श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग २, (६ ते १०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

श्री दतात्रय

भाग  –  ६.

       पुराणांत भूलोकाची विभागणी सात द्वीपांत केलेली आहे. पृथ्वी म्हणजेच जम्बुदीप,लक्षदीप,शाल्मल, कुश,क्रौंच, शाक, पुष्कर! ही सर्व द्वीपे मध्यस्थित मेरुपर्वताभोवती कमळाच्या पाकळ्यासारखी रचलेली आहे. ह्या सर्व भाकड कल्पना वाटत असल्या तरी पृथ्वीच्या कांही भागात( उदा. बर्म्युडा त्रिकोण) मोठमोठी जहाजे, विमाने अचानक गडप झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

         स्वप्न संपताच शीलधरेला जाग आली. स्वप्नातल्या प्रभुदर्शनाने ती आनंदाने मोहरुन तिने ते स्वप्न राजा कृतवर्माला सांगीतल्यावर त्यांनाही आनंद झाला. लवकरच राणीला दिवस गेलेत. यथावकाश ऊच्च कोटीचे पांचही ग्रह असतांना रात्री शुभवेळी तीने पुत्ररत्नाला जन्म दिला. राजाने ज्योतीषाला पाचारण केले, ज्योतीषाने सांगीतले की, हा बालक मोठा भाग्यवान असुन दत्तप्रभुंची कृपा संपादन करेल, तपोबलाने पवित्र होऊन त्रैलोक्यात याची किर्ती,सुयश पसरेल. याच्या नामजपाने हरवलेली अथवा नष्ट झालेली वस्तु परत मिळेल,” कार्यवीर्यार्जुनी नामराजा बाहुसहस्रवानम्। तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभते।” (या मंत्राचा आजही अनेकांना प्रचीती येते.) वेदशास्रसंपन्न होऊन अनंतव्रताच्या प्रभावाने सप्तदीपां कित पृथ्वीचे सार्वभौम राज्य पंच्याऐंशी हजार वर्षे करेल.सूर्यव्रताच्या फलस्वरुप हा निरोगी,जितेंद्रिय, नित्य विजयी! व सर्वमान्य होईल. सोळाव्या दिवशी बाळा चे नांव अर्जुन ठेवले. कृतवीर्यचा मुलगा म्हणुन कार्तवीर्य अर्जुन, पुढे श्रीदत्ताच्या “वराने” सहस्र बाहु लाभले म्हणुन सहस्रार्जुन अशी त्याची नांवे आहेत. १०० वर्षाची आयुमर्यादा ही कलीयुगा साठी, कृतयुगात ती ६० हजार वर्षे होती प्रत्येक युगाचे जीवशास्र पुराणानुसार वेगवेगळे असतात.

       यथावकाश तो राजगुरु गर्गमुनींकडु न सर्व शास्रांचे शिक्षण घेत असतांनाच  कृतवीर्याचा मृत्यु झाल्यामुळे सर्वांनी त्याला राजधूरा सांभाळण्याची गळ घातली, पण त्याने स्पष्ट नकार दिला. अर्जुनाचा निश्चय ऐकुन गर्गमुनींना दिलेल्या शिक्षणाचे साफल्य झाल्याची त्यांना साक्ष पटली. ते आनंदुन अर्जुना ला म्हणाले, तू घेतलेला निर्णय योग्य आहे.योगाभ्यासाने अनेक देह धारण करतां येईल. त्यामुळे कोणाच्याही मदतीशिवाय एकटाच राज्यकारभार करुं शकशील. मनाच्या वेगाने संचार करुन अंतर्ज्ञानाने सर्व जाणशील.मग अपर्‍याध्याला दंड व निरपर्‍याध्याला शिक्षा होणार नाही.तू दत्तप्रभुंना शरण जा….

         अनुसयेच्या गर्भातुन प्रकटलेले दत्तात्रय नावांचे रत्न सह्यांद्रीच्या शिखरा वर योगीश्वर नांवाने त्यांचा आदर करतात. विश्वाचा रचियता अत्रिपुत्राची आराधना कर…. जंभासुराने प्रत्यक्ष इंद्रा ला स्वर्गातुन हाकलल्यावर, इंद्र दत्ताला शरण गेल्यावर इंद्राला त्याचे स्थान मिळवुन दिले. गर्गमुनी पुढे म्हणाले,दत्त प्रभुंना प्रसन्न करणे दुष्कर असले तरी, भक्तिभावाने श्रध्दापुर्वक नुसते स्मरण केले तरी ते दर्शन देतात.

      गर्गमुनींच्या उपदेशाचा अर्जुनाच्या मनावर तात्काळ व तीव्र परिणाम झालाआणि श्रध्दापुर्वक दत्तात्रयांची आराधना करण्याचा निश्चय केला व तो दत्तदर्शनाच्या अतिव ऊत्सुकतेने सह्यांद्री ची वाट धरली. नंदनवनाप्रमाणे शोभणा र्‍या आश्रमात येऊन अत्रिनंदन दत्ताचे दर्शन घेऊन तो ऊल्हासीत झाला. हे सर्व वर्णन गुरु वेदधर्मांनी संदीपकाला कथन केले.

      योगभ्रष्ट पुत्राने वडिलांना जे सांगीतले तेच वेदधर्मा संदीपकाला कथन करीत होते.अर्जुन सह्याद्रीवर गेल्यावर तीथे व्रज,अंकुश, पताका, आणि कमळ या चिन्हांनी सुशोभित दत्त प्रभुंचे ठसे पाहून मन स्तब्ध होऊन अंगावर सरसर काटा आला.व  इंद्रियाची चळवळ थांबली. अर्जुनाचे अंतर्बाह्य भान हरपुन आपपर द्वैत निमाले.योग्यां नाही अगम्य अवस्था त्याला प्राप्त झाली

!!  श्री  दत्तात्रय  !!

भाग  –  ७.

      भक्तिप्रेमाणे भारलेला  अर्जुन गर्ग मुनींच्या वचनाची आठवण ठेवत अविचल मनाने,भावाने दत्ताची सेवा करुं लागला. दत्तप्रभुंनी अर्जुनाला जायला सांगीतल्यावरही तो जात नाही असे पाहुन त्याला मारण्याची धमकी देत.परंतु अर्जुन त्यांची अविरत सेवा करीत असे. दत्तसेवेने त्याचे अज्ञान मुळासकट नष्ट होऊन प्रभुविषयीचे प्रेम वाढु लागले. एकदा अर्जुनाची परीक्षा पाहण्यासाठी केवळ दृष्टीक्षेपाने त्याचे दोन्ही हात तोडुन त्याला पळवुन जायला सांगीतल्यावर गर्गमुनींच्या शिकवणीचे स्मरण करुन तो नम्रपुर्वक म्हणाला, देवा! असे बोलुन माझे मनोधैर्य खच्ची करता का? मला भूल पाडता? विधिनिषेधांचे बंधन आपल्या ला असुच शकत नाही. म्हणुन हा देह राहो अथवा जावो, तुमच्या स्वरुपातच चित्त स्थिर होऊन विपरीत भावना न येवो हीच प्रार्थना!

      पुर्वपीठीका म्हणुन दत्तात्रयांनी त्याचे बाहु तोडले, कारण पुढे त्याला सहस्र बाहु द्यायचे होते, अर्जुन क्षत्रिय!  बाहु तोडल्यावर दुःख होणे सहाजिकच होते, परंतु चित्त शुध्द झालेल्या अर्जुना चा सेवा करण्यांत थोडाही खंड पडला नाही. त्याच्या बोलण्यातुन प्रकाशणा र्‍या ज्ञानाग्निच्या तेजाने दत्तप्रभु प्रसन्न झालेत. आणि हवा तो “वर” मागण्यास सांगीतल्यावर, तो म्हणाला, प्रभू मला सन्मार्गाने जाऊन धर्म,अर्थ, काम हे त्रिविध पुरुषार्थ एकमेकांचा छेद न करतां सिध्द व्हावेत. माझ्या एकट्याच्या बळावर प्रजापालन करण्याचे सामर्थ्य द्यावे. आठही सिध्दी प्राप्त व्हाव्यात.हवे तिथे जाण्यासाठी गती अकुंठीत असावी. सदैव सज्जन, पुज्यनीयांची संगत लाभावी. सर्व भूमंडळात मी अजातशत्रु असावा. आपल्या चरणांचे नित्य स्मरण असावे. दत्तप्रभु म्हणाले, तू मागितलेले सर्व “वर” प्राप्त होतील. पृथ्वीवरील द्वीपाचा तू अधिपती होशील लागलीच दोन सुंदर भुजा त्याला फुटल्या. प्रभू म्हणाले,तु आतां महिष्पतीला जाऊन विधियुक्त अभिषेक करण्याची त्याला आज्ञा केली.

      दत्तप्रभुंची आज्ञा शिरोधार्य मानुन,दत्तप्रभुंचे रुप डोळ्यात,मनांत साठवत कसाबसा महिष्पतीच्या वाटेला लागला. दत्तचरणांपासुन दूर जातांना झालेली अर्जुनाची अवस्था “कन्या सासुराशी जाये, मागे परतुनी पाहे। तैसे झाले माझ्या जीवा।। तुकोबांच्या अभंगा त वर्णिला प्रमाणे झाली.

         अशा रितीनेअर्जुन रेवातीरी महिष्पतीला आल्यावर समारंभपुर्वक सर्व मान्यवर सामोरे गेलेत. शास्रविधि नुसार वेदमंत्रघोषात त्याचा अभिषेक संपन्न झाल्यावर सर्वच स्तरांतील लोकांना दानधर्म व पूजन करुन सर्वांचे आशिर्वाद घेतले. अनेक देशांच्या राजां नी करभार दिला.त्याने दवंडी पिटवली की, माझ्याशिवाय शस्र धारण केल्यास तो मृत्युदंडास पात्र होईल. नंतर कार्तवीर्याने सर्व मंत्र्यांची पदे स्वतःच धारण करुन एकटाच अनेक रुपं धारण करुन एकटाच रक्षण करुं लागला. राजा अर्जुनाने यज्ञादिकांच्या अनुष्ठानांनी देव  ब्राम्हणांना तृप्त केले. न्यायाने प्रजेचे पालन करत तो त्रैलोक्यात संचार करीत असे. दत्तकृपेच्या बळावर एकछत्री शासन सुरु केले.

       ज्या दिवशी दत्तप्रभूचे दर्शन झाले त्या माघ वद्य अष्टमीला अनघाष्टमीचे व्रत करीत असे. यज्ञ,दान,तेज,योग,शौर्य आणि विजय यांत कार्तवीर्याची बरोबरी करणारा कोणीही राजा झाला नाही.

        एकदा कार्तवीर्य आपल्या सहस्र पत्नींसह नर्मदातीरी क्रीडा करीत असतांना नारदांकडुन अर्जुनाची  किर्ती एकुन रावण त्याच्याशी युध्द करण्यांस आला असतां, फक्त डोळ्यांच्या इशाराने आपल्या स्रीयांकरवी बांधुन टाकले, व खेळणे म्हणुन आपल्या मुलांच्या स्वाधीन केले. शेवटी कुंभकर्णाने सहस्र अर्जुनाला विनवणी करुन रावणाची सुटका केली. ब्रम्हदेवांच्या वराने रावण त्या काळी देवादिकांनाही अनावर रावणाचा पराभव केल्यामुळे कार्तवीर्या चा त्रैलोक्यात दरारा पसरला.

!!!   श्री  दत्तात्रय   !!!

भाग  –  ८.

           योगीश्वर दत्तात्रयांच्या कृपेने महाप्रतापी शूर चक्रवर्ती कार्तवीर्य अर्जुनाने ८४ हजार वर्षे राज्य केले.तो प्रतिदिन माहुरला दत्तदर्शनाला येऊन धर्मा बद्दल विचारांचे आदानप्रदान करीत असे.एकदा रात्री शय्येवर पडल्या पडल्या त्याच्या मनात विचार आला, भगवान दत्तात्रयांनी प्रसन्न होऊन “वर” दिला आणि माझ्या दुर्दैवाने नाशिवंत, क्षणभंगुर, निष्र्कीय, शुध्द, सर्वव्यापी तत्व जाणुन न घेता, राज्य मागुन घेतले, यात कोणता मोठा पुरुषार्थ केला? जन्म मरणाच्या फेर्‍यातुन मुक्ती न मागतां डोळस असुनही या राज्यरुपी खोल अंधार्‍या विहिरीत पडलो. कोण कुणाचे मृत्युनंतर सर्व मिथ्याच! असा विरक्तीचा भाव जागृत झाल्यावर, त्या दयाघन करुणाकर परमेश्वराला शरण गेल्या शिवाय आतां तरणोपाय नाही.

       याप्रमाणे विरक्त अर्जुन सह्यांद्रीवर आले, त्यावेळी दत्तप्रभु ध्यानात बसलेले होते.त्यांना जागृत करण्यासाठी अर्जुना ने तनमन वाणीने,भक्तीभावाने भजन केले, तरीही सर्वांतरी प्रभुचे ध्यान भंगले नाही. दुःखी,कष्टी अर्जुनाने कांहीही खातापिता सद्गदित होऊन श्रीदत्तांच्या चरणी दृष्टी लावुन स्तवन सुरु ठेवले,

      राज्य,संसार,विषयभोगापासुन उपरत होऊन मोक्षाच्या इच्छेने व त्याची मुमुक्षा व्र होण्यासाठी,वैरागय बळकट व त्याच्या विवेकाला धार आणण्यासाठी, चित्तला स्थैर्य येण्यासाठी ही परीक्षा घेत ध्यानस्थ असण्याचे नाटक सद्गुरु करीत होते.तो अनेक प्रकाराने त्यांना आळवत,विनवित प्रार्थना करीत या मोह माया संसारातुन मुक्ती मिळण्यासाठी काकुळतेने आळवुं लागला,तरी प्रभू दर्शन देत नसल्यामुळे भक्तिच्या आवेगा ने कार्तवीर्य मुर्च्छित झाला.रात्री मुर्च्छीत झालेला कार्तवीर्य सकाळी सावध झाला परत आळवणी, स्तुती करत म्हणाला,हा आपला अर्जुन उपाशी तिष्ठत आहे, आणखी उपेक्षा न करतां आतांतरी कृपा दृष्टी करावी.

     अश्या उपेक्षिलेल्या कार्तवीर्याला उदास पाहुन आश्रमातील शांततपा मुनीं  ना त्याची दया आली. त्यांनी एकप्रकारे त्याची वकीलीच केली. कृपेला पात्र असलेल्या संतांनी मध्यस्थी केल्यावर देव सुध्दा त्यांचा शब्द व्यर्थ जाऊ देत नाही. किंचित हसुन श्रीदत्तांनी विचारले काय हवय त्याला? त्याच्या मागणी प्रमाणे सगळ्या सिध्दी तर दिल्यात! हे ऐकुन अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आले, देवा! परमेश्वरा! तू दिलेली शिक्षा पुरे ना! तू अंतर्यामी असुन माझे मनोगत जाणतोसच, आतामात्र माझ्यावर कृपा करावी, पुरे झाली ना उपेक्षा! अर्जुनाचा उरलासुरला अभिमान गळून जावा या उद्देशाने शांततपा मुनींच्या विनंतीनुसारा त्यांनी उपरोध गर्भीत ठेवुन अर्जुनाशी संवाद आरंभला. राजा अर्जुनाने दत्तप्रभुं ना विनंती केली, देवा! माझे अपराध पोटात घालुन आत्मज्ञानाचा बोध करावा. हे प्रभो! आपल्या कृपेने संपुर्ण त्रेलोक्याचे सुख,समृध्दी सर्व कांही मिळाले,पण हे भोग भोगुन मन विटले आहे. तरी हे माझ्या गुरुदेवा!कांहीही करुन या संसारदरीतुन काढुन उध्दारावे! 

      वेदधर्मा गुरु संदीपकाला पुढे सांगताहेत…. कार्तवीर्याची प्रार्थना ऐकुन दत्तात्रय त्याला समजावत म्हणाले, तू सात्विक असुन दैवी संपत्ती चा धनी आहेस. पुर्व कर्मानुसार व माझ्या वरदानाने सर्व भोग भोगलेलै आहेस,माझ्या सेवेने सांप्रत हे वैराग्य प्राप्त झालेले आहे. मुक्तीसाठी आवश्यक स्वस्वरीपाचे ज्ञान हवे असेल तर, शास्रांचे तत्वे जाणुन द्वैतदृष्टी सोडुन समन्वयात्मक परिशीलन केल्यास सर्व शास्रांचे तात्पर्य एकच आहे हे लक्षात येते. यासाठी तुला एक आख्यान सांगतो

!!! श्री  दत्तात्रय  !!!

भाग   –  ९.

      एकदा इंद्रदेव, देवगुरु बृहस्पतींच्या दर्शनाला गेला असतां अनेक शिष्य शास्राभ्यास करतांना  दिसले. कोणी चार्वाकाच्या लोकायत शास्राचा! कोणी कामशास्राचा,शिल्पशास्राचा, कोणी न्यायशास्राचा अभ्यास करतांना पाहुन देवर्षी इंद्राने आक्षेप घेतल्यावर बृहस्पती म्हणाले, सर्व शास्रांचे तात्पर्य अंतीम लक्ष्य एक परमेश्वरच आहे. इंद्राचे मन निःशंक होण्यासाठी त्यांनी सांगण्यास सुरुवात केली…..

      कपिला नगरीत वास्तुशास्राचा उत्तम जाणकार, तज्ञ विधिज्ञ नांवाचा शिल्पकार होता. शास्राधाराने लोकांची  आधी व्याधी, अपमृत्यु पासुन संरक्षण करणारी उत्तम घरें बांधण्यात तज्ञ होता.

जीवनभर परोपकारी कार्य करुन वृध्दप काळी मरण पावला. दुसर्‍या जन्मात राजा होऊन जन्माला आला. याही जन्मात त्याने लोककल्याणार्थ पुण्य करीत आयुष्य व्यतीत करुन मरण पावला. परत त्याचा ब्राम्हणकुळात जन्म झाला. यागकर्मे, ज्ञानयोग सिध्द करुन ऊपरती,वैराग्य,ज्ञान संपादन होऊन मुक्ती दासी होते हे सत्य त्याने अनुभवले. अशा रितीने जीवन मुक्त  झालेला ब्राम्हण देवाचा भक्त झाला.  

अनासक्त वृत्तीने देहाचे प्रारब्ध भोगुन देहत्याग करुन तो देहमुक्त झाला.

      दत्तप्रभु अर्जुनाला पुढे सांगु लागले.

गोदातीरी राहणार्‍या वेदशर्मा नांवाच्या ब्राम्हणाला सुशील नांवाचा मुलगा होता. तो नांवाप्रमाणेच शीलवान,उत्तम अचार पाळणारा असुन गायत्री मंत्र जप करीत असे. पण दुर्दवाने त्याला सात पिशाच्च्यांनी पछाडले होते. वेदधर्माने अनेक उपाय केले. एकदा द्रत्तप्रभु भिकार्‍याच्या वेशात त्याच्या समोर आले, पण वेदधर्मा महान दत्तभक्त असल्यामुळे त्या वेशातही ओळखले. दत्तप्रभु  प्रसन्न होऊन सुशीलला पिशाच्च्यापासुन मुक्ती केली.

      सह्यांद्री पर्वताजवळ माहुरगांवी विष्णुदास शर्मा नांवाचा कर्मनिष्ठ गृहस्थाश्रमी  आपल्या सुस्वभावी, सुशील पत्नीसह राहत होता.विष्णुदत्त दत्तप्रभुचा भक्त होता. तो निष्ठेने व विवेकाने दैनंदिन कः वेळच्यावेळी करीत असे. त्याच्या अंगणांत असलेल्या पिंपळाच्या झाडावर एका ब्रम्हराक्षसाचा वास होता. विष्णुदत्त जेवायच्या आधी पिंपळाच्या झाडाखाली भूतबळी ठेवीत असे. रोज दिलेल्या शुध्द अन्नाच्या बळी सेवनाने ब्रम्ह राक्षस प्रसन्न होऊन एके दिवशी त्याच्यासमोर प्रकट होऊन वरदान मागायला सांगीतले.ब्राम्हणाने पत्नीच्या सल्ल्याने दत्तप्रभुच्या भेटीची मागणी केली. ब्रम्हराक्षस म्हणाला, अरे बापरे! ज्यांचे नांव ऐकल्याबरोबर आम्हा भूतांची भितीने गाळण उडते, त्यांचे दर्शन तू मागतो आहेस? बरं ठीक आहे, तुला दिलेला शब्द पाळायलाच पाहिजे! तो योगीराज दृढनिश्चयी असणा र्‍यालाच भेटतो. ब्रम्हराक्षसाने दोन वेळा त्याला दत्तप्रभूचे ओंगळ रुपात दर्शन देववले, पण ब्राम्हण ओळखुं शकला नाही.तिसर्‍यां वेळी मात्र प्रभूंना ओळखलेही आणि त्यांच्या परीक्षेत उतरला पण!

      ब्राम्हणाने त्यांना घरी जेवणाचे आमंत्रण दिल्यावर, ते म्हणाले, माझ्या पंगतीला योग्य ब्राम्हण असेल तरच मी जेवेन! विष्णुदत्तने अट मान्य करुन पत्निला सर्व वृत्तांत सांगीतल्यावर तीने आनंदाने व उत्साहाने चारी ठाव स्वयंपाक केला. तेवढ्यांत दत्तप्रभु अवतरले. त्यांना बसायला तिने आसन देऊन तु बाहेर येऊन भगवान सुर्य नारायणांची प्रार्थना करीत म्हणाली, हे! सर्वात्मक कश्यपपुत्रा! आपण सौम्य व  ब्राम्हणाचे रुप धारण करुन अत्रिंनदना सोबत पंगतीला यावे. सुर्य ब्राम्हणरुपात  भोजणास बसल्यावर दत्तांनीाआणखी एका ब्राम्हणाची मागणी केली. तिने अग्निदेवतांची विनवणी केल्यावर तेही ब्राम्हणरुपात पंगतीला आलेत. अशाप्रकारे तिनही देव तृप्त झाले.

!!!!   श्री  दत्तात्रय   !!!!

भाग  –  १०.

         श्रीक्षेत्र नरसोवाडीजवळ कृष्णा काठी शिरोळ गांवात श्रीमनृसिंह सरस्वती स्वामींच्या भोजनपात्राचे मंदिर आहे, ते भोजनपात्र म्हणजे एक सपाट दगड असुन त्यावर श्रीगुरुंच्या हाताचे बोटें उमटलेली आजही पहायला मिळतात. या शिरोळे गांवात आचारनिष्ठ दरिद्री ब्राम्हण आपल्या साध्वी पत्नीसह राहत होता. दोघेही दत्तप्रभुंचे भक्त होते.एकदा ब्राम्हण बाहेर गेला असतां मध्यान्हसमयी श्रीगुरु भिक्षेसाठी त्यांच्या घरी आले. घरांत दुसरं कांहीच नसल्याने त्यादिवशी तिने ज्वारीच्या कण्याच केल्या होत्या. वाढायला पात्र पण नव्हते

 त्यामुळे ब्राम्हण येईस्तोवर थांबण्याची विनंती केली. ते म्हणाले आम्हाला रुची चे कांही महत्व नाही, जे असेल ते वाढ!  तीने पात्र नसल्याचे सांगीतल्यावर, श्रीगुरुनी जवळच पडलेली शीळा आणुन ती शीळा स्वच्छ धुतल्यावर त्यावर  एक ॐकारयुक्त अष्टदल कमळ काढुन त्यावर वाढायला सांगीतले.यती रुपाने आलेल्या दत्तप्रभूंनी त्या कण्या खायला सुरुवात केली. ती त्यांना म्हणाली, आपण विदुराघरच्या कण्या खाल्ल्या तसेच आमच्यि दरिद्री घरच्या कण्या गोड करुन  घ्याव्यात…. 

     तृप्त झालेले श्रीगूरु निघुन गेल्यावर ब्राम्हण घरी आल्यावर झालेली हकीकत पत्नीकडुन ऐकली. देवाचे बोटे उमटले ले पात्र पाहून कांही अनुष्ठान नसतांना, वेद अध्ययनाचा अधिकार नसतांना केवळ भक्तिच्या प्रभावाने आपल्या पत्नीने इश्वराला तृप्त केले, अशा पत्नीच्या सहवासाने स्वतःला धन्यता मानीत, त्या भोजनपात्राची नित्य पुजा करुन कृतकृत्य झाला.

        प्रतिष्ठान( पैठण)  नगरीत एक ब्राम्हण होता,त्याला एक मुलगा जो पुर्वजन्मीचा योगभ्रष्ट होता, शहाणा असुनहु वेडेचाळे करीत असे. वडिलांनी अनेक उपचार केलेत, पण कांही सुधारणा झाली नाही. त्याला मलमुत्रा ची शुध्द नव्हती की, चांगल्या वाईटाचे भान नव्हते, आठ वर्षाचा झाल्यावर त्याची मुंज लावुन कानांत गायत्री मंत्र सांगीतला, पण मार खाऊनही त्याने गायत्री मंत्राचा जप केला नाही. भागवत पुराणात योगभ्रष्ट जडभरताचे उदाहरण प्रसिध्द आहे.

        दत्तभक्त विष्णुदत्तची किर्ती त्या दुःखी ब्राम्हणाच्या कानावर आल्याने मुलाला घेऊन त्याचे आई वडिल विष्णुदत्ताकडे येऊन मुलाची अवस्था कथन केली. मुलाला पाहिल्याबरोबर तो ब्रम्हनिष्ठ असल्याचे ओळखले. मुलाला इथेच ठेवायला सांगुन निश्चिंतपणे जायला सांगीतले. साधुच साधुला ओळखु शकतो. विष्णुदत्तांनी त्या मुला ला असे वागण्याचे कारण विचारल्यावर तो  म्हणाला, हे विप्रवर्या! माझे आत्मस्वरुप फक्त तुम्हीच एकटे जाणतां! मुळात माझा जन्मच मिथ्या आहे.अक्रीय आहे, अस्तित्व,चैतन्य आणि आनंदस्वरुप आहे. प्रलयकाळी सर्व विश्व व्यापणारा एकटा मीच आहे. मला भोग्यच नाही तर  भोगाची रुची कशी असेल? देश,काळ,वस्तु या सर्वांनाच व्यापुन राहणारा मी असल्यामुळे मला ना परिच्छेद ना भेद!

,        त्या मुलाचे बोलणे ऐकुन विष्णुदत्तांनी प्रेमाने त्याला छातीशी लावत म्हणाले, तू खरा सन्यासी आहेस. पण! कुणीही पुरुष कधीही कर्माविना राहु शकत नाही. कारण त्रिगुणात्मक प्रकृती (माया) त्याला कर्म करायला भाग पाडतोच. हा भगवद् गीतेचा सिध्दांत आहे. विष्णुदत्तांनी त्या योगभ्रष्टाला नेमकी स्थिती व पुढचा साधनमार्ग व्हावा या उद्देशाने ज्ञानाच्या सात भूमिका व निष्काम कर्मयोगाची प्रभाव समजावुन दिल्यावर, त्या मुलाने आपले वेडे चाळे बंद केले.तो शांत होऊन घरी गेल्यावर त्याच्या आईवडिलां ना अतिशय आनंद झाला.

       श्रीदत्तप्रभु कार्तवीर्य अर्जुनाला सांगतात, शास्राच्या अभ्यासाने परोक्ष ज्ञान मिळवुन अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव मिळतो. दत्तप्रभुंचा सविस्तर उपदेश ऐकुन, अर्जुन त्यांना वंदन करुन म्हणाला, या सह्याद्री पर्वतावर आपले दर्शन झाल्याने मी धन्य तर झालोच पण वैराग्यही प्राप्त झाले आणि शास्रतत्व सुध्दा समजले.

                         

श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading