“२३ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २३ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २३ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २८०९ ते २८२० चे पारायण आपण करणार आहोत.
२३ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी १५१ ते १७५
151-15
स्त्री पुरुष नपुंसके । हे व्यक्तिभेदांचे टके । आंदोळती आंगिके । विकारभारे ॥151॥
स्त्री, पुत्र व नंपुसक हे भेदात्मक आकाराचे घोस असलेल्या कामादिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आदळतात.
152-15
जैसा वर्षाकाळु गगनी । पाल्हेजे नवघनी । तैसे आकारजात अज्ञानी । वेली जाय ॥152॥
ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामधे नव्या नव्या मेघांच्या रूपाने दिसु लागतो. त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी जगातील विविध आकारमात्राचा वेल पसरतो.
153-15
मग शाखांचेनि आंगभारे । लवोनि गुंफिती परस्परे । गुणक्षोभाचे वारे । उदयजती ॥153॥
मग शाखेच्या स्वाभाविक ओझ्याने त्या शाखा आपआपल्या अंगभाराने खाली लवून एकमेकांमधे गुंततात व हे सर्व ञिगुणरुपी वाहु लागल्याने होत असते.
154-15
तेथ तेणे अचाटे । गुणांचेनि झडझडाटे । तिही ठायी हा फाटे । ऊर्ध्वमूळ ॥154॥
ते गुण अती वाढल्यामुळे त्या ऊर्ध्वमूलाच्या वृक्षास खाली, वर व मध्ये असे तीन भेद तयार होऊन फाटे फुटतात.
155-15
ऐसा रजाचिया झुळुका । झडाडिता आगळिका । मनुष्यजाती शाखा । थोरावती ॥155॥
रजोगुणाचा वारा वहात असताना होणारी वाढ रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्यजातीरूपी फांद्या जोराने वाढतात.
156-15
तिया ऊर्ध्वी ना अधी । माझारीचि कोंदाकोंदी । आड फुटती खांदी । चतुर्वर्णांच्या ॥156॥
त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन, त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात.
157-15
तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचे अभिनव । पालव डोलती बरव । नीच नवे ॥157॥
विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते.
158-15
अर्थु कामु पसरे । अग्रवने घेती थारे । तेथ क्षणिके पदांतरे । इहभोगाची ॥158॥
ज्याप्रमाने मनामध्ये अर्ध आणि कामाचा विस्तार होऊ लागतो. इहलोकात क्षणभंगुर असलेल्या जिवनास सुखाचे कोंभ फुटु लागतात.
159-15
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभे । खांकरेजती शुभाशुभे । नानाकर्मांचे खांबे । नेणो किती ॥159॥
️त्य़ावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेकानेक शुभ आणि अशुभ कर्मांचे फाटे किती फुटतात हे कळत नाही.
160-15
तेवीचि भोगक्षीणे मागिले । पडती देहातींची बुडसळे । तव पुढा वाढी पेले । नवेया देहांची ॥160॥
त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की मागची देहरुपी सुकलेली जुनी बुडे पडुन जातात. तोच पुन्हा पुढे नव्या देहाच्या नव्या सालीच्या शाखा तयार होऊन वाढु लागतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-15
आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगे हवावे । विषयपल्लव नवे । नीत्य होती ॥161॥
ज्याप्रमाने त्या संसारवृक्षाला मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आवड तयार करणारे आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दादिक विषयरूप पालवी ती नेहेमीच नवनव्याने तयार होत असते.
162-15
ऐसे रजोवाते प्रचंडे । मनुष्यशाखांचे मांदोडे । वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु ॥162॥
याप्रमाणे रजोगुणाचा प्रचंड वारा सुटल्यावर मनुष्यशाखांचे समुदाय जेव्हा तयार होतात. त्यास या संसारवृक्षाचे ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रघात आहे.
163-15
तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा । मग वाजो लागे घोरा । तमाचा तो ॥163॥
तमोगुणाचा वारा वहात असतांना होणारी वाढ) त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वहाण्याचा बंद होतो तेव्हा तमोगुणाचा भयंकर वारा वहाण्यास लागतो.
164-15
तेधवा याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधी देखा । पाल्हेजती डाहाळिका । कुकर्माचिया ॥164॥
तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्यरूपी शाखांना भोगाची निच वासना जेव्हा उत्पन्न होते. तेव्हा त्याच वाईट कर्माच्या डहाळ्या विस्ताराला पावतात असे समज.
165-15
अप्रवृत्तीचे खणुवाळे । कोंभ निघती सरळे । घेत पान पालव डाळे । प्रमादाची ॥165॥
ज्याप्रमाने वाईट मार्गाचे बळकट सरळ फोक निघुन (मनुष्यरूपी शाखेला) प्रमादरूपी पाने व फांद्या उत्पन्न करीत फुटतात.
166-15
बोलती निषेधनियमे । जिया ऋचा यजुःसामे । तो पाला तया घुमे । टकेयावरी ॥166॥
यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे (अमूक आहेत असे) सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर फुटु लागतो.
167-15
प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तिही पानी घेती प्रसार । वासना वेली ॥167॥
दुसर्याच्या नाशाकरता जारण, मारण स्तंभन, मोहन, , उच्चाटन, वशीकरण इत्यादी प्रतिपादन करणारी अविचाररुपी कर्मे आगम ग्रंथांनी सांगितलेली आहेत.
ती करण्याची ‘इच्छारुपी’ पानाची वेल विस्तार पावु लागते.
168-15
तव तव होती थोराडे । अकर्मांची तळबुडे । आणि जन्मशाखा पुढे पुढे । घेती धाव ॥168॥
मागील ओवीत सांगितल्या प्रमाणे जो जो वासना वेली विस्तारतात तो तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे वाढत जातात. अर्थात श्रेष्ठ योनीतून नीच योनीच्या जन्मास प्राप्त होतात.
169-15
तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फाटा । जाळ पडे कर्मभ्रष्टा । भुलोनिया ॥169॥
तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादि निकृष्ट पाप योनीरूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते.
170-15
पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥170॥
ज्याप्रमाने जसजसा अधर्माची वाढ होऊ लागेल तसतसे पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, साप ह्या आडव्या शाखांचे समुदाय विस्तार पावु लागतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-15
परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगीहि नित्य नवा । निरयभोग यावा । फळाचा तो ॥171॥
परंतु अर्जुना, (तमोगुणाच्या उत्कर्षात) अशा या मनुष्यशाखांना सर्व अंगांचे ठिकाणी नित्य नवी नरकभोग हीच फलाची प्राप्ती होते.
172-15
आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगे धुर धुरी । जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥172॥
आणि तेथे हिंसा व मैथुन ह्या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्मांची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादि निषिद्ध कर्मांचे अंकूर अनेक जन्मातून वाढतच असतात.
173-15
ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण । इया खांदिया तेवी जाण । फळेही हेची ॥173॥
(ज्या माणसांमधे तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे) ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस गवत, लोखंड, माती, दगड अशा जड योनीत जातात. येथे शाखा तरी ह्याच आणि फळे तरी हीच.
174-15
अर्जुना गा अवधारी । मनुष्यालागोनि इया परी । वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची ॥174॥
(मनुष्यरूपी डहाळ्या ह्या खालच्या शाखांची मुळे आहेत. ) अर्जुना, ऐक. याप्रमाणे या संसारवृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते.
175-15
म्हणौनि जी मनुष्यडाळे । तिये जाणावी अधीचि मूळे । जे एथूनि हा पघळे । संसारतरु ॥175॥
म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत, ह्याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे. कारण की मग तेथून संसारवृक्ष विस्ताराला पावतो.
दिवस २३५ वा. २३, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २८०९ ते २८२०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २८०९
लावूनिया गोठी । चुकवू आदरिली दिठी । देऊनिया मिठी । पळे महिया माथुले ॥१॥
पुढे तेची करी आड । तिचा लोभ तिसी नाड । उरवी चरफड । हात गोउनी पळावे ॥ध्रु॥
आधी काकुलती । मोहो घालावापुढती । तोंडी पडे माती । फिरता मग कैचां तो ॥२॥
तुका म्हणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावे का हे सेवा । सुखे तुम्हा नार्पीती ॥३॥
अर्थ
कृष्णाने एके दिवशी गोपीकांच्या सोबत बसून त्यांना थोडयाशा गप्पा गोष्टीमध्ये रंगवून त्यांची नजर चुकवण्यास सुरवात केली. नंतर त्याने गोपीकांच्या अंगावर गुपचूप झडप घालून त्यांच्या दह्यादुधाचे मटकेच घेऊन पळून गेला. त्याच गवळणीला पुढे दह्यादुधाचा लोभच तिला आडवा येऊ लागला व मोक्षाला तो मोह आडवा झाला. मग भगवंताने या श्रीकृष्णाने तिचे हात सारखे कामात गुंतवून ठेवले आणि तिच्या मागे चरफड करणेच बाकी ठेवून देव तेथून पळून गेले. आधी काकूळतीला यावे, मग संसाराचा मोह पुढे घालावे. मग त्यांच्या तोंडात माती पडते, एकदा की त्याच्यापासून (देव) ते मागे फिरले पुन्हा संसाराच्या मोहात पडले तर तो त्यांना कसा मिळणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा यांचा हेवाच यांना रडवित असतो. देवा तुम्हाला या गोपीका सुखाने दही दूध लोणी सेवा म्हणून का अर्पण करीत नाहीत. ”
अभंग क्र. २८१०
आर्तभूता द्यावे दान । खरे पुण्य त्या नावे ॥१॥
होणार ते सुखे घडो । लाभ जोडो महाबुद्धी ॥धृपद॥
सत्य संकल्पचे साठी । उजळा पोटी रविबिंब ॥२॥
तुका म्हणे मनी वाव । शुद्ध भाव राखावा ॥३॥
अर्थ
ज्याला ज्या गोष्टीची खरोखर गरज आहे ती गोष्ट त्याला दान म्हणून दयावी हेच खरे दान आणि हेच खरे पुण्य आहे. जर आपण दान केले तर त्यानंतर आपले काय होणार असेल ते सुखाने होऊ दयावे त्याविषयी चिंता करु नये परंतू मोठया बुध्दीने होणाऱ्या पुण्याचा लाभ जोडून घ्यावा. सत्य संकल्पासाठी आपल्या पोटामध्ये विवेकरुपी सूर्याचा उजेड होऊ दयावा. तुकाराम महाराज म्हणतात, “आपल्या मनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टीला वाव असू दयावे आणि मनामध्ये गुरु वेद आणि हरी याविषयी शुध्द भक्तीभाव राखावा. ”
अभंग क्र. २८११
कवतुकवाणी बोलतसे लाडे । आरुष वाकडे करुनि मुख ॥१॥
दुजेपणी भाव नाही हे आशंका । जननीबाळकामध्ये भेद ॥धृपद॥
सलगी दुरूनि जवळी पाचारू । धावोनिया करू अंगसंग ॥२॥
धरूनि पालव मागतो भातुके । आवडीचे निके प्रेमसुख ॥३॥
तुका म्हणे तुज आमचीच गोडी । ऐसी हे आवडी कळो आली ॥४॥
अर्थ
आम्ही आमच्या विठाबाईबरोबर कौतुकाने लाडाने तोंड वाकडे करुन बोबडे बोल बोलत आहोत. कारण आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजेपणा भेदभाव आणि शंका कुशंका नाहीत मायलेकरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसतोच. बाळ मातेला सलगीने लांबून हाक मारते ती जर जवळ आली नाही तर स्वत: सलगीने जवळ जाऊन तिला मिठी मारते. ते बाळ मातेचा पदर धरुन तिला हवा तो खाऊ मागतो आणि आवडीचे प्रेमसुख तो भोगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुला देखील आमचीच गोडी आहे आणि तुझी ही आवड आम्हाला आता कळून आली आहे. ”
अभंग क्र. २८१२
ऐक पांडुरंगा वचन माझे एक । झालो मी सेवक दास तुझा ॥१॥
कळे तैसा आता करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढे ॥धृपद॥
दंभ मान माझा करू पाहे घात । झालिया ही थीत कारणाचा ॥२॥
हीन बुद्धी माझी अधम हे याती । अहंकार चित्ती वसो पाहे ॥३॥
तुका म्हणे मज बिघडता क्षण । नलगे जतन करी देवा ॥४॥
अर्थ
हे पाडूरंगा माझे एक बोलणे तू ऐक ते म्हणजे असे की मी तुझा अन्न्यसेवक दास झालो आहे. देवा आता तुला जसा कळेल तसा माझा उध्दार कर यापुढे माझा विचारच खुंटला आहे. मी कोणतेही कार्य केले आणि ते पूर्ण झाले तर मला त्याचा अभिमान आणि दंभ होत आहे आणि अभिमान व दंभ हेच माझा घात करण्यासाठी टपलेले आहेत. माझी बुध्दी हीन आहे माझी जात देखील अधम आहे तरी देखील अहंकार माझ्या चित्तात वास्ताव्या करण्याचे पाहात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला बिघडण्यासाठी एक क्षण देखील लागणार नाही त्यामुळे तुम्ही माझे जतन करावे असे मला वाटते. ”
अभंग क्र. २८१३
जेणे माझे चित्त राहे तुझ्या पायी । अखंड ते देई प्रेमसुख ॥१॥
देहभाव राखा दीन करूनिया । जनाचारी वाया जाय तैसा ॥धृपद॥
द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशी गोडी प्रपंचाची ॥२॥
तुझे नाम माझे धरूनिया चित्त । एकांत लोकात सदा राहो ॥३॥
तुका म्हणे तुझे जडोनिया पायी । झालो उतराईं पांडुरंगा ॥४॥
अर्थ
देवा जेणेकरुन माझे चित्त तुझ्या पायाशी राहील असेच अखंड प्रेमसुख तुम्ही मला दयावे. देवा माझा देहभाव तू अतिशय दीन करुन टाक, की ज्यामुळे चार लोकांमध्ये मी काहीही उपयोगीला राहणार नाही तसेच तू माझे करुन टाक. देवा मला द्रव्य घरदार हे काहीही नको आहे मला मानसन्मानाची देखील आवड राहिली नाही आणि प्रपंचाविषयी कोणत्याही गोष्टीची मला गोडी राहिली नाही. देवा माझ्या चित्तामध्ये तुझे एक नामच धरुन राहिल असू दयावे मग ते एकातात असो किंवा लोकातात असो सदा तुझे नामच माझ्या चित्तात राहू दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा मी तुझ्या पायाशी जडून राहीलो आहे आणि तुझ्या उपकारातून उतराई झालो आहे. ”
अभंग क्र. २८१४
काय सांगो आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥
काय द्यावे त्यासी व्हावे उतराईं । ठेविता हा पायी जीव थोडा ॥धृपद॥
सहज बोलणे हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥
तुका म्हणे वत्स धेनुवेचा चित्ती । तैसे मज येती सांभाळीत ॥३॥
अर्थ
या संतांचे उपकार काय सांगावेत ते मला नेहमी धर्म भक्तीज्ञान वैराग्य आणि स्वत:चे हित कशात आहे याविषयी नेहमी जागृती करुन देतात. अशा प्रकारचा अगाध उपकार संतांनी माझ्यावर केला आहे आणि त्या बदल्यात काय दयावे आणि त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण हे मला काही कळत नाही माझा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी तो देखील त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी थोडाच आहे. संत सहज जरी बोलले तरी तो आपल्या हिताचा उपदेश ठरतो आणि संत स्वत: सायास करुन आपल्याला शिकवत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “जसे गाईच्या चित्तामध्ये सारखे तिचे वासरुच असते त्याप्रमाणे संतांच्या चित्तामध्ये सारखे मीच आहे आणि माझा सांभाळ करण्यासाठी संत देखील त्या गाईप्रमाणेच माझ्याकडे येतात. ”
अभंग क्र. २८१५
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हासी वेव्हारा पात्र केले ॥१॥
काय झाले तरी नेघा तुम्ही भार । आणीक कोणा थोर म्हणो सांगा ॥धृपद॥
पंच भूते तव चर्माचिया मोटा । येथे खरा खोटा कोण भाव ॥२॥
तुका म्हणे नाही बोलावया जागा । का देवा वाउगा श्रम करू ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही सर्वाच्या बुध्दीमध्ये संचार करता आणि सर्व जगाला चालवता तुम्ही सर्व जगाचे चालक आहात आम्ही केवळ व्यवहार करण्यासाठी निमित्त आहोत. देवा काय झाले म्हणून तुम्ही आमच्या योगक्षेमाचा भार तुमच्या खांदयावर घेत नाही आणि मी तुमच्यावाचून दुसऱ्या कुणाला श्रेष्ठ म्हणू ? पंचमहाभूतांना श्रेष्ठ म्हणावे तर पंचमहाभूते हे कातडयाच्या मोटेत बांधलेली आहेत. मग तेथे खरा किंवा खोटा असा निवाडा कसा काय करता येईल ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मी तुम्हाला बोलण्यासाठी कोणती जागाच ठेवली नाही त्यामुळे विविध प्रकारचे प्रश्न विचारुन मी का बरे स्वत:ला कष्ट करुन घेऊ. ”
अभंग क्र. २८१६
एका एक वर्मे लावूनिया अंगी । ठेवितो प्रसंगी सांभाळीत ॥१॥
नेघावा जी तुम्ही वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥धृपद॥
वेव्हारे आले ते समानचि हाते । बळ नाही येथे चालो येत ॥२॥
तुका म्हणे आता निवाडाच साठी । संवसारे तुटी करुनि ठेलो ॥३॥
अर्थ
देवा तुमचे व आमचे एकेक वर्म मी जसेच्या तसेच तुमच्या अंगी ठेवीन आणि प्रसंगी त्याचा सांभाळ करुन संतांपुढे ते सांगेन. देवा तुम्ही जास्त फार अवकाश धरुन आमच्यापासून अंतर ठेवून राहू नका. देवा व्यवहार कोणताही असो जेथे जो नियम आहे तो सर्वाना समानच असतो. मग तो जीवन जगण्याचा व्यवहार असो किंवा व्यवहारामधील असो तेथे सर्वाना सारखाच नियम असतो तेथे कोणाचेही काही बळ चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता काय तो निवाडा करा माझा उध्दार करा या निवाडयासाठीच मी माझ्या सर्व संसाराची तूट म्हणजे नुकसान करुन ठेवली आहे. ”
अभंग क्र. २८१७
आता येथे खरे । नये फिरता माघारे ॥१॥
होय तैसी हो आबाळी । देहनिमित्य या बळी ॥धृपद॥
तुम्हासवे गाठी । देवा जीवाचिये साठी ॥२॥
तुका नव्हे लंड । करू चौघांमध्ये खंड ॥३॥
अर्थ
देवा आम्ही आता संसाराची तूट म्हणजे नुकसान करुन घेतली आहे केवळ आमच्या उध्दारासाठी आता आम्हाला मागे फिरता येणार नाही. आता जशी आबाळी व्हायची तशी होऊ दया या आबाळीला केवळ निमित्ताने देहबळी दिला तरी हरकत नाही. देवा आम्ही आमचा जीवच समर्पण केला आहे केवळ तुमची गाठ पडावी म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आपल्या दोघामध्ये कोण लबाड आहे कोण खोटारडा आहे याचा चारचौघांमध्येच निवाडा करु. ”
अभंग क्र. २८१८
का हो वाढविता देवा । मज घरी समजावा । केवढा हो गोवा । फार केले थोड्याचे ॥१॥
ठेविन पायावरी डोई । यासी तुमचे वेचे काईं । झालो उतराईं । जाणा एकएकाचे ॥धृपद॥
निवाड आपणियांपाशी । असोनका व्हावे अपेसी । होती गाठी तैसी । सोडूनिया ठेविली ॥२॥
तुका म्हणे गोड । होते झालिया निवाड । दर्शने ही चाड । आवडीच वाढेल ॥३॥
अर्थ
देवा आपल्या दोघामध्ये कोण लबाड आहे याचा चारचौघांमध्ये निवाडा करायचा एवढे वाढवण्यापेक्षा मला घरच्या घरीच समजवा. अहो देवा गोष्ट किती थोडी होती परंतू तुम्ही त्याला फारच मोठी केली. मी माझे मस्तक तुमच्या पायावर ठेवीन मग त्यामध्ये तुमचे काही नुकसान आहे काय ? देवा अहो मी तुमच्या पायावर माझे मस्तक ठेवीन आणि तुम्ही माझ्यावर कृपा करा मग आपण दोघेही एकमेकांच्या ऋणातून मुक्त होऊ सोपी गोष्ट आहे. देवा हे पाहा आपल्या दोघाच्याहीमध्ये जो वाद आहे त्याचा निवाडा देखील आपल्याजवळच आहे मग चारचौघांमध्ये आपला वाद घेऊन आपला अपयश का दाखवायचे. देवा जे काही माझ्या पदरामध्ये माझे म्हणणे होते मी सर्व तुमच्यापाशी ते सोडून मोकळे केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आपल्या दोघाच्यामध्ये असणारा वादाचा निवाडा जर घरच्या घरी झाला तरच ते गोड ठरेल. देवा मला तुमच्या दर्शनाची आवड आहे आणि तुम्ही मला जर दर्शन दिले तर मला तुमची आवड अधिकच वाढेल. ”
अभंग क्र. २८१९
नव्हो सभाधीट । समोर बोलायाचे नीट । एकली एकट । दुजे नाही देखिले ॥१॥
आता अवघे तुम्ही जाणा । तुमचे माझे नारायणा । येईल करुणा । तेचि पहा तुम्हासी ॥धृपद॥
ताळ नाही माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आता वेळ कधी । कोण्या जन्मे निवाड ॥२॥
आता शेवटीचे । उत्तर ते हेचि साचे । शरण आले त्याचे । तुका म्हणे सांभाळा ॥३॥
अर्थ
देवा एकदमच तुमच्यासमोर नीट येऊन बोलणे एवढे आमचे धैर्य नाही एवढे आम्ही सभाधिट नाहीत. परंतू देवा तुम्ही आम्हाला एकटे एकातात दिसले दुसरे कोणीही तुमच्याजवळ दिसले नाही त्यामुळे मी तुमच्याशी बोलत आहे. हे नारायणा आता तुमचे व माझे काय कर्तव्य आहे हे तुम्हीच ठरवा. आणि तुम्हाला माझ्यावर दया येईल तेच तुम्ही पाहावे करावे. माझ्या बुध्दीला तर ताळाच राहिलेला नाही ती शुध्दीवर जरी धरण्यास गेले तरी ती धरली जात नाही. आता माझ्या सेवेला फळ केव्हा येईल आणि कोणत्या जन्मात तुम्ही माझा उध्दाराचा निवाडा करणार आहात ? तुकाराम महाराज म्हणतात, “आता तुम्हाला शेवटचे हेच सांगायचे आहे देवा, मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही माझा सांभाळ करा. ”
अभंग क्र. २८२०
ऐसा तव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥१॥
मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळी ॥धृपद॥
नसेल ना नवे । ऐसे धरियेले देवे ॥२॥
तुका म्हणे झाला । उशीर तो विठ्ठला ॥३॥
अर्थ
हे गोपाळा तुमची अशी रीत नाही ना, की तुम्हाला कोणी काही मागावयास आले तर त्याची टाळाटाळी करण्यासाठी कपाळावर केस ओढून डोके दुखण्याचे निमित्त करुन झोपून राहायचे. अशी नवी रीत तर धरली नसेल ना या देवाने ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमच्याकडून कधीही उशीर झाला नाही तरी हे विठ्ठला मला भेट देण्यासाठी यावेळी तुमच्याकडून उशीर झाला आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

