“२ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2 July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २१८५ ते २१९६ चे पारायण आपण करणार आहोत.
२ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ४५१ ते ४७५,
451-13
कैवल्यसुखासाठी । परमाणु घे किरीटी । उधळती पायांपाठी । चालता जे ॥451॥
अर्जुना, श्रीगुरू चालत असताना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते त्यातील रज:कण तो गुरुभक्त मोक्षसुखाच्या किंमतीचे समजतो.
452-13
हे असो सांगावे किती । नाही पारु गुरुभक्ती । परी गा उत्क्रांतमती । कारण हे ॥452॥
हे राहू दे, मी गुरुभक्तीसंबंधाने किती सांगू ? गुरूवरील प्रेमाला अंत नाही परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती झाली, हेच या विस्ताराचे कारण आहे.
453-13
जया इये भक्तीची चाड । जया इये विषयीचे कोड । जो हे सेवेवाचून गोड । न मनी काही ॥453॥
ज्याला या भक्तीची इच्छा आहे ज्याला याविषयी कौतुक आहे व जो या सेवेवाचून दुसरे काही चांगले मानत नाही,
454-13
तो तत्त्वज्ञानाचा ठावो । ज्ञाना तेणेचि आवो । हे असो तो देवो । ज्ञान भक्तु ॥454॥
तो पुरुष तत्वज्ञानाचे ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इभ्रत असते. हे वर्णन पुरे. अशी गुरूची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे.
455-13
हे जाण पा साचोकारे । तेथ ज्ञान उघडेनि द्वारे । नांदत असे जगा पुरे । इया रीती ॥455॥
ह्या रीतीने खरोखर तेथे (त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी) जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते, हे तू खरोखर समज.
456-13
जिये गुरुसेवेविखी । माझा जीव अभिलाखी । म्हणौनि सोयचुक॥ बोली केली ॥456॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) ह्या गुरुसेवेविषयी माझ्या अंत:करणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मार्ग सोडून गुरुभक्तीचे व्याख्यान केले.
457-13
एऱ्हवी असता हाती खुळा । भजनावधानी आंधळा । परिचर्येलागी पांगुळा- । पासूनि मंदु ॥457॥
नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा, मला डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याच्या कामी आंधळा आहे व सेवा करण्याविषयी पाय असून पांगळ्यापेक्षा मंद आहे.
458-13
गुरुवर्णनी मुका । आळशी पोशिजे फुका । परी मनी आथि निका । सानुरागु ॥458॥
वाचा असून गुरुवर्णनाविषयी मी मुका आहे व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे. परंतु माझ्या मनामधे गुरुभक्तीविषयी चांगले प्रेम आहे.
459-13
तेणेचि पै कारणे । हे स्थळ पोखणे । पडले मज म्हणे । ज्ञानदेवो ॥459॥
त्याच कारणामुळे ह्या (आचार्योपास्ति) पदाचे व्याख्यान विस्तृत करणे भाग पडले असे ज्ञानदेव म्हणतात.
460-13
परि तो बोलु उपसाहावा । आणि वोळगे अवसरु देयावा । आता म्हणेन जी बरवा । ग्रंथार्थुचि ॥460॥
तरी ते माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्याला सवड द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थच चांगला सांगेन.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-13
परिसा परिसा श्रीकृष्णु । जो भूतभारसहिष्णु । तो बोलतसे विष्णु । पार्थु ऐके ॥461॥
ऐका ! ऐका ! भूतांचे ओझे सहन करणारा विष्णू जो श्रीकृष्ण तो बोलत आहे व अर्जुन ऐकत आहे.
462-13
म्हणे शुचित्व गा ऐसे । जयापाशी दिसे । आंग मन जैसे । कापुराचे ॥462॥
श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे कापूर हा आत व बाहेर दोन्ही बाजूंनी स्वच्छ असतो, त्याप्रमाणे ज्याचे शरीर आणि अंत:करण ही शुद्ध असतात, अर्जुना, तशा प्रकारचे शुचित्व ज्याचे ठिकाणी असते.
463-13
का रत्नाचे दळवाडे । तैसे सबाह्य चोखडे । आत बाहेरि एके पाडे । सूर्यु जैसा ॥463॥
जसे रत्नाचे स्वरूप आतबाहेर चोख असते, अथवा सूर्य जसा आतबाहेर एकसारखा (प्रकाशमय) असतो.
464-13
बाहेरी कर्मे क्षाळला । भितरी ज्ञाने उजळला । इही दोही परी आला । पाखाळा एका ॥464॥
तसा बाहेरून जो कर्माने शुद्ध झालेला आहे व आतून तो ज्ञानाने शुद्ध झालेला आहे, अशा रीतीने जो या दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झालेला आहे.
465-13
मृत्तिका आणि जळे । बाह्य येणे मेळे । निर्मळु होय बोले । वेदाचेनी ॥465॥
वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी, ह्यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्मळ होते.
466-13
भलतेथ बुद्धीबळी । रजआरिसा उजळी । सौंदणी फेडी थिगळी । वस्त्रांचिया ॥466॥
बुद्धीच्या बळाने वाटेल तेथे आरसा धुळीने (मातीने) स्वच्छ करता येतो व परिटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते.
467-13
किंबहुना इयापरी । बाह्य चोख अवधारी । आणि ज्ञानदीपु अंतरी । म्हणौनि शुद्ध ॥467॥
फार काय सांगावे ? ऐक. याप्रमाणे त्याचे शरीर शुद्ध असते व मनात ज्ञानरूपी दिवा असतो. म्हणून अंतर शुद्ध असते असे समज.
468-13
एऱ्हवी तरी पंडुसुता । आत शुद्ध नसता । बाहेरि कर्म तो तत्त्वता । विटंबु गा ॥468॥
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आत मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीराने कर्मे करणे, ही विटंबना होय.
469-13
मृत जैसा शृंगारिला । गाढव तीर्थी न्हाणिला । कडुदुधिया माखिला । गुळे जैसा ॥469॥
प्रेतास जसे अलंकार घालून सजवले किंवा गाढवाला जसे तीर्थात स्नान घातले अथवा कडू असलेला दुध्या भोपळा जसा गुळाने चोपडला.
470-13
वोस गृही तोरण बांधिले । का उपवासी अन्ने लिंपिले । कुंकुमसेंदुर केले । कांतहीनेने ॥470॥
ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपवासी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले अथवा विधवेने कुंकू व शेंदूर लावला
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-13
कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील ते झळाळ । काय करू चित्रीव फळ । आंतु शेण ॥471॥
आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात त्यांच्या वरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लागो. शेणाची फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन, जरी ती हुबेहूब फळांसारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन काय करायचे आहे ? कारण त्यांच्या आत शेण आहे.
472-13
तैसे कर्मवरिचिलेकडा । न सरे थोर मोले कुडा । नव्हे मदिरेचा घडा । पवित्र गंगे ॥472॥
आत शुद्ध नसून केवल बाह्यात्कारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तर तो खपत नाही. जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही.
473-13
म्हणौनि अंतरी ज्ञान व्हावे । मग बाह्य लाभेल स्वभावे । वरी ज्ञान कर्मे संभवे । ऐसे के जोडे ? ॥473॥
म्हणून मनामधे ज्ञान असावे, मग बाह्य शुद्धि सहजच प्राप्त होईल. शिवाय ज्ञान व कर्म या दोहोंनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता कोठे मिळेल ?
474-13
यालागी बाह्य विभागु । कर्मे धुतला चांगु । आणि ज्ञाने फिटला वंगु । अंतरीचा ॥474॥
याकरता अर्जुना, बाहेरील भाग कर्माने चांगला धुतलेला (शुद्ध केलेला) आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकलेला आहे.
475-13
तेथ अंतर बाह्य गेले । निर्मळत्व एक जाहले । किंबहुना उरले । शुचित्वचि ॥475॥
त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्वे एक झाली, फार काय सांगावे ? केवल एक शुचित्व मात्र राहिले.
दिवस १८३ वा. २, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २१८५ ते २१९६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २१८५
जन्मा येऊनि का रे निदसुरा । जाये भेटी वरा रखुमाईच्या ॥१॥
पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळउत्तम ते ॥धृपद॥
संतमहंतसिद्धहरीदासदाटणी । फिटती पारणी इंद्रियांची ॥२॥
तुका म्हणे तेथे नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेई ॥३॥
अर्थ
अरे जन्माला येऊन तु असा झोपला का आहेस उठ आणि रुक्मिणी मातेच्या वराला पांडुरंगाला पंढरीस भेटण्यासाठी जावा. अरे त्याच्या भेटीने तुझे सर्व पाप ताप नाहीसे होईल आणि अढळ अशा उत्तम स्थितीला तु प्राप्त होऊ शकतो. अरे तेथे संत, महंत, सिद्ध, हरिदास यांची गर्दी झालेली आहे त्यांच्या गर्दीत तु जा म्हणजे तुला त्यांचे दर्शन होईल त्यांच्याकडून तुला हरी कथा ऐकण्यास मिळेल त्यांचे पदस्पर्श होईल अशाप्रकारे तुझ्या सर्व इंद्रियांचे पारणे फिटतील. तुकाराम महाराज म्हणतात अरे तेथे हरिनामाचा गजर चाललेला असतो आणि त्यानिमित्ताने तु अपार अशा लाभाला फुकट लुटून घेऊ शकतोस.
अभंग क्र. २१८६
काय धोविले कातडे । काळकुट भीतरि कुडे ॥१॥
उगा राहे लोकभांडा । चाळविल्या पोरे रांडा ॥धृपद॥
घेसी बुंथी पानवथा । उगा च हालविसी माथा ॥२॥
लावूनि बैसे टाळी । मन इंद्रिये मोकळी ॥३॥
हालवीत बैस माळा । विषयजप वेळोवेळा ॥४॥
तुका म्हणे हा व्यापार । नाम विठोबाचे सार ॥५॥
अर्थ
अरे वर तु देहाचे कातडे का धुतलेस अंतकरणात किती काम क्रोधाचे काळ कुट्ट खान आहे. अरे भांड खोरा तु जरा शांत रहा तु तुझ्या बायका पोरांना असे का फसवित आहेस. अरे तु अंगावर घोंगडी पाघरून घेऊन पाणवठ्यावर बसतोस आणि हारीच्या चिंतनाने फार आनंद होत आहे असे जगाला दाखवून उगाचच मान हलवीत असतोच. अरे तु डोळे लावून शांत बसतोस परंतु तुझे इंद्रिये आणि मन हे मोकळे सोडून देतोस. अरे तु पानवट्यावर हातात माळ घेऊन बसतोस खरा पण केवळ माळ हालवतोस परंतु तुझ्या अंतकरणात वेळोवेळी वेगळेच विषय जप चालू असतात. तुकाराम महाराज म्हणतात आता हा दंभाचा व्यापार तु टाकून दे आणि सर्व सार असलेले विठोबाचे नामच तु घेत रहा.
अभंग क्र. २१८७
येई वो येई वो येई धावोनिया । विलंब का वाया लाविला कृपाळे ॥१॥
विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठे गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥धृपद॥
न करी न करी न करी आता अळस अव्हेरु । व्हावया प्रकट कैचे दूरि अंतरु ॥२॥
नेघें नेघें नेघें माझी वाचा विसावा । तुका म्हणे हावा हावा हावा साधावा ॥३॥
अर्थ
हे विठाई तु लवकर ये लवकर ये लवकर धावत ये मला भेट देण्यासाठी तु व्यर्थ विलंब का लावलास हे कृपाळुये. हे विठाबाई माऊली तु विश्वंभर आहे भवसागराचा छेद करणारी आहेस सर्व विश्वव्यापक आहेस मग तु कुठे गुंतली आहेस माये. हे विठाबाई तु मला भेट देण्याकरता आता आळस किंवा माझा अव्हेर करू नकोस आणि माझ्यासमोर प्रकट होण्या करता तुला अंतर ते कसले, कारण तु तर सर्व विश्व व्यापकच आहेस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी भेट झाल्यावाचून माझी वाचा विश्रांती घेणार नाही ती सतत तुझे नामचिंतन करणार आहे कारण मला तुझी भेट व्हावी याची तीव्र इच्छा आहे मला तु हवा आहेस.
अभंग क्र. २१८८
तरि का पवाडे गर्जती पुराणे । असता नारायण शिक्तहीन ॥१॥
कीर्तीविण नाही नामाचा डांगोरा । येर का इतरा वाणीत ना ॥धृपद॥
तरि च म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखी गुणे ॥२॥
चांगलेपण हे निरुपायता अंगी । बाणले श्रीरंगा म्हणऊनि ॥३॥
तरि च हा थोर सांगितले करी । अभिमान हरीपाशी नाही ॥४॥
तुका म्हणे तरि करिती याची सेवा । देवापाशी हेवा नाही कुडे ॥५॥
अर्थ
हा नारायण जर शक्तीहीन असता तर पुरानाने त्याचे वर्णन एवढे गर्जुन का केले असते. एखाद्याच्या नामाचा महिमा मोठा असल्याशिवाय त्याची कीर्तिचा डांगोरा संपूर्ण विश्वात पसरत नाही, बरं वेदाने केवळ देवाच्या नावाचा डांगोरा का केला असेल इतरांचा का नाही ? देव स्वतः सुखी आहे आणि त्यांनी माझ्या जीवाला देखील सुखी केले आहे या गुणामुळेच मी देवाला चिरंजीव म्हणजे अमर आहे असे म्हणत आहे. खरोखरच या श्रीरंगाच्या ठिकाणी चांगलेपणा अतिशय बांदलेला आहे त्यामुळेच त्याचे वर्णन पुराणांनी केले आहे. हरीच्या ठिकाणी अभिमान नाही भक्तांनी कोणतेही काम सांगितले की तो लगेच करतो म्हणूनच तो थोर आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाला भक्तांचा केवळ हेवा आहे कुढिलपणा नाहि व या करताच भक्त हरिची सेवा करतात.
अभंग क्र. २१८९
तेव्हा धाले पोट बैसलो पंगती । आता आम्हा मुक्तिपाग काई ॥१॥
धावा केला आता येईल धावोन । येथे काही करणे न लगे संदेह ॥धृपद॥
गायनाचा आता कोठे उरला काळ । आनंदे सकळ भरी आले ॥२॥
देवाच्या सख्यत्वे विषमासी ठाव । मध्ये कोठे वाव राहो सके ॥३॥
तेव्हा जाली अवघी बाधा वाताहात । प्रेम हृदयात प्रवेशले ॥४॥
तुका म्हणे आह्मी जिंतिले भरवसा । देव कोठे दासा मोकलितो ॥५॥
अर्थ
ज्यावेळी मी देवा तुझ्या पंगतीला येऊन बसलो त्यावेळेस माझे पोट भरल्यासारखे झाले आता आम्हाला मोक्ष देखील दरिद्री प्रमाणे आहे. तुझा धावा केला की तु लगेच धाऊन येशील याविषयी काहीच संदेह राहिला नाही. आता तुझे नाम घेण्यासाठी देखील मला वेळ कुठे आहे कारण सर्वत्र आनंद भरलेला आहे. देवाशी माझी सख्यत्व झाले त्यामुळे आता कोठेही विषमतेचा ठाव राहिलेला नाही व राहणे ही शक्य नाही. हरीचे प्रेम ज्यावेळी माझ्या हृदयात भरले हरीच्या प्रेमाने ज्यावेळी माझ्या हृदयात प्रवेश केला त्यावेळी माझ्या अंतकरणातील काम क्रोध आणि अहंकाराची बाध झाला व त्यांची वाताहत झाली. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देवाला जिंकले आहे याविषयी भरवसा आम्हाला झाला आहे आणि तसेही देव त्याच्या भक्तांना कोठे मोकलत असतो काय म्हणजे विना आश्रित ठेवत असतो काय ?
अभंग क्र. २१९०
हेचि याच्या ऐसे मागावे दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥
धीर उदारी व निर्मळ निर्मत्सर । येणे सर्वेश्वर ऐसे नांव ॥धृपद॥
हाचि होईजेल याचिया विभागे । अनुभववी अंगे अनुभविल्या ॥२॥
जोडे तयाचे का न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥३॥
फावल्यामागे का न घालावी धाव । धरिल्या तरि हाव बळ येते ॥४॥
तुका म्हणे घालू खंडीमध्ये टांक । देवाचे हे एक करुनी घेऊ ॥५॥
अर्थ
आपण देखील नारायणा सारखेच व्हावे असेच दान नारायणाला वंदन करून मागावे. नारायणाच्या ठिकाणी धैर्य उदारपणा निर्मळता आणि निरमत्सर पणा हे सर्व गुण आहेत यामुळेच त्याला सर्वेश्वर हे नांव आले आहे. या गुणा पैकी एखादा ही गुण ज्यानी अंगी बांधला तरी तो नारायण रूपच होईल आणि हा अनुभव ज्याला असेल त्यालाच तो कळेल. जी गोष्ट आपल्याला प्राप्त होण्यासारखी आहे त्यासाठी कष्ट का करू नये आणि जर त्या विषयी आळस धरला तर आपले दैन्य पण कधीही नष्ट होणार नाही. जी गोष्ट आपल्याला सहज साध्य होणार आहे त्या गोष्टीच्या मागे धाव का न घ्यावी त्या गोष्टीविषयी तीव्र हाव धरली तर ती गोष्ट तुमच्या कडे बळेच येते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे खंडीभर धान्यांमधील थोडासा भाग घेऊन आपण आपल्या पोटात टाकतो त्याप्रमाणे देवाच्या एवढ्या लक्षणांपैकी एक लक्षण आम्ही आत्मसात करून घेऊ.
अभंग क्र. २१९१
सत्ताबळे येतो मागता विभाग । लावावया लाग निमित्य करू ॥१॥
तुझी ऐसी मुखे करू उच्चारण । बोले नारायण सांपडवू ॥धृपद॥
आसेविण नाही उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदी ॥२॥
तुका म्हणे आता व्हावे याजऐसे । सरिसे सरिसे समागमे ॥३॥
अर्थ
आपल्या भक्तीच्या सत्तेच्या बळावर देवाचे कोणतेही लक्षण आपल्याला मागितल्या बरोबर मिळू शकते आणि त्याच निमित्ताने देवासी संबंध जोडता येईल असे आपण काहीतरी करू. आपण आपल्या मुखाणे असं म्हणू, हे नारायणा आम्ही तुझेच बालके आहोत ना असेच लाडाने बोलून बोलून याला आपण वश करू. अपेक्षेविना मोह उत्पन्न होत नाही जसे स्त्रीची अपेक्षा असेल तर मग तिचा नवरा इतर कोणत्याही स्त्रीच्या फंदात पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता आपण या देवासारखे होऊ आणि त्याच्याच बरोबरीला राहून त्याची संगती करू.
अभंग क्र. २१९२
करिता होय होय चित्तचि नाही । घटापटा काही करू नये ॥१॥
मग हालत चि नाही जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥धृपद॥
साहत चि नाही काही पाकुळले । उगल्या उगले ढळत आहे ॥२॥
तुका म्हणे तरी बोलावे झांकून । येथे खुणे खूण पुरते चि ॥३॥
अर्थ
काही लोक वेदात शिकत असतांना केवळ हो समजलं हो समजलं असे म्हणतात परंतु त्यांचे चित्त त्याठिकाणी नसते मग जर समजत नसेल तर घट आणि पटाच्या नादालाच लागायचं नाही. मग आपण हो हो केले की सांगणाराही आपल्या जवळून हलतच नाही त्यापेक्षा अध्यात्म केला तर देवही आपल्या जवळून हालणार नाही घट पटाच्या नादी लागले की व्यर्थ शिणच आपल्याला शिनवत असतो. आपले मन चंचल असेल तर देव तेथे राहत नाही आणि मन जर स्थिर असेल तर देव तिथून हलत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात अध्यात्म शास्त्रांमध्ये आपले कितीही ज्ञान असेल तरीही ते झाकूनच बोलावे आणि बोलणे कसे असावे तर अधिकार संपन्न व्यक्ती पुढे केवळ खुणेनेच बोलावे म्हणजेच मर्यादेने बोलावे.
अभंग क्र. २१९३
संतसंगे याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तीमंत ॥१॥
घालूनिया काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरी वास दिला ॥धृपद॥
आपुलेसे जिंही नाही उरो दिले । चोजविता भले ऐसी स्थळे ॥२॥
तुका म्हणे नाही झांकत परिमळ । चंदनाचे स्थळ चंदन चि ॥३॥
अर्थ
जेथे संत संग आहे तेथे देव हा सर्व काळ वास करत असतो आणि संतांच्या संगे हा मूर्तिमंत सगळीकडे संचरून असतो. संतांनी संपूर्ण काळ म्हणजे कळीकाळाला बाहेर हाकलून लावले आहे आणि अंतकरणात देवाला स्थान दिले आहे. संतांनी आपल्या देहामध्ये अहमं भावाला अजिबात उरू दिले नाही व असे संत जेथे वास करून राहतात त्या स्थळांचा शोध घेणे केव्हाही चांगलेच. तुकाराम महाराज म्हणतात चंदन कितीही झाकून ठेवले तरी त्याचा सुगंध केव्हाच झाकल्या जात नाही चंदन ज्या ठिकाणी आपण ठेवतो ते संपूर्ण स्थळच चंदनासारखे होते कारण त्याचा सुगंध त्या स्थळाला लागला जातो त्याप्रमाणे संत जेथे वास करतात ते स्थळ पवित्र व निर्मळ होते.
अभंग क्र. २१९४
पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगी ॥१॥
अंतर्बाही विलेपन । हे भूषण मिरवू ॥धृपद॥
इच्छेऐसी आवडी पुरे । विश्वंभरे जवळी ॥२॥
तुका करी नारायण । या या सेवन नामाचें ॥३॥
अर्थ
श्रीरंगाच्या दर्शनाने शरीर पुष्ट होते, शरीरावर कांती येते, डोळ्याची भूक भागते आणि विविध प्रकारचे सुख सोहळे साजरे होतात. त्यामुळे आम्ही आमच्या अंतर बाह्य रंगात हरीच्याच सुख सोहळ्याचे विलेपण म्हणजेच उटी लाऊन त्याचेच भुषण मिरवीत आहोत. त्या विशंभरा जवळ आपण आपल्या आवडीचे जी इच्छा बोलू ती इच्छा पूर्ण होत असते. तुकाराम महाराज म्हणतात मला जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मी नारायण या नावाचे सेवन करत आहे.
अभंग क्र. २१९५
सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवीच ॥१॥
करुनि सेवू नानापरी । राहे उरी गोडीने ॥धृपद॥
सरे ऐसा नाही झरा । पंक्ती करा समवेत ॥२॥
तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाई माउलीचा ॥३॥
अर्थ
नामसंकीर्तनामुळे मला दिवस काय आणि रात्र काय हे समजत नाही कारण मी नित्य नवा दररोज तृप्तीचा अनुभव घेत आहे. नामाचे विविध प्रकार आहेत त्यापैकी कोणताही एक प्रकार आम्ही आवडीने सेवन करू आणि पुन्हा ती गोडी चाखण्याची इच्छा शिल्लक राहतेच. हरिभक्तांच्या पंक्तीत बसून कितीही नामाचे सेवन केले तरी तो प्रेम सुखाचा झरा संपत नाही सरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कान्हाबाई माऊलीचा हा नाम सुखाचा पान्हा फारच सुख देणार आहे.
अभंग क्र. २१९६
पाहता तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥
ज्याचे त्याचे मिळणी मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥धृपद॥
जाणिवेचे नेदी अंग । दिसे रंग निवडेना ॥२॥
तुका म्हणे ये चि ठायी । हे तो नाही सर्वत्र ॥३॥
अर्थ
या हरीला वरवर पाहण्यास गेले तर हा एकटा दिसतो पण आत्मदृष्टीने पाहिले तर सर्वत्र कसा व्यापक आहे ते पहा. हा हरी जगामध्ये ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्याच्या त्याच्यात मिसळत असतो आणि विविध रूपाने येथे खेळ खेळत असतो. हा हरी मुळतहाच आनंदरुप आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रंग आहेत परंतु ज्ञानाने समजणारा हा विषय नाही आणि त्यामधून वेगळा कोणता रंग ही निवडता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा हरी एकाच ठिकाणी आहे असे नाही तर तो सर्वत्र व्यापक आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

