“२१ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 21 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २१ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३८८९ ते ३९०० चे पारायण आपण करणार आहोत.
२१ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ९०१ ते ९२५,
901-18
जे सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जे प्रमा । नाना कर्ममार्गश्रमा । शेवटु जेथ ॥901॥
जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय व मोक्षलाभाचा निश्चय अथवा कर्ममार्गाचे श्रमपरिहार होण्याचे स्थान होय; 901
902-18
मोक्षफळे दिधली वोल । जे सुकृततरूचे फूल । तये वैराग्यी ठेवी पाऊल । भंवरु जैसा ॥902॥
ज्याला मोक्षफल जामीन झालेले आहे किंवा जे सत्कर्म रूप वृक्षांचे फुलच होय, त्या वैराग्याचे ठिकाणी साधक पुरुष भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो. 902
903-18
पाही आत्मज्ञानसुदिनाचा । वाधावा सांगतया अरुणाचा । उदयो त्या वैराग्याचा । ठावो पावे ॥903॥
हे पहा सूर्योदयाची वार्ता सांगणारा जसा अरुणोदय आहे, त्याप्रमाणे या आत्मज्ञान रूप सुदिनाचा उदय सुचविणारे हे वैराग्य आहे. 903
904-18
किंबहुना आत्मज्ञान । जेणे हाता ये निधान । ते वैराग्य दिव्यांजन । जीवे ले तो ॥904॥
किंबहुना आत्मज्ञान रूप जे निधान ते ज्या वैराग्यरूप दिव्य अंजनाने हातात येते, ते जो जीवेभावे करून बुद्धी रूप डोळ्यात घालतो 904
905-18
ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धी जाय तया पंडुसुता । अनुसरोनि विहिता । कर्मा यया ॥905॥
अर्जुना, अशाप्रकारे विहित कर्माला अनुसरून आचरण केले असता, त्याला मोक्षप्राप्तीची योग्यता प्राप्त होते. 905
906-18
हे विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा । आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥906॥
हे पांडवा, विहित कर्म हा आपल्या कल्याणाचा जिव्हाळा होय. त्याचं आचरण करणे हीच मज सर्वात्मक ईश्वराची परम सेवा होय. 906
907-18
पै आघवाचि भोगेंसी । पतिव्रता क्रीडे प्रियेसी । की तयाची नामे जैसी । तपे तिया केली ॥907॥
संपूर्ण भोगे करून पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीबरोबर क्रीडा करते त्या तिच्या आचरणास ‘तप’ असे म्हणावे 907
908-18
का बाळका एकी माये । वाचोनि जिणे काय आहे । म्हणौनि सेविजे की तो होये । पाटाचा धर्मु ॥908॥
किंवा बाळाला आई वाचून जगायला दुसरे साधन नाही, म्हणून तिची सेवा केली असता त्याचे कल्याण होते, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करणे हाच मुख्य धर्म होय. 908
909-18
नाना पाणी म्हणौनि मासा । गंगा न सांडिता जैसा । सर्व तीर्थ सहवासा । वरपडा जाला ॥909॥
अथवा केवळ पाणी समजून गंगेत राहिलेल्या माशाला तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थांचा सहज लाभ होतो, 909
910-18
तैसे आपुलिया विहिता । उपावो असे न विसंबिता । ऐसा कीजे की जगन्नाथा । आभारु पडे ॥910॥
तसे आपल्या विहित कर्मांचे आचरण केल्यावाचून दुसरा उपायच नाही व अशा निश्चयाने त्याचे आराधन केले असता जगन्नाथ जो ईश्वर त्यावर आपले ओझे पडते, 910
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
911-18
अगा जया जे विहित । ते ईश्वराचे मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रांत । सापडेचि तो ॥911॥
अरे ज्याचे जे विहित कर्म नेमलेले आहे, ते त्याने करणे हेच ईश्वराचे मनोगत आहे, म्हणूनच ते कर्म केले असता नि:संशय ईश्वर प्राप्त होतो. 911
912-18
पै जीवाचे कसी उतरली । ते दासी की गोसावीण जाली । सिसे वेचि तया मविली । वही जेवी ॥912॥
दासी असूनही जर राजाच्या कसोटीस उतरली, तर तीच सर्वाची स्वामिनी होते; किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा त्याला स्वामी जसा इनामपत्र करून देऊन आपले दप्तरी दाखल ठेवतो, 912
913-18
तैसे स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा । येर ते गा पांडवा । वाणिज्य करणे ॥913॥
तसे ईश्वराच्या मनोभावे प्रमाणे वागणे हीच त्याची परम सेवा होय व यावाचून हे दुसरे कृत्य करणे, ते अर्जुना, वाणिज्य कर्माप्रमाणे आहे. 913
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥18. 46॥
914-18
म्हणौनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची खूण पाळिली । जयापसूनि का आली । आकारा भूते ॥914॥
म्हणून विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे, तर ज्या परमात्म्यापासून सर्व भूते उत्पन्न झाली आहेत, त्यांचे मनोगतच आपण पाळीले ! 914
915-18
जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू ॥915॥
जो परमात्मा अज्ञानरूपी चिंध्या गुंडाळून जीवरुपी बाहुल्या तयार करतो, आणि सत्व-रज-तम अशा तीन पदरी अहंकाररूप सूत्राने त्यांना खेळवितो. 915
916-18
जेणे जग हे समस्त । आत बाहेरी पूर्ण भरित । जाले आहे दीपजात । तेजे जैसे ॥916॥
दिवा जसा तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो तसे ज्या परमात्म्याने हे सर्व जग अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे; 916
917-18
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागी ॥917॥
वीरा अर्जुना, त्या सर्वात्मका ईश्वराची स्वकर्मरुपी पुष्पांनी पूजा केली असता, ती पूजा त्याला परमसंतोष कारक होते. 917
918-18
म्हणौनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजे । वैराग्यसिद्धि देईजे । पसाय तया ॥918॥
म्हणून त्या पूजेच्या योगाने आत्मराज प्रसन्न होऊन भक्ताला वैराग्य उत्पन्न करतो. हाच त्याच्या भक्तांवर खरोखर प्रसाद ! 918
919-18
जिये वैराग्यदशे । ईश्वराचेनि वेधवशे । हे सर्वही नावडे जैसे । वांत होय ॥919॥
जी वैराग्य दशा प्राप्त झाली असता ईश्वराचा छंद लागून हा सर्व संसार वमनप्राय भासतो, 919
920-18
प्राणनाथाचिया आधी । विरहिणीते जिणेही बाधी । तैसे सुखजात त्रिशुद्धी । दुःखचि लागे ॥920॥
ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पतीच्या वियोगाने विरहिणी स्त्रीस जिवंत राहणे देखील नकोसे होते, त्याप्रमाणे संसारातील सर्व सुखे त्याला खरोखर दु:खवत भासतात. 920
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
921-18
सम्यक्ज्ञान नुदैजता । वेधेचि तन्मयता । उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे ॥921॥
ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होण्याचे पूर्वी त्याच्या ध्यासाने तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता आहे. 921
922-18
म्हणौनि मोक्षलाभालागी । जो व्रते वाहातसे आंगी । तेणे स्वधर्मु आस्था चांगी । अनुष्ठावा ॥922॥
यास्तव ज्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा, अशी इच्छा असेल, त्याने स्वधर्माचे परम आस्थेनेआचरण करावे. 922
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥18. 47॥
923-18
अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणी जरी विषमु । तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणे ॥923॥
अरे, आपला धर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी चे फल प्राप्त होणार त्यावर लक्ष ठेविले पाहिजे. 923
924-18
जै सुखालागी आपणपया । निंबचि आथी धनंजया । तै कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना ॥924॥
हे धनंजया, कडुलिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला सुख होत असेल, तर त्याच्याकडून कडूपणास कंटाळू नये 924
925-18
फळणया ऐलीकडे । केळीते पाहाता आस मोडे । ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसे के गोमटे ॥925॥
केळविण्याचे पूर्वी तिच्याकडे पाहून निराश होते; आणि तशा स्थितीतच जर ती तोडून टाकिली, तर तीच पासून उत्तम फळे कोठून प्राप्त होणार ? 925
दिवस ३२५ वा. २१, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३८८९ ते ३९००
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३८८९ (बाळकोडेचेअभंग)
जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हासे कंसा ॥१॥
सावध करिता नये देहावरी । देखोनिया दुरि पळे जन ॥२॥
जन वन हरी झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥
झांकुनि लोचन मौन्येंचि राहिला । नाही आता बोलायाचे काम ॥४॥
बोलायासि दुजे नाही हे उरले । जन कृष्ण झाले स्वये रूप ॥५॥
रूप पालटले गुण नाम याति । तुका म्हणे भूती देव झाला ॥६॥
अर्थ
भयापोटी कंस कृष्णाचे ध्यान करु लागला व कृष्ण कृष्ण करु लागला त्यामुळे त्याचा जीवभाव व देहाभिमान नाहीशा झाला व याच कारणामुळे लोक त्याला हसत होते. तो भय भावनेने का होईना कृष्णाचे इतके ध्यान करु लागला की, त्याला देहभावच राहिला नाही त्याला जर सावध करण्यासाठी लोक गेले तर तो देहभावनेवर येत नव्हता जर कोणी सावध करण्यासाठी त्याच्याजवळ गेले तर तो त्यांना पाहून दूर पळायचा कारण हा कृष्णच आहे व हा मला मारण्यासाठीच आला आहे असे त्याला वाटत होते. त्याला सर्वत्र सर्व लोक, जन, वन व स्वत:चे शरीर देखील हरीरुप दिसू लागले त्यावेळी त्याने निश्चिंत होऊन भयापोटी डोळे झाकून घेतले. त्याची अवस्था अशी झाली होती की, त्याने डोळे झाकून मौन धारण केले आता काही बोलायचेच काम राहिले नाही असे त्याने ठरवले. आता त्याला बोलण्यासाठी दुसरे काहीही तेथे राहिले नव्हते सर्व लोक आणि स्वत:चे शरीर देखील त्याला कृष्णासारखेच दिसत होते. तुकाराम महाराज म्हणतात, “रुप नाम, गुण आणि जात या सर्वाचा नाश कंसाच्या ठिकाणी झाला व सर्व भूतमात्रा त्याला देवास्वरुपच झाले होते. ”
12:59 Sdm:
अभंग क्र. ३८९० (बाळकोडेचेअभंग)
झालो स्वये कृष्ण आठव हा चित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥
उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
तोवरी हा देव नाही तयापासी । आला दिसे त्यासि तोचि देव ॥३॥
देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरी तो भयाभीत भेदे ॥४॥
भेदे तुका म्हणे अंतरे गोविंद । साचे विण छंद वाया जाय ॥५॥
अर्थ
भयभावनेने कंसाने कृष्णाचे सतत चिंतन चालू केले व तो कृष्णरुप झाला केवळ भेदाने त्याच्या ठिकाणी भयवृत्ती राहिली. त्याच्या चित्तामध्ये तर कृष्णाचे चिंतन सारखे चालू होते परंतु भेदभावनेमुळे मी आणि कृष्ण हे वेगवेगळे आहोत हेच सतत तो आठवत होता. असे चिंतन तो करत होता की, मी आणि कृष्ण वेगळा आहे त्यामुळे जोपर्यंत त्याच्याजवळ कोणीही नव्हते तोपर्यंत त्याच्यासाठी देव नव्हताच परंतु जर कोणी त्याच्याजवळ आले तर सतत कृष्णाचे चिंतन चालू असल्यामुळे तो कृष्णच आहे असे त्याला दिसत होते. त्याला आपले शरीर तर वरवर कृष्णरुपच दिसत होते परंतु कृष्णाच्या भयाने तो कृष्णात व आपल्यात भेद पाहात होता त्यामुळे त्याचे अंत:करण भयभीत झाले होते. तुकाराम महाराज म्हणतात, “जर भेदभावना अंत:करणामध्ये ठेवली तर गोविंद आपल्यापासून अंतरतो मग आपण कितीही योग, याग, तप, साधना, ध्यान, ज्ञान इत्यादी साधनांचे छंद केले तरी ते वायाच जातात. ”
12:59 Sdm:
अभंग क्र. ३८९१ (बाळकोडेचेअभंग)
वाया तैसे बोले हरीसी अंतर । केले होती चार भयभेदे ॥१॥
भेदभय गेले नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा झाली ॥२॥
झाली भेटी कंसा हरीशी निकट । सन्मुखचि नीट येरयेरा ॥३॥
येरयेरा भेटी युद्धाच्या प्रसंगी । त्याचे शस्त्र अंगी हाणितले ॥४॥
त्याचे वर्म होते ठावे या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥
अर्थ
जर आपल्या अंत:करणामध्ये भेद आणि भय या दोन गोष्टी असल्या आणि आपण कितीही चार ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तरी त्या व्यर्थ ठरतात कारण या गोष्टीमुळे हरी आपल्यापासून अंतरतो. ज्यावेळी कंसाच्या मनातून भेद आणि भय नाहीसे झाले व स्वत:लाही तो विसरुन गेला त्यावेळी नारायणाची कंसाला भेट झाली. मग कंसाला हरीची भेट त्याच्या अगदी समोरच, त्याच्याजवळच झाली. युध्दाच्या प्रसंगी दोघाचीही समोरासमोर भेट झाली त्यावेळी कृष्णाने कंसाच्या शरीरावर खड्गाचा वार करुन त्याचा नाश केला. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व सत्ताधीश असा जो अनंत त्याला कंसाच्या नाश करण्याचे खरे वर्म माहित होते. ”
1:00 Sdm:
अभंग क्र. ३८९२ (बाळकोडेचेअभंग)
नारायणे कंस चाणूर मर्दिले । राज्यी स्थापियेले उग्रसेना ॥१॥
उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचा ॥२॥
अवघेचि केले कारण अनंते । आपुलिया हाते सकळ ही ॥३॥
सकळ ही केला आपुली अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसि ॥४॥
मथुरेसि आला वैकुंठनायक । झाले सकळिक एक राज्य ॥५॥
राज्य दिले उग्रसेना शरणागता । सोडविली माता पिता दोन्ही ॥६॥
सोडवणे धावे भक्ताच्या कैवारे । तुका म्हणे करे शस्त्र धरी ॥७॥
अर्थ
नारायणाने कंस आणि चाणूर या दोघाचाही नाश केल्यानंतर उग्रसेनाला राज्यावर बसविले. उग्रसेन देवाला शरण असल्यामुळे त्याला देवाने राज्यावर बसविले आणि सर्व दुष्ट अभक्तांचा देवाने नाश केला. या अनंत श्रीकृष्णाने आपल्या हाताने राज्याभिषेकाचे सर्व कार्य पूर्ण केले. सर्व लोकांना आपल्या अंकित करुन गोपींनाथ श्रीकृष्ण मथुरेत राहिला. वैकुंठनायक श्रीकृष्ण मथुरेत आला व सर्वत्र एकछत्र राज्य झाले. शरणागत असलेल्या उग्रसेनाला कृष्णाने राज्य दिले आणि कंसाने बंदिस्त केलेल्या आपल्या माता पित्यांना कृष्णाने सोडविले. तुकाराम महाराज म्हणतात, “देव आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांच्या मदतीला धावतो कारण तो भक्तांचा कैवारी आहे. ”
1:01 Sdm:
अभंग क्र. ३८९३ (बाळकोडेचेअभंग)
धरी दोही ठायी सारखाचि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥
दोघे एके ठायी केली नारायणे । वाढविला तिणे आणि व्याली ॥२॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणे मायबाप ॥३॥
माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥४॥
कोण जाणे याचे अंतरीचा भाव । तुका म्हणे माव कळो नेदी ॥५॥
अर्थ
वसुदेव, देवकी आणि नंद, यशोदा या दोघाच्याही ठिकाणी कृष्ण सारखीच भावना ठेवत होता. वसुदेव आणि देवकी यांनी कृष्णाला जन्म दिला तर नंद व यशोदा या दोघानी कृष्णाला वाढविले आणि दोघाच्याही ठिकाणी सारखीच भावना कृष्णाने धरली होती. खरे तर कृष्ण स्वत:हूनच जन्माला आला व स्वत:च्याच सामर्थ्याने वाढला केवळ निमित्त कारण म्हणून नंद, यशोदा आणि वसुदेव, देवकी हे मायबाप होते. खरातर नारायण हाच जगाचा मायबाप आहे याचे पालनपोषण करण्यासाठी कोण प्रयत्न करेन ? तुकाराम महाराज म्हणतात, “या नारायणाच्या अंत:करणातील खरे काय आहे हे कोणाला कळू शकेल व तो नारायण देखील हे कोणाला कळू देखील देणार नाही. ”
1:01 Sdm:
अभंग क्र. ३८९४ (बाळकोडेचेअभंग)
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥
हासे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये प्राकृत म्हणो यासि ॥२॥
यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाही ठाव धांडोळिता ॥३॥
धांडोळिता श्रुति राहिल्या निश्चेत । तो करी संकेत गोपींसवे ॥४॥
गोपिकांची वाट पाहे द्रुमातळी । मागुता न्याहाळी न देखता ॥५॥
न देखता त्यासि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळा ॥६॥
वेळोवेळा पंथ पाहे गोपिकाचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥
अर्थ
कृष्ण हा दीनांचा कृपाळू आहे, दुष्ट जनांचा काळ आहे व तोच एक सर्वत्र व्यापक आहे. हा कृष्ण सर्वाबरोबर हसतो, बोलतो त्यामुळे हा प्राकृत आहे सर्वजणांप्रमाणे हा सामान्य आहे असे कोणीही म्हणू नये. याला समजून घेण्यासाठी केवळ एकनिष्ठ भक्तिभाव लागतो दुस-या कोणत्याही साधनेव्दारे याला शोधण्याचा प्रयत्न केला तरी हा सापडत नाही. ज्या देवाचा शोध करण्यासाठी श्रृती, वेदशास्त्र आणि वेद यांनी प्रयत्न केला पण यांना तो काही केल्या सापडला नाही नंतर त्या निवांत राहिल्या निश्चिंत राहिल्या असा तो श्रीकृष्ण गोपीकांना मला अमूक वेळेत भेटा, मला या वेळेत येऊन भेटा असे संकेत करतो. गोपीकांची वाट हा श्रीकृष्ण वृक्षाच्या खाली जाऊन पाहात होता त्या येतानी दिसतात का नाही तो पुन्हा पुन्हा न्याहाळून पाहात होता. त्या गोपीका येताना दिसत नसल्या की, हा वेडावल्यासारखा व्हायचा, सारखा उठायचा, बसायचा त्यांची वाट पाहातच बसायचा. तुकाराम महाराज म्हणतात, “परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी अशा चारही वाणींना ज्याचे वर्णन करता येत नाही असा श्रीकृष्ण गोपीकांची वाट वेळोवेळ�
1:01 Sdm:
अभंग क्र. ३८९५ (बाळकोडेचेअभंग)
तो बोले कोमळ निष्ठुर साहोनि । कोपता गौळणी हास्य करी ॥१॥
करावया दास्य भक्तांचे निर्लज्ज । कवतुके रज माथा वंदी ॥२॥
दिले उग्रसेना मथुरेचे राज्य । सांगितले काज करी त्याचे ॥३॥
त्यासि काही होता अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥
शरणागता राखे सर्व भावे हरी । अवतार धरी तयांसाठी ॥५॥
तयांसाठी वाहे सुदर्शन गदा । उभा असे सदा सांभाळित ॥६॥
तळमळ नाही तुका म्हणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथा ॥७॥
अर्थ
श्रीकृष्णाबरोबर गवळणी जरी निष्ठुर शब्दात बोलल्या तरी श्रीकृष्ण ते सहन करुन त्यांच्याशी कोमल शब्दात बोलत होता जरी गवळणी कृष्णावर रागावल्या तरी तो त्यांच्याशी हसून बोलत होता. हा कृष्ण भक्तांचे दास्यत्व करण्यासाठीच निर्लज्ज झाला होता कौतुकाने भक्तांचे चरण रज म्हणजे चरणाला लागलेली माती हा माथ्याला लावून त्याला वंदन करीत होता. मथुरेचे राज्य कृष्णाने उग्रसेनाला देऊन टाकले व उग्रसेनाने सांगितलेले काम कृष्ण करीत होता. आणि उग्रसेनावर काही अरिष्ट संकट निर्माण झाले तर तो कृष्णाला शरण गेल्यानंतर कृष्ण त्याचे सर्व संकटाचे निवारण करत होता. कृष्ण आपल्याला शरण आलेल्या भक्तांचे सर्व भावे म्हणजे काया वाचा मनाने रक्षण करतो वस्तुत: भक्तांसाठीच तो अवतार धारण करतो. भक्तांच्यासाठीच हातामध्ये सुदर्शन, गदा श्रीकृष्ण वागवितो आणि त्यांच्या मागेपुढे उभा राहून त्यांचा नेहमी सांभाळ करतो. तुकाराम महाराज म्हणतात “देवाच्या भक्तांना चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची तळमळ नसते कारण भक्तांचा सर्व भार अनंताच्या माथ्यावरच असतो. ”
1:02 Sdm:
अभंग क्र. ३८९६ (बाळकोडेचेअभंग)
मारिले असुर वाढल्या मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥
तया नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥
वारीले ते दूती यमाचिया दंडी । नुच्चरिता तोंडी नारायण ॥३॥
नारायण नाम नावडे जयासि । ते झाले मिरासी कुंभपाकी ॥४॥
कुंभपाकी सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥
अर्थ
जे असुर दुसर्यांना पीडा देत होते व ज्यांच्यामुळे पृथ्वीला भार झाला होता अशा असुरांना कृष्णाने मारले होते. जे असुर संतांचा मत्सर करत होते व संतांचा घात करण्यास टपलेले होते अशा असुरांना नारायणाने अघोर अशा नरकाकडे पाठवले. ज्या दुष्टांनी नारायण नामाचा उच्चार देखील आपल्या तोंडानी केला नाही त्यांना नारायणाने मारुन यमदूताच्या हाती शासन करविले. ज्यांना नारायण नाम आवडत नाही ते कुंभीपाक नरकाचे वतनदार झाले. तुकाराम महाराज म्हणतात, “जे लोक संतांची निंदा आपल्या वाचेने करतात त्यांना कुंभीपाक नरकामध्ये चांगलाच मान भेटतो. ”
1:03 Sdm:
अभंग क्र. ३८९७ (बाळकोडेचेअभंग)
वास नारायणे केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायी ॥१॥
ठायी पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोका ॥२॥
लोका दुःख नाही मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणी ॥३॥
देखोनिया देवा विसरली कंसा । ठावा नाही ऐसा होता येथे ॥४॥
येथे दुजा कोणी नाही कृष्णाविणे । ऐसे वाटे मने काया वाचा ॥५॥
काया वाचा मने कृष्णी रत झाले । सकळा लागले कृष्णध्यान ॥६॥
ध्यान गोविंदाचे लागलेसे या लोका । निर्भर हे तुका म्हणे चित्ती ॥७॥
अर्थ
नारायणाने दुष्ट असुरांचा, दुष्ट लोकाचा नाश करुन मथुरेत वास केला. कृष्णाने उग्रसेनाला पित्याच्या ठिकाणी मानून सर्व लोकांचे पालनपोषण केले. ज्या लोकांनी प्रत्यक्ष आपल्या डोळयांनी कृष्णाला पाहिले त्यांना, कंसाने मागे जो काही दुराचार केला, त्रास दिला त्याची काहीच आठवण राहिली नाही. देवाला पाहून सर्वजण कंसाला विसरुन गेले कंस या राज्यात पूर्वी होता की, नव्हता हे देखील लोकांना आठवत नव्हते. लोकांना काया वाचा मनाने मथुरेमध्ये कृष्णावाचून दुसरे कोणीही नाही असेच वाटत होते. कायावाचामनाने सर्व कृष्णाशी रत झाले होते, एकरुप झाले होते सर्वाना कृष्णाचेच ध्यान लागले होते. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्वाच्या चित्ताला गोविंदाचे ध्यान लागले होते त्यामुळे सर्व लोक आनंदीत झाले होते त्यांचे चित्त आनंदाने भरुन गेले होते. ”
1:03 Sdm:
अभंग क्र. ३८९८ (बाळकोडेचेअभंग)
चिंतीले पावली जया कृष्णभेटी । एरवी ते आटी वायाविण ॥१॥
वासना धरिती कृष्णाविणे काही । सीण केला तिही साधनांचा ॥२॥
चाळविले दंभे एक अहंकारे । भोग जन्मांतरे न चुकती ॥३॥
न चुकती भोग तपे दाने व्रते । एका त्या अनंतेंवाचूनिया ॥४॥
चुकवुनि जन्म दाखवी आपणा । भजा नारायण तुका म्हणे ॥५॥
अर्थ
जो कोणी कृष्णाचरणाचे चिंतन करतो त्यालाच कृष्ण भेट होते नाहीतर इतर कोणतेही साधने केली तरी ते व्यर्थच ठरतात. कृष्णावाचून कोणत्याही इच्छा मनात धरल्या आणि कोणत्याही साधनांचा वापर केला तर तो व्यर्थ त्रासच ठरतो. दंभ आणि अहंकार या गोष्टीमुळे कितीतरी लोक चाळवले गेलेले आहेत आणि यामुळेच त्यांचे भोग आणि जन्ममरणाच्या फे-या कधीही चुकत नाही. एका अनंतावाचून कोणाचेही तप, दान, व्रत, भोग चुकणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “केवळ एक नारायणच आपल्याला आपले जन्ममरण चुकवून दाखवू शकतात त्यामुळे तुम्ही त्यालाच नित्य भजा त्याचेच नित्य ध्यान करा. ”
1:05 Sdm:
अभंग क्र. ३८९९ (बाळकोडेचेअभंग)
भजल्या गोपिका सर्व भावे देवा । नाही चित्ती हेवा दुजा काही ॥१॥
दुजा छंदु नाही तयांचिये मनी । जागृति स्वप्नी कृष्णध्यान ॥२॥
ध्यान ज्या हरीचे हरीसि तयांचे । चित्त ग्वाही ज्यांचे तैशा भावे ॥३॥
भाग्ये पूर्वपुण्ये आठविती लोक । अवघे सकळिक मथुरेचे ॥४॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथे नारायण राज्य करी ॥५॥
राज्य करी गोपीयादवांसहित । कर्मिले बहुतकाळ तेथे ॥६॥
तेथे दैत्यी उपसर्ग केला लोका । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥
अर्थ
गोपीका सर्व भावे देवालाच म्हणजे कृष्णालाच भजतात त्यांच्या चित्तामध्ये देवावाचून दुसरे कोणत्याही गोष्टीविषयी हेवा नाही. त्यांच्या मनामध्ये कृष्णावाचून इतर कोणताही छंद नव्हता, जागृती आणि स्वप्नांमध्येही त्या कृष्णाचेच ध्यान करीत होत्या. जे लोक आपल्या चित्तामध्ये नेहमी हरीचे ध्यान करतात त्यांचेच ध्यान हरी नेहमी करत असतो आणि आपण हरीचे चिंतन नेहमी करतो की नाही याला आपले मनच साक्षी आहे. मथुरेच्या सर्व लोकांचे काहीतरी पूर्व पुण्य होते, भाग्य होते त्यामुळेच तर ते नेहमी देवाचे चिंतन करत होते. अशा प्रकारे देवाने मथुरेच्या लोकांना सुखी करुन तेथे नारायणाने राज्य केले. गोपी आणि यादवा सहीत देवाने मथुरेत राज्य केले व खूप काळ तेथे राहिले. तुकाराम महाराज म्हणतात, “परंतु तेथे दैत्यांनी लोकांना खूप उपसर्ग केला म्हणजे त्रास दिला त्यामुळे देवाने व्दारका स्थापित केली. ”
1:06 Sdm:
अभंग क्र. ३९०० (बाळकोडेचेअभंग)
रचियेला गाव सागराचे पोटी । जडोनि गोमटी नानारत्ने ॥१॥
रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति नानाकळा ॥२॥
कळा सकळ ही गोविंदाचे हाती । मंदिरे निगुती उभारिली ॥३॥
उभारिली दुर्गे दारवंटे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥
शोभले उत्तम गाव सागरांत । सकळांसहित आले हरी ॥५॥
आले नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥
निवडीना याति समानचि केली । टणक धाकुली नारायणे ॥७॥
नारायणे दिली अक्षई मंदिरे । अभंग साचारे सकळासि ॥८॥
सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥
रचिले ते देवे न मोडे कवणा । बळियांचा राणा नारायण ॥१०॥
बळबुद्धीने ती देवाच सारिखी । तुका म्हणे मुखी गाती ओंव्या ॥११॥
अर्थ
समुद्राच्या बेटावर विविध रत्नांनी जडित असलेल्या व्दारकेची रचना देवाने केली. प्रत्येक खणाखणाच्या भिंतीला विविध प्रकारचे रत्न लावण्यात आले होते त्यामुळे खूप सारे दिवे लागले असे वाटत होते. सर्व प्रकारची कला देवाच्या हातात होती त्यामुळे देवाने तेथे विविध प्रकारचे मंदिरे देखील उभारली होती. अशा प्रकारे देवाने प्रचंड अशा वेशी, शिखरे, आवारे स्थापन केली व घरामध्ये कोटी सुर्याचा प्रकाश समावलेला शोभुन दिसत होता. अशा प्रकारे सागरामध्ये ते गाव उत्तम प्रकारे शोभून दिसत होते व सर्वासोबत हरी तेथे आले. उदार आणि शूरांचाही मुकुटमणी असलेला नारायण व्दारका नगरीत आला. लहान मोठे कोणीही असले कोणत्याही जातीचे असले तरीही नारायणाने सर्वाना समान केले. नारायणाने सर्वाना कधीही न भंगणारे अक्षय असे घरे दिले. त्या व्दारकेतील ना�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

