“२१ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २१ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २१ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २४१३ ते २४२४ चे पारायण आपण करणार आहोत.
२१ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ९२६ ते ९५०,
926-13
नभाचे शून्यत्व गिळून । गुणत्रयाते नुरऊन । ते शून्य ते महाशून्य । श्रुतिवचनसंमत ॥926॥
आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादि तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय. अशा बद्दल वेदवचन प्रमाण आहे.
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम् ॥13. 17॥
भावार्थ त्यालाच तेजाचेही तेज व अंधाराच्या पलिकडील आहे असे (ज्ञाते म्हणतात). ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही तेच आहे, सर्व भूतमात्रांचे हृदयामधे तेच स्थित आहे.
927-13
जे अग्नीचे दीपन । जे चंद्राचे जीवन । सूर्याचे नयन । देखती जेणे ॥927॥
परब्रह्माचे वर्णन पुढे चालू
जे ब्रह्म अग्नीला चेतवणारे आहे व चंद्राचे जीवन (चंद्राला अमृत देणारे) आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात.
928-13
जयाचेनि उजियेडे । तारांगण उभडे । महातेज सुरवाडे । राहाटे जेणे ॥928॥
ज्याच्या उजेडाने तारे (तार्यांचे समुदाय) प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो,
929-13
जे आदीची आदी । जे वृद्धीची वृद्धी । बुद्धीची जे बुद्धी । जीवाचा जीवु ॥929॥
जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे.
930-13
जे मनाचे मन । जे नेत्राचे नयन । कानाचे कान । वाचेची वाचा ॥930॥
जे मनाचे मन आहे, जे डोळ्याचा डोळा आहे, जे कानाचे कान आहे व वाचेची वाचा आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
931-13
जे प्राणाचा प्राण । जे गतीचे चरण । क्रियेचे कर्तेपण । जयाचेनि ॥931॥
जे प्राणाचा प्राण आहे, जे गतीचा पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते.
932-13
आकारु जेणे आकारे । विस्तारु जेणे विस्तारे । संहारु जेणे संहारे । पंडुकुमरा ॥932॥
अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो.
933-13
जे मेदिनीची मेदिनी । जे पाणी पिऊनि असे पाणी । तेजा दिवेलावणी । जेणे तेजे ॥933॥
जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्या च्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो.
934-13
जे वायूचा श्वासोश्वासु । जे गगनाचा अवकाशु । हे असो आघवाची आभासु । आभासे जेणे ॥934॥
जे ब्रह्म वायूचा श्वासोच्छ्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे. हे राहू दे, हा सर्व जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो.
935-13
किंबहुना पांडवा । जे आघवेचि असे आघवा । जेथ नाही रिगावा । द्वैतभावासी ॥935॥
फार काय सांगावे ? अर्जुना, जे सर्वाच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही.
936-13
जे देखिलियाचिसवे । दृश्य द्रष्टा हे आघवे । एकवाट कालवे । सामरस्ये ॥936॥
ज्याचे दर्शन होण्याबरोबरच द्रष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्यभावाला येते.
937-13
मग तेचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन । ज्ञाने गमिजे स्थान । तेहि तेची ॥937॥
मग ते ब्रह्माचे ज्ञान होते व ज्ञाता, ज्ञेय व ज्ञानाने जाणले जाणारे ठिकाणही तेच (ब्रह्म) आहे.
938-13
जैसे सरलिया लेख । आंख होती एक । तैसे साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये ॥938॥
ज्याप्रमाणे हिशोब करण्याचे संपल्यावर हिशेबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे साध्य साधनादिक हे ब्रह्माचे ठिकाणी ऐक्यास येतात.
939-13
अर्जुना जिये ठायी । न सरे द्वैताची वही । हे असो जे हृदयी । सर्वाच्या असे ॥939॥
अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असो, जे ब्रह्म सर्वाच्या अंत:करणात असते.
इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥13. 18॥
भावार्थ याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने तुला सांगितली, हे सर्व जाणून माझा भक्त मत्स्वरूप होतो.
आतापर्यंत क्षेत्र, ज्ञेय, ज्ञान व अज्ञान असे ब्रह्माचे चार प्रकार करून विचार सांगितला
940-13
एवं तुजपुढा ” । आदी क्षेत्र सुहाडा । दाविले फाडोवाडा । विवंचुनी ॥940॥
हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
941-13
तैसेचि क्षेत्रापाठी । जैसेनि देखसी दिठी । ते ज्ञानही किरीटी । सांगितले ॥941॥
त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्याला दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले.
942-13
अज्ञानाही कौतुके । रूप केले निके । जव आयणी तुझी टेके । पुरे म्हणे ॥942॥
तुझी बुद्धी ‘पुरे ” म्हणून तृप्त होईपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही वर्णन केले.
943-13
आणि आता हे रोकडे । उपपत्तीचेनि पवाडे । निरूपिले उघडे । ज्ञेय पै गा ॥943॥
आणि अर्जुना, आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले.
944-13
हे आघवीच विवंचना । बुद्धी भरोनि अर्जुना । मत्सिद्धिभावना । माझिया येती ॥944॥
अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूपसिद्धीला येतात.
945-13
देहादि परिग्रही । संन्यासु करूनिया जिही । जीवु माझ्या ठाई । वृत्तिकु केला ॥945॥
ज्यांनी देहादि परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला.
946-13
ते माते किरीटी । हेचि जाणौनिया शेवटी । आपणपया साटोवाटी । मीचि होती ॥946॥
अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून व आपल्या मोबदला मला घेऊन, मद्रूपच होतात.
947-13
मीचि होती परी । हे मुख्य गा अवधारी । सोहोपी सर्वापरी । रचिली आम्ही ॥947॥
अर्जुना, मीच होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज व इतर सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारापेक्षा हा सोपा प्रकार आम्ही तयार केला आहे.
948-13
कडा पायरी कीजे । निराळी माचु बांधिजे । अथावी सुइजे । तरी जैसी ॥948॥
डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा पायर्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव (होडी) घालावी.
949-13
एऱ्हवी अवघेचि आत्मा । हे सांगो जरी वीरोत्तमा । परी तुझिया मनोधर्मा । मिळेल ना ॥949॥
सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे, हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे वीरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीला गिळला गेला नसता. म्हणजे तुझ्या कल्पनेत आला नसता.
950-13
म्हणौनि एकचि संचले । चतुर्धा आम्ही केले । जे अदळपण देखिले । तुझिये प्रज्ञे ॥950॥
तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्याकारणाने एकच सर्व ठिकाणी भरलेले जे परब्रह्म ते आम्ही चार प्रकारचे केले.
दिवस २०२ वा. २१, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४१३ ते २४२४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २४१३
ऐसा माझा कोण आहे भीडभार । नावाचा मी फार वाया गेलो ॥१॥
काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । ते मज राउळ कृपा करी ॥धृपद॥
काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणे पडे वर्म तुझे ठायी ॥२॥
कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगी एक बळ आहे सत्ता ॥३॥
तुका म्हणे वाया झालो भूमी भार । होईल विचार काय नेणो ॥४॥
अर्थ
माझी अशी कोणती मोठी भिड आहे की मला देव भेटेल, मी तर नावाचाच फार वाया गेलो आहे. माझी अशी कोणती सेवा देवाच्या जवळ रुजू झाली आहे व अशी कोणते सत्ताबळ माझ्याकडे आहे की जेणेकरून देव माझ्यावर कृपा करेल. माझी जाती व कुळ धर्म असे कोणते शुद्ध आहे की ज्यामुळे मला तुझ्या प्राप्तीचे वर्म समजेल. देवा मी असे कोणते तपोनिधी मोठे दानधर्म पुण्य केले आहे किंवा कोणती अशी माझ्या अंगी सत्ता बळ आहे की ज्यामुळे तु मला भेट देशील. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तर पूर्ण वाया गेलेलो आहे त्यामुळे भूमीला देखील भार झालो आहे आता यापुढे माझे काय होईल याविषयी विचार करू गेलो तर मला ते काही समजत नाही.
3:53 Sdm:
अभंग क्र. २४१४
साच मज काय कळो नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥
करावे ते बरे जेणे समाधान । सेवावे हे वन न बोलावे ॥धृपद॥
शुद्ध माझा भाव होईल तुझे पायी । तरि च हे देई निवडूनि ॥२॥
उचित अनुचित कळो आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे मज पायासवे चाड । सांगसी ते गोड आहे मज ॥४॥
अर्थ
देवा खरे काय आहे हे मला कळत नाही तुझ्या सेवेने काय कळत नाही अर्थात सर्व काही समजते. देवा मला जेणेकरून चांगले आणि समाधान वाटेल असेच तु कर त्यासाठी तु जर मला सांगितले की वनात जाऊन मौन धारण कर तर तसे ही मी करीन. देवा माझा जर तुझ्या पायाशी शुद्ध भक्तिभाव होईल तरच तु मला वरील गोष्टी निवडून सांगाव्या स्पष्ट करून सांगाव्यात. हे पांडुरंगा तुझी माझ्या वर कृपादृष्टी आहे त्यामुळेच मला उचित व अनुचित गोष्टी समजल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझ्या पायाची सेवा करण्याचीच चाड आहे मग त्यांच्यासाठी तु मला जे काही सांगशील तेच मला गोड वाटणार आहे.
3:54 Sdm:
अभंग क्र. २४१५
नाही कंटाळलो परि वाटे भय । करावे ते काय न कळता ॥१॥
जन वन आम्हा समान चि झाले । कामक्रोध गेले पावटणी ॥धृपद॥
षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळे तुझ्या ॥२॥
म्हणऊनिं मुख्य धर्म आम्हा सेवकाचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावे ते ॥३॥
म्हणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥४॥
अर्थ
देवा मी तुझ्या सेवेला कंटाळलो नाही परंतु सेवा कशी करावी हे समजत नाही त्यामुळे भय वाटते. देवा जन आणि मन हे आम्हाला तर सारखेच झाले आहे आणि काम क्रोधाच्या तर आम्ही पायऱ्याच केल्या आहेत. हे अनंता आम्ही षड ऊर्मी रुपी शत्रुना जिंकले आहे केवळ तुझ्या नामाच्या सत्तेच्या बळावर. स्वामी जे सांगतील तेच शिरसावंद्य मानून त्याचे पालन करावे हाच आम्हा सेवकाचा मुख्य धर्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी देवा तुझ्या पाया कडे एक टक लक्ष देऊन आहे आणि तुझ्याकडून एक तरी आज्ञा वचन मला मिळेल याची वाट पाहत आहे.
3:54 Sdm:
अभंग क्र. २४१६
वायाविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघा ॥१॥
नाही ऐसा जाला देव माझ्या मते । भुकेले जेविते काय जाणे ॥धृपद॥
शब्दज्ञाने गौरविली हे वैखरी । साच ते अंतरी बिंबे चि ना ॥२॥
जालो परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥
तुका म्हणे मागे कळो येते ऐसे । न घेतो हे पिसे लावूनिया ॥४॥
अर्थ
देवा मी तुझा खरा भक्त आहे असा माझा लौकिक तु विनाकारण वाढविला आहेस मी भक्त आणि तु देव हा खोटा भेद तु निर्माण केला त्यामुळे आपल्या दोघात विनाकारणच वाद निर्माण झाला आहे. माझ्या मते देव झालाच नाही कारण त्याला भुकेला आणि जेवलेला यांच्यातील फरक कळतो काय ? देव तर नाहीच पण मी ही त्याचा खरा भक्त नाही कारण मी केवळ शब्द ज्ञानाचे अलंकार माझ्या वाणीला लावून माझी वाणी गौरवीत आहे मी जे काही विशब्द ज्ञान बोलतो त्याचे खरे तत्व माझ्या मनात बिंबतच नाही. देवा तुझी प्राप्ती होईल म्हणून मी तुझे ध्यान सतत करत राहिलो आणि त्यामुळे मी संसाराकडे लक्ष ही दिले नाही आणि आता मला तुझ्या पायाची प्राप्ती ही झाली नाही आणि माझ्याकडून संसारही घडला नाही त्यामुळे दोन्ही चा आधार तुटून मी एकटा परदेशी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याविषयी जर मला मागे समजले असते तर मी मला तुझे वेडच लावून घेतले नसते.
3:55 Sdm:
अभंग क्र. २४१७
न कळे तत्त्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातो चित्ती चरणकमळ ॥१॥
आगमाचे भेद मी काय जाणे । काळ तो चिंतने सारीतसे ॥धृपद॥
काही नेणे परि म्हणवितो दास । होईल त्याचा त्यास अभिमान ॥२॥
संसाराची सोय सांडिला मारग । दुराविले जग एका घाये ॥३॥
मागिल्या लागाचे केलेसे खंडण । एकाएकी मन राखियेले ॥४॥
तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावे ॥५॥
अर्थ
मला तत्व ज्ञान कळत नाही कारण माझी मती माझी बुद्धी मूढ म्हणजे जड आहे परंतु मी माझ्या चित्तामध्ये हरी च्या चरणकमळाचे ध्यान नेहमी करतो. अगमाचे म्हणजे विविध प्रकारचे शास्त्र त्यांचे प्रक्रिया यांचे अर्थ मी काय जाणू शकतो परंतु माझा सर्वकाळ मी हरिच्या चिंतनात घालवत आहे. मी काही जाणत नाही मला काही समजत ही नाही परंतु मी स्वतःला हरीचा दास म्हणून घेतो व त्याच कारणामुळे हरीला माझा अभिमान होईल. मी संसाराचा त्याग करून तो मार्ग सोडून दिला आहे त्यामुळे एकाच घावात मी माझ्यापासून जग दूर केले आहे. मागील सर्व संचित कर्माचे मी खंडन केले आहे व माझे मन एकाग्र करून राखून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहो रुक्मिणी वरा भक्त करूणा कारा तुम्हीच माझे सर्व काही आहात त्यामुळे तुम्ही माझा सांभाळ करावा.
3:55 Sdm:
अभंग क्र. २४१८
संसारसोहळे भोगिती सकळ । भक्ता त्याचे बळ विटोबाचे ॥१॥
भय चित्ती धाक न मनिती मनी । भक्ता चक्रपाणि सांभाळीत ॥धृपद॥
पापपुण्य त्यांचे धरू न शकेअंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावे ॥२॥
नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव त्यांचा भार सर्व वाहे ॥३॥
तुका म्हणे देव भक्ता वेळाईत । भक्त ते निश्चिंत त्याचियाने ॥४॥
अर्थ
संसाराचे सुख सोहळे सर्व लोक भोगतात परंतु भक्तांना केवळ एका विठोबाचे बळ असते. भक्तांचा सांभाळ चक्रपाणि करत असतो त्यामुळे भक्तांच्या मनात कोणत्याही प्रकारचे भय नसते आणि चित्तात कोणत्याही प्रकारचा धाक नसतो. श्रीरंग च भक्तासाठी सर्वकाही असतो त्यामुळे भक्तांच्या अंगाला पाप पुण्य केव्हाही धरू शकत नाहीत. काही भक्त संसारातून मुक्त झालेले नसतात त्यांना संसार आवडतो व अशा भक्तांच्या संसाराचा ही सर्व भार देव वहात असतो. तुकाराम महाराज म्हणतात वेळप्रसंगी देवभक्तांची सर्व कामे करतो त्याची काळजी घेतो त्यांना मदत करतो त्या योगाने भक्त निश्चिंत असतात.
3:56 Sdm:
अभंग क्र. २४१९
देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहीचा विचार एकपणे ॥१॥
भक्तांसी सोहळे देवाचिया अंगे । देव त्यांच्या संगे सुख भोगी ॥धृपद॥
देवे भक्ता रूप दिलासे आकार । भक्ती त्याचा पार वाखाणिला ॥२॥
एका अंगी दोन्ही झाली ही निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥३॥
तुका म्हणे येथे नाही भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥४॥
अर्थ
देवाचा अवतार असतो तर भक्तांचा जन्म म्हणजे संसार असतो परंतु दोघाचाही विचार एकच असतो. देवाच्या अंगसंगतीला राहून भक्त सुखसोहळे भोगतात आणि देव भक्तांच्या संगतीत राहून सुख सोहळे भोगतात. देवांनी भक्तांना मनुष्य देह आणि भक्तांनी देवाला नामरूप व आकार दिलेला असतो व भक्त त्याच्या भक्तीचा अपार महिमा संपूर्ण जगभर करत असतात. एकच ब्रह्मापासून देव आणि भक्त हे दोघे निर्माण झालेले असतात स्वामी आणि भक्त सेवक म्हणून वावरतात आणि भक्त स्वामी ची सेवा करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात देव आणि भक्त यामध्ये कोणत्याही प्रकारचा भिन्न भाव नाही भक्त तोच देव आणि देव तोच भक्त आहे.
3:56 Sdm:
अभंग क्र. २४२०
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥
गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणे वनमाळी सुखावला ॥धृपद॥
चोरोनिया खाये दुध दही लोणी । भावे चक्रपाणि गोविला तो ॥२॥
निष्काम तो झाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥३॥
जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥४॥
तुका म्हणे हे चि चैतन्ये सावळे । व्यापुनि निराळे राहिलेसे ॥५॥
अर्थ
ज्या वेळी भगवान गायी चारण्या करता वनात घेऊन जात त्यावेळी हा मोक्षाचे निदान कैवल्याचे निदान भगवान श्रीकृष्ण गायीच्या हुंबरण्याकडे कान देऊन उभा राहत असत. आणि गोपाळ गायी चारण्यास गेले की तेथे भगवंताची पूजा करायचे ती म्हणजे अशी की आपल्या मुखातील उष्टा घास भगवंताच्या मुखात घालत आणि त्यामुळे वनमाळी भगवंत खूप सुखावला जायचा. हा हरी दही-दूध-लोणी चोरून खायचा त्यामुळे गोपिका त्याला बांधून ठेवायच्या परंतु त्याला बांधणे शक्य नाही असे असले तरी केवळ त्यांच्या प्रेमभावामुळे हा चक्रपाणी त्यांच्या प्रेम बंधनात बांधला जायचा. हरी निष्काम असून देखील काम लंपट झाला आणि गोपिकांची वाट पाहत बसला होता. सगळ्या जगाला दान देणारा भगवंत केवळ एका तुळशीच्या पानाची इच्छा करतो म्हणजेच तो भक्तांच्या भक्तीला विकला गेला होता. तुकाराम महाराज म्हणतात हेच ते सावळे चैतन्य आहे की जे सर्वत्र व्यापून देखील सर्वापेक्षा वेगळे होऊन राहिले आहे.
3:57 Sdm:
अभंग क्र. २४२१
वाढविले का गा । तुम्ही एवढे पांडुरंगा ॥१॥
काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥धृपद॥
ब्रम्हसंतर्पण । लोकी करावे कीर्तन ॥२॥
निमित्याचा धणी । तुका म्हणे नेणे कोणी ॥३॥
अर्थ
हे पडुरंगा तुम्ही माझी एवढी महती का वाढवली आहे ? अभंग करून मला एवढी बडबड करण्याची आवड होती काय ? लोकांमध्ये कीर्तन करून ब्रम्ह संर्तपण करण्याची मला आवड होती काय ? तुकाराम महाराज म्हणतात अभंग रचना करण्याचा मी केवळ निमित्त झालो आहे, खरे तर हे अभंग रचना तुझीच आहे तुच याचा जन्मदाता आहेस परंतु हे कोणालाही समजत नाही आणि त्यामुळेच हे मला महती देतात.
3:57 Sdm:
अभंग क्र. २४२२
आनंद अद्वय नित्य निरामय । जे का निजध्येय योगियांचे ॥१॥
ते हे समचरण साजिरे विटेवरी । पहा भीमा तिरी विठ्ठलरुप ॥धृ॥
पुराणासी वाड श्रुती नेंणती पार । ते झाले साकार पुंडलिका ॥२॥
तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळ दैवत पांडुरंग ॥३॥
अर्थ
जे ब्रम्ह नित्यानंद अद्वैय आणि नेहमी निर्मळ अविनाशी आहे ते योगी मुनिजणांचे निज ध्येय आहे. तेच सुंदर ब्रम्ह आपले दोन्ही चरण विटेवर सम ठेवून भीमातीरी उभे आहे, विठ्ठल रूपाने उभे आहे ते पहा. जे ब्रम्ह, पुराणासाठी अति मोठे श्रुतीसाठी नेतीनेती म्हणजे नकळणारे झाले ते ब्रम्ह पुंडलिकासाठी साकार झाले. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे ध्यान शुकादिक मुनिजन करतात ते आमचे कुलदैवत पांडुरंग आहे.
3:58 Sdm:
अभंग क्र. २४२३
वाचेचिया आळा कवळिले ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥
सुलभ झाले सुलभ झाले । जवळी आले पंढरिये ॥धृपद॥
नामरूपाचे बांधले मोटळे । एक एका वेळे सारियेले ॥२॥
तुका म्हणे वाटे चुकली वसती । उधार तो हाती आणियेला ॥३॥
अर्थ
वाचेच्या द्वारा आम्ही निर्गुण ब्रम्हाला नामाने आळा घालून कवळीले आहे व आमचा त्यामुळे त्याच्या प्राप्तीसाठी होणारा इतर सर्व श्रम आम्ही चुकविला आहे. ते ब्रम्ह आमच्यासाठी इतके सुलभ झाले आहे इतके सुलभ झाले आहे की ते अगदी जवळ, आमच्या जवळ पंढरीला आले आहे. आम्ही एका दमामध्ये नाम रुपी गाढोडे बांधले आहे व त्यामुळे इतर सर्व साधना नामा पुढे आम्ही बाजूला सारून दिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ब्रम्ह प्राप्तीकरता इतर अनेक साधनंची वाट चुकवली असून नाम साधनेमुळे अनेक जन्मांच्या शेवटी ज्या ब्रह्माची प्राप्ती व्हायची होती ते ब्रम्ह आम्ही याच जन्मी हाताशी आणले आहे.
3:58 Sdm:
अभंग क्र. २४२४
सवंग झाले सवंग झाले । घरा आले बंदरींचे ॥१॥
आता हेवा करु सोस । भक्तीरस बहु गोड ॥धृपद॥
पाउल वेचे चिंता नाही । आड काही मग नये ॥२॥
तुका म्हणे संचिताचे । नेणे काये राहो ते ॥३॥
अर्थ
द्वारकेच्या बंदरावर असलेले भगवान श्रीकृष्ण हे आता एकदम आपल्या घरी म्हणजे पंढरीला आले आहे त्यामुळे ते अतिशय सवंग म्हणजे अतिशय स्वस्त झाले आहे. भक्ती रस अतिशय गोड आहे व आता त्याचा हेवा करून त्याचाच मनाला छंद लावून घेऊ. पंढरीला जाण्याकरता पावलाने चालले तर कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही आणि हरीची प्राप्ती होण्यासाठी कोणतेही संकट आड येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर मनुष्य एकदा पंढरीला गेला की त्याचे सर्व पूर्वसंचित नाहीसे होऊन तो भाग्यवान होतो.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

