Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१७ जानेवारी, दिवस १७, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी १२६ ते १५०, सार्थ तुकाराम गाथा अभंग १९३ ते २०४

17 JANUARY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

17 JANUARY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“१७ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 17 January

राम कृष्ण हरी आज दिनांक १७ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

126-2
या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत । ते तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥126॥
या विश्वामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे. (असे गुप्त रुपाने असलेले चैतन्य जे) तत्व जाणणारे (तत्वज्ञानी) संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.
127-2
सलिली पय जैसे । एक होऊनि मीनले असे । परी निवडूनि राजहंसे । वेगळे कीजे ॥127॥
ज्याप्रमाणे दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात मिसळून गेलेलं असते, तरी पण राजहंस ज्याप्रमाणे पाण्यातून दूध निवडून वेगळे करतो.
128-2
की अग्निमुखे किडाळ । तोडोनिया चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥128॥
किंवा (सोनार) सुवर्णजाणकार अग्नीच्या साहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात; .
129-2
ना तरी जाणिवेच्या आयणी । करिता दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणी । दिसे जैसे ॥129॥
अथवा, चतुरपणाने दही घुसळल्यानंतर (दह्यातून लोणी वेगळी करण्याची प्रक्रिया), ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते.
130-2
की भूस बीज एकवट । उपणिता राहे घनवट । तेथ उडे ते फलकट । जाणो आले ॥130॥
किंवा एकत्र झालेले (धान्यात मिसळलेला टरफल, व्यर्थ केर) भूस व धान्य उफणले (पाकडल्यानंतर) धान्य खाली राहून (व्यर्थ कचरा) फोलकट निघून जाते. (धान्य निवडण्याची प्रक्रिया).
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

131-2
तैसे विचारिता निरसले । ते प्रपंचु सहजे सांडवले । मग तत्त्वता तत्त्व उरले । ज्ञानियासि ॥131॥
याप्रमाणे विचार केला, तर अनित्य प्रपंच सहजपणे नाहीसा होतो आणि मग ज्ञानी पुरुषांना एक तत्व (ब्रम्ह) मात्र उरते.
132-2
म्हणौनि अनित्याच्या ठायी । तया आस्तिक्यबुद्धि नाही । निष्कर्षु दोहीही । देखिला असे ॥132॥
म्हणून ज्यांनी (ज्ञानी पुरुषांनी) सत आणि असत या दोन्हीमधील सार ओळखले (निष्कर्ष जाणला), त्यांचा अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी, त्या नित्य आहेत, असा निश्चय नसतो.

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥2. 17॥


ज्याने हे सारे विश्व व्यापलेले आहे, ते अविनाशी आहे आणि त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही.
133-2
देखे सारासार विचारिता । भ्रांति ते पाही असारता । तरी सार ते स्वभावता । नित्य जाणे ॥133॥
पाहा सारसाराचा (सूक्ष्म) विचार केला असता, असारता ही भ्रांती आहे आणि सार हे स्वभावतः नित्य आहे, असे जाण.
134-2
हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाही ॥134॥
या तिन्ही लोकात ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम, वर्ण, आकार, अशी काही (लक्षणे) नाहीत.
135-2
जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाहि घातु । कदा नोहे ॥135॥
जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे. त्याचा नाश करू म्हटल्यास त्याचा नाश कधीहि होणार नाही.

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥2. 18॥


नित्य, अविनाशी व अगम्य अशा जिवात्म्याचे हे देह, त्या सर्व देहास नाशवंत म्हंटले आहे. म्हणून हे अर्जुना या नाशवंत देहाचा विचार मनात न आणता तू युद्ध कर.

136-2
आणि शरीरजात आघवे । हे नाशिवंत स्वभावे । म्हणौनि तुवा झुंजावे । पंडुकुमरा ॥136॥
शरीर म्हणून जेवढे आहे, तेवढे सगळे नाशवंत आहे. म्हणून हे अर्जुना ! तू युद्ध करावे हे हिताचे आहे.

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥2. 19॥

हा आत्मा मारणारा आहे असे जो समजतो. मरणारा आहे असे जो समजतो, त्या दोघांनाही खरे कळत नाही, हा कोणाला मारीत नाही किंवा कोणाकडून मारला जात नाही.

137-2
तू धरूनि देहाभिमानाते । दिठी सूनि शरीराते । मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥137॥
तू देहाच्या जागी मी असा अभिमान ठेवला आहेस. दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत, अशा दृष्टी तू ठेवली आहेस. मी मारणारा आहे आणि हे कौरव मरणारे आहेत, असे तू म्हणत आहेस.

138-2
तरी अर्जुना तू हे नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तू नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥138॥
तरी अर्जुना, तुला खरे सत्य समजत नाही. जर तू ज्ञानाने सूक्ष्म विचार करून पाहशील, तर मारणारा नाहीस आणि हे मारले जाणार नाहीत, हे तुझ्या लक्षात येईल.

न जायते म्र्यिते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥2. 20॥

हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही. हा एकदा उत्पन्न होऊन पुनः नाश होणारा आहे, असेही नाही. हा जन्मरहित, नित्य, क्षयरहित व अनादि आहे. शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही.

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥2. 21॥

हे पार्था ! या आत्म्याला जो नाशरहित, जन्मरहित, नित्य व क्षयरहित असे जाणतो, तो आत्मज्ञानी पुरुष कोणाला मारणार तरी कसा ? व कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा ?

139-2
जैसे स्वप्‍नामाजी देखिजे । ते स्वप्‍नीचि साच आपजे । मग चेऊनिया पाहिजे । तव काही नाही ॥139॥
ज्याप्रमाणे स्वप्नात जे काही दिसते ते स्वप्नातच खरे वाटते, पण मग जागे होऊन जेंव्हा पाहतो, त्या वेळी ते काहिच दिसत नाही.
140-2
तैसी हे जाण माया । तू भ्रमतु आहासी वाया । शस्त्रे हाणितलिया छाया । जैसी आंगी न रुपे ॥140॥
त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज. तू व्यर्थ (या मायेच्या)भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे एखाद्या शस्त्राने देहाच्या सावलीला मारल्यास शरीराला घाव लागत नाही.

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

141-2
का पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाही नासला । तयासवे ॥141॥
किंवा पाण्याने भरलेला घडा पालथे केल्यावर त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहिसे झालेले दिसते; पण खरा सूर्य नाहिसा झालेला नसतो.
142-2
ना तरी मठी आकाश जैसे । मठाकृती अवतरले असे । तो भंगलिया आपैसे । स्वरूपचि ॥142॥
किंवा, ज्याप्रमाणे आकाश हे मठामध्ये मठाच्या आकाराचे झालेले दिसते; . (मठाच्या आकृतीचा झालेला दिसतो); पण मठ मोडल्या नंतर (तो आकार नष्ट होत नाही) ते आकाश आपल्या मूळ रूपात राहते.
143-2
तैसे शरीराचा लोपी । सर्वथा नाशु नाही स्वरूपी । म्हणऊनि तू हे नारोपी । भ्रांति बापा ॥143॥
त्याच प्रमाणे शरीर नाश पावले, तरी मूळ आत्म्याचा कधीच नाश होत नाही. म्हणून बाबा ! तू स्वरूपाच्या ठिकाणी (आत्मा जन्माला आला आणि आत्मा मरण पावला)जन्म- मरण हा भ्रांतीचा आरोप करू नकोस.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नावानि देही ॥2. 22॥

भावार्थ :-
ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून दुसरे नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा हा जीर्ण झालेले शरीर (टाकून देऊन) सोडून देतो आणि दुसरे नवीन शरीर धारण करतो.
144-2
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्यनाथे ॥144॥
(मनुष्य) ज्याप्रमाणे, जूनी कपडे टाकून देतो आणि नवीन वस्त्रे घालतो धारण करतो, त्या प्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा जीर्ण देह टाकून दुसर्‍या नवीन देहाचा स्विकार करतो.

नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥2. 23॥

भावार्थ :-
या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वायू सुकवू शकत नाही.

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥2. 24॥

भावार्थ :-
हा आत्मा तोडता, जाळता, भिजवता, आणि सुकवताही येत नाही. हा निःसंशय (आत्मा) नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल आणि सनातन आहे.

145-2
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकी छेदु । न घडे यया ॥145॥
हा आत्मा जन्म-मरणरहित असून नित्य (शाश्वत असणारा) उपाधिरहित व अत्यंत शुद्ध आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांनी ही घात करता येत नाही.

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥2. 25॥


भावार्थ :ऱ्हा आत्मा अव्यक्त :- (इंद्रियांना अगोचर, अदृश्य), अचिंत्य :- (मनाने न समजणारा, किंवा ज्याचा विचार किंवा तर्क करता येत नाही, गूढ), अविकारी :- (विकाररहित, कधीहि न बदलणारा) असे आहे. म्हणून अशा प्रकारच्या आत्म्याला जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही.

146-2
हा प्रळयोदके नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥146॥
हा आत्मा प्रलयकाळच्या पाण्यानेही बुडत नाही. हा अग्नीने जळणारा नाही. तसेच वायूमध्ये देखील याला शुष्क करण्याची शक्ती नाही.

147-2
अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥147॥
म्हणून हे अर्जुना ! हा आत्मा नित्य, स्थिर व शाश्वत असून सर्व ठिकाणी (स्वयंप्रकाशित) परिपूर्ण व्यापक रूपाने भरलेला आहे.
148-2
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरिटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥148॥
आत्मा हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा नाही, ध्यान तर या आत्म्यास भेटण्यासाठी उत्कंठित (उत्कट इच्छा) झालेले असते.
149-2
हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥149॥
हे अर्जुना ! हा आत्मा मनास नेहमीच दूर्लभ (म्हणजे मनाने जाणता येत नाही), कोणत्याही साधनाने प्राप्त न होणारा आहे. हे पुरषोत्तमा, हा आत्मा अनंत आहे.
150-2
हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु । अनादि अविकृतु । सर्वरूप ॥150॥
हा आत्मा तीन गुणांनी (सत्व, रज, तम) रहित आहे, अनादि आहे, विकाररहित आहे, आणि आकाराच्या पलीकडचा विकार न पावणारा सर्वव्यापी असा आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १७ वा, १७ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १९३ ते २०४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 193
पूजा समाधान । अतिशय वाढे सीण ॥१॥
हे तो जाणा तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥धृपद॥
पहिले पाहिजे ते केले । सहज प्रसंगी घडले ॥२॥
तुका म्हणे माथा । पायी माझा तुम्हा संता ॥३॥
अर्थ

साधुची वृत्ती समाधानी असली पाहिजे अन्यथा लोकांकडून अपमान होतो. हे संतसज्जनहो, तुम्हीही अशीच वृत्ती ठेवा. नितीने वागणे हेच साधुत्व आहे. परमार्थ तुम्ही सहजपणे केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या नीतिमान संतांच्या पायांवर मी माझा माथा ठेवतो.


अभंग क्र. 194
स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिले होते वेठी । जालिया शेवटी । जागे लटिके सकळ ॥१॥
वाया भाकिली करुणा । मूळ पावावया शीणा । राव रंक राणा । कैचे स्थानावरी आहे ॥धृपद॥
सोसिले ते अंगे । खरे होते नव्हता जागे । अनुभव ही सांगे । दुःखे डोळे उघडीले ॥२॥
तुका म्हणे संती । सावचित केले अंती । नाही तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥३॥
अर्थ

अज्ञानाच्या निद्रेत मला जन्म-मृत्युने वेठिला धरले होते, ब्रम्‍हज्ञानाची जागृति आल्यावर शेवटी या गोष्टी खोट्या ठरल्या. मी विनाकारणच व्यर्थ हरीला जन्म मृत्यूच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी करून भाकणे कारण खरे पाहिले तर हे जग म्हणजे एक प्रकारचे स्वप्नच आहे, हे मला नंतर कळुन चुकले, की ही अवस्था प्राप्त होण्यासाठी गरीब-श्रीमंत असा भेदाभाव केला जात नाही. प्रपंच्यात सुख दुःख, वेदना सहन केल्या; पण त्या स्वप्नवत वाटल्या. प्रपंच्यातील दुःखमुळेच परमार्थाकडे वळलो आणि ब्रम्‍हज्ञानाची प्राप्ती झाली. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच्यातुन बाहेर पडण्यासाठी मला संतांनी मोलाची मदत केली, त्यामुळे मला ब्रम्‍हज्ञान प्राप्त झाले, नाहीतर हरिभक्तीविना मी तसाच प्रपंच्यात अडकून पडलो असतो.


अभंग क्र. 195
आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसी निष्ठुर अतिवादी ॥१॥
याति कुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगी ॥धृपद॥
काळकुट पितळ सोने शुद्ध रंग । अंगाचेच अंग साक्षी देते ॥२॥
तुका म्हणे बरी जातीसवे भेटी । नवनीत पोटी साठविले ॥३॥
अर्थ

एखादा मनुष्य अंतकरणात राक्षसी स्वभावाचा, निर्दयीअसेल तर मग तो कितीही श्रेष्ट, उच्च कुळातील असला तरी व्यर्थ ! कारण कुळापेक्षा गुणाना ज्यास्त महत्त्व आहे. पीतळ आणि सोने पिवळ्या रंगाचे असले तरी पितळाला डाग पडतात, सोन्याला नाही, सोने या धातूच्या अंगाचे गुणच येथे साक्षी ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने भक्तीचे नवनीत पोटात म्हणजे अंतकरणात साठविले आहे, तो श्रेष्ठ, उच्च जातिकुळातील मानांव आहे, त्याची भेट घ्यावी.


अभंग क्र. 196
वासुगीच्या वनी सीता शोक करी । का हो अंतरले रघुनाथ दुरी ।
येउनि गुफेमाजी दुष्टे केली चोरी । काहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥
सांग वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल का नेदी भेटी रघुनाथ ।
मन उतावळि जाला दुरी पंथ । राहो न सके प्राण माझा कुडी आत ॥धृपद॥
काय दुष्ट आचरण होते म्या केले । तीर्थ व्रत होते कवणाचे भंगीले ।
गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिले । न कळे वो संचित चरण अंतरले ॥२॥
नाडियेले आशा मृगकांतिसोने । धाडिले रघुनाथा पाठिलागे तेणे ।
उल्लंघिले आज्ञा माव काय मी जाणे । देखुनी सूनाट घेउनि आले सुने ॥३॥
नाही मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामे रघुनाथाच्या माये ।
उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्ये तेथे चाले काये ॥४॥
जनकाची नंदिनी दुःखे ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।
समोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । येईल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥५॥
अर्थ

रावणाने सीतेचे हरण केले व सीतेला वासुकीच्या वनांमध्ये आणून ठेवले त्यावेळेस सीता शोक करत त्रिजटेला म्हणते हे त्रिजटे का बरे रघुनाथ माझ्यापासून दूर अंतरले असतील, मी माझ्या पर्णकुटी मध्ये होते दुष्ट रावण तेथे आला व माझे हरण केले आणि अवघड अशा अलंकापुरी मध्ये मला त्याने का बरे आणले ? हे माझे सखये त्रिजटे मला सांग माझे रघुनाथ मला भेट देतील की नाही, रघुनाथाना भेटण्यासाठी माझे मन फार उताविळ झाले आहेत परंतु ते तर माझ्यापासून खूप दूर आहेत आणि आता माझा प्राण देखील या कुडीत राहीनासा झाला आहे. हे सखये मी असे कोणते दुष्ट आचरण केले होते किंवा कोणाची तीर्थ किंवा व्रत भंग केले होते काय, हे सखे मी कधी गाई आणि वासरू किंवा पत्नी आणि पती यांची ताटातूट केली होती काय मला माझे संचित काही कळेनासे झाले आहे का बरे मला रघुनाथांच्या चरणांचे अंतर पडले असेल ? सोन्यासारखी कांती हरणा मुळे मी फसले मला वाटले त्या हरणाच्या कातड्याची चोळी करून घालावे त्यामुळे मी रघुनाथ यांना त्या हरणाच्या पाठीमागे पाठविले. लक्ष्मणाच्या आज्ञेचे उल्लंघन केले मला काय माहित त्या दृष्टा ची माया काय आहे, मी लक्ष्मण रेषेचे उल्लंघन करताच रावण रुपी कुत्रे यांनी माझे अपहरण केले. हे माय एका रघुनाथा वाचून मला दुसरा कोणताही मार्ग किंवा उपाय नाही. मला सोडवण्यासाठी जटायू पक्षाने धाव घेतली त्यावेळी रावणाने जटायू च्या अंगावर पाय देऊन त्याचे दोन्ही पंख उपटून टाकले जटायू पक्षी पाण्याच्या वेढ्यामध्ये पडला त्यामुळे माझेही तेथे काहीच चालले नाही. तुकाराम महाराज म्हणतात जनकाची मुलगी जानकी अशाप्रकारे दुःखाने वेढली गेली हरणाची व पाडसाची जशी चुकामुक व्हावी अशा प्रकारची स्थिति जानकीची झाली त्यावेळी त्रिजटा सीतेला शांत करत म्हणाली सिते शांत हो तुकयाचा स्वामी राम अलंकापुरी ला येईल आणि संपूर्ण अलंकापुरी जिंकून घेईल.


अभंग क्र. 197
विट नेघे ऐसे राधा । जेणे बाधा उपजे ना ॥१॥
तरीच ते गोड राहे । निरे पाहे स्वयंभ ॥धृपद॥
आणिका गुणा पोटी वाव । दावी भाव आपुला ॥२॥
तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥३॥
अर्थ

ज्याचा कंटाळा येणार नाही किंवा जे पोटाला बाधणार नाही, असे अन्न शिजवावे. तरच ते गोड वाटेल व् पचेल. असे रसदार, चविष्ट, पाचक अन्न पोटात गेले तर ते आपल्या शरीरावर प्रभाव दाखवेल. तुकाराम महाराज म्हणतात, असे शुद्ध अन्न सेवन केल्याने शुद्ध भाव, शुद्ध चित्त निर्माण होते. (म्हणजे कर्म असे करावे की जे चांगले असेल व आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला चांगले मिळेल व दुसऱ्याला ही त्याचा फायदा होईल असेच आपण कर्म करावे.


अभंग क्र. 198
नव्हतो सावचित । तेणे अंतरले हित ॥१॥
पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥धृपद॥
लटिक्याचे पुरी । गेलो वाहोनिया दुरी ॥२॥
तुका म्हणे नांव । आम्हा सापडला भाव ॥३॥
अर्थ

मी परमार्थाविषयी सावचित्त नव्हतो म्हणून माझे अहित झाले. संसार वाढविता वाढविता मला नामाचा विसर पडला. प्रपंच्यातील खोट्या लोभाला भुललो त्यामुळे पर्मार्थापासून दूर गेलो. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलरूपी नाव(नौका) सापडल्यामुळे या भवसागरातून आम्ही तरुण जाऊ.


अभंग क्र. 199
अन्नाच्या परिमळे जरि जाय भूक । तरि का हे पाक घरोघरी ॥१॥
आपुलाले तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥धृपद॥
देखोनि जीवन जरि जाय तहान । तरि का सांटवण घरोघरी ॥२॥
देखोनिया छाया सुख न पाविजे । जव न बैसीजे तया तळी ॥३॥
हित तरी होय गाता अईकता । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥
तुका म्हणे होसी भावेचि तू मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची ॥५॥
अर्थ

अन्नाच्या वासाने जर पोट भरले असते तर स्वयंपाक करण्याचे कारणाच काय होते. नुसत्या शब्दाने कधी प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही; त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी रामाचे सतत स्मरण करा. पाणा फक्त पाहुन जर कोणाची तहान भागत असेल तर पाण्याचा साठा का करावा ? वृक्षाची सावली दुरुण पाहुन त्याचा अनुभव घेता येत नाही, त्याखाली बसावे लागते. तसे हरिनाम प्रत्यक्ष गावे, एकावे लागते, त्यावर दृढ़ भक्तीभाव ठेवावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, तू जर दृढ भक्तीभावाने हरिभक्ती केलीस तर तू निश्चिंतच मुक्त होशील.


अभंग क्र. 200
काय उणे आम्हा विठोबाचे पाई । नाही ऐसे काई येथे एक ॥१॥
ते हे भोवताले ठायी वाटू मन । बराडी करून दारोदारी ॥धृपद॥
कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी । फुकाची लुटावी भांडारे ती ॥३॥
अर्थ

आम्हाला विठ्ठलाच्या पायाजवळ काय कमी आहे; आम्हाला तेथे कोणतीही उणीव भासत नाही. हे सुख सोडून इतरांच्या दारोदारी सुख शोधण्यासाठी आम्ही भिकाऱ्यासारखे भटकत नाही. माझ्या विठ्ठला पेक्षा बलवान दुसरा कोणीही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठालाच्या गावी मोक्षाची कोठारे आहेत, त्याची लयलुट करा.


अभंग क्र. 201
सेवितो हा रस वाटितो आणिका । घ्या रे होऊ नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याची पाउले समान । तोचि एक दानशूर दाता ॥धृपद॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायी ॥२॥
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
अर्थ

मी परमार्थामधुन निघणारा रस सेवन करतो आणि आणि तो मधुर रस इतरांनाही पण वाटतो, प्रपंच्याच्या रानावानात भटकू नका, माझ्याप्रमाणे हा ब्रम्‍हरस प्या आणि आनंदित व्हा. जो विटेवर समचरण ठेवून उभा आहे, तोच एक जगामध्ये शूर दाता आहे, त्यानेच हा रस मला दिला आहे. याच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून रहाल तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होतील. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याचा निरोप्या आहे, तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्याचा निरोप घेऊन आलो आहे.


अभंग क्र. 202
ऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ।
जे का सिच्चदानंदी नित्यानंदु । जे का मोक्षसिद्धी तीर्थ वंदू रे ॥१॥
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।
भूतकृपा मोडी द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करी बंधु रे ॥धृपद॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करी । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारी ।
लघुत्व सर्वभावे अंगीकारी । सांडीमांडी मीतूपण ऐसी थोरी रे ॥२॥
अर्थकामचाड नाही चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानी जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥
मनी दृढ धरी विश्वास । नाही सांडीमांडीचा सायास ।
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥
अर्थ

जे आपल्या आनंदात निमग्न असतात, इश्वरचिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते, त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अश्या साधुंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात व भव बंध तुटतात. त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्तिभाव ठेव कारण, त्यांच्या ठिकाणी स्थीरबुद्धि, नास्तिक्यभेद करणारी बुद्धि आहे. भूतदया धर मनातील द्वेषाचा कांदा फोडून टाक, शत्रु, मित्र, पुत्र या सर्वा प्रती समभाव धरअरे तू सर्वभावे लहानपणाचा अंगीकार कर अरे तू मी तू पणा चा लहान मोठेपणा चा त्याग कर. शरीर, वाणी, मन आणि बृद्धि शुद्ध असावी. सर्वत्र विठ्ठालाचे स्वरुप पहावे, विनम्रता असावी, अहंकार नसावा. ज्याच्या मनी धन, कामवासना नाही, मान सन्मानाचा मोह नाही, जो समाधानी वृत्तीचा आहे, त्याला संतसज्जन आनंदाने भेटतात. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा, आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंच्याला विटला आहे, ज्याने आवड निवड टाकून दिली आहे, त्याला संत सज्जन नित्य भेट देतात साधू दर्शन नित्य घडते.


अभंग क्र. 203
भवसागर तरता । का रे करीतसा चिंता । पैल उभा दाता । कटी कर ठेवुनिया ॥१॥
त्याचे पायी घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठी । खांदा वाहे आपुल्या ॥धृपद॥
सुखे करावा संसार । न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥
भुक्तिमुक्तिची चिंता । दैन्य नाही दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥
अर्थ

हे जनहो, हा भवसागर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारण का करता ? तुम्हाला पार करणारा तो सर्वशक्तिमान विठ्ठल पैलतीरावर हात कटावर ठेऊन तत्परतेने उभा आहे. त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही, फक्त भक्तीभावाने त्याच्या पायी मीठी घाला, तो तुम्हाला विनामोबादला आपल्या खांद्यावर घेईल. त्याला फक्त तुम्ही भक्तीभाव व आपले चित्त अर्पण केले की मग खुशाल संसार सुखाने करा, दोन वारी(आषाढी व कार्तिकी) चुकवु नका. मग दया क्षमा चालत तुमच्या घरी येतील. तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगा दात्याची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्रय येणार नाही, मुक्तीची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही.


अभंग क्र. 204
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥धृपद॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ॥२॥
ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥३॥
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥४॥
तुका म्हणे सांगू किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥५॥
अर्थ

जे दुःखी कष्टी, प्रपंचीक त्रासाने गांजले आहेत, त्यांना जो आपले म्हणतो. तोच खरा साधू म्हणून ओळखावा आणि त्याच्या ठिकाणी देव आहे असे समजावा. अश्या साधुंगे चित्त अंतरबाह्य लोण्यासारखे मऊ असते. ज्याला आधार नाही, जो निराधार आहे, त्याला आपल्या ह्रदयाशी जो धरतो. जे प्रेम आपण आपल्या पुत्रावरती करतो, तेच प्रेम तो आपल्या दास दासींवर करतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे संतसज्जन म्हणजे साक्षात भगवंताची मुर्ति असते; यापेक्षा अधिक काय व किती सांगू ?

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version