“१२ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १२ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १२ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१२ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ७०१ ते ७२५,
701-13
जैसे सत्री अन्न जाले । की सामान्या बीक आले । वाणसियेचे उभले । कोण न रिगे ? ॥701॥
ज्याप्रमाणे सत्रातील अन्न असते, ते वाटेल त्याला मिळते किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही ? अथवा वेश्येच्या उंबर्याचे आत कोण प्रवेश करणार नाही ?
702-13
तैसे जयाचे अंतःकरण । तयाच्या ठायी संपूर्ण । अज्ञानाची जाण । ऋद्धि आहे ॥702॥
त्याचप्रमाणे ज्याचे अंत:करण असते म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे जे बर्या-वाईट कल्पनांनी व्यापले जाते त्या पुरुषाचे ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट आहे.
703-13
आणि विषयांची गोडी । जो जीतु मेला न संडी । स्वर्गीही खावया जोडी । येथूनिची ॥703॥
आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांवरील प्रेम सोडीत नाही व मेल्यानंतरही स्वर्गातही खावयास, भोगावयास मिळावे म्हणून जो येथूनच सामुग्री सकाम कर्मे करून ठेवतो.
704-13
जो अखंड भोगा जचे । जया व्यसन काम्यक्रियेचे । मुख देखोनि विरक्ताचे । सचैल करी ॥704॥
जो भोगाकरता एकसारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्यकर्म करण्याचे व्यसन असते व जो विरक्त पुरुषाचे मुख पाहून कपडे वगैरेसह स्नान करतो,
705-13
विषो शिणोनि जाये । परि न शिणे सावधु नोहे । कुहीला हाती खाये । कोढी जैसा ॥705॥
विषय त्रासून जातो परंतु हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष त्रासत नाही व सावधही होत नाही. तो कसा तर जसा कोडी(कुष्ठरोग झालेला) पुरूष सडलेल्या हातांनी खातो पण त्याला जशी कुजलेल्या हाताची किळस येत नाही.
706-13
खरी टेको नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडे । तऱ्ही जेवी न काढे । माघौता खरु ॥706॥
ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या अंगास स्पर्श करू देत नाही व गाढव तिच्या जवळ आला असता ती त्यास उलट लाथा मारून त्याचे नाकाड फोडते, तरी पण तो गाढव मागे हटत नाही
707-13.
तैसा जो विषयांलागी । उडी घाली जळतिये आगी । व्यसनाची आंगी । लेणी मिरवी ॥707॥
जो विषयाकरता जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे म्हणून मिरवतो.
708-13
फुटोनि पडे तव । मृग वाढवी हाव । परी न म्हणे ते माव । रोहिणीची ॥708॥
हरीण हा पिण्याची तीव्र इच्छा इतकी वाढवतो की तो मृगजळाच्या मागे लागून उर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडत नाही व असे म्हणत नाही की मृगजल ही जलाची भ्रांती आहे.
709-13
तैसा जन्मोनि मृत्यूवरी । विषयी त्रासिता बहुती परी । तऱ्ही त्रासु नेघे धरी । अधिक प्रेम ॥709॥
त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्यास त्रास दिला तरी तो कंटाळत नाही, तर उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो.
710-13
पहिलिये बाळदशे । आई बा हेचि पिसे । ते सरे मग स्त्रीमांसे । भुलोनि ठाके ॥710॥
पहिल्या प्रथमच्या बाळपणात आई, बाबा असे आईबापाचे वेड असते, ते संपते, मग तारुण्यात स्त्रीच्या देहाने वेडा होतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
711-13
मग स्त्री भोगिता थावो । वृद्धाप्य लागे येवो । तेव्हा तोचि प्रेमभावो । बाळकासि आणी ॥711॥
मग तारुण्याच्या भरात स्त्री भोगीत असताना म्हातारपण येऊ लागते, त्यावेळी तेच स्त्रीवरील प्रेम मुलाबाळांवर आणून ठेवतो.
712-13
आंधळे व्याले जैसे । तैसा बाळे परिवसे । परि जीवे मरे तो न त्रासे । विषयासि जो ॥712॥
एखाद्या आंधळ्या मुलास जन्म दिला की त्याची आई जशी आपल्या तान्ह्या मुलास विसंबत नाही, तसे जो आपल्या मुलाबाळास धरून रहातो आणि महाराज, मरतो परंतु विषयांविषयी त्यास वीट येत नाही,
713-13
जाण तयाच्या ठायी । अज्ञानासि पारु नाही । आता आणीक काही । चिन्हे सांगो ॥713॥
त्याच्या ठिकाणी अज्ञानाला अंत नाही असे समज. आता (अज्ञानाची) आणखी काही लक्षणे सांगतो.
714-13
तरि देह हाचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा । वळघोनिया कर्मा । आरंभु करी ॥714॥
<अज्ञानाची लक्षणे देहात्मवादी, अभिमान ताठा> तर देह हाच आत्मा आहे. देहच मी आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास प्रारंभ करतो.
715-13
आणि उणे का पुरे । जे जे काही आचरे । तयाचेनि आविष्करे । कुंथो लागे ॥715॥
आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते त्यामधे तो पूर्ण झालेल्या कर्मामुळे गर्वाने फुगतो व अपूर्ण झालेल्या कर्मामुळे खंत करतो.
716-13
डोईये ठेविलेनि भोजे । देवलविसे जेवी फुंजे । तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ॥716॥
बाधेने घेरलेल्या एखाद्याने मंत्रतंत्र करणाराच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्रतंत्र करणारा जसा आनंदाने फुगून जातो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो.
717-13
म्हणे मीचि एकु आथी । माझ्यांचि घरी संपत्ती । माझी आचरती रीती । कोणा आहे ॥717॥
तो म्हणतो, जगात काय तो एक मीच (महत्वाचा मनुष्य) आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे व माझी वागण्याची पद्धत दुसर्या कोणाला आहे ?
718-13
नाही माझेनि पाडे वाडु । मी सर्वज्ञ एकचि रूढु । ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके ॥718॥
माझ्यासारखा कोणी मोठा नाही. प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे. अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन रहातो.
719-13
व्याधि लागलिया माणुसा । नयेचि भोग दाउ जैसा । निके न साहे जो तैसा । पुढिलांचे ॥719॥
रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत (दाखवल्यास जशी त्याची तळमळ होते) त्याप्रमाणे जो लोकांचे बरे सहन करत नाही.
720-13
पै गुण तेतुला खाय । स्नेह की जाळितु जाय । जेथ ठेविजे तेथ होय । मसीऐसे ॥720॥
परंतु जसा एखादा दिवा वात ‘तेवढी खातो, तेल जाळून टाकतो व जेथे ठेवावा तेथे काजळासारखे काळे करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
721-13
जीवने शिंपिला तिडपिडी । विजिला प्राण सांडी । लागला तरी काडी । उरो नेदी ॥१३-७२१॥
पाणी शिंपडल्याने तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो. एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो, एक काडी उरू देत नाही.
722-13
आळुमाळ प्रकाशु करी । तेतुलेनीच उबारा धरी । तैसिया दीपाचि परी । सुविद्यु जो ॥१३-७२२॥
थोडासा प्रकाश करतो व तेवढ्याने उष्णता वाढवतो, त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण अवगुण बरेच असतात.
723-13
औषधाचेनि नांवे अमृते । जैसा नवज्वरु आंबुथे । का विषचि होऊनि परते । सर्पा दूध ॥१३-७२३॥
नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो अथवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते.
724-13
तैसा सद्गुणी मत्सरु । व्युत्पत्ती अहंकारु । तपोज्ञाने अपारु । ताठा चढे ॥१३-७२४॥
त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सर असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो,
725-13
अंत्यु राणिवे बैसविला । आरे धारणु गिळिला । तैसा गर्वे फुगला । देखसी जो ॥१३-७२५॥
अत्यंजाला जसे राज्यावर बसवावे म्हणजे तो गर्वाने फुगतो अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता तो जसा फुगतो. त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल.
दिवस १९३ वा. १२, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २३०५ ते २३१६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २३०५
रोजकीर्द जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥
नाही होत झाड्यापाड्याचे लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥धृपद॥
चोरासाठी रदबदल आट्टहास्य । जळो जिणे दास्य बहुताचे ॥२॥
सावधान तुका निर्भर मानसी । सालझाड्यापाशी गुंपोनेणे ॥३॥
अर्थ
मी एक खतावणी केली आहे ज्यामध्ये माझा रोज च्या वेळेत ला किती वेळ हरीच्या सेवेत गेला व किती वेळ वाया गेला हे मी लिहून ठेवले आहे. आणि त्यामुळे पूर्ण हिशोब झाल्यानंतर देवापुढे मांडण्याची मला गरज पडत नाही व मी स्वामींच्या सेवेतच नेहमी तत्पर आहे त्यामुळे माझी सेवा स्वामी गोड मानून घेतात. आपल्या हरी वाचून इतर कोणाचीही सेवा करण्याचा किंवा रद बदल करण्याचा अट्टास करणे म्हणजे लबाडीचे धंदे आहेत आशा दास्याच्या जगण्याला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या हरिची, स्वामी ची सेवा अगदी सावधानतेने व निर्भर पणे म्हणजे आनंदाने करत आहे त्यामुळे मला वर्षाखेरीस हिशोब देण्याची गरज राहिली नाही. मी पापपुण्याचा हिशोब पहिल्यापासून ठेवत आहे त्यामुळे पंचमहाभूताचे ऋण देखील मी नित्यच फेडून टाकत आहे.
3:45
अभंग क्र. २३०६
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविले ॥१॥
आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख तो गौरव संता अंगी ॥धृपद॥
हिशेबे आले ते सकळांसी प्रमाण । तेथे नाही आन चालो येत ॥२॥
तुका म्हणे नाही पापपुण्य खती । झाड्याची हुजती हाता आली ॥३॥
अर्थ
आपल्या शास्त्रात कर्माचे तीन प्रकार सांगितले आहेत सात्विक, राजस, तामस आणि त्यांचे तीन प्रकार पडतात ते म्हणजे इष्ट-अनिष्ट आणि इष्टा, निष्ट ही तीन वेगवेगळे फळे वेगवेगळी करून दाखवलेले आहेत. आलेले भोग मी भोगतो आणि जे संचित कर्मामुळे राहिलेले भोग आहेत ते मी संता वर सोपवून सुखाचा गौरव भोगत राहतो. जे हिशोबाने चालत आले आहे ते सर्वाना मान्य आहे तेथे कोणाचे काही चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता संतांच्या कृपेने माझ्या सर्व संचित कर्माचा हिशोब पूर्ण झाला असून त्याची पावतीही माझ्या हाती आली आहे त्यामुळे मला पाप पुण्याची आता खंत राहिली नाही.
3:46
अभंग क्र. २३७
बळियाचे अंकित । आम्ही झालो बळिवंत ॥१॥
लाताळीता संसारा । केला षड ऊर्मीचा मारा ॥धृपद॥
जन धन तन । केले तृणाही समान ॥२॥
तुका म्हणे आता । आम्ही मुक्तीचिया माथा ॥३॥
अर्थ
सर्व जगात जो स्वामी बळीवंत आहे त्याचे आम्ही अंकित झालो त्यामुळे आम्हीही बळीवंत झालो आहोत. त्यामुळे आम्ही या संसाराला लाथ मारून सहा उर्मींचा नाश केला आहे. जन धन व तन या सर्वाना आम्ही तृण म्हणजे कसपटा समान मानले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता तर आम्ही मुक्तीच्याही माथ्यावर बसलो आहोत.
3:47
अभंग क्र. २३८
मृत्युलोकी आम्हा आवडती परी । नाही एका हरीनामे विण ॥१॥
विटले हे चित्त प्रपंचापासूनि । वमन ते मनी बैसलेसे ॥धृपद॥
सोने रूपे आम्हा मृत्तिके समान । माणिके पाषाण खडे जैसे ॥२॥
तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हापुढे ॥३॥
अर्थ
हे मृत्यु लोक आम्हाला आवडते पण या मृत्यु लोकात हरी नामावाचुंन दुसरे काहीही आम्हाला आवडत नाही. आता आमचे चित्त प्रपंचा पासून विटले (ओकलेल्या अन्ना प्रमाणे) आहे मणि फक्त हरिनाम आहे. सोने रुपे आम्हाला माती प्रमाने तर माणिक हीरे आम्हाला हे दगडा प्रमाणे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात ज्या सुंदर नारी आहेत त्या आम्हाला अस्वाला प्रमाणे दिसतात.
3:47
अभंग क्र. २३९
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥
नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरे ना ॥धृपद॥
दृष्टिमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे । लावण्य ते खरे दुःखमूळ ॥२॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधू संघष्टणे ॥३॥
अर्थ
महाराज म्हणतात देवा मला स्त्रियांचा संग नको आहे मग त्या लाकडी किंवा पाषाण मातीच्या असतील तरी नको. कारण त्यांच्या मुळे देवाचे भजन व देव हि आठवत नाही कारण मन हे त्यांच्या ठिकाणी लांचावलेले असते त्यामुळे ते आवरत नाही. आहो दृष्टीने त्यांच्या कडे पहिले तरी मरण ओढवते व त्यांचे लावण्या हे खरे दुखाचे मुळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात अग्नी हा उपकरी असला तरी पण त्याच्याशी संबंध आला कि तो आपल्यालाही बाधतो म्हणजे नष्ट करतो.
3:49
अभंग क्र. २३१०
क्षीर मागे तया रायते वाढी । पाधानी गधडी ऐशा नावे ॥१॥
समयो जाणा समयो जाणा । भलते नाणा भलतेथे ॥धृपद॥
अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन ते ॥२॥
तुका म्हणे नेणे समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥३॥
अर्थ
जेवन चालू असताना एखाद्याने खीर मागितली की त्याला जी स्री तिखट रायते वाढते तीला गधडी असे म्हणावे. त्यामुळेच समय वेळ काळ व्यवस्थित जाणून घ्यावे भलत्या ठिकाणी भलतेच काहीतरी आणू नये. जो अमंगळ वाणी उचित कार्य चालू असताना बोलतो त्याचे ते बोलणे त्या चांगल्या कार्यात योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला अनुचित बोलतांना वेळ, काळ, ठिकाण समजत नाही, बोलण्याचे ज्याला ज्ञान नाही त्याचे प्रत्येक वागणे बोलणे हे गुखडी प्रमाणे घाणी प्रमाणेच वाईट असते.
3:49
अभंग क्र. २३११
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगी ॥१॥
केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥धृपद॥
मधुरा उत्तरी । रांवा खेळे उरावरी ॥२॥
तुका म्हणे रेडा । सुखे जाती ऐशा पीडा ॥३॥
अर्थ
विंचवाला पाहिले की माणसे लगेच त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागतात कारण त्याच्या अंगी विष असते हे सर्वाना माहीत आहे याचा अर्थ असा की कोणाच्याही अंगात म्हणजे अंतरंगात जर दुर्गुण असतील तर तेच त्याला परिणामी दुःख देतात. याविषयी विचार केला पाहिजे म्हणजे आपल्या मनातील गुण आपले मित्र तर दोष हे शत्रू आहेत. पोपटाचे बोलणे कसे मधुर असते त्यामुळे लोक त्याला आपल्या अंगाखांद्यावर घेऊन खेळत असतात. तुकाराम महाराज म्हणतात रेडा एक असा प्राणी आहे की ज्याच्या अंगी कोणताही गुण किंवा दोष नाही म्हणजे पोपटासारखे सुखही तो लोकांना देत नाही आणि विचंवा सारखे दुःख ही तो लोकांना देत नाही.
3:50
अभंग क्र. २३१२
तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म । जाणावे ते वर्म बहु पुण्य ॥१॥
बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाही घडी जात वाया ॥धृपद॥
करूनी चिंतन करवावे आणिका । तो या जाला लोका नांव जगी ॥२॥
तुका म्हणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायावरी डोई माझी ॥३॥
अर्थ
वेगवेगळ्या तीर्थाला जाण्याची अपेक्षा करण्यापेक्षा एकाच जागी स्वस्थ बसून आपले पुण्य कसे वाढेल याचे वर्म जाणून घ्यावे. ते वर्म असे भाविक भक्त वैष्णवांच्या संगतीत आपला सर्वकाळ घालावा त्यामुळे होईल काय तर एकवेळ देखील हरिचिंतना वाचून वाया जाणार नाही. जो स्वतः ही हरी चिंतन करतो आणि दुसऱ्या कडूनही हरिचिंतन घडून घेतो असा मनुष्य जगामध्ये लोकासाठी भवसागर तारक नावच झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात असे परोपकार करणारे जे वैष्णव आहेत त्यांच्या पायावर माझे सदा अखंड मस्तक असो.
3:50
अभंग क्र. २३१३
भयाची तो आम्हा चिंत्ती । राहो खंती सकेचीन ॥१॥
समर्पीलो जीवे भावे । काशा भ्यावे कारणे ॥धृपद॥
करीन ते कवतुके । अवघे निके शोभेल ॥२॥
तुका म्हणे माप भरू । दिस सारू कवतुके ॥३॥
अर्थ
आमच्या चित्तामध्ये भय याविषयाची काळजी राहूच शकत नाही. आम्ही जीव भावाने हरीला समर्पित झालो आहोत त्यामुळे आता कशाला आणि कोणाला भ्यावे ? मी जे काही आता यापुढे वर्तन करेल ते सर्व मला चांगले व शोभून दिसेल. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही आमच्या चित्ता मध्ये हरिरूप माप भरू व सर्व दिवस कौतुकाने हरिनामात घालु.
3:50
अभंग क्र. २३१४
पाचारिता धावे । ऐसी ठायीची हे सवे ॥१॥
बोले करुणा वचनी । करी कृपा लावी स्तनी ॥धृपद॥
जाणे कळवळा । भावसिद्धींचा सोहळा ॥२॥
तुका म्हणे नाम । मागे मागे धावे प्रेम ॥३॥
अर्थ
हरिभक्त वैष्णवांनी देवाला हाक मारली बोलवले की तो लगेच धावतच येतो ही त्याची मुळची सवय आहे. जो भक्त करुणेने हरीशी बोलतो त्या भक्तावर हरी कृपा करतो व त्याला आपल्या स्तनाला लावून प्रेम रुपी पान्हा पाजतो. हरी भक्तांच्या भावना जाणून घेतो व त्यांचा कळवळा जाणून त्यांना रिद्धी सिद्धी चा सोहळा दाखवितो. तुकाराम महाराज म्हणतात जे भक्त हरीचे नाम घेतात त्यांच्या मागेमागे हरीचे प्रेम धावत असते.
3:51
अभंग क्र. २३१५
का जी माझे जीवी । आळस ठेविला गोसावी ॥१॥
येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥धृपद॥
देहआत्म वादी । केला घात कुबुद्धी ॥२॥
तुका म्हणे मन । कळवटी वाटे सीण ॥३॥
अर्थ
अहो माझे स्वामी तुम्ही माझ्या जीवा मध्ये येवढा आळस का बरे ठेवला आहे ? या आळसामुळे सगळ्यात मोठा घात होतो आहे यापेक्षा मी दुसरा कोणता घात मानू की, मला तुमच्या चिंतनासाठी वेळ मिळत नाही तुमच्या चिंतनात मला अंतर पडते आहे. मी देहालाच आत्मा समजत बसलो आणि माझ्या कु-बुद्धीनेच माझा घात केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा हा आळस आणि कु-बुद्धी माझ्या जीवातून केव्हा जाईल याविषयी माझ्या मनाला काळजी वाटत आहे व मला दुःख वाटत आहे.
3:51
अभंग क्र. २३१६
दर्शनाचे आर्त जीवा । बहु देवा राहिले ॥१॥
आता जाणसी ते करी । विश्वंभरी काय उणे ॥धृपद॥
येथे जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥
तुका म्हणे जाणवले । आम्हा भले एवढेच ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या दर्शनाचीच उत्कट इच्छा तेवढी माझ्या मनात राहिली आहे. हे विश्वंभरा आता माझ्या अंतरंगातील इच्छा जाणून घ्या व ती पूर्ण करा, ती पूर्ण होऊ शकणार नाही अशी कोणती उणीव तुमच्यात आहे ? जर आमच्या अंतरंगात काही चिंता राहिली असेल तर ती चिंता दूर करणारा इथे तुझ्या वाचून दुसरा कोण दाता आहे ? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुच आमची चिंता दूर करू शकणारा आहेस व आमची इच्छा पूर्ण करणारा आहेस हे आम्हाला चांगले जाणवले आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

