श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग ७, (३१ ते ३७)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

श्री भ. दतात्रय प्रभू

!!!   श्री  दत्तात्रय   !!!

भाग  –  ३१.

         काशीराजालाही वैराग्य उत्पन्न झाल्याने जेष्ठ मुलाचा राज्याभिषेक करुन राज्य त्याच्या सुपुर्द केले. आणि वनांत सुबाहुच्या सोबत राहुन त्याच्या मार्गदर्शनाखाली मोक्षाचे साधन करुं लागला. अलर्कानेही आपल्या जेष्ठ पुत्रा ला राज्यावर बसवले. सर्वसंगपरित्याग करुन वैराग्य आल्याने दुःख, इष्ट-अनिष्ट इत्यादु सर्व द्वदापासुन मुक्त होऊन वनांत जाऊन अलर्कने दत्तप्रभुंची उपासना सुरु केली. निर्विकल्प समाधी प्राप्त करुन परमानंदात निमग्न झाला. प्रारब्ध संपल्यावर प्राणायनाने टाळुच्या जागी असलेल्या सहस्रार चक्राचि भेद करुन स्थूल देहाचा त्याग केला आणि तो परब्रम्हाशी एकरुप झाला. वेदधर्मा मुनी संदीपाकाला म्हणतात…. जडवत वाटणारा त्या योगभ्रष्ट पुत्राने वडिल  भार्गवमुनींना सर्व दत्तचरित्र ऐकवले. भार्गवमुनींनीही वैराग्य निर्माण झाल्याने  दत्तात्रयाची उपासना करुन तोही लवकरच मुक्त झाला.

       अलर्क, आयुराजा, कार्तवीर्यार्जुन,यदु, प्रल्हाद, पिंपलनाग, साध्य ब्राम्हण हे सर्व दत्तांचे नित्य भक्त असुन त्यांना कालचक्राचाही भेद करुन आपल्या भक्तीने ब्रम्हांड गाजवले आणि शेवट गोड करुन ते अखंड परमात्म रुपात मिळुन गेलेत.

      भगवान दत्तात्रय सर्वात्मक, विश्वात्मक व सर्व देवांचेही देव आहेत.  ते करुणेचा सागर असल्यामुळेच संसारा च्या वणव्यात होरपळणारे जीव पाहुन त्यांनी अत्रि अनुसयेच्या पोटी जन्म घेतला. “बुडती हे जन देखवेना डोळां। म्हणोनी कळवळा येतसे।। हे त्या दया धनाच्या अनुकंपेचे पडसाद आहेत. या लोकांना स्व-आत्मसौख्याची वाट दाखवण्यासाठी सत्य, जाणीव आणि आनंद यांचा निराकार असीम धन असे ज्याचे वर्णन करतात, त्या परमात्म्याने मायेचा आश्रय करुन जन्मादी विकारां  चा अंगीकार करावा यापेक्षा त्याच्या दयाळुपणाची दुसरी साक्ष काय असेल? आत्मसौख्याची वाट दाखवणे हेच श्री दत्तावराचे प्रमुख कार्य असल्यानेच ते अनेक रुपे धारण करतात व जन्ममरणा च्या अखंड फेर्‍यातुन सुटका करतात. दत्तप्रभुच सर्व जीवांचा एकमेव नियामक आहेत. वस्रांचा उभा आडवा  धागा जसा एकच असतो, तसचं हे जग, त्यांच्या रुपाने द्वैताचा नाश करुन व्यापलेला आहे. मुनी वेदधर्मांनी दत्तप्रभुं चे गुणगान केल्याने ते प्रसन्न झाले. दीपकने आयुराजाबद्दल सांगण्याची विनंती केली.

      सोमवंशात पुरुव्याला उर्वशीपासुन झालेला पुत्र आयुराजा! त्याने सर्व पृथ्वी जिंकुन सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली. राजा प्रजेचे पुत्रवत प्रेम करीत असे, सत्यवचनी प्रजावत्सल शरणांगतांचा त्राता, दुष्टांचा कर्दनकाळ होता. देवांना ही दुर्लभ अशी सर्व सुखे त्याला प्राप्त होती, पण पोटी संतान नसल्यामुळे, वंश पुढे चालणार नाही या घोर चिंतेने, आपल्याला व पितरांनाही अधोगतीला जावे लागेल या कल्पनेनेच तो कायम दुःखी,चिंतीत राहत असे. शेवटी कुशल ज्योतीष्याला बोलावुन त्यांच्याशी चर्चा केली.ज्योतीष्य म्हणाले, राजा! सर्वांच्या आत्मरात्म्यात वास करणारे, भक्तांचा वाली असणारे सह्यपर्वतावर जाऊन अत्रिपुत्र दत्तात्रयाला शरण जाऊन त्यांची अनन्यभावे भक्ती करुन त्यांच्या चरणी लीन झालात तर, अलभ्यांतील अलभ्यही सहज प्राप्त होते. दत्तप्रभु भक्तांची कठोर परीक्षा पाहतात, तेव्हा न घाबरतां, धीराने आणि भक्तीभावाने त्यांची सेवा केली व त्यांच्या परीक्षेस उतरुन मनात घर केले की, तुझी मनोकामना पुर्ण झालीच म्हणुन समज!

        ज्योतीष्याने दर्शवलेल्या मार्गा नुसार राजा ताबडतोब सह्याद्रीच्या शिखरावर दत्तप्रभुंच्या समोर उपस्थित होऊन आनंदाने व भक्तीभावाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. सिध्दासनावर ध्यानस्थ दत्तमुर्तीला पाहुन राजाचे सात्विक भाव उचंबळुन आले, गहिवर ल्या स्वरांत बोलु लागला. कांही पुर्व पुण्याईनेच योग्यांनाही याजकांनाही दुर्लभ असे भगवद् दर्शन झाले. राजा असे बोलत असतांनाच दत्तप्रभुंनी एकदम चित्र पालटुन टाकले.

              क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  श्री  दत्तात्रय  !!!

भाग  –  ३२.

         दत्तप्रभुंनी आपल्या अनिर्वचन मायेला तरुण स्रीचे रुप देऊन तिला मांडीवर घेऊन अलिंगन, चुंबनादी प्रणय चाळे सुरु केले.राजावर कांहीच परिणाम होत नाहीसे पाहुन दत्तप्रभुंनी रुद्रावतार धारण करुन, मी संस्कारहीन, बहिष्कृत आहे. ताबडतोब तूं निघुन जा! अन्यथा तुला शाप देईन. राजा विनम्रतेने लिन होऊन म्हणाला, देवा! सर्व वर्ण आणि आश्रम ज्या वेदत्रयीने बांधलेले आहेत, आपल्या स्वरुपाला जाणणारे देखील वेदांना शिरोधार्य मानतात. शिवाय ज्ञानी पुरुष  शरणांगताला कधीच शाप देत नाही, त्यामुळे मी आपले पाय सोडणार नाही. मग दत्तप्रभुं नी त्याला मारण्यास सुरुवात केली, पण घट्ट मन करुन  राजा वारंवार त्यांच्या चरणावर पडुं लागला.

       अखेर दत्तप्रभु जी सांगतील ती सेवा न कुरकुरता करावी या अटीवर त्याला आश्रमात राहण्याची परवाणगी मिळाली. राजाने अट मान्य केल्यावर दत्तप्रभुंनी लगेच रोज मानवी कवटीतुन ताजे मांस, व मद्य आणण्याची आज्ञा केली. ज्याला यज्ञातील हवींनीही तृप्त करणे अत्यंत दुष्कर, असा परमात्मा, आयुराजाने दिलेले मद्य व मांस खाऊन तृप्त झाले. प्रसन्न होऊन राजाला इच्छित वर मागण्यास सांगीतले. अरे! हे मंंदमती लोक माझे स्वरुप न समजता, स्थुल दृष्टीनेच पाहतात, त्यामुळे माझ्या वागण्याचा विपरित अर्थ लावतात. मी अभोक्तृत्व, अलिप्रत्व, असुन केवळ साक्षीत्वाने पाहत असतो.मी कांहीही भक्षण करत नाही वा भोगतही नाही. मीच वैश्वाचर( अग्नि ) होऊन प्राण-अपनांसह अन्नाचे पचन करतो. सर्वांचा चालक मीच आहे.त्या वैश्वनरा च्याही आंत मीच आहे. सर्व विश्वाप्रमाणे तोही माझेच स्वरुप आहे. मी कर्ता असुनही अकर्ता आहे. मला कर्माच्या फलाची आसक्ती नसल्यामुळे कर्मे मला चिकटत नाही हे जो जाणतो तोच कर्मबंधनातुन मुक्त होतो.

        दत्तप्रभुंचे प्रासादिक बोलणे ऐकुन आयुराजा कृतकृत्य झाला.हरखुन म्हणाला, आपणच देवाधिदेव भगवान विष्णु आहांत, मी पुत्रहीन आहे. देव व पितरांचा भक्त, असलेला, सन्मार्गावर चालणारा, देवाब्राम्हणांचा,गुरुंचा आदर करणारा, सर्वज्ञ आणि पुज्य,शूर,रणमर्द वीर, योध्दा,कर्तव्यदक्ष,पुत्रवत्  प्रजेचे पालन करणारा पुत्र देऊन माझे मनो वांच्छित इच्छा पुर्ण करावी.उर्वशीपुत्राचे बोलणे ऐकुन दत्तप्रभु म्हणाले, तुझे मागणे दुर्लभ आहे, परंतु तू माझा भक्त असल्यामुळे तुला मी तसा “वर” देतो. तुझ्या इच्छेप्रमाणे सर्वमान्य व विख्यात पुत्र होईल असे म्हणुन एक फळ  पत्नि ला खायसाठी राजाला दिले.राजाने त्यांना पुनः साष्टांग नमस्कार करुन त्यांच्या आज्ञेनुसार फळ घेऊन गांवी निघुन गेला.

        आयुराजा घरी येऊन प्रिय पत्निस, सर्व देवांचा प्रमुख, पुण्यवान लोकांना सुमूख(प्रसन्न) आणि भक्तांसाठी सदैव उन्मुख असणार्‍या प्रभुने दिलेले फळ तिला देऊन म्हणाला, आतां आपल्या कुळाची वृध्दी होईल. एका रात्री तीला एका चतुर्भुज महापुरुषाचे दर्शन झाले. त्याच्या शिरावर रत्नमाणिकांनी मढविले ल्या अगणित शेषाच्या फणाचे छत्र होते प्रसन्नतेने हसत त्याने तिच्या हातात अनमोल मोती देऊन हातातल्या शंखाने तिच्यावर दुधाचा अभिषेक केला.ते स्वप्न पाहुन तिला परमानंद व परम आश्चर्य होऊन तिला एकदम जाग आली. हा दत्तप्रभुंचाच प्रसाद असावा असे वाटुन  तिने स्वप्न पतीला सांगतले. सुचक स्वप्न आहे असे म्हणुन राणीला परत झोपु नकोस म्हणुन सांगीतले. दुरर्‍या दिवशी  सकाळी इंदुमतीला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ विचारण्यासाठी शौनक मुनींना बोलावणे पाठविले.

           क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  श्री  दत्तात्रय  !!!

भाग  –  ३३.

            शौनक त्रृषींनी इंदुमतीचे स्वप्न ऐकल्यावर म्हणाले, स्वप्न शुभसुचक असुन,दत्तप्रभुंनी दिलेल्या फळाने इंदुराणी लवकरच गर्भवती होईल.हा गर्भ दिक्पाळाच्या अंशानीयुक्त असुन तो महान तेजस्वी,धर्मनिष्ठ,वेदज्ञ,सोमवंशा ला भूषणास्पद असा चक्रवर्ती सम्राट होईल. दीनांचे पालन व सज्जनांचे रक्षण करुन हुंडासुराचा वध करील.ज्या वेळी आयुराज सह्याद्रीपर्वतावर दत्तप्रभुं च्या सेवेसाठी गेला होता, त्याचवेळी कांचन नगरीत हुंडा नांवाच्या असुराचा जन्म झाला होता.त्याने भुमंडळावर वर्चस्व स्थापन करुन देवांनाही धाक निर्माण झाला.एकदा शुककन्या अशोक सुंदरीला( दत्तपुराणांत शिवकन्या असे ही म्हटले आहे) बलात्काराने धरले असतां, तिने त्याला झिडकारुन “आयु राजाच्या पुत्राकडुन तुझा नाश होईल असा शाप दिला. त्यामुळे त्याने चिडुन कारागृहात बंदीवान केले.

       एकदा हुंडासुराची कन्या नंदननवनात  खेळायल गेली असतां, आपसांत बोलत असलेले दोन चारण देवांच्या रक्षणार्थ हुंडासुराच्या मृत्युची योजना झाली असे बोल तिच्या कानावर आल्यामुळे  तडक घरी येऊन हे वृत्त पित्याच्या कानी घातले. हे ऐकुन त्याला धक्काच बसला.अशोकसुंदरीचा शाप त्याला आठवला.अदृष्यरुपाने इंदुमतीराणी जवळ जाऊन पाहिल्यावर ती गर्भवती असुन रक्षणार्थ तिच्या सभोवती वेगाने फिरणारे सुदर्शन चक्र पाहुन त्याला कापरेच भरले. तिचा  गर्भ किंवा तिला मारण्याचा बेत फसल्यामुळे, जीव तर वाचवायलाच हवा या विचाराने, त्याने इंदुमतीला डोके नसलेले मृत बालक जन्माला आला, असे दुःस्वप्न आपल्या योगमायेने हुंडासुराने तिला दाखवले. अपल्याला तर दत्तप्रभुंनी आशीर्वाद दिला, मग असे दुःस्वप्न कां पडावे? सकाळी उठुन तिने सुर्यदेवाची व दत्तप्रभुंची गर्भ सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना केली.

      इंदुमतीभोवती फिरणार्‍या सुदर्शन चक्रामुळे तिचा गर्भ पाडण्याचा किंवा तिला मारण्याचा मायावी खटाटोप व्यर्थ गेला म्हणुन तो अनुकुल संधीची वाट बघत दबा धरुन बसला. स्वतः दत्तप्रभुच रक्षणकर्ता असल्याने त्यांना हानी पोहच विण्यास सर्व भूमंडळात कोण समर्थ असु शकेल? इंदुमतीला दहा महिने झाले तरी ती प्रसुत न झाल्यामुळे राजा चिंतित झाला.हे विघ्न निवारण्यासाठी ब्राम्हणांच्या सल्ल्याने अश्विनीकुमारां च्या मंत्राने अभिमंतरलेले पाणी राणीला पाजल्याबरोबर विनासायास प्रसुत होऊन सुंदर व तेजस्वी बाळाला जन्म दिला. राजाला वृत्त कळतांच आनंदुन त्या तेजस्वी बालकाला पाहिल्यावर आपण सर्व त्रृणातुन मुक्त झाल्याची धन्यता वाटली. ज्योतीषांनी त्याची कुंडली पाहुन सांगीतले की,हा पृथ्वीचा सम्राट तर होईलच पण स्वर्गावरही अधि  पत्य गाजवेल.चौसष्ट कला व चौदा विद्यांचा जाणता होईल.महावीर,दानशूर धर्मनिष्ठ, गोरगरिबांचा कैवारी व दुष्टांचा वैरी होईल, पण बाल्यावस्थेतच तुमच्या शोकाला हा कारण होईल.

        काशिक्षेत्रात संदीपकाला गुरुवेद धर्मा पुढे सांगतात….बाल्यावस्थेतील तेजस्वी राजपुत्राला पाहुन हा नक्कीच आपला वध करेल याची खात्री हुंडासुरा ला पटली. याला कोणत्या समर्थ देवाचे संरक्षण आहे हे पृथ्वी,स्वर्ग व पाताळात शोध घेऊनही एवढा बलीष्ठ कोणी दिसेना! शेवटी त्याने महामायाच्या चरणाचा आश्रय घेण्याचे ठरविले.अन्न पाणी सोडुन बाळाच्या कक्षेबाहेर सुक्ष्म रुपाने राहुन हुंडासुराने महामायेला अत्यंत दिनवाने स्वतःचा जीव वाचव ण्यासाठी प्रार्थना करुं लागला.हुडा सुराची भक्ती राजसी होती.या उपासनेत शत्रुच्या घाताची प्रवृत्ती जास्त व तिच्या विषयीची श्रध्दा,भक्ती कमी! स्वतःला वाचवण्यासाठी मद्य,मांसाचे प्रलोभन देऊन तो देवीला वश करुं पाहत होता.

             क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  श्री दत्तात्रय  !!!

भाग  –  ३४.

         हुंडासुराची कठोर साधना व विनवणीने महामायेला दया आली.इंदु मतीच्या अंःपुरातील एक दासी बाहेर आल्याबरोबर तिच्या शरीरात परकाया प्रवेश केला.व गुप्तरुपाने राणीकक्षात प्रवेश मिळवला.महामायेची कृपा समजुन त्याने प्रस्वापिनी मंत्राचा प्रयोग करुन सर्वजण सकाळपर्यंत निद्रिस्त होईल अशी व्यवस्था केल्यावर बाळाला घेऊन आकाशमार्गे तो त्याच्या घरी गेला

         साक्षात दत्तात्रय ज्या बाळाचे रक्षण अहोरात्र करीत असतांना मायावी असुराने बाळाचे अपहरण कसे केले? भक्तांचे रक्षण, एकवार नाम उच्चारल्यानेही महासंकटातुन वाचवता त ज्यांच्या नामस्मरणाने मूळमायासुध्दा त्यांच्यापुढे नतमस्तक होते,त्यासमोर या असुरी मायेचा काय पाड? परमेश्वर असला तरी कांही नियमांचा त्याला आदर करावाच लागतो, त्याचमुळेच आणी प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात या इश्वरी नियमांच्या अधिन राहुन दत्तप्रभुंनी महामायेच्या मंत्राचा मान राखला.मात्र भक्तांना संकटातुन सोडवतोच,फक्त कांही काळ जावा लागतो. “श्रध्दा आणि सबूरी” साई बाबांच्या सुत्राचे हेच रहस्य आहे.

      हुंडासुराने पळवुन आणलेल्या बाळाला पत्नीच्या हाती देऊन त्याला कापुन शिजवायला सांगीतले.त्यावर तिने परोपरीने परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यावर तो अधिकच खळवळुन म्हणाला, याच्यावर दया दाखवुन माझ्या मृत्युला आमंत्रण देऊ कां? असे म्हणुन, तिला स्वतःसमोर शिजवायला सांगुन तो दुरर्‍या कामात व्यस्त झाला.हुंडापत्नीने ते मुल आपल्या विश्वासु एकला नावाच्या दासीच्या स्वाधीन करुन, कापुन व शिजवुन  न्याहारीला आणायला सांगीतले. दासीने ते बाळ बल्लवाच्या स्वाधीन करुन याला कापुन हुंडासुराला न्याहारी देण्याबद्दल सांगीतले. बल्लवाने मुलाला हातात घेऊन तलवारीचा वार त्याचेवर केला, तो काय आश्चर्य!बाळा ला इजा न होता त्या शस्राची धार बोथट होऊन तलवार लांब जाऊन पडली.मग बल्लवाने बाळाला जमीनीवर ठेवुन बकर्‍यासारखे धरुन जोराने वार केला, पण याहीवेळी खणखण आवाज होऊन ते खड्गच मोडुन पडले.बाळ मात्र हसत होते. दत्तांचे सुदर्शन बाळाचे रक्षण करीत होते, हे त्या बल्लवाला कसे बरे दिसणार? दुरुन पाहणार्‍या एकलेन दासीने बल्लवाच्या हातुन बाळ काढुन घेतले, व म्हणाली, याला कोण्या मोठ्या देवाचे पाठबळ आहे. याचे लक्षण मात्र राजपुत्रासारखे दिसताहेत. त्या हिंसका च्या अंतःकरणांत अंतर्यामी श्रीगुरु दत्तात्रय शिरुन, त्यांच्या प्रेरणेने बल्लवा ने गुप्तपणे बालकाला वशिष्ठांच्या आश्रमासमोर नेऊन ठेवले. आणि एका हरणाचे पाडस मारुन बेमालुम शिजवुन हुंडासुराला न्याहारीसाठी दिले. दैत्याने मोठ्या आवडीने शत्रूचे मांस मानुन खाल्ले. शत्रु संपवला. मृत्युवर विजय मिळवुन अमर झालो अशा समजुतीने तो निश्चिंत झाला.

        दुरर्‍या  दिवशी वशिष्ठमुनी नित्या प्रमाणे सुर्योदयापुर्वी घराबाहेर आले असतां दारापुढे त्यांना एक तान्हे बाळ रडत असलेले दिसला. बाळाला बघायला कुतुहलाने बाकी आश्रमवासी ही तिथे जमले.वशिष्ठांनी अंतर्दृष्टीने महात्मा दत्तात्रयांच्या वराने सोमवंशी आयुराजा व इंदुराणीचा बाळ असुन शुक्रशिष्य हुंडासुराने याला आपला शत्रु मानुन ठार करण्याच्या ऊद्देशाने पळवुन आणले. पण साक्षात परमेश्वरस्वरुप सर्वव्यापी भगवान दत्तच त्या अर्भकाचे रक्षण करीत असल्यामुळे त्याचा घात कसा होऊ शकेल? बाळाचे लक्षणे अत्युत्तम, राजचिन्हे व दैवी लक्षणांनी परिपुर्ण असुन लवकरच हुंडासुराचा वध करुन चक्रवर्ती सम्राट होईल अशी वशिष्ठमुनींनी बाळाची भविष्यवाणी केली.

          क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  श्री दत्तात्रय  !!!

भाग  –  ३५.

            त्या सुंदर, सुकुमार बाळाला वशिष्ठांनी सती अरुंधतीच्या सुपुर्द केले. त्रृषीश्रेष्ठ वशिष्ठांनी नामकरण करुन त्याचे नांव “नहुष” ठेवले.ॐ दत्तात्रय या मंत्राचा ताईत त्याच्या गळ्यात बांधला. आश्रमांत ‘नहुस’ मुनी वशिष्ठ व अरुंधतीच्या सानिध्यात चंद्रकले सारखा वाढु लागला. अकराव्या वर्षी क्षत्रिय वर्णानुसार  मुंज झाल्यावर त्याच्या अध्ययनाला सुरुवात झाली.चार वेद, सहा शास्रे, चौदा विद्या! चौसष्ट कला शिवाय अस्रशस्रातही प्रभुत्व मिळवले पाहुन प्रसन्न झालेल्या वशिष्ठ मुनींनी त्याल अस्ररहस्याचेही ज्ञान दिले.

        हुंडासुराने टाकलेल्या प्रस्वापिनी मंत्राची भूल सकाळी उतरल्यावर कुशीत बाळ नसल्याचे पाहुन इंदुमतीचा धीरच सुटला. छाती पिटत,तळमळत विलाप करीत दत्तप्रभुची आराधना केली. थोड्याच अवधीत राजालाही हे दुःखद वृत्त कळल्यावर तोही शोकमग्न झाला. स्वतःला सावरुन विवेकाने बळा वलेल्या दत्तप्रभुंची करुणा भाकु लागला  राजाला बोध देण्यासाठी प्रभुने नारदाला पाठविले. खुपसा उपदेश करुन पुत्र कसा नाहीसा झाला व आतां तो कुठे आहे हे सविस्तर सांगुन म्हणाले, हुंडा सुराचा वध करुन व लग्न करुन पत्नी सह लवकरच येऊन भेटेल. तुम्ही दत्तप्रभुवर श्रध्दा ठेवुन त्यांचेवर सोपवा. आणि नारदमुनी गुप्त झाले.आयुराजा व इंदुमतीने कोणतेही प्रापंचिक मागणे न मागतां, ” हेचि दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा”।। अशी त्या दोघांची आर्त भक्ती नारदमुनींच्या जिज्ञासु भक्तित परिणत झाली. त्यांच्या प्रार्थनेत तिव्र मुमुक्षा निर्माण झाली.

       संदीपकाने गुरु वेदधर्माच्या चरणी

विनम्र होऊन निवेदन केले की, नहुषाने हुंडासुराचा वध कसा केला? त्याची तिव्र  उत्सुकता पाहुन प्रसन्न झालेले मुनी पुढे सांगताहेत…. अर्भकावस्थेतच ज्याचे आई वडील,गणगोत्र दुरावले,त्या नहुषा चे  रक्षण वशिष्ठमुनींचे निमित्य करुन स्वयं दत्तप्रभुनेच केले. वेदांचा व धनुर्विद्येचा अभ्यास त्याने सारख्याच चिकाटीने केला. सर्व शास्रात निपुन झालेला नहुष वशिष्ठांच्या आज्ञेने शिकारीसाठी वनांत गेला असतां, त्याचे कौशल्य पाहुन देवांना खात्री झाली की, आतां हुंडासुराच्या जाचातुन सुटका नक्की होईल. आकाशवाणीद्वारे नहुषा ला कळले की, तो त्रृषीपुत्र नसुन सोम वंशीय आयुराजा व राणी इंदुमती यांचा मुलगा आहे. हुंडासुराचा वध करुन  त्याच्या कैदेत असलेल्या शिवकन्या अशोकसुंदरीशी विवाह करुन आई-वडिलांच्या दर्शनाला जा! श्रीदत्त प्रभुंच्या वरप्रसादाने हुंडासुरासहित सर्व

दैत्यांचा निःपात करण्याचे सामर्थ्र तुझ्यात असल्यामुळे निहित कार्य संपन्न कर! अशी आकाशवाणी ऐकुन नहुष संभ्रमात पडला.

       आश्रमांत येऊन मुनी वशिष्ठांना विचारल्यावर त्यांनी सविस्तर माहिती देऊन आकाशवाणीची पुष्टीच केली. वशिष्ठांचा आशिर्वाद ग्रहण केला व युध्दभुमीकडे प्रस्थान करतांना मनोमन नहुषाने श्रीदत्तप्रभुंचे स्मरण करुन त्यांच्या प्रसादासाठी प्रार्थना केली.रणां गणाभिमुख होऊन दैत्यनगरीवर वेगाने चालुन जाणार्‍या नहुषाच्या सहाय्या साठी इंद्राने सारथी मातालीसह ऊत्तम घोडे जुंपलेल्या सर्व आयुधे,शस्र व साधन सामग्रीने सज्ज रथ हुंडासुराला ठार करण्यास्तव पाठवला. तेवढ्यात देवसैन्य सुध्दा तिथे येऊन पोहोचले, नहुषाने मनोमन जाणले की, भक्तांच्या इच्छा पुरवणारा कल्पवृक्ष, योग्यांचा नायक दत्तप्रभुंचीच प्रेरणा आहे.

       हुंडासुरावर स्वारी करायला नहुष येत असल्याची वार्ता तुरुंगात बंदिस्त असलेल्या अशोकसुंदरीला समजल्यावर तिला अतिशय आनंद झाला. तिने सखी मार्फत निरोप पाठवल्यावर नहुषाने तिला आश्वास्त केले. हुंडाच्या नगरी बाहेर, नहुषाच्या अधिपत्याखाली देव सैन्य आल्याचे कळल्यावर हुंडासुराला कळेना की, ज्याला आपण शिजवुन खाल्ले तो नहुष जिवंत कसा? चौकशी केल्यावरही त्याला खरी गोष्ट कळलीच नाही. युध्दानंतर चौकशी करुं असा विचार करुन विधिवत अभिषेक करुन ससैन्य युध्दभूमीकडे निघाला.

             क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  श्री दत्तात्रय  !!!

भाग  –  ३६.

         शस्रास्रांनी सज्ज हुंडासुर रणांगणात पोहोचल्यावर समोर इंद्राच्या रथात तेजस्वी नहुषाला पाहुन त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. स्वतःला सावरुन आपल्या सेनापतींना आक्रमण करण्याची आज्ञा केली, महारथी, रथी, अतिरथी वअर्धरथी असे दैत्यवीर देवसेने वर तुटुन पडुन त्यांची दानादान केली.हे पाहुन नहुषाने हुंडासुराला आव्हान करुन इंद्राचे धनुष्याचा टणत्कार केला व दैत्यसेनेचा महाभयंकर संहार सुरु केला. असूरसैन्यात हाहाःकार माजलेला पाहुन हुंडासुर नहुषच्या समोर आला. हुंडासुर समोर दिसतांच त्याची निर्भत्सना करुन युध्दाला सुरुवात झाली.दोघेही एकमेकांवर मायावी अस्र शस्रांनी वार करुं लागले. दोघांचेही तुंबळ युध्द झाले.शेवटी नहुषाकडुन हुंडासुराचा वध झाल्याने देव व त्रृषी महाभयंकर दैत्याच्या वधाने हरखुन जाऊन नहुषाचा जयजयकार, पुष्पवृष्टी व अभिनंदन करुन इष्ट वर मागण्यास सांगीतल्यावर नहुषाने “आपली धर्मावर निरंतर श्रध्दा असावी” असा वर मागीतला. तथास्तु! म्हणुन सर्व देवगण

हुंडासुरापासुन मुक्त झाल्यावर आपली पदे पुनश्च ग्रहण करण्यासाठी स्वर्गात प्रयान केले.

       हुंडासुराच्या वधानंतर मुक्त झालेली अशोकसुंदरी आपल्या रंभा सखीसह हुंडाची सर्व संपत्ती घेऊन नहुषाकडे आली.व त्याला आपला स्विकार करण्याची विनंती केली. नहुष तिच्यासह वशिष्ठत्रृषींच्या आश्रमात जाऊन आणलेली सर्व संपत्ती त्यांच्या स्वाधिन केली.वशिष्ठमुनींनी त्यांचा विवाह लावल्यावर, आणखी वेळ न दवडतां पत्नीसह मातापित्यांची भेट

घेऊन त्यांच्या शोकाचे निवारण करण्या ची आज्ञा केली. जड अंतःकरणाने व साश्रु नयनाने अरुंधती माता व व त्रृषी वशिष्ठांचा निरोप घेतला. मातालीला रथ व रंभेला स्वर्गाकडे जायला सांगुन,स्वतः पत्नी अशोकसुंदरीसह घरी जाण्यार मार्गस्थ झाला.

        रतिमदनशी सौंदर्यात स्पर्धा करणारी सुन व पराक्रमी शूर पुत्र पाहुन राजा  आयु व इंदुराणी हरखुन गेले. काही दिवस लेक सुनेबरोबर आनंदात घालवले. शुभ मुहुर्तावर आयुराजाने नहुषाचा राज्यभिषेक करुन, राज्याची धूरा त्याच्यावर सोपवुन आयुराजा राणी इंदुमतीसह वानप्रस्थाश्रम स्विकारुन वनांंत निघुन गेले. वनांत दोघांनी श्रीदत्त प्रभूंची उपासना करुन सायुज्य मुक्तीचा लाभ करुन घेतला. पुढे महापराक्रमी नहुष सार्वभौम सम्राट होऊन मानवदेहा नेच इंद्रपदावर आरुढ होऊन स्वर्गावरही राज्य केले. दत्तभक्ताला अप्राप्य असे काय आहे?

         श्री दत्तलीलारुपी अमृत आकंठ पिऊनही संदीपक अविट श्रवणाने मन भरुन आले तरी श्रवणाची तहान वाढतच होती. वेदधर्मा गुरुंना भावपुर्ण विनवणी केल्याने त्यांच्या चित्ताला पाझर फुटला, ते  योगेश्वर दत्ताने यदुला सांगीतलेली ऊपनिषदांचे सार समावले ले रहस्यपुर्ण अवधूतगीता संदीपकाला सांगु लागले…..

        असुरांचे गुरु शुक्राचार्यांना संजीवनी मंत्राच्या प्रभावाने मृतास जिंवत करीत असत. देवगुरु बृहस्पतीं नी कचला शुक्राचार्यांचे शिष्यत्व पत्करण्यास पाठविले. कचाने सेवा भावाने त्यांचे मन जिंकले पण त्याचे कपट उघड झाल्याने दैत्यांनी त्याला ठार केले. शुक्रकन्या देवयानीचे मन कचावर जडल्याने तिने पित्याला जिंवत कराण्यास भाग पाडले. असे दोन तीन वेळा घडल्यावर असुरांनी त्याला मारुन त्याचे भस्म मधात मिसळुन शुक्राचार्यां ना खायला घातले. देवयानीच्या आग्रहा खातर प्रथम तिला संजीवनी मंत्रोपदेश

करुन मगच कचाचे पुनरुज्जीवन केले. मृत पिता शुक्राचार्यांना तिने मंत्राच्या सहाय्याने जिवंत केले. अशा तर्‍हेने तीन वेळा ऐकल्यामुळे संजीवनी मंत्र कचाने आत्मसात केला. त्याचे काम झाल्यावर शुक्राचार्यांकडे जाण्याची अनुमती मागीतली असतां, देवयानीने आपले मनोगत व्यक्त करुन विवाहाचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला असता, कच म्हणाला, शुक्राचार्यांच्या उदरातुन माझा जन्म झाल्यामुळे तू माझी बहिण व प्राणरक्षण केल्यामुळे माता होतेस, म्हणुन हा अधर्माचा विचार मनांतुन काढुन टाक, असे म्हणुन कचाने तिला नकार दिला.

             क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  श्री दत्तात्रय   !!!

अंतिम भाग  -३७.

         कचाच्या नकाराने संतापुन, तू ही मंत्रविद्या विसरुन जाशील असा देवयानीने त्याला शाप दिला. कचानेही “तुला ब्राम्हणेत्तर पती मिळेल” असा उलट शाप दिला. शुक्राचार्यांचा संजीवनी मंत्र षटकर्णी झाल्यामुळे निष्र्पभ झाला. कचाचा ऊद्देश सफल झाल्याने तो स्वर्गात परत गेला. एकदा दैत्यराज वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठा व शुक्राचार्याची कन्या देवयानी ह्या दोघी मैत्रीणी वस्रे काढुन विहिरीत जलक्रीडा करीत असतां कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने घाईघाईने शर्मिष्ठेच्या आधी येऊन चुकीने देवयानीने तिचे वस्र नेसली. ते पाहुन संतापाने चिडुन शर्मिष्ठे ने देवयानीला विहिरीत ढकलुन दिले व तशीच घरी निघुन गेली. योगायोगाने राजा ययाती तिथुन जातांना  देवयानीचा रडण्याचा आवाज ऐकुन त्याने आपले अर्धे वस्र तीला नेसण्यास देऊन बाहेर काढले.वर आल्यावर देवयानी म्हणाली, तुम्ही मला बाहेर काढल्यामुळे,मी ब्राम्हण कन्या असुनही तुमची मी पत्नी झाली,मला तसा शाप आहे.शुक्राचार्यां नी त्यांचा यथाविधी विवाह लावून दिला वृषपर्वाला हकीकत समजल्यावर शर्मिष्ठेसह येऊन त्याने माफी मागीतली पण! शर्मिष्ठा आपली दासी व्हावी ही अट देवयानीने घातली. ययातीने दोघीं नाही घेऊन राजधानीला परततांना त्रिकालयज्ञ शुक्राचार्यांनी  शर्मिष्ठेसोबत शरीरसंबंध न ठेवण्याची ययातीला ताकिद दिली. यथावकाश देवयानीला

यदु व तुवर्सु असे दोन पुत्र झालेत. या काळात राजकन्या देवयानीची दासी झालेल्या शर्मिष्ठेच्या विनंतीवरुन, तिची करुणा आल्याने किंवा तिच्या रुपाकडे आकृष्ट झाल्याने तिलाही देवयानीच्या परोक्ष ययातीपासुन तीन पुत्र झालेत.ही  गोष्ट शुक्राचार्यांना कळल्यावर ” त्यांनी संतापुन “तू  लगेच जर्जर म्हातारा होशील” असा शाप दिल्याबरोबर राजा ययाती जर्जर म्हातारा झाला. परंतु त्याच्यातील कामवासना मात्र धगधगत होती.देवयानीच्या मनातील सुध्दा भोग वासना शमलेली नव्हती. त्यामुळे शुक्रा चार्यांकडे त्याचे तारुण्य परत देण्याची  विनंती केल्यावर राजाच्या एखाद्या पुत्रा ने जर त्याचे वार्धक्य घेतले तर, राजाला तारुण्य प्राप्त होईल,असा उपाय सांगीत ल्यावर चारही पुत्रांनी नकार दिल्यावर धाकटा पुत्र पुरुने मात्र वडीलांच्या सुखा साठी आपल्या यौवनाचा त्याग केला. राजाने चारही पुत्रांचे छत्र आणि सिंहासनाचा अधिकार काढुन पुरुलाच यौवराजपद दिले.पण पुरु बिचारा म्हातारा होऊन दिवस कंठु लागला.

       पुरुने बहाल केलेल्या यौवनाचा १०० वर्षे ऊपभोग घेतल्यावर ययातीचे मन विषयभोगाला उबगले. पुरुचे तारुण्य त्याला परत करुन पुरुला राज्या वर बसवुन देवयानीसह तो आत्मकल्या णाच्या शोधात वनांत निघुन गेला. आपण जेष्ठपुत्र असुनही दासीपुत्र पुरु  सर्व वैभव भोगत आहे हे पाहुन विवेकी  यदुच्या मनांत वैराग्य निर्माण होऊन मोक्षाचे साधन करण्याकरितां वनांत निघुन गेला. यदु बालपणापासुनच दत्त भक्त असल्यामुळे दत्तप्रभुंचे त्याच्यावर लक्ष होतेच. यदु वनांत संचार करीत असतांना दत्तप्रभु अवधूतरुपाने त्याच्या समोर प्रकटल्याबरोबर यदुने त्यांना भक्तीभावाने नमस्कार करुन उपदेश करण्याची त्यांना विनंती केली. दत्तप्रभु म्हणाले मोठ्या प्रयासाने चोविस गुरुं पासुन मिळालेले ज्ञान तुला सांगतो.ब्रम्ह स्वरुप ज्ञानाचे निदिध्यासन केल्यास तुला साक्षात्कार होईल. यालाच “वृत्तव्याप्ती” म्हणतात. याने अज्ञान नष्ट होऊन जन्ममरणाच्या फेर्‍यातुन सुटका होऊन मोक्ष मिळेल. दत्तगुरुंनी  चोवीस गुरुंपासुन मिळालेले ज्ञान विस्तारपुर्वक यदुला कथन केले. हे सर्व ज्ञान ओळखुन हे साक्षात दत्तप्रभुच आहे, याची त्याला खात्री पटली. यदु अत्यंत विनम्रपणे त्यांना म्हणाला, मी आपण दिलेल्या ज्ञानदानाने पवित्र झालो. आतां कशाचाही मोह, इच्छा उरलेली नाही. ब्रम्हा,विष्णु महेश या तिन्हीही रुयांचा अंतर्भाव असलेल्या या रुपाची आराधना करीत आपल्या चरणी उर्वरीत आयुष्य व्यतीत करीन. आपल्या उपदेशाने मनातले सर्व द्वैत नष्ट झाले, असे म्हणुन यदु दत्तचरणी लीन झाला.

     विष्णुरुपाने जगाचा सांभाळ करणार्‍या, ब्रम्हदेवरुपाने सृजन आणि शंभुरुपाने जगाला तारणार्‍या मनोहर दत्तप्रभु तुम्हाला त्रिवार वंदन असो…

 श्रीगुरुदेव दत्त! श्रीगुरुदेव दत्त! श्रीगुरुदेव दत्त।।

            समाप्त
संकलन – मिनाक्षी देशमुख.

                         

श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading