आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग ६ , (२१ ते २४)
७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन…………………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! महाराणी ताराबाई!!!
!! महाराणी ताराबाई !!
भाग – २१.
ताराबाई कोकणची मोहिम रामराजेंसह करुन आल्यावर,व मोहिमेस जाण्यापूर्वी दौलतीत सर्वत्र फिरल्यामुळे,प्रत्यक्ष दौलतीच्या स्वामीच्या दर्शनाने,आणि दिलेल्या दिल्याशाने रयतेला अभय मिळालं.गडकोटातील चाकर तृप्त झाले. सगळीकडून विजयाच्या खबरा हेबिज आणू लागले.मुगल सलतनीतले असंख्य
गांवे लुटलीत.पुरंदर,रायगड सोडले तर सारे किल्ले स्वराज्यात सामील झाले. बुवासाहेबांनी नर्मदा पार करुन थेट माळव्यापर्यंत मजल मारली.
ताराला विश्वासच वाटत नव्हता, क्षीन प्रकृतीचे,दुबळ्या मनाचे रामराजे हाती समशेर घेऊन रणमैदानांत उतरतील,गनीमाशी दोन हात करतील, बेधडक मोहिमेत क्षीण प्रकृतीची पर्वा न करतां शरीक होतील!
एक दिवस राजे ताराबाईंना म्हणाले, खेळण्यावरुन राज्यकारभार बघणे जरा जिकरीचे वाटते.सातारा राजधानी करावी.आम्हालाही तेच वाटते. स्वामी!एक मागणं आहे,आतां आपल्या जवळ फौजफाटा,गडकोट,शिवाय स्वतः लढाईत उतरला आहांत,मग दौलतीचे शाहूराजेॅ,व येसूबाईसाहेबांंना रिहा करुन ही अमानत त्यांच्या सुपुर्द केली की, आपण जिम्मेदारीतून मुक्त होऊ.
तो दिवस दूर नाही तारा,त्यासाठी आम्ही स्वतः दोघांच्याही सुटकेसाठी निघणार आहोत.आतां त्या अगदी तृप्त होत्या.कशाचीच कमतरता नव्हती.आबा साहेबांच्या लाडक्या पुत्राची पत्नी,धर्म निष्ठ,बेडर शिलेदार,शंभूराजेंची भावजय, येसूबाईंच्या खास मर्जीतली,दौलत, प्रतिष्ठा,शब्दाला मोल सार सारं मिळालं! आतांपर्यंत ज्यांंना निष्र्कीय समजत होते आज त्यांची तलवार गाजत होती.त्यांच्या मूळच्या शौर्याला विलक्षण धार चढली. दौलतीत घुसलेल्या व मराठी दौलतीला तोशीस देणारा हा भुजंग ठेचला जाईल या विचारांनीच ताराबाई हरखल्या.
शाहूराजेंच्या रिहाई मोहिमेवर निघालेल्या रामराजेंना औक्षण करुन, निरोप देतांना म्हणाल्या,आई भवानी आपल्या पाठी आहे.आपण निश्चिंतपणे जाऊन दौलतीचे खरे वारस शाहूराजे व येसूबाईंना रिहा करावे,आम्ही स्वगताच्या तयारीत राहतो.प्रसन्नपणे राजे ताराबाईं चा निरोप घेऊन निघाले,
आणि रामराजेंनी पराक्रमाची शर्थ केली.यवनांची दाणादाण उडवली.पण वेळ आली नव्हती.नेमक्या त्याच वेळी बादशहा शाहूमहाराजांसमवेत शहजादी कडे जेवावयास गेले असल्यामुळे बादशहा वाचला व शाहूराजेंची रिहाई होऊ शकली नाही.हताश रामराजे माघारी फिरले.वाटेत फिरोजजंगाशी लढाई झाली.त्याचवेळी धनाजीरावांंनी ब्रम्हपुरीवर चढाई करुन,शहजादी व अंमलदारांच्या कबिल्यास कैद केले. नंतर मोठी खंडणी घेऊन रिहा केले.गनीम जेरीस येत असल्याच्या खबरा येतच होत्या.हर हर महादेव च्या गर्जना व समशेरींचा खणखणाटात नर्मदापलिकडे माळव्यापर्यंतचा मुलूख दणाणून गेला. दीन दीन चे केविलवाणे चित्कार,यवनां ची लांडगेतोड करणार्या मराठ्यांच्या पराक्रमाने रयत संतुष्ट व निश्चिंत होत होती.मराठ्यांच बळ वाढत होतं.”मराठा तितुका मेळावा” होऊ लागला,
आलमगिर अल्लाला दुवा मागत होता.अय परवदिगार!उस पहाडी चुहे शिवाजीच्या मौतनंतर स्वतःचा विजय झाला या भावनेने आग्रा सोडून इथे आलो तर,त्या संभाजींने नऊ वर्षे नाकात दम आणला.त्याचा वध केल्यावर वाटले, आतां मराठेशाही आपलीच!पण ही समजूत या रामराजेने तोडली.तो शेर बनून मागे लागला.त्याची हाक बहुतेक त्याच्या परवदिगारने ऐकली असावी. ध्यानी मनी नसतांना,सर्व सुरळीत सुरु असतांना पुन्हा एकदा दौलत पोरकी झाली.लाखांचा पोशींदा,दौलतीचा धनी सारी मराठी दौलत अनाथ करुन निघून गेले.सिंहगडावरुन रामराजेंच महानिर्वाण झाल्याची खबर आल्याने सार्यांनाच प्रचंड धक्का बसला.सारी दौलत चेतना शुन्य झाली.
अहिल्याबाई(अंबिकाबाई)येऊन ताराबाईंचे चरणस्पर्श करुन आशिर्वाद मागीतला.ताराबाईंनी तीला छातीशी कवटावत विचारले,निघालात?होय! तयारी झालीय,निघायलाच हवय ना? अहिल्याबाई तुम्ही भाग्यवंत म्हणून स्वारीं सोबत जायचा मोका मिळाला,आमचीही इच्छा आहे,पण स्वारींनी आमच्यावर सोपवलेली दौलतीची जबाबदारी,शिवाय चिरंजीव बाळ शिवाजीराजे,कन्या अंबिकाबाईला कोण सांभाळेल?जा..जा. अहिल्याबाई! स्वारींची नीट काळजी घ्या त्या मंद पावलं टाकत चित्तेजवळ पोहचल्या.जमलेल्या सर्वांना नमस्कार केला.अंगावरची हळदही पुरती निघाय च्या आधीच त्यांचे शरीर ज्वाळांनी वेढल्या गेले.ताराबाईंच्या शोकाला पारावार नव्हता.दाटलेल्याा आसवांनी त्यांना समोरच कांहीच दिसेनास झाल.
एके दिवशी ताराबाई झोपेत असतांना,हळूवार ताराऽऽ अशी हाक ऐकू आली.डोळे उघडल्यावर रामराजे समोर उभे दिसले,तारा किती दिवस अश्रू गाळत बसणार आहेस?स्वतःला सावरुन उभं राहा.आम्ही या मराठी दौलतीचा स्वामी छत्रपती रामराजे तुझ्याकडे भीक मागत आहे,आम्हाला ऋणमुक्त करण्याची..स्वामी अशी विणवनी करुं नये,आज्ञा करावी,ती आम्ही प्राणपणाने पालन करु..
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २२-१२-२०२१.
!! महाराणी ताराभबाई !!
भाग – २२.
रामराजे पुढे म्हणाले,आम्हाला खात्री होती,म्हणून तर तुमच्यासमोर येण्याचे साहस केले.ताराऽऽ आमच्या अकाली मृत्युने गनीमाला जोर चढला. मराठी दौलत पोरकी झाल्याच्या बेहोशीत सारी दौलत गिळंकृत करण्याचा त्याने पुरा इंतजाम केला आहे.मराठी दौलत बुडवण्याच्या जिद्दीने दक्षिणेत पाय पसरुन बसलेल्या आलमगीरचा मकसद तडीस जाऊ नये,त्याची झोप उडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.मराठी दौलतीचं आमच्या वतीने ऋण फेडावे, रयतेला अभय द्यावं.धर्म राखावा.यासाठी तन,मन,धन खर्ची घालून ठामपणे उभं राहण्याची सूचना नव्हे आज्ञा देतोय!पण आम्हाला कसं शक्य आहे?आम्ही असे पोरके अनाथ..कोण म्हणतय अनाथ.. पोरकं…बाळराजेंना विसरलात?बाळ राजे आमचे पुत्र,भोसल्यांचं स्वाभिमानी रक्त त्यांच्याही नसानसांतून वाहतेय!ते यवनांना कापून काढण्यासाठी अर्जुनपुत्र अभिमन्युसारखे तुटून पडून बादशहाला त्राही भगवान करुन सोडतील.
आज जरी ते लहान असले तरी त्यांच बळ व्हा.त्यांच्या वतीनं गनीमाला सामोर्या जा.आमची जिम्मेदारी तुमच्या सुपुर्द केली,तीला धर्म,फर्ज समजून पार पाडा.आमचे बाळराजे शिवाजीचा शक्य तेवढ्या लवकर मंचकारोहन करा.पण दौलतीचे असली वारसदार शाहूराजे… अशीच नौबत आमच्यावरही आली होती. सिंहाचा छावा दादासाहेब जेरबंद झाल्या वर,येसूवहिणींसाहेबांनी दौलतीच्या हिता पायी,दौलतीची जोखीम आमच्या खांद्या वर लादली होती.
तारा दौलत आज संकटात आहे. दौलतीचे स्वामी शाहूराजे अजुनही कैदेत आहेत.काळाची गरज म्हणूनही आमच्या
बाळराजेंचे मंचकारोहण दौलतीतील कांही विघ्नसंतोषी लोकांना खपणार नाही.तारा,तुमच्या सद्हेतूकडे दुर्लक्ष करुन जे तुमच्या विरोधात उभे राहतील, त्यांचा एक दिवस नक्की भ्रमनिरस होईल.पण स्वारी!आमच्यावर स्वार्थी, मतलबी पणाचा कलंक लागेल…म्हणून कां लोकोपवादाच्या भितीने दौलत वार्यावर सोडून,यवनांच्या हवाली करणार का?आमचा आत्मा असाच अतृप्त भटकत ठेवणार का?
स्वारींच्या शांतीसाठी,मुक्तीसाठी, आज्ञेस्तव बाळराजेंचे मंचकारोहण करु, प्रसंगी हाती समशे घेऊन यवनांचा मुकाबलाही करु.तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती.आम्ही स्वारींच्या शब्दा खातर आमचं सारं बळ,निष्ठा खर्ची घालू, स्वकीयांना प्रेमाने बांधण्याचा प्रयत्न करु यवनांना नामोहराम करु.अशाप्रकारे कितीतरी वेळ बोलत राहिल्या असत्या, पण त्यांची खाली झोपलेली दासीच्या आवाजाने त्यांचे स्वप्न भंगले.भानावर आल्या,बघतात तर स्वारींचा पत्ता नव्हता
सकाळी ताराबाईंची पुजा आटोपल्यावर,यादवराव भेटीस आल्या ची वर्दी मंजुळाने दिली.वृध्द गिरजोजी यादवराव थोरल्या महारांजापासून दौलतीच्या सेवेत होते.अतिशय विश्वासू, निर्मोही,इमानदार व कर्तव्यनिष्ठ.रामराजे चंदीला गेले होते,तेव्हा खजिना,जड जवाहीर त्यांनीच चंदीला पोहोचवला होता.ताराबाईंना त्यांचा फार मोठा आधार वाटत होता.शिवाय पूर्ण भरवसा होता.त्यांनीच मोठ्या हिफाजतीने राजेंचा कुटुंबकबिला चंदीवरुन दौलतीत पोहोचवला होता.
स्वराज्याचे सेनापती धनाजीराव आणि राजकुटुंबाचे अतिशय स्वामीनिष्ठ विश्वासू स्नेही गिरजोजीराव यांचे इस्टेटी वरुन वाद विकोपाला गेला होता.पण न्यायनिष्ठूर,बुध्दीमती ताराबाईंनी अत्यंत चातुर्याने दोघांमधील वाद मिटवून, गिरजोजींना योग्य न्याय दिला होता.
महालात प्रवेशलेल्या गिरजोजींचा मुजरा स्विकारला .त्यांचा ओढवलेला चेहरा बघून विचारले काय खबर?सातारा पडल्याची खबर ऐकून ताराबाईंचा विश्वासच बसला नाही.त्यांच्या नजरे समोर सार्या घटना साकार झाल्या.पती निधनातून सावरायलाही त्यांना अवसर मिळाला नाही.अहिल्याबाईने तर सती जाऊन मोक्ष मिळवला.त्यांनाही सती जायचे होते,मोक्ष मिळवायचा होता.तसं तर त्या रोजच सती जात होत्या.पतीने त्यांच्यावर सोपवलेली दौलतीची जबाब दारी,दोन मुलांचे संगोपन नियतीपुढे त्यांना मजबूर व्हावं लागलं,नुकतच पखांत बळ भरलेल्या गरुडागत राजे उतुंग झेप घेऊ लागले होते.शर्थीने राज्य राखण्याची कोशिश करीत असतांमाच नियतीनं घाव घातला.त्या आतांकुठे समाधात असतांना हा भयंकर घाव बरदास्त करावा लागला होता.
पतीनिधनाच्या दुःखातून थोड्या सावरत नाही तोच हेबिजने वार्ता आणली,मराठ्यांचा राजा गेला,म्हणजे मराठेशाही बुडाली,या आनंदात रामराजें नी नव्यानच स्थापन केलेल्या सातारा राजधानीवर औरंगजेबने आपल्या शहजादा अज्जामला अफाट सैन्यानिशी पाठविले.खबर कट्यारीगत दिलात घुसली.पण त्या डगमगल्या नाही.उलट बादशहाने आपल्याला नगण्य समजून दौलत गिळंकृत करण्याच्या इराद्याने त्या अधिकच डिवचल्या गेला.त्यांनी तात्काळ मसनद बोलावली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २२-१२-२०२१.
!! महाराणी ताराबाई !!
भाग – २३.
मसनदीवर मोजकीच माणसं होती. रामचंद्रपंत,परशुराम त्रिंबक,शंकरजी नारायण आणि गिरजोजी यादव सारे गंभीर चेहर्याने बसले होते.रामचंद्रपंता ना ताराबाईचा निग्रही कठोर मुद्रा बघून आश्चर्य वाटले,त्यांच्या कल्पनेलाच धक्का बसला.कठोर,खणखणीत स्वरात हाक मारली…हुकुमतपन्हाऽऽ एवढी मोठी घटना घडल्यावरही आपण तुरंत भेटीस आला नाहीत.मातोश्रीसाहेब!अवसरच मिळाला नाही.पंत आज दौलतीची निकड बघतां,आमच्या पुत्राची मुंज करायची आहे.दचकलेले पंत म्हणाले, शाहूराजेंचे वय वीस वर्षाचे होऊनही अजून त्यांची मुंज झालेली नाही.स्वामी दौलतीत परत आल्यावर दोघांचीही एकत्र मुंज करणे उचित होईल.त्यानंर शाहूराजे दौलतीचं काम पाहतील आणि
पंत,एक सांगा,रायरीला वेढा पडला,दौलतीचे स्वामी शंभूराजे गिरफ्तार झाले,त्यावेळी हा विचार तुमच्या मनी आला नाही?मातोश्रीसाहेब! त्यावेळी दौलतीची निकड बघून रामराजें ची मुंज करुन मंचकारोहण करणं ही काळाची गरज होती.मग आज पोरक्या दौलतीला कुणातरी स्वामीची गरज नाही?पंत,मुगल पिसाळलेला,स्वारींच्या निधनाने दौलत सांभाळणारं जबाबदार असं कुणी उरलेलं नाही आणि याच संधी चा फायदा गनिमाला मिळेल.पण मातोश्रीसाहेब,स्वामी लवकरच परत…. पंत ते येतील त्यावेळी आमचे चिरंजीव तख्त स्वामींचे सुपुर्द करतीलच,पण तोवर ही दौलत पोरकी ठेवायची कां?
मातोश्रीसाहेब!भक्ताजी हुजरे व बंकी गायकवाड कडून शंभूराजे लवकर परत येत असल्याची पक्की खबर आहे.
पंत तुमच्या मुत्सद्दीपणाबद्दल आम्हाला शंका येत आहे.गेल १०-११ वर्षापासून दौलतीचे स्वामी शाहूराजेऔरंगजेबाच्या कैदेत आहेत,पंत जो तख्तासाठी पाठच्या भावाचा निर्घुन हत्या करतो,जन्मदात्या पित्याला कैदेत ठेवुन हालहाल करतो, पोटच्या पोर अकबरला देशोधडीला लावतो,प्रत्येकाकडे संशयाने बघणारा औरंगजेब शाहूराजेंना रिहा करेल?दौलत पोरकी झालेली आहे हे जाणून असलेला औरंगजेब अशावेळी शाहूराजेंना रिहा करणं म्हणजे पोरक्या दौलतीला आधार देणे हे न समजण्याइतका दुधखुळा वाटला?उलट शाहूराजे रिहा होऊ नये ही खबरदारी त्याने घेतली असेल.तुम्हाला मिळालेली खबर खोटी असण्याचा जास्त संभव आहे.
ताराबाईंना ते आताच ओळखत नव्हते.त्यांची शिस्तप्रियता,न्यायमिष्ठूरता, चाणाक्षपण व बळ जोखून होते.धनाजी व गिरजोजींच्या झगड्यात त्यांनी महा प्रतापी सेनापती जाधवांचाही मुलाहिजा ठेवला नव्हता.त्यामुळे जास्त वाद न घालता म्हणाले,आपल्याला जे योग्य व उचित वाटेल ते करावे,आणि मुजरा करुन निघून गेले.
रामचंद्रपंत असा पवित्रा घेतील याची ताराबाईंना कल्पना नव्हती.त्या व्यथीत स्वरात शंकरजी नारायणकडे बघत म्हणाल्या,प्रतिनिधी,आम्ही यांंची अशी कोणती आगळीक केली?रामचंद्र पंत व धनाजीराव आमच्यावर नाराज आहेत कारण आम्ही सत्य व स्पष्ट बोलतो हेच ना?त्यांच अस निघून जाणं, दौलतीत कलह,पोरक्या दौलतीला धोका अशाने गनिमांचं फावेल..कांही होणार नाही.रामचंद्रपंतासारखी माणसं मसनदी पासून फार काळ दूर राहूच शकत नाही. शंकरजी तुम्ही व परशुरामपंतानी भेट घ्यावी.ते धूर्त आहेत.आपले हीत कशात आहे हे त्यांना चांगले ठावूक आहे,असं म्हणून मसनद सोडली.
ताराबाई जाणून होत्या पंताचा विरोध फार वेळ टिकायचा नाही.घडलेही तसेच,शंकरजीने ते राजी झाल्याचा निरोप आणल्यावर म्हणाल्या,मुंज व मंचकारोहणाची जबाबदारी पंतावर सोपवा.सार्या मानकरी,सरदारांना आवतन धाडायचं काम तुमच्याककडे, परशुरामपंतांची मदत घ्या.हे आटोपल्या वर आम्ही तुरंत मोहिमेवर निघणार आहो
वर्षप्रतिपदेच्या शुभ मुहुर्तावर, सर्वांच्या उपस्थितीत बाळराजेंची मुंज व राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.या निमित्याने जमा झालेल्या सर्व अधिकारी, सरदार मानकर्यांना म्हणाल्या,ज्यावेळी बाळ शिवाजीच्या राज्याभिषेकाची माहिती पातशहाच्या कानावर जाईल त्या वेळी तो खळवळून उठेल.सारं बळ एकवटून तो स्वराज्यावर तुटुन पडेल. आपण आतां आपसांतील मतभेद विसरुन,एक दिलाने संघटीत होऊन गनिमी काव्याने उभे राहिलो तर,त्याचा टिकाव लागणार नाही.निरोपाचे विडेदिले
आणि वेळ न दवडतां,मोजकी कुमक घेऊन,शुभ्रवस्र परिधान केलेल्या, कमरेला समशेर लटकवलेल्या करारी मुद्रे च्या ताराबाई मोहिमेसाठी बाहेर पडल्या. त्यांचा आवेश पाहून मराठी माणूस पेटून उठला.प्रत्येकाचे बाहू स्फुरले होते,हर हर महादेवाच्या घनगर्जना आकाशाला भिडल्या.घोड्यावर स्वार होतांना त्यांना रामराजेंची आठवण झाली.यावेळी आपण एकट्याच असल्याच्या जाणीवेने भरुन आलेल्या डोळ्यांनीच घोड्याला टाच दिली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २२-१२-२०२१.
!! महाराणी ताराबाई !!
भाग -२४.
ताराबाईचा घोडा चौखूरा उधळला
कांही दिवसांत त्यांनी अवघी मराठेशाही पालथी घातली.प्रत्येक गडावरील किल्ले दार व इतर सेवकांना भेटून त्यांच्या अडी अडचणी,दुःख विचारुन त्यांचे नाराकरण केले.गड कसा लढवायच्या बद्दल बारीक सारीक सूचनां दिल्या.
मुलूखगिरीवरुन परतल्यावर, शहजादा आज्जमने सातार्याला वेढा दिल्याची खबर मिळाली.रायरी गेल्या पासून मराठ्यांची राजधानी सातारा बनली होती.म्हणूनचाअति महत्वाची होती.ताबडतोब सातार्याचे किल्लेदार सुभानजी भांडवलदारांना कांहीही करुन सातारा कसा वाचवायचा यासाठी तपशीलवार सूचना व मार्गदर्शन केले. रोजची प्रत्येक वार्ता मिळण्यासाठी भक्ताजी आणि बंकी गायकवाडची नेमणूक केली.त्या शंकर नारायणाला म्हणाल्या,गनिम सातार्याला विळखा घालून बराच कालावधी झाला.होय मातोश्रीसाहेब!आलमगीरने सारी प्रतिष्ठा पणाला लावून,प्रत्यक्ष आपला पुत्र शहजादा आज्जम व त्याच्या मदतीला कसलेले सरदार खुदाबदखान,तरबीयत खान,मुनीमखान,रुहुदुल्लाखान,बक्षी मन्सुरखान दिले असून किल्ल्याच्या पश्चिमेला स्वतः आज्जम व खुदाबंदखान मंगळी दरवाज्याच्या बाजूने तबीयतखान दख्खनची बाजू रुहुल्लाखान व मन्सुर खान असून किल्ल्याच्या समोर तटा पासून तेरा यार्डाच्या अंतरावर बुरुजा समोर दमदमा उभा केला.हा दमदमा उभा करायला लागलेल्या सामानामुळे आसपासच्या ३०-४० कोसातील सारे वृक्ष जाळून खाक झाले.शिवाय तोफांचा माराही सुरु केलाय!
ताराबाई म्हणाल्या,शंकरजी,यवनां नी कितीही प्रयत्न केला तरी किल्ला त्यांना मिळणार नाही,कारण ३० गज उंचीवर सरळसोट पहाड त्यांच्या तोफांना भीक घालणार नाही.आम्हाला चिंता वेगळीच आहे,यवनांना महिने नी महिने विळखा घालून बसायची संवय आहे, त्या अवधीत गडावरची रसद संपली तर? पेशवे परशुराम त्र्यबंकांना रसद पुरवण्या साठी कळवा.नंतर शुभ वार्ता आल्याने त्या थोड्या समाधान पावल्या,पण हे समाधान फार काळ टिकले नाही.गिरजो जी म्हणाले,मातोश्रीसाहेब!स्वकीयच उलटले.किल्लेदा सुभानजी भांडवलकर यवनास फितूर होऊन किल्ला यवनाच्या सुपुर्द केला.आपले सारे प्रयत्न व्यर्थ गेले. तारा सुन्न होऊन गिरजाजी काय सांगतात हेच कांही क्षण त्यांना उमगले नाही.
सुभानजी भांडवलकर सारखा मराठा माणूस,पांच हजार रुपये आणि पांच हजाराच्या मनसबीचा तुकडा आज्जमशहाने पुढे केल्यावर नेकजात म्हणवून घेणारा निमकहराम बनला. स्वधर्माचं मोल त्याला कळलं नाही,हा धक्का ताराबाईंसाठी फार मोठा होता. पण मसदनीवर बसल्यावर मात्र स्वतःला सावरले.दिलासा देत म्हणाल्या,सातारा पडला म्हणून एवढे चिंतीत होण्याचे कारण नाही.तो पाठीवर गडकोट घेऊन थोडाच जाईल?त्याची पाठ वळली की, आपली माणसं पुन्हा हस्तगत करतील.
पण बादशहाची नजर आतां परळी कडे वळली.त्याने फत्तेहुल्लाखानास तिकडे रवाना केले आहे.त्याला रसद मिळणार नाही,जनावरांना दाणावैराण मिळणार नाही ही काळजी घ्या.गडावर सिदोजी इंगवले,भिकाजी जाधव,गोविंद महादेव,गोडबोले आदी निष्ठावंत माणसं आहेत.ते प्राणपणाने गड लढवतील ही आम्हाला खात्री आहे.आणि तसेच घडले सिदोजी इंगवले शर्थीने लढून दौलतीच्या कामी आले.भिकाजी जाधवने तांब्र्यांचा सुलतानच मोडून काढला. गोविंद महादेवाने गड चढून येणार्या शेकडो लोकांना एकट्याने कापून काढले जेरीस आलेल्या आज्जमने सुलुखाची बोलणी सुरु केली.भरपूर पैशाच्या मोबदल्यात आणि गडावरील सर्वांना सुरक्षित जाऊ देण्याच्या अटीवर सुलुख होऊन मराठ्यांनी परळी सोडली.
सैन्याला आराम मिळण्याच्या हेतू ने बादशहाने भूषणगडाकडे कूच करण्या ची आज्ञा दिली.परळी ते भूषणगड केवळ १२-१५ कोसांच अंतर,पण पावसामुळे त्यांची अतिशय वाईट हालत झाली.बरेचसे सैनिक,जनावरे मृत्युमुखी पडले.उरलेल्यांना भूषणगडवर पोहचण्या स ३५ दिवस लागले.
आपला अंदाज खरा ठरल्याच्या आनंदात असतांनाच एक अकल्पित धोका समोर आला.रामचंद्रपंत मुजरा करुन म्हणाले,मातोश्रीसाहेब,आनंदाची खबर आहे.दौलतीचे स्वामी खुद्द शाहू राजे परतले आहे.ताराबाना केवढे तरी आश्चर्य वाटले.स्वामी यवनाच्या हातून निसटून १-२ दिवसांत इथं पोहचणार आहेत.पंत,राजेंच्या स्वागताची तयारी तेवढ्याच इतमामाने करा.ते निघून गेल्या वर,तातडीने गिरजोजींना बोलावणे पाठवले.आल्यावर ताराबाई म्हणाल्या, बाबा,सध्याची परिस्थितीत,पंताचा उत्साह बघून,आमच्या मनी शक निर्माण झाला.सध्या कोणावरच विश्वास ठेवायला मन होत नाही.भिंतीला कान असतात हे लक्षात घेऊन,कोणालाही कळणार नाही या बेताने खरी बातमी काढून आणा.शाहूराजे खरेच की,तोतया आहे?आश्वासन देऊन गिरजोजीबाबा निघून गेले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-१२-२०२१.








