Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१८ जुलै, दिवस १९९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ८५१ ते ८७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २३७७ ते २३८८

18 July NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI1

18 July NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI1

“१८ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 18 July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १८ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २३७७ ते २३८८ चे पारायण आपण करणार आहोत.
१८ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ८५१ ते ८७५,

851-13
जे ज्ञानपदे अठरा । केलिया येरी मोहरा । अज्ञान या आकारा । सहजे येती ॥851॥
कारण की ज्ञानाची अठरा पदे उलट फिरवली उदा. अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात.
852-13
मागा श्लोकाचेनि अर्धार्धे । ऐसे सांगितले श्रीमुकुंदे । ना उफराटी इये ज्ञानपदे । तेचि अज्ञान ॥13-852॥
मागे (या अध्यायाच्या) अकराव्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसर्‍या अर्ध्यामधे श्रीमुकुंदाने (श्रीकृष्णाने) असे संगितले की ही ज्ञानपदे उलट केली की तेच अज्ञान होय.
853-13
म्हणौनि इया वाहणी । केली म्या उपलवणी । वाचूनि दुधा मेळऊनि पाणी । फार कीजे ? ॥853॥
ज्ञानदेवांचा परिहार
म्हणून अशा रीतीने (अज्ञानं यदतोऽन्यथा या पदाचे) मी विस्तारपूर्वक वर्णन केले नाही, तर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढावयाचे.
854-13
तैसे जी न बडबडी । पदाची कोर न सांडी परी । मूळध्वनीचिये वाढी । निमित्त जाहलो ॥854॥
महाराज, त्याप्रमाणे पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे मी बडबडत नाही. श्लोकातील पदांची हद्द मी सोडीत नाही. परंतु मूळश्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो.
855-13
तव श्रोते म्हणती राहे । के परिहारा ठावो आहे ? । बिहिसी का वाये । कविपोषका ? ॥855॥
श्रोतेकृत ज्ञानदेव स्तुती =
तेव्हा श्रवणास बसलेली संतमंडळी म्हणतात, थांब, परिहाराला जागा कोठे राहिली आहे ? हे कविपोषका, तू व्यर्थ का भितोस ?


856-13
तूते श्रीमुरारी । म्हणितले आम्ही प्रकट करी । जे अभिप्राय गव्हरी । झाकिले आम्ही ॥856॥
जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रगट कर ” असे तुला श्रीमुरारींनी (श्रीकृष्णाने) सांगितले.
857-13
ते देवाचे मनोगत । दावित आहासी तू मूर्त । हेही म्हणता चित्त । दाटैल तुझे ॥857॥
देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रगट करावेस हे जे देवाचे मनोगत, ते तू आपल्या वक्तृत्वाने (अज्ञानाची लक्षणे सांगण्याने) स्पष्ट दाखवीत आहेस, असे म्हणण्याने देखील तुझे चित्त संतमंडळी माझी स्तुति करीत आहेत असे तुला वाटून त्या भाराने दडपून जाईल.
858-13
म्हणौनि असो हे न बोलो । परि साविया गा तोषलो । जे ज्ञानतरिये मेळविलो । श्रवण सुखाचिये ॥858॥
म्हणून हे राहू दे, आम्ही हे बोलत नाही, परंतु अरे, आम्हास सहज संतोष झाला आहे. कारण की श्रवणसुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा (होडीचा) तू आम्हास योग करून दिला आहेस.
859-13
आता इयावरी । जे तो श्रीहरी । बोलिला ते करी । कथन वेगा ॥859॥
तर आता यानंतर तो श्रीहरी जे काही बोलला, ते लवकर सांग पटकन सांग.
860-13
इया संतवाक्यासरिसे । म्हणितले निवृत्तिदासे । जी अवधारा तरी ऐसे । बोलिले देवे ॥860॥
पुढील विषयाची प्रस्तावना =
असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तिदास (ज्ञानेश्वरमहाराज) म्हणाले की तर महाराज, ऐका, असे म्हणाले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


861-13
म्हणती तुवा पांडवा । हा चिन्हसमुच्चयो आघवा । आयकिला तो जाणावा । अज्ञानभागु ॥861॥
अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज.
862-13
इया अज्ञानविभागा । पाठी देऊनि पै गा । ज्ञानविखी चांगा । दृढा होईजे ॥862॥
अर्जुना, या अज्ञानभागाकडे पाठ करून म्हणजे या अज्ञानभागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो.
863-13
मग निर्वाळिलेनि ज्ञाने । ज्ञेय भेदैल मने । ते जाणावया अर्जुने । आस केली ॥863॥
मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ज्ञेयात (ब्रह्मवस्तूत) प्रवेश होईल ते ज्ञेयस्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली.
864-13
तव सर्वज्ञांचा रावो । म्हणे जाणौनि तयाचा भावो । परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो । सांगो आता ॥864॥
तेव्हा सर्वज्ञांचे राजे, जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात, आता ज्ञेयाचे स्वरूप तू ऐक, आम्ही तुला सांगतो.
ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ञात्वा~मृतमश्नुते ।
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥13. 12॥
भावार्थ ~> जे जाणले असता (मनुष्य) अमृतत्व पावतो, ते जे ज्ञेय, ते मी सांगतो ते हे की आदिरहित परब्रह्म होय ते सत् ही नाही व असत् ही नाही असे ज्ञाते म्हणतात.
865-13
तरि ज्ञेय ऐसे म्हणणे । वस्तूते येणेचि कारणे । जे ज्ञानेवाचूनि कवणे । उपाये नये ॥865॥
परब्रह्म वर्णन तर ब्रम्हाला
ज्ञेय म्हणावयाचे, ते एवढ्याकरता की ते (ब्रह्म) ज्ञानावाचून दुसर्‍या कोणत्याही उपायांनी जाणले जात नाही.


866-13
आणि जाणितलेयावरौते । काहीच करणे नाही जेथे । जाणणेचि तन्मयाते । आणी जयाचे ॥866॥
आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावयाचे रहात नाही व ज्याचे ज्ञान जाणणाराला ज्ञेयस्वरूप करते.
867-13
जे जाणितलेयासाठी । संसार काढूनिया कांठी । जिरोनि जाइजे पोटी । नित्यानंदाच्या ॥867॥
जे ज्ञेयस्वरूप जाणल्यामुळेच संसाराचे कुंपण काढून टाकून संसाराचा निरास करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे म्हणजे नित्यानंदरूप व्हावे.
868-13
ते ज्ञेय गा ऐसे । आदि जया नसे । परब्रह्म आपैसे । नाम जया ॥868॥
अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की ज्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावत:च नाव आहे.
869-13
जे नाही म्हणो जाइजे । तव विश्वाकारे देखिजे । आणि विश्वचि ऐसे म्हणिजे । तरि हे माया ॥869॥
जे नाही म्हणायला जावे, तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि जे ब्रह्म विश्वच आहे, असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे.
870-13
रूप वर्ण व्यक्ती । नाही दृश्य दृष्टा स्थिती । तरी कोणे कैसे आथी । म्हणावे पा ॥870॥
त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप, रंग व आकार ही नाहीत व दृश्य (पहाण्याचा विषय) व द्रष्टा (पहाणारा) ही स्थिती नाही. असे असल्यामुळे ते आहे, हे कोणी व कसे म्हणावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


871-13
आणि साचचि जरी नाही । तरी महदादि कोणे ठाई । स्फुरत कैचे काई । तेणेवीण असे ? ॥871॥
आणि (असे आहे म्हणून) जर ते खरोखरच नाही असे म्हणावे, तर महतत्त्वादिक कोणाच्या ठिकाणी स्फुरतात ? व त्याच्यावाचून कोठले काय आहे ? त्याच्यावाचून दुसरे काहीच नाही).
872-13
म्हणौनि आथी नाथी हे बोली । जे देखोनि मुकी जाहली । विचारेसी मोडली । वाट जेथे ॥872॥
म्हणून जे ब्रह्म पाहून ‘आहे, नाही ” ही भाषा मुकी झाली, जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही व ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही.
873-13
जैसी भांडघटशरावी । तदाकारे असे पृथ्वी । तैसे सर्व होऊनिया सर्वी । असे जे वस्तु ॥873॥
डेरा, घागर व परळ यामधे माती जशी त्या त्या आकाराने असते, त्याप्रमाने जी वस्तु ब्रह्मवस्तु सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे.

सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो~क्षिशिरोमुखम् ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥13. 13॥
भावार्थ त्याचे हस्तपाद सर्वत्र आहेत (ते विश्वबाहू किंवा विश्वांघि आहे). त्याचे नेत्र-शिर-मुख सर्वत्र आहेत. त्याचे कान सर्वत्र आहेत, ते विश्वामधे सर्वाला व्यापून राहिले आहे आहे.
874-13
आघवाचि देशी काळी । नव्हता देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळी । तेचि हात जयाचे ॥874॥
परब्रह्म पुढे चालू)
ज्ञा – सर्व देशांमधे व सर्व कालांमधे देशकालाहून जी वस्तु वेगळी न होता, जी क्रिया स्थूल व सूक्ष्माकडून (देहाकडून व अंत:करणाकडून) होते तेच (ती क्रियाच) ज्याचे (ब्रह्माचे) हात आहेत.
875-13
तयाते याकारणे । विश्वबाहू ऐसे म्हणणे । जे सर्वचि सर्वपणे । सर्वदा करी ॥875॥
या कारणास्तव या वस्तूला विश्वबाहु असे म्हटलेले आहे. कारण की ती वस्तु सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते.

दिवस १९९ वा. १८, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २३७७ ते २३८८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २३७७
अनंत ब्रम्हांडे । एके रोमी ऐसे धेडे ॥१॥
तो या गौळियांचे घरी । उंबरा चढता टेंका धरी ॥धृपद॥
मारीले दैत्य गाडे । ज्यांचे पुराणी पवाडे ॥२॥
तुका म्हणे कळा । अंगी जयाच्या सकळा ॥३॥
अर्थ
अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका केसावर आहे असा जो विराट हरी आहे, असा हा हरी गवळ्यांच्या घरी त्यांचा उंबरा चढतांना हाताचा ठेका धरतो. या हरीने अनेक प्रकारचे मोठे मोठे प्रकारचे बलवान दैत्य मारले आहेत असे पुरानाने पवाडे गाऊन वर्णन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला आणि चातुर्य त्याच्या अंगी आहेत.
5:37

अभंग क्र. २३७८
सावधान ऐसे काय ते विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥
अंती समयाचा करणे विचार । वेचती सादर घटिका पळे ॥धृपद॥
मंगळ हे नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥२॥
तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥३॥
अर्थ
जन्माला आलेल्या सर्व लोकांनी आपण जन्माला येऊन काय करावे याचा सावधानतेने विचार करावा. आपले अंतकाळी काय होणार याविषयी विचार करावा कारण आपला प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ हे संसारातील कामे करण्यातच खर्च होत आहे. मुलांचे व मुलींचे सर्व काही व्यवस्थित करून देणे म्हणजे मंगल आहे असे नाही तर परमात्मा व आपल्या मध्ये जो लौकिकाचा आतरपाट आहे तो बाजूला सारून देणे हे महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात लौकिकामुळेच तुमच्यापासून देव अंतरला आहे व तुमच्या डोळ्यावर अज्ञानाचा अंधार पडला आहे.
5:37

अभंग क्र. २३७९
लवण मेळविता जळे । काय उरले निराळे ॥१॥
तैसा समरस जालो । तुजमाजी हरपलो ॥धृपद॥
अग्नीकर्पुराच्या मेळी । काय उरली काजळी ॥२॥
तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥३॥
अर्थ
मीठ जर पाण्यामध्ये मिसळले तर ते पाण्यापेक्षा वेगळे होऊन राहते काय ? त्याप्रमाणे देवा मी तुझ्याशी समरस झालो असून तुझ्यातच मी हरवून गेलो आहे. अग्नी आणि कापूर यांचे मीलन झाले मग तेथे काजळी म्हणून काही शिल्लक राहते काय ? तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी एक ज्योत आणि तुझी एक ज्योत दोन्ही मिळवल्या तर अग्नी एकच उरतो त्याप्रमाणे आपल्या दोघाचेही आत्मज्योत एकच झाली आहे.
5:38

अभंग क्र. २३८०
सुख नाही कोठे आलिया संसारी । वाया हावभरी होऊ नका ॥१॥
दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाही कोठे ॥धृपद॥
चवदा कल्पेवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखाली ॥२॥
तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया । धरूनि हृदयामाजी हरी ॥३॥
अर्थ
या संसारात आल्यानंतर सुख कोठेही नाही त्यामुळे तुम्ही व्यर्थ हावभरी होऊ नका. संसार म्हणजे दुःखाचा बंदीखाणा आहे त्यामुळे येथे कोठेही सुखाचा विचार करता येत नाही. चौदा कल्प आयुष्य ज्याला आहे असा मार्कंडेय ऋषी सूर्यकिरणांच्या पासून त्रास होतो म्हणूनच झोपडी बांधून त्या खाली राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे या बंदी खाण्यातून लवकर सुटून जा आणि हरीला हृदयात साठवून ठेव.
5:38

अभंग क्र. २३८१
तुज करिता होय ऐसे काही नाही । डोंगराची राई रंक राणा ॥१॥
अशुभाचे शुभ करिता तुज काही । अवघड नाही पांडुरंगा ॥धृपद॥
सोळा सहस्त्र नारी ब्रम्हचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥
पंचभ्रतार द्रौपदी सती । करिता पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥
दशरथा पातके ब्रम्हहत्ये ऐसी । नवल त्याचे कुशी जन्म तुझा ॥४॥
मुनेश्वरा नाही दोष अनुमात्र । भांडविता सुत्र वध होती ॥५॥
तुका म्हणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायी जालो देवा ॥६॥
अर्थ
देवा तु मनात आणले तर काय करू शकत नाहीस डोंगराचे मोहरी आणि रंकाचा राजा तु करू शकतोस. हे पांडुरंगा अशुभाचे शुभ करणे हे तुझ्यासाठी काही अवघड नाही. देवा तुला सोळा सहस्त्र बायका असूनही तु ब्रम्‍हचारी कसा आणि दुर्वास ऋषींनी साठ खंड्या अन्न खाऊन देखील ते नीराहारी कसे हे आश्चर्य नाही काय ? देवा पाच पतींचा भोग घेऊन देखील द्रोपदी सती म्हणजे पतीव्रता कशी आणि भीष्माचार्य सारख्या पित्रांचा वध करूनही धर्मराजाला पुण्य कसे प्राप्त झाले ? देवा दशरथ राजाने ब्रम्‍हहत्या केली व पातकांची राशी ठरला तरीदेखील तु त्याच्या कुशीत जन्म घेतलास हे नवल नाही काय ? नारद मुनींनी अनेक ठिकाणी चहाडी लावून भांडणे लावून दिली व त्या भांडणांमध्ये अनेक लोकांचे वध देखील झाले आहेत परंतु त्यांना अनुमात्र सुद्धा दोष लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मग यांच्या सर्वाच्या दोषा पुढे माझे दोष ते किती आहेत आता मी तुझ्या पायाशी सरता झालो आहे व निष्पाप होऊन तुझ्याच ठिकाणी राहिलो आहे.
5:38

अभंग क्र. २३८२
आवडीच्या ऐसे झाले । मुखा आले हरीनाम ॥१॥
आता घेऊ धणीवरी । मागे उरी नुरे तो ॥ध्रु॥
साठवण मना ऐसी । पुढे रासी अमुप ॥२॥
तुका म्हणे कारण झाले । विठ्ठल या ती अक्षरी ॥३॥
अर्थ
माझ्या मुखा मध्ये हरिनाम आले हे माझ्या आवडीनुसार झाले आहे. आता हे हरिनाम इतके सेवन करू की मागे परत बाकी शिल्लक राहिली नाही पहिजे. हरिनाम साठवण्यासाठी मना सारखी मोठी जागा आहे आणि पुढे हरिनामाची अमुप राशी देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल या तीन अक्षरांनेच माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे.
5:39

अभंग क्र. २३८३
उपजोनिया मरे । परि हेचि वाटे बरे ॥१॥
नाही आवडीसी पार । न म्हणावे जाले फार ॥धृपद॥
अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥२॥
तुका म्हणे पचे । विठ्ठल हे मुखा साचे ॥३॥
अर्थ
हरिनाम घेण्यासाठी किती वेळा जन्माला येऊन मेलो तरी मला काही वाटणार नाही कारण हरिनाम हेच मला बरे वाटते. कारण हरीच्या नावाविषयी मला इतकी आवड आहे की त्याला पारावारच नाही ते किती घेतले तरी असे वाटत नाही की आता बास झाले. हरीचे नाम म्हणजे जणू अमृताची खानच उघडली आहे ते कितीही घेतले तरी मनाची तृप्तिच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हे नाम मुखाने आवडीने घेउन मनाला ते पचते देखील.
5:39

अभंग क्र. २३८४
लटिकेची साच दाविले अचळ । पिडीतसे काळ किती म्हणू ॥१॥
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला । का गा हा दाविला जगदाकार ॥धृपद॥
सांभाळी सांभाळी आपुली हे माया । आम्हासी का भयभीत केले ॥२॥
रूप नाही त्यासी ठेविले नाम । लटिकाची भ्रम वाढविला ॥३॥
तुका म्हणे का गा झालासी चतुर । होतासी निसूर निर्विकार ॥४॥
अर्थ
हे विठ्ठला अरे तु हे खोटे जगत आम्हाला सत्य भासवले आहे व आम्ही ते खरे मानून विषयातच सुख मानीत बसलो आहोत त्यामुळे आम्हाला काळ किती त्रास देतो आहे तुच बघ. हे विठ्ठला अरे तुच एक सत्य आहेस सत्य आहेस सत्य आहेस मग आम्हाला हा जगताचा आकार का दाखविलास ? देवा तुम्ही तुमची माया आता आवरा त्या मायेने आम्हाला भयभीत का केले आहे ? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही इतके चतुर का झाला आहात अहो तुम्ही पूर्वी निर्विकार निर्गुण होते ना ते बरे होते.
5:40

अभंग क्र. २३८५
आमच्या कपाळे तुज ऐसी बुद्धी । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥
काय या राहिले विनोदावाचून । आपुलिया भिन्न केले आम्हा ॥धृपद॥
कोठे मूर्त्तिमंत दावी पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥२॥
तुका म्हणे आता आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा आमच्या भाग्यानेच तुला अशी बुद्धी आली असावी म्हणजे आम्हाला भयातून आणि उपवत त्रासातून मुक्त न करण्याची बुद्धी आली असावी, असे म्हणजे आम्हाला भयातून व त्रासातून मुक्त करण्याचा योग पुन्हा येणार नाही, देवा तु आपल्यापासून आम्हाला भिन्न केलेस परंतु आमची अशी चेष्टा करण्यावाचून तुझे काही खोळबंले होते काय ? देवा मूर्तिमंत पाप पुण्य कोठे आहे ते आम्हाला प्रत्यक्ष दाखव उगाच कशाचाही संकल्प आम्हाला का वाहायला लावतोस ? तुकाराम महाराज म्हणतात देवा पांडुरंगा आता तुमची ही चेटूक गिरी तुम्ही आवरा आणि आमच्या पाठीमागे लावलेली कोटी पीडा ही नाहीशी करा.
5:40

अभंग क्र. २३८६
न बोलावे ऐसे जनासी उत्तर । करितो विचार बहु वेळा ॥१॥
कोण पाप आड ठाकते येऊन । पालटिति गुण अंतरीचा ॥धृपद॥
संसारा हाती सोडवूनि गळा । का हे अवकळा येती पुढे ॥२॥
तुका म्हणे सेवे घडेल अंतराय । यास करू काय पांडुरंगा ॥३॥
अर्थ
सामान्यतः कोणत्याही लोकांशी मी बोलू नये असाच मी खूप वेळा विचार करतो. परंतु कोणते पाप आडवे येऊन उभा राहते कुणास ठाऊक माझ्या अंतरंगातील विचार गुण एकदमच बदलून जातो. संसाराच्या हातून माझा गळा मी सोडून घेतला आहे तरीदेखील माझ्यापुढे अशी अवकळा का येते हे मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्या सेवेत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अडथळा येतोच आता याला मी काय करू ?
5:40

अभंग क्र. २३८७
आता हे उचित माझे जना हाती । पाहिजे फजीती केली काही ॥१॥
मग हे तुमचे न सोडी चरण । त्रासोनिया मन येईल ठाया ॥धृपद॥
वाउगे वाणीचा न धरी काटाळा । ऐसी का चांडाळा बुद्धी मज ॥२॥
तुका म्हणे जरि माथा बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढे ॥३॥
अर्थ
देवा आता मला असे वाटते की लोकांच्या हातून माझी काहीतरी फजिती घडली पाहिजे. कारण माझी फजिती केली की मला त्रास होईल आणि त्रास झाला की माझे मन तुमच्याकडे ओढ घेईल मग त्या वेळेस मी तुमचे चरण सोडणारच नाही. व्यर्थ बोलण्यासाठी माझी वाणी कधीही कंटाळा धरत नाही अशी माझी चांडाळ बुद्धी का झाली आहे काय माहित ? तुकाराम महाराज म्हणतात एकदा की माझ्या माथ्यावर फजितीचे घाव बसले की मग पुढे व्यर्थ लोकांशी बोलण्यासाठी जागाच राहणार नाही.
5:41

अभंग क्र. २३८८
मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥१॥
अपराध माझे न मनावे मनी । तुम्ही संतजनी मायबापी ॥धृपद॥
आरुषा वचन लेकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥२॥
तुका म्हणे अंगी काय नाही सत्ता । परि निष्ठुरता उपेजना ॥३॥
अर्थ
बाळाची आपल्या आईवर सत्ता असते त्याला कारण म्हणजे प्रेम असते आणि आईही त्या बालकाचे लाडाने पालन-पोषण करते तेही कोणतेही संकोच न करता. त्याप्रमाणे हे संतजनहो तुम्ही माझे मायबाप आहात तुम्ही माझे कोणतेही अपराध मनावर घेऊ नयेत. बाळाचे बोबडे बोल आणि त्याचा हट्ट सहन करून आई पुन्हा पुन्हा त्या बाळाला कवटाळत असते. तुकाराम महाराज म्हणतात बाळाला मारण्याची सत्ता आईच्या अंगात नसती काय परंतु लेकराविषयी कोणत्याही प्रकारची निष्ठुरता आईच्या अंगी उत्पन्न होत नाही.

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version