“१३ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 13 January
राम कृष्ण हरी आज दिनांक 13 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
26-2
तरी आता काय जाहले । कायि स्नेह उपनले । हे नेणिजे परी कुडे केले । अर्जुना तुवा ॥26॥
तर मग आताच (यांक्षणी) असे काय झाले, हा मोह कोठून उत्पन्न झाला, (हे मला काही कळत नाही) परंतू हे अर्जुना ! ! हे तू वाईट केलेस. ॥26॥
27-2
मोहो धरिलीया ऐसे होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेसी ॥27॥
जर या प्रसंगी (युद्ध) तू चित्तामध्ये मोह ठेवलास, तर तुझी असणारी (आजपर्यंतची)प्रतिष्ठा नाहीशी होईल आणि इहलोकसह परलोकासही तू अंतरशील. (गमलवशील) ॥27॥
28-2
हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हे संग्रामी पतन जाण । क्षत्रियांसी ॥28॥
युद्धप्रसंगी हा तुझा मनाचा दुबळेपणा (ढिलेपणा)तुझ्यासाठी हिताचे नाही. कारण, युद्धाच्या वेळी दुबळेपणा ठेवल्याने क्षत्रियांचे अधःपतन होते, हे लक्षात ठेव. ॥28॥
29-2
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हे ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥29॥
अशाप्रकारे (परम कृपाळू) भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विविध प्रकारे समजावले. मग हे सर्व ऐकून अर्जुन पुढे म्हणाला. ॥29॥
अर्जुन उवाच ।
कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥2. 4॥
भावार्थ ::-अर्जुन म्हणाला, ” हे मधुसूदना, पितामह भीष्मावर आणि गुरू द्रोणाचर्य यांच्यावर कसा बरा बाण सोडू ? हे शत्रूनाशका, ते दोघेही पूजनीय आहेत. ॥4॥
30-2
देवा हे येतुलेवरी । बोलावे नलगे अवधारी । आधी तूचि चित्ती विचारी । संग्रामु हा ॥30॥
देवा ! ऐका, तू मला एवढे समजावून सांगतोस; पण आधी तूच विचार कर. हे युद्ध आहे का ? ॥30॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-2
हे झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा ॥31॥
हे युद्ध नव्हे; मोठा अपराध आहे. हे करण्यास आम्ही तयार झालो, तर हा दोष आहे. एव्हडेच नाही; तर आम्ही उघड उघड आराध्यदेवतांचा उच्छेद करीत आहोत. ॥31॥
32-2
देखे मातापितरे अर्चिजती । सर्वस्वे तोष पावविजती । तिये पाठी केवी वधिजती । आपुला हाती ॥32॥
पाहा, माता-पितांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे त्यांना संतुष्ट करावे आणि पुढे आपल्या हाताने त्यांचा वध कसा बरे करावा ? ॥32॥
33-2
देवा संतवृंदु नमस्कारिजे । का घडे तरी पूजिजे । हे वाचूनि केवी निंदिजे । स्वये वाचा ॥33॥
देवा ! साधूसंतांना नमस्कार करावे, शक्य असेल (घडलें) तर त्यांची पुजा करावी. पण हे न करता आपल्या वाचेने त्यांची निंदा कशी कराव ? ॥33॥
34-2
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हा नियमांचे । मज बहुत भीष्मद्रोणांचे । वर्ततसे ॥34॥
भीष्मादिक आमचे गोत्रज आणि द्रोणादी आमचे गुरू आहेत. ते आम्हला सदैव पुजनीय आहेत. पितामह भीष्म व गुरू द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे ! ॥34॥
35-2
जयालागी मने विरु । आम्ही स्वप्नीही न शको धरू । तया प्रत्यक्ष केवी । घातु देवा ॥35॥
हे देवा ! ! ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात ही वैर धरू शकत नाही, तर मग त्यांचा आम्ही प्रत्येक्ष घात कसा बरे करावा ? ॥35॥
36-2
वर जळो हे जियाले । एथ आघवेयांसी हेचि काय जाहले । जे यांचा वधी अभ्यासिले । मिरविजे आम्ही ॥36॥
आज सर्वाना काय झाले ? ज्यांच्या कडून आम्ही ज्या शस्त्रविद्देचा अभ्यास केला, त्याच विद्धेचा उपयोग त्यांचे वध करण्यासाठी करावा, आणि प्रतिष्ठा प्राप्त करावी. यांपेक्षा आग लागो या जगण्याला ! ! ॥36॥
37-2
मी पार्थु द्रोणाचा केला । येणे धनुर्वेदु मज दिधला । तेणे उपकारे काय आभारैला । वधी तयाते ॥37॥
मी अर्जुन, पण गुरू द्रोणाचार्यांनी मला (धनूर्विद्धेत निपूण) बनविले. या त्यांच्या उपकाराने मी (दडपलेला) भारभूत झालो आहे, तर त्यांचा वध मी करावा काय ? ॥37॥
38-2
जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेचि मने व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥38॥
अर्जुन म्हणाला ! ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाला, त्यांच्या विषयीच मनात पाप आणावे, असा प्रकारचा मी काय भस्मासूर आहे का ? ॥38॥
39-2
गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके ।
हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥2. 5॥
भावार्थ :-
महान परपूज्य गुरूंना न मारता यालोकी भिक्षा मागून जीवन जगणे (उदरनिर्वाह करणे) हे कल्याणकारी आहे. कारण गुरूजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या अर्थरूप व कामरूप भोगांनाच भोगावे लागणार.
39-2
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनी नेणिजे । द्रोणाचिये ॥39॥
देवा, समुद्र गंभीर आहे असे (ऐकतो) म्हणतो. पण त्याचे गांभीर्य वरवरचे आहे. कारण अनेक वेळा तो क्षुब्ध(रागावतो) होतो. परंतु गुरू द्रोणाचार्यांच्या मनात राग निर्माण झालेले कधी माहित नाही. ॥39॥
40-2
हे अपार जे गगन । वर तयाही होईल मान । परि अगाध भले गहन । हृदय यांचे ॥40॥
हे आकाश अमर्याद आहे खरे, पण एखाद्या वेळी त्याचे मोजमापही येईल. परंतू द्रोणाचार्यांचे हृदय ज्ञानाने गहन (अंतःकरण इतके विचारपूर्ण)आणि सखोल आहे. त्यामुळे त्याचे मोजमाप करता येणार नाही. ॥40॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-2
वरी अमृतही विटे । की काळवशे वज्र फुटे । परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥41॥
एकवेळ अमृत आंबेल (विटेल) किंवा वज्र ही फुटेल; पण द्रोणाचार्यांचे मनात क्रोधादि विकार उत्पन्न (निर्माण) करण्याचा कसालाही प्रयत्न केला तरी तरी त्यांचे हे (विशाल हृदय) मन धर्म (अविकारी होणार) सोडणार नाही.
42-2
स्नेहालागी माये । म्हणिपे ते कीरु होये । परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणी इये ॥42॥
स्नेह, (ममता, प्रेम)हे आईनेच करावे असे म्हणतात, हे खरे आहे. पण गुरू द्रोणाचार्याच्या ठिकाणी (गुरू द्रोण हे) मूर्तिमंत ममता (प्रेम) आहे.
43-2
हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥43॥
अर्जून म्हणाला ! गुरू द्रोणाचार्य हे जणू दयेचे(कारुण्याचे) उगमस्थान आहेत. सर्व सद्गूणांचे भांडार आहेत आणि विद्देचे अमर्याद सागर आहेत.
44-2
हा येणे माने महंतु । वरी आम्हालागी कृपावंतु । आता सांग पा येथ घातु । चिंतू येईल ॥44॥
अशा प्रकारे ते (गुरू द्रोण) सर्व गुणांनी श्रेष्ठ असून, त्यांची आमच्या वर कृपा आहे ! ! तर मग देवा ! तूच सांग, त्यांचा घात करण्याचे विचार देखील माझ्या मनात आणता येईल का ?
45-2
ऐसे हे रणी वधावे । मग आपण राज्यसुख भोगावे । ते मना न ये आघवे । जीवितेसी ॥45॥
अशांना (द्रोणाचार्या सारख्या) रणांगणात मारून आपण राज्यसुख भोगावे. ही गोष्ट माझ्या मनात देखील येवू शकत नाही.
46-2
हे येणे माने दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागता भली ॥46॥
इतके हे कार्यकठीण आहे, आणि यापेक्षा राज्यभोग श्रेष्ट असेल, तर ते असू दे, मला तर त्या भोग सुखा पेक्षा भीक मागून जगणे बरे वाटते.
47-2
ना तरी देशत्यागे जाइजे । का गिरिकंदर सेविजे । परी शस्त्र आता न धरिजे । इयांवरी ॥47॥
अथवा, देशत्याग करावा, डोंगर दर्यात जाऊन रहावे. पण यांचे (द्रोणाचार्य आणि इतर) घात (वध) करण्यासाठी शस्त्रे हाती धरू नये.
48-2
देवा नवनिशती शरी । वावरोनि यांचा जिव्हारी । भोग गिवसावे रुधिरी । बुडाले जे ॥48॥
देवा ! नविन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानी प्रहार करून, यांच्या रक्तात बुडालेले ते भोग आम्ही भोगवेत, हे योग्य नाही.
49-2
ते काढूनि काय कीजती । लिप्त केवी सेविजती । मज न ये हे उपपत्ति । याचिलागी ॥49॥
ते प्राप्त करून तरी काय उपयोग आहे ? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे उपभोग तरी कसा घ्यायचा ? याकरिता युद्ध करण्याचा तुमचा युक्तिवाद पसंद नाही.
50-2
ऐसे अर्जुन तिये अवससरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारी । परि ते मना न येचि मुरारी । आइकोनिया ॥50॥
(याप्रकारे बोलून झाल्या नंतर)
” हे कृष्ण ऎक ” असे अर्जुन म्हणाला, परन्तु एव्हडे सगळे सांगून सुद्धा आपले बोलणे श्रीकृष्णास पटत नाही, हे त्याने (अर्जुनाने) जाणले
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १३ वा, १३ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १४५ ते १५६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 145
साळंकृत कन्यादान । पृथ्वी दानाच्या समान ॥१॥
परि ते न कळे या मूढा । येईल कळो भोग पुढा ॥धृपद॥
आचरता कर्म । भरे पोट राहे धर्म ॥२॥
सत्या देव साहे । ऐसे करूनिया पाहे ॥३॥
अन्न मान धन । हे तो प्रारब्धा आधीन ॥४॥
तुका म्हणे सोसे । दुःख आता पुढे नासे ॥५॥
अर्थ
मुलीचे सळंकृत कन्यादान हे पृथ्वीदानाइतके महत्वाचे पूण्य आहे. या मुर्खाला”मुलीच्या बापाला” कन्येचा हुंडा घेउन होणारे पाप आज कळत नसले तरी पण पुढे ते पाप भोगताना कळते. धर्माचारणामुळे पोटहि भरते आणि धर्महि घडतो. सत्याने वागणाऱ्या मनुष्यास देवहि सहाय्य करतो याचा अनुभव तुम्ही घ्यावा. अन्न, धन, मानसन्मान प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नाशिबाप्रमाने मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, कोणतीही अभिलाषा दुःखदायक आहे, त्याचा शेवटहि दुःखकारकच आहे.
अभंग क्र. 146
दिवट्या वाद्य लावुनि खाणे । करूनि मंडण दिली हाती ॥१॥
नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचे ॥धृपद॥
गौरविली विहीण व्याही । घडिले काही ठेवू नका ॥२॥
करू द्यावे व्हावे बरे । ठायीचे का रे न कळेचि ॥३॥
वर्हाडियांचे लागे पाठी । जैसी उटि का तेली ॥४॥
तुका म्हणे जोडिला थुंका । पुढे नरका सामग्री ॥५॥
अर्थ
दिवट्यांचि आरास करुण, वाद्ये लावून, सुग्रास भोजन देवुन सुंदर मुलगी (वस्त्रालंकाराने नटलेली) वराला अर्पण करतात. आपल्या मुलीला घरी घेऊन जाणार म्हणून वराचे पाय धुतात. व्याही, विहिणीचा मानसन्मान करतात, काही कमी पडू देत नाहीत. वराकडिल मंडळी काशीही वागली तरी वाईट वाटून घेवू नये. विहीण मानसन्मानासाठी रागाऊन वर्हाडापाठीमागे धावते. तुकाराम माहाराज म्हणतात, लोकांचे असे आचरण म्हणजे नरकात जाण्याची व्यवस्था आहे.
अभंग क्र. 147
ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केले ॥१॥
ऐका जेणे विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥धृपद॥
नरमास खादली भाडी । हाका हाडी म्हणोनि ॥२॥
अवघे पाप केले तेणे । जेणे सोने अभिलाषिले ॥३॥
उच्चारिता मज ते पाप । जिव्हे काप सुटतसे ॥४॥
तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना का ॥५॥
अर्थ
जेणे आपली कन्येचा नवर्याला देउन तीचा सौदा केला त्याला ब्रम्हहत्या, गोहत्या यांसारखी पापे लागली कन्येचा नवर्याला देउन तीचा सौदा केला. त्याने नरमास भक्षण केल्याप्रमाणे पाप त्याने केले आहे. सोन्याची अश्या धरली. आशा प्रकारच्या पापी लोकाचा उच्चार करतांना माझी जीभ कापते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची पापे करण्यापेक्षा त्याने व त्याच्या बायकोने भिक मागून पोट भरावे.
अभंग क्र. 148
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥
फुकासाठी पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडी ॥धृपद॥
ऐके राजा न करी दंड । जरि या लड दुष्टासि ॥२॥
तुका म्हणे त्याचे अन्न । मद्यपानाचे समान ॥३॥
अर्थ
कन्येचि विक्रि करणार्या पापी मनुष्याची बाजू घेणारा पापीच आहे. असा मनुष्य पापी माणसांची बाजु जर कोणी घेत असेल तर तो फुकट दुख विकत घेतो व पितरांना नरकवास भोगायला लावतो. अश्या पापी मनुष्याला जर राज्याने देखील शिक्षा केली नाही तर तो राजाहि पापी ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पापी मनुष्याचे अन्न सेवन करू नये; कारण ते मद्यपानासमान आहे.
अभंग क्र. 149
कपट काही एक । नेणे भुलवायाचे लोक ॥१॥
तुमचे करितो किर्तन । गातो उत्तम ते गुण ॥धृपद॥
दाऊ नेणे जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥
नाही शिष्यशाखा । सांगो अयाचित लोका ॥३॥
नव्हे मठपति । नाही चाहुरांची वृत्ति ॥४॥
नाही देवार्चन । असे मांडिले दुकान ॥५॥
नाही वेताळ प्रसन्न । काही सांगो खाण खुण ॥६॥
नव्हे पुराणिक । करणे सांगणे आणीक ॥७॥
नाही जाळीत भणदी । उदो म्हणोनि आनंदी ॥८॥
नेणे वाद घटा पटा । करिता पंडित करंटा ॥९॥
नाही हालवीत माळ । भोवते मेळवुनि गबाळ ॥१०॥
आगमीचे नेणे कुडे । स्तंभन मोहन उच्चाटणे ॥११॥
नव्हे यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१२॥
अर्थ
लोकांना भुलाविण्यासाठी मी कोणतेही कपटकृत्य करीत नाही. देवा मी फक्त तुमचे उत्तम गुण गातो आणि नामस्मरण करतो. लोकांना भूल पाडण्यासाठी मी जडीबूटीचा चमत्कार दाखवित नाही. माझी याचना न करणारी वृत्ती पसरवीणारी माझे कोणी शिष्यमंडळी नाहीत. मी मठपति नाही, मला जमिनींची देणगी मिळालेली नाही. दूकान मांडावे तसे देवाची पूजा अर्चा करण्याचे असे उघड प्रदर्शनहि मी मंडलेले नाही. भुत-वेताळाला वष करुण लोकांचे भविष्य जाणणारा मी नाही. लोकांना सांगणारा एक आणि करणारा, असा मी एक दांभिक आणि पुराणिकही नाही. मी अंबाबाईचा उदो म्हणून कोणत्याही माणसाच्या डोक्यावर खापर जाळत नाही. उदो, उदो म्हणत नाचणारा भावाविन कोरडया भक्तीचा वेदात सांगणारा करंटा पंडितही नाही. हातातील जपमाळ हलवुन, भोवती पाखंडयांचा मेळा जमावणारा मी नाही. आपले महत्त्व वाढविण्यासाठी स्तंभन, मोहन, उच्चाटनासारखे खोटे उपचारही मी करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलभक्तिवाचून मी कोणतेही उपचार जानत नाही.
अभंग क्र. 150
रडोनिया मान । कोण मागता भूषण ॥१॥
देवे दिले तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥धृपद॥
लाविता लावणी । विके भीके केज्या दानी ॥२॥
तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥३॥
अर्थ
रडून, भुंकुन जर मान मागितला आणि समाजाने तो अनिच्छेने दिला, तर त्याला महत्त्व नाही. देवाने जे दिले आहे तेच गोड मानून समाधानी वृत्तीने राहतो. शेतातील धन्याचे दान आणि भिक मागून आणलेल्या धन्याचे दान यामध्ये फरक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात धीर, संयम धरल्यास हिर्याप्रमाने मोल प्राप्त होते.
अभंग क्र. 151
ऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ।
जे का सिच्चदानंदी नित्यानंदु । जे का मोक्षसिद्धी तीर्थ वंदू रे ॥१॥
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।
भूतकृपा मोडी द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करी बंधु रे ॥धृपद॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करी । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारी ।
लघुत्व सर्वभावे अंगीकारी । सांडीमांडी मीतूपण ऐसी थोरी रे ॥२॥
अर्थ काम चाड नाही चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानी जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥
मनी दृढ धरी विश्वास । नाही सांडीमांडीचा सायास ।
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥
अर्थ
जे आपल्या आनंदात निमग्न असतात, इश्वरचिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते, त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अश्या साधुंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात व भव बंध तुटतात. त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्तिभाव ठेव कारण, त्यांच्या ठिकाणी स्थीरबुद्धि, नास्तिक्यभेद करणारी बुद्धि आहे. भूतदया धर मनातील द्वेषाचा कांदा फोडून टाक, शत्रु, मित्र, पुत्र या सर्वा प्रती समभाव धरअरे तू सर्वभावे लहानपणाचा अंगीकार कर अरे तू मी तू पणा चा लहान मोठेपणा चा त्याग कर. शरीर, वाणी, मन आणि बृद्धि शुद्ध असावी. सर्वत्र विठ्ठालाचे स्वरुप पहावे, विनम्रता असावी, अहंकार नसावा. ज्याच्या मनी धन, कामवासना नाही, मान सन्मानाचा मोह नाही, जो समाधानी वृत्तीचा आहे, त्याला संतसज्जन आनंदाने भेटतात. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा, आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंच्याला विटला आहे, ज्याने आवड निवड टाकून दिली आहे, त्याला संत सज्जन नित्य भेट देतात साधू दर्शन नित्य घडते.
अभंग क्र. 152
सेवितो हा रस वाटितो आणिका । घ्या रे होऊ नका रानभरी ॥१॥
विटेवरी ज्याची पाउले समान । तोचि एक दानशूर दाता ॥धृपद॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायी ॥२॥
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
अर्थ
मी परमार्थामधुन निघणारा रस सेवन करतो आणि आणि तो मधुर रस इतरांनाही पण वाटतो, प्रपंच्याच्या रानावानात भटकू नका, माझ्याप्रमाणे हा ब्रम्हरस प्या आणि आनंदित व्हा. जो विटेवर समचरण ठेवून उभा आहे, तोच एक जगामध्ये शूर दाता आहे, त्यानेच हा रस मला दिला आहे. याच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून रहाल तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होतील. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याचा निरोप्या आहे, तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्याचा निरोप घेऊन आलो आहे.
अभंग क्र. 153
जेणे मुखे स्तवी । तेचि निंदे पाठी लावी ॥१॥
ऐसी अधमाची याती । लोपी सोने खाय माती ॥धृपद॥
गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥२॥
विंचु लाभेविण । तुका म्हणे वाहे शीण ॥३॥
अर्थ
तोंडावर एखादा स्तुती व पाठीमागे निंदा करतो अशी हिण मनोवृत्ती असणारा केवळ दुर्जनच आहे. तो स्वतःजवळील सोन्यासारखे अन्न लपवून माती खाणारा आहे. सुग्रास भोजन गुद्द्वारातुन नरक बनूनच बाहर पडते. तुकाराम महाराज म्हणतात, विंचवाला विषाचा काही उपयोग नसतानाही तो आपल्या नांगित विष सांभाळतो.
अभंग क्र. 154
आणिकाची स्तुति आम्हा ब्रम्हहत्या । एका वाचूनि त्या पांडुरंगा ॥१॥
आम्हा विष्णुदासा एकविध भाव । न म्हणो या देव आणिकासि ॥धृपद॥
शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥२॥
तुका म्हणे मज आणिका संकल्पे । अवघीच पापे घडतील ॥३॥
अर्थ
आम्ही एका पांडुरंगाशिवाय इतरांची भक्ती व स्तुती केली तर आम्हाला ब्रम्हहत्येचे पातक लागेल. आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत, म्हणून अन्य देवतांना आम्ही मानत नाही. या वचनामध्ये मी जर खोट बोललो असेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील. तुकाराम महाराज म्हणतात, एका पांडुरंगाशिवाय इतर संकल्प माझ्या मनात प्रवेश करतील तर जगातील सर्व पापे मला लागतील.
अभंग क्र. 155
तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥१॥
माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥धृपद॥
तू तो उदाराचा राणा । माझी अल्पचि वासना ॥२॥
कृपादृष्टी पाहे । तुका म्हणे होई साहे ॥३॥
अर्थ
तहानलेल्याने गंगेचे पाणी पिल्याने गंगाजल कमी होत नाही. हे कृपानीधी, माझे मनोरथ सिद्ध पावु देत. तू उदार राजा आहेस आणि माझे मागने अगदी थोडे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तू फक्त माझ्याकडे कृपादृष्टिने पहा आणि मला मदत कर.
अभंग क्र. 156
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥
येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्प देवा शिरी ॥धृपद॥
अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥
तुका म्हणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥३॥
अर्थ
संतांचा अनादर करुण जो देवाची पूजा करतो तो अधर्माचरण करतो. देवावर मंत्रपठण करुण टाकलेली फुले दगडा प्रमाणे आहे. दारात आलेल्या भुकेल्या अतिथिला अन्न न देता देवाच्या नैवेद्याल पुरणपोळी करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या प्रकारची देवाची सेवा करणे म्हणजे देवाला दिलेली एक प्रकारचि शिक्षाच् आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

