“१५ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १५ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १५ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २७१३ ते २७२४ चे पारायण आपण करणार आहोत.
१५ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३७६ ते ४००,
376-14
अगा हिम जे आकर्षले । तेचि हिमवंत जेवी जाले । नाना दूध मुराले । तेचि दही ॥376॥
अर्जुना, बर्फ जे एकत्र गोठून झाले तेच जसे हिमालय पर्वत होय अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते,
377-14
तैसे विश्व येणे नांवे । हे मीचि पै आघवे । घेई चंद्रबिंब सोलावे । न लगे जेवी ॥377॥
त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही चंद्र पहाणे असल्यास चंद्राच्या कला वेगळ्या कराव्या लागत नाहीत.
378-14
घृताचे थिजलेपण । न मोडिता घृतचि जाण । का नाटिता कांकण । सोनेचि ते ॥378॥
तुपाचा घट्टपणा न मोडणे ते जसे तूपच आहे अथवा (सोन्याचे) कडे हे आटवले नसताना ते सोनेच आहे.
379-14
न उकलिता पटु । तंतुचि असे स्पष्टु । न विरविता घटु । मृत्तिका जेवी ॥379॥
वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे, अथवा मातीची घागर न विरघळवता जशी ती घागर मातीच आहे.
380-14
म्हणौनि विश्वपण जावे । मग तै माते घेयावे । तैसा नव्हे आघवे । सकटचि मी ॥380॥
म्हणून विश्वपण काढून टाकावे विश्वाचा निरास करावा. व मग मला घ्यावे, तसा मी नाही, तर विश्वासकट सर्व मीच आहे.
381-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ऐसेनि माते जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे । येथ भेदु काही देखिजे । तरी व्यभिचारु तो ॥381॥
अशा प्रकारे मला जाणणे ती अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. येथे (या विश्वात व माझ्यात) काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो.
382-14
याकारणे भेदाते । सांडूनि अभेदे चित्ते । आपण सकट माते । जाणावे गा ॥382॥
या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्यासकट आपणास माझ्या वेगळे न मानून मला जाणावे.
383-14
पार्था सोनयाची टिका । सोनयासी लागली देखा । तैसे आपणपे आणिका । मानावे ना ॥383॥
अर्जुना सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसवलेली असते पहा त्याप्रमाणे आपल्याला (माझ्याहून) वेगळे मानू नये.
384-14
तेजाचा तेजौनि निघाला । परी तेजीचि असे लागला । तया रश्मी ऐसा भला । बोधु होआवा ॥384॥
किरण हे तेजोमय असते व तेजापासून झालेले असते व ते तेजालाच लागलेले असते, त्या किरणांसारखा चांगला बोध असावा, म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस.
385-14
पै परमाणु भूतळी । हिमकणु हिमाचळी । मजमाजी न्याहाळी । अहं तैसे ॥385॥
पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूप आहे अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पहा.
386-14
हो का तरंगु लहानु । परी सिंधूसी नाही भिन्नु । तैसा ईश्वरी मी आनु । नोहेचि गा ॥386॥
समुद्रावरची लाट जरी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नाही, तसा मी ईश्वराचे ठिकाणी दुसरा (ईश्वराहून वेगळा) खरोखर नाही.
387-14
ऐसेनि बा समरसे । दृष्टि जे उल्हासे । ते भक्ति पै ऐसे । आम्ही म्हणो ॥387॥
अरे अर्जुना, अशा ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते त्याला आम्ही भक्ती असे म्हणतो.
388-14
आणि ज्ञानाचे चांगावे । इयेचि दृष्टि नांवे । योगाचेही आघवे । सर्वस्व हे ॥388॥
हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सर्व सार हेच आहे.
389-14
सिंधू आणि जळधरा- । माजी लागली अखंड धारा । तैसी वृत्ति वीरा । प्रवर्ते ते ॥389॥
मेघ व समुद्र ह्यांच्यामधे जशी अखंड जलधारा लागलेली असते, अर्जुना, त्याप्रमाणे (त्या पुरुषाची) वृत्ती वहावत असते, म्हणजे जेथून वृत्ती उत्पन्न होते तेही ब्रह्म व ज्याला विषय करते तेही ब्रह्म व वृत्तीही ब्रह्म अशी त्याची ही त्रिपुटी एक ब्रहरूप असते.
390-14
का कुहेसी आकाशा । तोंडी सांदा नाही तैसा । तो परमपुरुषी तैसा । एकवटे गा ॥390॥
अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नाही, तर जसे आडातले आकाश हे महाकाशाशी नेहेमी मिळालेलेच असते, त्याप्रमाणे अर्जुना, तो परमपुरुष परब्रह्माशी ऐक्याला पावतो.
391-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
प्रतिबिंबौनि बिंबवरी । प्रभेची जैसी उजरी । ते सोऽहंवृत्ती अवधारी । तैसी होय ॥391॥
प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रभेचा एकसारखा सरळपणा असतो. तशी ती सोऽहंवृत्ती आहे असे समज.
392-14
ऐसेनि मग परस्परे । ते सोऽहंवृत्ति जै अवतरे । तै तियेहि सकट सरे । अपैसया ॥392॥
याप्रमाणे जीव व ब्रह्म या दोहोत (जीवाच्या ठिकाणी) जेव्हा सोहंऽवृत्ती (ते ब्रह्म मी आहे अशी वृत्ती) प्रगट होते, तेव्हा ती सोहंवृत्तीसुद्धा आपोआप सरते (नाहीशी होते).
393-14
जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजी पांडवा । विरालेया विरवावा । हेही ठाके ॥393॥
अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात विरघळल्यावर तो मिठाचा खडा विरघळावा हेही थांबते (नाहीसे होते).
394-14
नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण । तैसे भेदु नाशूनि जाण । ज्ञानही नुरे ॥394॥
अथवा गवत जाळून जसा अग्नीही आपण विझतो त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान रहात नाही.
395-14
माझे पैलपण जाये । भक्त हे ऐलपण ठाये । अनादि ऐक्य जे आहे । तेचि निवडे ॥395॥
मी मायेच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे असा माझ्यात व भक्तात असलेला पलीकडेपणा व अलीकडेपणा नाहीसा होतो. आणि माझ्यात व भक्तांमधे अनादि जे ऐक्य आहे तेच प्रगट होते.
396-14
आता गुणाते तो किरीटी । जिणे या नव्हती गोष्टी । जे एकपणाही मिठी । पडो सरली ॥396॥
अर्जुना, आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच रहात नाही, कारण की आता एकपणाही सरला.
397-14
किंबहुना ऐसी दशा । ते ब्रह्मत्व गा सुदंशा । हे तो पावे जो ऐसा । माते भजे ॥397॥
फार काय सांगावे ? अशा प्रकारची जी अवस्था ते जे मर्मज्ञ अर्जुना, ब्रह्मत्व होय. वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारित्वाने मला भजतो त्यास ते प्राप्त होते.
398-14
पुढती इही लिंगी । भक्तु जो माझा जगी । हे ब्रह्मता तयालागी । पतिव्रता ॥398॥
शिवाय आणखी या लक्षाणांनी युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे त्याच्या करता ब्रह्मता पतिव्रता आहे.
399-14
जैसे गंगेचेनि वोघे । डळमळित जळ जे निघे । सिंधुपद तयाजोगे । आन नाही ॥399॥
ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते त्याला समुद्राचे स्थान अवश्य मिळतेच यात अन्यथा नाही.
400-14
तैसा ज्ञानाचिया दिठी । जो माते सेवी किरीटी । तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी । चूडारत्न ॥400॥
त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो, तो ब्रह्मस्थितीच्या मुगुटात अग्रभागी असणारे रत्न (मुकुटामणी) होतो.
दिवस २२७ वा. १५, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७१३ ते २७२४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २७१३
अनेक दोषाचे काट । जे जे गादले निघोट ।
होती हरीनामे चोखट । क्षण एक न लगता ॥१॥
तुम्ही हरी म्हणा हरी म्हणा । महादोषाचे छेदना ॥धृपद॥
अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळी रतला ।
क्षण न लगता नेला । वैकुंठासी हरी म्हणता ॥२॥
अमित दोषाचे मूळ । झाले वाल्मीकासी सबळ ।
झाला हरीनामे निर्मळ । गंगाजळ पै जैसा ॥३॥
हरी म्हणता तरले । महादोषी उद्धरिले ।
पहा गणिकेसी नेले । वैकुंठासी हरी म्हणता ॥४॥
हरीविण जन्म नको वाया । जैसी दर्पणींची छाया ।
म्हणोनि तुका लागे पाया । शरण तया हरीसी ॥५॥
अर्थ
अनेक दोषानी व पापानी जे मलिन झाले आहेत, असे लोक देखील हरीनामामुळे शुध्द होतात ते ही एक क्षणदेखील न लागता. त्यामुळेच तुम्ही हरीनाम घ्या हरीनाम घ्या ते हरीनामच महादोषाना देखील छेदून टाकीन. अजामिळासारखा दुष्ट मनुष्य चांडाळ जातीच्या स्त्रीशी रत झाला व तिच्याशी अति प्रीतीने बांधला गेला. त्याच्याकडून नकळत हरीनामाचा उच्चार झाला तरी देखील त्याला एकक्षणही न लागता विष्णुदासांनी वैकुंठाला नेला. वाल्मिकीच्या ठिकाणी तर अनेक महादोषाचे मूळ सबळ होऊन राहिले होते. परंतू तो देखील हरीनामाने अगदी निर्मळ झाला अगदी गंगाजळाप्रमाणे निर्मळ झाला. अनेक लोक “हरी” म्हटले व ते तरले महादोषी देखील हरीनामामुळे उध्दरुन गेले. पाहा गणिका देखील एक वैश्या होती तिने केवळ हरी म्हटल्यामुळे वैकुंठाला नेले. तुकाराम महाराज म्हणतात, “जशी दर्पणेची छाया व्यर्थ असते त्याप्रमाणे हरीनामावाचून जन्म वाया जायला नको. म्हणून तर हा तुकाराम म्हणजे मी हरीच्या पायाशी लागलो आणि त्याला शरण गेलो आहे. ”
अभंग क्र. २७१४
भजन या नासिले हेंडि । दंभा लडी आवडी ॥१॥
जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥धृपद॥
एकाएकी इच्छी पाठ । नेणे चाट काउळे ॥२॥
तुका म्हणे मुलाम्याचे । बंधन साचे सेवटी ॥३॥
अर्थ
लबाड लोकांनी दंभाची आवड धरुन भजन जरी केले तरी त्या नीच लोकांनी केलेले भजन नासते. जो मनुष्य आयता झालेला स्वयंपाक सेवन करत नाही कारण ते परान्न आहे त्यामुळे मी ते सेवन करणार नाही असे नाटक करतो आणि केवळ ताक घुसळवून पितो असा मनुष्य नीच आहे. जो मनुष्य आपला कोणताही अधिकार नसताना एकाएकी आपल्याला मान मिळावा सन्मान मिळावा अशी इच्छा बाळगतो तो मनुष्य देखील नीच असून मूर्ख कावळयासारखेच त्याचे वर्तन असते. तुकाराम महाराज म्हणतात, “जो मनुष्य केवळ परमार्थाचा मुलामा लावून केवळ परमार्थाचे सोंग आणतो त्याला शेवटी यमाचेच वंदन मिळत असते. ”
अभंग क्र. २७१५
जैसा निर्मळ गंगाओघ । तैसा भाग वोगरी ॥१॥
प्रेम वाढे ग्रासोग्रासी । ब्रम्हरसी भोजन ॥धृपद॥
तृप्तीवरी आवडी उरे । ऐसे बरे प्रकार ॥२॥
तुका म्हणे पाख मन । नारायण ते भोगी ॥३॥
अर्थ
जसा गंगेचा निर्मळ ओघ आहे त्याप्रमाणे अन्न वाढणार्या दात्याने जेवणार्याला अन्नाचे प्रकार वाढावेत. त्याप्रमाणे हे देवा तू मला ब्रम्हरसाचे भोजन वाढ त्याने प्रत्येक घासाघासाला माझे प्रेम वाढत जाईल. आपली कितीही तृप्ती झाली तरी ज्या पदार्थाविषयी आपली आवड शिल्लक राहाते असे अन्नाचे प्रकार चांगले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याचे मन पवित्र व शुध्द आहे तेच नारायणाच्या ब्रम्हरसाचा भोग घेऊ शकतात. ”
अभंग क्र. २७१६
सुख सुखा विरजण झाले । ते मथिले नवनीत ॥१॥
हाले डोले हरुषे काया । निवती बाह्या नयन ॥धृपद॥
प्रबळ तो नारायण । गुणे गुण वाढला ॥२॥
तुका म्हणे भरली सीग । वरी मग वोसंडे ॥३॥
अर्थ
निर्गुण सुखामध्ये सगुण सुखाचे विरजन घातले व त्याचे मंथन केले व नंतर भक्तीसुखाचे नवनीत बाहेर आले. निर्गुण सुखाने आपली काया म्हणजे शरीर आनंदाने डोलू लागते आणि सगुण रुपाच्या दर्शनाने डोळे तर सगुण रुपाला पाहुन, बाहू आलिंगन दिल्याने निवतात म्हणजे शांत होतात. सगुण आणि निर्गुण या दोन्हीही स्थितीमध्ये नारायण प्रबळ असतो व त्याच्या गुणामुळेच दोन्हीही स्थितीमध्ये आनंद वाढला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा की तो आनंद आपल्या ह्दयात उत्पन्न झाला तर तो ह्दयामध्ये शीग लागेपर्यंत भरला जातो मग तो बाहेर यायला सुरवात होते म्हणजेच तो आनंद बाहेर ओसंडून वाहतो, म्हणजेच लोकांना आपोआप आपण उपदेश करतो. ”
अभंग क्र. २७१७
का रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी ॥१॥
होईल यमपुरी । यमदंड यातना थोरी ॥धृपद॥
कोण झाली लगबग । काय करिसि तेथे मग ॥२॥
का रे भरला ताठा । करिती वोज नेता वाटा ॥३॥
तोंडा पडिली खिळणी । जिव्हा पिटिती वोढूनि ॥४॥
का रे पडिली जनलाज । कोण सोडवील तुज ॥५॥
लाज धरी म्हणे तुका । नको वाया जाऊ फुका ॥६॥
अर्थ
अरे तू हरीला का भजत नाहीस त्याच्यावाचून तुझा कोण अंगीकार करणार आहे ? जेव्हा तुला यमपुरीमध्ये यमदंड यातना होतील त्यावेळी तुला कळून येईल. अरे या तुला प्रपंचाची तरी एवढी लगबग का झाली आहे यमपुरीत गेला तर मग तेथे तू काय करशील ? अरे तुझ्या अंगी एवढा अभिमानाचा ताठा का भरला आहे यमदूत जेव्हा यमपुरीच्या मार्गाने नेतील तेव्हा तू काय करशील ? अरे आता हरीनाम घेण्याविषयी तुझ्या तोंडाला तर खीळ पडली आहे परंतू ज्यावेळी तुझी जीभ ओढून तुला पिटतील त्यावेळी तुझे कसे होईल ? अरे तुला हरीनाम घेण्याविषयी लोकांची लाज का वाटते तुला हरीवाचून दुसरे कोण सोडविणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तू आता तरी लाज धर व्यर्थ फुकट वाया जाऊ नकोस. ”
अभंग क्र. २७१८
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपणचि खेळे आपणाशी ॥ ॥
मधील ते वाव अवघी उपाधि । तुम्हा आम्हामधी तेचि परी ॥धृपद॥
घट मठ झाले आकाशाचे पोटी । वचनेचि तुटी तेथेचि ते ॥ ॥
तुका म्हणे बीजे बीज दाखविले । फल पुष्प आले गेले वाया ॥३॥
अर्थ
समुद्र वाफेच्या रुपाने ढग होतो नंतर मेघवृष्टी करुन तो गंगेत मिळतो आणि ती गंगा पुन्हा समुद्रात मिळते म्हणजेच समुद्र विविध प्रकारचे रुप धारण करुन स्वत:शीच खेळत असतो. देवा समुद्रापासून निघलेले पाणी आणि समुद्रापर्यंत पोहोचणारे पाणी यामध्ये जे काही उपाधी आहेत म्हणजे ढग वाफ गंगा इत्यादी ज्या काही उपाधी आहेत त्या सर्व मिथ्या आहेत. खरा आहे ते एक समुद्र त्याप्रमाणे आपल्या दोघामधीलही तसाच प्रकार आहे आपल्या दोघामधेही ब्रम्ह एकच खरे आहे. घट आणि मठ हे आकाशाच्या पोटीच निर्माण होतात परंतू घटाकाश आणि मठाकाश ही नावे त्यांना प्राप्त होऊन शब्दाने भेद निर्माण होतो आणि पूर्वी जसे ते होते तसेच सर्व आकाश एकाच ठिकाणी आहे त्यातच विलीन होतात. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादया पुष्पाचे बीज लावले की पुन्हा त्या पुष्पाला बीज येण्यापर्यंत जे मध्ये पाने फुले येतात जातात ते सर्व मिथ्या आहे त्या सर्वामध्ये एक आहे ते बीज त्याप्रमाणेच एक ब्रम्हसत्य असून बाकी सर्व मिथ्या आहे. ”
अभंग क्र. २७१९
काय विनवावे कोणे तो निवाड । केले माझ्या कोड वचनाचे ॥१॥
आहो कृपनिधी गुणाच्या निधाना । माझ्या अनुमाना नयेचि हे ॥धृपद॥
बहुत करुणा केलेसे भाषन । एक ही वचन नाही आले ॥२॥
माझी काही सेवा होईल पावली । निश्चिंती मानिली होती ऐसी ॥३॥
तुका म्हणे माझी उरली ते आटी । अभय कर कटी न देखेंचि ॥४॥
अर्थ
देवा तुम्हाला मी आतापर्यंत किती विनंती केली आहे त्याच्याबद्दल तुम्ही कधी निवाडा केला आहे काय आणि माझ्या शब्दाचे कोड कौतुक तुम्ही केले आहे काय ? अहो कृपानिधी गुणाच्या निधाना तुमच्या या अशा वागण्याचा मला काहीच अंदाज येत नाही. अहो देवा मी तुमच्याशी खूप करुणतेने भाषण केले परंतू तुमच्याकडून एकही उत्तर मला आले नाही. तुमच्यापर्यंत माझी कोणती तरी सेवा पोहचेल अशी निश्चिंती मी मानली होती. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा परंतू मी आतापर्यंत परमार्थामध्ये जी काही आटाआटी केली आहे ती सर्व व्यर्थच ठरली असे मला वाटते कारण तुम्ही कमरेवर जे कर ठेवले आहेत ते अभय कर आहेत आणि ते अभय कर माझ्या उपयोगाचे नाही असेच मला दिसत आहेत. ”
अभंग क्र. २७२०
लाजोनिया काळे राहिले लिखित । नेदिता ही चित्त समाधान ॥१॥
कैसे सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥धृपद॥
एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मायेचा पदर कळो येतो ॥२॥
होत्या आपल्या त्या वेचूनिया शक्ती । पुढे झालो युक्तिकळाहीन ॥३॥
तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठे पावे ॥४॥
अर्थ
देवा वेद शास्त्र पुराण यांनी तुझ्याविषयी जे गुण वर्णन गायिले आहे ते आता लज्जेने तोंड काळे करुन राहीले आहेत असे मला वाटते कारण मी तुला इतके आळविले तरी देखील तू माझ्या चित्ताचे समाधान केले नाही. अरे देवा जर तू आमच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलला नाहीस तर आम्हाला सुख तरी कसे वाटेल आणि प्रेम नसताना केवळ आपल्यामध्ये भेट झाली तर त्याचा काही उपयोग आहे काय ? एखादा मनुष्य दुस-या मनुष्याला भेटण्यासाठी गेला आणि त्याला प्रेमाने भेट देण्याऐवजी त्याला कोपरखळी मारुन हात आडवा केला तर त्या दोघामध्ये माया किती आहे हे लगेच कळून येते. देवा माझ्याकडे ज्या काही शक्ती व युक्ती होत्या त्या सर्व मी खर्च केल्या आहेत आता यापुढे माझ्याकडे कोणत्याही प्रकारच्या शक्ती व युक्ती शिल्लक राहिल्या नाहीत मी शक्ती व युक्तीहीन झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही सर्व समर्थ आहात त्यामुळे माझ्यासारख्या दुर्बलाची सेवा तुम्हाला कोठे पावेल ? ”
अभंग क्र. २७२१
आशाबद्ध बहु असे निलाजिरे । होय म्हणे धीरे फळ टोंके ॥१॥
कारणापे चित्त न पाहे अपमान । चित्त समाधान लाभासाठी ॥२॥
तुका म्हणे हाते लोटिले न कळे । झांकितसे डोळे पांडुरंगा ॥३॥
अर्थ
जो मनुष्य आशाबध्द असतो तो खूप निर्लज्ज असतो त्याला थोड्यावेळाने तुला काहीतरी देतो असे जरी म्हटले तरी त्याला धीर निघत नसतो बळेच धीर काढून तो फळाची अपेक्षा करीत असतो. असा निर्लज्ज मनुष्य आपला कितीही अपमान होवो त्याकडे तो लक्ष देत नाही केवळ आपले कार्य साध्य व्हावे हेच त्याच्या बुध्दीत असते आणि एकदा की त्याचे कार्य पूर्ण झाले तरच त्याचे चित्त् समाधानी होते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा पाडूरंगा त्या आशाबध्द मनुष्याप्रमाणेच मी आहे मला अपेक्षा आहे ती केवळ तुमच्या दर्शनाची आणि मला तुमचे दर्शन झाल्याशिवाय समाधान मिळणार नाही अगदी तुम्ही मला माझ्या हाताला धरुन जरी लोटून दीले तरी मी डोळे झाकून तसाच उभा राहीन म्हणजे मला माझा अपमानही कळणार नाही. ”
अभंग क्र. २७२२
साता पाचां तरी वचना सेवटी । निरोप का भेटी एक तरी ॥१॥
का नेणे निष्ठुर केले नारायणा । न देखे हे मना येता काही ॥२॥
तुका म्हणे ऐसा न देखे निवाड । कडू किंवा गोड फळ पोटी ॥३॥
अर्थ
देवा मी तुम्हाला पाच सात वेळा हाक मारली मला भेटीचे तर सोडून दया निदान तुम्ही मला थोड्यावेळ थांब नंतर भेटतो असा निरोप तरी पाठवायचा होता. हे नारायणा तुम्ही माझ्याविषयी तुमच्या मनात इतका निष्ठूरपणा का केला आहे आणि मला तुम्ही भेट का देत नाही हे काही मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझा निवाडा करण्याविषयी तुमच्या मनामध्ये कडू फळ आहे की गोड फळ आहे हे मला काही कळत नाही. ”
अभंग क्र. २७२३
कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड का एक केला नाही ॥१॥
मग तळमळ न करिते मन । झाले ते कारण कळो येते ॥२॥
तुका म्हणे केला पाहिजे निवाड । वैद्यासी ते भीड मरणरोग्या ॥३॥
अर्थ
देवा तुला जर मला भेट दयायची नव्हती तर लोकांमध्ये माझा “मी तुझा खूप थोर भक्त आहे” असा लौकिक का वाढविला सुरवातीला तू मला भेट देणार आहे किंवा नाही याविषयी निवाडा का नाही केला ? देवा माझ्या मनाने तळमळच केली नसती, जर सुरवातीला याचा निवाडा केला असता तर. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा कोणताही निवाडा करताना पटकन केला पाहिजे जर वैदयाने रोग्याची भीड धरली आणि असे म्हटले की रोग्याला हे औषध आवडणार नाही तर तो निर्णय म्हणजे रोग्यासाठी मरणच ठरेल. ”
अभंग क्र. २७२४
वाया ऐसा जन्म गेला । हे विठ्ठला दुःख वाटे ॥१॥
नाही सरता झालो पायी । तुम्ही जई न पुसा ॥धृपद॥
का मी जीतो संवसारी । अद्यापवरी भूमिभार ॥२॥
तुका म्हणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला माझा मनुष्य जन्म वाया गेला याचे मला दु:ख वाटते. देवा ज्याअर्थी तुम्ही माझ्याशी काही बोलत नाही त्याअर्थी मी तुमच्या पायाशी सरता झालो नाही असे मला वाटते. मी अद्यापही या भूमीला भार होऊन का संसारात जगत आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा माझ्या मागे भवरोगाची सबळ व्यथा लागलेली आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

