“११ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ११ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ११ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २६६५ ते २६७६ चे पारायण आपण करणार आहोत.
११ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २७६ ते ३०० ,
276-14
पै वस्तु वस्तुत्वे असिके । ते आपणपे गुणासारिखे । देखोनि कार्यविशेखे । अनुकरे गा ॥276॥
वस्तू ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने आहेच, तरी ती वस्तू (विस्मृतीने) आपण आपल्याला गुणांसारखे पाहून त्या त्या गुणाच्या विशेष कार्याप्रमाणे वागते.
277-14
जैसे का स्वप्नीचेनि राजे । जै परचक्र देखिजे । तै हारी जैत होईजे । आपणपाचि ॥277॥
आपल्यावर परचक्र आले आहे असे ज्यावेळेस राजा स्वप्न पहातो, त्यावेळेस ते परचक्र निवारण करण्याच्या कामी दडलेला जय अथवा पराजय आपणच होतो. (त्या स्वप्नातील जयामुळे अथवा पराजयामुळे) राजाचा मूळचा राजेपणा वाढला नाही अथवा कमी झाला नाही, तर तो आहे तसाच आहे),
278-14
तैसे मध्योर्ध्व अध । हे जे गुणवृत्तिभेद । ते दृष्टीवाचूनि शुद्ध । वस्तुचि असे ॥278॥
त्याप्रमाणे (वरील राजाच्या दृष्टांताप्रमाणे) उत्तम गती, मध्यम गती व अधोगती हे गतीचे भेद गुणवृत्तींच्या भेदामुळे आहेत. ती गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्म वस्तू शुद्ध आहे तशीच आहे.
नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टाऽनुपश्यति ।
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥14. 19॥
श्लोकार्थ -: -::- जेव्हा गुणातीत पुरुष (गुणांचा) द्रष्टा होऊन गुणांवाचून इतर कर्ता नाही (म्हणजे गुणच कर्मे करतात) असे जाणतो व गुणांहून वेगळा जो (साक्षी) आत्मा त्याला जाणतो तेव्हा तो पुरुष गुणातीत जे माझ्या स्वरूपाप्रत पावतो.
(गुणातीत मनुष्य स्वत:ला अकर्ता समजतो तेव्हा मत्स्वरूप पावतो)
279-14
परी हे वाहणी असो । तरी तुज आन न दिसो । परिसे ते सांगतसो । मागील गोठी ॥279॥
परंतु हा बोलण्याचा ओघ राहू दे. तर हे आमचे सांगणे विषयातर झाले असे तुला वाटू देऊ नकोस. आता मागील विषय पुढे सांगतो. ऐक.
280-14
तरी ऐसे जाणिजे । सामर्थ्ये तिन्ही सहजे । होती देहव्याजे । गुणचि हे ॥280॥
तर हे तिन्ही गुणच आपापल्या सामर्थ्याने याप्रमाणे स्वभावत:च देहाच्या निमित्ताने होतात. देहच बनतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-14
इंधनाचेनि आकारे । अग्नि जैसा अवतरे । का आंगवे तरुवरे । भूमिरसु ॥२८१॥
ज्याप्रमाणे लाकूड ज्या आकाराचे असेल, त्याच आकाराचा अग्नि होतो किंवा सर्व प्रकारच्या वृक्षात भूमीचा एकच रस त्या त्या प्रमाणे होतो.
282-14
नाना दहियाचेनि मिसे । परिणमे दूधचि जैसे । का मूर्त होय ऊसे । गोडी जेवी ॥२८२॥
अथवा जसे दूधच दह्याच्या रूपाने परिणाम पावते किंवा गोडीच उसाच्या रूपाने साकार स्वरूपात येते.
283-14
तैसे हे स्वांतःकरण । देहचि होती त्रिगुण । म्हणौनि बंधासि कारण । घडे कीर ॥२८३॥
त्याप्रमाणे हे तीन गुणच अंतःकरणासह देहरूप होतात; म्हणून ते बंधन करण्याला कारणीभूतही होतात.
284-14
परी चोज हे धनुर्धरा । जे एवढा हा गुंफिरा । मोक्षाचा संसारा । उणा नोहे ॥२८४॥
तरीपण, अर्जुना ! हे आश्चर्य आहे की जीव इतका गुणबध्द होऊनही त्याच्या मोक्षस्थितीत यत्किंचित कमीपणा येत नाही.
285-14
त्रिगुण आपुलालेनि धर्मे । देहीचे माघुत साउमे । चाळिताही न खोमे । गुणातीतता ॥२८५॥
तीन गुण हे आपआपल्या स्वभावधर्माप्रमाणे देहाचे ठिकाणी मागे झालेल्या व पुढे होणार्या कर्मरूपाने राहाटत असता जीवाची मूळची गुणातीत स्थिती यत्किंचितहि उणी होत नाही.
286-14
ऐसी मुक्ति असे सहज । ते आता परिसऊ तुज । जे तू ज्ञानांबुज- । द्विरेफु की ॥२८६॥
अशी जीवाची गुणातित मक्तावस्था जी स्वाभाविकच आहे ती, तू आत्मज्ञानरूपी कमळावरील भ्रमर असल्यामुळे तुला सांगतो, ऐक.
287-14
आणि गुणी गुणाजोगे । चैतन्य नोहे मागे । बोलिलो ते खागे । तेवीचि हे ॥२८७॥
आणि चैतन्य हे गुणांमध्ये असले तरी गुणाजोगे होत नाही व तसेच ती अंतिम स्वरूपस्थिति आहे, हे मागे सांगितलेच आहे.
288-14
तरी पार्था जै ऐसे । बोधलेनि जीवे दिसे । स्वप्न का जैसे । चेइलेनी ॥२८८॥
तरी अर्जुना ! ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्नाला भास समजतो, त्याप्रमाणे जीव जगाला सत्य न समजता मिथ्याभासरूप समजेल
289-14.
नातरी आपण जळी । बिंबलो तीरोनी न्याहळी । चळण होता कल्लोळी । अनेकधा ॥२८९॥
किंवा आपण पाण्यात बिंबलो आहो व पाण्यातील लाटांच्या अनेक प्रकारच्या चळणवळणाने अनेक प्रकारचे होत आहो; पण माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही, असे जसे तीरावर उभे राहून मनुष्य पाहतो.
290-14
का नटलेनि लाघवे । नटु जैसा न झकवे । तैसे गुणजात देखावे । न होनिया ॥२९०॥
ज्याप्रमाणे नट, घेतलेल्या नानाप्रकारच्या सोंगाने मी खरोखर तसा झालो, असे समजत नाही; त्याप्रमाणे मी संपूर्ण सत्वादिगुणाचा साक्षी, त्याच्याहून निराळा आहे, असे पहावे.
291-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पै ऋतुत्रय आकाशे । धरूनियाही जैसे । नेदिजेचि येवो वोसे । वेगळेपणा ॥291॥
ज्याप्रमाने आकाशावर आपआपल्या क्रियाक्रमानुसार तिन्ही ऋतु निर्माण होतात. आणि नाहीसे ही होतात. पंरतु हे सर्व एकमेकापासुन भिन्न भिन्र आहेत. हे नुसते पाहावे.
292-14
तैसे गुणी गुणापरौते । जे आपणपेअसे आयिते । तिये अहं बैसे अहंते । मुळकेचिये ॥292॥
त्याप्रमाने गुण-व्यवहार सुरु असताना त्याहुन पलीकडे असे जे आपले सहज स्वरुप आणि जो अह’ या प्रथम असणारे स्फुरणांचे मुळस्थान, त्या आत्मस्वरुपाशी त्याची बुद्धि स्थिर होत असते.
293-14
तै तेथूनि मग पाहता । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजाता । नियोजित ॥293॥
मग तेव्हा तो त्या मुळस्वरुपाशी पाह लागला असता तो म्हणतो की, मी कर्माचा कर्ता नसुन, केवळ साक्षीभुत आहे. आणि सर्व कर्म ञिगुणांपासुन तयार होतात.
294-14
सत्त्वरजतमांचा । भेदी पसरु कर्माचा । होत असे तो गुणांचा । विकारु हा ॥294॥
प्रकृतीस्वरुप असलेल्या सत्विक-राजस-तामस या विषेश अवस्थाप्रमाने कर्माचा विस्तार होते असतो, म्हणुन हा जो कर्माचा विस्तार आहे. तो ञिगुणांचा परिनाम आहे.
295-14
ययामाजी मी ऐसा । वनी का वसंतु जैसा । वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत ॥295॥
वनामधे जसा वसंतऋतु वनाची शोभा वाढवण्यास कारणीभूत असतो, पंरतु तो या सर्वापासुन अलिप्त असतो. तसा मी या सर्व क्रिया करुनही अलिप्त आहे.
296-14
का तारांगणी लोपावे । सूर्यकांती उद्दीपावे । कमळी विकासावे । जावे तमे ॥296॥
अथवा तारागंनाच्या समुदायांनी लोपुन जावे. सूर्यकांतमण्याने अग्नी उत्पन्न करावा, सूर्यविकासी कमलांनी विकासावे व अंधाराने नाहीसे व्हावे.
297-14
ये कोणाची काजे कही । सवितिया जैसी नाही । तैसा अकर्ता मी देही । सत्तारूप ॥297॥
यापैकी कोणाच्याही कार्यामधे सूर्य जसा केव्हाही कोणालही कारण होत नाही, त्याप्रमाणे या देहात मी क्रियारहित असुन देखिल, केवळ साक्षित्वाने, अधिष्ठानरूप होऊन राहिलो आहे.
298-14
मी दाऊनि गुण देखे । गुणता हे मिया पोखे । ययाचेनि निःशेषे । उरे ते मी ॥298॥
मी स्वरुपातःप्रकाशित होऊन तिन गुणांचे प्रकाशन करत असतो. गुणांच्या ठिकाणी गुणास पहातो, या तिन गुणांच्या ठिकाणी (असणारा) गुणत्व माझ्या सत्तेने वाढले जाते. व या गुणांचा आभास झाल्यावर जे उरते ते मीच आहे.
299-14
ऐसेनि विवेके जया । उदो होय धनंजया । ये गुणातीतत्व तया । अर्थपंथे ॥299॥
हे धनंजया अशा या विवेकाचा किंवा विचाराचा ज्याच्या ह्रदयात उदय होतो त्यास गुणातीतपणा (उच्च) स्थानाच्या मार्गाने प्राप्त होतो.
300-14
गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् ।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥14. 20॥
श्लोकार्थ -: -: देहाला कारण असणार्या या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म, मृत्यू, जरा व इतर दु:खे यांनी मुक्त होऊन, मनुष्य मोक्ष, अमृतत्व पावतो_
(अमृतत्व कोणाला मिळते ?)
आता निर्गुण असे आणिक । ते तो जाणे अचुक । जे ज्ञाने केले टीक । तयाचिवरी ॥300॥
आता निर्गुण ब्रम्ह म्हणून जे तिनही गुणापेक्षाही वेगळे आहे ते तो बिनचूक जाणतो. कारण की ज्ञानाने त्याला द्रष्टा असणारा पुरुष संशयरहित आणि भ्रमरहित होऊन जाणतो. कारण की ज्ञानाने आपले रहाण्याचे ठिकान त्याच्याच ठिकानी स्थायिक केलेले असते.
दिवस २२३ वा. ११, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २६६५ ते २६७६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २६६५
पावतो ताडन । जरी हे मोकलिते जन ॥१॥
मग मी आठवितो दुःखे । देवा सावकाश मुखे ॥धृपद॥
होती अप्रतिष्ठा । होतो वरपडा कष्टा ॥२॥
तुका म्हणे मान । होता उत्तम खंडन ॥३॥
अर्थ
जर माझा लोकांनी त्याग केला तर मला चांगली शिक्षा मिळाली असे मी म्हणेन. जर मला असे दु:ख झाले तर मी मग देवाला सावकाशपणे आठवेन व मुखाने त्याचे नाम घेईन. जर लोकांमध्ये माझी अप्रतिष्ठा झाली आणि त्यामुळे मला कष्ट होऊन दु:ख झाले तर मला ते चांगलेच होईल. तुकाराम महाराज म्हणतात, “माझा लोकांमध्ये अपमान झाला, माझा मानसन्मान होणे खंडीत झाले तर हे फारच उत्तम होईल. ”
अभंग क्र. २६६६
धरावे ते भय । जाती अंतरोनि पाय ॥१॥
झाल्या तुटी देववास । काय वाचोनि करावे ॥धृपद॥
कोणासी पारिखे । लेखू आपणासारिखे ॥२॥
तुका म्हणे असो । अथवा हे आता नसो ॥३॥
अर्थ
देवाचे पाय ज्या कारणामुळे अंतरतील त्या कारणाचे भय धरावे. देवापासून आपला वियोग जर झाला तर जगून तरी काय करावे ? देवाला सोडून मी कोणा परक्याला आपलासा म्हणू ? तुकाराम महाराज म्हणतात, “काही असो वा नसो मला फक्त देवच पाहिजे. ”
अभंग क्र. २६६७
आनंदाचा थारा । सुखे मोहरला झरा ॥१॥
ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या कोण पाहे बळा ॥धृपद॥
अंकिता ऐसिया । होईल पावविले ठाया ॥२॥
तुका म्हणे ऐसे । दिले आभंड प्रकाशे ॥३॥
अर्थ
माझ्या अंत:करणामध्ये जो स्वस्वरुपाचा आनंदाचा थारा आहे तो शब्दरुपाने योग्य नाही तर विषयाच्या उपाधीमध्ये बाहेर प्रवाहीत होत आहे. असे प्रभूची शक्ती आहे आणि त्याची शक्ती कोण पाहू शकेन ? जर आपण अशा प्रभूचे अंकीत झाले तर तो आपल्याला अविनाशी आनंदाच्या ठिकाणी पोहाचवील. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे प्रभूने आम्हाला त्याच्या अमर्यादित प्रकाशाने प्रकाशीत केले आहे. ”
अभंग क्र. २६६८
आम्हासी संगाती । होती अराले ते होती ॥१॥
येती आइकता हाक । दोन्ही मिळोन म्हणती एक ॥धृपद॥
आणिक उत्तरी । नसे गोवीली वैखरी ॥२॥
तुका म्हणे बोला । खूण पहाती विठ्ठला ॥३॥
अर्थ
जे आमच्याकडे येण्यासाठी नेहमी उत्सुक असतात तेच खरे आमचे मित्र आहेत. आम्ही हाक मारली की ते लगेच आमच्याकडे येतात आणि आम्ही एकत्र आलो की ते म्हणतात की, आम्ही दोघेही एकच आहोत. आणि त्यांची वाणी हरीनामावाचून इतर कशातही गुंतलेली नसते. तुकाराम महाराज म्हणतात, “प्रत्येक बोलामध्ये ते विठ्ठलाचीच खूण पाहात असतात. ”
अभंग क्र. २६६९
काहे लकडा घास कटावे । खोद हि जुमीन मठ बनावे ॥१॥
देवलवासी तरवरछाया । घरघर माई खपरि सब माया ॥धृपद॥
का छांडिये भार फेरे सीर भागे । मायाको दुःख मिटलिये अंगे ॥२॥
कहे तुका तुम सुनो हो सिद्ध । रामबिन और झुटा कछु धंदा ॥३॥
अर्थ
अहो तुम्ही जंगलातील लाकडे झाडे गवते का तोडता आणि तेथे जमीन खोदून मठ का बांधता हे सर्व व्यर्थच आहे. अरे संन्यास घेऊन जंगलात जायचे आणि तेथे मठ बांधायचे असे व्यर्थ खटाटोप तुम्ही का करता त्यापेक्षा देवळात जावे वृक्षाच्या सावलीखाली बसावे आपल्या भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जर घरोघरी गेले तर प्रत्येक घरी आईसारखी स्त्री असते ती तुम्हाला जेवण वाढेल ते खापराच्या थाळीत घेऊन जेवण करावे व्यर्थ मायेत का तुम्ही गुंतून पडता ? अहो तुम्ही प्रपंचाचा त्याग केला, तो भार कुठे कमी नाही होत तर तुम्ही मठ टाकून दुसरा भार का आपल्या माथ्यावर वाहता त्यापेक्षा हे सर्व माया तुम्ही टाकून दया या मायेला तुम्ही टाकून दिले की तुमचे दु:खही आपोआप नाहीसे होईल. तुकाराम महाराज म्हणतात, “हे सिध्द साधू संत हो संन्यासी हो तुम्हाला मी सांगतो ते तुम्ही कृपा करुन ऐका रामावाचून सर्व व्यवहार धंदा खोटा आहे. ”
अभंग क्र. २६७०
आणीक पाखांडे असती उदंडे । तळमिळती पिंडे आपुलिया ॥१॥
त्याचिया बोलाचा नाही विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामी ॥धृपद॥
दृढ एक चित्ते झालो या जीवासी । लाज सर्वविशी तुम्हासी ते ॥२॥
पीडो नेदी पशु आपुले अंकित । आहे जे उचित तैसे करा ॥३॥
तुका म्हणे किती भाकावी करुणा । कोप नारायणा येईल तुम्हा ॥४॥
अर्थ
देवा अनेक असे पाखंडी लोक येथे आहेत की जे आपला देह पोसण्यासाठी तळमळत असतात. आणि त्यासंबंधीच लोकांना ते उपदेश करतात परंतू माझा त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही मी केवळ तुझ्या नामाशीच कास बांधली आहे. देवा मी माझा जीव तुम्हाला केव्हाच समर्पण केला आहे याविषयी मी दृढही आहे व माझे चित्त तुमच्याच ठिकाणी दृढ झाले आहे त्यामुळे सर्व लाज तुम्हालाच असावी. देवा एखादया मनुष्याने पशू पाळला तर त्याला त्रास देखील तो होऊ देत नाही मग मी तुमचा अंकीत दास आहे माझे संबंधी जे उचित आहे तेच तुम्ही करा. तुकाराम महाराज म्हणतात, “हे नारायणा आता मी तुम्हाला किती करुणा भाकावी अजून तुमच्याशी काही बोलावे तर तुम्हाला माझा राग येईल त्यामुळे मी काहीही बोलत नाही माझे ज्यात हित आहे तेच तुम्ही करा. ”
अभंग क्र. २६७१
व्हावया भिकारी हेचि आम्हा कारण । अंतरोनि जन व्हावे दुरी ॥१॥
संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥
तुका म्हणे दुःखे उबगला जीव । म्हणऊनी कीव भाकी देवा ॥३॥
अर्थ
आम्ही भिकारी होण्याचे कारण एकच आहे व असे केल्यानेच लोक आमच्यापासून दूर जातील. माझा या प्रपंचाशी पूर्णपणे संबंध तुटावा एवढेच काय कोणाच्या शब्दाचा देखील स्पर्श मला होऊ नये त्यामुळेच तर मी संसाराची पूर्ण इच्छाच टाकून दिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा या प्रपंचाच्या दु:खाने तर माझा जीव खूप उबगला आहे त्यामुळेच तर मी तुला कीव भाकीत आहे. ”
अभंग क्र. २६७२
कोरडिया ऐशा काय सारू गोष्टी । करु उठाउठी हित आधी ॥१॥
खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठे ॥धृपद॥
लौकिकाचा आड येईल पसारा । मग येरझारा दुःख देती ॥२॥
तुका म्हणे डांक लागे अळंकारे । मग नव्हे खरे पुटेविण ॥३॥
अर्थ
अनुभवावाचून ब्रम्हज्ञानाच्या कोरडया गोष्टी बोलून काय करावे त्यापेक्षा तातडीने आपले हित करुन घेवू. अहो या कोरडया गप्पागोष्टीमुळे तर आपल्या हिताचा मार्ग कोलमडू लागला आहे आणि जर आपले हित आपण साध्य केले नाही तर एवढी मोठी नुकसान आपण कोणत्या योनीत भरुन काढणार आहोत याचा विचार करुन पाहावा. अहो आपल्या हिताच्या आड नंतर लौकिकाचा पसारा येईल त्यामुळे पुढे आपल्याला जन्ममरणाचे दु:खही होईल. तुकाराम महाराज म्हणतात, “सोन्याचे अलंकार करत असताना त्याला डाग लागला तर त्याला रसायनाची पूड दिल्याशिवाय ते खरे व स्वच्छ होत नाही. ”
अभंग क्र. २६७३
ऐसे ठावे नाही मूढा । सोस काकुलती पुढा ॥१॥
माझी नका जाळू भांडी । पोटी भय सोस तोंडी ॥धृपद॥
पातलिया काळ । तेव्हा काय चाले बळ ॥२॥
संचित ते करी । नरका जाया मेल्यावरी ॥३॥
परउपकार । न घडावा हा विचार ॥४॥
तुका म्हणे लांसी । आता भेटो नये ऐसी ॥५॥
अर्थ
एखादया मनुष्याच्या घरी कोणी काही मागावयास गेले तर तो त्याला काकूळतीला येऊन म्हणतो “ही माझी वस्तू आहे तुम्ही नेऊ नका”. एखादया मनुष्याच्या घरी जर काही कार्यक्रम असला व तो स्वयंपाक करण्यासाठी एखादया व्यक्तीकडे भांडी मागण्यासाठी गेला तर तो मनुष्य त्या व्यक्तीला म्हणतो की माझे भांडे तुम्ही नेऊ नका व ते जाळू नका कारण त्या माणसाला मिथ्या गोष्टीविषयी हाव असते आणि ती वस्तू नष्ट होईल की काय याचे भय वाटते त्यामुळे तो मनुष्य काहीही बोलत असतो. परंतू अशा व्यक्तीच्या जर पुढे काळच येऊन उभा राहिला तर त्यावेळी काळापुढे त्याचे काय बळ चालणार आहे ? तो मनुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हरीचे नाम घेत नाही केवळ धनाचा हव्यास करत राहतो आणि मेल्यावर मात्र नरकाला जातो. आपल्या हातून कधीही परोपकार घडू नये हाच विचार त्याच्या मनात नेहमी असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अशी राक्षस वृत्ती असणारी माणसे कधीही भेटू नयेत. ”
अभंग क्र. २६७४
काळाच सारिखी वाहाती नक्षत्रे । करिता दुसरे फळ नाही ॥१॥
ऐसे करत्याने ठेविले करून । भरिले भरून माप नेमे ॥धृपद॥
शीतउष्णकाळी मेघ वरुषाव । वरुषता वाव होय शीण ॥२॥
तुका म्हणे विष अमृताचे किडे । पालट न घडे जीणे तया ॥३॥
अर्थ
काळाप्रमाणेच नक्षत्र योग्य प्रमाणे येतात या कालामध्ये मेषादी बारा संक्रांती आणि सत्तावीस नक्षत्रे क्रमाने येतात यामध्ये जर बदल केला तर त्यापासून योग्य फळ मिळत नाही. असा नियम जगत्कर्त्याने केलेला आहे एक माप भरुन झाले की नियमाने दुसरे माप भरले जाते. विचार करा की जर हिवाळयात आणि उन्हाळयात पाऊस झाला तर त्यापासून काय फायदा होईल फायदा तर होणार नाही परंतू सर्वाना त्रास मात्र होईल. तुकाराम महाराज म्हणतात, “अमृतातील किडे विषामध्ये टाकले किंवा विषातील किडे अमृतात टाकले तर त्यांच्यामध्ये बदल तर होत नाहीत परंतू ते जगूही शकत नाहीत त्याप्रमाणे याच नियमाला अनुसरुन असे लक्षात येते की जगत्कर्त्याने प्रत्येकाला नियम घालून दिलेले आहेत. ”
अभंग क्र. २६७५
बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी । पडिले प्रसंगी काळाऐसे ॥१॥
जयामध्ये देव आदि मध्ये अंती । खोल पाया भिंती न खचेची ॥धृपद॥
करणे ते आम्ही करू एका वेळे । पुढिलिया बळे वाढी खुंटे ॥२॥
तुका म्हणे असो आज्ञेची धारके । म्हणऊनि एके बोले सारू ॥३॥
अर्थ
कालाच्यानुसार जसा प्रसंग पडेल त्यावेळीच उपयोगी पडणारे बोल आम्ही बोलू. ज्या बोलामध्ये देवाची व्याप्ती सुरवातीला मध्ये आणि शेवटी असते तेच बोल उपयोगी ठरते जसे पाया खोल घेतला म्हणजे भिंत कधीही खचत नाही. आम्ही काहीही करताना असे करु की आमचे पुढे वाढणारे संचित कर्म एकदम खुंटीत होऊन जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही हरीचे आज्ञाधारक सेवक आहोत त्यामुळे एका बोलातच आम्ही परमार्थाचे सर्व कामे सारु. ”
अभंग क्र. २६७६
तुझिया विनोदे आम्हासी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥१॥
आता आपणचि येसी ते करीन । नाम हे धरीन तुझे कंठी ॥धृपद॥
वियोगेचि आलो उसंतीत वने । संकल्प हे मने वाहोनिया ॥२॥
तुका म्हणे वर्म सापडले सोपे । गोवियेलो पापे पुण्ये होतो ॥३॥
अर्थ
देवा अरे तू या सृष्टीची निर्मिती केली पण तुझ्या या विनोदाने आम्हाला किती त्रास होतो आम्ही आजपर्यंत खूप जन्ममरणाचे त्रास सोसले आहेत व खूप कष्टही त्यामुळे आम्हाला झाले आहेत. देवा मी आता असा उपाय करीन की जेणेकरुन तूच आपणहून माझ्याकडे येशील तो उपाय म्हणजे मी तुझे नाम माझ्या कंठात धारण करीन. देवा मी तुझ्या वियोगाने अनेक योनीमध्ये विविध प्रकारचे संकल्प वाहून अनेक योनीरुप वने भटकत मनुष्य देहापर्यंत आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला तुझ्या प्राप्तीचे सोपे वर्म सापडले आहे ते म्हणजे तुझे नाम कंठात धारण करणे आणि इतके दिवस मी पाप पुण्याच्या गुंताडयात गुंतलो गेलो होतो. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

