Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१४ जुलै, दिवस १९५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ७५१ ते ७७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २३२९ ते २३४०

14 July NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

14 July NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“१४ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १४ July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १४ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २३२९ ते २३४० चे पारायण आपण करणार आहोत.
१४ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ७५१ ते ७७५,

751-13
तैसे जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे । हे हातोहातीचे नव्हे । ठाउके जया ॥13-751॥
त्याप्रमाणे (वरील 750 ओवी. मीठाच्या उदाहरणाप्रमाणे) दिवसानुदिवस आयुष्य कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजाडते म्हणजे मरण जवळ येते. ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही.
752-13
किंबहुना पांडवा । हा आंगीचा मृत्यु नीच नवा । न देखे जो मावा । विषयांचिया ॥752॥
अर्जुना, फार काय सांगावे ? हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही.
753-13
तो अज्ञानदेशीचा रावो । या बोला महाबाहो । न पडे गा ठावो । आणिकाचा ॥753॥
हे महाबाहो अर्जुना, तो पुरुष अज्ञानदेशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे नाही, तर हे अज्ञानाचे पूर्ण वर्णन झाले.
754-13
पै जीविताचेनि तोखे । जैसा का मृत्यु न देखे । तैसाचि तारुण्ये पोखे । जरा न गणी ॥754॥
(अज्ञानाची लक्षणे = म्हातारपणाविषयी बेफिकीर) जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाविषयी बेपर्वा असतो.
755-13
कडाडी लोटला गाडा । का शिखरौनि सुटला धोंडा । तैसा न देखे जो पुढा । वृधाप्य आहे ॥755॥
डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा जसा पुढील परिणामाला, म्हणजे आपले तुकडे तुकडे होतील हे पहात नाही. तसे पुढे म्हातारपण येणार आहे हे पहात नाही.


756-13
का आडवोहळा पाणी आले । का जैसे म्हैसयाचे झुंज मातले । तैसे तारुण्याचे चढले । भुररे जया ॥756॥
अथवा आडरानातील ओढ्यास जसा पूर यावा किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते.
757-13
पुष्टि लागे विघरो । कांति पाहे निसरो । मस्तक आदरी शिरो । बागीबळ ॥757॥
शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होण्य़ास लागतो व शरीरातील तेज कमी होण्यास लागते व मस्तकास कापरे सुटते.
758-13
दाढी साउळ धरी । मान हालौनि वारी । तरी जो करी । प्रियेचा पैसु ॥758॥
दाढी पांढरी होते, मान हलून नाही नाही अशी निर्वाणीची खूण करते, तरी देखील जो प्रिय वस्तूचा पसारा वाढवीत रहातो,
759-13
पुढील उरी आदळे । तव न देखे जेवी आंधळे । का डोळ्यावरले निगळे । आळशी तोषे ॥759॥
पुढे असलेला पदार्थ उरावर आदळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे ते पहात नाही अथवा डोळ्यावर आलेल्या चिपाडाच्या योगाने डोळे उघडत नाहीत या सबबीवर अधिकच झोप घेण्यास संधी सापडते म्हणून आळशी मनुष्य किळस घेण्याऐवजी अधिकच संतुष्ट होतो.
760-13
तैसे तारुण्य आजिचे । भोगिता वृद्धाप्य पाहेचे । न देखे तोचि साचे । अज्ञानु गा ॥760॥
अरे अर्जुना, त्याप्रमाणे आजचे तारुण्य भोगीत असता उद्याचे येणारे म्हातारपण जो पहात नाही, तोच खरोखर अज्ञानी आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


761-13
देखे अक्षमे कुब्जे । की विटावू लागे फुंजे । परी न म्हणे पाहे माझे । हेचि भवे ॥761॥
आंधळ्या माणसाकडे पाहून किंवा कुबड्या माणसांकडे पाहून त्यास गर्वाने वेडावू लागतो पण असे म्हणत नाही की माझीही उद्या हीच अवस्था होईल.
762-13
आणि आंगी वृद्धाप्यतेची । संज्ञा ये मरणाची । परी जया तारुण्याची । भुली न फिटे ॥762॥
आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आले परंतु ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही,
763-13
तो अज्ञानाचे घर । हे साचचि घे उत्तर तेवीचि परयेसी थोर चिन्हे आणिक ॥763॥
तो पुरुष अज्ञानाचे घर आहे, हे बोलणे खरे मान. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे ऐक.
764-13
तरि वाघाचिये अडवे । चरोनि एक वेळ आला दैवे । तेणे विश्वासे पुढती धावे । वसू जैसा ॥764॥
(अज्ञानाची लक्षणे = रोगादींची चिंता करत नाही, क्षणभंगुरता जाणत नाही)
तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळा सुरक्षितपणे पोळ (बैल) चरून आला, त्या विश्वासाने जसा तो पोळ पुन्हा त्या अरण्याकडे धावतो.
765-13
का सर्पघराआंतु । अवचटे ठेवा आणिला स्वस्थु । येतुलियासाठी निश्चितु । नास्तिकु होय ॥765॥
ज्या जागेत पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले, एवढ्यावरून जो खास नास्तिक होतो (म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो व तो द्रव्य घेऊ देत नाही ही गोष्ट खोटी आहे असे मानतो.


766-13
तैसेनि अवचटे हे । एकदोनी वेळा लाहे । एथ रोग एक आहे । हे मानीना जो ॥766॥
त्याप्रमाणे आरोग्य, हे एखादे दुसरे वेळी चुकून मिळालेले असले, तर तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे, ही गोष्ट जो मानीतच नाही.
767-13
वैरिया नीद आली । आता द्वंद्वे माझी सरली । हे मानी तो सपिली । मुकला जेवी ॥767॥
शत्रूला झोप लागली एवढ्यावरून जो असे मानतो की आता आपले भांडणतंटे संपले, असे मानून जो स्वस्थ रहातो, तो ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळासह नाश पावतो.
768-13
तैसी आहारनिद्रेची उजरी । रोग निवांतु जोवरी । तव जो न करी । व्याधी चिंता ॥768॥
त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेथपर्यंत यथास्थित चालू आहेत व जोपर्यंत रोग निवांत आहे, तोपर्यंत जो रोगाची काळजी करीत नाही.
769-13
आणि स्त्रीपुत्रादिमेळे । संपत्ति जव जव फळे । तेणे रजे डोळे जाती । जयाचे ॥769॥
आणि स्त्री पुत्रादिकांच्या संगतीत जसजशी संपत्ती अधिकाधिक मिळत जाते, तसतसा त्या संपत्तीच्या धूराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो,
770-13
सवेचि वियोगु पडैल । विळौनी विपत्ति येईल । हे दुःख पुढील । देखेना जो ॥770॥
या स्त्रीपुत्रादि व संपत्ती यांचा तात्काळ वियोग होईल व एका दिवसात वाईट अवस्था येईल, हे पुढले दु:ख जो आगाऊ जाणत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


771-13
तो अज्ञान गा पांडवा । आणि तोही तोचि जाणावा । जो इंद्रिये अव्हासवा । चारी एथ ॥771॥
अर्जुना, तो अज्ञानी आहे, जो इंद्रियांना हवे ते बरे वाईट न पहाता विषय देतो, तो देखील अज्ञानीच समजावा.
772-13
वयसेचेनि उवाये । संपत्तीचेनि सावाये । सेव्यासेव्य जाये । सरकटितु ॥772॥
(अज्ञानाची लक्षणे = विषयाधीनता, अविचार) तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या साह्याने जो सेवन करण्य़ास योग्य-अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो.
773-13
न करावे ते करी । असंभाव्य मनी धरी । चिंतू नये ते विचारी । जयाची मती ॥773॥
जे करू नये ते करतो व न होणार्‍या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयीच ज्याची बुद्धी विचार करते.
774-13
रिघे जेथ न रिघावे । मागे जे न घ्यावे । स्पर्शे जेथ न लागावे । आंग मन ॥774॥
जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो व जेथे अंग किंवा मन लागू देऊ नये त्यांना जाऊन खेटतो.
775-13
न जावे तेथ जाये । न पाहावे ते जो पाहे । न खावे ते खाये । तेवीचि तोषे ॥775॥
जेथे जाऊ नये, तेथे जातो, जे पाहू नये ते पहातो व खाऊ नये ते खातो व ह्या निषिद्ध गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटता त्याविषयी आनंद मानतो.

दिवस १९५ वा. १४, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २३२९ ते २३४०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २३२९
सर्वविशी आह्मी हेचि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥
पाहिले चि नाही मागे परतोनी । जिंकिला तो क्षणी क्षण काळ ॥धृपद॥
नाही पडो दिला विचाराचा गोवा । नाही पाठी हेवा येऊ दिला ॥२॥
केली लाग वेगी अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥
कोठे मग ऐसे होते सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥४॥
तुका म्हणे लाभ घेतला पालवी । आता नाही गोवी कशाची ही ॥५॥
अर्थ
सर्व गोष्टी विषयी आम्ही लाभ करून घेतला आहे कारण आम्ही आमच्या स्वामी पांडुरंगाची चरणसेवा साधली आहे. स्वामी ची चरण सेवा करतांना आम्ही प्रपंचा कडे मागे परतून देखील पाहिले नाही त्यामुळे हरीचे नाम घेताना आम्ही क्षणो क्षणाला काळाला जिंकले आहे. हरीचे चिंतन करत असताना आम्ही मनामध्ये कोणत्याही विषयी विचार येऊ दिला नाही आणि पोटातही कोणत्या प्रकारचा हेवा येऊ दिला नाही. हरिच्या नामस्मरणा विषयी, चींतना विषयी आम्ही लवकर घाई करून तातडी केली आणि मनातील वाईट भावना काढून टाकल्या. हरीचे नाम स्मरण व चिंतन मनुष्य देहावाचुन इतर कोठेही घडणे शक्य आहे काय तर नाही व सांगताही येत नाही त्यामुळे संसाराविषयी च्या प्रत्येक इच्छेला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मनुष्यदेहात येऊन आमच्या स्वामीची चरणसेवा व त्याचे चिंतन, नामस्मरण करण्याचा लाभ आमच्या नशिबी बांधून घेतला आहे त्यामुळे आम्हाला आता कोणत्याही प्रकारची अडचणच राहिली नाही.
3:57

अभंग क्र. २३३०
येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम । तेचि मज प्रेम देई देवा ॥१॥
डोळे भरूनिया पाहे तुझे मुख । तेचि मज सुख देई देवा ॥धृपद॥
कान भरोनिया ऐके तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥२॥
वाहे रंगी टाळी नाचेन उदास । हे देई हातास पाया सुख ॥३॥
तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतू यासी ॥४॥
अर्थ
देवा मी माझ्या मुखाने तुझ्या रुपाचे, तुझ्या गुनाचे वर्णन कायम करेल असेच प्रेम मला तू द्यावे. देवा मी तुझे मुख डोळे भरून पाहिलं असेच सुख मला द्यावे. देवा कान भरून तुझी कीर्ती ऐकेन अशीच विश्रांती मला द्यावी. मी तुझ्या नाम चिंतनाच्या आनंद रंगात टाळी वाजविण व देहाविषयी उदास होवून नाचेन हेच सुख माझ्या हाताला व पायाला तू द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा सर्व देह केवळ तुझेच चिंतन करील व तुझ्यावाचून इतर कोणाचेही चिंतन माझ्या मनात येऊ देऊ नकोस.
3:57

अभंग क्र. २३३१
तू माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूचि माझे हित करिता देवा ॥१॥
तू चि माझा देव तू चि माझा जीव । तू चि माझा भाव पांडुरंगा ॥धृपद॥
तू चि माझा आचार तूचि माझा विचार । तू चि सर्व भार चालविसी ॥२॥
सर्व भावे मज तू होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातसे ॥३॥
तुका म्हणे तुज विकला जीवभाव । कळे तो उपाव करी आता ॥४॥
अर्थ
देवा तूच माझा माय बाप सर्व गण-गोत्र व वित्त असून तुच माझा हित करणारा आहेस. पांडुरंगा तूच माझा देव आहेस जीव आहेस आणि तुच माझा भक्ती भाव आहेस. देवा तूच माझा अचार आहेस तूच माझा सद्विचार आहेस आणि माझा योगक्षेमाचा भार देखील चालवणारा तुच आहेस. देवा सर्व भावे काया-वाचा-मनाने तुच मला प्रमाण आहे असे मी शपथ घेऊन सांगतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझा जीव भाव तुला विकला आहे त्यामुळे माझा उद्धार करण्याविषयी तुला काय उपाय करता येईल तो तू कर.
3:58

अभंग क्र. २३३२
वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा ॥१॥
गेला मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाही ॥धृपद॥
गुणा अवगुणाचे पडती आघात । तेणे होय चित्त कासावीस ॥२॥
काही एक तुझा न देखो आधार । म्हणऊनी धीर नाही जीवा ॥३॥
तुका म्हणे तू ब्रम्हांडाचा जीव । तरी का आम्ही कीव भाकीतसो ॥४॥
अर्थ
देवा मी तुला वारंवार माझी आठवण करून देतो कारण माझा एकनिष्ठ भक्ती भाव तुझ्याविषयी कसा आहे ते तुला कळवा म्हणून. या मनुष्य देहातील गेलेला दिवस परत फिरून येत नाही आणि पुढे येणाऱ्या दिवसाची मी तर अपेक्षा धरत नाही. लोकांचे गुण व अवगुण सांगण्याचे आघात माझ्याकडून घडत आहेत त्यामुळेच माझे चित्त कासावीस होत आहे. व अशा परिस्थितीतही तुझा काही एक आधार मला दिसत नाही त्यामुळे तर मला धीर धरवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तूच सर्व ब्रह्मांडाचा जीव आहेस तरी देखील आम्हाला तुझी करुणा भाकावी लागते, तू जर आमची स्वतःहून काळजी घेतली असतीस तर आम्हाला तुझी करुणा भाकावीच लागली नसती.
3:58

अभंग क्र. २३३३
असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥१॥
आमुचे स्वहित जाणतसो आम्ही । तुझे वर्म नामी आहे तुझ्या ॥धृपद॥
विचारिता आयुष्य जाते वायाविण । रोज नागवन पडतसे ॥२॥
राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक ते मनी येऊ नेदी ॥३॥
तुका म्हणे येथे येसी अनायासे । थोर तुज पिसे कीर्तनाचे ॥४॥
अर्थ
देवा तुझ्या कडे मोक्षाचे अनेक प्रकार आहेत ते तुझ्याकडेच असू दे त्याच्यासाठी मी व्यर्थ कष्ट करत का राहावे. आमचे स्वहित आम्ही जाणतो अन तुझ्या प्राप्तीचे खरे वर्म तुझ्या नामातच आहे हे देखील आम्हाला समजले आहे. तुझ्या नामा वाचून दुसरा कोणताही विचार करत बसलो की आयुष्य वाया जाऊन रोज नुकसानच होते. यामुळे मी तुझे पाया आठवून निश्चिंत राहील व दुसरे काहीही मनात येऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुला कीर्तनाचे फार मोठे वेड आहे त्यामुळेच तुला कीर्तनाला कोणी बोलावले जरी नाही तरी तु तेथे आवर्जून येतोस.
3:59

अभंग क्र. २३३४
विष्णुदासा भोग । जरी आम्हा पीडी रोग ॥१॥
तरि हे दिसे लाजिरवाणे । काय तुम्हासी सांगणे ॥धृपद॥
आम्हा काळे खावे । बोलिले ते वाया जावे ॥२॥
तुका म्हणे दास । आम्ही भोगू गर्भवास ॥३॥
अर्थ
देवा विष्णुदासांना विविध प्रकारचे भोग त्रास आणि रोग होऊ लागलेत, देवा तुमचे वागने हे लाजिरवाणे दिसेल आणि हे तुम्हाला सांगावे लागेल काय ? आम्हाला काळाने खावे आणि आम्ही बोललेले वाया जावे तर, तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुमचे दास असून देखील आम्ही गर्भवास तर भोगू परंतु तुम्हाला हे चांगले दिसणार नाही.
3:59

अभंग क्र. २३३५
भावे गावे गीत । शुद्ध करूनिया चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥धृपद॥
आणिकाचे कानी । गुण दोष मना नाणी ॥२॥
मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥३॥
वेची ते वचन । जेणे राहे समाधान ॥४॥
तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥
अर्थ
चित्त शुद्ध करून भक्तीभावाने हरीचे गीत गावे. जर तुला देव हवा असेल तर त्याच्या प्राप्तीसाठी हा सुलभ उपाय आहे. इतर लोकांचे गुणदोष कानावर तर काय मनात देखील येऊ देऊ नकोस. संतांच्या चरणावर मस्तक वाकून ठेव. नेहमी असे बोलत जावे की ज्यामुळे सर्वाना समाधान प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात थोडा, फार तरी परोपकार करत जा हे सर्व उपाय मी देवाच्या प्राप्ती करता सांगितले आहेत.
4:00

अभंग क्र. २३३६
नव्हो आता जीवी कपट वसती । मग काकुळती कोणा यावे ॥१॥
सत्याचिये मापे गाठी नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥धृपद॥
चोखटिया नाही विटाळाचा आघात । साच ते साचांत सांच पडे ॥२॥
विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढे बळ तृणतुल्य ॥३॥
आहाराच्या घासे पचोनिया जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥४॥
तुका म्हणे ताळा घालावा वचनी । तू माझी जननी पांडुरंगे ॥५॥
अर्थ
आता माझ्या अंतःकरणात कपट राहू नये आणि जर कपटच राहिले नाही तर काकुळतीला कोणाला जाण्याची गरज आहे ? सत्य कार्‍यामध्ये कधीही अडचण येत नाही आणि सत्य कार्‍यात नारायण सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोड, प्रसन्न असतो. जे सत्य कर्म करत असतात त्यांच्यावर केव्हाही कोणत्याही विटाळाचा आघात होत नाही आणि सत्य कर्म केल्याने सत्यच पदरात पडते व सत्य हळूहळू वाढत चालते. कोणत्याही मार्गाने आपण चाललो असोत आपल्याला जिथे जायचे असेल तो मार्ग आपण विचारून घेऊन त्या मार्गाने गेलो तर आपण योग्य मुक्कामाला पोहचु त्यामुळे आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होईल आणि बुद्धीच्या पुढे शारीरिक बळ हे गवताप्रमाणे असते. अन्न सेवन करताना आपण घासा घासाने शांततेने जेवण केले तर ते पचुन व्यवस्थित जिरतेही आणि पुन्हा आपल्याला जेवणाची इच्छा उर्वरित राहते. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगे तु माझी जननी आहे त्यामुळे माझ्या बोलण्यास योग्य मर्यादा घाल.
4:15

अभंग क्र. २३३७
नव्हती ही माझी जायाची भूषणे । असे नारायणे उचित केले ॥१॥
शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळीच जिव्हाळा झरवणी ॥धृपद॥
अर्थांतरी असे अनुभवसेवन । परिपाकी मन साक्ष येथे ॥२॥
तुका म्हणे मज सरते परते । हे नाही अनंते उरो दिले ॥३॥
अर्थ
माझी काव्यरूपी भूषणे ही जाणारी नाहीत तर ते टिकणारे आहेत असे ते नारायणाने उचित केलेले आहेत. माझे काव्यरूपी भूषणे म्हणजे शब्दांची ओवणे असून रत्नांच्या माळाच आहे त्यामध्ये जिव्हाळ्याचा झरा मूळचाच आहे. माझ्या काव्यरूपी भूषणांमध्ये वेगवेगळे अर्थ असून अनेक अनुभव आहेत व यामध्ये ब्रम्‍ह रसाचेही सेवन आहे याविषयी माझे परिपाकी मन म्हणजे शास्त्र व अनुभव सपंन्न असणारे माझे मनच साक्षी आहे. तुकाराम महाराज म्हणतात या आनंताने मला काव्य रुपी स्फूर्ती अशी दिली आहे की ती कधी संपणार नाही आणि त्याने मला त्याच्या पेक्षा वेगळे ही उरु दिले नाही.
4:16

अभंग क्र. २३३८
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचू वाचा ऐसे जाले ॥१॥
उपक्रमे वदे निशब्दाची वाणी । जे कोठे बंधनी गुंपोनेणे ॥धृपद॥
तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन ॥२॥
तुका म्हणे येथे गेला अतिशय । आता पुन्हा नये तोंड दावू ॥३॥
अर्थ
मी जे काव्य केले आहे ते सहज रीतीने लीला रुपी काव्य केले आहे परंतु ते मी केले नसून केवळ मी त्याचा साक्षी आहे व त्याचा त्याग ही मी करू शकत नाही इतका मला त्या काव्याचा हेवा जडला आहे. हा जो माझ्या वाणीतुन काव्य रुपी उपक्रम चालू आहे तो पहिल्यापासून जे निशब्द असे ब्रम्‍ह आहे हे त्याचेच निरूपण करीत आहे व कोणत्याही माइक पदार्थाचे वर्णन करण्याच्या बंधनात माझी वाणी पडत नाही. सर्व अंधाराचा नाश सूर्य करतो व त्या सूर्‍याच्या उजडा मध्ये सर्व लोक आपापले व्यवहार करत असतात परंतु सर्वाच्या व्यवहारापासून सूर्य वेगळा राहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काव्य केले आहे त्याविषयी “मी काव्य केले” असा अभिमान माझा केव्हाच गेला आहे आता तो अभिमान केव्हाच परत येणार नाही.
4:16

अभंग क्र. २३३९
बोलाल या आता आपुल्यापुरते । मज या अनंते गोवियेले ॥१॥
झाडिला न सोडी हातीचा पालव । वेधी वेधे जीव वेधियेला ॥धृपद॥
तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवे मिठी अंगसंगे ॥२॥
तुका म्हणे तुम्हा होईल हे परी । अनुभव वरी येईल मग ॥३॥
अर्थ
एक भक्त स्री देवाशी अनन्य झालेली असते व ती आपल्या मैत्रिणींना म्हणते हे, सख्यानों तुम्हाला बोलायचं असेल तर ते आपल्यापुरतेच मर्‍यादित बोला माझ्याशी बोलू नका कारण या आनंताने मला त्याच्यात गुंतून टाकले आहे. त्याने माझा पदर धरला आहे त्याला कितीही हिसका दिला तरी तो काही त्याच्या हातून माझा पदर सोडत नाही. तो त्याच्या जवळ जाणाऱ्या माणसाला वेधून टाकून माझा ही जीव त्याने वेधून टाकला असून त्याचेच वेध मला त्याने लावले आहे. अहो तुम्ही जे काही बोलता ते शब्द माझ्यासाठी केवळ कोरड्या गप्पा आहेत मला तर प्रत्यक्ष देवानेच मिठी मारली असून त्याचा अंग संग मला झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हालाही या भक्त स्री प्रमाणे होईल, जेव्हा तुम्हाला देवाचा अनुभव येईल त्यावेळेस तुमची देखील अशीच स्थिती होईल.
4:17

अभंग क्र. २३४०
जैशा तुम्ही दुरी आहा । तैशा राहा अंतरे ॥१॥
नका येऊ देऊ आळ । अंगी गोपाळ जडलासे ॥धृपद॥
अवघा हाचि राखा काळ । विक्राळ चि भोवता ॥२॥
तुका म्हणे मज ऐशा । होता पिशा जगनिंद्य ॥३॥
अर्थ
देवाशी अनन्य असलेली भक्त स्री म्हणते की हे सखयानों जश्या तुम्ही आता माझ्यापासून दूर आहात तशाच दूर रहा. माझ्या अंगी गोपाळ जडला आहे व त्याच्याशी व्याभिचार केल्याचा आळ माझ्यावर आला आहे तसा आळ तुमच्यावर येऊ देऊ नका. तुमच्या भोवती मृत्यू रुपी विक्राळ काळ आहे त्याच्या पासूनच तुमचे तुम्ही रक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर माझ्यासारख्या देव वेड्या झालात तर तुम्ही ही माझ्यासारख्या जगात निंदेला पात्र व्हाल (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी सामान्य कोटीतील स्त्रियांना उपरोधिक भाषेमध्ये परमार्थाचा उपदेश केला आहे. )
4:17

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version