“३ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २५६९ ते २५८० चे पारायण आपण करणार आहोत.
३ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी ७६ ते १००,
76-14
पैल खांबु का पुरुखु । ऐसा निश्चयो नाही एकु । परी काय नेणो आलोकु । दिसत असे ॥76॥
पलीकडे दिसत आहे तो खांब आहे की पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही, परंतु काय भास होतो तेही कळत नाही,
77-14
तेवी वस्तु जैसी असे । तैसी कीर न दिसे । परी काही अनारिसे । देखिजेना ॥77॥
त्याप्रमाणे आत्म्याचे निवळ स्वरूप ज्या वेळी खरोखर दिसत नाही, व दुसरी काही वस्तू आहे, असाही निश्चय होत नाही.
78-14
ना राती ना तेज । ते संधि जेवी सांज । तेवी विरुद्ध ना निज । ज्ञान आथी ॥78॥
रात्र नाही व दिवसही नाही त्या वेळेला जशी सांजवेळ म्हणतात, त्याप्रमाणे ज्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते व स्वरूपज्ञानही नसते केवळ अज्ञान असते.
79-14
ऐसी कोण्ही एकी दशा । तिये वादु अज्ञान ऐसा । तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नाम ॥79॥
अशी कोणी एक अवस्था आहे, तिला अज्ञान असे म्हणतात. आणि त्या अज्ञानाने गुंडाळलेला जो चित्प्रकाश आहे त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे.
80-14
अज्ञान थोरिये आणिजे । आपणपे तरी नेणिजे । ते रूप जाणिजे । क्षेत्रज्ञाचे ॥80॥
आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव सांगतात) अज्ञानास महत्व आणावे आणि आपल्या स्वरूपाला तर जाणू नये ते क्षेत्रज्ञाचे स्वरूप समजावे.
81-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
हाचि उभय योगु । बुझे बापा चांगु । सत्तेचा नैसर्गु । स्वभावो हा ॥81॥
हाच क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबंध आहे. तो तू बाबा चांगला समज. हा अज्ञानाशी संबंध असणे हा सत्तेचा सामान्य चैतन्याचा सहज स्वभाव आहे.
82-14
आता अज्ञानासारिखे । वस्तु आपणपाचि देखे । परी रूपे अनेके । नेणो कोणे ॥82॥
आता वस्तू आपण आपल्यालाच अज्ञानाप्रमाणे म्हणजे दृश्यत्वाने व नाना तर्हेने पहातो, परंतु किती अनेक रूपांनी पहाते ते कळत नाही.
83-14
जैसा रंकु भ्रमला । म्हणे जा रे मी रावो आला । का मूर्च्छितु गेला । स्वर्गलोका ॥83॥
जसा एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्री मनुष्य म्हणतो की जा रे, ‘मी राजा आलो आहे ” , अथवा जसा एखादा मूर्च्छा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गास गेलो आहोत असे मानतो,
84-14
तेवी लचकलिया दिठी । मग देखणे जे जे उठी । तया नाम सृष्टी । मीचि विये पै गा ॥84॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मांडले जाते त्याचेच ना व मी सृष्टी प्रसवतो.
85-14
जैसे का स्वप्नमोहा । तो एकाकी देखे बहुवा । तोचि पाडु आत्मया । स्मरणेवीण असे ॥85॥
ज्याप्रमाणे एकटा निजलेला पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थरूपाने पहावा (पाहिला जातो) तीच स्थिती आत्म्याची (आपल्या स्वरूपाच्या) स्मरणावाचून आहे.
86-14
हेचि आनीभ्रांती । प्रमेय उपलवू पुढती । परी तू प्रतीती । याचि घे पा ॥86॥
परंतु हे सर्व मी सृष्टीला प्रसवतो वगैरे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, ही दृढ प्रतीती आत ठेऊन तू ऐक
87-14.
तरी माझी हे गृहिणी । अनादि तरुणी । अनिर्वाच्यगुणी । अविद्या हे ॥87॥
तरी ही माया माझी विवाहित स्त्री असून, आद्यंतरहित, तरूण, अलौकिक व गुणवान आहे.
88-14
इये नाही हेचि रूप । ठाणे हे अति उमप । हे निद्रिता समीप । चेता दुरी ॥88॥
हिला वस्तुत: अस्तित्व नाही, हेच हिचे स्वरूप आहे. ही अविद्या स्वरूपी निजलेल्यांना जवळ आहे व स्वरूपी जागे असलेल्यांना दूर आहे,
89-14
पै माझेनिचि आंगे । पहुढल्या हे जागे । आणि सत्तासंभोगे । गुर्विणी होय ॥89॥
परंतु मी स्वत: झोपलो म्हणजे ही जागृत असते (स्वरूपज्ञानाच्या गैरहजेरीत अविद्येच्या गमज्या चालतात). माझ्या सदत्वाचा आश्रय उपयोगात आणून (उपभोगून) ही (ब्रह्मांडे पोटात साठवलेली) मोठी गरोदर होते.
90-14
महद्ब्रह्मउदरी । प्रकृती आठै विकारी । गर्भाची करी । पेलोवेली ॥90॥
महद्ब्रह्म आपल्या उदरात प्राकृत आठ विकारांनी जगद्रूप गर्भाची वाढ करते.
91-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
उभयसंगु पहिले । बुद्धितत्त्वे प्रसवले । बुद्धितत्त्व भारैले । होय मन ॥91॥
उभयतांच्या (माझ्या व मायेच्या) संगात प्रथम बुद्धी तत्व जन्मास आले, ते बुद्धी तत्व (रजोगुणाने) भारले गेले, म्हणजे मन तयार होते.
92-14
तरुणी ममता मनाची । ते अहंकार तत्त्व रची । तेणे महाभूतांची । अभिव्यक्ति होय ॥92॥
मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकारतत्व तयार करते व त्यायोगाने पंचमहाभूते स्पष्ट दशेस येतात.
93-14
आणि विषयेंद्रिया गौसी । स्वभावे तव भूतांसी । म्हणौनि येती सरिसी । तियेही रूपा ॥93॥
अणि विषय व इंद्रिये यांचा स्वभावत:च पंचमहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळे विषय व इंद्रिये देखील त्या भूतांबरोबरच आकारास येतात.
94-14
जालेनि विकारक्षोभे । पाठी त्रिगुणाचे उभे । तेव्हा ये वासनागर्भे । ठायेठावो ॥94॥
पंचभूते, विषय व इंद्रिये ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्मप्रकृतीपासून उत्पन्न झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो. त्यावेळी वासनेत सूक्ष्मरूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे, तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो
95-14
रुखाचा आवांका । जैसी बीजकणिका । जीवी बांधे उदका भेटतखेवो ॥95॥
ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाण्याला भेटल्याबरोबर आपल्यामधे वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो.
96-14
तैसी माझेनि संगे । अविद्या नाना जगे । आर घेवो लागे । आणियाची ॥96॥
त्याप्रमाणे माझ्या संगाने अविद्या ही अनेक जगरूपी अणकुचीदार अंकुर घेऊ लागते.
97-14
मग गर्भगोळा तया । कैसे रूप तै ये आया । ते परियेसे राया । सुजनांचिया ॥97॥
हे सुजनाच्या राजा अर्जुना, त्यावेळी मग त्या गर्भगोलाचा आकार कसा व्यक्त होतो ते ऐक.
98-14
पै मणिज स्वेदज । उद्भिज जारज । उमटती सहज । अवयव हे ॥98॥
तेव्हा अंडज, स्वेदज, उद्भिज व जरायुज असे हे अवयव स्वभावत: उमटतात.
99-14
व्योमवायुवशे । वाढलेनि गर्भरसे । मणिजु उससे । अवयव तो ॥99॥
मणीज हा अवयव आकाश व वायू यांच्या योगाने गर्भरस वाढाल्याने जीवन पावतो.
100-14
पोटी सूनि तमरजे । आगळिका तोय तेजे । उठिता निफजे । स्वेदजु गा ॥100॥
तम व रज हे दोन गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता, निश्चयेकरून स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो.
दिवस २१५ वा. ३, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५६९ ते २५८०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २५६९
काय मज एवढा भार । हे वेव्हार चालवाया ॥१॥
उकल तो जाणे धणी । मज भोजनी कारण ॥धृपद॥
चिंता ज्याची तया शिरी । लेंकरी ते खेळावे ॥२॥
तुका म्हणे शेवट झाला । देव या बोला भोगिता ॥३॥
अर्थ
प्रपंचातील येवढा भार चालवण्याची मला काय गरज आहे ? प्रपंचाची सर्व काळजी करण्याचे काम माझ्या धन्याचे आहे माझे केवळ भोजनासी कार्य आहे. ज्याची चिंता असेल ती त्याच्या माथ्यावर असो लेकराने केवळ खेळण्याचा आनंद घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात आता सर्व कर्ता भोक्ता देवच आहे यामुळे अधिक बोलायचे काही उरलेच नाही म्हणजे बोलण्याचा शेवट झाला आहे.
अभंग क्र. २५७०
एकांती लोकाती करू गदारोळ । लेश तो ही मळ नाही येथे ॥१॥
घ्यावे द्यावे आह्मी आपुलिया सत्ता । न देखो पुसता दुजा कोणी ॥धृपद॥
भांडाराची किल्ली माझे हाती आहे । पाहिजे तो पाहे वान येथे ॥२॥
तुका म्हणे आम्हा विश्वासाच्या बळे । ठेविले मोकळे देवे येथे ॥३॥
अर्थ
आम्ही एकातात असो किंवा लोकातात असो हरिनामाचा गजर आम्ही करू त्याविषयी आमच्या मनात कोणत्याही प्रकारची लाज किंवा किंतू येत नाही. आम्ही परमार्थाची देवाण-घेवाण आमच्या सत्तेने करत आहोत त्याबद्दल आम्हाला कोणीही काहीच विचारत नाही परमार्थाच्या भांडाराची किल्लीच माझ्या हातात आहे ज्याला जो माल पाहिजे आहे तो येथे उपलब्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच बळावर त्यांनी आम्हाला या भांडारखाण्यात मोकळे सोडले आहे आणि या भांडारखाण्यातला माल ही मी लागेल तेवढा ज्याला हवा आहे त्याला देत असतो.
अभंग क्र. २५७१
स्मरणाचे वेळे । व्हावे सावध न कळे ॥१॥
पडिलो विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसे काढी ॥धृपद॥
भांडवल माझे । वेच झाले भूमी ओझे ॥२॥
तुका म्हणे कळे । तूचि धावे ऐसे वेळे ॥३॥
अर्थ
हरी चिंतन करताना किंवा स्मरण करताना सावध व्हावे हे मला कळत नाही. मी विषय आवडींच्या प्रवाहामध्ये पडलो आहे या मधून मला बाहेर कोणी काढेल असे मला दिसत नाही. माझे मुख्य भांडवल म्हणजे मन होते बुद्धी होती आणि आता त्या बुद्धीचा उपयोग नको त्या ठिकाणी मी केला तेथे माझा या भांडवलाचा खर्च झाला त्यामुळे मी आता भूमीला ओझे म्हणून राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तूच एक अशा वेळी धावून येणार आहेस हे मला कळले आहे.
अभंग क्र. २५७२
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचिते ॥१॥
एक नाही एका ऐसे । दावी कैसे शुद्ध हीन ॥धृपद॥
पंचभूते एकी राशी । सूत्रे कैसी खेळवी ॥२॥
तुका म्हणे जे जे जाती । त्याची स्थिति तैशी ते ॥३॥
अर्थ
देवा पहा हे लोक आपल्या संचित कर्मानुसार भिन्न भिन्न देहामध्ये जन्माला आले आहे. देवा आहो हे एकसारखे नाहीत काही शुध्द आहेत, तर काही हीन आहेत, काही चांगले, तर काही वाईट आहेत याचा अर्थ असा की यांचे पूर्वकर्मच हे प्रकार दाखवत आहेत. सर्व देह एका पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत परंतु सर्वाचे पूर्व संचित हे भिन्न भिन्न आहेत आणि ते कसे ओळखावे ते तुम्हीच सांगा ? तुकाराम महाराज म्हणतात जो जन्म आणि कर्मानुसार ज्या जातीचा असतो त्याची स्थिती देखील तशीच असते.
अभंग क्र. २५७३
कोणाचिया न पडो छंदा । गोविंदासी आळवू ॥१॥
बहुतांची बहु मते । अवघे रिते पोकळ ॥धृपद॥
घटापटा डहुळी मन । होय सीण न करू ते ॥२॥
तुका म्हणे पांडुरंग । भरू भाग आला तो ॥३॥
अर्थ
आम्ही कोणाच्याही छंदात पडणार नाही केवळ गोविंदाला आम्ही नेहमी आळवू. खूप लोकांची खूप मते आहेत परंतु ती कोणताही अनुभव नसताना केवळ पोकळ असून मोकळी आहेत. घट आणि पट या विचाराने मन ढवळले जाते त्यामुळे ज्याने शीण होईल असे आम्ही काही करणारच नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या वाटेला पांडुरंगाचा एक धर्म भाग आलेला आहे तोच आम्ही आमच्या हृदयात धरू आणि साठवण करून ठेऊ.
अभंग क्र. २५७४
एकवेळ करी या दुःखावेगळे । दुरिताचे जाळे उगवूनि ॥१॥
आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥धृपद॥
बहु दूरवरी भोगविले भोगा । आता पांडुरंगा सोडवावे ॥२॥
तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओवाळूनि सांडी मस्तक हे ॥३॥
अर्थ
देवा माझ्या पातकांचे जाळे एकदाचे तोडून टाका आणि मला या दुःखातून मुक्त करा. हे पांडुरंगा रात्रंदिवस तुझ्याच पायाचे मी चिंतन करील आणि हाच माझा नवस आहे. हे पांडुरंगा मी आज पर्यंत खूप दुःखाचे भोग भोगले आहेत आता तुम्ही मला यातून सोडवावे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी माझ्या शरीराची कुरवंडी करून तुझ्यावरून ओवाळून टाकीन माझे मस्तक देखील तुझ्या वरून ओवाळून टाकेल.
अभंग क्र. २५७५
आणीक म्या कोणा यावे काकुळती । कोण कामा येती अंतकाळी ॥१॥
तू वो माझी सखी येसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहे ॥धृपद॥
काया वाचा मने हेचि आस करी । पाउले गोजिरी चिंतीतसे ॥२॥
तुका म्हणे माझी पुरवी हे आस । घाली ब्रम्हरस भोजन हे ॥३॥
अर्थ
अर्थ:–हे देवा आता तुझ्याशिवाय मी कोणास काकुळतीस येऊ, कोणास शरण जाऊ कारण अंतकाळात माझ्या मदतीला तुझ्याखेरीज कोण धावून येईल, माझ्या शेवटच्या क्षणी माझी कोण सोडवणूक करेल ? हे पांडुरंगा तू माझी सखी आहेस, माझी जिवाभावाची मैत्रीण आहेस, तू लवकर माझ्या हाकेला धावून ये, मी तुझी वाट पाहत आहे. माझे मन काया वाचा सकट तुझ्या पाउलांची आस लावून बसले आहेत, तुझ्या गोजिऱ्या पायाचे सतत ते चिंतन करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा, हे विठ्ठला कृपा करून माझी ही आस, माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करावीत व माझ्या मुखी ब्रम्हरस रुपी भोजन घालून मला धन्य करावेत.
अभंग क्र. २५७६
आम्हा सकळा हे । तुझ्या नामाचेचि बळ ॥१॥
करू अमृताचे पान । दुजे नेणो काही आन ॥धृपद॥
जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुझे पायी माझा हेवा ॥३॥
अर्थ
हे देवा, हे पांडुरंगा आमच्यासारख्या हरिभक्तांकडे फक्त आणि फक्त तुझ्या नामाचेच काय ते बळ आहे, अन्य आमच्याकडे विसंबण्यासारखे काहीही नाही, सतत तुझ्या अमृतरूपी नामाचे सेवन करणे एवढेच काय ते आम्ही जाणतो, अन्य आम्हास काहीही माहित नाही. ह्या व्यतिरिक्त ज्याचा ज्याचा जो काही भोग आहे ते तो सुख, दुःख पीडा आणि रोग रूपाने भोगतच असतो म्हणेजच शरीर हे प्रारब्धानुसार त्याचे त्याचे भोग भोगतच राहणार, त्याच्या वाट्याला येणारे सुख दुःख त्याला घेत राहावे लागणार. तुकाराम महाराज म्हणतात परंतु मला मात्र तुझ्या पायाची ओढ लागली आहे, माझ्या मनाने त्याचा ध्यास घेतला आहे, त्यापायी माझा हेवा वाढतच चालला आहे.
अभंग क्र. २५७७
आर्त माझ्या बहु पोटी । व्हावी भेटी पायाची ॥१॥
यासी तुम्ही कृपावंता । माझी चिंता असो द्या ॥ ध्रु. ॥
तळमळ करी चित्त । अखंडित योगे ॥२॥
तुका म्हणे पढंरिनाथा । जाणे व्यथा अंतरिची ॥३॥
अर्थ
हे पंढरीनाथा तुझ्या पायाची भेट व्हावी हीच तीव्र इच्छा माझ्या पोटी आहे. हे कृपावंता देवा माझी इच्छा आहे त्याविषयी तुम्ही कृपा असो द्यावी. देवा माझे चित्त तुझ्या वियोगामध्ये अखंडित तळमळत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा माझ्या अंतरीची व्यथा तुम्ही जाणून घ्यावे.
अभंग क्र. २५७८
बहु जन्मांतरे फेरे । केले येरे सोडवी ॥१॥
आळवितो करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥धृपद॥
वाहवतो मायापुरी । येथे करी कुढावा ॥२॥
तुका म्हणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥३॥
अर्थ
देवा मी आजवर खूप जन्मामध्ये फिरलो आहे आता तू ये आणि मला यातून मुक्त कर. हे करुणाकरा विश्वंभरा दयाळा मी तुला आळवित आहे. देवा मी मायेच्या पुरात वाहत चाललो आहे तरी तू माझे रक्षण कर. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या वाचून दुसरा कोण माझे दुःख निवारण करणार आहे.
अभंग क्र. २५७९
कराल ते काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावे बोला बोबडिया ॥१॥
सोडवूनि घ्यावे काळचक्रा हाती । बहुत विपत्ती भोगविल्या ॥धृपद॥
ज्याले जेऊ नेदी मारिलेचि मरो । प्रारब्धा ते उरे मागुताले ॥२॥
तुका म्हणे दुजा खुंटला उपाय । म्हणऊनि पाय आठविले ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला तुम्ही ठरवले तर काय एक करू शकत नाही आता तरी माझ्या बोबड्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. देवा तुम्ही मला कालचक्राच्या हातातून सोडून न्या कारण मी खूप विपत्ती आजपर्यंत भोगल्या आहेत. माझे प्रारब्ध मला सुखानेही जगू देत नाही आणि मेलो तरीही ते मला पुन्हा जन्माला घालतेच आणि एवढे करूनही ते थांबत नाही तर मला त्रास देण्याकरता ते मागे राहतेच. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता या जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त होण्याकरता इतर सर्व उपाय खुंटले आहेत म्हणूनच मी तुझ्या पायाची आठवण केली आहे.
अभंग क्र. २५८०
डौरलो भक्तीसुखे । सेवू अमृत हे मुखे ॥१॥
संतसंगे सारू काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥धृपद॥
ब्रह्मादिकासी शिराणी । तो हा आनंद मेदिनी ॥२॥
नाही वैकुंठीचा पाग । धावे कथे पांडुरंग ॥३॥
मुक्त व्हावे काशासाठी । कैची येणे रसे तुटी ॥४॥
तुका म्हणे गोड । हेचि पुरे माझे कोड ॥५॥
अर्थ
मी भक्ती सुखाने डौरवलो आहे आता नामामृत हे मुखाने सेवन करू. संत संगती मध्ये सर्व काळ घालु कारण तेथे प्रेम सुखाचा कल्लोळ आहे. जो आनंदा ब्रम्हादिक देवांनाही प्राप्त होत नाही तो भक्ती सुखाचा आनंद आम्ही पृथ्वीवर मिळवतो आम्हाला तो मिळतो. पांडुरंगाला वैकुंठाची आवडला नाही तो कधीही इकडे धाव घेत असतो. मुक्त तरी कशासाठी व्हावे कारण भक्ती रसामध्ये आनंदाची तूट आहे तरी कुठे ? तुकाराम महाराज म्हणतात भक्तीरस हा अतिशय गोड असून तेथे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

