महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग ३, (९ ते १२)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       ७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन…………………

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! महाराणी ताराबाई!!!

!! महाराणी ताराबाई !!

                  भाग – ९.

      सर्व ऐकून ताराबाई आवाक झाल्या. म्हणजे अन्नाजी दत्तो,मोरोपंत,प्रल्हाद निराजी… होय ताराऊसाहेब!त्यांनीच दौलतित स्वार्थाचं विष पेरले.पण कां? कशासाठी?कां पेटवला गृहकलह? मतलबासाठी…पण त्यांचा काय मतलब त्यांना शंभूभावोजी नको होते.त्यांच्या स्वार्थात भाऊजी अडथळा घालत होते. त्यांच्याकडे दौलत नको जायला आणि थोरले महाराजांनी भावोजींच्याच स्वाधीन करण्याचा संकल्प केला होता. सर्व रयतेसमोर युवराजपद देऊन,तशी मंजूरीही होती.पन्हाळगड त्यांच्या स्वाधीन केला होता,आणि नेमकं हेच त्या स्वार्थाध्यांना नको होतं.भावोजी त्यांचे कारस्थान उघड करुन,त्यांच्या वर्मावर बोट ठेवत होते.त्यांना अपल्या कह्यात राहणारा,आपल्या इशार्‍यावर नाचणारा,मतलबांकडे कानाडोळा करणारा स्वामी हवा होता.भावोजीचे परवड,स्पष्ट आरोप करणे,न्याय्य वागणे जनतेची पीडा दूर करत असल्यामुळे, वाटेल तश्या त्यांच्याबाबत वावड्या उठवून,रान उठवले,गृहकलह पेटवला.

         आक्कासाहेब!आपल्या स्वारींना हे मंजूर होत?नाही ताराऊ, स्वामींच दिल गंगेच्या पाण्यागत निर्मळ..त्यांच साफ जीवन मलिन करण्यांत येत आहे याची कल्पनाही नव्हती.त्यात सासूबाईंनी त्यांच्या पंखातील बळ वाढवण्याऐवजी त्यांना मर्यादेच्या बंधनात बांधले.हे जे घडत आहे हे अन्यायकारक होत आहे ही जाणीव होऊनही मुळातच दुबळी,मवाळ स्वभावाची स्वारी,आईच्या धाकाने मुखातून शब्दही काढू शकली नाही. आणि थोरल्या महाराजांच्या आजाराचा फायदा घेऊन,ते अस्तिनीतले निखारे सासुबाईंच्या मुखातुन बोलत होते, स्वामी हे राज्य आमचे चिरंजीव रामराजेंना द्या म्हणून आबासाहेबांच्या मागे जिद्द करत होत्या,

           तस पाहिलं तर,ताराबाईंना यातलं बरचस माहित झालं होतं.थोरल्या महाराजांचा मृत्यु अकाली,अनपेक्षित झाला,एवढंच नव्हे तर,प्रत्यक्ष दौलतीचे स्वामी प्रत्यक्ष शिवाजी महाराज,मतलबी स्वार्थी राजकारणाचे बळी ठरले हे त्यांनी आपले वडिल हंबीरराव मोहित्यांंकडून ऐकले होते.जरी ते सातार्‍याला होते तरी, रायगडावरची प्रत्येक मसलत त्यांना कळत होती.

            जानकीबाई म्हणाल्या,लाखांचा पोशिंदा,हिंदु धर्माचा रक्षक गेला.आणि रायगडाचे दरवाजे बंद झाले.आमच्यावर तर वीजच कोसळली.,पण आमच्याही पेक्षा एक दुर्देवी जीव होता. पुतळा सासु बाईसाहेब!त्यांना ही खबर लागली की, काय माहित नाही,पण त्या गडाच्या दरवाज्यावर आल्यावर गडाचे दरवाजे उघडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली मस्तक आपटून घेतले,पण त्यांचा आक्रोश,गडावरील पाषाणह्रदयी माणसां पर्यंत पोहचला नाही.प्रत्यक्ष आपल्या पतीचे अंत्यदर्शनही होऊ शकले नाही ती स्री किती दुर्दैवी,दुर्भागी?

          ताराबाईंना आपल्या वडिलांकडून समजलेलं सारं आठवलं.पुतळाबाईंची पाण्याबाहेर काढलेल्या माशागत तडफड आणि त्याचवेळी महाराजांच्या मृत्युची खबर नसलेल्या शंभूराजेंना जेरबंद करण्यासाठी अन्नाजीपंत,मोरोपंतांचे सैन्य बाहेर पडले होते.गडाबाहेर यवनां शी लढत असलेल्या सरदारांना  अन्नाजीपंतास मिळण्याच्या आज्ञाही रवाना झाल्यात,त्यातून सरसेनापती हंबीररावही सुटले नव्हते.

             आक्कासाहेब!दौलतीची जुनी माणसं दादाराहेबांकडून दुखवली म्हणून, पुत्रप्रेमात अडकल्यामुळे व अमात्यांच्या विषपेरणीने स्वपुत्र कल्याणार्थ वागल्या ते एकवेळ समजूं शकते पण, स्वारी? हे दोघे बंधू तर राम लक्ष्मणाची जोडी..तरी ही अमात्याच्या इशार्‍यावर नाचून स्वतः चा मंचकारोहण करुन घेतांना आपण अन्यायाने वागतो आहोत अहे वाटले नाही?नाही ताराऊ..स्वारींना दौलतीचा मोह कधीच नव्हता.ते पटावरची नरद (सोंगटी) बनवल्या गेले होते.

          कांही वेळाने ताराबाईंनी जानकी बाईंचा निरोप व रामराजेंच्या महाली गेल्या.मुजरा करुन,मंचकावर पहुडलेल्या पतीच्या पायाशी बसला.स्वारी एवढी कोणत्या विचारात गढली की,आम्ही आल्याची खबरही लागली नाही.ताराऽऽ ताराऽऽ आमच्या दुबळ्या प्रकृतीआड एक मानवी ह्रदय आहे,त्याला स्वतःच अस्तित्व असूं शकते,हे कुणी जाणलच नाही.प्रत्यक्ष आमच्या जन्मदात्रीनेही, आम्हाला कठपुतलीसारखं नाचवल.एक दादामहाराज…त्यांच्या आठवणीने कंठ अवरुध्द झाला.ताराऽऽ दादामहाराजांच्या जाण्याने..ते होते तोवर आम्हाला प्रत्यक्ष  मृत्युचेही भय नव्हते.पण आतां पंखच तुटले,देहातील बळचं सरलं,चेतना हरवली.शंभूराजेंच्या अकाली निधनाने रामराजेच काय,सारी मराठी रयतच पोरकी झाली.पण बंधूचे दुःख करायला ही वेळ नव्हता.आपले दुःख बाजूला ठेवून,रयतेला धीर,येसूबाईना आधार द्यायसाठी त्यांना पुढं सरसावयाचच होत.

         ताराबाई मन घट्ट करुन म्हणाल्या, स्वारींनी आपलं दुःख बाजूला ठेवून, पोरक्या रयतेसाठी,आधारहीन येसूबाई साठी शिवाय दादासाहेबांचे अस्तित्व नाहीसे झाल्याने,चेकाळलेल्या यवन गनीमाला,जो दौलतीचा घास घेण्यास टपला आहे,या सर्वांची जबाबदारी आतां आपल्यावर आहे हा विचार करुन पाय घट्ट रोवून उभे राहावे!

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि. २०-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                भाग – १०.

        ताराबाईंनी पतीला त्यांच्या कर्तव्या ची जाणीव करुन दिल्यावर,रामराजे म्हणाले,म्हणूनच आज सदरेवर आम्ही स्पष्ट सांगीतले,वहिणीसाहेबांनी बाळ राजेंना घेऊन तातडीने रायगडाबाहेर पडावे आणि आम्ही स्वतः गड लढवावा. पण आमची कोणतीही गोष्ट किंवा हट्ट आजपर्यंत कोणी कधी ऐकला तर आतां ऐकणार?सार्‍यांनी विरोध करत म्हणाले, म्हणजे,दौलत स्वहस्ते यवनांच्या स्वाधीन करणे…सर्वांनीच री ओढली.शेवटी अंतिम फैसला देत वहिणीसाहेब म्हणाल्या,अजून तरी आम्ही दौलतीच्या स्वामीनी आहोत.आम्ही एक स्री आहोत शिवाय आमचे पुत्र अज्ञान आहेत.अशा वेळी दौलतीबाहेर पुडून स्वतःची सुरक्षा करायची म्हणजे नकळत दौलत अलमगी रच्या हाती देणे…म्हणून दौलतीची स्वामीनी म्हणून,आमची आज्ञा आहे, रामराजेंनी आपल्या कुटुंबासहित गडा बाहेर पडावं,सोबतच मुख्य अधिकारीही, पोरक्या झालेल्या दौलतीची हिफाजत करण्यासाठी मराठी माणसं एकत्र करावी

        वहिणीसाहेबांची आज्ञा व इतरांचा विरोध,आम्हाला कांहीच बोलतां आलं नाही.ताराबाईंचा अंदाज बरोबर ठरला. स्वारींना पुन्हा इतरांच्या मसलतीचा विरोध करणं नाही जमलं,परत एकदा ते दुबळे ठरले,आणि स्वकीय गनीमांनी अखेर डाव साधला..येसूबाईसाहेब पुत्रासह एकट्या पडल्या.त्यांची आज्ञा नव्हतीच तर होती अगतिकता..स्वामीविना पोरक्या झालेल्या एका असहाय्य स्रीची!

         सीमाल्लंघनाचा योग साधून,राम राजे पन्हाळगडावरुन निसटून चंदीकडे कूच केले.अलमगीरने नऊ लाखांच्या सैन्यासह दौलतीला व्यापून टाकले. मराठी दौलतीच्या राजधानीला झुल्फीकारखानने वेढा घातल्याने येसू बाई आणि दौलतीचे स्वामी बाळ शिवाजी अडकून पडले.दौलतीच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिरावर घेऊन निसटलेल्या रामराजांचा पाठलाग सुरु झाला.यवनाने प्रतापगड,सिंहगड,पुरंदर, लोहगड,राजगड,तोरणा,रोहिडा हे गड किल्ले हासील केले.आलमगीरचा पुत्र आज्जमचे नांव पुरंदरला देऊन आज्जम गड म्हणायला सुरुवातही केली.रायगड चा वेढा झुल्फिकारखानने आणखी आवळला.बालगण,कल्याण,भिवंडी यवनांनी जिंकले.सुबे,बारामती,इंदापूर, म्हसवड,खटाव,बुध,पांचगाव,कोल्हापूर, मसूर,शिरत,चाकण,शिरवल,राई,पुणे, कराड येथे आपली ठाणी बसवून,स्वतः आलमगीर तुळापुरी ठाण मांडून बसला.

स्वराज्यात उरले फक्त रत्नागिरी जिल्हा आणि वर घाटावर सातारा,पाली,विशाळ गड,वसंतगड,घाटातील राजमाची आणि कुलाब्यातील कुलाबा व असेच एक दोन गड उरलेत.

        ताराबाई त्यांच्या महालात विमनस्क मनस्थितीत बसल्या असतांना त्यांना एक प्रसंग आठवला.गोष्ट आहे, रामराजेनी पन्हाळगडवरुन निसटण्या आधीची…पन्हाळगडावर मनसद भरली होती.राज्याचे प्रमुख अधिकारी,रामराजे, व स्वतः ताराबाईही उपस्थित होत्या.तारा बाई स्वराज्याच्या सरसेनापती हंबीररावां ची कन्या,पित्याच्या स्वामीनिष्ठेचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या,पित्याने दौलती ची इंच नी इंच जागेचा परिचय करुन दिलेला,अन्याय बरदास्त न होणार्‍या.. सहाजिकच अस्तिनीतले निखारे किती व कोणते हे त्यांनी ओळखले होते.

        प्रल्हादपंत स्वार्थीपणाच्या राजकार णांतले शिरोमणी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच प्रल्हादपंतांच्या कल्पनेतही नसतांना,बारभाईने त्यांना मनसुबा विचारला होता.शंभूराजेंचा काटा परस्पर निघाला होता,येसूबाई,बाळराजेंच्या रुपाने मार्गातला अडथळा दूर झाला,पण परत तारा बाईच्या रुपाने काटा शिल्लक राहीला असल्याने, प्रल्हादपंताना बेइज्जत करण्यास त्या मागेपुढे बघणार नाही,हे जाणूनच विचारपूर्वक जबाब दिला.राम राजेंनी सध्यातरी आपली जान वाचवावी संतापाने खळवळून ताराबाई कठोर स्वरात म्हणाल्या,रयत मुसीबतीत असतांना केवळ आपली जान वाचवावी असं कुठवर चालणार?रामचंद्रपंत म्हणाले,मातोश्रीसाहेब ही वेळ गनिमांशी लढा देण्याचा नाही .एवढ्या कमी फौजेनिशी लढा देऊन हासिल कांहीच  न

होता सैन्यहानीच होईल.त्यापेक्षा राजेंनी दूरकुठे तरी स्थिरस्थावर होऊन योजना बध्द तरीक्याने गनीमाला शह देता येईल.

       पंत त्यामुळे येसूबाईसाहेबांची व बाळराजेंची काय गत होईल?पण त्यांचीच आज्ञा असल्याने,आपल्याला त्यांच्या आज्ञेचे पालन करणे आपला फर्ज नाही का?कुत्सितपणे हसून तारा बाई म्हणाल्या,पंत येसूबाईंनी ती आज्ञा कोणत्या परिस्थितीत दिली हे आम्ही विसरुं शकत नाही,म्हणूनच स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा बाईसाहेबांचा विचार व्हावासा वाटते.मातोश्रीसाहेब! दौलत,रयत,धर्म वाचवायचा असेल तर, मजबुरीने कां होईना, आज्ञा मान्य करावीच लागेल.रामराजेंचाही कल तसाच दिसल्यामुळे,ताराबाई निरुत्तर झाल्या.रामराजे,रामचंद्रपंताना म्हणाले, पंत!आमच्या पश्चात दौलतीची जबाब दारी आपल्या सुपुर्द करीत आहोत.मदती ला शंकर नारायण आहेतच शिवाय संताजी,धनाजी इथे राहून गनीम मोडून काढावा!

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि. २०-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                   भाग – ११.

         आणि ताराबाईकडे वळून रामराजे म्हणाले,आमचा निश्चित ठावठीकाणा लागेपर्यंत,अशा अवघडलेल्या स्थितीत आमच्याबरोबर दौडधूप न करतां,इथे राहून,आमच्या अनुपस्थितीत दौलतीची जबाबदारी सांभाळावी.ती तुम्ही यशस्वी पणे हाताळाल,तुमचा वकुब आम्ही जाणून आहोत.रामचंद्रपंतांना “हुकुमतपन्हा” हा किताब देऊन,जरी दौलतीचे अधिकार त्यांच्या सुपुर्द करीत असलो तरी,स्वामिनी म्हणून,त्यांना गरज असेल तेव्हा मार्गदर्शन करण्याची आज्ञा देतोय!मसलत संपली.निरोपाचे विडे देण्यातआले.रात्री ताराबाईॅनी राजेंना किती विनंती केली,प्रल्हादपंताना संगे घेऊ नये,पण रामराजेंनी न ऐकता प्रहाद पंतासह पन्हाळगडावरुन निसटले.आणि ताराबाई रामचंद्रपंतासह खेळण्याला पोहोचल्या.

         त्यादिवशी ताराबाई बेचैन होऊन अस्वस्थपणे आपल्या महालांत फेर्‍या घालीत होत्या,तेवढ्यात त्यांच्या मंजुळा नावाच्या दासीने,रामंचद्रपंत भेटण्याची अनुमती मागत असल्याची वर्दी दिली.पाठवून दे. गंभीर चेहर्‍याने गर्दन झुकवून समोर उभे असलेल्या रामंचद्रपंताना काय खबर म्हणून विचारले.पंतांची गंभीर मुद्रा बघून म्हणाल्या,आमच्या विवाहापासून सुखाचे क्षण फारच कमी आलेत आमच्या वाट्या ला.सारं बर्दास्त करण्याची आदत झाली सांगा,काय असेल ते…मातोश्रीसाहेब! बिदनूरच्या हद्दीत रामराजे जेरबंद झालेत

          पण बिदनूर दौलतीत येते ना?होय तिथली राणी आपली मांडलिक,राजे तिच्यापर्यत पोहोचले असते तर,नक्कीच आश्रय मिळाला असतां,पण..बिदनूरच्या हद्दीत सुभानगड व जिरा नावाचे दोन गड कोट,तिथूनच तुंगभद्रा वाहते.तुंगभद्रेच्या पात्रात एक लहान बेट आहे.राजेंनी या बेटाचा आश्रय घेतला होता.पण त्यांच्या मागावर असलेल्या अब्दुलखानने रात्रीची संधी साधून सरळ राजेंना भिडला,त्यात त्याचा जय झाला.राजेंसोबत संताजीराव चे बंधू हिंदुराव एकोजी,बहिर्जी,मानाजी घोरपडे इत्यादी लोकही गिरफ्तार झाले.

राजेंना आणण्यासाठी हमिदुद्दीन खाना ला बादशहाने रवानाही केले.

         तारांनी विकलावस्थेत भिंतीचा आधार घेत कसा तरी मंचक गाठला.पंत मुजरा करुन कधी गेले ,कळलेही नाही. आंतल्या मनातून हांक आली,ताराऽ तूं कुणी सामान्य स्री नाहीस,रडायला मोकळी नाहीस.दौलतीची स्वामिनी आहे आपलं दुःख ह्रदयांत दडवून रयतेचा विचार आधी करायचा असतो.म्हणजे आमचीही अवस्था येसूबाईंसारखीच… आलमगीर नऊ लाख सेना घेऊन दौलत बुडवायला निघालेला,ज्यांच्या भरवशावर आज दौलतीचा भार आहे,त्या स्वारींना,धर्मद्वेष्टा औरंंगजेब मौत दिल्या शिवाय संतुष्ट कसा व्हायचा?

         शंभूराजेंचं ताजं उदाहरण समोर आहे.महालात असलेल्या भवानीमातेच्या  मूर्तीसमोर दोन्ही हात जोडून दिनवाणे अश्रूभरल्या नयनांनी विव्हल स्वरांत विनवू लागल्या. ४-६ दिवसापासून त्या आईभवानी समोर बसून होत्या.अन्न पाण्याला स्पर्श तर केला नाहीच,पण दार उघडले नाही की,कुणाला उघडूही दिले नाही.पण रामचंद्रपंत आल्याने नाईलाजा ने दरवाजा उघडावाच लागला.सांगा पंत, कोणती भयंकर खबर आणली?नाही मातोश्रीसाहेब !राजे सकुशल चंदीला पोहोचले.पण कसं शक्य आहे?बादशहा च्या पंजात एकदा अडकवल्यावर?नाही मातोश्रीसाहेब!राजे त्यांच्या पंजात कधीच अडकले नव्हते.त्याचवेळी ते निसटले होते.स्वतः बहर्जीं घोरपडेंनी त्यांना खांद्यावर बसवून बिदनूरला पोहचवले होते.मुजरा करुन पंत निघून गेले.ताराबाई तशाच धावत जाऊन आई भवानी जवळ बसल्या.गद्गदित स्वरांत म्हणाल्या,माते!आमचे सौभाग्य वाचवून अनंत उपकार केले.दौलतीच्या या स्वामी वर फार मोठी जबाबदारी आहे.त्यांच्या पाठी राहून त्यांना उदंड आयुष्य दे माते..

          कांही दिवसांनी तीक्ष्ण भाला काळजात खुपसावा अशी खबर आली. खानाने वाईची देशमुखी देण्याची लालूच दाखवून किल्लेदार सूर्याजी पिसाळ फितूर होऊन किल्ल्याचे दरवाजे उघडून दिले.खानाने रायगड किल्ला ताब्यात घेऊन येसूबाईसाहेब व बाळराजेंना कोरेगांवच्या छावनीत आलमगीरच्या स्वाधीन केले.दोघेही मायलेकरुं कैद झाले.पंत!हे टाळता नसते कां आले?

        चारही बाजूने शत्रूचा विळखा,त्यांत सूर्याजी पिसाळाने केलेली फितूरी.कस शक्य होत?संतापाने थरथरत,ताराबाई कडाडल्या,रायरी सोडायच्या आधीची मसलत विसरलांत? आतून किल्ला लढवण्याची जबाबदारी येसूबाईंनी घेतली होती,आणि बाहेरुन,तुम्ही,स्वारी, संताजी,धनाजीनी मदत करण्याचे ठरले होते ना?पण,झाले काय?स्वारींनी गनीम पाठीवर घेऊन दौलतीतून पळ काढला, तुम्ही स्वतः दुर्गम खेळणागडाचा आश्रय घेऊन स्वतःची सुरक्षितता बघीतली, संताजी,धनाजी इतरत्र लढत राहिले आणि मराठ्यांची राजधानी…?

                क्रमशःः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि.  २०-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                   भाग – १२.

          संतापातिरेकाने ताराबाई ताडताड बोलत होत्या.मराठ्यांची राजधानी रायगड…मराठी राज्याची महाराणी येसू बाईसाहेब,मराठ्यांचे स्वामी बाल शिवाजी यांची फिकर कुणालाच नाही. पंताची दशा अतिशय वाईट झाली,घसा कोरडा पडून,पाय लटपटू लागले,तरीही ताराबाईचे बोलणे सुरुच होते.पंत!पती विना निराधार झालेली स्री केरकचर्‍या सारखीच,तीच्या दुःख,भावनांचा विचार समाज करतच नाही म्हणूनच,आज मराठी दौलतीच्या विधवा महाराणीच्या नशीबी यवनाचा तुरुंगवास आला.पुन्हा विद्युल्लतेगत कडाडत म्हणाल्या,पंत! गडाचे दरवाजे उघडून देऊन सूर्याजी पिसाळांनी हरामखोरी केलीच,पण शब्दा ला न जागता उचित समयी मदत न धाडता तुम्हीही स्वराज्याच्या राजधानीशी महाराणीशी व स्वामी बाळराजेशी दगलबाजी केली हे आम्ही विसरुं शकत नाही.जा..पंत जा.. निदान यापुढे तरी निष्ठेने वागा..जा..

         पंत निघून गेले आणी ताराबाईंच्या मनःचक्षुसमोर शुभ्र वस्र परिधान केलेल्या कुंकुविहिन कपाळाच्या येसूबाई साकार झाल्या.म्हणाल्या,ताराऊ!तुमच्या डोळ्यांत आसव?भोसले कुळात आल्या पासून आसवंच तर सोबत आहे.आम्हीही  आमच्या मनातील दुःख बाहेर दिसूं न देतां वावरत राहिलो.पण बाईसाहेब हे सर्वांनाच जमेल असं नाही ना?तुम्ही भोसले कुळाच्या स्वामिनि असून अस कसं बोलू शकता ताराऊ?

         रायरीच्या मसलतीवेळी आमचा फक्त सर्वात जास्त तुमच्यावर विश्वास होता,खात्री होती.वाटलं होतं रामराजेंवर वचक ठेवाल,म्हणूनच तर दौलतीचा भार त्यांच्या सुपुर्द केला होता.योग्यवेळी आमची रायगडावरुन सुटका कराल.पण

बाईसाहेब आम्हाला मौका.. येसूबाई भीषण हसल्या,म्हणाल्या,स्वारी नेहमी एकांतात म्हणायचे,अमची जबान फटकळ,अन्याय बरदास्त होत नाही, म्हणून आम्हाला सारेच पाण्यांत पाहतात आमचं अहित चिंततात.ताराऊ,स्वारीची हीच सवय आम्हाला जडली व नडली सुध्दा,म्हणूनच तर आमचे बंधू गणोजी शिर्के आमच्या सौभाग्याचे काळ बनले.

ज्यावेळी तुम्हाला गड सोडायला सांगीतला,तेव्हाच आम्हाला जाणीव होती की,प्रसंगी कुणीच आमच्या मदती ला येणार नाही.आमचा अंदाज खरा ठरला.शेवटी आलमगीरचे कैदी बनण्याची आमच्यावर नौबत आली.

        ताराऊ,तुम्हाला अश्रू ढाळून चालणार नाही.रामराजे भोळे आहेत. त्यांना मतलबी,स्वार्थी लोकांपासून दूर ठेवून  दौलतीच्या जबाबदारीची जाणीव करुन देत रहा.आमच्या स्वारींचा दगल बाजीने झालेल्या मृत्युचा बदला कुणी घ्यायचा?पुसा अश्रू!रयतेची काळजी घ्या दुःखाला दडवण्याची कोशीश करा…पण बाईसाहेब! आपली रिहाई?प्रथम दौलती चा विचार करा.गेलेले गडकोट परत मिळवा.माणसं जमवा,तोडू नका.रामचंद्र पंताना सत्य बोलून डिवचले तस करुं नका.संतापाला आवर घालायला शिका.स्वारींच्या खुनाचा बदला घ्या. यवनांना जेरीस आणा.यातच आम्ही तृप्त होऊ,सारे पावेल…त्या स्मृतीत किती काळ राहिल्या असत्या…पण दासी मंजुळाने हुकुमपन्हा तातडीने भेट मागत असल्याची वर्दी दिली.पंत मुजरा करुन म्हणाले,चंदीवरुन संताजीराव व धनाजी राव मसनदीवर आपल्या इंतजारीत आहे त्यांना कांही महत्वाचं…पंत मुजरा करुन निघून गेले.बाहेर अंधार अधिकच गडद वाटला.शाल पांघरुन ताराबाई मसनदी कडे निघाल्या…

         तारा पोहोचल्या तेव्हा मनसदीचं वातावरण गंभीर असल्याचे त्यांना जाणवले.सार्‍यांचे मुजरे स्विकारुन बसल्यावर,धनाजी,संताजी यांना चंदी सोडून एवढ्या तातडीने येण्याचे कारण विचारल्यावर,धनाजी म्हणाले,आम्ही मजबूर होतो.मजबूर?ज्यांनी प्रत्यक्ष औरंगजेबच्या डेर्‍याचे कळस कापले, मोठमोठ्या मुगल सरदाराच्या दिलात धडकी भरवली ते दौलतीचे शूर शिलेदार मजबूर?दोघेही शिलेदार आंत दुखावल्या गेले.सेनापती संताजी उठून म्हणाले, मातोश्रीसाहेब!आम्ही थोरल्या महाराजां च्या तालिमीत तयार झालेले शिलेदार, सुराज्याची निष्ठेने सेवा केली.दौलतीच्या स्वामींचा शब्दही खाली पडूं दिला नाही, तीच दौलत,पंतप्रतिनिधी प्रल्हादपंतांनी मुलुख विकण्याची आगळीक केली. म्हणजे?

         मातोश्रीसाहेब!राजे चंदीस पोहचण्या आधीच,निष्ठावान सेवक हरजीराजे मृत्यु पावले होते.त्यांच्या निष्ठेचा मोबदला काय मिळाला?तर त्यांची पत्नी अंबीकाबाई व पुत्र दुर्गोजीरावांना कैद व एक कोट रुपये पेश करण्याची आज्ञा…पण यांत पंतांचा काय संबंध?ही सलाह पंताचीच!या एक कोट रुपयांपैकी कांही रक्कम त्यांनी स्वतः …

त्यासाठी तर हे राजकारण शिजलं… एवढ्यावरच थांबलं नाही तर,थोरल्या महाराजांनी तसू तसू जागा जमवून दौलत उभी केली,त्यासाठी कित्येक मोहरे कामी आलेत आणि पंतानी… पंतांनी याच दौलतीच्या तैनातपट्टीचा किल्ला विक्रीस काढला.पण गरज काय पडली एवढी?

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.  
           दि.  २०-१२-२०२१.

महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading