“२१ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 21 January
राम कृष्ण हरी आज दिनांक २१ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
226-2
सुखी संतोषा न यावे । दुःखी विषादा न भजावे । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजी ॥226॥
अर्जुना, सुखाच्या वेळी संतोष मानू नको, दुःखाच्या वेळी खेद करू नकोउ. आणि मनात लाभ किंवा हानी याचा (कसलाही) विचार करू नकोस.
227-2
एथ विजयपण होईल । का सर्वथा देह जाईल । हे आधीचि काही पुढील । चिंतावेना ॥227॥
या युद्धात आपल्याला जय मिळेल किंवा देहच नाहिसा होईल, या पुढील गोष्टींचे युद्धपूर्वी (आगोदरच) चिंतन करत बसू नको.
228-2
आपणया उचिता । स्वधर्मातेचि रहाटता । जे पावे ते निवांता । साहोनि जावे ॥228॥
आपल्या विहित स्वधर्माने वागत असताना, जे काही (आपले बरे-वाईट) प्रसंग आपल्याला येतील ते (शांतपणे) निमूटपणे सहन करावे
229-2
ऐसेया मने होआवे । तरी दोषु न घडे स्वभावे । म्हणोनि आता झुंजावे । निभ्रांत तुवा ॥229॥
अशी मनाची तयारी होईल. (मन शांत होईल) मन शांत झाल्यामुळे स्वभावतःच तुझ्याकडून पाप घडणार नाही. म्हणून तू आता खुशाल झुंज देण्यास तयार व्हावे.
एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥2. 39॥
भावार्थ :-
अर्जुना ! ! आतापर्यंत तुला सांख्यविषयक (आत्मज्ञान – विचार) ज्ञान सांगितले. आता निष्काम कर्मयोगासबंधी ज्ञान सांगतो. त्याने तू कर्मबंधनापासून मुक्त होशील.
230-2
हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ । आता बुद्धियोगु निश्चित । अवधारी पा ॥230॥
आत्तापर्यंत तुला आत्मज्ञान (ज्ञानमार्ग) संक्षिप्तपणे सांगितला, आता निश्चित असा निष्काम कर्मयोग सांगतो, तो तू ऐक.
231-2
जया बुद्धियुक्ता । आहालिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बांधू न पावे ॥231॥
हे अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याने आचरली. त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही.
232-2
जैसे वज्रकवच लेईजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसी उरिजे । अचुंबिता ॥232॥
ज्याप्रमाने अंगात वज्रकवच (चिलखत)घातले म्हणजे शस्त्रांची वृष्टी सहन करता येते. इतचेच नव्हे तर (अंगाला शस्त्र स्पर्शहि)न करता विजय मिळवून राहता येते.
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥2. 40॥
भावार्थ :-
या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही. यात कोणताही दोष नाही. या धर्माचे थोडे अनुष्ठानही मोठ्या भयापासून रक्षण करते.
233-2
तैसे ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत ॥233॥
त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वी पासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने सुरु असलेले दिसून येते. त्या कर्मयोगात ऐहिक सुखांचा नाश तर होत नाहीच, शिवाय मोक्षसुख ही तर ठेवलेलाच आहे. (प्राप्त होते)
234-2
कर्माधारे राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥234॥
म्हणून निष्काम कर्म करीत रहावे. परंतू कर्माच्या फळावर नजर ठेऊ नये. जसे मंत्र जाणणाऱ्यास भुताची बाधा होत नाही,
235-2
तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि । हा असताचि उपाधि । आकळू न सके ॥235॥
त्याप्रमाणे अंतःकरणात आसक्ती न ठेवता (अनासक्त) भावाने कर्म करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली, . हा उपाधित (देह धारण करून देखील) असूनही उपाधी त्याला बाधा करू शकत नाही.
236-2
जेथ न संचरे पुण्यपाप । जे सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥236॥
ज्या बुद्धीत (योगी, संत, परमतत्व स्वरूप ब्रम्हस्थितीस प्राप्त झालेले असे) कर्मफळांचा प्रवेश होत नाही. जी सूक्ष्म व निश्चल झालेली आहे आणि जिला (सात्विक, राजस, तामस) तीन गुणांचा मूळीच स्पर्श होत नाही,
237-2
अर्जुना ते पुण्यवशे । जरी अल्पचि हृदयी बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ॥237॥
अर्जुना ! सद्बुद्धी जर अनंत जन्मीच्या पुण्याईने थोडीशीच अंतःकरणात (प्रकाशित) प्रगट झाली, तर तेवढ्यानेच संसाराचे संपूर्ण भिती नाहिसे होते.
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवस्थिताम् ॥2. 41॥
भावार्थ :-
हे अर्जुना, येथे (कर्मयोगात) निश्चयात्मक (इश्वरनिष्ठ) बुद्धी एकच असते. (अज्ञानी, चंचल, सकामी) अनिश्चित व्यक्तींची बुद्धी (वृक्षाच्या शाखेप्रमाणे) अनेक भेदानी युक्त अशा अनंत बुद्धी असतात.
238-2
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजाते प्रगटी । तरी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणो नये ॥238॥
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असते, पण, तिचा मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे अंतःकरणातील निष्काम कर्माची सद्बुद्धी (अल्प जरी असली तरी तीला) लहान (म्हणजेच महान आहे) आहे, असे म्हणू नये.
239-2
पार्था बहुती परी । हे अपेक्षिजे विचारशूरी । जे दुर्लभ चराचरी । सद्वासना ॥239॥
हे अर्जूना ! विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात. कारण या चाराचात सद्बुद्धी ही सहज प्राप्त होणे (शक्य नाही) ही दूर्लभ आहे.
240-2
आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । का अमृताचा लेशु । दैवगुणे ॥240॥
ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात, पण ‘परीस’ काही मिळत नाही, किंवा ‘लेशमात्र अमृत’ सापडण्यास तसाच दैवयोग लागतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-2
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥241॥
त्याप्रमाणेच, परमेश्वराशी एकरूपता प्राप्त (परमात्मा हाच जिचे अंतिम ध्येय) अशी ही सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगा जशी शेवटी संगरालाच मिळते,
242-2
तैसी ईश्वरावाचूनि काही । जिये आणिक लाणी नाही । ते एकचि बुद्धि पाही । अर्जुना जगी ॥242॥
त्याप्रमाणे जिला ईश्वरावाचून दुसरे आश्रयस्थान नाही, (ईश्वरप्राप्ती शिवाय इतर काहीही प्राप्त करणे नाही) (किंवा अंतिम ध्येय ईश्वर प्राप्तीच करणे) अर्जुना, अशी या जगामध्ये जगात एकच सद्बुद्धी आहे, हे जाण.
243-2
येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरती । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥243॥
(सद्बुद्धी शिवाय, ) इतर त्या दूर्बुद्धीच आहेत. अशा दूर्बुद्धीत अनेक विकार (अविचार) उत्पन्न होतात. आणि आशा बुद्धीच्या ठिकाणी अविचारी लोक रममाण (रमून गेलेले असतात) होतात.
244-2
म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाही ॥244॥
म्हणून हे पार्था ! आशा (अविवेकी, अविचारी) लोकांना स्वर्ग, संसार किंवा नरकावस्था हे प्राप्त हातात. परंतू त्यांना आत्मसुखाच (आत्मानंदाचे अनुभव) मुळीच दर्शन होत नाही.
यामिना पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥2. 42॥
भावार्थ :-
हे अर्जुना, वेदांच्या नुसत्या बाह्य अर्थवादात रममाण झालेले अविवेकी लोक (स्वर्गसुख व त्याचे साधन जे कर्म याशिवाय) सकाम कर्मशिवाय दुसरे काही नाही, अशी शोभायुक्त (मनोहर दिसते) दिखाऊ वाणी (वेदांची पुष्पित, किंवा रोचक वाणी तिच्या) च्या आधाराने बोलतात.
245-2
वेदाधारे बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळी आसक्ती । धरूनिया ॥245॥
असे (अविचारांच्या अधिन) असणारे लोक वेदांतील वाचनाचा आधारा घेऊन बोलतात. (केवळ फलाची अपेक्षा ठेवूनच कर्म करतात) केवळ कर्मभागाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, कर्मफळाची आसक्ती, लोभ त्यांच्या हृदयात असते.
246-2
म्हणती संसारी जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥246॥
ते म्हणतात, मृत्यूलोकी जन्माला यावे, यज्ञादि कर्मे करावीत व आल्हाददायक असे मनोहर स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा.
247-2
एथ हे वाचूनि काही । आणिक सर्वथा सुखचि नाही । ऐसे अर्जुना बोलती पाही । दुर्बुद्धि ते ॥247॥
मृत्युलोकी, (इहलोकी)उपभोगाच्या सुखासारखे दुसरे सुख नाही, असे द्रूबुद्धी असलेले लोक नेहमी असे (बोलतात) म्हणतात. अर्जुना हे तू जाण.
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविषेश्बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥2. 43॥
भावार्थ :-
विषयभोगाविषयी तत्पर व स्वर्गसुखाच्या मागे लागलेले, भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसंबंधाने जीच्यामध्ये अनेक कर्माचे वर्णन केले आहे. जी जन्मरूप कर्मफल देणारी अशी बोली बोलणारे,
248-2
देखे कामना अभिभूत । होऊनि कर्मे आचरत । ते केवळ भोगी चित्त । देऊनिया ॥248॥
असे पाहा की, हे अविचारी लोक सुखाच्या उपभोगाकडे लक्ष ठेवून (कामना आसक्त होवून) (भोगजण्य सुखावर), फळाची इच्छा मनात धरून ते कर्मे करतात.
249-2
क्रियाविशेषे बहुते । न लोपिती विधीते । निपुण होऊनि धर्माते । अनुष्ठिती ॥249॥
शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे अनेक प्रकारची (अनुष्ठाने मनलावून) कर्मे करतात. आणि त्यात निपुण होऊन यत्किंचितहि चूक न होऊ देता अगदी दक्षतेने धर्माचरण करतात.
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥2. 44॥
भावार्थ :-
त्या वाणीद्वारा ज्यांचे चित्त हरण केलेले आहे, तसेच भोग व ऐश्वर्य यांची आसक्ती असणाऱ्या (ज्यांची विवेकबुद्धी झाकलेली आहे) अशा पुरुषांच्या अंतःकरणांमध्ये भगवंताशी एकरूप असणारी सद्बुद्धी असत नाही. (उदभवत नाही)
250-2
परि एकचि कुडे करिती । जे स्वर्गकामु मनी धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥250॥
अर्जूना, हे लोक एकच गोष्ट फार वाईट करतात, ती ही की, ते मनामध्ये स्वर्गसुखाची इच्छा धरतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा, त्यालाच नेमके विसरतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २१ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४१ ते २५२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 241
भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥
पडिला विसर माझा काय गुणे । कपाळ हे उणे काय करू ॥२॥
तुका म्हणे माझे जाळूनि संचित । करी वो उचित भेट देई ॥३॥
अर्थ
भक्ती प्रतिपाळे म्हणजे भक्तांचे रक्षण करणारी विठाबाई तू कृपाळू माऊली आहेस. हे विठ्ठला तुला माझा विसर तरी कसा पडला ? अरे माझे कपाळच फुटके त्याला मी तरी काय करू ? तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तू माझे संचित जाळूण तू मला भेट दे हे उचित कर्म तू कर हि माझी विनंती तुझ्या पाशी आहे.
अभंग क्र. 242
तुजविण मज कोण वो सोयरे । आणीक दुसरे पांडुरंगे ॥१॥
लागलीसे आस पाहातसे वास । रात्री वो दिवस लेखी बोटी ॥२॥
काम गोड मज न लगे हो धंदा । तुका म्हणे सदा हेचि ध्यान ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगा तुझ्या वाचून मला या जगामध्ये दुसरे कोण सोयरे आहे. देवा तुझी मी अहोरात्र तुझी वाट पाहत आहे मला तुझ्या भक्तीची आस लागली आहे रात्र गेली दिवस गेला कि मी बोटाने मोजत आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझे कामात गोडी लागत नाही धंद्यात लक्ष लागत नाही सदा सर्वकाळ तुझेच ध्यान लागले आहे. .
अभंग क्र. 243
पढियते आम्ही तुजपाशी मागावे । जीवीचे सांगावे हितगुज ॥१॥
पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥धृपद॥
जीव भाव तुझ्या ठेवियेला पायी । तूचि सर्वा ठायी एक आम्हा ॥२॥
दुजियाचा संग लागो नेदी वारा । नाही जात घरा आणिकाच्या ॥३॥
सर्वसत्ता एकी आहे तुजपाशी । ठावे आहे देसी मागेन ते ॥४॥
म्हणउनि पुढे मांडियेली आळी । थिंकोनिया चोळी डोळे तुका ॥५॥
अर्थ
हे पांडुरंग आम्हाला जे आवडते ते आम्ही तुझ्या पाशी मागू व आमचे जीवाचे जे हित गुज आहे ते आम्ही तुला सांगू. हे विठ्ठला तू आमचा सांभाळ आवडीने लाडाने व वात्सल्य भावनेने करशील. हे दिन वत्सला विठ्ठला तू या जगाची कृपाळू जननी आहेस. आम्ही आमचा जीव भाव सर्व तुझ्या पायी ठेवला आहे सर्व ठिकाणी तूच आम्हाला तारणारा आहे. आम्हाला दुसर्याच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस आणि मी अणिकाच्या घरी सुद्धा जाता नाही. अरे पांडुरंगा मी जे काही मागेन ते तू मला नक्की देणार कारण सर्व सत्ता तुझ्या पाशी आहे हे मला माहित आहे. तुकाराम महाराज म्हणतात आणि म्हणूनच तर देवा मी तुझ्या पुढे आळी (हट्ट) मांडला आहे आणि डोळे चोळीत तुझ्या पुढे रडत आहे.
अभंग क्र. 244
कोण पर्वकाळ पहासील तीथ । होते माझे चित्त कासावीस ॥१॥
पाठवी भातुके प्रेरी झडकरी । नको राखो उरी पांडुरंगा ॥धृपद॥
न धरावा कोप मजवरी काही । अवगुणी अन्यायी म्हणोनिया ॥२॥
काय रडवीसी नेणतिया पोरा । जाणतिया थोरा याचिपरी ॥३॥
काय उभी कर ठेवुनिया कटी । बुझावी धाकुटी लडिवाळे ॥४॥
तुका म्हणे आता पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥५॥
अर्थ
हे देवा अरे मला भेटण्यासाठी तू कोणत्या तिथीची पर्वकाळाची वाट पाहत आहे इकडे माझा जीव कासावीस होत आहे. अरे पांडुरंगा लवकर ये उशीर लावू नकोस. देवा मी अवगुणी अन्यायी आहे म्हणून तू माझ्यावर कोप करू नको माझा त्याग करू नको. अरे अज्ञानी मुलाला काय रडवतो ? तू सर्व जाणता असून तू थोर आहे तरी असे का वागतो हे मला समजेना. अरे कर कटेवर ठेऊन काय उभा आहेस ? आम्हा लहान लाडाची मुलांची तू समजूत काढ. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही तूझ्या पदारालाच पीळ घालणार मग मी तुझ्या पेक्षा निराळाच नाही होणार ?
अभंग क्र. 245
का हो देवा काही न बोलाचि गोष्टी । का मज हिंपुटी करीतसा ॥१॥
कंठी प्राण पाहे वचनाची वास । तो दिसे उदास धरिले ऐसे ॥धृपद॥
येणे काळे बुंथी घेतलीसे खोळ । का नये विटाळ होऊ माझा ॥२॥
लाज वाटे मज म्हणविता देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥
अर्थ
हे देवा तुम्ही माझ्याशी काही का बोलत नाही का मला हिंपुटी म्हणजे कष्टी करता. माझा प्राण कंठात आला आहे तुझ्या शब्दाचा वसा व्हावा असे मला वाटते पण तुम्ही माझ्या भक्तीत उदासीन झाला आहात असे मला वाटते. आहो देवा तुम्ही खोळ पाघरून अलग वेगळे बसला आहात काय ? माझा विटाळ तुम्हाला होऊ नये असे तुम्हाला वाटते काय ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुमचा म्हणण्याची लाज वाटते कारण तुम्ही मला फुकटचेही विचारत नाही ?
अभंग क्र. 246
उचित ते काय जाणावे दुर्बळे । थोरिवेचे काळे तोंड देवा ॥१॥
देतो हाका कोणी नाइकती द्वारी । ओस कोणी घरी नाही ऐसे ॥धृपद॥
आलिया अतीता शब्दे समाधान । करिता वचन काय वेचे ॥२॥
तुका म्हणे तुम्हा साजे हे श्रीहरी । आम्ही निलाजिरी नाही ऐसी ॥३॥
अर्थ
परमार्थात उचित काय आहे हे मी दुबळा काय जाणार ? पण ऐवढे मात्र मी जाणतो जो कोणी परमार्थात गर्व करतो त्याचे तोड काळे होते. जसे एखाद्या घरी कोणी नसते व आपण द्वारातून ओ दिली कि कोणीही ऐकत नाही तसे मी तुम्हाला हाक देऊनही तुम्ही काहीच बोलत नाही. आहो देवा आहो दारात आलेल्या पाहुण्याचे गोड शब्दाने समाधान केले तर काय खर्च आहे काय. तुकाराम महाराज म्हणतात आहो देवा तुमच्या थोर पणाच्या मानाने ते तुम्हाला साजेसे आहे ते तुम्हाला शोभातेही पण आम्ही पण एवढे निलाजिरी नाहीत.
अभंग क्र. 247
आम्ही मागो ऐसे नाही तुजपाशी । जरी तू भितोसि पांडुरंगा ॥१॥
पाहे विचारूनि आहे तुज ठावे । आम्ही धालो नावे तुझ्या एका ॥धृपद॥
ॠद्धिसिद्धि तुझे मुख्य भांडवल । हे तो आम्हा फोल भक्तीपुढे ॥२॥
तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत । बैसोनि निवांत सुख भोगू ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगा आम्ही जे काही मागत आहे ते तुझ्या पाशी नाही म्हणून तू आमच्याशी बोलण्यास भीत आहे. देवा तू विचार करून पहा हे तुला पण माहित आहे आम्ही तुझ्या नामानेच तृप्त झालो आहोत. देवा तुझ्या भक्ताला देण्यासाठी तुझ्याकडे रिद्धी सिद्धी हे एवढेच मुख्य भांडवल आहे पण ते आम्हास तुझ्या भक्ती पुढे निष्काम फोल वाटते. तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही चालत वैकुंठाला जाऊ आणि निवांत सुख भोगू.
अभंग क्र. 248
न लगे हे मज तुझे ब्रम्हज्ञान । गोजिरे सगुण रूप पुरे ॥१॥
लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥धृपद॥
जाळोनि संसार बैसलो अंगणी । तुझे नाही मनी मानसी हे ॥२॥
तुका म्हणे नको रागेजु विठ्ठला । उठी देई मला भेटी आता ॥३॥
अर्थ
देवा मला तुझे ब्रम्ह ज्ञान नको तुझे गोजिरे सगुण रूपच मला पुरे आहे. अरे देवा मला भेट देण्या करीता तू उशीर केला म्हणजे मी पतित पावन आहे या वचनाला तू विसरला आहे. अरे मी संसार जाळून अंगणात बसलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला तू असा माझ्या वर रागावू नकोस उठ आता तू मला लवकर भेट दे.
अभंग क्र. 249
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
तैसे तुज ठावे नाही तुझे नाम । आम्हीच ते प्रेमसुख जाणो ॥धृपद॥
माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटी । नाही त्याची भेटी भोग तिये ॥३॥
अर्थ
कमळ (कुमुदिनी) ला स्वतःचा परीमळ (सुगंध) समजतो काय पण भ्रमर (भुंगा) च त्याचे सुख भोगतो. अरे विठ्ठला तसेच तुझे नाम आहे ते किती गोड आहे ते तुला ठाऊक नाही पण त्या नामाचे भोग गोडी प्रेम सुख आम्ही जाणतो. गाय तृण (गवत) खाते आणि त्या गवताचे जे दुध तयार होते त्याची गोडी हि वासारालाच माहित आहे. पण ज्याची कमाई त्याच्या कामास येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात शिंपल्याच्या पोटात मोती जन्माला येतो पण ते का एकदा बाहेर आले परत त्या शिपंल्याला मोतीची भेट त्या मोतीचा आंनद मिळत नाही.
अभंग क्र. 250
काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा । अनुभव ठाउका नाही तुज ॥१॥
बोलता हे वाटे कैसे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥धृपद॥
आम्ही एकएका ग्वाही मायपुते । जाणो ते निरुते सुख दोघे ॥२॥
तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा । का तुम्ही गोपाळा नेणा ऐसे ॥३॥
अर्थ
आहो देवा तुमच्या चरणाचे सुख काय सांगावे ? कारण तुम्हाला त्या चरण सुखाचा अनुभव नाही. आम्ही तुला ते सांगितले तर तुला ते खरे वाटणार नाही कसे वाटेल कारण अमृताचे गुण अमृताला कळत नाही. त्या सुखाची ग्वाही फक्त आम्ही माया लेकरे जाणतो माता लक्ष्मी व आम्ही तिचे मुले आहोत ते सुख आम्ही दोघेच जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात हे गोपाळा आहो आम्हाला मोक्षाचा कंटाळा आहे हे तुम्ही का जाणत नाहीत.
अभंग क्र. 251
देखोनिया तुझा सगुण आकार । उभा कटी कर ठेवूनिया ॥१॥
तेणे माझ्या चित्ता झाले समाधान । वाटते चरण न सोडावे ॥धृपद॥
मुखे गातो गीत वाजवितो टाळी । नाचतो राउळी प्रेमसुखे ॥२॥
तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे । तुच्छ हे बापुडे सकळही ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला तुझा सगुण आकार जो कर कटेवर ठेऊन विटे वर उभा आहे ते रूप पाहून माझ्या चित्ताला समाधान झाले आहे असे वाटते कि तुझे चरण कधीच सोडू नये. मी मुखाने तुझे गुणगान गात हाताने ताळी वाजवीत प्रेम सुखाने नाचतो. तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला तुझ्या नामाच्या पुढे मला सर्व तुच्छ वाटते.
अभंग क्र. 252
आता येणेविण नाही मज चाड । कोण बडबड करील वाया ॥१॥
सुख तेचि दुःख पुण्यपाप खरे । हे तो आम्हा बरे कळो आले ॥धृपद॥
तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचे आता काम नाही ॥३॥
अर्थ
तुझे नाम घेणे या व्यतिरिक्त मला काहीही आवडत नाही उगाच व्यर्थ बडबड कोण करील. संसारातील जे सुख आहे खरे तर ते दुखच आणि जे आपण पुण्य म्हणतो ते नश्वर असल्यामुळे ते पापच होय कारण ते बंधन कारक असते हे आम्हाला चांगले कळून आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर आमची वाचा हि अनंताला वाहिली आहे त्यामुळे आणिक काही बोलायचे कामच उरले नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

