आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

झाशीची राणी संपूर्ण भाग ३, (११ ते १५)
आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! धगधगती शलाका, इतिहासातील एक पर्व ! स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा ! इंग्रजांचा तनखा खात, त्यांचे पाय चाटत, देशाची माती त्यांच्या स्वाधीन करुन ऐषारामात जगणार्या संस्थापिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी तेजोमयी ज्योत म्हणजे झाशीची राणी !
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
झाशीची राणी
! ! ! झाशीची राणी ! !
भाग – ११.
नवरात्राचे नऊदिवसांचे उपवास नको नको म्हणुन कोणाचेही न ऐकतां राजेंनी केले. झाशीवर येणारी आपत्ती त्यांना स्पष्ट दिसत होती. पेशवांचा तनखा या क्रुर ब्रिटिशांनी बंद केला. दत्तकविधी झाल्यावरही हे सत्ताभिलाषी मान्यता देतील की नाही या काळजीने त्यांची प्रकृती अधिकच खालवत होती. आनंद नेवाळकरास दत्तक घेण्याचे निश्चित झाल्यावर, दत्तकाची तयारी सुरु झाली.
व्हाईसराय डलहौसीने एक जुना कायदा संस्थानिकांच्या डोक्यावर थापला. Doctrine of Laps ! उत्तराधिकाराचा कायदा ! याच कायद्या नुसार कांही राज्ये ब्रिटिशांनी हिसकावुन घेतल्यामुळे सगळे हादरले होते. म्हणुनच दत्तकविधानासाठी मेजर एलिस आणि कॅप्टन मर्टिन यांना खास आमंत्रीत केले. हे दत्तकविधान त्यांच्याच साक्षीने होणे महत्वाचे होते.
अनेक उपचार करुनही महाराजां च्या प्रकृतीत उतार पडत नव्हता. अशाच वातावरणात मंत्रघोषात २० नोव्हेंबरला दत्तकविधान पार पडले. आनंदचे नांव दामोदर ठेवल्या गेले. त्या पांच वर्षाच्या मुलाच्या स्पर्शाने लक्ष्मीबाईचे मन वात्सल्याने व आनंदाने भरुन गेले. राजे अश्रुपुर्ण नेत्रांनी हा सोहळा पाहत होते.
महत्वाच्या लोकांच्या साक्षी झाल्यावरही दत्तक मान्य नाही केला तर, या आशंकेने
एलिस व मालकनला पत्र पाठवुन दत्तक पुत्रास मान्यता देण्याची विनंती केली. राजेंना आपल्या अंतकाळाची कल्पना आल्याने, अडखळत्या शब्दात म्हणाले, झाशी आपल्या सुपुर्द. . . सांभाळा. . . मृत्यु पुढे पुढे सरकत होता. एकतलावावर असलेल्या गृहदेवता महालक्ष्मी मंदिरा जळळच्या कक्षात आणले गेले. क्षीण आवाजात मेजर एलिसला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राणीसाहेब गंगाधर राजेंच्या मृत्युशय्येजवळ मंगळसुत्रांच्या मण्यांवर हात फिरवित गेल्या अकरा वर्षाच्या वैवाहिक जीवनाच्या आठवणीं नी त्यांच्या मनात गर्दी केली. महाराज हेच प्राक्तन आहे असं आधी माहित असतं तर, सारं आपल्या मनासारखं होऊ दिलं असतं. आपल्या व्यसनांवर, दोषांवर रोक टोक केली नसती. आपल्या आनंदातच आनंद मानला असतां, काय सुख मिळालं आपल्याला आमचेकडुन?पुत्र तोही फसवुन गेला. आतां आपणही चाललात. . पण महाराज ! आम्ही जे केलं ते आपल्या ला दुखवण्यासाठी नव्हते तर प्रजेसाठी, राज्यासाठी, ब्रिटिशांना शह देण्यासाठी. . आपल्याला वचन देते की, प्राणांतापर्यंत झाशीचे रक्षण करेन, मरेन तर या राज्या साठी, प्रजेसाठी. . . . या झाशीच्या मातीची रक्ताची शपथ. . . .
२१ तारीख उजाडली. गोदान, स्वर्ण दान, भूमिदान. . . . मोरोपंत, तानुमावशी, दरबारी, छोटी आई, प्रजा, आणि राणी
साहेब भरल्या डोळ्यांनी शेवटचे श्वास मोजत असलेल्या महाराजांना बघत होते अश्रू कुणालाच आवरत नव्हते. अवघ्या ४० वर्षीय गंगाधर राजांच्या मृत्युची दुःखद वार्ता झाशीच्या गल्ली बोळात शिरली. बिठूर, ओहर्ग, दतिया, सागर सर्वी कडे घोडेस्वार रवाना झाले. लक्ष्मीताल सरोवराजवळ चंदनाची चित्ता रचली जात होती. यात्रा निघाली. महाराज अनंता च्या प्रवासाला निघाले. झाशीचे सर्व प्रजाजन, कॅप्टन एलिस, मेजर मार्टिन, डाॅ. एलन फुले उधळत चालले होते. हारांनी भरलेली राजेंची अंतिम पालखी चित्तेवर ठेवली. पांच वर्षाच्या इवल्याशा दामोदरने अग्नि दिला. काल ज्या पित्याच्या मांडीवर बसलो आज त्या पिताश्रींना अग्नि देतांना बालकाला अश्रू अनावर झाले. दामोदरचे नवीन जीवनरोप लावुन राजेंचा वृक्ष उन्मळुन पडला.
राणीसाहेबांना शोक करायलाही अवसर मिळाला नाही. कॅप्टने राजेंच्या मृत्युचे निमित्याने इथल्या राजबंद्यांना मुक्त करुन अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला तर परिणाम गंभीर होईल अशी ताकीद दिली. अंदाजे २॥ लाख असलेल्या खजिन्यावर मेजर एलिस व कॅप्टन मार्टिनने मोहोर ठोकली. किल्ल्या वरच्या सैन्यात वाढ केली. आणि मानभावीपणे लोकांसमोर भाषण देत म्हणाले, इथे कोणीही षडयंत्र, राजकारण करु नये म्हणुन ही व्यवस्था केली.
राणीसाहेबांनी आपल्या विश्वासु लोकांना एकत्रीत करुन म्हणाल्या, आतां चहुअंगे सावध राहण्याची व खात्रीचे नजरबाज नेमुन इंग्रजांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे दत्तकास मान्यता मिळेलच याची शाश्वती नसली तरी झाशीचे रक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत. डोळ्यात तेल घालुन पहारे द्या. घरभेद्यांपासुन सावध रहा. राणीसाहेबांनी दुःखाचे गाठोडे बांधुन तलावात अर्पन केले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! !
भाग – १२.
राणीसाहेबांच्या समाचारास बिठुर हुन नानासाहेब, रावसाहेब पेशवे, तात्या टोपे सारे बंधु आलेत. २२ वर्षाची विधवा बहिण पाहुन त्यांना अतोनात दुःख झाले. पण रडायलाही वेळ नव्हता. लक्ष्मीबाईस सावध करुन धीर धरुन म्हणाले, मनूबाई !
ब्रिटिशांनी किल्ल्यावर फौजेची वाढ, राज कोषावर मोहोर ठोकली. त्यांना केवळ राजसत्ताच नाही तर धर्मावरही आक्रमण करुन अवघा भारत त्यांनी ख्रिस्तीमय करायचा आहे.
मनूबाई ! राजेलोक तसे तेजबुध्दी, पण, ब्रिटिशांच्या मायाजालात गुंतल्याने त्यांची मती निर्बुध्द होते. यांना ब्रिटिशांची बदनेकी कळु नये इतके भ्रष्ट झालेत का तात्या. . . आपसांत भांडणे लावुन स्वतःचा स्वार्थ साधण्यात हे लोक तरबेज ! नबाब अली वर नजर ठेवुन सावध राहावे मनूबाई ! नाना, स्वाभीमानी जनता हेच आमचं पाठबळ ! इथल्या प्रजेला व स्रीयां ना शस्रसज्ज केले. सैन्याच्या आणि शस्रास्राच्या जोरावर संस्थानिक विकत घेतले. अनेक नजरबाजांच्या नेमणुका केल्या. येणार्या वार्ता बर्या नाहीत. अशा परिस्थीतीत आम्हाला सल्ला देण्यासाठी व आपत्तीतुन मार्ग काढण्यासाठी आपण सर्व बंधु सतत इथे येत राहावे.
राणींसाहेबांच्या डोळ्यातुन अश्रू ऐवजी धगधगते अग्निकुंड बघुन नानादी सार्यांना समाधान वाटले. मनूबाईने सतर्क, जागृत रहावे म्हणुन ते म्हणाले, ब्रिटिश तुझं राज्य घशात घालायला टपुन बसलेत. दत्तकास मंजुरी मिळेलसे वाटत नाही. घरभेद्यांपासुन सावध रहा. तिन्ही बंधुना निरोप देतांना राणींना फारच जड गेले. नजरबाजांकडुन रोज बातम्या येत होत्या. ब्रिगेडियर पारसन कडुन चार पलटणी ग्वाल्हेरला पाठवल्या जात आहे कडेरच्या किल्ल्यावरही पहारे वाढवले. डेरिनो, लो, आणि हाॅलीके या तिन्ही गव्हर्नरकडे दत्तकाविरुध्द मत नोंदवले गेले. बिठुरचे पेशवे, कर्नातकचे नबाब, तंजावरचे राजे, यांच्या मृत्युनंतर त्यांची वार्षिकप्राप्ती बंद करुन वारसहक्क नाकारले. अश्या डलहौसीकडुन न्याय मिळणे अशक्यच !
शिवरामभाऊंचे काका सदाशिवपंत यांचे पणतू कृष्णराव आणि गंगाधररावचे जातभाईचे पुत्र सदाशिवराव यांनीही झाशीवर अधिकार सांगुन तसे पत्र एलिसला पाठवले. एलिसनाच फक्त राणी चेच दत्तक मान्य होते बाकी सारे विरोधात. कॅप्टन ठामपणे राणीच्या पाठी उभे असल्यामुळे कृष्णराव व सदाशिवचे दावे अमान्य केले पण डलहौसीला सामाज्यपिपासा अनावर असल्याने त्याने दत्तक अमान्य केले. या सर्व बाबींनी राणी भयभीत झाल्यात पण, क्षणभरच !
राणींनी एकीकडे शहरात तालिम खाने, शस्रनिर्मिती, सैनिक प्रशिक्षण सुरु होते तर दुसरीकडे वेगवेगळे कागदोपत्री पुरावे गोळा करुन भारताचे गव्हर्नर डलहौसीस विसृत विनंतीवजा पुराव्या सहित पत्र पाठवले. पत्रात लिहिले १८४३ साली माझे पती गंगाधररावांना ऋणग्रस्त
राज्याचे अधिकार प्राप्त झाल्याच्या बदल्यात ब्रिटिश फौजेचा खर्च २५५८९१ रुपये आणि दुलिया, तालगंज सारखे कांही जिल्हे ब्रिटीश सरकारला देण्यात आले. कर्नल श् लिमने(Shlim)जुन्या अटींचा स्विकार केला. इंग्रज शासनकर्त्यां नी आमच्या घराण्याशी चिरस्थायी मैत्री आहे. मेजर एलिस व कॅप्टन मार्टिन यांच्या साक्षीने चि. दामोदरास विधिपूर्वक दत्तक घेतले आहे. बुंदेलखंडातील उदाहरणे समोर ठेवुन या दत्तकविधानास व दामोदरास झाशीराज्याचे उत्तराधिकारी म्हणुन मान्यता द्यावी.
बुंदेलखंडातील निपुत्रीक राजांच्या मृत्युनंतर त्यांच्या दत्तकपुत्रास मान्यता दिलेली आहे, इथे तर माझे पती गंगाधर राजेंनी जिवंतपणी मेजर ऐलिस व कॅप्टन मार्टिनच्या साक्षिने विधिपुर्वक दत्तविधान करुन पुत्रास दत्तक घेतले आहे. तरी या दत्तकास मान्यता देऊन आपले मैत्री दृढ करावे असा विनंती अर्ज रवाना केला.
संतापाने व अगतिकतेने खदखदत होत्या. सुंदर, मुंदर, शामा, झलकारी, काशी ह्या सार्या त्यांच्या सतत अवतीभवती असत. आमचेच राज्य हिसकावुन धनी होऊन बसलेत ही माकडं ! आमच्या डेर्या चे फक्त दांडे राहीलेत. आम्ही कांही फक्त बांगड्या भरुनच बसलो नाही तर इथेही सेना सज्ज आहेत. आम्ही मरणाला भीत नाही. महाराजांना शब्द दिलाय, शपथ घेतली, मरेन तर झाशीसाठी, जगेन तर झाशीसाठीच ! तुम्हीसगळ्या तयार आहात ना?सगळ्या एकसुरात उत्तरल्या आमचं ऊर्वरित आयुष्य व अवघं जिवन मरण फक्त आपल्या पायाशीच ! आमच्या ही तलवारीचं तेजाळलं पाणी दाखवुटच !
क्रमशः
संकलन व©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-२-२०२१.
! ! झाशीची राणी ! ! !
भाग – १३.
कलकत्त्याच्या नजरबाजाने खबर आणली की, तीन दिवसांपासुन डलहौसीसाहेब तीन सहकार्यांसोबत कागदपत्रत्रे तपासुन निष्कर्ष काढला की, झाशी आम्ही सांभाळत आहोत व पुढेही आम्हीच सांभाळु असा त्यांच्या चर्चेचा सूर. . . एकाएकी दत्तक घेण्यामागे काय योजना असावी?बालक अल्पवयीन असल्यामुळे राज्याचा उत्तराधिकारी होऊ शकत नाही आणि राणी स्री असल्यामुळे
राज्यकारभार चालवण्यास असमर्थ. . तेव्हा प्रजाजनांचे हित लक्षात घेतां, झाशी राज्य ब्रिटिशांच्या अधिन असनेच हितकारक ठरेल, राणीसाहेब सुखात राहतील एवढे वेतन दिल्या जाईल.
वार्ता ऐकुन राणीसाहेबांच्या डोळ्यातुन फुल्लिंग उडत होते. इंग्रज आम्हास समजतात काय खुळे की दुबळे इथे घराघरांत शस्रसज्ज माणसं आहेत. यांनी मोठी फौज ठेवुन आमचे महाल ताब्यात घेत सुटले. इतके दिवस एलिस साहेबांनी साखरपेरणी करुन वेळ निभावत नेली. आतां आमचाही पीळ बघा म्हणावं ! दत्तक नामंजुर केला तर तलवारीस तलवार भिडेल. राणीसाहेबांचा आवेश पाहुन सारे दरबारी थक्क झाले. ही राणी साधी नाही तर कडकडणारी विद्युल्लता, साक्षात कालीमाताच ! केवळ २२ वर्षाची. . . सर्वांनी मनोमन शपथ घेतली, आपण सर्व शक्तीनिशी राणीला साथ देऊ. . .
राणीसाहेबांनी सर्वांना आव्हान केले, आपण सारे शूर, कर्तबगार मर्द आहात, आपल्या शौर्याची, निष्ठेची, आपले श्रध्दास्थान असलेल्या बेलदुर्वाची सर्वानी आण घ्यावी. तोच उत्स्फुर्तपणे गर्जना झाली राणी साहेबांचा विजय असो. . . हर हर महादेव. . . . हर हर महादेव. . . आतां खलित्याची वाट बघणे इतकेच हाती होते राणींनी भरोश्याच्या माणसांची शिबंदी ठेवली. स्री पुरुष सर्वच शस्र बाळगु लागली. सतर्क लोकांची ये. . जा. . दुःखाला निग्रहाने दूर लोटुन राणीसाहेब स्तंभा सारख्या खंबीरपणे ताठ उभ्या राहिल्या.
मार्च महिना उजाडला. किल्ल्यावर सर्वीकडे अस्वस्थता. . सणावारात कुणालाच रस नव्हता. मोरोपंत, तानु मावशी, दरबारी मंडळी सगळे किल्ल्या च्या संरक्षणार्थ योजना करण्यांत मग्न होते. नजरबाजांच्या रोज नवनवीन वार्ता येतच होत्या.
एलिससाहेबांची सहानुभुती राणी कडे असल्यामुळे व त्यांना राणींच्या कर्तुत्वाची, मुत्सद्दीपणाचा अभिमान असल्याने, दत्तकास मंजुरी मिळण्याच्या दृष्टीने सारा पत्रव्यवहार, राणीच्या बाजुचे मैत्रीचे पुरावे डलहौसीला पाठवले, परंतु ज्यांना स्वच्छ, निर्मळ, पवित्र मैत्री स्री पुरुषात असु शकते ही जाणीवच नसल्या ने एलिसच्या झाशीप्रेमाने इंग्रज आश्चर्यात पडले. अशाच एका दुष्ट लेखकाने “The Rane” उर्फ राणी या नावाची कादंबरी लिहुन गंगाधर, लक्ष्मी आणि एलिसलाच शेक्सपिअर करुन या तीन पात्रांची विकृत कथा रंगवली होती. त्यात लक्ष्मीबाईंना स्वैरिणी, हिंसक चारित्र्यहिन दाखवण्याचा असभ्य प्रयत्न केला होता. झाशीच्य्या राणीबद्दल ब्रिटिशांमधे दूषित दृष्टीचा प्रसार व एलिस बद्दल डलहौसी व इतर अधिकार्यांच्या मनांत संशय उत्पन्न करण्याच्याच हेतूने हा हीन प्रयोग केला गेला. परंतु सुदैवाने व राणींच्या उज्वल, उदात्त आणि पवित्र तेजाने ही भाकड कथा कोठेही लोकप्रिय, प्रसिध्द झाली नाही. राणीसाहेबांना या कांदबरीचा प्रचंड धक्का बसला पण त्यातुनच त्या खंबीर पणे सावरल्या.
नजरबाज भयंकर पेटुन उठले होते, ते म्हणाले, राणीसाहेब ! आपण फक्त आज्ञा द्या. या लेखकाची जीभ हासडुन त्याची होळी करतो. त्यांना समजावत म्हणाल्या, या कादंबरी विषयी ऐकुन आम्ही सुन्न झालोत. स्री हा नेहमीच चर्चेचा विषय, त्यातही ज्या स्रीला अघटीतपणे कांही विपरित कार्य करावे लागले तर तीच्या दुर्देवाला अंतच नसतो. तिच्या चारित्र्यावर गलिच्छ शितोंडे उडवुन चारीत्र्य बाजारी मांडुन लिलाव करावा, कुलटेचा शिक्का मारावा ही तर जनरीत. कुळकिर्ती, कुळरीत, धर्मकर्तव्ये जपत व याचबरोबर प्रजाकर्तव्य, देशकार्य आमच्या माथी आल्याने या भाकडकथेने खचुन जाऊन अस्वस्थ होण्याचे कांहीही कारण नाही. त्याची होळी केल्याने दुषित रोपे पाणी न घालतां मरु द्यावी. जाळली तर दुषित धूर आपल्याला बाधतो. तो लेखक व त्याची ती चोपडी आपोआपच, परंतु त्या मनोमनी अत्यंत व्यथित झाल्या. एलिसच्या सद्भावनेला असं विकृत रुप दिल्याने व इतरांना कळल्यास सर्वत्र आगडोंब उसळुन, दत्तकास मान्यता न द्यायला निमित्यच होईल म्हणुन, मनाला समजावत त्या शांत बसल्या.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! !
भाग – १४.
झाशीचे प्रधानमंत्री राधारामचंद्र चौकशी करायला एलिसकडे येऊन म्हणाले, राणीसाहेब अस्वस्थ असुन अन्न पाणीही त्यांना जात नाही. सतत आपल्या निर्णयाची वाट बघत आहेत. प्रधानसाहेब मीही मान्यतापत्राची आतुरतेने वाट बघत आहो. मला जेवढे शक्य तेवढे प्रयत्न केले आहे व करत आहे. भारतीय राज्यांचा दत्तक अधिकार इस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरर्सनी नऊ नंबरच्या डिस्पॅचच्या १६ व १७ परिच्छेदानुसार उघडपणे स्विकृत केला आहे. आभार मानुन व नमस्कार करुन प्रधानमंत्री किल्ल्याकडे रवाना झाले. अन् त्याचवेळी गव्हर्नर डलहौसीचे पत्र हाती पडले. पत्र वाचता वाचता एलिसचा चेहरा काळवंडला. झाशीवर अन्याय होत होता व एलिस कांहीच करुं शकत नव्हते याचेच त्यांना जास्त दुःख, खेद वाटत होते
पत्रात स्पष्ट लिहिले होते की, टेहरी, ओरछा जसे स्वतंत्र राज्य आहेत तसे झाशी राज्य कधीही नव्हते. रामचंद्रांनी कांही वर्षे राज्य केले, परंतु त्याच्या विधवा पत्नीने घेतलेला दत्तक राजनैतिक कारणास्तव अवैध ठरवला होता. आतांही न्यायसंग उत्तराधिकारी नसल्यामुळे झाशी राज्य ब्रिटिश साम्राजात सामील करुन घेऊन तसा अमंल बसवावा. ब्रिटिश अधिकृत जिल्ह्यांच्या मध्यभागी झाशी असल्या मुळे तिथुन बुंदेलखंडावर राज्य करणे शासनव्यवस्था अधिक उन्नत व सुनियंत्रित करणे शक्य होईल. राणी साहेबांस उचित वार्षिक तनखा दिल्या जाईल. या पत्रासोबतच मालकन साहेबांनी एलिसला घोषपत्राद्वारे सुचना दिल्या. झाशीच्या सैनिकांना दोन महिन्या चे वेतन देऊन सेवामुक्त करावे. कर्मचार्यांना शक्यतोवर त्याच कामावर राहु द्यावे. झाशीमधे तीन व कडेरामधे दोन कंपनी सैन्य ठेवावे. झाशीत सिंधिया काॅंटिजेंटची सहावी संपुर्ण तुकडी ठेवावी. सीपरीचे कॅप्टन हॅन्सी ५०० सैनिक, दोन तोफा व घोडदळाची तुकडी घेऊन येतील. झाशीच्या संरक्षणार्थ हेन्सिचे सैन्य, इन्फेंट्रीची पुर्ण तुकडी, अश्व दल, तोफा राहतील. राणीसाहेबांच्या निर्वाहभत्याचा निर्णय योग्यवेळी कळवला जाईल. झाशीचा दत्तकनामा अस्विकार करण्यांत येत आहे. झाशीचे राज्य ब्रिटिश भारतात सामील केले आहे.
मेजर एलिस हे झाशीचे शासक म्हणुन नियुक्त केले. झाशीची जनता आतां ब्रिटिशांच्या अधिन आहे. आणि शासक म्हणुन कॅप्टन एलिस. . .
ऐलिस हे पत्र वाचुन अतोनात दुःखी झाला. झाशीचे राज्य बळकावणे हा राणी वर उघड उघड अन्याय होता. त्याला मिळालेले अधिकारच त्याला टोचत होते. पण तोही हुकुमाचा ताबेदार ! हा खलिता दरबारात पोहचविण्याचे कडु काम त्याच्यामाथी आले होते. कर्तव्य तर पार पाडणे भाग होते. झाशीच्या संघर्ष पर्वास सुरुवात होणार होती. तसा निरोप एलिसने किल्ल्यावर पाठवला.
दुसरा दिवस उजाडला. काय होणार दरबारात?काय आहे झाशीच्या नशीबी?सगळेजण अस्वस्थ होते. मनुबाई मोरोपंतांना म्हणाल्या, पिताजी ! आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढु पण माझी झाशी कदापी देणार नाही. आम्हास पुढील प्रांंत बरा दिसत नाही. नजरबाजां च्या वार्ता बर्या नाहीत. इंग्रजांची रक्त पिपासा घाव घालुन नष्ट करण्याच्या योजना तयार कराव्या लागतील. राणींना संताप आवरत नव्हता. सारा दरबार सजवुन सुसज्य, सुंगधमय करण्यांत आला. राणी लक्ष्मीबाईंनीसुध्दा माफक श्रृंगार करुन पांढरी शुभ्र साडी पांढर्या कपाळावर पांढरा चंदनी टिळा त्यांच्या वैधव्याची दुःखद आठवण देत होती. दामोदरास जवळ घेऊन राणीसाहेब पडद्याआड बसल्या.
दरबार भरला. सेवकवर्ग अस्वस्थ पणे कामं करीत होते. उत्सुकता, हुरहुरतेने सगळेजणं कॅप्टन एलिसची वाट बघत होते. आणि जड अंतःकरणाने, जिन्याच्या पायर्या चढतांना एलिसचे हातपाय गळुन गेले. गव्हर्नरचे आज्ञापत्र वाचून दाखवण्याचे कडु कार्य त्याला अतिशय जड वाटत होते. झाशीचे मिळालेल्या विशेष अधिकाराचा त्याला बिलकुलच आनंद वाटत नव्हता. आज आपल्या कडुन फार मोठा अन्याय होणार याच भावाने ग्रस्त मटकन आपल्या आसनावर बसला. सर्वांनी आपापले आसन ग्रहण केल्यावर दरबार सुरु झाला.
एलिस गव्हर्नरचा खलिता वाचत होता. आणि सारा दरबार थक्क होऊन ऐकत होते. एकएक कलम म्हणजे जणुं शब्दांचे बाॅंब गोळेच होते. राणीसाहेबांच्या लक्षात आले की, आपण मेहनत घेऊन १५-२० दिवस अभ्यासपुर्ण माहिती गोळा करुन दत्तकमान्यतेसाठी दिलेले पुराव्यासाठी दिलेली माहिती व्यर्थ गेली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – १५.
गव्हर्नरचे आज्ञापत्र ऐकुन राणी साहेबांचा चेहरा धगधगत होता. डोळ्यात अंगार पेटला होता. संतापाने त्या म्हणाल्या, एलिस हे काय केलेस?तुम्ही ब्रिटिश स्वतःस काय समजता?आमचच खाऊन आम्हालाच देशोधडीला लावतां? गोड बोलुन गळ्यावर सुरी चालवता?अनेक महाल घशात घालुनही समाधान होत नाही?एकएक कलम म्हणजे अन्यायाची परिसीमाच ! अहो एलिस ! तुमच्याच तर साक्षीने दत्तकविधान झाले होते ना?आमचे राज्य बेवारस झाले असे कसे म्हणुं शकतां?सलामाईची भाषा करुन उलटलात एलिस आपण ! दरबारी लोक संतापाने उभे राहिले. एलिसभोवती इंग्रजी सशस्र सैनिक उभी होती. कापर्या आवाजात शेवटचे कलम वाचु लागला. . . आठवे कलम. . . या सर्व कारणांनी राणी साहेबांचा दत्तकनामा अस्विकार झाला. झाशी राज्य ब्रिटिश भारतात सामिल केले गेले. कॅप्टन एलिस झाशीचे शासक म्हणुन नियुक्त झाले. यापुढे झाशीचे राज्य आणि जनता ब्रिटिशांच्या अधिन आहे.
ऐलिसने हे वेदनामय वाचन कसे बसे पुर्ण करुन दुःखाने म्हणाला, राणी साहेब ! क्षमा करा ! दरबार सुन्न झाला. तोच पडद्याआडुन गगनभेदी आवाजांत राणी साहेब गर्जल्या. . . मै मेरी झाॅंशी नही दूंगी ! माझी झाशी कालत्रयी देणार नाही. . . कदापी नाही. . . कदापी नाही. . . .
महाराणीच्या गर्जनेने सगळा दरबार थरकला. एलिसला ब्रिटिश सैन्याने संरक्षणात बाहेर काढले. मोरोपंतांच्या हाती जाहीरनामा फडफडत होता. त्या चवताळुन बाहेर येऊन जाहीरनाम्याचे तुकडे तुकडे केले. दामोदरला छातीशी कवटाळुन ओरडल्या. . . हा या राज्याचा वारस आहे. बघतेच कोण अन् कसं नामंजूर करते. अरे एलिस, नामर्द माणसा आतां तुमच्याबरोबर संघर्ष चालु झाला. संध्याकाळी दरबार भरवण्याची आज्ञा देऊन आपल्या कक्षाकडे निघाल्या. तानु मावशी व इतरजण त्यांच्या मागुन. . . . त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि राणींच्या डोळ्यात होता फक्त अंगार. . ठिणग्या. . . संताप. . .
प्रजेवर जणुं वज्राघात झाला. ठीक ठीकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला. सगळीकडे दहशतीचे वातावरण ! शहरभर दवंडी पिटुन झाशी ब्रिटिश साम्राजात विलिन झाल्याची घोषणा करण्यांत आली. राणींचा जयजयकार करीत किल्ल्याकडे निघालेल्या प्रजेवर चाबुक ओढल्या गेले. त्यांना कैद करण्याचा सपाटा लावला. तहसील कचेरीत जाहिर नाम्याच्या प्रति पाठवण्यांत आल्या. जहागिरीवर जप्ती आणण्याचे काम आतां एलिसपुढे होते. वसुलीचा आकडा काढणे, जहागिरदारांच्या याद्या करणे ही महत्वाची कामे एलिसला उरकावयाची होती. या कामाला त्याने सुरुवातही केली. परंतु, राणीसाहेबांविषयी त्याला खुप आदर होता, त्यांना त्रास होऊ नये या भावनेपोटी राणीसाहेबांचा तनखा, दागिने जडजवाहीर, कर्जाचा हिशोब या बद्दलचा विचार अत्यंत सहानुभुतिपुर्वक व्हावा अशा आशयाच्या सुचना त्याने गव्हर्नर कडे पाठविल्या. त्यांना भरपूर तनखा, सन्मानाची वागणुक मिळावी यासाठी एलिस प्रयत्नशील होता.
त्यानंतरचे दिवस म्हणजे रोज मरणा ला सामोरे जाण्याइतके दुःखद होते. किल्ल्यावर ब्रिटिशांची गस्त बघणे जड जात होते. राजे गंगाधरांच्या नाट्यशाळे तील सर्व चिजवस्तु एका खोलीत बंदिस्त झालेले त्यांना बघवत नव्हते. तानुमावशी ! हेच जर दैवात आहे हे जर आधी माहित असतं तर आम्ही स्वामींना दुखवलं नसतं मनूबाई ! त्यावेळी योग्य तेच केलय ! आतां त्या दुःखापेक्षा इतर दुःखे. . . . .
मावशी आमच्याच सैनिकांना आम्हाला बोलावतां येणार नाही. त्यांची शस्रास्र, गणवेश जमा करण्याचा हुकुम मिळाल्यावर काल आम्हास भेटण्यास आल्यावर, त्यांना धीर देत म्हटले, हे वाईट दिवसही जातील. आम्ही स्वस्थ बसणार नाही. पण सध्या चढाई करणे म्हणजे जाणुनबुजुन आगीत उडी टाकण्यासारखे होईल. वेळ आली की, आपल्या तलवारी चे पाणी दाखवु, क्षोम करु नये. नगारा चामराचं चिन्ह असणारा ध्वज ऊतरवुन तिथे युनियन जॅक लावला गेला तेव्हा आमचा जीव किती कासावीस झाला असेल?आम्ही हाक देऊ तेव्हा मात्र नक्की या. यावर सर्वजन एका आवाजात म्हणाले, आपणासाठीच जगणार, हे प्राण आपल्यासाठीच गहाण आहे. इंग्रजांना कापण्यासाठी हात फुरफुरत आहेत. कोणत्याही क्षणी बोलवा. . .
बिठूरची मंडळी त्यांच्या विवंचनेत, त्यांचाही आठ लाखाचा निर्वाह भत्ता नामंजुर झाला. गेल्या चार वर्षाचे ३२ लाख देतो म्हणुन तोंडाला पाणं पुसलीत. सगळी कागद घेऊन विलायतेला गेलेला अजिमुल्ला हात हलवत परत आला, पण रशियाशी झालेल्या युध्दात फ्रांस व इंग्रज पराभूत झाल्याची वार्ता मात्र घेऊन आला, म्हणजे इंग्रजसुध्दा पराभूत होऊ शकतात ही वार्ताच प्ररणादायक होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-२-२०२१.






