Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१० ऑगस्ट, दिवस २२२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी २५१ ते २७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २६५३ ते २६६४

10 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

10 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“१० ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १० August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १० ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २९५३ ते २९६४ चे पारायण आपण करणार आहोत.
१० ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २५१ ते २७५ ,

251-14
तैसे निषिद्धाचेनि नांवे । भलतेही भरे हावे । तियेविषयी धावे । घेती करणे ॥251॥
त्याप्रमाणे शास्ञनिषिद्ध कर्म म्हटले की वाटेल त्या निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याची इंद्रियसुद्धा त्याच दिशेने धाव घेतात.
252-14
मदिरा न घेता डुले । सन्निपातेवीण बरळे । निष्प्रेमेचि भुले । पिसे जैसे ॥252॥
हा तमोगुणी पुरुष दारू न पिता झोकांड्या खातो, सन्निपातापासुन बरळतो आणि हा कोणाची ओळख असो अथवा नसो कोणासही भुलत असतो.
253-14
चित्त तरी गेले आहे । परी उन्मनी ते नोहे । ऐसे माल्हातिजे मोहे । माजिरेनि ॥253॥
त्याचे चित्त तर नाहीसे झालेले असते. पण ती उन्मनी अवस्था नाही. याप्रमाणे जे उन्मत्तकारक मोहाकडून वश केले जातात.
254-14
किंबहुना ऐसैसी । इये चिन्हे तम पोषी । जै वाढे आयितीसी । आपुलिया ॥254॥
फार काय सांगावे ? जेव्हा तमोगुण आपल्या स्वाभाविक गुणांसह पूर्णपणे वाढला जात असतो, तेव्हा जीव अशा लक्षणांचा पोषणकर्ता ठरतो.
255-14
आणि हेचि होय प्रसंगे । मरणाचे जरी पडे खागे । तरी तेतुलेनि रिगे । तमेसी तो ॥255॥
आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असताना जर मरणाचे ठिकाण प्राप्त झाले, तर तो तमोगुणी पुरुष तितक्याच तमोगुणासह पुन्हा देहरुपी घरट्यामध्ये जन्म घेतो.


256-14
राई राईपण बीजी । सांठवूनिया अंग त्यजी । मग विरूढे तै दुजी । गोठी आहे ? ॥256॥
मोहरी पेरल्यानंतर काही दिवसात तिचे रुपातंर एका झाडामध्ये होते. त्यावेळेस त्या झाडास येणारी फळे त्या मोहरीशिवाय दुसर्‍या एखाद्या रसाळ फळाची येणार आहेत काय ?
257-14
पै होऊनि दीपकलिका । येरु आगी विझो का । का जेथ लागे तेथ असका । तोचि आहे ॥257॥
ज्याप्रमाने अग्नी हा दिव्याची ज्योत होऊन (अग्नीपासून दिवा लावल्यावर) मग तो पहिला अग्नी जरी विझला तरी विझेना का ? कारण की ज्या नविन ठिकाणी त्या दिव्याची ज्योत लागेल, त्या ठिकाणी तो पूर्वीचाच सगळा अग्नी असनार आहे.
258-14
म्हणौनि तमाचिये लोथे । बांधोनिया संकल्पाते । देह जाय तै मागौते । तमाचेचि होय ॥258॥
म्हणून तमाच्या तमोगुणाच्या संकल्पाला बांधून (म्हणजे तामस संकल्प करीत असताना) जर त्यास मृत्युरुपी देहाचे गाठाडे बांधावयास लागले असता. त्यास पुन्हा तामसयोनीतच देह मिळतो. अथवा जन्म प्राप्त होतो.
259-14
आता काय येणे बहुवे । जो तमोवृद्धि मृत्यु लाहे । तो पशु का पक्षी होये । झाड का कृमी ॥259॥
आता हे पुष्कळ बोलून काय करायचे आहे ? ज्या मानवदेही तमोगुण वाढुन ज्यावेळी त्यास मृत्यु ओढावला जाता. त्यावेळी त्याच्या हातुन घडलेल्या पापकर्माप्रमानेच त्याला पशु-पक्षी अथवा झाड किंवा कृमी-किटकाचा जन्म त्यास प्राप्त होतो.
260-14
येणेचि पै कारणे । जे निपजे सत्त्वगुणे । ते सुकृत ऐसे म्हणे । श्रौतसमो ॥260॥
याच कारणाकरता जे सत्वगुणापासून किंवा चांगल्या गुणापासुन उत्पन्न होते त्यास श्रुतींमध्ये सुकृत म्हटले जाते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

261-14
म्हणौनि तया निर्मळा । सुखज्ञानी सरळा । अपूर्व ये फळा । सात्त्विक ते ॥261॥
म्हणून त्या निर्मळ सुकृताला सरळ असे सुख व ज्ञान हे लोकोत्तर फळ येते व तेच सात्विक फळ होय.
262-14
मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी फळलिया । जे सुखे चितारूनिया । फळती दुःखे ॥262॥
मग राजस ज्या क्रिया आहेत, त्या पिकलेल्या इंद्रावणीच्या फळाप्रमाणे आहेत कारण की त्या क्रिया बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगवलेल्या असतात तरी त्या क्रियांचे फळ दु:ख हे असते.
263-14
का निंबोळियेचे पिक । वरि गोड आत विख । तैसे ते राजस देख । क्रियाफळ ॥263॥
अथवा कडूनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर असतात, पण आत विषासारख्या कडू असतात. त्याप्रमाणे ते राजस क्रियांचे फळ आहे असे समज.
264-14
तामस कर्म जितुके । अज्ञानफळेचि पिके । विषांकुर विखे । जियापरी ॥264॥
ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषच फळ येते त्याप्रमाणे जितके तामस कर्म आहे तितके अज्ञानरूप फळाने पिकते.

कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् ।
रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥14. 16॥

श्लोकार्थ -: -: 👉सात्विक (सुकृत) कर्माचे निर्मल सत्वप्रधान फल मिळते, असे ज्ञाते सांगतात. राजस कर्माचे फल दु:ख व तामस कर्माचे फल अज्ञान असते.
(सात्विक-राजस-तामस कर्माचे फल)
265-14
म्हणौनि बा रे अर्जुना । येथ सत्त्वचि हेतु ज्ञाना । जैसा का दिनमाना । सूर्य हा पै ॥265॥
म्हणून बा अर्जुना, जसा सूर्य हा दिनमानाला हेतू आहे, तसा सत्वगुणच ज्ञानाला हेतू आहे,


266-14
आणि तैसेचि हे जाण । लोभासि रज कारण । आपुले विस्मरण । अद्वैता जेवी ॥266॥
ज्याप्रमाणे अद्वैत परमात्म्याला आपले स्वरूप-विस्मरण हे जसे जीवदशेस येण्याचे कारण आहे, त्याप्रमाणेच लोभाला रज हे कारण आहे.
267-14
मोह अज्ञान प्रमादा । यया मैळेया दोषवृंदा । पुढती पुढती प्रबुद्धा । तमचि मूळ ॥267॥
शहाण्या अर्जुना, मोह, अज्ञान व प्रमाद या मलिन दोषसमुदायाला वारंवार तमोगुणच कारण आहे.
268-14
ऐसे विचाराच्या डोळा । तिन्ही गुण हे वेगळवेगळा । दाविले जैसा आंवळा । तळहातीचा ॥268॥
तळहातावरील आवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा त्याप्रमाणे हे वेगवेगळे तिन्ही गुण विचाराच्या डोळ्यांना दिसतील असे दाखवले.

सत्त्वात्संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥14. 17॥

*श्लोकार्थ -: -:सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो व तमोगुणापासून प्रमाद व मोह एवढेच नाही तर अज्ञान सुद्धा उत्पन्न होते
(सत्व-रज-तम यापासून होणारी निर्मिती)
269-14
तव रजतमे दोन्ही । देखिली प्रौढ पतनी । सत्त्वावाचूनि नाणी । ज्ञानाकडे ॥269॥
तेव्हा रजोगुण व तमोगुण हे दोघेही पतन घडवून आणण्यास समर्थ आहेत आणि सत्वगुणाकडून ज्ञानाकडे कोणी नेत नाही असे दिसून आले.
270-14
म्हणौनि सात्त्विक वृत्ती । एक जाले गा जन्मव्रती । सर्वत्यागे चतुर्थी । भक्ति जैसी ॥270॥
म्हणून ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा (आर्त जिज्ञासू, अर्थार्थी या तीन भक्तींचा) त्याग करून (ज्ञानी भक्त) ज्ञानरूप भक्तीचे जन्मभर आचरण करतात त्याप्रमाणे कित्येक पुरुष आमरणपर्यंत सात्विक वृत्तीने रहाण्याचा निश्चय करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
क्षजघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः- ॥14. 18॥

श्लोकार्थ -: -::- सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी (स्वर्गादि लोकी) जातात, रजोगुणी पुरुष मध्येच (मनुष्यलोकी) रहातात. निंद्य गुणांमधे असलेले तामसी पुरुष अधोगतीला पशुपक्ष्यादिकांच्या जन्माला जातात.
(सत्व-रज-तमाचे फल)


271-14
तैसे सत्त्वाचेनि नटनाचे । असणे जाणे जयांचे । ते तनुत्यागी स्वर्गीचे । राय होती ॥271॥
त्याप्रमाणे सत्वाच्या उत्कर्षाने त्यांचे जगणे व मरणे असते, ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात.
272-14
इयाचि परी रजे । जिही का जीजे मरिजे । तिही मनुष्य होईजे । मृत्युलोकी ॥272॥
याचप्रमाणे जे रजोगुणात जगतात व मरतात ते मृत्युलोकात मनुष्य होतात.
273-14
तेथ सुखदुःखाचे खिचटे । जेविजे एकेचि ताटे । जेथ इये मरणवाटे । पडिले नुठी ॥273॥
त्या मृत्युलोकात सुखदु:खाची खिचडी, देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते. व जेथे, ज्या मृत्युलोकात रजोगुणाच्या स्वाधीन झाले तर मरणरूपी वाटेत सापडले असता बाहेर पडता येत नाही.
274-14
आणि तयाचि स्थिति तमी । जे वाढोनि निमती भोगक्षमी । ते घेती नरकभूमी । मूळपत्र ॥274॥
व त्याच स्थितीने शरीरात तमोगुणाचे उत्कर्षात जे मरतात, ते नरक भूमीला जाण्याचा दाखला घेतात.
275-14
एवं वस्तूचिया सत्ता । त्रिगुणासी पंडुसुता । दाविली सकारणता । आघवीचि ॥275॥
अशा रीतीने वस्तूच्या सत्तेने सत्वादि तिन्ही गुण ऊर्ध्वादिगतींना कसे कारण आहेत, हे अर्जुना तुला संपूर्ण सांगितले.

दिवस २२२ वा. १०, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २९५३ ते २९६४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २६५३
हित नाही ठावे जननी जनका । दाविला लौकीकचार तीही ॥१॥
अंधळ्याचे काठी लागले अंधळे । घात एक वेळे पुढे मागे ॥ध्रु॥
न धरावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥
तुका म्हणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहाती ॥३॥
अर्थ

काही आई वडिलांना हित कशात आहे ते माहित नसते ते केवळ लौकिकाचार कशा प्रकारे करावा हे दाखवितात. एका आंधळयाच्या काठीला धरुन अनेक आंधळे जर चालू लागले तर पुढचा आंधळा खड्डयात पडला की मागचेही त्यात पडतो आणि एकाच वेळी मागच्या पुढच्या सगळयांचाच घात होतो. त्याप्रमाणे कोणत्याही माणसाचे वागणे पाहून आपण तसे वागू नये त्याच्यावर एकदम विश्वास टाकू नये थोडासा तरी त्याबाबतीत विचार करावा जसे माश्याला गुंतवण्यासाठी गळाला अमिषाचा तुकडा लावला जातो व त्याच अमिषापोटी मासा गळाला लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, “मी मनुष्य आणि त्यांचे वागणे, यावरुनच त्यांचा बरोबर निवाडा केला आहे जसा कोणता घोडा आणि कोणता घोडेस्वार चांगला आहे हे जसे त्यांच्या चालीढालीवरुन कळून येते त्याप्रमाणे मी संसारिक मनुष्य पाहाताच त्यांना चांगलेच ओळखतो आहे. ”

अभंग क्र. २६५४
जेथे पाहे तेथे कांडिती भूस । चिपाडे चोखूनि पाहाती रस ॥१॥
काय सांगो देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कीव ॥धृपद॥
वैकुंठीचे मोटळे लटिकेचि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥२॥
तुका म्हणे का उगेचि खोल । जवळी दाखवी आपणा बोल ॥३॥
अर्थ
मला जिकडे तिकडे लोक व्यर्थ भूस कांडत असताना आणि चिपाडे चोखूनमध्ये रस निघतो आहे काय हे करत असताना दिसतात. देवा अशा प्रकारे हे लोक भुलले आहेत तुला काय सांगू आणि मला हे लोक असे वागतात त्यामुळे त्यांची खूप कीव येते. देवा अरे काही लोक तर असे आहेत की जे लोकांना म्हणतात, आमचा देह म्हणजे वैकुंठावरुन आलेला आहे असे खोटे सांगून व्यर्थ खूपतात आणि त्यांना भूक लागली की तेच लोक दारोदारी जाऊन भिक्षा मागतात. तुकाराम महाराज म्हणतात, “असे काही लोक आहेत जे परमार्थातील उच्च कोटीचे बोल लोकापुढे वापरतात आणि स्वत:ची विद्वत्ता लोकापुढे का उगचंच दाखवतात ? ”

अभंग क्र. २६५५
जाणिवेच्या भारे चेंपला उर । सदा बुरबुर सरेचि ना ॥१॥
किती याचे ऐको कानी । मारिले घाणी नाळकरी ॥धृपद॥
मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥२॥
तुका म्हणे डेंगा न कळे हित । किती फजित करू तरी ॥३॥
अर्थ

काही लोक इतके शब्दज्ञानी असतात की त्यांच्या शब्दज्ञानामुळे समोरच्याचा ऊर दडपून जातो आणि त्यांची ती शब्दज्ञानाची भूरभूर चालू झाली की काही केल्या संपतच नाही अशा शब्दज्ञानी लोकांचे बोलणे तरी आम्ही आमच्या कानाने किती ऐकावे त्यांचे बोलणे म्हणजे जसे जनावराची नाळ दुर्गंध टाकते व येणा-या जाणाऱ्याला त्रास देते त्याच प्रकारचे त्यांचे बोल असतात. मीठेविना अन्न जर अळणी असेल तर त्याची चव लागत नाही उपयोग होत नाही त्याप्रमाणे केवळ शब्दज्ञान ज्याच्याकडे असतात त्याचे बोलणे म्हणजे अनुभवा वाचून घासाघीसच असते. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा डेंगळया मनुष्याला स्वत:चे हित कशात आहे हे कळत नाही त्याची फजिती आम्ही किती करु ? ”
अभंग क्र. २६५६
अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरू वचन मागिलांचा ॥१॥
त्याचे पाय माझे लागोत कपाळी । भोगे उष्टावळी धन्यकाळ ॥धृपद॥
षडउर्मी जिंही हाणितल्या लाता । शरण या संता आल्या वेगी ॥२॥
तुका म्हणे जाती वोळे लवकरी । ठायीचि अंतरी शुद्ध होती ॥३॥
अर्थ

ज्याच्या ठिकाणी पश्चात्ताप उत्पन्न होऊन जो देहाविषयी अभिमान विसरुन गेला त्याचे सर्व मागील पापी शब्द आम्ही विसरुन जाऊ. त्याचे पाय माझ्या कपाळाला लागोत त्याचे उष्टे ज्यावेळी सेवन करण्याचा योग येईल तो काळ धन्य होय. षडऊर्मींना जे लाथा मारतात आणि संतांना जे शरण जातात. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यांचे अंत:करणात शुध्द असते तेच संतांच्या संगतीने लवकर परमार्थाकडे वळतात. ”

अभंग क्र. २६५७
खोल ओली पडे ते पीक उत्तम । उथळाचा श्रम वाया जाय ॥१॥
लटिक्याचे आम्ही नव्हो सांटेकरी । थीते घाली भरी पदरीचे ॥धृपद॥
कोणा इहलोकी पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥२॥
तुका म्हणे कसी अगी जे उतरे । तेचि येथे सरे जातिशुद्ध ॥३॥
अर्थ

बी खोलवर आणि जेथे ओलावा असेल तेथे पेरले तर त्याचे पीक उत्तम प्रकारे येते नाहीतर बी पेरले आणि तेथे पाण्याचा प्रवाह जास्त असेल उतार असेल तर तेथे काहीही श्रम केले तर ते वाया जाते. आम्ही खोटयाचे साथीदार नाहीत कारण जो खोटा आहे तो त्याचे पदरचे सर्व खोटे आपल्या पदरात घालत असतो. या इहलोकामध्ये परमार्थाचा खोटा पसारा कोणाला पाहिजे आहे आणि खोटा परमार्थ दाखवण्याचे सोंग म्हणजेच दंभ होय त्याची आवड तरी कोणाला आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “जे सोने अग्नीमध्ये घातल्यावर पूर्णपणे कसाला उतरुन चांगले बाहेर येते तेच शुध्द जातीचे खरे सोने ठरते. ”

अभंग क्र. २६५८
गोमटया बीजाची फळेही गोमटी । वाहे तेचि पोटी समतुक ॥१॥
जातीच्या संतोषे चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरो नेणे ॥धृपद॥
खऱ्याचे पारखी येत नाही तोटा । निवडे तो खोटा ढाळे दुरी ॥२॥
तुका म्हणे मज सत्यासी आवडी । करिता तांतडी येत नाही ॥३॥
अर्थ

चांगल्या बीजाला फळेही चांगलेच येतात आणि तसेच चांगले बीज पुन्हा आपल्या पोटात धारण करतात. ज्यांचे चित्त परमार्थामध्ये शुध्द जातीचे असते त्यांचे चित्त नेहमी हरीच्या ठिकाणीच असते त्यामुळे त्यांच्या चित्ताला समाधान व विश्रांती प्राप्त होते व त्यांचे चित्त हरीच्या ठिकाणाहून परत माघारी फिरत नाही. कोणत्याही ख-या गोष्टीची परीक्षा घेतली तरी त्यात काही तोटा होत नाही याउलट त्यामध्ये काही खोटेपणा आढळला तरी तो निवडून बाजूला टाकता येतो. तुकाराम महाराज म्हणतात, “मला तर एक सत्याचीच आवड आहे आणि त्यासाठी तातडी केल्याने काहीही हाताला येत नाही. ”

अभंग क्र. २६५९
मन झाले भाट । कीर्ती मुखे घडघडाट । पडियेली वाट । येचि चाली स्वभावे ॥१॥
बोले देवाचे पवाडे । नित्य नवेचि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥धृपद॥
रोखी रहावे समोर । पुढे मागे चाले भार । करावे उत्तर । सेवा रुजू करूनि ॥२॥
पूर वर्षला देकारे । संतोषाच्या अभये करे । अंगींच्या उत्तरे । तुकया स्वामी शृंगारी ॥३॥
अर्थ

माझे मन हरीचे गुण गाणारे भाट झाले आहे ते आपल्या मुखाने हरीची किर्ती गडगडाटात गात आहे. आता मनाला हरीचे गुण गाताना जो मार्ग सापडला आहे त्याच मार्गाने मन चालत आहे व माझा स्वभावही तिकडेच ओढ घेत आहे. माझे मन देवाचे पोवाडे नित्य व नवे गात आहे. जसेजसे देवाला आवडेल तसेतसे मी वर्णन करुन देवाचे पोवाडे गात आहे. देवाच्या पुढे मन नेहमी अगदी समोर असावे आणि इंद्रियांचा परिवार तर देवाच्या मागेपुढेच चालत राहावा आणि देवापुढे विविध प्रकारचे देवाचे वर्णन करावे हीच सेवा देवाच्या ठिकाणी रुजू (सादर) माझे मन करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाने संतोषी होऊन माझ्या मस्तकावर त्याचा अभय हस्त ठेवला आणि देवाच्या प्रसादाच्या फुलाचा वर्षावच त्याने माझ्यावर केला. आणि देवाने आपल्या अंगावरील सच्चिनंदारुपी उपरणे आणि दागिन्यांनी मला श्रृंगारीत केले. ”

अभंग क्र. २६६०
दूरि तोचि होतो आपुले आशंके । नव्हते ठाउके मूळ भेद ॥१॥
आता जेथे तेथे येइन सांगाते । लपाया पुरते उरो नेदी ॥धृपद॥
मिथ्या मोहो मज लाविला उशीर । तरी हे अंतर झाले होते ॥२॥
तुका म्हणे का रे दाखविसी भिन्न । लटिकाचि सीण लपंडाई ॥३॥
अर्थ

देव आणि मी एकच स्वरुप आहोत हेच खरे वर्म मला माहित नव्हते त्यामुळेच मी देवापासून शंकेने दूर होतो. देवा आता जेथे जाशील तेथे मी तुझ्यासंगतीतच राहीन तुला लपायला मी कोठेच जागा उरु देणार नाही. देहाच्या मिथ्य मोहानेच तर मला तुझ्याशी ऐक्य पाहण्यास उशीर लावला त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात अंतर निर्माण झाले. तुकाराम महाराज म्हणतात, “तू मायेच्या आड लपून काहीतरी वेगळेच दाखवितोस मायेच्या आड लपून तू लपंडाव खेळून आम्हाला खोटा प्रकार दाखवतो आणि दु:ख देतोस. ”

अभंग क्र. २६६१
कळो नये तोचि चुकाविता बरे । मग पाठमोरे काय काज ॥१॥
धरिलेती आता द्या जी माझा डाव । सांपडता भाव ऐसा आहे ॥धृपद॥
होतासी अंतरे झाकिलिया डोळी । तोचि मी हा न्याहाळी धरुनी दृष्टी ॥२॥
तुका म्हणे तुज रडीचीच खोडी । अहाच बराडी तो मी नव्हे ॥३॥
अर्थ

देवा तुझ्या ख-या स्वरुपाची जोपर्यंत ओळख मला नव्हती तोपर्यंत तू मला चुकवाचुकवी करणे हे ठीक होते परंतू आता मला तुझे खरे स्वरुप समजले आहे त्यामुळे मला पाठ दाखविण्याचे काही कारण नाही. देवा आता मी तुमचे वर्म अचूक धरले आहे त्यामुळे माझा डाव देऊन टाका बरे तुम्ही माझ्या हाती लागले त्यामुळे मी असे बोलत आहे. देवा जोपर्यंत मी माझ्या ज्ञानदृष्टीचे पडळ झाकले होते तोपर्यंत आपल्यात अंतर होते आता त्याच ज्ञानदृष्टीने मी तुला न्याहाळीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्यावर एकदा डाव आला की तुला अशी रडायचीच घाण सवय लागलेली आहे परंतू मी ही साधा भक्त नाही. ”

अभंग क्र. २६६२
विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥१॥
माझी वदवितो वाणी । जेणे धरिली धरणी ॥धृपद॥
जोडिली अक्षरे । नव्हेती बुद्धीच्या विचारे ॥२॥
नाही केली आटी । काही मानदंभासाठी ॥३॥
कोणी भाग्यवंत । तया कळे हे उचित ॥४॥
तुका म्हणे झरा । आहे मुळींचाचि खरा ॥५॥
अर्थ

देव माझा योगक्षेमाचा भार वाहतो हा मला दृढविश्वास आहे, त्यामुळेच मी त्याच्या ठिकाणी एकनिष्ठ भक्तीभाव ठेवला आहे. ज्याने पृथ्वी धरली आहे तोच माझी वाणी वदवीत आहे. मी माझ्या बुध्दीच्या विचाराने हे अभंगरुपी अक्षरे जोडलेली नाहीत. मला लोकांमध्ये मानसन्मान मिळावा किंवा दंभासाठी मी ही अभंगरुपी रचना केलेली नाही. जे कोणी खरे भाग्यवंत आहेत त्यांनाच माझ्या या अभंग रचनेचे उचित वर्म कळेल. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या ठिकाणी देवाच्या भक्तीरसाचा खरा झरा आहे त्यामुळे तर ही अभंगरचना निर्माण झाली आहे

अभंग क्र. २६६३
सुराणीची झालो लाडिकी एकली । वडील धाकुली आम्ही देवा ॥१॥
म्हणऊनि काही न घडे अव्हेर । गोमटे उत्तर भातुके ही ॥धृपद॥
काही एक नाही वंचिले वेगळे । मुळिचया मुळे स्थिरावले ॥२॥
लेवविलो अंगी आपली भूषणे । अळंकार लेणे सकळ ही ॥३॥
सारिता न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाही लेखा ॥४॥
तुका म्हणे आम्ही आळवू आवडी । म्हणऊनी जोडी दाखविली ॥५॥
अर्थ

देवा मी तुझे एकुलते एक लाडके लेकरू झालो आहे वडीलही आम्हीच आणि धाकटेही आम्हीच झालो आहोत. त्यामुळेच तर तू आमच्याशी गोड बोलतोस आमचा कधी अव्हेर करत नाही आणि आम्हाला प्रेमाने खाऊ घालतोस. देव आमच्यापासून काहीही एक वेगळे ठेवत नाही आम्हाला कधी तो वंचितही करीत नाही त्यामुळे आमचे चित्त जे मूळ आहे “नीजस्वरुप” त्या ठिकाणी स्थिर झाले आहे. देवाने त्याचे सर्व अलंकार आभूषणे आमच्या अंगावर घातली आहेत. या देवाच्या पारमार्थिक धनाचे भांडार इतके आहे की ते कितीही खर्च केले तरी खर्च होत नाही ते शिल्लकच राहाते आणि त्याचा अंत:पारही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाला आम्ही आवडीने आळवितो व यापुढेही आळवू त्यामुळेच तर देवाने एवढा मोठा लाभ आम्हाला दाखविला आहे. ”

अभंग क्र. २६६४
एक वेळ केले रिते कलेवर । आता दिली थार पांडुरंगा ॥१॥
पाळण पोषण नलगे ते सोई । देहाचे ते काई सर्वभावे ॥धृपद॥
माझिया मरणे झाली हे वसति । लागली ते ज्योती अविनाश ॥२॥
झाला ऐसा एका घाये येथे नाही । तुका म्हणे काही बोलो नये ॥३॥
अर्थ

मी एकदाचे माझ्या देहातून सर्व विकार बाहेर काढून दिले आहे आणि तेथे पाडूरंगालाच थारा दिला आहे. यामुळेच देहाचे पालनपोषण आणि देहाचे सर्व चोचले पुरवण्याची गरजच राहिली नाही. आता माझा देहभाव नाहीसा झाला त्यामुळे माझ्या अंत:करणात अविनाश अशा पाडूरंगाचीच ज्योत लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अविनाशी पाडूरंगाची माझ्या अंत:करणात ज्योत पेटली त्यामुळे माझ्या देहाभिमानाचा एका घावातच नाश झाला त्यामुळे मला कोणीही विशेष नावाने किंवा पदवीने संबोधू नये. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version