Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१३ ऑगस्ट, दिवस २२५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी ३२६ ते ३५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २६८९ ते २७००

13 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

13 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“१३ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १३ August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १३ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २६८९ ते २७०० चे पारायण आपण करणार आहोत.
१३ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३२६ ते ३५० ,

326-14
हा संदेह जरी वाहसी । तरी सुखे पुसो लाहसी । परिस आता तयासी । रूप करू ॥326॥
हा संशय जर तुझ्या मनात असेल तर तुला तो प्रश्न सुखाने विचारता येईल. आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो, तरी तू ऐक.
327-14
(अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर गुणातीताची लक्षणे)
तरी रजाचेनि माजे । देही कर्माचे आणोजे । प्रवृत्ति जै घेईजे । वेटाळुनि ॥327॥
गुणातीत असणारा पुरुष रजोगुणाच्या उत्कर्षाने तो ज्यावेळेला प्रवृत्तीने वेढला जातो, त्या वेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात.
328-14
तै मीचि का कर्मठ । ऐसा न ये श्रीमाठ । दरिद्रलिये बुद्धी वीट । तोही नाही ॥328॥
तेव्हा (त्या गुणातीत पुरुषाला) ‘मी एक कर्मठ आहे ” असा अभिमान चढत नाही अथवा कर्मे करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद होत नाही.
329-14
अथवा सत्त्वेचि अधिके । जै सर्वेंद्रियी ज्ञान फाके । तै सुविद्यता तोखे । उभजेही ना ॥329॥
अथवा सत्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान प्रकाशित होते त्यावेळी चांगल्या विद्वत्तेने (मी ज्ञानी आहे असा) हर्षभरित होत नाही. व मोह आणि भ्रम याकडुनही तो ग्रासला जात नाही (अथवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही) तरी त्याला दुखःही होत नाही किंवा मानत नाही.
330-14
का वाढिन्नलेनि तमे । न गिळिजेचि मोहभ्रमे । तै अज्ञानत्वे न श्रमे । घेणेही नाही ॥330॥
अथवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष, मोह व भ्रम यांच्याकडून ग्रासला जात नाही, (त्याचप्रमाणे) तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही, अथवा तो अज्ञानाचा स्वीकार देखिल करत नाही.


331-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पै मोहाच्या अवसरी । ज्ञानाची चाड न धरी । ज्ञाने कर्मे नादरी । होता न दुःखी ॥331॥
मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही व त्याच्या हातून सहज कर्म झाले तर त्याचा खेदही करत नाही.
332-14
सायंप्रतर्मध्यान्हा । या तिन्ही काळांची गणना । नाही जेवी तपना । तैसा असे ॥332॥
ज्याप्रमाणे सूर्याला प्रात:काल, मध्याह्न काल व सायंकाल या तिन्ही काळांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष आतो. (म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबर नसते).
333-14
तया वेगळाचि काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे । कायि जळार्णव पाउसे । साजा होय ? ॥333॥
त्याला काही वेगळ्याच (सत्वगुणाच्या शास्त्राचा वगैरे) प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय तर नाही, तो ज्ञानाची मूर्तीच आहे.
334-14
ना प्रवर्तलेनि कर्मे । कर्मठत्व तया का गमे । सांगे हिमवंतु हिमे । कांपे कायी ? ॥334॥
अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व (मी यथासांग कर्म करणारा आहे असा अभिमान) वाटेल काय ? अर्जुना, सांग पाहू. हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय ?
335-14
नातरी मोह आलिया । काई पा ज्ञाना मुकिजैल तया । हो मा आगीते उन्हाळेया । जाळवत असे ? ॥335॥
अथवा (तमाधिक्याने) त्याच्यासमोर मोह आला असता त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय ? उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय ?


336-14
उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते ।
गुणा वर्तन्त इत्येव यो~वतिष्ठति नेङ्गते ॥14. 23॥
*श्लोकार्थ : उदासीनासारखा रहाणारा, जो गुणांच्या (गुणकार्य जे सुखदु:खादिक यांच्या) येण्याजाण्याने चलन पावत नाही, गुण आपापली कर्मे करीत आहेत (माझा त्यांच्याशी संबंध नाही) असे जाणून तटस्थ रहातो (जो गुणांच्या हालचालीबरोबर डोलत नाही,
गुणातीताची लक्षणे पुढे चालू
तैसे गुणागुणकार्य हे । आघवेचि आपण आहे । म्हणौनि एकेका नोहे । तडातोडी ॥336॥
त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे. म्हणून एक एका गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळित होत नाही
337-14
येवढे गा प्रतीती । तो देहा आलासे वस्ती । वाटे जाता गुंती- । माजी जैसा ॥337॥
वाटेने जाणारा वाटसरू संध्याकाळ वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला (धर्मशाळेत वगैरे) रहातो, तसा तो गुणातीत पुरुष (प्रारब्धभोगाच्या अडचणीत सापडल्यामुळे) एवढ्या थोर अनुभावाने देहात उदासीनतेने वस्तीला आलेला असतो.
338-14
तो जिणता ना हरवी तैसा गुण नव्हे ना करवी । जैसी का श्रोणवी । संग्रामींची ॥338॥
ज्याप्रमाणे युद्धाची भूमी (उदास) असते, (म्हणजे जशी रणभूमी ही जिंकणारी नसते अथवा पराभव पावणारी नसते), त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो व गुणांकडून पराभव पावणारा नसतो व त्याचप्रमाणे तो गुण नसतो अथवा तो गुणांकडून करवीत नाही.
339-14
का शरीरा आतील प्राणु । घरी आतिथ्याचा ब्राह्मणु । नाना चोहटाचा स्थाणु । उदासु जैसा ॥339॥
अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण जसा त्या घरसंबंधाने उदास असतो, अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो (त्याप्रमाणे जो देहादि गुणाकार्यावर उदास असतो.
340-14
आणि गुणाचा यावाजावा । ढळे चळे ना पांडवा । मृगजळाचा हेलावा । मेरु जैसा ॥340॥
आणि अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरुपर्वत यत्किंचिंतही हलत नाही, तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्याजाण्याने गडबडत नाही,


341-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
हे बहुत कायि बोलिजे । व्योम वारेनि न वचिजे । का सूर्य ना गिळिजे । अंधकारे ? ॥341॥
याबद्दल फार बोलून काय करावयाचे आहे ? आकाश वार्‍याकडुन कुठे घालवले जाते काय ? अथवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही.
342-14
स्वप्न का गा जियापरी । जगतयाते न सिंतरी । गुणी तैसा अवधारी । न बंधिजे तो ॥342॥
जागृत असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडत नाही, त्याप्रमानेच आत्मज्ञानी पुरुष तीन गुणांनी बांधला जात नाही. हे लक्षात ठेव.
343-14
गुणासि कीर नातुडे । परी दुरूनि जै पाहे कोडे । तै गुणदोष सायिखडे । सभ्यु जैसा ॥343॥
गुणांच्या तडाख्यात तर तो निश्चय करुन आवळला जात नाही, परंतु तो जेव्हा गुणांचा कमीजास्तपणा पहातो, तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ (प्रेक्षक) हालणार्‍या लाकडी बाहुल्यांच्या खेळ दुरून पहातो, तसा गुणांचे कमीजास्तपण दुरून तटस्थ वृत्तीने व कौतुकाने (साक्षीरूपाने) पाहातो.
344-14
सत्कर्मे सात्त्विकी । रज ते रजोविषयकी । तम मोहादिकी । वर्तत असे ॥344॥
सत्वगुण हा सात्विक कर्माकडे, रजोगुण हा राजस भोगांकडे आणि तमोगुण हा मोह, प्रमाद, झोप, आणि आळस याकडे कशा प्रकारे प्रवृत्त होत असतो. परमात्मा सर्वकाही तो साक्षीरुपानेच पहात असतो.
345-14
परिस तयाचिया गा सत्ता । होती गुणक्रिया समस्ता । हे फुडे जाणे सविता । लौकिका जेवी ॥345॥
अर्जुना ऐक. जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात, त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या (गुणातीत पुरुषाच्या) सत्तेने चालतात, हे तू पक्के समज.


346-14
समुद्रचि भरती । सोमकांतचि द्रवती । कुमुदे विकासती । चंद्रु तो उगा ॥346॥
(चंद्रोदयाने) समुद्रांना भरती येते, सोमकांत मण्यांना पाझर फुटतो आणि चंद्रविकासी कमळे उमलतात पण चंद्र तर काही हालचाल करत नाही.
347-14
का वाराचि वाजे विझे । गगने निश्चळ असिजे । तैसा गुणाचिये गजबजे । डोलेना जो ॥347॥
वारा वहातो अथवा वहाण्याचा बंद होतो, परंतु आकाश माञ स्थिर असते. त्याप्रमानेच गुणांच्या हालचालीने जो गोंधळुन जात नाही.
348-14
अर्जुना येणे लक्षणे । तो गुणातीतु जाणणे । परिस आता आचरणे । तयाची जी ॥348॥
अर्जुना, या लक्षणांनी तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता त्याचे आचरण कसे असते. ते सांगत आहे तरी त्याचे तु श्रवण सुखाचा आनंद घ्यावा.

समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः ।
तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥14. 24॥
श्लोकार्थ -: सुखदु:खाचे ठिकाणी समान (दृष्टी ठेवणारा) स्वस्वरूपी स्थित, माती, दगड व सोने ही सारखीच मानणारा, ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा, स्वत:ची निंदा, स्तुती समान मानणारे असतात.

349-14
तरी वस्त्रासि पाठी पोटी । नाही सुतावाचूनि किरीटी । ऐसे सुये दिठी । चराचर मद्रूपे ॥349॥
तर अर्जुना, वस्त्राच्या आतबाहेर जसे सुताशिवाय दुसरे काही नसते, त्याप्रमाणेच चराचरात माझ्यावाचुन दुसरा कोणताही पदार्थ नाही, सर्व विश्व मद्रूप आहे असे तो मानतो.
350-14
म्हणौनि सुखदुःखासरिसे । काटाळे आचरे ऐसे । रिपुभक्ता जैसे । हरीचे देणे ॥350॥
म्हणून ज्याप्रमाणे देवाचे देणे भक्तांना व शत्रूंना समान असते, त्याचप्रमाने सुख व दुःख मिळाले असता. त्याचे मन ताजव्याप्रमाने समतोल एकसारखे राहते,

दिवस २२५ वा. १३, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २६८९ ते २७००
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २६८९
सेवट तो होती तुझियाने गोड । म्हणऊनि चाड धरीतसो ॥१॥
देऊ भोगाभोग कलिवरचा भार । साहो तुज भार त्याचमधी ॥धृपद॥
तुझ्या बळे काही खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥२॥
तुका म्हणे आम्ही चेंपलो या भारे । तुमचे ते खरे देवपण ॥३॥
अर्थ
देवा तू जर साहाय्य केले तर कोणत्याही कार्‍याचा शेवट गोड होतो म्हणून तर मी तुझ्याविषयी आवड धरीत आहे. देवा देहाविषयीचे कोणतेही भोग उपभोग असो ते सर्व आम्ही तुला समर्पण करु आणि आमच्या देहामध्ये तुला थारा देऊ. देवा तुझे फळ आमच्या पाठीमागे आहे त्यामुळे आम्हाला प्रपंचातील कसल्याही प्रकारची खटपट काम वाढविण्याची व कष्ट करण्याची गरज लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही प्रपंचाच्या भाराने शेकलो गेलेलो आहोत परंतू तुम्ही सुखदु:खाच्या पलीकडचे आहात त्यामुळे तुमचे देवपणच खरे आहे. ”
अभंग क्र. २६९०
ऐसाचि तो गोवा । न पाहिजे केला देवा ॥१॥
बहु आली दुरिवरी । ओढत हे भरोवरी ॥धृपद॥
आम्हासी न कळे । तुम्ही झाकु नये डोळे ॥२॥
तुका म्हणे संगे । असो एक एका अंगे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही मला यापुढे प्रपंचाच्या बंधनात ठेवले नाही पाहिजे. कारण आम्ही या प्रपंचाची ओढाओढ खूप योनीपासून पुष्कळ दिवसापासून करत आलेलो आहोत. देवा आमचे हित कशात आहे ते आम्हाला तर कळत नाही परंतू तुम्ही तरी असे डोळे झाकू नका. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही व आम्ही एकमेकासंगेच राहू म्हणजे एकरुपच राहू. ”
अभंग क्र. २६९१
माय लेकरांत भिन्न । नाही उत्तराचा सीण ॥१॥
धाडी धाडी वो भातुके । रंजविल्याचे कौतुके ॥धृपद॥
करूनि नवल । याचे बोलिलो ते बोल ॥२॥
तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥३॥
अर्थ
मायलेकरांमधे जरी बोलण्याबोलण्यात परकेपणा आला तरी त्यांना त्याचा त्रास वाटत नाही. देवा त्याप्रमाणे आपल्या दोघामध्येही मायलेकराचे नाते आहे मी आतापर्यंत तुमच्याशी जे काही गोड बोबडे बोलून तुमचे मनोरंजन केले त्या बदल्यात तुम्ही तुमचे प्रेमरुपी भातूके दयावेत. देवा मी तुमच्याशी जे काही बोललो त्याचे तुम्ही कौतुक करा. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंग कृपावंत माते तू मला तुझ्या भक्तीप्रेमरुपीचा खाऊ दयावे. ”
अभंग क्र. २६९२
आवडी का ठेवू । बैसोनिया संगे जेवू ॥१॥
मागे नको ठेवू उरी । माझी आण तुजवरी ॥धृपद॥
देखिले प्रकार । त्याचे पाहेन साचार ॥२॥
तुका म्हणे बाळी । केली चाहाडी सकळी ॥३॥
अर्थ
देवा तू आणि मी एकत्र बसून जेवु आता एवढी तरी आवड बाकी का ठेवावी ? देवा माझी कोणत्याही प्रकारची इच्छा तू मागे उरु देऊ नकोस ही तुला माझी शपथ आहे. देवा तू भक्तांबरोबर कसा आवडीने जेवतोस त्यांच्याबरोबर राहतोस हे मी फक्त नामदेवरायांच्या प्रकारावरुन चांगले अनुभवले आहे पाहिले आहे आणि तोच प्रकार मी माझ्याबाबतीतही पूर्ण होताना पाहणारच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू काल्याच्या प्रसंगी गोपाळाचे उष्टे सेवन केले आहे याबद्दल तुझी चहाडी गोपाळांनी माझ्याजवळ केली आहे. ”
अभंग क्र. २६९३
नव्हेसी तू लांसी । माया आणिका त्या ऐसी ॥१॥
जे हे वाया जाती बोल । होती निर्फळचि फोल ॥धृपद॥
नव्हेसी दुबळी । काही नाही ते जवळी ॥२॥
तुका म्हणे खोटी । काही नव्हेसी करंटी ॥३॥
अर्थ
हे पाडूरंगे आई तू इतरासारखी क्रुर राक्षसीण आई नाहीस. मी बोललेले कोणतेही शब्द वाया जाणार नाही आणि ते व्यर्थ व निष्फळही ठरणार नाहीत. तू दुबळी नाही आणि तुझ्याजवळ काय नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, “तू खोटी किंवा करंटी ही नाहीस. ”
अभंग क्र. २६९४
आम्हा बोल लावा । तुम्हा अनुचित हे देवा ॥१॥
ऐसे सांगा का व्यालेती । काय नाही तुम्हा हाती ॥धृपद॥
आता धरा दुरी । वाया दवडाया थोरी ॥२॥
तुका म्हणे ठायी । ऐसे विचारावे पायी ॥३॥
अर्थ
हे देवा तू आमच्यावर दोष ठेवून आम्हाला बोलावे हे योग्य नाही. आम्हाला मग तुम्ही जन्मच का बरे दिला आणि तुमच्या हाती काय नाही ते तुम्ही सांगा. देवा तुम्ही जर आम्हाला तुमच्यापासून दूर धराल तर तुमचा मोठेपणा वाया जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, “या गोष्टीचा तुम्ही स्वत:शीस विचार करा. ”
अभंग क्र. २६९५
मरोनिया गेली माया । मग तया कोण पुसे ॥१॥
पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥धृपद॥
निढळासी निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥२॥
तुका म्हणे देवाऐसी । आहो सरसी आपण ॥३॥
अर्थ
ज्याची आई मेली त्याला कोण विचारतेय ? त्या पोरक्या मुलाला कोण विचारील अहो ही तर जगाची रीतच आहे. पण जर चांगला मुलगा व चांगली आई असा जोडा असेल तरच त्या मुलाचे कोड कौतुक होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवही चांगला आहे व त्या देवाप्रमाणे आम्हीही चांगले आहोत मग आम्हाला येथे काय कमी पडणार आहे. ”
अभंग क्र. २६९६
संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥१॥
निष्ठुर तू बहु देवा । पुरे हेवा न म्हणवी ॥धृपद॥
पाहोनिया कर्म डोळा । निराळा तो वर्जीना ॥२॥
तुका म्हणे तुज माझे । म्हणता ओझे फुकट ॥३॥
अर्थ
देवा या संसारामध्ये अशी कोणती गोडी आहे की ज्यामुळे तू आम्हाला याचा लाभ करुन दिला आहे. परंतू हे देवा तू फार निष्ठूर आहेस कारण आमच्या कितीही इच्छा पूर्ण झाल्या तरी आता बास झाले असे देखील तू आमच्याकडून म्हणून घेत नाहीस. देवा आम्ही केलेले सर्व कर्मे तू तुझ्या डोळयाने पाहातो आम्हाला त्यापासून वेगळे तू काही करीत नाहीस परंतू याउलट तू काय करतोस तर या सर्वपासून वेगळा होऊन राहातो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला तुमचा म्हणणे हे तुम्हाला फुकटचे ओझेच वाटत आहे काय ? ”
अभंग क्र. २६९७
नव्हते ते कळो आले । तरी बोले अबोला ॥१॥
तुज मज घातली तुटी । एका भेटीपासूनि ॥धृपद॥
आता याची न धरी चाड । काही कोड कवतुके ॥२॥
तुका म्हणे यावे जावे । एका भावे खंडले ॥३॥
अर्थ
देवा तू निर्गुण आहेस तसाच निष्ठूरही आहेस हे मला माहित नव्हते पण आता कळले आहे त्यामुळे मी तुझ्याशी अबोला धरला आहे. देवा तुझी आणि माझी एकदाच भेट झाली, त्याच्यानंतर तुझ्यात आणि माझ्यात ताटातूटच झाली. त्यामुळेच आता आम्ही तुझे कोणत्याही प्रकारचे कोड कौतुक करुन तुझी इच्छा धरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता तुझ्याकडे येण्याजाण्याचा माझा सर्व व्यवहारच खंडीत झाला कारण आपल्या दोघाचेही ऐक्य झाले म्हणजेच आपल्यातील व्दैत नाहीसे झाले आहे म्हणून. ”
अभंग क्र. २६९८
आता दोघामध्ये काय । उरले होय वाणीजेसे ॥१॥
निष्ठुर हे केले मन । समाधान न करूनि ॥धृपद॥
झुरावे ते तेथींच्या परी । घरिच्याघरी अवघिया ॥२॥
तुका म्हणे देवपण । गुंडाळून असो दे ॥३॥
अर्थ
देवा आता तुमच्यात आणि आमच्यात वर्णन करुन सांगण्यासारखे काय उरले आहे ? देवा तुम्ही माझे समाधान करुन माझे मन निष्ठूर केले आहे. देवा तुझ्यासाठी आम्ही घरच्या घरीच झुरत बसावे एवढेच आता बाकी राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता तुझे देवपण तू गुंडाळून टाक. ” (या अभंगामध्ये महाराज नीजस्वरुपच स्थितीत असताना देवाशी विरोधी भासाने बोलतात. )
अभंग क्र. २६९९
मागितल्यास आस करा । उरी धरा काहींबाही ॥१॥
म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ ते ॥धृपद॥
माझ्या मोहे तुज पान्हा । लोटे स्तना वोरसे ॥२॥
तुका म्हणे आळवणे । माझ्या देणे उत्तरा ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला काहीतरी मागितले तर तुम्ही मागे काहीतरी राहू देताच. त्यामुळेच देवा मी माझी आवड टाकून दिली टाकून देण्याचे मूळ कारण हेच होते. देवा मला माहित आहे माझ्या मोहाने तुझ्या स्तनाला प्रेमरुपी पान्हा लोटतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुला प्रेमाने आळवित आहे त्या निमित्ताने तरी तू माझ्याशी बोलशील. ”
अभंग क्र. २७००
आता बरे घरिच्याघरी । आपली उरी आपणापे ॥१॥
वाईट बरे न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥धृपद॥
बोलो जाता वाढे बोल । वाया फोल खटखट ॥२॥
काकुलती यावे देवा । तो तो सेवा इिच्छतो ॥३॥
हिशोबाचे खटपटे । चढे तुटे घडेना ॥४॥
तुका म्हणे कळो आले । दुसरे भले तो नव्हे ॥५॥
अर्थ
आता स्वत:च्याच घरी असलेले चांगले म्हणजे आपलाच आपल्याशी संबंध येतो. घरी राहिल्याने काय होते तर चांगले वाईट काहीही आपल्या दृष्टीला पडत नाही त्यामुळे कष्टही होत नाही. बोलण्याने बोलणे वाढते आणि त्यामुळे व्यर्थ खटपट वाढते. देवाशी जसेजसे काकूळतीला यावे तसेतसे जास्त सेवेची इच्छा होते, व्यर्थ हिशोबाचा खटपट केल्याने कोणत्याही प्रकारचा नफा किंवा तोटाही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मला आता चांगले कळले आहे की घरी एकटे असणे हे चांगले आहे किंवा जरी आपल्याबरोबर कोणी असले तर एखादा सज्जन असावा. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version