“२० जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २० July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २० जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २४०१ ते २४१२ चे पारायण आपण करणार आहोत.
२० जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ९०१ ते ९२५,
901-13
परी पै गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी । तैसी गुण इंद्रिये फुडी । नाही तेथ ॥901॥
परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते, तरी ती गोडी ढेपेच्या आकाराची झालेली नसते, त्याप्रमाणे (गुण व इंद्रिये यात जरी ब्रह्म वस्तु आहे तरी) ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये ही खरोखर नाहीत.
902-13
अगा क्षीराचिये दशे । घृत क्षीराकारे असे । परी क्षीरचि नोहे जैसे । कपिध्वजा ॥902॥
हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेमधे तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते.
903-13
तैसे जे इये विकारी । विकार नोहे अवधारी । पै आकारा नाम भोवरी । येर सोने ते सोने ॥903॥
त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे, परंतु जे विकार नाही असे समज. (ते कसे तर) ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सर्व सोने ते सोनेच आहे.
904-13
इया उघड मऱ्हाटिया । ते वेगळेपण धनंजया । जाण गुण इंद्रिया- । पासोनिया ॥904॥
अर्जुना, या उघड उघड मराठी (सोप्या) भाषेने सांगावयाचे म्हटले म्हणजे, तू गुणेंद्रियांपासून वस्तूचे वेगळेपण समज.
905-13
नामरूपसंबंधु । जातिक्रियाभेदु । हा आकारासीच प्रवादु । वस्तूसि नाही ॥995॥
नाम रूप, संबंध, जाति, क्रिया व भेद हे सर्व आकाराला बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही.
906-13
ते गुण नव्हे कही । गुणा तया संबंधु नाही । परी तयाच्याचि ठायी । आभासती ॥906॥
ते ब्रह्म कधी गुण होत नाही, आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात.
907-13
येतुलेयासाठी । संभ्रांताच्या पोटी । ऐसे जाय किरीटी । ना हेचि धरी ॥907॥
अर्जुना, एवढ्या मुळेच अज्ञानी लोकांच्या पोटात (मनात) असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते.
908-13
तरी ते गा धरणे ऐसे । अभ्राते जेवी आकाशे । का प्रतिवदन जैसे । आरसेनी ॥908॥
पण अर्जुना, त्या वस्तूचे गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो.
909-13
सूर्य प्रतिमंडल । जैसेनि धरी सलिल । का रश्मिकरी मृगजळ । धरिजे जेवी ॥909॥
पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते, अथवा सूर्याची किरणे जशी मृगजलाला धारण करतात.
910-13
तैसे गा संबंधेवीण । यया सर्वाते धरी निर्गुण । येरी ते वाया जाण । मिथ्यादृष्टी ॥910॥
अर्जुना त्याप्रमाणे वास्तविक संबंधावाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते. परंतु विकारास आधार आहे, हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
911-13
आणि यापरी निर्गुणे । गुणाते भोगणे । रंका राज्य करणे । स्वप्नी जैसे ॥911॥
आणि एखाद्या गरीब दरीद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय.
912-13
म्हणौनि गुणाचा संगु । अथवा गुणभोगु । हा निर्गुणी लागु । बोलो नये ॥912॥
म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग, यांचा निर्गुण ब्रह्माचे ठिकाणी संबंध आहे. हे बोलू नये. किंवा अयोग्य आहे.
बहिरंतश्च भूतानांमचरं चरमेव च ।
सूक्षमत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चांतिके च तत् ॥13. 15॥
भावार्थ ते भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आहे, चरही आहे, सूक्ष्मत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे, ते दूर आहे, व जवळही आहे.
913-13
जे चराचर भूता- । माजी असे पंडुसुता । नाना वन्ही उष्णता । अभेदे जैसी ॥913॥
परब्रह्माचे वर्णन पुढे चालू
अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते, त्याप्रमाने जे ब्रम्ह चराचर भुतांमध्ये असते.
914-13
तैसेनि अविनाशभावे । जे सूक्ष्मदशे आघवे । व्यापूनि असे ते जाणावे । ज्ञेय एथ ॥914॥
ह्या सर्व पदार्थाना सुक्ष्म स्थितीने व्यापुन नित्य अविनाश रुपाने {असंगत्वाने} असते. अशी जी वस्तु येथे ज्ञेय असे समझावे.
915-13
जे एक आंतुबाहेरी । जे एक जवळ दुरी । जे एकवाचूनि परी । दुजी नाही ॥915॥
जे एक (चराचरांच्या) आत व बाहेर, जे एक जवळ व दूर आहे, इतकेच नव्हे तर ज्याच्या स्वरुपात कधीही तिळमाञ फरक होत नाही.
916-13
क्षीरसागराची गोडी । माजी बहु थडिये थोडी । हे नाही तया परवडी । पूर्ण जे गा ॥916॥
अर्जुना, क्षीरसमुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार गोड व काठाशी थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत, त्याप्रमाणे ते नित्य सर्व बाजूंनी सारखे आहे.
917-13
स्वेदजादिप्रभृती । वेगळाल्या भूती । जयाचिये अनुस्यूती । खोमणे नाही ॥917॥
स्वेदजादिकरून वेगळाल्या प्राण्यात, ज्याच्या व्याप्तीत न्यूनता नाही. किंवा स्वेदज-अंडज-जारज आणि उद्भिज अशा चारही प्रकारच्या वेगवेगळ्या प्राण्यात ज्याच्या व्याप्तीस न्युनता नाही
918-13
पै श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेका- । माजी बिंबोनि चंद्रिका । न भेदे जेवी ॥918॥
हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरींमधे चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही, चंद्रबिंबास अनेकता येत नाही,
919-13
नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी । का कोडी एकी ऊसी । एकचि गोडी ॥919॥
मीठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो, अथवा कोट्यावधी उसात गोडी जशी एकच असते.
अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् ।
भूतभर्तृ च तज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥13. 16॥
भावार्थ ते तत्वत: अविभक्त असुनही, तरी भूतांचे ठिकाणी (नाना प्रकारच्या रूपांनी) विभागल्यासारखे आहे. भूतांचे पालन करणारे ते आहे. संहारकाली भूतांचा ग्रास करणारे व निर्माणकाली उत्पन्न करणारे ते आहे, याप्रमाणे जाणावे.
920-13
तैसे अनेकी भूतजाती । जे आहे एकी व्याप्ती । विश्वकार्या सुमती । कारण जे गा ॥920॥
परब्रह्मवर्णन पुढे चालू
त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमधे जे एकसारखे व्यापून राहिले आहे व हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे ब्रह्म विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे.
मुख्यसूची ओव्या श्लक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
921-13
म्हणौनि हा भूताकारु । जेथोनि तेचि तया आधारु । कल्लोळा सागरु । जियापरी ॥921॥
म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो, तेच ब्रह्म, त्या भूताकाराला आधार आहे.
922-13
बाल्यादि तिन्ही वयसी । काया एकचि जैसी । तैसे आदिस्थितिग्रासी । अखंड जे ॥922॥
बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था, या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड एकसारखे असते.
923-13
सायंप्रातर्मध्यान । होता जाता दिनमान । जैसे का गगन । पालटेना ॥923॥
सायंकाल, प्रात:काल व मध्यान्हकाल, या क्रमाने सबंध दिवसही होत जात असताना जसे आकाश बदलत नाही.
924-13
अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा । व्याप्ति जे विष्णुनामा । पात्र जाहले ॥924॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, जगाच्या उत्पत्तीकाली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तिकाली जे विष्णू या नावाला प्राप्त झाले,
925-13
मग आकारु हा हारपे । तेव्हा रुद्र जे म्हणिपे । तेही गुणत्रय जेव्हा लोपे । तै जे शून्य ॥925॥
मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी ज्यास रुद्र असे म्हणतात व रजसत्वतमादि तीन गुण (उत्पत्ती, स्थिती व लय) ते देखील नाहीसे होतात, त्यावेळेला जे ब्रह्म शून्य (निर्धर्म) होऊन रहाते.
दिवस २०१ वा. २०, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४०१ ते २४१२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २४०१
अनुभवावाचून सोंग संपादणे । नव्हे हे करणे स्वहिताचे ॥१॥
तैसा नको भुलो बाहिरल्या रंगे । स्वहित ते चि वेगे करूनि घेई ॥धृपद॥
बहुरूपी रूपे नटला नारायण । सोंग संपादून जैसा तैसा ॥२॥
पाषाणाचे नांव ठेविले देव । आणिका तारी भाव परि तो तैसा ॥३॥
कनक झाड ह्म वंदिले माथा । परि ते अर्था न मिळे माजी ॥४॥
तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास । अहंभावी नाश तोचि पावे ॥५॥
अर्थ
कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना एखाद्या गोष्टीविषयी सोंग संपादन करणे हे स्वहिताचे नाही. त्याप्रमाणे तू बाहेरील रंगाला भुलू नको स्वहित त्वरेने करून घ्यावे. बहुरूपी जरी नारायणाचे सोंग घेऊन नारायणा सारखा नटला तरी त्याच्या हृदय म्हणजे अंतकरण जसे असते ते तसेच असते ते काही नारायणा प्रमाणे होत नाही. धोत्रे च्या झाडाला कणक म्हणतात म्हणून ते काही सोने होत नाही. दगडाला कोरून जरी दगडाचा देव तयार केला तरी त्या देवा विषयी भाव आपल्याला तारतो परंतु दगड आहे तसाच राहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचा खरा भक्तिभाव आहे तोच भक्तिभाव त्याला तारण्यास मदत करतो परंतु ज्याच्या अंतःकरणा मध्ये अहंभाव आहे तोच त्याचा नाश करत असतो.
3:48 Sdm:
अभंग क्र. २४०२
मज नष्टा माया मोह नाही लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥
धिग हे शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥धृपद॥
मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥२॥
न दिसती मज आपलेसे गुण । संचित ते कोण जाणे मागे ॥३॥
तुका म्हणे देखोनिया काई । पांडुरंगा पायी राखियेले ॥४॥
अर्थ
अहो मी नष्ट आहे दुष्ट आहे माझ्या ठिकाणी मायामोह लोभ नाही कोणी माझा आदर केला तर मला त्याचा क्षोभ म्हणजे रागच येतो. माझ्या शरीराचा धिक्कार असो कारण मी कधीही कोणावर परोपकार केले नाही आणि माझ्यावर जर कोणी उपकार केले तर मी त्याचे आभार मानत नाही असा मी कृतघ्न आहे. अहो मला जर कोणी मिष्टांन्न खावयास दिले कोणी माझ्याशी गोड बोलले तर ते देखील मला आवडत नाही मग मला एक सांगा माझ्यापेक्षा नष्ट दुष्ट दुसरा येथे कोण आहे ? मला कोणीही आपलेसे वाटत नाही कोणाचेही चांगले गुण मला दिसत नाही सर्वत्र मी दोष पाहतो काय माझे मागचे संचित आहे काय माहित ? तुकाराम महाराज म्हणतात अहो या देवाने माझ्या मध्ये असे कोणता चांगलेपणा पाहिले ते मला काही कळत नाही आणि त्याने मला पायापाशी त्याच्या पायाजवळ ठेवले कसे हे देखील मला कळत नाही.
3:48 Sdm:
अभंग क्र. २४०३
उभ्या बाजारांत कथा । हे तो नावडे पंढरिनाथा ॥१॥
अवघे पोटासाठी सोंग । तेथे कैचा पांडुरंग ॥धृपद॥
लावी अनुसंधान । काही देईल म्हणऊन ॥२॥
काय केले रांडलेका । तुला राजी नाही तुका ॥३॥
अर्थ
उभ्या बाजारांमध्ये हरिकथा करणे असा प्रकार पंढरीनाथाला आवडत नाही. अहो हे सर्व सोंग पोट भरण्यासाठी केले जातात मग तेथे पांडुरंग तरी कसा राहील ? कथा करत असताना कोणीतरी आपल्याला श्रोतृवर्गा मधून काहीतरी अनुदान किंवा धन पैसे देईल यासाठी तो कथाकार लक्ष लावून बसलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात हे रांडलेका तू असे का केलेस तुझ्या अशा कर्माला मी तरी राजी नाही आणि तुला पांडुरंग ही मुळीच प्रसन्न होणार नाही.
3:49 Sdm:
अभंग क्र. २४०४
असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाई ॥१॥
आपंगिले मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥धृपद॥
वेदशास्त्रे जिसी वर्णिती पुराणे । तिचे मी पोसणे लडिवाळ ॥२॥
जिचे नाम कामधेनु कल्पतरू । तिचे मी लेकरू तुका म्हणे ॥३॥
अर्थ
अर्थ : लोकांचे कोणतेही बोल माझ्या शिरावर असो परंतु मला माझी विठाबाईच बरी आहे. माझी विठाबाई अंतरंगातून खूप कनवाळू आहे कृपाळू आहे तिनेच तर मला तिच्या ठिकाणी स्थान दिले आहे. वेदशास्त्र पुराने जिचे वर्णन करतात तिचे मी पोसणारे बाळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात जीचे नावच कामधेनू कल्पतरु आहे अशा विठाबाईचे मी लेकरू आहे.
3:49 Sdm:
अभंग क्र. २४०५
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥
पंढरीसी नाही कोणा अभिमान । पाया पडे जन एकमेका ॥२॥
तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरी यम न ये ॥३॥
अर्थ
अर्थ : मी वाराणसी गया द्वारका हे तीर्थक्षेत्र पाहिले परंतु पंढरीची सर कोणालाही येत नाही. पंढरी मध्ये कोणालाही अभिमान नाही तेथे सर्व लोक एकमेकांच्या पाया पडतात. तुकाराम महाराज म्हणतात जो एक वेळ पंढरीला जातो त्याच्या घरी यम येत नाहीत.
3:50 Sdm:
अभंग क्र. २४०६
सांडुनिया सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तीभावे ॥१॥
पाहूनिया झाडे वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावे ॥धृपद॥
वेचूनिया चिंध्या भरूनिया धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावे ॥२॥
तुका म्हणे ऐसे मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥३॥
अर्थ
अर्थ : सर्व लौकिकाची लाज टाकून दया आणि यदुराज म्हणजे पांडुरंगाला भक्तिभावाने आळवा. कोणतेही झाड पाहून त्याचा पाला वरबडावे व तो खाऊन विठ्ठलाला आळवावे. कोठेही पडलेल्या चिंध्या गोळा करून त्यात धागा भरून म्हणजे ते शिवून ढुंगणाला गुंडाळावे आणि देवाला आळवावे. तुकाराम महाराज म्हणतात असे वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याची नारायण कधीही उपेक्षा करत नाही.
3:50 Sdm:
अभंग क्र. २४०७
दहयाचिया अंगी निघे ताक लोणी । एका मोले दोन्ही मागो नये ॥१॥
आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे । दोहींशी समान पाहो नये ॥धृपद॥
पृथ्वीचा पोटी हिरा गारगोटी । दोहोसी समसाटी करू नये ॥२॥
तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजू नये ॥३॥
अर्थ
अर्थ : दह्याच्या अंगातून ताक आणि लोणी हे दोन्ही निघते परंतु दोघानाही एकाच मोलाने मागू नये. आकाशाच्या पोटामध्ये चंद्र आणि तारे आहेत परंतु दोघानाही एक सारखे पाहू नये. एकाच पृथ्वीच्या पोटात हिराही असतो आणि गारगोटी ही असतात परंतु दोघाचीही किंमत सारखी करून आदलाबदली कोणीही करू नये. तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्याप्रमाणे संतांना जसे भजतो तसे सामान्य लोकांना भजू नये.
3:50 Sdm:
अभंग क्र. २४०८
काय धर्म नीत । तुम्हा शिकवावे हित ॥१॥
अवघे रचियेले हेळा । लीळा ब्रम्हांड सकळा ॥धृपद॥
नाम महादेव । येथे निवडला भाव ॥२॥
तुका म्हणे वेळे । माझे तुम्हा का न कळे ॥३॥
अर्थ
अर्थ : हे शंकरा आम्ही तुम्हाला धर्म नीती काय म्हणून शिकवावे ? तुम्ही एका क्षणांमध्ये सर्व ब्रह्मांडाची लीला करून रचना केली आहे. देवा तुमचे नावच महादेव आहे म्हणजे येथे तुमच्या नावातच सर्व भेद निवडला गेला आहे महादेव म्हणजे सर्व देवांमध्ये तुम्ही महान आहात. तुकाराम महाराज म्हणतात अहो महादेवा तुम्ही सर्व जगाचे कल्याण करता परंतु माझ्या वेळेसच तुम्हाला माझे कल्याण करावे हीत करावे असे का कळत नाही ?
3:51 Sdm:
अभंग क्र. २४०९
भांडावे ते गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥
ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटा जवळा ॥धृपद॥
हाक देता दारी । येती जवळी सामोरी ॥२॥
तुका म्हणे शिवे । मागितले हाती द्यावे ॥३॥
अर्थ
अर्थ : महादेवा आम्ही तुमच्याशी जसे जसे भांडावे तसे तसे आम्हाला तुमच्या विषयी गोडी अधिक वाढत आहे आणि आमचे सर्व लाड ही पूर्ण होत आहेत. ही तुमच्या घरची रीतच आहे मला हे कसे कळले असेल तर मी तुमच्या जवळ कायम राहतो म्हणून मला हे समजले. तुम्हाला दारातून हाक दिली की तुम्ही लगेच धावत समोर येऊन जवळ येता. तुकाराम महाराज म्हणतात हे महादेवा तुमचे नावच शिव आहे आणि मग तुम्हाला भक्त जे काही मागतील ते लगेच त्याच्या हाती तुम्ही देता.
3:51 Sdm:
अभंग क्र. २४१०
तेरा दिवस जाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥१॥
पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी झाले तुज ॥धृपद॥
तुजवरी आता प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥
फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥४॥
अर्थ
अर्थ : हे अनंता मायबापा आज मी तुझ्या भेटी करता तेरा दिवस झाले तसे उपोषणाला बसलो आहे तरीदेखील तु मला पावत नाहीस. हे ऋषिकेषा तु पाषाणाची खोळ अंगावर घेऊन बसलास काय तुला झाले तरी काय. हे पांडुरंगा तुझ्या साठी मी माझा प्राण त्याग करील आणि माझ्या हत्येचा दोष तुझ्यावर घालीन. हे विठाबाई मी तुझ्या भेटीची फार आशा धरली आहे आणि भेट जर झाली नाही ना पांडुरंगा तर मी माझ्या जीवाचा नाश करील. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुझी भेट तरी घेईन किंवा माझा प्राण तरी सोडीन असा मी निर्णय घेतला आहे.
3:52 Sdm:
अभंग क्र. २४११
लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥
विषया वंचलो मीपणा मुकलो । शरण तुज आलो पांडुरंगा ॥धृपद॥
घर दार अवघी तजिली नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे पडिलो पुंडलिकापाशी । धाव हृषीकेशी आळिंगी मज ॥३॥
अर्थ
अर्थ : हे पांडुरंगा काही लोक फार वाईट आणि अमंगळ आहेत आता मी त्यांचा त्याग केला आहे. मी विषयासंबंधी सावध होऊन मीपणाला मुकलो आहे आणि त्यामुळे मी आता तुला पांडुरंगा शरण आलो आहे. हे नारायणा मी तुझ्यासाठी सर्व घरादाराचा त्याग केला आहे कारण तु माझ्या जीवाचे जीवन आहेस पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात हे ऋषिकेषा मी पुंडलिका जवळ पडलो आहे तरी तु माझ्या कडे धाव घे आणि मला आलिंगन द्यावे.
3:52 Sdm:
अभंग क्र. २४१२
करिसी की न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥
देसी की न देसी पायाचे दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाही ॥धृपद॥
बोलसी की न बोलसी मजसवे देवा । म्हणोनिया जीवा भय वाटे ॥२॥
होईल की न होय तुज माझा आठव । पडिला संदेह हाचि मज ॥३॥
तुका म्हणे मी कमाईचे हीण । म्हणऊनि सीण करी देवा ॥४॥
अर्थ
देवा तु माझा अंगिकार करशील की नाही याविषयी माझ्या मनात विचार पडला आहे. तु मला तुझ्या पायाचे दर्शन देशील की नाही याविषयी मला विचार पडला त्यामुळे माझे मन स्थिर नाही. देवा तु माझ्याशी बोलशील किंवा नाही याविषयी मला संदेह निर्माण झाला आहे म्हणून माझ्या जीवाला भय वाटते. देवा तुला माझी आठवण येईल की नाही याविषयी संदेह मला पडला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आजपर्यंत कोणतेही पुण्य कमावले नाही पुण्य कमावयाच्या बाबतीत मी हिन आहे त्यामुळे मला तुझी प्राप्ती होईल की नाही याविषयी शीन वाटत आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

