महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग ५ , (१७ ते २०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       ७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन…………………

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! महाराणी ताराबाई!!!

!! महाराणी ताराबाई !!

                    भाग – १७.

            मध्यंतरीच्या काळात सेनापतीचे पद गमावलेल्या संताजीने कासिमखान आणि रहुल्लाखानावर हल्ला करुन दांडडेरीगड व सात लाख हासिल करुन मोठा पराक्रम गाजवलेला बघून रामराजें च्या मनातील किल्मिष दूर झाले आणि सन्मानाने त्यांना चदीवर येण्याची आज्ञा केली.ते आल्यावर स्वतः राजे त्यांना सामोरे गेले.आणि स्वतः ताराबाईंनी औक्षण केले.संताजींच्या नेत्रकडा पाणावल्या.कृतार्थतेचं तेज मुखावर पसरले.रामराजेनी हाताला धरुन त्यांना बैठकीवर बसविले.स्वहस्ते मानाचा पोषाख, नजराणा व एक दुधारी तलवार भेट करत म्हणाले,तुम्हाला या दोन्ही दुष्मणावर मोर्चे बांधायचे आहे.महाराज! या समशेरीची शपथ घेऊन वचन देतो, स्वराज्याची हिफाजत प्राण पणाला लावून करुं..निरोपाचे विडे झाले.मसनद उठली.

         संताजीच्याच तोडीचे धनाजीराव! दोघांत अतिशय घट्ट मैत्री,पण स्वभाव भिन्न!धनाजीचा स्वभाव हळवा,कोमल छोट्यामोठ्या चुका दुर्लक्षित करणे,शरण आलेल्यास इज्जतीने वागवणे,त्यामुळे धनाजी आपल्या सैन्यात प्रिय होते,तर संताजी अतिशय न्यायनिष्ठूर,शिस्तप्रिय, दयामाया या भावना त्यांच्यात नसल्या मुळे त्यांचा वचक दांडगा होता.सैन्यात भीती असल्यामुळे आंतून सारे नाराज असत.

           रामराजेंनी संताजीचे सरसेना पतीचे पद काढून धनाजीला बहाल केल्याने दोघांत बेबनाव झाला,पण एवढं च कारण नव्हते.संताजीविरुध्द धनाजीचे कान फुंकून मन कलुषित केल्या गेले.व त्यामागे रामचंद्राचा हात असल्याचे चाणाक्ष ताराबाईंनी हेरले.राजेंजवळ आपली शंका व्यक्त केल्यावर,ते म्हणाले, बिचारे प्रल्हादपंंत तुझ्यासमोर न येता इथून बेपत्ता झाले आणि पुढे पंढरपूरांत गळफास लावून आत्महत्या केली.तसच रामचंद्राच व्हावं असं तुला सुचवायच कां तारा,शंका,संशयाने दौलत सांभाळल्या जात नाही,म्हणूनच यापुढे स्वारींनी थोडं कठोर व्हावं,दौलत मोठी समजुन कुणाचीही चुक,आगळीक दुर्लक्षू नये, मग प्रत्यक्ष आम्ही जरी दौलतीच्या आड आलो तरी मुलाहिजा ठेवू नये,डोळसपणे माणसांची पारख करावी.

       झुल्फिकारखानचा विळखा आवळला जात होता.किल्ल्याच्या पश्चिमे कडे तो स्वतः,उत्तरेकडच्या डोंगराजवळ सिंघवरम ठाण मांडून बसलेला,त्याच्या लगतच राव दल्पतचे ठाणे,किल्ल्याच्या मागील बाजूस रामसिंग हाडा ससैन्य दबा धरुन बसलेला होता.किल्ल्यापासून अर्ध्या कोसावर चिखली दुर्ग दाऊदखान ने हस्तगत केला होता.चंद्रायण दुर्गा जवळून चंदीला येणारा भूयारी मार्गही गनीमांना माहित झालेला,त्यातच झुल्फिकारखानला,बादशहाचे कडक फर्मान आले,वाटेल ते करुन चंदी हासील करा,अन्यथा देहदंडाची सजा फर्मावण्यां त येईल,त्याने तातडीने रामराजेंना गुप्त निरोप पाठवला,आमच्या सैन्यात कांही मराठी सरदार व तुमचे सोयरे आहेत,त्यांचेशी संधान बांधून,संधी साधून चंदीतून निघून जावे.राजेंनी तातडीची बैठक बोलावली.

        ताराबाईंना कांही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.स्वागतसमारंभा नंतरही संताजी बरेच दिवस तळ ठोकून चंदीत थांबल्याने सर्वानाच आश्चर्य वाटले.एके दिवशी संताजी रामराजेंना आपल्या गेलेले सेनापतीपद पुन्हा बहाल करण्या च्या मुद्यावरुन दोघांमधे बरीच बाचाबाची झाली.राजेंनी त्यांना जेरबंद करण्याची भाषा बोलल्यावर,संतापून संताजीने तलवारीला हात घातलेला बघून विद्युल्ल सारख्या तारा कडाडल्या व चांगलीच कान उघाडणी केल्यावर,समशेरीवरचा हात लुळा पडला.गर्दन झुकली आणि बाहेर निघून गेले.दुसर्‍या दिवशी निःशस्र हात बांधून,राजेंना माफी मागीतली.पण म्हातारी मेल्याचे दुःख नसते,पण काळ सोकावतो.वास्तविक संताजीसारख्या मोहर्‍याची दौलतीला अत्यंत गरज होती,पण त्यांच्या बेताल वागण्याला क्षमा केली तर..पुन्हा तोंड दाखवू नका म्हणून क्षमा नाकारली.

            हताश संताजीने ससैन्य चंदी सोडली.आणि कांही दिवसांतच खबर आली,दौलतीचे दोन स्वामीनिष्ठ सेवक, एकमेकांचे जिवलग मित्र यांच्यात मारा मारी झाली,मधे पडलेल्या अमृतराव निंबाळकर सारखा अनमोल हिरा खर्ची पडला.आगळीक धनाजी जाधवांचीच!ते ससैन्य संताजीवर चालून गेले,पण संताजीसमोर त्यांचा जास्तवेळ टिकाव न लागल्याने पराभव झाला.

          आणि एक दिवस बातमी आली, संताजी बेसावध असतांना नागोजी माने ने त्यांच्यावर घाव घातला.दौलतीचा एक स्वामीनिष्ठ सेवक कुत्र्याच्या मौतीनंं मेला मराठीशाहीचा एक तेजस्वी तारा अकालीच निखळला.

       बैठकीत निर्णय झाला,पुत्र लहान बाळराजे,सवत राजसबाईची जबाबदारी, शिवाय परत दिवस गेल्याने व पुढील व्यवस्था लागेपर्यंत ताराबाईंनी गडावर थांबावे आणि सड्या स्वारांनिशी रामराजें नी गड सोडावा.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि.  २१-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                    भाग – १८.

          चंदीच्या मसनदीवर मुत्सद्यांची बैठक भरली.चंदी मुसीबतमधे आहे. रामचंद्रपंतांना अनेक खलिते पाठवूनही कुमक येत नव्हती.इथे सैन्य थोडं!त्यात  इथले वतनदार मोहापायी यवनांना मिळालेले,अशावेळी दौलतीतून कुमक मागवणे अत्यंत निकडीचे!जेव्हा खलित्याने काम होत नाही,तेव्हा एखादा मातब्बर आसामीला धाडणे गरजेचे,पण तेवढेच धोक्याचे…त्याचवेळी खंडोजीराव ताडकण उठून उभे राहत निश्चयी स्वरात म्हणाले,महाराजांनी आज्ञा द्यावी,ही जबाबदारी आमच्या शिरावर घेतो.आपण खलिता द्यावा.एका कारकुना समवेत खलिता घेऊन खंडोजीराव स्वराज्याकडे निघाले.गनीमांची नजर चुकवित.त्रिवेदी प्रांत,अरुणाचलचे ठाणे येथे विश्रामा साठी थांबले असतां,कोंडो विठ्ठल नामक स्वकीय दगलबाजाने त्यांना ओळखून, यवनाकडून गिरफ्तार करवले.पुरं एक सवंत्सर खडोजीरावांच्या पायात बेड्या व गळ्यात हत्तीच्या जंजीरा अडकवल्या गेल्या.वेळीच रामराजेंना खबर मिळाल्या वर त्यांनी झुल्फिकार खानाकडे रदबदली करुन खंडोजीची रिहाई करवली.नाहीतर स्वराज्याचा आणखी एकनिष्ठ अनमोल हिर्‍याला दौलत मुकली असती.

           ताराबाईंसमोर खंडोजीरावां संबंधी आणखी एक प्रसंग साकार झाला

चंदीला विळखा घालून बसलेल्या झुल्फि कारखानाची भेट घेऊन गणोजी शिर्के व राणोजी शिर्के मोर्च्याचे प्रमुख आहे ही माहिती मिळाल्यावर त्यांचे मन वळवण्या स जाण्यासाठी मोठ्या मुश्कीलीने,राजे व ताराबाईची संम्मती मिळवून,जीवाची पर्वा न करतां,पाळण्यातून खानाच्या गोटात जाऊन गणोजी शिर्केच्या तंबू जवळ पोहचले.वर्दी मिळताच गणोजी शिर्केसमोर उभे राहिले.नंतर इतर गोष्टी, चंदीची परिस्थिती,दौलतीची निकड वगैरे सांगीतल्यावर,गणोजी म्हणाले,जसे आमचे शिरकान केले तसे भोसलेंचा निर्वंश झाला तर आम्हाला आनंदच वाटेल.खंडोजीराव म्हणाले,जसे तुमचे शिरकाण केले,तसेच आमच्याही जवळ च्या  नातलगाला हत्तीच्या पायी दिल्या गेले होते,म्हणून कां आम्ही यवनाला मिळालो?गणोजीराव दौलत हिंदुंची आहे.या दौलतीसाठी झटणं प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. तसे तुम्ही रामराजेंचे आप्त,सगे सोयरे,तुमच्या हाताखाली ५००० सैन्य,अशावेळी मराठी रयतेला तुमच्या आधाराची सक्त आवश्यकता आहे,शिवाय ज्यांच्यावर तुमचा राग ते शंभूराजे आतां हयातही नाहीत.सध्या रामराजे दौलतीचे स्वामी, त्यांनाच पारखे  झालो तर ही दौलत कशी सांभाळावी?मराठी धर्म कसा राखायचा?

         या निकट प्रसंगी तुम्ही पुढाकार घेऊन त्यांचा कुटुंबकबील्यास इथून काढून नेल्यास,तुमची किर्ती दौलतभर पसरेल,स्वराज्यावर तुमचे डोंगराएवढे उपकार होतील.ठीक!पण आमच्या शर्ती मंजूर असतील तरच!तुमची हर शर्त मान्य करण्यास आम्ही वचनबध्द आहोत तुमचं दोभोळचं वतन आमच्या नावे कराव,क्षणाचाही विचार न करतां तात्काळ कबूल झाले.भोर तालुक्यातील तीन गांवे इनाम शिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील पांच गावे आणि ही जोखीमीची कामगिरी शिरावर घेण्यापूर्वी राजेंच्या सहीशिक्यानिशी सनदपत्रे हवीत

गणोजीराव,उद्या आम्ही सनदपत्रासह हजर होऊ,पण?बोला खंडोजीराव… आम्ही दौलतीचे प्राण तुमच्या सुपुर्द करतो आहोत…आमच्या शब्दाबद्दल शंका वाटते का?नाही पण वेळ कठीण आहे…खंडोजीराव आम्ही राजेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, शिवाय त्यांचा कुटुंबकबिलाही मोठ्या हिफाजतीने बाहेर काढु!खंडोजीराव! आम्हीही हिंदुच आहोत,मराठी मातीत जन्मलेलो,विपरीत कारणाने जरी यवना स मिळालो असलो तरी या मातीला आम्ही  कसे विसरणार? निश्चिंत असा,..

          गणोजीरावांचा निरोप घेऊन, खंडोजीरावांनी घडलेली हकिकत मसनदीवर पेश केल्यावर,ताराबाई म्हणाल्या,तुमचं दाभोळचं वतन?स्वामी कार्यासाठी आम्ही अशी दहा वतनं देऊ

मराठी दौलत आमची आई आहे. राजेंना सनदपत्रे लवकर देण्याची विनंती केली. दुसर्‍या दिवशी रात्री सनदपत्रे घेऊन जीव धोक्यात घालून चंदीवरुन पाळण्याद्वारे खाली उतरले.सनदपत्रे गणोजी शिर्क्यां च्या स्वाधीन करुन म्हणाले,आम्ही आमचा शब्द पाळला..आम्हीही दिल्या शब्दाशी इनाम राखू.शब्दाला जागून प्रथम रामराजे व लवकरच ताराबाई आपल्या कबिल्यासह निसटल्या खेळण्याच्या बलदंड किल्ल्याकडे…

       गणोजीराव शिर्क्यांच्या सैनिक तुकडीसह मेण्यात बसलेल्या ताराबाईंना  चंदी सोडण्याच्या त्या विरहाच्या आदल्या रात्रीचा सारा प्रसंग आठवला.रामराजे त्यांच्या महालात येऊन मंचकावर तारा बाईच्या शेजारी बसून,प्रेमाने जवळ घेत म्हणाले,आम्हाला कांही सांगायचेय!तारा वेळ सांगून येत नाही.उद्या आम्ही यवना च्या विळख्यातून निसटण्यासाठी,गणोजी सारख्या मतलबी,झुल्फिकारखाना सारख्या दगलबाज यवनाच्या बोलण्या वर विश्वास ठेवून निघत आहोत,पण या दोघांचे मन कधी बदलतील नी कधी हरामखोरी करतील याचा भरोसा नाही, तसं कांही झालं,त्यात आमचं बरं वाईट झाल्याचं तुझ्या कानावर आलं तर….

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
            दि. २१-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                  भाग – १९.

        ताराबाईंनी त्यांच्या तोंडावर हात ठेवून,व्याकुळ स्वरात,भरल्या गळ्याने म्हणाल्या,स्वारीने अस अभद्र बोलू नये. नेहमी माणसाने दोन बाजूंनी विचार करावा ताराऽ..आम्ही तुला वचन देतो, जर आम्ही या संकटातून सहिसलामत निसटलो तर,खर्‍या अर्थाने शिलेदारी व्रताची सुरुवात करुन,दौलतीचा जबाब दार स्वामी या रितीने बर्ताव करु.आमच्या समशेरीने आलमगिरची झोप हराम करु. तुला अभिमान वाटेल असेच वागू..

        पण जर कां आमचं बरं वाईट झालं तर,आमची जिम्मेदारी तूं आपल्या शिरा वर घे.तूं एकटी नाहीस,बालराजे आणि दौलत अशी दुहेरी जिम्मेदारी असेल, त्याच प्राणपणाने जतन कर.तुझा वकुब आम्ही ओळखून आहोत.प्रसंग पडलाच तर रणरागिणी बनून सौदामिनीसारखी शत्रूवर तुटुन पडशील.म्हणूनच तस कांही घडलच तर,सरसेनापतीची लेक,स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांची स्नुषा, भोसले कुळाची शान आहे याचा विसर कदापी पडू देऊ नकोस.रामराजे बोलत होते आणि ताराबाई शब्द नी शब्द मनात साठवत होत्या.

            दुसर्‍यांदा विरहाचा क्षण जवळ आला.पहिल्या वेळच्या विरहाने त्या चांगल्याच पोळल्या होत्या.सगुणा सारख्या देखण्या स्रीच्या अधिन झालेले रामराजे हाती लागतील की नाही या धास्तीने रात्रीची झोप हराम झाली होती. पण जगदंबेच्या कृपेने ती आपत्ती टळली आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊन राजे सुधारले.पण या वेळचा विरह.. निघतेवेळी राजे म्हणाले,तारा,सुहास्य वदनाने आम्हाला निरोप दे!आमचं बळ वाढव..

       रामराजे निघून गेल्यावर,ताराबाई आपली सवत राजसबाई व इतर स्रीयां सह चंदीच्या उंच राजगिरीच्या आश्रयाला आल्यात.राजगिरीच्या दरवाज्याबाहेर झुल्फिकारखानचे ठाणे होते.मागच्या बाजूस उतुंग दरड.रामसिंग हाडा ती दरड चढून वर येऊन राजगिरीत घुसला आणि सार्‍या स्रीयांच्या तोंडचे पाणी पळाले. सार्‍या घाबरल्या,पण ताराबाई घाबरल्या नाही.शिवाय त्यांचा आधार त्यांच्या कुशीत होता बाळराजेच्या रुपाने.त्या आई भवानीला शरण जाऊन अगदी कळकळीने विनवले,माते!स्वराज्य रक्षणासाठी घेतलेल्या शपथा निभवण्या साठी तरी या अस्मानी संकटातून सर्वांना वाचव,डाव अर्ध्यावर नको मोडूस आणि त्यांची विनवणी वाया नाही गेली.गणोजी व झुल्फिकारखान आपल्या शब्दाला जागले.विळख्यातून स्वार्‍या सकुशल बाहेर पडल्या.त्याचवेळी धनाजीरावांची फौज दिमतीला आली.फौजेतील एका सैनिकाला अधिरतेने ताराने विचारले, सध्या स्वारी कुठे आहेत?मातोश्रीसाहेब! राजे सकुशल वेरुळला पोहचले असून, तिथून प्रतापगड,नंतर राजपूरास व शेवटी खेळण्यास पोहोचणार आहे. आपल्याला तिकडेच नेण्याची राजांची आज्ञा आहे.मेण्यात बसलेल्या ताराबाईं ना गड चढतांना हे सारे आठवले.नकळत डोळे मिटून मनोमन आई जगदंबेला भक्तीभावाने हात जोडले,त्याचवेळी गडा वरील मंदीरातून घंटानाद ऐकू आला.

          चंदीहून परतलेल्या रामराजेत एक नवा आवेश संचारला,त्यात ते आपली क्षीण प्रकृतीही विसरले.चंदीत त्यांचे बहु मोल ७-८ वर्षे वाया गेली या जाणीवेने, आतां वेळ न दवडतां,दौलतीतील गड कोट जातीने नजरेखालून घालण्याच्या कामगिरीवर,तारांच्या आग्रहाने त्याही बरोबर होत्या.आतांपर्यंत जीव वाचवण्या साठी घोडदौड करावी लागली,पण आतां मोहिमेवर,दौलतीच्या हिफाजतीसाठी कमलेला समशेर अडकवून,प्रसंग पडला तर,रामराजेंच्या खांद्याला खांदा भिडवून गनीमावर झडप घालण्याची तयारी होती.

घनदाट जंगल,दुर्दम्य दर्‍याखोर्‍या, अवघड घाट,जीवघेण्या घळी पार करत, गडकोट पालथे घालत,गडगर्‍यांना योग्य सुचना देत पुढे जात राहिले.सारी रयत आनंदी होती.आपापसातले भेदभाव,हेवे दावे,मतभेद सारं विसरुन एकत्र होऊ लागले.दौलतच श्रेष्ठ याची प्रत्येकाला जाणीव झाली.समाधानाने संतुष्ट होऊन ताराबाई मोहिम फत्ते करुन राजेंसह माघारी परतल्या.पतीबद्दल त्यांचा उर अभिमानाने भरुन आला.

        त्यादिवशी वर्दी न देतां अचानक रामराजे तारांच्या महाली आलेत.चकित तारांनी राजेंना मुजरा केला.राजे त्यांच्या रुपाकडे भान हरपून बघत असलेले बघून,किंचित लाजत म्हणाल्या,स्वारी आज एवढं निरखुन काय पाहत आहे? राजे दिलखुलास हसून त्याचीं स्तुती केल्यावर,लज्जेने चूर होत म्हणाल्या, स्वारी आमची फाजील स्तुती करताहेत. राजे अगदी जवळ पोहोचले.एका मनोहर कल्पनेने सर्वांगावर गोड रोमांच उभे राहिले.कानशीलं तापली.शरीरातील रक्त गरम होऊन विलक्षण वेगानं सळसळू लागले.आणि सरितेगत त्या राजेंच्या बाहूत विसावल्या,अस्तित्व हरपुन बसल्या.आणि त्या बातमीने त्या एकदम जमीनीवर कोसळल्या.त्यावेळी राजेंचा राग येण्याऐवजी,त्यांची कीव करावीशी वाटली.पतीच्या मिठीतील धग कधीच निमाली.शरीर बर्फ बनलं.गात्रागात्रातून फुललेला मोहोर केव्हाच गळून पडला. अधिरता संपली.उरलं फक्त थंडगार, पत्थरागत,भावहीन हाडामासांच शरीर!

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. २२-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                   भाग – २०.

        ताराबाईंचा आनंदी मूड बघून राजे म्हणाले,ताराऽ आम्ही कुणाला तरी शब्द देऊन बसलोय.तुझं मन दुखवण्याचा किंवा तुझ्या स्वाभिमानाला ठेच पोहचवण्याचा आमचा बिलकुल हेतू नव्हता.आमचं नेहमीच अस होतं,ज्या वेळी विचार करायचा तेव्हा करत नाही, कुणाच्या तरी शब्दात अडकल्यावर जाणीव होते तेव्हा उशीर झालेला असतो मुखावरचे अपराधी भाव बघून,ताराबाई म्हणाल्या,जे काय असेल ते स्पष्ट सांगावे

आम्हाला आतां घाव,दुःख पचवण्याची आदत झाली आहे.पण त्याआधी तुझं वचन हवय!दिलं वचन.आतांतरी आड पडदा न ठेवता स्वारीने सांगावे…

           ताराभोवतालचे हाताचे बंध सुटले.गंभीर होऊन म्हणाले,ताराऽऽ  वारसीचे पारगावकर निंबाळकर आले होते.तोलामोलाचं घराणं,दौलतीच्या चाकरीत असलेले,आबासाहेबांच्या वेळे पासूनच….आम्हाला सारे माहित आहे . आबासाहेबांप्रमाणेच सारा मराठा एकत्रीत करुन,दादासाहेबांच्या निर्घुन हत्येचा बदला घ्यावा म्हणून आम्ही निंबाळकरांना शब्द दिला.जसे राजकारण साधण्यासाठी आबासाहेबांनी आठ लग्ने केलीत.केवळ आणि केवळ तेवढ्याच उद्देशाने,पारगांव निंबाळकरां ची कन्या अंबिकाबाईशी आम्ही विवाह करण्याचे ठरविले,अर्थात त्याआधी तुझा सल्ला घ्यायला हवा होता,पण नेहमीच्या आदतीनुसार…हा शब्द छत्रपतींचा नसला तरी,यावेळी दौलतीचा भार शिरा वर घेतलेल्या जबाबदार व्यक्तीचा आहे, त्याचे पालन करावे.आमचा विचार करुं नये.तारांच्या या आगळ्या वेगळ्या दर्शना ने त्यांच्याबद्दलचा अभिमान आणखी दुनावला.भावनावेशाने ताराला घट्ट मिठी मारली.पण तारांच्या मनातील कोलाहालाची राजेंना काय कल्पना?

           प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी तारानेच पुढाकार घेतला.आग्रहाने तिचे पूर्वीचे अंबिकाबाई नांव बदलून अहिल्याबाई  ठेवून तिचे स्वागत केले.चेहर्‍यावर,खेद, नापंसती,विषादाची छटाही उमटू दिली नाही.ताराने स्वतःला बजावलं..तारा, देवा ब्राम्हणासमक्ष स्विकारलेला पुरुष कसाही असला तरी त्याच्या सुखदुःखात समरस होऊन,त्याचं हित,यश,सुख चिंतून आपलं सर्वस्व त्याला अर्पण करणे स्रीचे कर्तव्य आहे

         निंबाळकरांची अंबिका भोसल्यां ची अहिल्या बनली नी प्रथम ताराबाईंना नमस्कार करायला साजश्रृंगार करुन आलेल्या अहिलेला दोन गोष्टी सांगाव्या या हेतूने तीला आपल्याजवळ प्रेमाने बसवून म्हणाल्या,अहिल्या,आम्ही स्वारीं च्या सुखातच आमचं सुख मानतो.राजस बाईंचही तसच आहे.यापुढे स्वारी आमच्याकडे नाही आली तरी आम्हाला, तुमचा मत्सर किंवा खंत,खेद वाटणार नाही.फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे,त्यांना आपल्या मोहजाळ्यात गुरफटून ठेवू नका.कारण आज आपल्या पेक्षा त्यांचेवर स्वराज्याचा अधिकार, मराठेशाहीच्या संरक्षणाची जबाबदारी जास्त आहे.त्यांना आपल्या बाहुपाश्यात अडकवून न ठेवतां,त्यांना त्यांच्या जबाब दारीची सतत जाण राहील,बळ वाढेल,सामर्थ्याला धार चढेल असा बर्ताव करा.आमची व स्वराज्यची तुमच्या कडून हीच अपेक्षा आहे.

          विशाळगडाच्या सदरेवर मसनद भरली.दौलतीचे अनेक मान्यवर हजर होते.राजेंच्या आज्ञेने ताराही उपस्थित होत्या.रामराजे गंभीरपणे बोलू लागले, मंडळी!आम्ही चंदी मुक्कामी असतांना यवनासंगे ज्या जोमाने लढाई करायला  हवी होती,दुर्देवाने तितकी करुं शकलो नाही.सहाजिकच गनीम शेफारला.त्यात च आम्ही चंदीवरुन निसटल्यामुळे बादशहा बिथरला.तो स्वतः जातीने ससैन्य दौलतीत घुसला.त्याच्या सैन्याची संख्या जास्त असली तरी,खोगीरभरतीच जास्त आहे.त्यातच त्याचे सैन्य,तो स्वतः, शहजादा,गाजिउद्दीन,फिरोजजंग,झुल्फि कारखान यांच्यात विभागल्या गेल्यामुळे, त्याचं बळ कमी झालं,त्याचाच फायदा उठवायचा,नी आपली मनुष्यहानी टाळावी म्हणून,ज्या मार्गाने मुगलांना रसद येते,त्या मार्गावर दबा धरुन रसद लुटावी,सगळ्यांना राजेंचा मनसुबा पटला.शिंदे तुम्ही बालगाण,खानदेशात येसाजी,खंडोजी,दाभाडेंनी जावे शिंद्याच्या मदतीला बुवासाहेब असतील.परसोनींनी वर्‍हाडात,धनाजीराव व अमृतराव महाराष्र्टात,तसेच महाराष्र्टाचा दक्षिण भाग बहिर्जी आणि कर्नाटक राणोजी रावांनी बघावा.आम्ही स्वतः कोकणात उतरतो.

            रामराजेंच्या संकल्पाने ताराबाईं  आनंदल्या.त्यांच्यासवे जाण्याचा निर्धार केला.पुढे राजें म्हणाले,आपलं मनुष्यबळ  कमी असल्यामुळे हानी होणार नाही या दृष्टीने गनिमीकाव्याने लढावे,तसेच वेळो वेळी दौलतीत खबर पाठवायला विसरुं नये.निरोपाचे विडे घेऊन मसनद उठली. ताराबाई या नव्या संकल्पाने फारच प्रभावित झाल्यात.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि.  २२-१२-२०२१.

महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading