Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१ ऑगस्ट, दिवस २१३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २५४५ ते २५५६

1 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

1 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“१ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 1 ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १४ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २५४५ ते २५५६ चे पारायण आपण करणार आहोत.
1 ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी २६ ते ५०,

26-14
हे असो आता वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावी उत्कंठा । भंगो नेदी ॥26॥
हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीताग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस.
27-14
हो का जी स्वामी । हेचि पाहत होतो आम्ही । जे श्रीमुखे म्हणा तुम्ही । ग्रंथु सांग ॥27॥
स्वामी महाराज, अशी का आपली इच्छा आहे ? मी याचीच वाट पहात होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ‘ग्रंथ सांग ” असे म्हणावे.
28-14
सहजे दुर्वेचा डिरु । आंगेचि तव अमरु । वरी आला पूरु । पीयूषाचा ॥28॥
हरळीची मुळी स्वभावत: तर अंगाने अमर आहेच, तशात जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला तर मग तिच्या अमरपणाविषायी शंका धरणे नको.
29-14
तरी आता येणे प्रसादे । विन्यासे विदग्धे । मूळशास्त्रपदे । वाखाणीन ॥29॥
तर आता या श्रीगुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीताशास्त्रातील पदे, ती विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन करीन.
30-14
परी जीवा आंतुलीकडे । जैसी संदेहाची डोणी बुडे । ना श्रवणी तरी चाडे । वाढी दिसे ॥30॥
पण असे वर्णन करीन की जेणे करून जीवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल. (संशय नाहीसे होतील) एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल.

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत.


31-14
तैसी बोली साचारी । अवतरो माझी माधुरी । माले मागूनि घरी । गुरुकृपेच्या ॥31॥
माझ्या वाणीतुन उत्तम प्रकारचे अमृतमधुर शब्द प्रगट व्हावेत. एवढे माझे सद्गुरुच्या चरणकमलाशी मागणे आहे.
32-14
तरी मागा त्रयोदशी । अध्यायी गोठी ऐसी । श्रीकृष्ण अर्जुनेसी । चावळले ॥32॥
चौदाव्या अध्यायाची प्रस्तावना
तर मागे तेराव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनास अशी गोष्ट सांगितली आहे.
33-14
जे क्षेत्रक्षेत्रज्त्रयोगे । होईजे येणे जगे । आत्मा गुणसंगे । संसारिया ॥33॥
की हे जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासुन जग उत्पन्न होते आणि आत्मा हा गुणांच्या संबंधाने संसारी झाला आहे.
34-14
आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदुःख भोगी हेतु । अथवा गुणातीतु । केवळु हा ॥34॥
आणि हाच (आत्मा) प्रकृतीच्या तावडीत गेल्यामुळे सुखदु:ख भोगण्यास कारण होतो. त्यास सुखदु:खाचा भोग होतो. एरवी खरोखर पाहिले तर हा केवल गुणातीतच आहे.
35-14
तरी कैसा पा असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्त्रयोगु । सुखदुःखादि भोगु । केवी तया ? ॥35॥
तर असंगाला संग कसा व क्षेत्र-क्षेत्रज्ञ यामधील संबंध तो कोणता ? व त्याला सुखदु:खादि भोग कशा प्रकारे भोगावी लागतात ?


36-14
गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती । नातरी गुणातीती । चिन्हे काई ? ॥36॥
गुण ते कसे व किती आहेत व ते आत्म्याला कोणत्या प्रकाराने बद्ध करतात ? अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत ?
37-14
एवं इया आघवेया । अर्था रूप करावया । विषो एथ चौदाविया । अध्यायासी ॥37॥
या प्रमाणे यावरील सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट सांगणे हा चौदाव्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे,
38-14
तरी तो आता ऐसा । प्रस्तुत परियेसा । अभिप्रायो विश्वेशा । वैकुंठाचा ॥38॥
तरी आता जगाच्या या वैकुठनिवासी विक्ष्वेक्ष्वरांचा अभिप्राय काय आहे. तो तुम्ही या प्रस्तुत चौदाव्या अध्यायात ऐका
39-14.
तो म्हणे गा अर्जुना । अवधानाची सर्व सेना । मेळऊनि इया ज्ञाना । झोंबावे हो ! ॥39॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, श्रवण करण्याची जी साधन सामुग्री एकत्र जुळवून आणून ज्ञानाशी एकरुप व्हावे.
40-14
आम्ही मागा तुज बहुती । दाविले हे उपपत्ती । तरी अझुनी प्रतीती- । कुशी न रिघे ॥40॥
आम्ही मागे तुला पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादांनी हा विचार, ज्ञान समजावुन सांगितले आहे. परंतु अजूनही तुझ्या अंतकरणात ह्याचा अनुभव आलेला दिसत नाही


41-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

श्रीभगवानुवाच ।
परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।
यद्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥14.1॥
श्लोकार्थ -::- श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला (श्रुतींनी) ‘पर ” म्हणून म्हटले आहे, जे सर्व ज्ञानांमधे उत्तम आहे व जे जाणून सर्व मुनी या देहबंधनापासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धी पावले, असे हे ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो.
म्हणौनि गा पुढती । सांगिजैल तुजप्रती । पर म्हण म्हणौनि श्रुती । डाहारिले जे ॥41॥
या करता श्रुतीने पर (सर्वाच्या पलीकडे) म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल.
42-14
एऱ्हवी ज्ञान हे आपुले । परी पर ऐसेनि जाले । जे आवडोनि घेतले । भवस्वर्गादिक ॥42॥
सहज विचार करून पाहिले तर ज्ञान हे आपले रूपच आहे. परंतु संसार, मृत्यू लोक, स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे ते ज्ञान आपले स्वरूप असून पर म्हणजे परके असे झाले आहे.
43-14
अगा याचि कारणे । हे उत्तम सर्वापरी मी म्हणे । जे वन्हि हे तृणे । येरे ज्ञाने ॥43॥
ह्या ज्ञानापुढे, अग्नी व इतर ज्ञाने ही गवत आहेत. म्हणून अर्जुना, हे ज्ञान सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम आहे. असे मी म्हणतो.
44-14
जिये भवस्वर्गाते जाणती । यागचि चांग म्हणती । पारखी फुडी आथी । भेदी जया ॥44॥
जी इतर ज्ञाने संसाराला व स्वर्गाला विषय करतात व यज्ञच चांगले असे म्हणतात व द्वैतभावाची ज्यांना ओळख असते,
45-14
तिये आघवीचि ज्ञाने । केली येणे स्वप्ने । जैशा वातोर्मी गगने । गिळिजती अंती ॥45॥
ती सर्व इतर ज्ञाने या ज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली आहेत. ज्याप्रमाणे वार्‍याच्या लाटा अखेरीस आकाशा कडून गिळल्या जातात,


46-14
का उदिते रश्मिराजे । लोपिली चंद्रादि तेजे । नाना प्रळयांबुमाजे । नदी नद ॥46॥
अथवा सूर्य उगवला असता जशी चंद्रादिक तेजे लोपतात अथवा प्रलयकाळच्या पाण्याच्या महापुराने जसे नदी व नद नाहीसे होतात.
47-14
तैसे येणे पाहलेया । ज्ञानजात जाय लया । म्हणौनिया धनंजया । उत्तम हे ॥47॥
अर्जुना त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लयास जातात. म्हणून अर्जुना हे ज्ञान उत्तम आहे.
48-14
अनादि जे मुक्तता । आपुली असे पंडुसुता । तो मोक्षु हाता येता । होय जेणे ॥48॥
अर्जुना, आपली जी अनादि मुक्तता आहे, ती मुक्तता या ज्ञानाने हस्तगत होते.
49-14
जयाचिया प्रतीती । विचारवीरी समस्ती । नेदिजेचि संसृती । माथा उधऊ ॥49॥
ज्याच्या अनुभावाने सर्व विचारशूर पुरुष संसाराला डोके वर काढूच देत नाहीत.
50-14
मने मन घालूनि मागे । विश्रांति जालिया आंगे । ते देही देहाजोगे । होतीचि ना ॥50॥
ते विचारशूर पुरुष आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटावून, अंगाने विश्रांती स्वत: ब्रह्मरूप झाल्यावर जरी देतात असतात तरी पण ते देहाजोगे होत नाहीत. देहाएवढेच आपल्याला समजत नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २१३ वा. १, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५४५ ते २५५६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २५४५
तरी का वोळंगणे । राजद्वारी होती सुने ॥१॥
अंगी दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥धृपद॥
कासया मोकळ । भोवते शिष्यांचे गाबाळ ॥२॥
तुका म्हणे ढाळे । बाहेरमुदे ते निराळे ॥३॥
अर्थ
अनेक विरक्त साधू आहेत परंतु तरी देखील ते एकद्या राज द्वारा मध्ये कुत्र्यासारखे का राहतात. अंगात निष्कामता आहे असे ते जगाला दाखवतात परंतु त्यांच्या अंतकरणात जर पाहिले तर वैराग्य नसते भक्ती नसते केवळ पोकळी असते त्यामुळेच ती पोकळी व्यर्थ असते. हे जर विरक्त आहेत विभक्त आहेत मग यांच्याभोवती शिष्यांचे समुदाय कशाला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे साधू हे बाहेरून तर आनंदी असल्या सारखे दिसतात परंतु बर्हि मुखी वेगळे असतात, जे खरे साधू असतात ते यांच्यापेक्षा फारच निराळे असतात.
अभंग क्र. २५४६
हरीच्या दासा सोपे वर्म । सर्व धर्म पाउले ॥१॥
कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥धृपद॥
सरती येणे आटाआटी । नाही तुटी लाभाची ॥२॥
तुका म्हणे समाधान । सदा मन आमुचे ॥३॥
अर्थ
हरीच्या दासांसाठी सर्वात सोपे वर्म आणि सर्वधर्म हरीचे पावलेच आहेत. देव आम्हाला कडेवर व खांदयावर वाहात असतो आणि आम्हाला परमार्थिक क्रीडा करण्यासाठी खेळ खेळण्यासाठी वैष्णवाचा समुदाय त्यांनीनिर्माण केलेला आहे. त्यामुळे आम्हाला जी आटाआटी होते जो त्रास होतो तो नाहीसा होऊन आम्हाला ज्या सुखाची ज्या लाभाची अपेक्षा आहे त्या लाभाची तुट कधीही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे पाऊले आणि वैष्णवांच्या मेळ्याची संगती आम्हाला असते त्यामुळे आमचे मन सदा समाधी अवस्थेत असते.
अभंग क्र. २५४७
भूताचिये नांदे जीवी । गोसावीच सकळा ॥१॥
क्षणक्षणा जागा जागा ठायी । दृढ पायी विश्वास ॥धृपद॥
दावूनिया सोंग दुजे । अंतर बीजे वसतसे ॥२॥
तुका म्हणे जाणे धर्म । धरी ते वर्म चिंतन ॥३॥
अर्थ
हा गोसावी म्हणजे माझा स्वामी सर्व भूतमात्रांच्या अंतकरणात नांदत असतो. तुम्ही सर्व क्षणाक्षणाला त्या हरी विषयी जागरुक रहा त्याचे चिंतन करा आणि त्याच्या पायावर दृढ विश्वास ठेवा. हा हरी नाम व रुप यांचे विविध सोंग आपल्याला दाखवत असतो. व तो नाम आणि रुप बिजाच्या आत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अंतःकरणात हरीचे चिंतन करणे हेच खरे धर्माचे वर्म आहे असे जाणावे.
अभंग क्र. २५४८
संत आले घरा । तो मी अभागी दातारा ॥१॥
कासयाने पूजा करू । चरण हृदयीच धरू ॥धृपद॥
काया कुरवंडी । करुन ओंवाळून सांडी ॥२॥
तुका म्हणे भावे । हात जोडी असो ठावे ॥३॥
अर्थ
हे दातारा देवा संत आज माझ्या घरी आलेत परंतु मी आभागीच आहे. आता या संतांची पूजा मी कशी करू माझ्याकडे काहीच नाही आता यांची केवळ चरण ह्रदयात धारण करणे एवढेच मला यावेळी जमेल. माझ्या शरीराची कुरवंडी करून त्यांच्या वरून ओवाळून टाकावे हेच यावेळी मी करू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात हे संत जनहो मी भक्ती भाव पूर्वक तुमच्यापुढे नतमस्तक होऊन हात जोडत आहे हे तुम्हाला माहीत असू द्यावे.
अभंग क्र. २५४९
भेद तुटलियावरी । आम्ही तुमचीच हो हरी ॥१॥
आता पाळावे पाळावे । आम्हा लडिवाळाचे लळे ॥धृपद॥
आणिकाची देवा । नाही जाणतचि सेवा ॥२॥
तुका म्हणे हेवा । माझा हेत पायी देवा ॥३॥
अर्थ
अहो हरी एकदा की तुमच्यातील व माझ्यातील भेद नाहीसा झाला की आम्ही तुमचेच आहोत. त्यामुळे हे हरी आम्ही तुझे लाडके भक्त आहोत त्यामुळे आमच्या लाडक्या भक्तांचे तुम्ही लाड सांभाळ करावेत. तुझ्या वाचून देवा आम्ही कोणाचीही सेवा करण्याचे जाणत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा सर्व हेवा तुमच्या पाया जवळच आहे.
अभंग क्र. २५५०
आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥१॥
हेचि एक जाणे । काया वाचा आणि मने ॥धृपद॥
पुढती पुढती नमन । घालूंनिया लोटांगण ॥२॥
नीच जना लोका । तिळले पायरीस तुका ॥३॥
अर्थ
हे कमळापती आमची विश्रांती म्हणजे तुमचे चरण आहेत. आणि एवढे एकच तत्व काया, वाचा आणि मन जाणत आहे. तुम्हाला लोटांगण घालून सारखे सारखे तुम्हाला नमन करावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्यासमोर अनेक भक्त बसलेले आहेत त्यामध्ये मी सर्वात नीच आहे आणि सर्वात खालच्या पायरीवर मीही तेथे आहे.
अभंग क्र. २५५१
विनवितो शेवटी । आहे तैसे माझे पोटी ॥१॥
कंठी राहावे राहावे । हेचि मागतसे भावे ॥धृपद॥
पुरली वासना । येणे होईल नारायणा ॥२॥
तुका म्हणे जो देहाडा । तोचि वर्णीन पवाडा ॥३॥
अर्थ
देवा माझ्या अंतःकरणात जे आहे त्यासंबंधी आता मी तुम्हाला शेवटची विनंती करीत आहे. कंठामध्ये तुमचेच नांव राहावे हेच मागणे मी तुम्हाला भक्ती भावपूर्वक मागत आहे. हे नारायणा ज्यावेळी असे होईल त्यावेळी माझी इच्छा वासना पूर्ण होईल. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत हा देहाचा सांगाडा आहे तोपर्यंत तुमचा पोवाडा तुमची कीर्ती वर्णन करीत आहे.
अभंग क्र. २५५२
आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥१॥
ऐसी उफराटी वर्मे । कळो भ्रमे न येती ॥धृपद॥
न लगे समाधान मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥२॥
तुका म्हणे एका जीवे । सूत्र व्हावे गुंतले ॥३॥
अर्थ
अतिशय सलगीने जवळीकतेणे वागणे ही देवाची आवडती पूजा असून विषमतेने भेदभाव मनात ठेवणे याचे देवाला दुःख वाटते. असे काही उरफाटे वर्म आहेत जे सामान्य जीवांना समजून येत नाहीत कळून येत नाहीत. देवाला कितीही मौल्यवान दागिने किंवा मोल वाहिले तरी ते त्याला लागत नाही व ते आवडतही नाही केवळ प्रेमाने हरी असे बोल जरी बोलले तरी ते त्याला आवडत असतात. तुकाराम महाराज म्हणतात हरी आणि जीवन हे एकाच सूत्रात गुंतून रहावे.
अभंग क्र. २५५३
बाळ माते लातेवरी । मारी तेणे संतोषे ॥१॥
सुख वसे चित्ता अंगी । ते हे रंगी मिळाले ॥धृपद॥
भक्षी त्याचा जीवमाग । आले भाग तो बरा ॥२॥
तुका म्हणे ॠणानुबंधे । सांगे सुदे सकळांसी ॥३॥
अर्थ
लहान मुल आपल्या आईला लाथेवर लाथ मारते परंतु त्यामुळे आईला संतोषच वाटत असतो. दोघाच्याही चित्तात सुख बसलेले असते आणि दोघाचेही प्रेम रंग एकमेकात मिसळलेले असतात म्हणूनच. मुलाने सेवन केलेले अन्न उरलेले चांगले आहे हे समजुन तेच आई सेवन करते. तुकाराम महाराज म्हणतात हा सर्व ऋणानुबंधच आहे असे मी निसंकोच पणाने सर्वाना सांगत आहे.
अभंग क्र. २५५४
शिजल्यावरी जाळ । वाया जायाचे ते मूळ ॥१॥
ऐसा वारावा तो श्रम । अतिशयी नाही काम ॥धृपद॥
सांभाळावे वर्म । उचिताच्या काळे धर्म ॥२॥
तुका म्हणे कळे । ऐसे कारणाचे वेळे ॥३॥
अर्थ
अन्न चांगले शिजले आणि तरीही खाली जाळ चालू ठेवला तर चांगले अन्न वाया जाण्यासाठी ते मुख्य कारण ठरते. त्यामुळे अति श्रम करणे टाळावे जर अती श्रम केले तर ते व्यर्थ ठरते. योग्य वेळी योग्य काय आहे ते कळाले पाहिजे व ते सांभाळले पाहिजे आणि तोच मुख्य धर्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही कार्य करत असताना हया गोष्टी समजत असतात किंवा समजून घ्याव्या लागतात.
अभंग क्र. २५५५
उभा ऐल थडी । तेणे घालू नये उडी ॥१॥
पुढे गेल्याचे उपाय । करावे ते केले काय । ध्रु. ॥
दिसते आहारी । नये जाऊ ऐशावरी ॥२॥
अळसाची धाडी । तुका म्हणे बहु नाडी ॥३॥
अर्थ
नदीच्या अलीकडे जो काठावर उभा आहे त्याने एकदम अविचाराने नदी च्या पाण्यात उडी घालू नये. नदीच्या पलीकडे जो गेला आहे त्याने काय उपाय केला आहे तोच उपाय आपण जाणून घ्यावा आणि त्याप्रमाणे करावे. हे माझ्या आटोक्यातील आहे असे समजून त्याच्या आहारी जाऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात हेही खरे असले तरी आपण जे काम करत आहोत त्यावर जर आपण काम करतोय परंतु आळसाने जर आपल्यावर धाड टाकली तर तो आपल्याला प्रतिबंध करून आपल्याला फार नाडीतो.
अभंग क्र. २५५६
शक्ती द्याव्या देवा । नाही पार्थीवाची सेवा ॥१॥
मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥धृपद॥
मना पोटी देव । जाणे जैसा तैसा भाव ॥२॥
तुका म्हणे सोसे । लागे लाविल्याचे पिसे ॥३॥
अर्थ
देवा परमार्थ करण्याविषयी मला शक्ती द्याव्यात आणि देह व देहा संबंधित असलेल्या प्रत्येक जड जीवाची सेवा न करण्याची मला इच्छा द्यावी. परमार्थ करण्यासाठी देहा संबंधी असणार्‍या कोणत्याही देवाची सेवा न करणे हेच परमार्थ करण्याचा मुख्य धर्म आहे. आणि हेच तुम्ही जाणते लोकांनो जाणून घ्या. आपल्या मनातच जो भक्ति भाव असेल तसाच देव होत असतो हे जाणून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनाने ज्या गोष्टीविषयी छंद लावून घेतला असेल. त्याच गोष्टी विषयी आपणास वेड लागत असते.

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version