आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

झाशीची राणी संपूर्ण भाग ४, (१६ ते २०)
आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! धगधगती शलाका, इतिहासातील एक पर्व ! स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा ! इंग्रजांचा तनखा खात, त्यांचे पाय चाटत, देशाची माती त्यांच्या स्वाधीन करुन ऐषारामात जगणार्या संस्थापिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी तेजोमयी ज्योत म्हणजे झाशीची राणी !
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
झाशीची राणी
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – १६.
या सार्या दैवलिलेच्या खेळा बद्दल राणीसाहेब मनोमन सतत विचार करीत होत्या. दुर्भाग्य, विटंबनाना सामोरे जातांना संघर्षाचं बीज मनामनातुन पेरलं जात होतं. आपल्या हातुन कांही चांगलं व्हाव, राणीसाहेबांना योग्य न्याय मिळावा असा अहवाल एलिसने मालकनकडे पाठवला, पण किरकोळ शिफारसी मान्य करुन महत्वाच्या शिफारसी नाकरल्याने एलिसला पुन्हा धक्का बसला. तो स्वतः राणी समोर जाऊं शकत नसल्याने २८ एप्रीलला मोठ्या दुःखी मनाने डलहौसी च्या आलेल्या शिफारसी दुतामार्फत पाठविल्या. त्या अश्या. . . . राणीसाहेबांना दरमहा ५०००, गंगाधर राजेंची खाजगी मालमत्ता तो सज्ञान होईपर्यत त्यांच्या ताब्यात, त्यांचे वास्तव्य शहरांतील वाड्यातच राहील. राणीसाहेब व त्यांच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीवर खटले चालवु नये, दत्तकविधानास मान्यता नसल्यामुळे तो कधीही राजा होऊ शकणार नाही परंतु खानदानी संपत्ती त्याला मिळेल. नोकरांना सेवामुक्त केल्या वर त्यांची सहा महिण्याची नुकसान भरपाई राणीसाहेबांना दिल्या जाणार्या पगारातुनच करावी. गंगाधर राजेंनी घेतलेले कर्ज राणींच्या खाजगी मालमत्ते तुन कापुन घ्यावी. एलिसच्या दुताने एका दमात सारे वाचुन दाखवल्यावर तो मटकन खुर्चीत बसल्याबरोबर राणीसाहेब ओरडुन म्हणाल्या, उठ. . . आणि सांग तुझ्या साहेबाला, तुम्ही आमच्या पाठीत सुरी खुपसली, ह्या कोणत्याही अटी, शिफारसी आम्हास मान्य नाहीत. पुर्वीही झाशी स्वतंत्र होती आणि आताही आहे. मैत्रीची साखरपेरणी करत कोरडे ओढले, हे घाव आम्ही व्याजा सकट परत करु.
थोड्या शांत झाल्यावर त्या मोरोपंतांना म्हणाल्या, पिताश्री ! आतां गहन मसलती करुन गनिमी काव्याने यांच्यावर मात करावी लागेल, केवळ खणाखणी केल्याने आपलीच माणसं जाया होतील. अहिल्यादेवींचा आदर्श, संदेश आचरणांत आणावा लागेल. आतां किल्लाही सोडावा लागेल. येथील महाराजांच्या सार्या आठवणी त्यांच्या मनःचक्षुसमोर फेर धरुन नाचत होत्या. मावशी ! स्वामी अल्पायुषी आहेत असे माहित असते तर, त्यांच्याशी आठाचारा च्या गोष्टी केल्या नसत्या. मनूबाई ! दैव कुणाल कळल?खंत कुरवाळत बसायला आतां वेळ नाही. किल्ल्यातील युध्द सामुग्री नष्ट केली जातेय, पेशव्यांच्या काळातील तोफा निकामी करण्यांत येत आहे तिकडे लक्ष द्या.
मावशी ! जेव्हा हे राज्य इंग्रजांकडे चार वर्षे होते तेव्हा स्वामींना इथुन बरुआसागरला हलवलं होतं, २, ५५, ८९१ रु. भरुन तह केला होता. निदान आम्हाला झाशीतच राहु दिले, या मागे नक्कीच कॅप्टन एलिसची सद्भावना असेल, नाहीतर. . .
एलिसच्या बदलीची शिफारस केल्या गेली. जबलपुर, सागरचे डिव्हीजनल कमिशनर मेजर एरस्काईन ची नियुक्ती व एलिसची पन्ना राज्यात दूर बदली केली. तोच गव्हर्नर कोल्विनचा खलिता आला. झाशीवर असलेले ३६००० रु. चे कर्ज राणींच्या भविष्य निर्वाह निधितुन कापुन घ्यावे. राणींनी लगेच लिहून पाठवले, आमच्यावर मोठा आश्रितवर्ग अवलंबुन आहे. आमचं राज्य हडप केलं, कोष ताब्यात घेतला, किल्ला घेतला तर कर्जही तुमच्याकडेच. . . पण त्या राक्षसांवर कांहीही परिणाम झाला नाही. स्कीन आणि गार्डनने धुमाकुळ घातला. कुळदेवी महालक्ष्मीच्या खर्चा साठी असलेली दोन गांवे जप्त केली. नंदादीप, चौघडा बंद झाला.
इंग्रज मांसाहारी असल्यामुळे झाशीत कत्तलखाना उघडण्याचा स्कीनने निर्णय घेतला. इंग्रजांची जुलुम जबरदस्ती घराघरांत गल्लीबोळात, जातीजातीत पसरली. मुद्दाम अपमानित करण्यासाठी मारलेल्या जनावरांची रक्ताने थबथबले ली कातडी रस्त्यावर टाकुं लागले. जनता त्रस्त झाली. राणीसाहेबांकडे रोजच निरनिराळ्या तक्रारी येऊ लागल्या. प्रजा घुसमटत होती. क्रोध, संतापाच्या ठीणग्या उडत होत्या. राणीसाहेब संधीची वाट पाहत होत्या. अशीही दोन वर्षे मनःस्तापात खदखदत निघुन गेली.
दामोदर ७ वर्षाचा झाल्याने त्याच्या मुंजेचा प्रश्न ऐरणीवर आला. मुंजीसाठी लाख रु. ची परवाणगी मागीतली असतां चार प्रतीष्ठीत लोकांची जामीन मागीतली हे द्रव्य दामोदरचे असल्यामुळे तो सज्ञान होईस्तोवर त्यातील पैसा देता येणार नाही असा खलिता आला. जामीनदारांची व्यवस्था करायला मोरोपंत निघुन गेले. राणींचा अशा प्रकारे मानसिक छळ, अन्यायाचे शस्र वापरुन त्यांचे खच्चिकरण करणे सुरु केले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! !
भाग – १७.
शहरातील घनिक. . . बीमावाले, मगन गांधी, मोती खत्री व शाम चौधरी यांनी जामीननामा लिहुन दिल्याने झाशी च्या राणीच्या सन्मानचं रक्षण झालं. पण ह्रदयात बोचलेल्या काट्याचा सल ह्रदया त खुपुन इंग्रजांविषयाचा तिरस्कार प्रजेत वाढत चालला. राणींवरच्या अन्यायाला तर सीमाच नव्हती. दत्तक अमान्य, किल्ला जप्त, एखाद्या भिकार्यास द्यावी तशी पांच हजाराची मामुली निर्वाह निवृत्ती देऊन राणी व तिच्या आरित परीवाराची घोर उपेक्षा केली. केशवपना साठी जात असलेल्या राणीला बंदी, महालक्ष्मीच्या पुजेसाठी असलेले महाल जप्त, गंगाधर राजेंचे कर्ज राणीच्याच तनख्यातुन, दामोदरच्य्या नांवे असलेले पैसे काढण्यास जामीन पत्र, गोहत्या. . या सर्वांसाठी राणीसाहेबांनी वेळोवेळी पत्र व्यवहारही केला, पण इंग्रजांनी साधी दखल न घेता पिसाटासारखे अन्याय करीत, राज्ये, गांवे हडप करीत सुटले. अनेक राज्ये, संस्थाने ब्रिटिश अमलां खाली आले. नवनवीन अस्रेशस्रे, कठोरता दहशत, शिक्षेचे अघोरी प्रकार, शिकार या मुळे प्रजा संतापाच्या आगीत तीळतीळ जळत होती. या अपमानकारक स्थितीचा बदला कधी व कसा घ्यायचा?राणींसाठी सर्वस्वाचा, प्राणांचाही त्याग करण्यात लोकं आतुर होते. पण प्रजेचे हित लक्षात घेतां जे कांही पाऊल उचलायचे ते विचाराने व सबुरीने करायचे होते.
संपुर्ण भारतालाच आग लागली. मुसलमानांनी ज्या सुभेदाराकरवी लढण्यास नकार दिला त्या सुभेदारालाच फासावर लटकवले व चाळीस लोकांना बरखास्त केले. लाहोर राजमार्गावर २५ लोकांना फाशी दिले. छोटासाही विरोध चिरडुन टाकत होते ब्रिटिश. ग्वाल्हेरमधे इंग्रज फौजेत असणार्या देशी शिपायांचा आठ महिण्याचा तनखा न झाल्याची तक्रार करतांच गोळीबार केला त्यांत १६ लोकांचा मृत्यु झाला. गावोगावी फौजा घुसुन गांवकर्यांकडुन कोंबड्या, दुध, धान्य लुटुन नेत, जबरदस्तीने मिशनरी ख्रिश्चन धर्माची दीक्षा देत, शेतच्या शेतं उध्वस्त करुन तेथे बराकी बांधल्या जात. मेरठमधील एका सैन्याने शिस्त मोडली म्हणुन प्रथम चाबकाने फोडुन नंतर त्याला मृत्युदंड दिला. कानपुरच्या बाजारांत घोडागाडीखाली बालक आला तर चालकावर कार्यवाही म्हणुन खाली डोके वर पाय असं बांधल्यामुळे नाका तोंडातुन रक्त येऊन त्याचा मृत्यु झाला. साधी रागीट नजर जरी टाकली तरी फासी होत असे. हमालांवर लाठीमार. . अश्या अनेक घटना. . रक्ताने भिजलेल्या जमीनीतुन कोणतं पीक येणार?अन्याय, अत्याचार व उत्पाताने पिडित, अर्धमेली झालेली भारतमाता आपल्या लेकरांना साद घालत होती.
राणीसाहेब या वार्तांनी पेटुन उठत. १८५७ साल उजाडले. नानासाहेब तात्या टोपेंशी गुप्त खलबते सुरु होती. गुप्तपणे वेगवेगळ्या क्लुप्त्या योजुन, गावोगावी, खेडोपाडी देशासाठी उठाव करण्याचा, लढण्याचा गुप्त संदेश पाठवल्या गेले. एकाचवेळी सगळीकडुन लढाई व्हावी अशी योजना आखण्यांत आली.
तेवढ्यात पेशवे बाजीरांवाकडे धर्म कार्य करणारे रामभटांचे पुतणे विष्णुभट देशाटन करुन सैनिकांतील असंतोषाच्या बातम्या माहित असल्याने मोरोपंत त्यांना घेऊन राणीसाहेबांच्या भेटीस आले. त्या म्हणाल्या कांहीही आडपडदा न ठेवता सत्य कथन करा. विष्णुभट सांगु लागले, विलायतेतुन ज्या बंदुका काडतुस आल्या त्याला गायीची व डुकराची चरबी लावले ली ती काडतुसे दातांनी तोडावि लागते ही वार्ता वायुवेगाने सर्वत्र पसरल्यामुळे हिंदु व मुसलमान अक्षरशः पिसाळलेत. सगळीकडे क्रांतीची भाषा, छावणीतील गोर्यांना कापुन काढावं, आग लावावी, दबल्या आवाजात सर्वीकडे अशीच चर्चा, डाकटपाल लुटुन शिपाई मारले, तारांचे खांब पाडले. ग्वाल्हेरला बायजाबाई शिंदेनीही बहुत सैन्य जमा केले. सारा हिंदुस्थान खवळला. कानपुरात फलटणी जमा झाली, तिथे लढाई झाली. शिंदे कडील लोकांजवळ विषारी गोळे, ते फुटले की तात्काळ डोळे फुटतात व नंतर माणुस मरतो, अश्या फलटणी घेऊन तात्या टोपे गुलसराईला आले. तीन लाखा ची मागीतलेली खंडणी नाकारतांच तात्या टोपेने डंका वाजवला. बंदुकांचे आवाज घुमले. गुलसराईवाल्याचे शिपाई भयभित होऊन पळु लागले. गुलताई बाल्या केशवास बांधुन आणले.
स्वतः नानासाहेब पेशवे, बाळासाहेब, रावसाहेब तोफेस बत्ती देत होते. कानपुर हस्तगत झाले. सारे ब्रम्हवर्तास आल्यापासुन नानासाहेबांकडे गुप्त बैठका सुरु झाल्यात. नबाबांशी इंग्रजांचे कितीही सख्य असले तरी इंग्रज कधीहि उलटु शकतो, या विचाराने तेही भयग्रस्त झाले. इंदौर, ग्वाल्हेर, जोधपुर, जयपुर, कच्छभुज, हैदराबाद, कोल्हापुर, सातारा, इथुनही उठाव होणार अशी आवई उठली. इंग्रजांनी जबर कर बसवल्यामुळे लोकं मेतकुटीस आले. सर्वत्र असंतोष घुसमटत आहे. अशी माहिती विष्णुभटाने दिली. त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यांत आली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – १८.
सकाळी विष्णुभट जाताच दुपारी राणीसाहेबानी विश्वासु अनुचर व सेना नायक असे मोजक्याच लोकांची बैठक बोलावली. राणीसाहेब बोलण्यास सुरुवात करीत म्हणाल्या, माझ्या शूर निष्ठावान जिवलगांनो ! आतां प्राण पणाला लावायची वेळ आली आहे. सगळीकडे स्वातंत्र्यसंग्राम उठाव सुरु झाला. प्रथम इंग्रजांच्या तैनातीत असलेल्या आपल्या देशी सैनिकांना आपलेसे करा. राणीसाहेब ! कॅप्टन स्कीनच्या अधिन असलेलं आपलं ८८१ देशी सैन्य उठावाच्या तयारीत आहेत. आम्ही पण इंग्रजांना अनुकुल असल्याचा बहाणा चालु ठेवत अस्रशस्राना धार लावत आहोत. हरहर महादेव. . जय भवानीच्या गर्जनेत दरबार संपला. इंग्रजांचा स्टारफोर्ट ह्या लहान किल्ल्यावर असलेला दारुगोळा गनिमी काव्याने हल्ला चढवुन ताब्यात घेतल्या वर कॅप्टन डनलाॅपला मोठाच धक्का बसला. तोवर इंग्रजांचे दोन बंगले जळुन खाक केले. मुख्याधीकारी बक्षी अलीने तुरुंगातील सर्व कैदी सोडुन दिले. कार्यालयातील दस्तएवज जाळले. राणीं चा जयघोष करीत हजारो सैनिकांनी किल्ल्यास वेढा घातला. आजपर्यंतचा अपमान, अवहेलना, उपेक्षा राणींवरचे अनेक अन्याय या सुडाने पेटलेले सैनिक कोणालाच आवरेनासे झाले. कांही इंग्रज अधिकारी राणींकडे येत असतां त्यांनाही तुडवले. दिल्लीवरचं इंग्रजी सरकार संपलं मेरठची छावणी जाळली. इंग्रजांना बाहेरुन कोणतीही मदत मिळत नव्हती. त्यांना मदत करणारा यमसदनी जात होता. ७जुनला आत्मसमर्पनार्थ कॅप्टन स्कीनने किल्ल्यावर पांढरे निशाण फडकावले. राणीसाहेबांनी झोकनबागेत आश्रयास त्यांना पाठवले असतां काले खाॅंच्या नेतृत्वाखाली ६४ बायकामुले व कॅप्टन स्कीनला कापुन काढले. ६५ प्रेते झोकनबागेत पडले. बेफान सैनिकांनी प्रजेला लुटु, छळु नये म्हणुन एक लाखाचे दागिने राणींनी त्यांना दिले. सैनिक दिल्ली कडे राणींचा जयजयकार करत निघाले.
शासनव्यवस्था सांभाळण्यासाठी सर्वानुमते राणीसाहेबांना विनंती करण्यात आली. सर्वांची विनंती मान्य करुन राणीसाहेब म्हणाल्या, आम्हाला फक्त एकच खंत इंगज बायकामुलांना मारण्याची. ही परिस्थिती अशीच ठेवण्या साठी गनिमीकाव्याने वागणे भाग आहे. युध्दाचा सरंजाम व किल्ल्यावर तोफा सिध्द ठेवा. आपण पुर्ववत किल्ल्यावर रहावयास जाऊ त्यासाठी वास्तुशुध्दी करुन, महालक्ष्मी मंदिर, गणपती मंदिरांत अभिषेक पुजा, चौघडा, सनई, पुर्ववत सुरु करा. त्याप्रमाणे कमिशनर इरिस्कीनला पत्र जाऊ द्या. झोकनबागेतील शवांचे दफन करण्याची आज्ञा देऊन सभा संपवली.
झाशीवर राणी लक्ष्मीबाईंचे राज्य सुरु झाले. शासनाचे बागदोर आतां राणीं च्या हाती होते. “मेरी झाॅंशी नही दूंगी” अशी गर्जना करत हाती आलेलं राज्य वज्रकठोर होऊन प्राणपणाने सांभाळाय चे होतं. ओरच्छा आणि दतिया राणींवर दात खाऊन असल्यामुळे किल्ला, परकोटांची दुरुस्ती करुन किल्ल्याच्या बुरुजांवर तोफा उभ्या केल्या. नव्या तोफा गोळा बारुद, शस्रे, अस्रे यांचे कारखाने धडाधड चालु झाले. सर्व जाती धर्माच्या लोकांना भेदभाव न ठेवतां सेनेत भरती करण्यांत आले. महिलांचं दल वाढविण्या त आलं. लक्ष्मीबाईच्या दूरदृष्टीचा उदोउदो होत होता. दरम्यान सागरचे कमिशनर इरिस्कीनचे घोषणापत्र आले, जोपर्यत ब्रिटिश अधिकारी व सैन्य झाशीत पोहचत नाही तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई ब्रिटिश सरकारच्या नांवाने शासन सांभाळतील, सर्व वस्तुचे, मालगुजारीचे अधिकार देण्यांत आले. अशी दवंडी नगरात पिटण्यात आली. आणि त्याच वेळी मोजक्या अधिकार्यांसह गुप्त बैठक चालु होती. राणीसाहेब बोलु लागल्या. .
आतां इथे ब्रिटिश कधीच पोहचणार नाही ही काळजी घेऊन अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. फितूरांपासुन सावध राहा. नजरबाज आपले डोळे, त्यांना भरपुर बिदागी द्या. सैन्य मजबुत करा. वसुलीमधे सुट द्या. इंग्रज कधीही उठाव करुं शकतो हे पुरते लक्षात असु द्या. तात्या टोपे, नानासाहेब, रावसाहेब स्वराज्यासाठी लढत आहे. त्यांनी मेरठ, दिल्ली हस्तगत केली. इटावा मैनपुरी, नसीराबाद इथल्या देशी सैन्यांनी इंग्रजांशी असहकार पुकारला. नाना साहेबांनी इंग्रजांचे पाठीराखे असल्याचा अस्सल बहाना केल्याने, परकोट व नबाब गंज इथे असलेल्या खजिण्याच्या रक्षणार्थ व्हिलरने नानासाहेबांना आमंत्रित केले आणि नानासाहेबांनी इंग्रजांना भूलवत खजिन्यावर व दारु गोळ्यावर आपले चौकी पहारे बसविलेत असाच गनिमी कावा आपल्यालाही अनुसरायचे आहे. सावध रहा. बैठक संपली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २५-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! !
भाग – १९.
राणीसाहेबांच्या बोलण्याने प्रत्येक दरबारी भारावुन गेला. शेतकर्यांचा सारा माफ केल्याने त्यांनी आनंदाने पेरण्या केल्या. तात्या टोपेकडुन हेर बातम्या कळवित होते. तोच गंगाधर राजेचे लांबचे चुलतभाऊ सदाशिवरावांनी १६ जुनला अभिषेक करवुन “झाशीके गौरव महाराज सदाशिवराव नारायण” हा किताब घेतला. राणीसाहेबांनी त्वरीत कार्यवाही करुन त्यांना किल्ल्यात बंदी केले. या यशानंतर महत्वाच्या व्यक्तींना मोठमोठे पदे देऊन त्यांचा गौरव केला. महिलांचे सैन्यदल वाढवल. आपल्या सारंगी घोडीच्या पाठीवर स्वार होऊन राणीसाहेब झाशीच्या गल्ली सडकावरुन सैनिकांना, कर्मचार्यांना सूचना, मार्गदर्शन करीत फिरत याचा त्यांना सार्थ अभिमान वाटे. शिपयांना चांगले खायला घालुन स्वतः गुळ लाह्या खाणार्या या वत्सल, कर्तुत्वानवान राणीसाठी सख्या, दरबारी, प्रजा, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी हे सारेच जीवाला जीव देण्यास सज्ज होते.
ओरच्छा आणि दतियातील राज्या च्या मनांत राणींविषयी दरवर्षी ६०००रु. कर, लगान द्यावा लागतो म्हणुन अढी, राग होता त्यामुळे त्यांच्याशी कधीही युध्दास तोंड लागु शकणार होते. राणींनी युध्दाची जय्यत तयारी केली. सारी झाशी तन मन धनाने राणीसाहेबांच्या पाठी ठामपणे उभी होती. त्या स्वतः सैनिकांच्या घरी जाऊन अन्नपाण्याची सोय, शस्राची चौकशी करत आधार देत होत्या. गणपती मंदिरात भोजणासाठी मुक्तदार ठेवण्यात आले. बाणापुरच्या राजाने इंग्रजांशी असहकार पुकारल्यामुळे व आधीच राजाची आणि राणीसाहेबांची बहिण भाऊपणाची आणक्रीया असल्यामुळे, आपली बायका मुले, राणीवसा झाशीत आणुन ठेवुन स्वतःला युध्दात झोकुन दिले. पण इंग्रजांच्या आधुनिक शस्रापुढे टिकाव लागला नाही. बाणापुर इंग्रजांच्या ताब्यात गेले. पराभूत राजे झाशीस येऊन म्हणाले, राणीसाहेब ! आमच्या प्रयत्नाला यश नाही आले.
बंधो ! आपण इथे राहुन किल्ल्या च्या संरक्षणाकडे जातीने लक्ष द्यावे. हे ही आपलेच राज्य आहे. ओरच्छाहुन धमकीचे पत्र आले आहे.
राणीसाहेब ! झाशीहुन, शिंदे सरकारच्या ग्वाल्हेरला जाणारी डाक आमच्या छापेमारांनी पकडली. त्यातील प्रत्येक कागद पाहत असतां, झाशीहुन बेनाम फितूरीचे झाशीराज्य घेण्याबद्दलचे मजकुराचे पत्र मिळाले, तेच सांगायला मुद्दाम इथे आलोय ! राणीसाहेबांनी एवढ्या रात्री ताबडतोब सभा बोलावली. एका ताटात बाण आणि बेलभंडार ठेवले होते. सभेमधे बाणापुरच्या राजाने पत्र वाचन करतांच सर्वांच्या मुखातुन आश्चर्यो द्गार निघाले. आपल्याच सरदारांना शपथ द्यावी लागते केवढे दुर्देव?सर्वांनी बेलभंडार हाती घेऊन झाशीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. बाणेपुरचे राजे त्याच रात्री परिवारास घेऊन वेत्रावतीकडे निघुन गेले. ओरच्छाकडुन आक्रमण होणारची वार्ता रोज वेगाने येत होती.
जुनमधे राणींचं राज्य सुरु झालं, त्याच महिन्याअखेरीस सागरसिंग डाकु खिसनीच्या जंगलात आल्याची खबर मिळाली. त्याच्या सोबतच्या हत्यारी जमाव ठीकठीकाणी दरोडे, लुटालुट, रक्त पात करत असल्यामुळे बरुआसागरची जनता त्रस्त झाली. राणींच्या नजरबाजां नी सागरसिंग किसलीच्या जंगलात लपुन असल्याची खबर आणल्यावर जंगल व डोंगराला राणीने वेढा घातला. वेढा घातले ला पाहुन तो पळुन जाऊ लागल्याबरोबर राणींनी स्रीसैनिकांसह पाठलाग करुन त्याचेवर वार केल्याने तो घोड्यावरुन कोसळताच त्याला बरुआसागरला आणुन कैद केले. राणींचा पराक्रम पाहुन प्रभावित होऊन तो शरण आला व आपल्या सैन्यासह राणींच्या सैन्यात सामिल झाला. राणींच्या पराक्रमाने प्रजा उल्हासीत झाली.
श्रावणी पोर्णिमेला येणार्या भुजरियाच्या मेळाव्याच्या तयारीला प्रजा व्यस्त झाली. सर्व शहर सजुं लागले. मंदिर सजले. नांगर आणि चामर असलेला राणी साहेबांचा झेंडा किल्ल्यावर फडकत होता आणि त्याचवेळी ओरच्छाचा नत्थे खाॅं ससैन्य झाशीकडे निघाल्याची वार्ता मिळाली. राणींनी सर्वांना एकत्रीत करुन, भेदभाव विसरुन नत्थेखाॅंला चोख उत्तर देण्याचे आव्हान केले.
सप्टेंबरमधे नत्थेखांने झाशीला वेढा दिला. झाशीच्या परकोटाचे दरवाजे सख्त बंद असल्यामुळे ओरच्छासैनिकांचे नगरांत घुसण्याचे प्रयत्न वाया गेले. परकोटावरुन झाशीचे सैनिक नत्थेखाॅं च्या सैनिकांवर उकळते पाणी, तेल, पेटते गवत, दगडधोंडे फेकल्याने सैनिक जखमी होऊन पडुं लागले. एका फटक्यात झाशी घेऊ ही नत्थेखांची घमेंड पार उतरली. साधे परकोटाचे दारही उघडुं शकला नाही. झाशी सैनिकांनी छापामार करुन त्या सैनिकांना हैराण केले. ओरच्छा सैनिकांचे मनोबल ढासळले. त्याचवेळी स्रीसैन्यासह राणी मैदानात ऊतरल्या. घनसाम लढाई झाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – २०.
नत्थेखाॅं ऊरलेल्या सैन्यासह कुम्हरी गावच्या आश्रयास पळाला. राणीं नी दरबार भरवुन सर्वांचा सत्कार केला. गोसखाॅं व वजीरखाॅंच्या हातात राणींनी स्वहस्ते सोन्याचे कडे घातले. मृत सैनिकां च्या कुटुंबाला भेटुन त्यांचं सांत्वन व पायाशी द्रव्याच्या राशी ओतणारी, गरीबां साठी अन्नछत्रे, कांबळ्या, कपडे, स्वतःच्या किल्ल्यातील उत्तम वैद्याकरवी शुश्रुषा, शेतसारा माफ करणार्या राणींसाठी लोकांनी प्राणांची बाजी लावली.
इंग्रजांनी सेंट्रल इंडिया फील्ड फोर्स ची स्थापना केली. ह्युमरोज नांवाचा अधिकारी इंग्लडहुन डिसेंबर मधे येत असल्याचे कळल्यामुळे त्वरेने नानासाहेब व तात्या टोपेंकडे मदतीसाठी खलिते पाठविले. दतियातील घरभेदे इस्कीन व एलिसला गुप्त माहिती देत आहे, पळुन गेलेला नत्थेखाॅं इंग्रजांना वार्ता पुरवित आहे, अशातच दोन बहिण्यांच्या पाठीवर मनूबाईला भाऊ झाला. पण आनंद व्यक्त करायलाही अवसर नव्हता.
पिताश्री ! आपण व तानुमावशी कधीही इंग्रजांचे बंदी होऊ शकतां अशा वेळी दामोदरास कोण सांभाळेल?इंग्रजां ची खुप मोठी फौज, नवनवी शस्रे, ह्युज सारखा कसलेला सेनानी, आपला निभाव लागणे कठीन दिसते. माझी एक इच्छा तुम्हा सर्वांना सांगुन ठेवते. . . जर आम्ही धारातिर्थी पडलोच तर आमची काया इंग्रजांच्या हाती. . . .
सर्वांनी अश्रूभरल्या नयनाने बेलभंडार हाती घेऊन, कांहीही झाले तरी आम्ही आपली पाठ सोडणार नाही, अपल्याबरोबर आम्ही पण चितेवर जळुन जाऊ अशी शपथ घेतली.
हा भावी राजा दामोदरला प्राण पणाने सांभाळावे लागेल. पुढे बोलायला वेळ मिळेल ना मिळेल म्हणुन आजच मनांतले तुम्हा सर्वांसमोर बोलुन घेते. राणीसाहेब व त्यांच्या सख्या शस्रविद्येचा
सराव तेजाने करुं लागल्या. बुरुजावर भरपुर दारुगोळ्याचा साठा, तटाजवळ दगडांचे ढीग, उकळते तेल, पाणी, टाकण्या साठी मोठमोठ्या कढया, सरपण, मिरची पुडांनी भरलेली डबे ही सर्व योजना बाहेरुन कुणी तटावर चढलाच तर त्यासाठी तयार ठेवली.
महत्वाच्या सरदार व अधिकार्यांबरोबर रात्रंदिवस मसलती सुरु होत्या. डिसेंबर उजाडला. जबरदस्त सेनापती ह्युरोज सेनेसह सागर आणि राहतगड पर्यंत पोहोचल्याची बातमी आली. गाढाकोटा जिंकुन नारहटच्या घाटीकडुन ललितपुर ला पोहचला असतां, बाणापुरचा राजा मर्दानासिंहाने पराक्रमाची शर्थ करुन ह्युजच्या सैन्यास रोखले. प्रजेच्या काळजीने राणीसाहेबांची झोप उडाली.
एवढ्यात शहराच्या पश्चिमेस असलेल्या साहेबांच्या डेर्यातुन खलिता घेऊन एक स्वार आला. . . . दोन दिवसाच्या आंत सोबत फक्त आठ दरबारी घेऊन निःशस्र येऊन भेटावे, अन्यथा लढाईस सज्ज व्हावे.
सभा भरली. सर्वांनुमते गनिमी काव्याने पत्र पाठवायचे ठरले. आम्ही फक्त स्वसंरक्षणार्थ सैन्य ठेवलय, आपल्याशी लढाईची किंचितही मनिषा नाही अशा आशयाचा खलिता कप्तान साहेबांकडे रवाना झाला. आणि सर्वजण परिणामाची वाट बघू लागले. राणीसाहेबां नी नानासाहेब व तात्या टोपेंना निक्षुन सांगण्यासाठी चार निष्ठावंतांना कालपीस धाडले, आम्ही आपल्या सैन्यबळावरच इंग्रजांशी टक्कर देणार, तेव्हा सर्वांनीच एकत्र येऊन उपराळा झाल्यास आपला विजय निश्चित आहे. कालपीहुन तात्या टोपेचा भरघोस मदतीचा निरोप आला, त्यांनी लिहिले, आपण बालपणापासुनच मर्दानगी दाखवत आहांत. साक्षात रणयोगिनी रणचंडी आहात. आपण आंतुन आणि आम्ही बाहेरुन चढाई करुन इंग्रजांना चेचुन काढुं. मनुबाई ! झाशी तुमचीच आहे व तुमचेच राज्य असेल. पण पंचांगे डोळ्यांत तेल घालुन सावध रहावे. रणांगणी भेटूच !
राणीसाहेबांनी बुरुजावरुन बाहेर नजर टाकली तर सगळीकडे छोटेमोठे तंबु उभारले जात असल्या दिसले. त्या लक्ष्मणरावास म्हणाल्या, अन्नसाठा, घोड्यांना दानापाणी, शस्रांची कोठारे सर्व सज्ज ठेवा. आपला एकएक सैनिक लाख मोलाचा आहे. तेवढ्यात हेराने बातमी आणली की, तात्या टोपेंना कलपीतच झुंझत ठेवण्याची योजना. . . . म्हणजे झाशीस मदत जाणे दुरापास्त, त्या चिंतीत झाल्या पण क्षणभरच ! आणखी सैन्य भरतीचे आदेश दिले, टांकसाळीत चांदी ओतुन सिक्के ठोकुन घ्या. ओंजळीने द्रव्य ओता. सैनिचकांचे मनोबल, धैर्य वाढवा. झाशीत शस्रगारे, तोफखान्यांचे कारखाने, शस्रांना धार लावण्याच्या कार्य शाळा रात्रंदिवस धडधडत होते. घराघरात ल्या बेडगारात द्रव्य, किंमती चिजवस्तु, सोनेचांदी लपवुन व बायकामुलांना इतरत्र सुरक्षित पाठवुन माणसं एकएकटे राहिले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-२-२०२१.






