥
तसे अर्जुना, कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते ते कर्म होय यात शंका नाही. 510
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


511-18
एवं कर्म कर्ता करण । या तिहीचेही लक्षण । सांगितले तुज विचक्षण- । शिरोमणी ॥511॥
याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म, कर्ता व करण या तिघांची लक्षणे सांगितली. 511
512-18
एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हे कर्माचे प्रवृत्तित्रय । तैसेचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ॥512॥
तर ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी कर्मप्रवृत्ती कारक आहे. तसेच कर्ता, करण व कार्य ही त्रिपुटी हा कर्मसंचय आहे. 512
513-18
वन्ही ठेविला असे धूमु । आथी बीजी जेवी द्रुमु । का मनी जोडे कामु । सदा जैसा ॥513॥
विस्तवात जसा धूर ठेवलेलाच असतो, अथवा मनात जशी नेहमीच इच्छा असते, 513
514-18
तैसा कर्ता क्रिया करणी । कर्माचे आहे जिंतवणी । सोने जैसे खाणी । सुवर्णाचिये ॥514॥
आणि सोने जसे सुवर्णाच्या खाणीत सापडते- तसा कर्ता क्रिया व करणे(इंद्रिये) ही त्रिपुटी कर्माचा जिव्हाळाच (उत्पत्तिस्थानच) आहे. म्हणून 514
515-18
म्हणौनि हे कार्य मी कर्ता । ऐसे आथि जेथ पंडुसुता । तेथ आत्मा दूरी समस्ता । क्रियांपासी ॥515॥
हे पंडुसुता, अमुक कार्याचा मी कर्ता, जसा जीवाने कर्तेपणा धारण केला, म्हणजे सर्व क्रिया जवळ येतात व आत्मा या सर्व क्रियापासून दूर असतो. 515


516-18
यालागी पुढतपुढती । आत्मा वेगळाचि सुमती । आता असो हे किती । जाणतासि तू ॥516॥
यास्तव हे सुभते, कर्मापासून आत्मा वेगळाच आहे, हे तुला वारंवार काय सांगावे ? कारण हे तू जाणतच आहेस. 516
ज्ञानं कर्म च कर्ताच त्रिधैव गुणभेदतः ।
प्रोच्यते गुणसण्‌ख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥18. 19॥
517-18
परी सांगितले जे ज्ञान । कर्म कर्ता हन । ते तिन्ही तिही ठायी भिन्न । गुणी आहाती ॥517॥
पण तुला जे ज्ञान, कर्म व कर्ता म्हणून सांगितले, ती तिन्ही गुणांनी निरनिराळी आहेत. 517
518-17
म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजो नये धनंजया । जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ ॥518॥
म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म व कर्ता यांच्यावर विश्वास ठेवू नको. कारण यातील रज व तम या दोन गुणांपासून मनुष्य बद्ध होतो व फक्त सत्त्वगुणच सुटका करण्यास समर्थ आहे. 518
519-18
ते सात्विक ठाऊवे होये । तो गुणभेदु सांगो पाहे । जो सांख्यशास्त्री आहे । उवाइला ॥519॥
तो सात्त्विक गुणांचा भेद ज्याविषयी संख्याशास्त्रात विवेचन केलेले आहे तो तुला समजेल असा सांगतो. 519
520-18
जे विचारक्षीरसमुद्र । स्वबोधकुमुदिनीचंद्र । ज्ञानडोळसा नरेंद्र । शास्त्रांचा जे ॥520॥
जे संख्यशास्त्र विचाररूपी क्षीर समुद्रच आहे, आत्मबोधरुपी कमलास प्रफुल्लित करणारा चंद्रच आहे व ज्ञान उत्पन्न करणारे शास्त्रात श्रेष्ठ आहे. 520
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


521-18
की प्रकृतिपुरुष दोनी । मिसळली दिवोरजनी । तिये निवडिता त्रिभुवनी । मार्तंडु जे ॥521॥
किंवा प्रकृती व पुरुष ही दोन्ही दिवस व रात्र याप्रमाणे अहर्निश एकमेकांत मिसळली आहेत. त्यांना पृथक करून दाखविणारा या त्रिभुवनात सूर्यच आहे. 521
522-18
जेथ अपारा मोहराशी । तत्वाच्या मापी चोविसी । उगाणा घेऊनि परेशी । सुरवाडिजे ॥522॥
जे अपार अशा मोहाचा चोवीस तत्त्वांनी ठाव घेऊन परतत्त्वाची प्राप्ती करून देऊन सुख भोगावयास लावते. 522
523-18
अर्जुना ते सांख्यशास्त्र । पढे जयाचे स्तोत्र । ते गुणभेदचरित्र । ऐसे आहे ॥523॥
अर्जुना, असे जे सांख्यशास्त्र, ते ज्या गुणांचे स्तवन करिते, त्यात तीन गुणांचे वर्णन असे आहे. 523
524-18
जे आपुलेनि आंगिके । त्रिविधपणाचेनि अंके । दृश्यजात तितुके । अंकित केले ॥524॥
या गुणांनी आपल्या बळाने तीन प्रकारचे शिक्के देऊन द्रव्यपदार्थ स्वाधीन करून घेतले आहेत, 524
525-18
एवं सत्वरजतमा । तिहीची एवढी असे महिमा । जे त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंती कृमी ॥525॥
याप्रमाणे सत्व, रज व तम या तीन गुणांचे एवढे सामर्थ्य आहे की, त्यांनी ब्रह्मदेवापासून किटका पर्यंत तीन भेद केले आहेत. 525

दिवस ३०९ वा. ५, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६९७ ते ३७०८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३६९७
बळे डाई न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥१॥
मोकळे देवा खेळो द्यावे । सम भावे सांपडावया ॥धृपद॥
येतो जातो वेळोवेळा । न कळे कळा सांपडती ॥२॥
तुका म्हणे धरा ठायीच्या ठायी । मिठी जीवे पायी घालुनिया ॥३॥
अर्थ
परमेश्वर बळेच दुराग्रहात सापडनार नाही. आपल्या बुद्धिकौशल्याने जो वागेल, तो शहाणा. देवाला मुक्तपणे खेळूद्यावे तो सर्वव्यापी आहे; व समभावाने तो सापडतो. तो वारंवार येतो आणि जातो. त्याला शोधन्याची युक्ती केली तरी तो कोणाला सापडला नाही. तो आवतार कार्‍याने येतो आणि तेथिल कार्य संपले की नव्या आवतारात प्रविष्ट होतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या जीवाची मीठी त्याच्या पायावर घाला आणि आहे तिथेच त्याला धरा.

अभंग क्र. ३६९८
कवळाचिया सुखे । परब्रम्ह झाले गोरखे । हात गोवुनि खाय मुखे । बोटासांदी लोणची ॥१॥
कोण जाणे तेथे कोण लाभ । का ते ब्रम्हादिका दुर्लभ ॥धृपद॥
घाली हमामा हुंबरी । पावा वाजवी मोहरी । गोपाळाचे फेरी । हरी छंदे नाचतसे ॥२॥
काय नव्हते त्या घरी खावया । रिघे लोणी चोरावया । तुका म्हणे सवे तया । आम्ही ही सोंकलो ॥३॥
अर्थ
काल्याच्या घासाच्या सुखाच्या आशेमुळे परमेश्वर गुराखि झाला. तो घास हाती घेऊन, बोटाला लोणचे लाउन मुखात घालू लागला. देवांना दुर्लभ असलेला काला खाण्यात या परब्रम्हाला कृष्णाला कोणते सुख प्राप्त होते, ते कोणालाच कळत नाही. कृष्ण गोपाळ सोबत्यांबरोबर हमामा, हुंबरी असे खेळ खेळू लागला. सारे रिंगण धरून नाचू लागले. फेर धरून नाचु लागले. बासरी मोहरी वाजवून त्या छंदात गोपाल, कृष्ण नाचत होते. तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरिला घरात काही खायला मिळत नव्हते की काय ? इतरांच्या घरात घुसून तो हावरेपणाने लोणी चोरून खातो. आम्हीही त्याच्या संगतीने लोणी चोरून खायला सोकावलो आहोत.

अभंग क्र. ३६९९
कान्होबा आता तुम्ही आम्हीच गडे । कोणाकडे जाऊ नेदू ॥१॥
वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊ नेदू ॥धृपद॥
ढवळे गाईचे दूध काढू । एकएकल्या ठोंबे मारू ॥२॥
तुका म्हणे टोकवू त्यांला । जे तुझ्या बोला मानीती ना ॥३॥
अर्थ
कान्होबा, आता तुम्ही आणि आम्ही खेळगडी. आता आपल्याकडिल भाव दुसरीकडे जाऊ द्यायचा नाही. तुझ्या शिदोरिचा भार मी वहिन, गाई वळण्याची पाळी तुझ्यावर येऊ देणार नाही. ढवळया गाईचे दूध काढू, तर नाठाळ, स्वैर बुद्धिरूपी गाईला ठोसर मारू. तुकाराम महाराज म्हणतात, जे तुझ्या बोलण्याला मानत नाहीत, त्यांना तुझ्या तोंडाकडे पाहायला नको लावू त्याना आपण टोकवु.

अभंग क्र. ३७००
बहु काळी बहु काळी । आम्ही देवाची गोवळी ॥१॥
नाही विट देतो भाते । जेऊ बैसवु सांगाते ॥धृपद॥
बहु काळे बहु काळे । माझे पाघरे कांबळे ॥२॥
तुका म्हणे नाही नाही । त्याचे आमचे से काही ॥३॥
अर्थ
आम्ही खूप काळापासून देवाची गोवळी सखे आहोत. ज्याला कोणत्याही प्रकारचा वीट नाही अशा प्रकारचा दही भात काला तो आम्हाला देतो व एकमेकांच्या सोबतच जेवण करतो. माझे घोंगडे खूप काळापासून तो पाघरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात. “अहो आमचे काहीच नाही आमचे काहीच नाही सर्व काही त्याचेच आहे. ”

अभंग क्र. ३७०१
अभंग क्र. ३७०१
बहु बरा बहु बरा । यासांगाते मिळे चारा ॥१॥
म्हणोनि जीवेसाठी । घेतली कान्होबाची पाठी ॥धृपद॥
बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषे ॥२॥
पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोका ॥३॥
अर्थ
हा कान्हा खूप चांगला खूप चांगला आहे याच्या संगतीनेच आम्हाला भरपूर खाण्यास मिळते. म्हणूनच आम्ही आमचे जीव अर्पण करुन आमच्या जीवावर उदार होऊन आम्ही कान्होबाच्या पाठीमागे लागलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “पुन्हा पुन्हा कृष्णाकडे जाऊन चांगले खाण्यास मी सोकलो आहे व लोकांनाही मी सोकवीतो आहे. ”

अभंग क्र. ३७०२
घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचे समाधान करी ॥१॥
ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागे धावे ॥धृपद॥
स्थिरावली गंगा । पागविली म्हणे उगा ॥२॥
मोहरी पावा काठी । तुका म्हणे यांजसाठी ॥३॥
अर्थ
पाणी पिण्यासाठी गाई हंबरत असत परंतु भगवंताने वेणू वाजविला की त्या शांत होत असत. गाईंना हरीची इतकी सवय झाली होती की भगवंत जिथे जिथे जात असत त्यांच्या पाठीमागे मागे जात असत. भगवंताची सवय यमुनेला देखील झाली होती ज्यावेळी भगवंत वेणू वाजवत असत त्यावेळी यमुना देखील स्थिरावली जात मग भगवंत गोपाळांना म्हणत असे की आता तुम्ही देखील उगाच रहा. तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताने सर्वाना मोहित करण्यासाठी हातामध्ये मोहरी म्हणजे मुरली पावा, काठी धारण केलेली आहे.

अभंग क्र. ३७०३
वळत्या गाई धावे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥
नांव घेता तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥धृपद॥
नेदी पडो उणे पुरे । म्हणे अवघेचि बरे ॥२॥
तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥३॥
अर्थ
इतरत्र धावांर्‍या गाईंना हरी वळवितो. आमच्या घरी फेऱ्या मारतो. ‘कान्होबा’ म्हणताच तो जवळ येवून उभा राहतो. तो अतिशय बलवान आहे. आम्हाला तो काही कमी पडू डेत नाही. ‘तुमचे सर्व ठीक आहे ना ? ‘ असे विचारतो. तुकाराम महाराज म्हणतात, तो आमच्या अंत:करणापासून दूर व्हावा असे आम्हाला वाटतच नाही.

अभंग क्र. ३७०४
म्हणती धालो धणीवरी । आता न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आता यास विसंबों ॥१॥
चाल चाल रे कान्होबा । खेळ मांडू रानी । बैसवू गोठणी । गाई जमा करूनि ॥धृपद॥
न लगे जावे घरा । चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तू आम्हा ॥२॥
तुका म्हणे धाले पोट । आता कशाचा बोभाट । पाहाणे ते वाट । मागे पुढे राहिली ॥३॥
अर्थ
गोपाल म्हणतात, आमचे पोट भरले; आता आम्हाला शिदोरिचि गरज नाही. या देवाला आम्ही क्षणभरहि विसरणार नाही. कान्होबा, चल-चल- रे आपण राणात खेळ मांडू. गाई जमा करून त्याना गोठ्यात बसवु. आता घराकडे जाण्याची गरज नाही. घराच्या येरझार्‍या आता संपल्या. तूच आमचा मायबाप, उत्तम सयरा सारेकाहि आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा पोट भरले की कशाला बोभाटा करायचा ? मग मागे पुढे पाहणेच संपले.

अभंग क्र. ३७०५
तुझिये संगति । झाली आमुची निश्चिंति ॥१॥
नाही देखिले ते मिळे । भोग सुखाचे सोहळे ॥धृपद॥
घरी ताकाचे सरोवर । येथे नवनीताचे पूर ॥२॥
तुका म्हणे आता । आम्ही न वजो दवडिता ॥३॥
अर्थ
हे भगवंत तुझ्या संगतिमुळे अंतःकरण अगदी निश्चिंत झाले आहे. कसली काळजी राहिलेली नाही. जे कधीही अनुभवले नव्हते, ते सुख सोहळे आता आम्ही अनुभवले. घरात ताकाचे सरोवर आहे; तर येथे लोण्याचा पुर आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता जरी तू आम्हाला हकलुन लावलेस तरीदेखिल आम्ही येथून जाणार नाही. तुझ्याच सहवासात राहणार.

अभंग क्र. ३७०६
कामे पीडिलो माया । बहु मारी नाही दया ॥१॥
तुझ्या राहिलो आधारे । झाले अवघेचि बरे ॥धृपद॥
तुझे लागलो संगती । आता येतो काकुळती ॥२॥
तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥३॥
अर्थ
मी काम (वासना) मुळे त्रासुन गेलो आहे. “माया” मला जन्ममृत्यूच्या दारात सारखी मारत आहे, तिला जराहि मया-दया नाही. देवा मी तुझ्या आधाराने राहिलो; त्यामुळे सर्वत्र चांगले झाले आहे. तुझ्या संगतिला आलो म्हणून काकुलतीला आलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, हे कान्होबा, तुझ्या भिड़ेमुळे आमची पीड़ा दूर गेली.

अभंग क्र. ३७०७
खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायी रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळी । पवित्र गाणे नामावळी रे । कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥धृपद॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळा रे । टाळ मृदंग घाई पुष्पाचा वरुषाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥
लुब्धली नादी लागली समाधी । मूढ जन नर नारी लोका रे । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सद्धिसाधका रे ॥३॥
वर्णाभिमान विसरली याति । एकएका लोटांगणी जाती रे । निर्मळ चित्ते झाली नवनीते । पाषाणा पाझर सुटती रे ॥४॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ॥५॥
अर्थ
वैष्णवांनी प्रेमभावनेने वाळवंटात ऐक्यभावाचा खेळ मांडला आहे. सर्व वैष्णव त्या खेळात दंग होऊन नाचू लागले. क्रोध, अभिमान हे सारे पायाखाली तुडवुन एकमेकांच्या चरणावर ते डोके ठेवत आहेत. ते पवित्र नामावळी गात आहेत. आनंदाने उडया मारित आहेत. त्यांनी काळिकाळाला जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. ते एकापेक्षा एक शुर वीर आहे. त्यानी अंगाला गोपीचंदन लावले असून गळ्यात तुळशीच्या माळा घातलेल्या आहत. ते गळ्यात हार मिरवित आहेत. टाळ, मृदुंगाचा घोष, फुलांचा वर्षाव होत आहे. उपमा देतायेणार नाही असा तो सुखसोहळा आहे. भजनाच्या नादात लुब्ध होऊन मुढ, स्त्रिया, पुरुष, पंडित, ज्ञानि, योगी, महानुभवी, सीद्ध, साधक या सार्यांना एकच समाधि लागली आहे. वर्ण, जात यांचा अभिमान विसरून, जात-पात विसरून ते सारे एकमेकांना लोटांगण घालित आहेत. त्यांचे मन लोण्यासारखे निर्मळ आहे. पा�

अभंग क्र. ३७०८
एके घाई खेळता न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे ।
त्रिगुणाचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघासी तरी धरी सोई रे ॥१॥
खेळ खेळोनिया निराळा चि राही । सांडी या विषयाची घाई रे ।
तेणे चि खेळे बसवंत होसी । ऐसे सत्य जाणे माझ्या भाई रे ॥धृपद॥
सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणे विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई ।
तेणे सतत फड जागविला रे । एक घाई खेळता तो न चुके चि कोठे । तया संत जन मानवले रे ॥२॥
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदे खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनी बसवंत केला ।
आपण भोवती नाचती रे । सकळीका मिळोनी एकची घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायी रे ॥३॥
राम बसवंत कबीर खेळीया । जोड बरवा मिळाला रे । पाचा सावन्ग्दिया एकची घाई ।
तेथे नाद बरवा उमटला रे । ब्रम्हादिक सुरवर मिलोनिया त्यांनी । तो हि खेळीया निवडीला रे ॥४॥
ब्राम्हणाच पोर खेळीया ऐका भला । तेणे जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करुनिया तेणे वैष्णवाचा मेळ मेळविला रे ।
एकची घाई खेळता खेळता । आपणची बसवंत जाला रे ॥५॥
आणिक खेलीये होऊनिया गेले । वर्णावया वाचा मज नही रे ।
तुका म्हणे गडे हो हुशारुनी खेळा । पुढिलांची धरुनिया सोई रे ।
एकची घाई खेळता जो चुकला । तो पडे संसार डाई रे ॥६॥
अर्थ
अर्थ :- अरे भाई, एक्याभाव मणि धरून कोणताही खेल खेळशील तर संसाराच्या दावात पडणार नाहीस. दूर राहिलास तर फसशील. त्रिगुणाच्या फेऱ्यात तू अङ्कलास तर फार दुःखी होशील. तसे होउ नये म्हणून च्यार वेदानी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब कर ।।1।।अरे भावा, खेळ खेळून अलिप्त रहा. विषयचा संग टाकून दे. या खेळानेच तू समर्थ होशील. माझे बोलने सत्य आहे, हे ध्यानात ठेव ।।ध्रु।।शिमप्याचा पोर नामा-असाच खेळ खेळला . बलवान अश्या विठ्ठलाला त्याने आपलेसे केले. आपल्या सवंगड्यांना शिकवुन फड़ सतत जागता ठेवला. एक्य भावनेने खेळत असतांना तो कुठेच् चुकला नाही. सर्व संतानी त्याला सन्मान दिला ।।2।।ज्ञानदेव, मुक्ताबाई, वटेश्वर, चांगा, सोपान हे आनंदाने खेळ खेळले रे! यानी गुराखि कृष्णला पुढारी बनविले आणि सर्वजन त्याच्याभोवती फहरी धरून नाचले. ब्रम्हादिक देव त्यांच्या पाया पडतात रे ।।3।।रामा बसवंत, खेळाडू कबीर यांची चांलि जोड़ी जमली. तेथे भजनाचा सुंदर नाद जमला रे! ब्रम्हादिक देवांनी मिळून हाच खेळ निवडला ।।4।।ब्रम्हणाचा पोर एकनाथ हा एक चांगला खेळ निवडला. त्याने सर्वाणांच् खेलकरि बनविले. जनार्दन, बसवंत याना पुढे करूँ त्यानी वैष्णवांचा मेळा जमविला. एक्य भावाने खेळ खेळला आणि आपण स्वत: पुढारी झाला ।।5।।तुकाराम महाराज म्हणतात, वर्णन करण्यास माझी वाच्या समर्थ आहे. अरे गड्यानो, पुढे गेलेल्यांची सांगत धरून पुढे हुश्यारीने खेळा. एक्य भावाने जो खेळ खेळन्याचे चुकल, तो संसाराच्या जाळ्यात सापडेल रे! ।।6।।

नोव्हेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version