आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय ८ वा अक्षरब्रह्मयोगः
शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 8 AKSHRBRAMHA Yoga:
Sartha Dnyaneshwari Adhyay 8 AKSHRBRAMHAYOG:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ अष्टमोऽध्यायः ॥ अध्याय आठवा ॥ अक्षरब्रह्मयोग ॥
सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ अष्टमोऽध्यायः ॥ अध्याय आठवा ॥ अक्षरब्रह्मयोग ॥
अध्याय आठवा
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अर्जुन उवाचः
किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥8. 1॥
1-8
मग अर्जुने म्हणितले । हा हो जी अवधारिले । जे म्या पुसिले । ते निरूपिजो ॥1॥
मग अर्जुन म्हणाला, ” अहो देवा! ऐकले का ? मी जे विचारले ते मला स्पष्ट करून सांगा.
2-8
सांगा कवण ते ब्रह्म । काइसया नाम कर्म । अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥2॥
ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव, अथवा अध्यात्म कशाला म्हणतात,
3-8
अधिभूत ते कैसे । एथ अधिदैव ते कवण असे । हे उघड मी परियेसे । तैसे बोला ॥3॥
अधिभूत कसे, आणी या जगात अधिदैवत कोण आहे, हे मला नीट समजेल असे सांगा. “
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ 8. 2 ॥
4-8
देवा अधियज्ञ तो काई । कवण पा इये देही । हे अनुमानासि काही । दिठी न भरे ॥4॥
” देवा, अधियज्ञ तो काय, व तो या देहांत कोणता, हे अनुमानाने नीट लक्षात येत नाही.
5-8
आणि नियता अंतःकरणी । तू जाणिजसी देहप्रयाणी । ते कैसेनि हे शारंगपाणी । परिसवा माते ॥5॥
हे शांर्गपाणि, ज्यांनी अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे, त्यांना अंतकाली तुम्हाला कसे ओळखता येते, हे मला चांगल्या रीतीने समजवा. “
6-8
देखा धवळारी चिंतामणीचा । जरी पहुडला होय दैवाचा । तरी वोसणताही बोल तयाचा । परी सोपु न वचे ॥6॥
(ज्ञानोबाराय म्हणतात) पहा की, चिंतामणीच्या मंदिरात एखादा दैववान मनुष्य जर निजला, तर तो जरी झोपेंत बरळला तरी त्याचे बरळणे व्यर्थ जात नाही,
7-8
तैसे अर्जुनाचिया बोलासवे । आले तेचि म्हणितले देवे । परियेसे गा बरवे । जे पुसिले तुवा ॥7॥
त्याचप्रमाणे, अर्जुनाच्या मुखांतून जी वाक्ये आली त्याबरोबर देव म्हणाले, ” तू जे काही पुसलेस ते नीट ऐक. “
8-8
किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा । म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥8॥
किरीटी हा कामधेनूचा बछडा असुन कल्पतरूच्या मंडपांत बांधलेला आहे, अर्थात् त्याच्या मनातील सर्व हेतु सिद्धींस जातात यात नवल ते काय ?
9-8
कृष्ण कोपोनि ज्यासि मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारी । मा कृपेने उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ॥9॥
श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात, तो देखील ब्रह्मस्वरूपाला पावतो, मग ज्याला कृपादृष्टीने उपदेश करतील त्याला काय प्राप्त होणार नाही ?
10-8
जै कृष्णाचेया होइजे आपण । तै कृष्ण होय आपुले अंतःकरण । मग संकल्पाचे आंगण । वोळगती सिद्धी ॥10॥
ज्या वेळेस कृष्णाचे आपण भक्त व्हावे, त्या वेळी आपले अंतःकरण कृष्णरूप बनते; मग संकल्परूप अंगणात (आपल्या मनात जे जे संकल्प येतील, ते ते पूर्ण करण्याकरिता) ऋद्धिसिद्धि सहज हात जोडून उभ्या असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-8
परि ऐसे जे प्रेम । अर्जुनीचि आथि निस्सीम । म्हणऊनि तयाचे काम । सदा सफळ ॥11॥
परंतु अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम, ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच अमर्याद आहे, म्हणून त्याच्या मनकामना नेहमी पूर्ण होतात.
12-8
या कारणे श्रीअनंते । ते मनोगत तयाचे पुसते । होईल जाणूनि आइते । वोगरूनि ठेविले ॥12॥
म्हणूनच, अर्जुन हा आता आपल्या मनातील गोष्ट मला विचारील, असे जाणून श्रीकृष्णांनी आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेविले.
13-8
जे अपत्य थानी निगे । त्याची भूक ते मातेसीचि लागे । एऱ्हवी ते शब्दे काय सांगे । मग स्तन्य दे येरी ॥13॥
स्तनपान करुन दुर खेळत असलेल्या बालकाला भूक लागली आहे, हे त्याच्या आईलाच समजते. नाही तर त्याने मागितल्यावर मग का ती त्याला दूध पाजते ?
14-8
म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायी । हे नवल नोहे काही । परि ते असो आइका काई । जे देव बोलते जाहले ॥14॥
अर्थात् कृपाळू अशा सद्गुरूचे ठिकाणी (आपल्या शिष्यासंबंधी) असले हे प्रेम असणे म्हणजे काही नवल नव्हे. पण हे असो; देव जे काही बोलले ते ऐका.
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित ॥8. 3॥
15-8
मग म्हणितले सर्वेश्वरे । जे आकारी इये खोकरे । कोंदले असत न खिरे । कवणे काळी ॥15॥
मग सर्वेश्वर म्हणाले – जे या फुटक्या आकारात (देहांत) ओतप्रोत भरलेले असुन कोणत्याही वेळी नाश पावत नाही
16-8
एऱ्हवी सपूरपण तयाचे पहावे । तरि शून्यचि नव्हे स्वभावे । वरि गगनाचेनि पालवे । गाळूनि घेतले ॥16॥
बरे, त्याचा सुक्ष्मपणा पहावा तर स्वभावतः ते शुन्य नव्हे, पण अति पातळ अशा आकाशाच्या पदराने गाळून घेतलेले आहे;
17-8
जे ऐसेही परि विरूळे । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेही न गळे । ते परब्रह्म ॥17॥
अशा प्रकारचे जे विरळ आहे व जे प्रापंचिक ज्ञानाच्या मोटेतून (शरीरांतून) हालवले असताही गळत नाही, त्याला ‘ परब्रह्म ‘ असे म्हणतात.
18-8
आणि आकाराचेनि जालेपणे । जन्मधर्माते नेणे । आकारलोपी निमणे । नाही कही ॥18॥
आणि आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने त्याचे जे धर्म त्याला जे जाणत नाही, व ते शरीर नाश पावल्यावरही जे कधी नाश पावत नाही,
19-8
ऐशिया आपुलियाची सहज स्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा ॥19॥
हे सुभद्रापते, अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठिकाणी निरंतर सहज स्थिति असते, त्याला अध्यात्म असे म्हणतात.
20-8
मग गगनी जेवि निर्मळे । नेणो कैची एक वेळे । उठती घनपटळे । नानावर्णे ॥20॥
मग, निर्मळ आकाशांत नाना रंगाचे ढग एकदम कसे उत्पन्न होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-8
तैसे अमूर्ती तिये विशुध्दे । महदादि भूतभेदे । ब्रह्मांडाचे बांधे । होचि लागती ॥21॥
त्याचप्रमाणे त्या निराकार शुद्ध ब्रह्मांत प्रकृति – अहंकारादि भेदांनी ब्रह्मांडांचे आकार होऊ लागतात.
22-8
पै निर्विकल्पाचिये बरडी । की आदिसंकल्पाची फुटे विरूढी । आणि ते सवेचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांची ॥22॥
परंतु कल्पनातीत शुद्धब्रह्माच्या माळ जमिनीत, मी बहुत प्रकारचा होईन अशा संकल्पाचा अंकुर उत्पन्न होऊन, त्याला लागलीच ब्रह्मांडाचे धोंडे (आकार) उत्पन्न होऊन त्यांनी तो लवतो.
23-8
तया एकैकाचे भीतरी पाहिजे । तव बीजाचाचि भरिला देखिजे । माजी होतिया जातिया नेणिजे । लेख जीवा ॥23॥
आकारांत पाहू लागले म्हणजे तो त्या बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरलेला आहे असे दिसते, आणि त्या प्रत्येकांत किती जीव होतात व जातात याची गणना करता येत नाही.
24-8
मग तयागोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास । हे असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ॥24॥
मग त्या ब्रह्मांडांच्या गोलाचे प्रत्येक अंशापासून असंख्यात आदिसंकल्प उत्पन्न होतात. असो, अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होतो.
25-8
परि दुजेनविण एकला । परब्रह्मचि संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥25॥
परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरले असून अनेकरूपाने नटून पूर आल्याप्रमाणे भासते.
26-8
तैसे समविषमत्व नेणो कैचे । वायाचि चराचर रचे । पाहता प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती ॥26॥
त्याचप्रमाणे, स्थावरजंगम विश्वाची रचना सहज होऊन त्यात अधिकउणेपणा कसा होतो, हे समजत नाही; परंतु पाहू गेले असता लक्षावधि जाति उत्पन्न झालेल्या दिसतात.
27-8
येरी जीवभावाचिय पालविये । काही मर्यादा करू नये । पाहिजे कवण हे आघवे विये । तव मूळ ते शून्य ॥27॥
या व्यतिरीक्त, नानाप्रकारच्या जीवांच्या विस्ताराची मर्यादा करता येत नाही. ह्यांची कोणापासून उत्पत्ति होते हे पाहू गेले तर त्याचे मूळ अव्यक्तच आहे.
28-8
म्हणूनि कर्ता मुदल न दिसे । आणि शेखी कारणही काही नसे । माजी कार्यचि आपैसे । वाढोचि लागे ॥28॥
म्हणून, मूळांत कर्त्याचा ठिकाण नसून आणि शेवटी काही कारणही नसता मध्येच कार्याची आपोआप वृद्धि होते.
29-8
ऐसा करितेनवीण गोचरू । अव्यक्ती हा आकारू । निपजे जो व्यापारू । तया नाम कर्म ॥29॥
अशा प्रकारे, अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्यावाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात.
अधिभूतं क्षरो भावःपुरुषश्चाधिदैवतम ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृता वर ॥8. 4॥
30-8
आता अधिभूत जे म्हणिपे । तेहि सांगो संक्षेपे । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसे ॥30॥
आता, ‘ अधिभूत ‘ ज्याला म्हणतात ते संक्षेपाने सांगतो; ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-8
तैसे असतेपण आहाच । नाही होइजे हे साच । जयाते रूपा आणिती पांचपांच । मिळोनिया ॥31॥
त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व लटके असुन खरोखर पाहू गेले असता जे होत नाही व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन रूपाला आणतात,
32-8
भूतांते अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगे तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक ॥32॥
जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते त्यांच्याच संयोगाने दृष्टीस पडते, व विनाशकाली लय पावते, असे जे नामरूप, त्याला अधिभूत म्हणतात.
33-8
तयाते अधिभूत म्हणिजे । मग अधिदैवत पुरूष जाणिजे । जेणे प्रकृतीचे भोगीजे । उपार्जिले ॥33॥
मग अधिदैवत म्हणजे जीव असे समजावे. तो प्रकृतिजन्य भोगांचा उपभोग घेतो.
34-8
जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु । जो देहास्तमनी वृक्षु । संकल्पविहंगमाचा ॥34॥
जो बुद्धिचा द्रष्टा, इंद्रियरूप देशाचा अधिपति, व शरीराच्या अंतकाली मनोरथरूप पक्ष्यांचा विसावा घेण्याचा वृक्ष,
35-8
जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नीचिया बोरबारा । संतोषे शिणे ॥35॥
जो प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे, परंतु अहंकाररूप निद्रेत निजल्यामुळे ज्याला स्वप्नाच्या खटपटीने संतोष व शीणही होतो,
36-8
जीव येणे नांवे । जयाते आळविजे स्वभावे । ते अधिदैवत जाणावे । पंचायतनीचे ॥36॥
आणि ज्याला जीव या नांवाने हाक मारतात, त्याला ‘ अधिदैवत ‘ असे म्हणतात; व तो पंचमहाभुतांनी बनलेल्या शरीरांतील मुख्य दैवत आहे.
37-8
आता इयेचि शरीरग्रामी । जो शरीरभावाते उपशमी । तो अधियज्ञु एथ गा मी । पांडुकुमरा ॥37॥
आता, पंडुकुमरा, याच शरीररुप गावात जो शारीरिक उपाधीचा लय करितो, तो ‘ अधियज्ञ ‘ मी होय.
38-8
येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त । परि पंधरे किडाळा मिळत । ते काय सांके नोहे ॥38॥
येरवी, अधिदैव व अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे, परंतु उत्तम कसाचे सोने हिणकसाला मिळविल्यावर ते डाकलग होत नाही का ?
39-8
तरि ते पंधरेपण न मैळे । आणि किडाळाचियाही अंशा न मिळे । परि जव असे तयाचेनि मेळे । तव सांकेंचि म्हणिजे ॥39॥
तथापि त्याचा उत्तमपणा कमी होत नाही, व ते हिणकस सोन्यातही मिळत नाही; परंतु जोपर्यत त्याच्याशी एकत्र असते, तोपर्यंत त्याला डाकलगच म्हणतात,
40-8
तैसे अधिभूतादि आघवे । हे अविद्येचेनि पालवे । झांकले तव मानावे । वेगळे ऐसे ॥40॥
त्याचप्रमाणे अधिभूतादि सर्व हे अज्ञानाच्या पदराने जोपर्यत झाकले आहेत, तोपर्यंत वेगळे मानले पाहिजेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-8
तेचि अविद्येची जवनिका फिटे । आणि भेदभावाची अवघि तुटे । मग म्हणो एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ॥41॥
तोच अज्ञानाचा पदर काढून आणि भेदभावाची मर्यादा तोडून जर एकत्र करून आणले तर ते दोन वेगळे आहेत काय ?
42-8
पै केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिकशिळा । ते वरि पाहिजे डोळा । तव भेदिली गमती ॥42॥
परंतू केसांची गुंडाळी करुन त्यांवर स्फटिकाची शिळा ठेवल्यावर ती वरच्या दृष्टीने पांहू गेले असता जशी भंगलेली दिसते,
43-8
पाठी केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणो जाहाले । तरि डांक देऊनि सांदिले । शिळेते काई ॥43॥
पाठीमागुन ते केस बाजुस केल्यावर तिच्या चिरा कोणीकडे गेल्या हे समजत नाही; म्हणुन ती शीळ डाक लावून जोडली आहे का ?
44-8
ना ते अखंडचि आयती । परि संगे भिन्न गमली होती । ते सारिलिया मागौती । जैसी का तैसी ॥44॥
नाही; तर ती मुळची अखंडीतच होती; परंतू (केसांच्या संगतीने) भंगलेली भासत होती,परंतू ते केस एके बाजुस केल्यावर ती शीळ जशी होती तशीच दिसते;
45-8
तेवीचि अहंभावो जाये । तरी ऐक्य ते आधीचि आहे । हेचि साचे जेथ होये । तो अधियज्ञु मी ॥45॥
त्याचप्रमाणे, अहंभाव नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मुळचेच आहे; व हेच ऐक्य जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच.
46-8
पै गा आम्ही तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगीतले का जे काज । मनी धरूनि ॥46॥
हे पहा, जो हेतू मनात धरून, ‘सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहेत ‘ म्हणून आम्ही पूर्वी (चौथ्या अध्यायात) तुला सांगितले, तोच हा अधियज्ञ होय.
47-8
तो हा सकळ जीवांचा विसावा । नैष्कर्म्यसुखाचा ठेवा । परि उघड करूनि पांडव । दाविजत असे ॥47॥
हा सर्व जीवांचा विसावा असून ब्रह्मसुखाचा ठेवा आहे. पण अर्जुना, तुला तो स्पष्ट करून सांगतो
48-8
पहिले वैराग्याइंधनपरिपूर्ती । इंद्रियानळी प्रदीप्ती । विषयद्रव्याचिया आहुती । देऊनिया ॥48॥
प्रथम वैराग्यरूप इंधनाच्या पूर्णतेने इंद्रियरूप अग्नि पेटवून त्यात विषयरूप द्रव्याची आहुति देतात;
49-8
मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी । वेदिका रचे मांडवी । शरीराच्या ॥49॥
मग वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून त्यावर मूळबंधमुद्रेचा ओटा करतात, त्यावर शरीराचा मांडव उभा करतात.
50-8
तेथ संयमाग्नीची कुंडे । इंद्रियद्रव्याचेनि पवाडे । यजिजती उदंडे । युक्तिघोषे ॥50॥
त्या ठिकाणी इंद्रियनिग्रहरूप अग्नीच्या कुंडांत इंद्रियरूप होमद्रव्ये घालून योगमंत्राने हवन करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-8
मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणे संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥51॥
मग, मन व प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी, इने, धुराशिवाय निर्दोप जो ज्ञानाग्नि त्याचा संतोष करितात.
52-8
ऐसेनि हे सकळ ज्ञानी समर्पे । मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे । पाठी ज्ञेयचि स्वरूपे । निखिल उरे ॥52॥
याप्रमाणे हे साहित्य ज्ञानांत अर्पण करुन मग ते ज्ञान ब्रह्मांत लय पावते. नंतर निवळ जे ब्रह्म, तेच एकटे उरते.
53-8
तया नांव गा अधियज्ञु । ऐसे बोलिला जव सर्वज्ञु । तव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातले ते ॥53॥
त्यालाच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणावे. असे ज्या वेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलले, त्या वेळेस महाबुद्धिमान अशा अर्जुनाला ते समजले.
54-8
हे जाणोनि म्हणितले देवे । पार्था परिसतु आहासि बरवे । याकृष्णाचिया बोलासवे । येरू सुखाचा जाहला ॥54॥
अर्जुनाला ब्रह्म समजले असे देवांनीही जाणून ते म्हणाले, ‘ तू फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस. ‘ असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन संतोष पावला.
55-8
देखा बालकाचिया धणी धाइजे । का शिष्याचेनि जाहलेपणे होइजे । हे सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । का प्रसवतिया ॥55॥
पहा की, तान्ह्या मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे, किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे, हे एक आई किंवा सद्गुरूच जाणतात.
56-8
म्हणोनि सात्विका भावांची मांदी । कृष्णाआंगी अर्जुनाआधी । न समातसे परी बुद्धी । सांवरूनि देवे ॥56॥
म्हणून अर्जुनाच्या पूर्वीच श्रीकृष्णांच्या अंगी अष्ट सात्विक भाव उत्पन्न होऊन मावेनातसे झाले;
57-8
मग पिकलिया सुखाचा परिमळु । की निवालिया अमृताचा कल्लोळु । तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला ॥57॥
परंतू देवांनी बुद्धि आवरली, व पूर्णतेस पावलेल्या सुखाच्या सुगंधाप्रमाणे किंवा थंडगार अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि रसाळ असे बोल ते बोलू लागले.
58-8
म्हणे परिसणेयांच्या राया । आइके बापा धनंजया । ऐसी जळो सरलिया माया । तेथ जाळिते तेही जळे ॥58॥
मग म्हणतात :- श्रवण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना, ऐक. बाबारे, माया जळून गेली, म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही जळून जाते.
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥8. 5॥
59-8
जे आताचि सांगितले होते । अगा अधियज्ञ म्हणितला जयाते । जे आदीचि तया माते । जाणोनि अंती ॥59॥
अरे! आत्तांच जे मी सांगीतले, ज्याला मी अधियज्ञ म्हटले, त्या मला जे अगोदर व प्राणान्तसमयीही जाणतात,
60-8
ते देह झोळ ऐसे मानुनी । ठेले आपणपे आपण होऊनी । जैसा मठ गगना भरूनी । गगनीचि असे ॥60॥
देहाला मिथ्या मानून स्वतःचे ठिकाणीच ब्रह्मरूप होतात. ज्याप्रमाणे एखादे घर आकाशाने भरुन आकाशांतच असते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-8
ये प्रतीतीचिया माजघरी । तया निश्चयाची वोवरी । आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ॥61॥
त्याप्रमाणे, अनुभवरूप माजघरात त्याची निश्चयरुप खोली असते, म्हणून त्याला ब्रह्माशिवाय बाहेरील वस्तुचे स्मरण नसते.
62-8
ऐसे सबाह्य ऐक्य संचले । मीचि होऊनि असता रचिले । बाहेरि भूतांची पांचही खवले । नेणताचि पडिली ॥62॥
अशा प्रकारे जो अंतर्बाह्य ऐक्यतेमुळे मद्रूपच होऊन राहिला आहे, तो बाहेरील पंचमहाभूतांची पांच कवचे (शरीर) पडून गेली तरी तो जाणत नाही.
63-8
आता उभया उभेपण नाही जयाचे । मा पडिलिया गहन कवण तयाचे । म्हणोनि प्रतीतीचिये पोटीचे । पाणी न हाले ॥63॥
जे शरीर जिवंत असतांही त्याची जो पर्वा बाळगीत नाही, ते पडल्यावर त्याचे दुःख कोणाला होणार ? म्हणून अनुभवाच्या पोटांतले पाणी हालत नाही. (अंतकाली त्याचा ब्रह्माविषयींचा अनुभव ढळत नाही. )
64-8
ते ऐक्याची आहे वोतिली । की नित्यतेचिया हृदयी घातली । जैसी समरससमुद्री धुतली । रूळेचिना ॥64॥
तो अनुभव केवळ ऐक्याचा ओतून अविनाशीपणाच्या ह्रदयात घातलेला आणि तसाच पूर्णानंदसमुद्रात धुतलेला असतो म्हणून कामादि मळांनी तो मळत नाही.
65-8
पै अथावी घट बुडाला । तो आंतबाहेरी उदके भरला । पाठी दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ॥65॥
हे पहा की, अथांग पाण्यात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर पाणी असते; पण दैवगत्या जर तो मागाहून फुटला, तर उदकाचा नाश होतो का ?
66-8
ना तरी सर्पे कवच सांडिले । का उबारेने वस्त्र फेडिले । तरी सांग पा काय मोडले । अवेवामाजी ॥66॥
किंवा सर्पाने कात टाकली, अथवा उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले, तर अवयवांत काही बिघाड होतो का सांग बरे
67-8
तैसा आकार हा आहाच भ्रंशे । वाचूनि वस्तु ते सांचलीचि असे । तेचि बुद्धि जालिया विसुकुसे । कैसेनि आता ॥67॥
त्याचप्रमाणे, शरीर हे वरचेवर नाश पावले, तरी ब्रह्म हे सर्वत्र भरलेलेच आहे. त्याचप्रमाणे. त्या ठिकाणी बुद्धि जर निपूण झाली, तर भय कशाचे आहे ?
68-8
म्हणोनि यापरी माते । अंतकाळी जाणत सांते । जे मोकलिती देहाते । ते मीचि होती ॥68॥
म्हणून अशा रितीने अंतकाली माझे स्मरण ठेवून जे देह सोडतात ते मद्रूप होतात.
69-8
एऱ्हवी तरी साधारण । उरी आदळलिया मरण । जो आठव धरी अंतःकरण । तेचि होइजे ॥69॥
येऱ्हवी साधारण नियम असा आहे की, मरण प्राप्त असता अंतःकरणात ज्याचे स्मरण असते त्याप्रत तो पावतो.
70-8
जैसा कवण एक काकुळती । पळता पवनगती । दुपाउली अवचिती । कुहामाजी पडियेला ॥70॥
ज्याप्रमाणे एखादा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असता मार्गात अवचित विहीरीत पडतो;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-8
आता तया पडणयाआरौते । पडण चुकवावया परौते । नाही म्हणोनि तेथे । पडावेचि पडे ॥71॥
त्या स्थितीत त्याला पडण्याच्या अगोदर पळण्याचा वेग आवरून धरून, पडणे चुकविता येत नाही; म्हणून विहीरीत पडणे भाग पडते,
72-8
तेवि मृत्यूचेनि अवसरे एके । जे येऊनि जीवासमोर ठाके । ते होणे मग न चुके । भलतयापरी ॥72॥
त्याचप्रमाणे, मृत्युसमयी जीवासमोर जी वस्तु उभी राहते, तद्रूपच (मरणानंतर) त्यास व्हावे लागते. ते कोणत्याही उपायाने चुकत नाही
73-8
आणि जागता जव असिजे । तव जेणे ध्याने भावना भाविजे । डोळा लागतखेवो देखिजे । तेचि स्वप्नी ॥73॥
आणि मनुष्य जागा असता त्याच्या मनात ज्या कल्पना येतात, त्याच कल्पना डोळा लागल्यावर स्वप्नांत दिसू लागतात.
यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥8. 6॥
74-8
तेवि जितेनि अवसरे । जे आवडोनि जीवी उरे । तेचि मरणाचिये मेरे । फार हो लागे ॥74॥
त्याचप्रमाणे, जिवंत असतांना जी जी गोष्ट आवडीने अंतःकरणात उतरते, त्याविषयीचीच आवड अंतकालचे समयी वृद्धिंगत होते;
75-8
आणि मरणी जया जे आठवे । तो तेचि गतीते पावे । म्हणोनि सदा स्मरावे । मातेचि तुवा ॥75॥
आणि मरणाच्या समयी ज्या गोष्टीची आठवण असते, त्याच्याच गतीला तो (मरणानंतर) पावतो. म्हणून तू नेहमी मलाच स्मरत जा.
तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥8. 7॥
76-8
डोळा जे देखावे । का कानी हन ऐकावे । मनी जे भावावे । बोलावे वाचे ॥76॥
डोळ्यांनी जे पहावे किंवा कानांनी जे ऐकावे, मनाने जे चिंतावे अथवा वाचेने जे बोलावे,
77-8
ते आत बाहेरि आघवे । मीचि करूनि घालावे । मग सर्वी काळी स्वभावे । मीचि आहे ॥77॥
ते ह्रदयात भासणारे व बाह्य दृष्टीला दिसणारे सर्व मीच आहे असे समजावे. मग सर्वत्र मीच आहे असे सहज तुला दिसेल.
78-8
अर्जुना ऐसे जाहलिया । मग न मरिजे देह गेलिया । मा संग्रामु केलिया । भय काय तुज ॥78॥
अर्जुना, याप्रमाणे, सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे तुझ्या मनाने घेतले, म्हणजे देह गेला तरी तू मरणार नाहीस. मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे ?
79-8
तू मनबुद्धि साचेसी । जरी माझिया स्वरूपी अर्पिसी । तरी मातेचि गा पावसी । हे माझी भाक ॥79॥
तू मन आणि बुद्धि ही खरोखर माझ्या स्वरुपास अर्पण करशील, तर मद्रूप होशील हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो.
80-8
हेच कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे । तरी अभ्यासूनि आदी पाहे । मग नव्हे तरी कोपे ॥80॥
हेच कशाने होईल,असा जर तुझ्या मनात संशय येत असेल, तर अगोदर याचा अभ्यास करून अनुभव घे आणि जर मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल तर मग माझ्यावर रागाव.
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुन्तयन् ॥8. 8॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-8
येणेचि अभ्यासेसि योगु । चित्तासि करी पा चांगु । अगा उपायबळे पंगु । पहाड ठाकी ॥81॥
याकरिता चांगल्या रीतीने चित्ताची आणि अभ्यासाची गाठ घातली (मनःपूर्वक अभ्यास केला,) तर, ज्याप्रमाणे लंगडा उद्योगबलाने पर्वतही चढू शकतो,
82-8
तेवि सदभ्यासे निरंतर । चित्तासि परमपुरूषाची मोहर । लावे मग शरीर । राहो अथवा जावो ॥82॥
त्याप्रमाणे, नेहमी ब्रह्मविचाराचा अभ्यास करून चित्ताला आत्म्याचा छंद लाव, मग शरीर राहो अथवा जावो.
83-8
जे नानागतीते पावविते । ते चित्त वरील आत्मयाते । मग कवण आठवी देहाते । गेले की आहे ॥83॥
नानागति पावविणारे असे चित्त जर आत्म्याला वरील, तर मग देह गेला की आहे याची आठवण कोण करील ?
84-8
पै सरितेचिनि ओघे । सिंधुजळा मीनले ओघे । ते काय वर्तत आहे मागे । म्हणोनि पाहो येते ॥84॥
हे पहा कीं, पाणी नदीच्या ओघाने धो धो करीत समुद्रांत मिळण्यास चालले म्हणजे, मागे काय होते आहे हे पाहण्याकरिता परतते का ? नाही.
85-8
ना ते समुद्रचि होऊन ठेले । तेवि चित्ताचे चैतन्य जाहाले । जेथ यातायात निमाले । घनानंद जे ॥85॥
नाही. ते समुद्रांत मिळाल्यावर समुद्ररूपच होते. त्याचप्रमाणे, चित्त हे आत्मरूप झाले, म्हणजे जन्ममरणांच्या यातायाती चुकतात. कारण त्या ठिकाणी परमानंदच भरलेला आहे.
कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद् ।
सर्वस्य धातरमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ 8. 9 ॥
86-8
जयाचे आकारावीण असणे । जया जन्म ना निमणे । जे आघवेचि आघवेपणे । देखत असे ॥86॥
ज्याचे निराकार अस्तित्व, ज्याला जन्म अथवा मरण नाही, व जे सर्वव्यापकपणाने सर्वास पाहते
87-8
जे गगनाहून जुने । जे परमाणूहूनि साने । जयाचेनि सान्निधाने । विश्व चळे ॥87॥
जे आकाशाच्या आधीचे, जे परमाणूहूनही सूक्ष्म, ज्याच्या सान्निध्याने विश्वाचे व्यापार चालतात,
88-8
जे सर्वाते यया विये । विश्व सर्व जेणे जिये । हेतु जया बिहे । अचिंत्य जे ॥88॥
ज्याच्यापासून ह्या सर्वाची उत्पत्ति होते, सर्व विश्व जगते, ज्याला तर्क भितो व ज्यांचे अनुमान करता येत नाही;
89-8
देखे वोळंबा इंगळु न चरे । तेजी तिमिर न शिरे । जे दिहाचे आंधारे । चर्मचक्षूसी ॥89॥
; पहा – वाळवी कधी इंगळ (विस्तव) खात नाही; तेजामध्ये अंधार शिरत नाही; व जे अज्ञानदृष्टीला दिवसांही दिसत नाही;
90-8
सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचे जयासी । आडनांव नाही ॥90॥
जे निर्मळ अशा सुर्यरूप कणांच्या राशीसारखे आहे, व ज्ञान्याला नित्य उजेड करणारे आहे व ज्याला अस्त कधीच नाही,
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ गीता अध्याय 8. श्लोक10 ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-8
तया अव्यंगवाणेया ब्रह्माते । प्रयाणकाले प्राप्ते । जो स्थिरावलेनि चित्ते । जाणोनि स्मरे ॥91॥
त्या अव्यंग स्वरुपाच्या ब्रह्माला जाणून, मरणकाल समीप आला असता जो एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करितो;
92-8
बाहेरी पद्मासन रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि । जीवी सुख सूनि । कर्मयोगाचे ॥92॥
बाहेर पद्मासन घालून उत्तरेस तोंड करुन बसून, आणि कर्मयोगाने प्राप्त झालेले सुख अंतःकरणात सांठवून,
93-8
आंतु मिनलेनि मनोधर्मे । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमे । आपेआप संभ्रमे । मिळावया ॥93॥
अंतर्यामी एकाग्र चित्ताने स्वरुपप्राप्तीच्या प्रेमाने आपोआप ब्रह्मास त्वरित मिळण्याकरीता,
94-8
आकळलेनि योगे । मध्यमा मध्यमार्गे । अग्निस्थानैनि निगे । ब्रह्मरंघ्रा ॥94॥
संपादिलेल्या योगाच्या द्वारे सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने, अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रांत जाण्याकरिता निघतो,
95-8
तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु । जेथ प्राण गगनाआंतु । संचरे का ॥95॥
जेथे प्राण व चित्त यांची संगति आहे असे उगीच बाह्यात्कारी दिसते; जेथे प्राणाचा लय आकाशांत होतो.
96-8
परी मनाचेनि स्थैयैं धरिला । भक्तीचिया भावना भरला । योगबळे आवरला । सज्ज होउनी ॥96॥
परंतु मनाच्या स्थिरतेने जो बांधला गेला, व ज्याचे अंतःकरण भक्तीयुक्त झाले आहे, व जो योगाचे बळाने तयार होऊन मन आपल्या ताब्यात ठेवितो
97-8
तो जडाजडाते विरवितु । भ्रूलतांमाजी संचरतु । जैसा घंटानाद लयस्थु । घंटेसीच होय ॥97॥
तो चित्त व प्राण यांना भ्रुकुटीमध्ये आवरून धरुन ज्याप्रमाणे घंटेचा नांद घंटेतच लय पावतो, त्याप्रमाणे दोघांचा लय करतो,
98-8
का झांकलिय घटीचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हा । या रीती जो पांडवा । देह ठेवी ॥98॥
किंवा मडक्याखालील झाकलेला दिवा केव्हा नाहींसा होतो हे ज्याप्रमाणे समजत नाही, त्याप्रमाणे, अर्जुना, जो आपला देह ठेवतो
99-8
तो केवळ परब्रह्म । जया परमपुरूष ऐसे नाम । ते माझे निजधाम । होऊनि ठाके ॥99॥
(ब्रह्मकाशांत प्राणवायु नेऊन तो आत्मस्वरूपी केव्हा लीन होतो हे समजू न देता आपला देह ठेवतो). तो केवळ परब्रह्म- ज्याला परमपुरुष असे नांव आहे – त्या माझ्या निजस्वरूपाप्रत जाऊन मिळतो.
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति यत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥8. 11॥
100-8
सकळा जाणणेया जे लाणी । तिये जाणिवेची जे खाणी । तया ज्ञानियांचिये आयणी । जयाते अक्षर म्हणिपे ॥100॥
जे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा शेवट, त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहे, ते असणाऱ्या बुद्धिमान ज्ञानी पुरूषांनीही ज्याला ‘अक्षर ‘ असे म्हटले आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-8
चंडवातेही न मोडे । ते गगनचि की फुडे । वाचूनि जरे होईल मेहुडे । तरी उरेल कैचे ॥101॥
झंझावाताने न मोडणारे असे एक खरोखर गगनच आहे; त्याच्याशिवाय, त्या वाऱ्यापुढे ढग आले असता कसे टिकतील ?
102-8
तेवि जाणणेया जे आकळिले । ते जाणवलेपणेचि उमाणले । मग नेणवेचि तया म्हणितले । अक्षर सहजे ॥102॥
त्याचप्रमाणे, ज्ञान्याला जे समजले ते ज्ञानाच्या मापांत आले म्हणून ते क्षर (नाशवंत) होय; मग, जे जाणण्यास अशक्य, त्याला सहज अक्षर (अविनाशी) असे म्हणतात.
103-8
म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयाते अक्षर । जे प्रकृतीसी पर । परमात्मरूप ॥103॥
म्हणून वेदपारंगत पुरुष ज्याला अक्षर (ब्रह्म) असे म्हणतात, व जे मायेच्या पलीकडील असुन सच्चिदानंदरूप आहे,
104-8
आणि विषयांचे विष उलंडूनि । जे सर्वेद्रिया प्रायश्चित देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळी ॥104॥
आणि विषयांची इच्छा टाकुन व सर्व इंद्रियांचे दमन करुन देहरूपी झाडाच्या तळी उदासीनवृत्तीने बसलेले
105-8
ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जे ॥105॥
त्याप्रमाणे विरक्त पुरुषही ज्याची नेहमी वाट पहात असतात व जे नेहमी निरिच्छ लोकांना आवडते,
106-8
जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी । निष्ठुर होऊनि बापुडी । इंद्रिये करिती ॥106॥
ज्याच्या आवडीकरिता योगीजन ब्रह्मचर्यादि संकटे जुमानीत नाहीत व निष्ठुरपणे इंद्रियांना दीन करतात,
107-8
दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडिये वेद । चुबुकळिले ठेले ॥१०७॥
असे जे दुर्लभ आणि अगाध असलेले ब्रम्हपद, ज्याचा अंत नाही आणि ते वेदांनाही जाणता आले नाही. वेद अलिकच्या काठावर गंटागळ्या खात राहिले आहेत. . . .
108-8
ते ते पुरूष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगो ॥108॥
असे जे दुर्लभ पद – ज्याचा अंत नाही व जे वेदालाही जाणता आले नाही, त्या पदाला, मी सांगीतल्याप्रमाणे जे देह ठेवतात, ते प्राप्त होतात, म्हणून, पार्था, त्याबद्दल आणखी एकवार तुला सांगतो.
109-8
तेथ अर्जुने म्हणितले स्वामी । हेचि म्हणावया होतो पा मी । तव सहजे कृपा केली तुम्ही । तरी बोलिजो का ॥109॥
त्या वेळेस अर्जुन म्हणतो, ” हे गुरो, मी आपल्यास आता हेच विचारणार होतो, तो आपण मजवर कृपा केली. तर आता सांगण्यास सुरवात करावी;
110-8
परि बोलावे ते अति सोहोपे । तेथे म्हणितले त्रिभुवनदीपे । तुज काय नेणो संक्षेपे । सांगेन ऐक ॥110॥
परंतु काय सांगावयाचे ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा. ” त्या वेळी, त्रिभुवनदीप जे श्रीकृष्ण ते म्हणाले :- तुला का आम्ही ओळखीत नाही ? तुला संक्षेपाने सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-8
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवे मोडे । हे हृदयाचिया डोही बुडे । तैसे कीजे ॥111॥
तर मग, मनाची बाहेर हिंडण्याची स्वाभावीक सवय मोडून, ते ह्रदयातच स्थिर राहील, असे कर.
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरूध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ 8. 12॥
112-8
परी हे तरीच घडे । जरी संयमाची अखंडे । सर्वद्वारी कवाडे । कळासती ॥112॥
परंतु ज्या वेळेस इंद्रियरूपी कुलपाने बंद असतात, तेव्हांच ही गोष्ट घडते. असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन ह्रदयातच निर्विकल्प असते.
113-8
तरी सहजे मन कोंडले । हृदयीचि असेल उगले । जैसे करचरणी मोडले । परिवरू न संडी ॥113॥
परंतु ज्या वेळेस इंद्रियरूपी कुलपाने बंद असतात, तेव्हांच ही गोष्ट घडते. असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन ह्रदयातच निर्विकल्प असते. ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला प्राणी आपले घर सोडीत नाही,
114-8
तैसे चित्त राहिल्या पांडवा । प्राणाचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथे आणावा । मूर्ध्निवरी ॥114॥
त्याचप्रमाणे अर्जुना, चित्ताची स्थिरता झाल्यावर प्राणायामाने ॐकाराचे ध्यान करावे; मग प्राणवायु क्रमाक्रमाने ब्रह्मरंध्रांपर्यंत आणावा
115-8.
तेथ आकाशी मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळे । जव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबी ॥115॥
मग, अकार, उकार व मकार ही त्रयी अर्धमात्रेत मिळेपर्यंत, धारणाशक्तीच्या बलाने, प्राणवायु ब्रह्माकाशांत मिळतो न मिळतो अशा बेताने धरावा;
116-8
तंववरी तो समीरु । निराळी कीजे स्थिरू । मग लग्नी जेवि ॐकारू । बिंबींचे विलसे ॥116॥
तोपर्यंत तो वायु मस्तकाकांशांत स्थिर करावा; नंतर ॐकाराचा व त्याचा संयोग झाल्यावर, मुळ स्वरुप जे ब्रह्म त्यात तो रममाण होतो.
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ 8. 13॥
117-8
तैसे ॐ हे स्मरो सरे । आणि तेथेचि प्राणु पुरे । मग प्रणवांती उरे । पूर्णघन जे ॥117॥
त्याबरोबर ॐकाराचे स्मरण बंद पडते, आणि तेव्हांच प्राणाचा शेवट होतो; मग ॐकाराचे पलीकडील जे ब्रह्मानंदस्वरूप तेच बाकी राहते.
118-8
म्हणोनि प्रणवैकनाम । हे एकाक्षर ब्रह्म । जो माझे स्वरूप परम । स्मरतसांता ॥118॥
एकाक्षर ब्रह्म आहे, त्या माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करीत असता
119-8
यापरी त्यजी देहाते । तो त्रिशुद्धी पावे माते । जया पावनया परौते । आणिक पावणे नाही ॥119॥
जो त्या स्थितीतच देहत्याग करितो, तो निश्चयाने मजप्रत पावतो. कारण, त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी गतिच नाही.
120-8
तेथे अर्जुना जरी विपाये । तुझ्या जीवी हन ऐसे जाये । ना हे स्मरण मग होये । कायसयावरी अंती ॥120॥
अर्जुना, कदाचित् तुझ्या मनात जर अशी शंका येईल की, कायहो, मरणसमयी माझे स्मरण कसे व्हावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-8
इंद्रिया अनुघडु पडलिया । जीवितचे सुख बुडालिया । आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हे ॥121॥
जिविताचे सुख नाहीसे होऊन व इंद्रिये संकटात पडून अंतर्यामी व बाहेर मृत्युचिन्हे उघड दिसू लागल्यावर त्या वेळेस उठून बसावे कोणी ?
122-8
ते वेळी बैसवेचि कवणे । मग कवण निरोधी करणे । तेथे काह्याचेनि अंतकःरणे । प्रणव स्मरावा ॥122॥
इंद्रियांचे संयमन करावे कोणी ? आणि कोणत्या अंतःकरणाने ॐकाराचे स्मरण करावे ?
123-8
तरि गा ऐशिया ध्वनी । झणे थारा देशी हो मनी । पै नित्य सेविला मी निदानी । सेवकु होये ॥123॥
तर बाबारे, असल्या संशयास तू आपल्या अंतःकरणात थारा देऊ नको. असे पहा की, माझी जो नित्य सेवा करितो, त्याच्या निदानीच्या समयी मी त्याचा दास बनून राहतो.
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ 8. 14॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् ।
नाप्नुवंति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥8. 15 ॥
124-8
जे विषयासि तीळांजळी देऊनी । प्रवृत्तीवरी निगड वाउनी । माते हृदयी सूनी । भोगताती ॥124॥
जे विषयांला तिलांजलि देऊन, विषयाविषयी होणाऱ्या इच्छा आवरून व मला ह्रदयात साठवून त्या सुखाचा उपभोग घेतात,
125-8
परि भोगितया आराणुका । भेटणे नाही क्षुधादिका । तेथ चक्षुरादि रंका । कवण पाडु ॥125॥
त्यांना त्या समाधानांत क्षुधा वैगेरेची आठवणही रहात नाही. मग गरीब बिचाऱ्या नेत्रादिकाचा तेथे काय पाड !
126-8
ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणी मजशी लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासैती ॥126॥
अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्यरूपास पावलेले, आपले अंतःकरणात माझ्याशी तल्लीन झालेले, व मद्रूप होऊन जे माझीच सेवा करणारे आहेत,
127-8
तया देहावसान जै पावे । तै तिही माते स्मरावे । मग म्या जरी पावावे । तरि उपास्ति ते कायसी ॥127॥
त्यांचा अंतकाल समीप यावा, त्यांनी माझे स्मरण करावे, आणि मग जर मी त्यास पावावे; तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग ?
128-8
पै रंकु एक आडलेपणे । काकुळती अंती धावा गा धावा म्हणे । तरि तयाचिये ग्लानी धावणे । काय न घडे मज ॥128॥
हे पहा की संकटाच्या वेळी एखाद्या गरीब मनुष्यानेंही मोठ्या काकुळतीने ‘ देवा, धावरे धाव ‘ म्हणून माझा धावा केला, तर त्याचे दुःख निवारण करण्याकरिता मला जावे लागत नाही काय ?
129-8
आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा । म्हणऊनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥129॥
आणि माझे जे भक्त आहेत, त्यांची जर तीच दशा झाली तर त्यांनी मग माझ्या भक्तीचे श्रम तरी का करावे ? म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढू नको.
130-8
तिही जे वेळी मी स्मरावा । ते वेळी स्मरला की पावावा । तो आभारूही जीवा । साहवेचि ना ॥130॥
ते ज्या वेळी स्मरण करितात त्या वेळीच त्यांच्या स्मरणाबरोबर मी त्यांना पावतो. (ते माझी भक्ति करितात) हे देखील मला सहन करवत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-8
ते ऋणवैपण देखोनि आंगी । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागी । भक्ताचिया तनुत्यागी । परिचर्या करी ॥131॥
अशा प्रकारे आपण ऋणी झालो आहो हे पाहून, त्यातून उतराई होण्याकरिंता मी आपल्या भक्ताच्या अंतकाली त्याची सेवा करतो
132-8
देहवैकल्याचा वारा । झणे लागेल या सकुमारा । म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरा । सूये तयाते ॥132॥
देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या त्या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवितो; त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची थंडगार अशी सावली करतो;
133-8
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली । हीवाऐसी करी साउली । ऐसेनि नित्य बुद्धि संचली । मी आणी तयाते ॥133॥
आणि अशा प्रकारे, ज्यांची बुद्धि नेहमी मजकडे स्थिर असते त्यांना मी आपल्या स्वरुपी आणितो.
134-8
म्हणोनि देहातीचे सांकडे । माझिया कहीचि न पडे । मी आपुलियाते आपुलीकडे । सुखेचि आणी ॥134॥
म्हणून, देहाच्या अंतकालचे दुःख माझ्या भक्तांस कधीही होत नाही, व माझा जो भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो
135-8
वरचील देहाची गंवसणी फेडुनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी । शुद्ध वासना निवडुनी । आपणापा मेळवी ॥135॥
आत्म्यावरील देहरूप गवसणी काढून व त्यातला अहंकाररूप धुरळा झाडून केवळ भगवत्प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रूप करतो;
136-8
आणि भक्ता तरी देही । विशेष एकवंकीचा ठाव नाही । म्हणऊनि अव्हेरू करिता काही । वियोग ऐसा न वाटे ॥136॥
आणि भक्तालाही देहाचे ठिकाणी प्रेम नसल्यामुळे, त्याचा त्याग करतांना, त्याची व आपली ताटातूट होते असे वाटत नाही.
137-8
ना तरी देहातीचि मिया यावे । मग आपणपे याते न्यावे । हेही नाही जे स्वभावे । ते आधीचि मज मीनले ॥137॥
कारण, देहाच्या अंतसमयी भगवंतांनी पावावे आणि आपलेजवळ न्यावे, असेही त्यांच्या मनात येत नाही; का की, ते पूर्वीच मद्रूप झालेले असतात.
138-8
येरी शरीराचिया सलिली । असतेपण हे साउले । वाचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रीचि आहे ॥138॥
याशिवाय त्यांचे जे शरीर राहीले त्या शरीररुप पाण्यात आत्मा असतो खरा; परंतु तो सावलीप्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे चांदणे जरी बाहेर पसरलेले दिसते तरी खरोखर पांहू गेले असता ते चंद्राचेचे ठिकाणी आहे.
139-8
ऐसे जे नित्ययुक्त । तयासि सुलभ मी सतत । म्हणाऊनि देहाती निश्चित । मीचि होती ॥139॥
असे जे माझे नेहमी स्मरण करणारे आहेत, त्यांना मी नेहमी जवळच आहे. म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रूप होतात.
140-8
मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी । जे मृत्युकाकासि कुरोंडी । सांडिली आहे ॥140॥
मग, जे (शरीर)क्लेशरूप झाडांचे वन, जे तापत्रयरूप अग्नीची शेगडी, जे मृत्युरूप कावळ्यास बळी दिले आहे,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-8
जे दैन्याचे दुभते । जे महाभयाते वाढविते । जे सकळ दुःखाचे पुरते । भांडवल ॥141॥
जे दैन्य वाढविते, जे मृत्युचे भय वाढविणारे, जे सर्व दुःखाचे पूर्ण भांडवल,
142-8
जे दुर्मतीचे मूळ । जे कुमार्गाचे फळ । जे व्यामोहाचे केवळ । स्वरूपचि ॥142॥
जे वाईट बुद्धिचे मूळ, जे पूर्वजन्मीच्या वाईट कर्माचे फळ, जे भ्रांतीचे केवळ स्वरुपच,
143-8
जे संसाराचे बैसणे । जे विकाराचे उद्याने । जे सकळ रोगांचे भाणे । वाढिले आहे ॥143॥
जे संसाराची बसण्याची जागा, जे अहंकारादि विकरांची बाग, जे सर्व व्याधींचे वाढलेले ताटच होय;
144-8
जे काळाचा खिचउशिटा । जे आशेचा आंगवठा । जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावे जे ॥144॥
जे काळाने चघळुन टाकलेली उष्टी खिचडी, जे आशेचे अंगबळ; जे स्वभावतः जन्ममरणाला ओल देणारे,
145-8
जे भुलीचे भरीव । जे विकल्पाचे वोतीव । किंबहुना पेव । विंचुवाचे ॥145॥
देणारे, जे भ्रांतीने भरलेले, जे वाईट कल्पनांचे ओतलेले किंबहुना विंचवाचे पेवच होय,
146-8
जे व्याघ्राचे क्षेत्र । जे पण्यांगनेचे मैत्र । जे विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥146॥
जे वाघाची जाळी, जे वेश्यांचे मित्र म्हणजे मनाला वेश्येप्रमाणे मोह घालणारे, जे विषय जाणण्याचे उत्तम यंत्रच होय;
147-8
जे लावेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा । जे विश्वासु आंगवळा । संवचोराचा ॥147॥
जे (राक्षसी) जखिणीच्या दयेचे ठिकाण, व विषयरूपी थंड पाण्याचा घोट, जे स्नेहभावाने वागणाऱ्या चोराच्या बळकट विश्वासाप्रमाणे होय;
148-8
जे कोढियाचे खेंव । जे काळसर्पाचे मार्दव । गोरियाचे स्वभाव । गायन जे ॥148॥
जे कोडाने ग्रस्त झालेल्या मनुष्याचे आलिंगन, जे महाविषारी सर्पाच्या अंगाप्रमाणे मऊ, जे पारध्याच्या साहजिक गायनाप्रमाणे मधुर,
149-8
जे वैरियाचा पाहुणेर । जे दुर्जनाचा आदर । हे असो जे सागर । अनर्थाचा ॥149॥
जे वैऱ्याच्या पाहुणचाराची मेजवानी, जे दुर्जनांनी केलेले आगतस्वागत, फार काय सांगावे ? जे अनर्थाचा समुद्रच होय,
150-8
जे स्वप्नी देखिले स्वप्न । जे मृगजळे सासिन्नले वन । जे धूम्ररजांचे गगन । ओतले आहे ॥150॥
जे अनर्थाचा समुद्रच होय, जे स्वप्नांत पडलेले स्वप्न, जे मृगजळाचे तयार झालेले वन, व धुराच्या रजांनी भरलेले आकाश,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-8
ऐसे जे हे शरीर । ते ते न पवतीचि पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझे ॥151॥
ते हे शरीर, मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुनः प्राप्त होत नाही.
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ 8. 16॥
152-8
एऱ्हवी ब्रह्मपणाचिय भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे । परि निवटलियाचे जैसे । पोट न दुखे ॥152॥
येरव्ही, ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्यांना सुद्धा (ब्रह्मदेवाला सुद्धा) पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत; परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही
153-8
ना तरी चेइलियानंतरे । न बुडिजे स्वप्नीचेनि महापूरे । तेवी माते पावले ते संसारे । लिंपतीचि ना ॥153॥
किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नांतल्या महापुरांत कोणी बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्याप्रत पावले, ते संसाराने लिप्त होत नाहीत.
154-8
एऱ्हवी जगदाकाराचे सिरे । जे चिरस्थायीयांचे धुरे । ब्रह्मभुवन गा चवरे । लोकाचळाचे ॥154॥
येरव्ही, चौदा भुवनांचे शिखर, जे सप्त चिरंजीवामध्ये अग्रभागी असणारे, व त्रैलोक्यरूप पर्वताचे मस्तक जे ब्रह्मभुवन,
155-8
जिये गावीचा पहारू दिवोवरी । एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी । विळोनि पांती उठी एकसरी । चवदा जणांची ॥155॥
ज्या ब्रह्मलोकाच्या एक प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, व एका दिवसात एकदम चौदा इंद्रांचा निकाल लागतो;
सहस्त्रयुगपर्यंतमहर्यद् ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्त्रान्ता तेऽहोरात्रविदो जनाः ॥ 8. 17॥
156-8
जै चौकडिया सहस्त्र जाये । तै ठायेठावो विळुचि होये । आणि तैसेचि सहस्त्र भरिये पाहे । रात्री जेथ ॥156॥
चार युगे हजार वेळा जातील, तेव्हा ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस होतो; आणि तशीच हजार चौकड्यांची जेथे रात्रही आहे.
ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस गणित
कलियुग : 4,32,000. वर्ष
द्वापारयुग, + 8,64,000. = 12.96000. वर्ष
त्रेतायुग, +12,96,000. = 25,92,000. वर्ष
सत्ययुग, + 17,28,000. = 43,20,000. वर्ष
. एकूण 43,20,000/ त्रेचाळीस लक्ष वीस हजार चार युगाचे एकूण वर्ष होतात.
युगे 4×वर्ष 1000 = 43,20,000/ त्रेचाळीस लक्ष वीस हजार.
1 चतुर्युग म्हणजे 43,20,000/ मानवी वर्ष
43,20,000×1000 (चतुर्युग) = 4,32,00,00,00/ 4 अब्ज 32 कोटी मानवी वर्ष
आणि तेव्हढीच रात्र म्हणजे
4,32,00,00,00/×2 = 8,64,00,00,000/ म्हणजे 8 अब्ज 64 करोड मानवी वर्ष हा ब्रम्हदेवाचा 1 दिवस म्हणजे अहोरात्र आहे,
8,64,0000000/.(8 अब्ज 64 करोड.)
30 दिवसांचा महिना, 12 महिन्याचे १ वर्ष, आणि असे 100 वर्ष ब्रम्हदेवाचे आयुष्य आहे.
असे 100 वर्ष ब्रम्हदेवाचे आयुष्य आहे. ब्रम्हदेवाचे १ महिना ३६० दिवसाचा आहे.
३६०(वर्ष)×100 = 36,000×8,64,00,00,000 =
8,64, 00,00,000/×100 = 8,64,00,00,00,000/ म्हणजे
ब्रम्हदेवाचे एकूण आयुष्य
8,64,00,00,00,000/ 8 खर्व 64 अब्ज मानवी सौर वर्ष एव्हढे ब्रह्मदेवाचे आयुष्य आहे. (म्हणजे ब्रम्हदेवाचे 100 वर्ष झाले)
157-8
येवढे अहोरात्र जेथिचे । तेणे न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गीचे । चिरंजीव ॥157॥
एवढा दिवस व रात्र जेथे आहे, तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत, ते मरत नाहीत व त्या दिवसरात्री पाहतात. ते स्वर्गलोकीचे चिरंजीव होत.
158-8
येरा सुरगणांची नवाई । विशेष सांगावी तेथ काई । मुद्दल इंद्राचीचि दशा पाही । जे दिहाचे चौदा ॥158॥
येरव्ही, जेथे मुदली इंद्राचीच दशा अशी आहे की, एका दिवसात चौदा इंद्र होतात, तेथे देवगणांची काय प्रतिष्ठा वर्णन करावी ?
159-8
परि ब्रह्मयाचियाहि आठा पहारांते । आपुलिया डोळा देखते । जे आहाति गा तयाते । अहोरात्रविद म्हणिपे ॥159॥
परंतु ब्रह्मदेवाच्याही आठ प्रहराला जे आपल्या डोळ्यांनी पाहतात, त्यांना (ब्रह्मदेवाचे) दिवस व रात्र जाणणारे असे म्हणतात.
अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ 8. 18॥
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ 8. 19 ॥
160-8
तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे । ते वेळी गणना केही न समाये । ऐसे अव्यक्ताचे होये । व्यक्त विश्व ॥160॥
त्या ब्रह्मदेवाचा दिवस ज्या वेळेस उगवतो, त्या वेळेस निराकाराचे साकार विश्व अशा रीतीने उत्पन्न होते की, त्याची मोजदाद करवत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-8
पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे । पाठी तैसाचि मग पाहाटे । भरो लागे ॥161॥
पुढे त्या दिवसाचे चार प्रहर संपल्यावर हे विश्व नाहीसे होते; आणि पुनः पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे भरू लागते.
162-8
शारदीयेचिये प्रवेशी । अभ्रे जिरती आकाशी । मग ग्रीष्मांती जैशी । निगती पुढती ॥162॥
शरत्कालाच्या आरंभी आकाशातील अभ्रे नाहीतशी होतात, आणि तिच पुनः ग्रीष्मऋतूचे शेवटी जशी उत्पन्न होतात
163-8
तैसी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी । मिळे जव सहस्त्रावधी । निमित्त पुरे ॥163॥
त्याचप्रमाणे, ब्रह्मदेवाच्या दिवसाचे आरंभी ह्या भूतसृष्टीचा समुदाय एकत्र होतो, व तो चार हजार युगे वेळ जात तोपर्यंत असतो.
164-8
पाठी रात्रीचा अवसरू होये । आणि विश्व अव्यक्ती लया जाये । तोही युगसहस्त्र मोटका पाहे । आणि तैसेचि रचे ॥164॥
मागाहून ब्रह्मदेवाचे रात्रीचा समय झाला असता हे विश्व निराकारांत लय पावते; तेही पूर्वोक्त काल गेल्यावर उदयकाली पूर्ववत् होते.
165-8
हे सांगावया काय उपपत्ति । जे जगाचा प्रळयो आणि संभूति । इथे ब्रह्मभुवनीचिया होती । अहोरात्रमाजी ॥165॥
अशा रीतीने विश्वाची रचना होते. हे सांगण्याचा कोणता उद्देश म्हणशील, तर या ब्रह्मदेवाच्या दिवसात आणि रात्रीत जगाची उत्पत्ति आणि लय होतो.
166-8
कैसे थोरिवेचे मान पाहे पा । हो सृष्टिबीजाचा साटोपा । परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहला ॥166॥
त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे म्हणून पाहू गेले तर, तो ब्रह्मदेव सृष्टीच्या बिजाचे भंडार आहे, पण तोही जन्ममरणाला अग्रेसर झाला.
167-8
एऱ्हवी त्रैलोक्य हे धनुर्धरा । तिये गावीचा गा पसारा । तो हा दिनोदयी एकसरा । मांडतु असे ॥167॥
हे धनुर्धरा, येरव्ही ही त्रैलोक्यसृष्टि सत्यलोकाचा पसारा असुन ब्रह्मदेवाचा दिवस उगवण्याबरोबर हा एकसारखा मांडला जातो.
168-8
पाठी रात्रीचा समो पावे । आणि अपैसाचि सांटवे । म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे । साम्यासि ये ॥168॥
मागाहून रात्रीचा समय झाला असता तो आपोआप अव्यक्तांत लय पावतो, व हे पंचभूतादिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सहज जेथल्या तेथे लय पावते.
169-8
जैसे वृक्षपण बीजासि आले । की मेघ हे गगन जाहाले । तैसे अनेकत्व जेथ सामावले । ते साम्य म्हणिपे ॥169॥
ज्याप्रमाणे झाड हे बिजरूपात सामावते, किंवा मेघ हे आकाशांत लीन होतात, त्याप्रमाणे, ज्या ठिकाणी पुष्कळ वस्तुंचा समावेश होतो, त्याला ‘ साम्य ‘ असे म्हणतात.
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥8. 20॥
170-8
तेथ समविषम न दिसे काही । म्हणोनि भूते हे भाष नाही । जेवि दूधचि जाहालिया दही । नामरूप जाय 170॥
त्या साम्यात न्युनाधिक काही दिसत नाही, म्हणून ते भूत हे नांव पावत नाही. ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्याचे (दुधाचे) नांव व रूप ही नाही तशी होतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-8
तेवि आकारलोपासरिसे । जगाचे जगपण भ्रंशे । परि जेथ जाहाले ते जैसे । तैसेचि असे ॥171॥
त्याप्रमाणे, आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जगपण नाहीसे होते; परंतु ज्याच्यावर हे झाले आहे, त्या ठिकाणी ते जसेच्या तसेच असते,
172-8
तै तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारा वेळी तेचि व्यक्त । हे एकास्तव एक सूचित । एऱ्हवी दोनी नाही ॥172॥
तेव्हांच त्याला ‘अव्यक्त’ असे म्हणतात आणि साकार होतो त्यालाच ‘ व्यक्त ‘ म्हणतात. ही एकाला एक दाखविणारी आहेत. परंतु पाहुं गेले असता दोन्ही नाहीत.
173-8
जैसे आटलिया स्वरूपे । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारू हारपे । जे वेळी अळंकार होती ॥173॥
ज्याप्रमाणे रूपे आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात, पुढे त्याचे दागिने बनल्यावर ती लगड नाहींशी होते;
174-8
ही दोन्ही जैशी होणी । एकी साक्षीभूत सुवर्णी । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूच्या ठायी ॥174॥
ही दोन्ही रुपांतरे जशी एका रुप्यावरच होतात, त्याचप्रमाणे, व्यक्त व अव्यक्त हे दोन्ही विकार ब्रह्माच्याच ठिकाणी होतात.
175-8
ते तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोही भावाअतीत । अनादिसिध्द ॥175॥
ते ब्रह्म तर व्यक्त नाही आणि अव्यक्तही नाही, उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही; परंतु या दोन्ही स्थितीच्या पलीकडले अनादिसिद्ध असे आहे.
176-8
जे हे विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरे पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥176 ॥
जे ब्रह्म विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्वपण लयाला गेले तरी ते लय पावत नाही. ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यांचा अर्थ पुसला जात नाही.
177-8
पाहे पा तरंग तरी होत जात । परि तेथ उदक ते अखंड असत । तेवी भूताभावी नाशिवंत । अविनाश जे ॥177॥
पहा की, उदकावर तरंग येतात व जातात, परंतु उदक हे कायमच असते. त्याप्रमाणे, भुते नाहीतशी झाली असता अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही.
178-8
ना तरी आटतिये अळंकारी । नाटते कनक असे जयापरी । तेवी मरतिये जीवाकारी । अमर जे आहे ॥178॥
किंवा अलंकार आटल्यावर सोने जसे आटले जात नाही, त्याप्रमाणे मृत्यु पावणाऱ्या शरीरांत जे अमर आहे,
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ 8. 21॥
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभस्त्वनन्या ।
यस्यातःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ 8. 22 ॥
179-8
जयाते अव्यक्त म्हणो ये कोडे । म्हणता स्तुति हे ऐसे नावडे । जे मनबुद्धी न सांपडे । म्हणऊनिया ॥179॥
ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले असता त्याची स्तुति केली असे वाटत नाही, कारण जे मन व बुद्धि यांना सापडत नाही,
180-8
आणि आकारा आलिया जयाचे । निराकारपण न वचे । आकारलोपे न विसंचे । नित्यता गा ॥180॥
जे आकाराला आले असताही ज्याचे निराकारपण जात नाही, व आकाराचा नाश झाला असता ज्याची नित्यता बिघडत नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-8
म्हणोनि अक्षर जे म्हणिजे । तेवीचि म्हणता बोधुही उपजे । जयापरौता पैसु न देखिजे । या नामपरमगति ॥181॥
म्हणून ज्याला ‘ अक्षर’ म्हणतात, त्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो. त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही,
182-8
परि आघवा इही देहपुरी । आहे निजेलियाचे परी । जे व्यापारू करवी ना करी । म्हणऊनिया ॥182॥
आणि याचेच नाव परमगति. परंतु ते या शरीरांत व्यापून राहीलेले असुन निजल्याप्रमाणे आहे. का की, ते व्यापार करवीत नाही व करीतही नाही.
183-8
एऱ्हवी जे शारीरचेष्टा । त्यामाजी एकही न ठके गा सुभटा । दाही इंद्रियांचिया वाटा । वाहतचि आहाति ॥183॥
हे महावीरा अर्जुना, येरव्ही शरीराच्या सर्व व्यापारांत एकही व्यापार रहात नाही; दहाही इंद्रियांचे व्यापार चालूच आहेत.
184-8
उकलू विषयांचा पेटा । होता मनाचा चोहटा । तो सुखदुःखाचा राजवाटा । भीतराहि पावे ॥184॥
विषयरूप बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरू झाल्यावर, त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांचा मुख्य हिस्सा अंतर्यामीही प्राप्त होतो.
185-8
परि रावो पहुडलिया सुखे । जैसा देशीचा व्यापारू न ठके । प्रजा आपुलालेनि अभिलाखे । करितचि असती ॥185॥
परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे त्याच्या राज्यातील व्यापार रहात नाहीत, प्रजा आपापल्या (प्राप्तीच्या) इच्छेने व्यापार करीतच असते,
186-8
तैसे बुद्धीचे हन जाणणे । का मनाचे घेणे देणे । इंद्रियांचे करणे । स्फुरण वायूचे ॥186॥
त्याप्रमाणे, बुद्धिचे जाणणे किंवा मनाचे देणेघेणे, इंद्रियांचे करणे, व प्राणवायूंचे स्फुरण पावणे हे सर्व
187-8
हे देहक्रिया आघवी । न करिता होय बरवी । जैसा न चलवितेनि रवी । लोकु चाले ॥187॥
सर्व देहव्यापार त्याने न करविता आपोआपच होतात, ज्याप्रमाणे सूर्याने न चालविता लोकत्रय चालते,
188-8
अर्जुना तयापरी । सुतला ऐसा आहे शरीरी । म्हणोनि पुरूषु गा अवधारी । म्हणिपे जयाते ॥188॥
त्याप्रमाणे, अर्जुना, तो शरीरांत स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात असे समज;
189-8
आणि प्रकृति पतिव्रते । पडिला एकपत्नीव्रते । येणेही कारणे जयाते । पुरूषु म्हणो ये ॥189॥
आणि मायारूप पतिव्रतेच्या एकपत्नीव्रतांत पडल्यामुळे हा पुरुष हे नांव पावला आहे.
190-8
पै वेदाचे बहुवसपण । देखेचिना जयाचे आंगण । हे गगनाचे पांघरूण । होय देखा ॥190॥
परंतु वेदाच्या ज्ञानदृष्टीच्या महत्वाला ज्याचे आंगणही दृष्टीस पडत नाहीं, व ज्याच्यात आकाशाचा समावेश झाला आहे,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-8
ऐसे जाणूनि योगीश्वर । जयाते म्हणती परात्पर । जे अनन्यगतीचे घर । गिंवसीत ये ॥१९१॥
असे जाणूनच योगिजन त्याला परात्पर म्हणतात. तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्यांचे घरी येतो.
192-8
जे तनू वाचा चित्ते । नाइकती दुजिये गोष्टीते । तया एकनिष्ठेचे पिकते । सुक्षेत्र जे ॥१९२॥
जो एकनिष्ठ भक्त कायावाचामनेकरून दुसरे काही जाणत नाही, त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे ते उत्तम शेत होय.
193-8
हे त्रैलोक्यचि पुरूषोत्तम । ऐसा साच जयाचा मनोधर्मु । तया आस्तिकाचा आश्रमु । पांडवा गा ॥१९३॥
हे पांडवा, हे त्रैलोक्य भगवद्रूप आहे असा खरोखर ज्याचा मनोभाव आहे, त्या भक्ताचा हा आश्रमच होय.
194-8
जे निगर्वाचे गौरव । जे निर्गुणाची जाणीव । जे सुखाची राणीव । निराशासी ॥१९४॥
जे निरभिमान्यांचे वैभव, जे गुणातीतांचे ज्ञान व जे निस्पृहाचे सुखोपभोग घेण्याचे स्थान (राज्य),
195-8
जे संतोषिया वाढिले ताट । जे अचिंता अनाथाचे मायपोट । भक्ती उजू वाट । जया गावा ॥१९५॥
जे संतोषी जनाचे जेवण, जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागताचे मायपोट व जे भक्तीने चालणाराला मोक्षरूपी गावाची सरळ वाट.
196-8
हे एकैक सांगोनि वाया । काय फार करू धनंजया । पै गेलिया जया ठाया । तो ठावोचि होइजे ॥१९६॥
धनंजया, असे एकेक सांगून उगीच किती वर्णन करू ? परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य तद्रूपतेला पावतो.
197-8
हिंवाचिया झुळुका । जैसे हिंवचि पडे उष्णोदका । का समोर हालिया अर्का । तमचि प्रकाशु ॥१९७॥
थंडीच्या झुळकेने जसे ऊन पाणी थंड होते किंवा सूर्य समोर आल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो
198-8
तैसा संसारू जया गावा । गेला सांता पांडवा । होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ॥१९८॥
त्याप्रमाणे पांडवा, अज्ञान व त्याचे कार्य जग ज्या गावाला गेले असता आपणच मोक्ष होऊन रहाते.
199-8
तरी अग्नीमाजी आले । जैसे इंधनचि अग्नि जहाले । पाठी न निवडेचि काही केले । काष्ठपण ॥१९९॥
तसेच इंधन विस्तवात घातले असता विस्तवच होऊन राहते व मागून निवडू गेले असता त्याचे लाकूडपण दृष्टीस पडत नाही;
200-8
ना तरी साखरेचा माघौता । बुध्दिमंतपणेही करिता । परि ऊस नव्हे पंडुसुता । जियापरी ॥२००॥
किंवा, पंडुसुता, ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुनः चातुर्याने तिचा ऊस करिता येत नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-8
लोहाचे कनक जहाले । हे एके परिसेचि केले । आता आणिक कैचे ते गेले । लोहत्व आणी ॥201॥
लोखंडाचे एका परिसाने सोने बनले, नंतर कोणता दुसरा असा दगड आहे, की त्याचे गेलेले लोखंडपण परत आणील ?
202-8
म्हणोनि तूप होऊनि माघौते । जेवी दूधपण न येचि निरूते । तेवि पावोनिया जयाते । पुनरावृत्ति नाही ॥202॥
म्हणून, तुपाचे ज्याप्रमाणे पुनः खरोखर दूध होत नाही, त्याप्रमाणे, ज्याप्रत गेले असता पुनः जन्म नाही,
203-8
ते माझे परम । साचोकारे निजधाम । हे आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ॥203॥
त्याप्रमाणे, ज्याप्रत गेले असता पुनः जन्म नाही, ते माझे खरोखर उत्तम ठिकाण होय. हे गुह्य वर्म तुला स्पष्ट करून सांगितले आहे.
यत्र काले त्वानावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥8. 23॥
204-8
तेवीचि आणिकेही एके प्रकारे । जाणता आहे सोपारे । तरि देह सांडितेनि अवसरे । जेथ मिळती योगी ॥204॥
त्याचप्रमाणे, देहावसानानंतर ज्या स्वरुपाला योगी प्राप्त होतात, ते गुह्य वर्म आणखी एक प्रकाराने समजण्याला सोपे आहे.
205-8
अथवा अवचटे ऐसे घडे । जे अनवसरे देह सांडे । तरि माघौते येणे घडे । देहासीचि ॥205॥
अथवा अकस्मात् असे घडते की, जे योगी अकाली देह सोडतात, त्यांना पुनः देह धारण करावा लागतो.
206-8
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेवीती । तरी ठेवितखेवी ब्रह्मचि होती । एऱ्हवी अकाळी तरी येती । संसारा पुढती ॥206॥
त्यांना पुनः देह धारण करावा लागतो. म्हणून, शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले, तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात येरव्ही अकाली देहावसान झाल्यावर पुनः जन्मास येतात.
207-8
तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ति । या दोन्ही अवसराअधीन आहाती । तो अवसरू तुजप्रती । प्रसंगे सांगो ॥207॥
त्याचप्रमाणे, मोक्ष व पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. असा जो काल, तो प्रसंगानुसार तुला सांगतो.
208-8
तरि ऐके गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा । पांचै आपुलालिया वाटा । निघती अंती ॥208॥
तर हे महावीरा अर्जुना, ऐक. मरणकाल समीप आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने जातात.
209-8
ऐसा वरिपडिला प्रयाणकाळी । बुद्धीते भ्रमु न गिळी । स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥209॥
असा मरणकाल प्राप्त झाला असता बुद्धीला भ्रांति गिळीत नाही, स्मरणशक्ती अंधळी होत नाही, व मनही मरत नाही.
210-8
हा चेतनावर्गु आघवा । मरणी दिसे टवटवा । परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गवसणी होऊनि ॥210॥
ज्याने ब्रह्मभावाचा अनुभव घेतला आहे, तोच त्या ब्रह्माचा अंतर्यामी उपभोग घेतो. म्हणून हा सगळा प्राणसमुदाय मरणसमयी टवटवीत दिसतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-8
ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेऱ्ही निर्वाहो । हे तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ॥211॥
अशा रीतीने हा समुदाय सावध असतो; व ज्याला मरेपर्यंत इंद्रियांची मदत असते, असे साह्य जठराग्नि प्रदीप्त असला म्हणजेच मिळते.
212-8
पाहे पा वारेन का उदके । जै दिवियाचे दिवेपण झाके । तै असतीच काय देखे । दिठी आपुली ॥212॥
पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्या वेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्या वेळेस आपली दृष्टि विद्यमान असतांही तिला काही दिसते का ?
213-8
तैसे देहातींचेनि विषमवाते । देह आतबाहेरि श्लेष्माआते । तै विझोनि जाय उजिते । अग्नीचे ते ॥213॥
त्याचप्रमाणे देहावसानाच्या वेळेचा वात वाढल्याने शरीर आंतबाहेर कफाने व्याप्त होते, त्या वेळेस जठराग्निचे तेज विझून जाते,
214-8
ते वेळी प्राणासि पाणु नाही । तेथ बुद्धि असोनि करील काई । म्हणोनि अग्नीवीण देही । चेतना न थरे ॥214॥
त्या वेळेस प्राणाला अवसान नसते, मग बुद्धि असुनही काय करणार ? म्हणून अग्नीशिवाय देहांत चेतना रहात नाही.
215-8
अगा देहीचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला । वाया आयुष्यवेळु आपुला । अंधारे गिंवसी ॥215॥
हे पहा, शरीरांतील जठाराग्नि जर नाहींसा झाला, तर तो देह नसून ओला चिखलच होय. अशा वेळेस साधक आपल्या आयुष्याची वेळ अंधारांत शोधीत बसतो.
216-8
आणि मागील स्मरण आघवे । ते तेणे अवसरे सांभाळावे । मग देह त्यजूनि मिळावे । स्वरूपी की ॥216॥
नंतर पाठीमागील सर्व गोष्टीचे मरतेसमयी स्मरण होते. मग देह टाकून स्वरूपाला मिळावे कसे ?
217-8
तव तया देहश्लेष्माचे चिखली । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण ॥217॥
इतक्यात त्या देहाती कफाच्या चिखलांत चेतना बुडून गेल्यामुळे मागील व पुढील गोष्टीचे स्मरण नाहीसे होते.
218-7
म्हणोनि आधी अभ्यासु जो केला । तो मरण न येता निमोनि गेला । जैसे ठेवणे न दिसता मालवला । दीपु हातीचा ॥218॥
म्हणून पूर्वी जो योगाभ्यास केला तो मरण येण्याच्या आधी नाश पावतो. ज्याप्रमाणे आपण ठेविलेली वस्तु दिवा हातात घेऊन शोधण्याकरिता गेले असता ती दृष्टीस पडण्याच्या अगोदर दिवा जावा,
219-8
आता असो हे सकळ । जाण पा ज्ञानासि अग्नि मूळ । तया अग्नीचे प्रयाणी बळ । संपूर्ण आथी ॥219॥
त्याप्रमाणे, आता या सर्व गोष्टी राहू दे, तू हे समज की, ज्ञानाला जठराग्नि हा मूळ कारण आहे, आणि मरणसमयी सर्व बळ त्या अग्नीचेच असते.
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥8. 24॥
220-8
आंतु अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सा मासांमाजी मासु । उत्तरायण ॥220॥
शरीराच्या आत जठाराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश, बाहेर शुक्ल पक्षाचा पंधरवडा असून उत्तरायणातील कोणत्याही महिन्यापैकी एक महिना,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-8
ऐशिया समयोगाची निरूती । लाहोनि जे देह ठेविती । ते ब्रह्मविदचि होती । परब्रह्म ॥221॥
अशा प्रकारे सर्व गोष्टीची तयारी असता जे आपला देह ठेवितात,ते ज्ञानी ब्रह्मस्वरूपी मिळतात.
222-8
अवधारी गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवीचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावया पै ॥222॥
धनुर्धरा, ऐक. या वेळेच्या योगाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे, म्हणून मोक्षप्राप्तीकरिता स्वस्वरूपी येण्यास हा सरळ मार्ग आहे.
223-8
एथ अग्नि हे पहिले पायतरे । ज्योतिर्मय हे दुसरे । दिवस जाणे तिसरे । चौथे शुक्लपक्ष ॥223॥
या मार्गात जठराग्नि ही पहिली पायरी होय, अग्नीचे सतेजपण ही दुसरी पायरी; दिवस ही तिसरी पायरी; शुक्लपक्ष ही चौथी पायरी असे समज.
224-8
आणि सामास उत्तरायण । ते वरचील गा सोपान । येणे सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥224॥
आणि उत्तरायणांतील सहा महीन्यांपैकी एक महिना ही जिन्याची वरची पायरी, अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्षसिद्धिरूप घराला पावतो.
225-8
हा उत्तम काळु जाणिजे । याते अर्चिरादि मार्गु म्हणिजे । आता अकाळु तोही सहजे । सांगेन आईक ॥225॥
हा उत्तम काल असे समज, आणि याला अर्चिरादि मार्ग (प्राणोत्क्रमणाचा मार्ग) असे म्हणतात. आता मरण्यास अयोग्य काल कोणता तो प्रसंगानुसार तुला सांगतो, ऐक.
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योती प्राप्य निवर्तते ॥8. 25॥
226-8
तरि प्रयाणाचिया अवसरे । वात श्लेष्मा । तेणे अंतःकरणी आंधारे । कोंदले ठाके ॥226॥
मरणसमयी कफवातादि दोषांच्या भराने अंतःकरणात अंधार होऊन जातो,
227-8
सर्वेद्रिया लांकुड पडे । स्मृती भ्रमामाजी बुडे । मन होय वेडे । कोंडे प्राण ॥227॥
सर्व इंद्रियांची गति कुंठित होते; स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो; मन वेडावून प्राण घोटाळतो
228-8
अग्नीचे अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणे चेतना गिंवसिली ठाये । शरीरीची ॥228॥
अग्नीचे अग्निपण जाते व त्याचा चोहोंकडे धूरच होतो, त्यामुळे शरीरांतील ज्ञान दिपून जाते.
229-8
जैसे चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसे झांवळे होये ॥229॥
ज्याप्रमाणे चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश अशी झांजड पडते,
230-8
का मरे ना सावध । ऐसे जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद- । वेळु ठाकी ॥230॥
त्याचप्रमाणे, तो मरतही नाही व सावधही नसतो. अशा रीतीने शरीर नुसते पडलेले असते, व आयुष्य हे मरणाची वेळ पहात असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-8
ऐसी मनबुद्धिकरणी । सभोवती धूमाकुळाची कोंडणी । तेथ जन्मे जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥231 ॥
अशा प्रकारे बुद्धि व इंद्रिये यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडतो, त्या वेळेस जन्मभर मिळविलेले सर्व लाभ नाश पावतात.
232-8
हा गा हातीचे जे वेळी जाये । ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे । म्हणऊनि प्रयाणी तव होये । येतुली दशा ॥232॥
हे पहा, हातचे गेल्यावर मग पुनः लाभ होण्याची गोष्ट कशाला पाहिजे ? म्हणून मरणसमयी अशी दशा प्राप्त होते.
233-8
ऐसी देहाआंतु स्थिति । बाहेरि कृष्णपक्षु वरि राती । आणि सा मासही वोडवती । दक्षिणायन ॥233॥
याप्रमाणे देहातील आंतली स्थिती असुन बाहेर कृष्णपक्षाचा पंधरवडा असतो, व त्यात रात्र आणि दक्षिणायनांतील सहा महिन्यांपैकी एक महिना ही प्राप्त होतात.
234-8
इये पुनरावृतीची घराणी । आघवी एकवटती जयाचिया प्रयाणी । तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेनि आइके ॥234॥
हे सर्व जन्ममरणाच्या फेऱ्यात पाडणारे योग ज्यांच्या मरणसमयी एके ठिकाणी येतात, त्यांच्या कानी मोक्षप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार ?
235-8
ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणे घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥235॥
अशा वेळेवर ज्यांचे देहावसान होते, त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकापर्यंत जाता येते. मग तेथुन परतून तो फिरून जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो.
236-8
आम्ही अकाळ जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्ग गावा । पुनरावृत्तीचिया ॥236॥
हे पांडवा, आम्ही मरणास अयोग्य काळ म्हणून जो म्हटला, तो हाच असे समज, जन्ममरणाच्या गावास नेणारा धूम्रमार्ग हाच;
237-8
येर तो अर्चिरादि मार्गु । तो वसता आणि असलगु । साविया स्वस्थु चांगु । निवृतीवरी ॥237॥
याच्याशिवीय दुसरा जो अर्चिरादि मार्ग, तो भरवस्तीचा, सोपा, अति उत्तम व अगदी सुलभ असून मोक्षापर्यत गेलेला आहे.
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः ॥8. 26॥
238-8
ऐसिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥238॥
असे हे दोन मार्ग -एक सरळ आणि दुसरा वाकडा – अनादि कालापासून चालत आलेले आहेत. म्हणून, हे महावीरा, ते तुला बुद्धिपुरस्सर दाखविले.
239-8
का जे मार्गामार्ग देखावे । साच लटिके वोळखावे । हिताहित जाणावे । हिताचिलागी ॥239 ॥
का की, त्या मार्गापैकी चांगला कोणता व वाईट कोणता हे तुला दिसावे; आणि खरे खोटे ओळखून, आपले हित साधून घेण्याकरिता (त्वां) हित व अहित यांचाही विचार करावा.
240-8
पाहे पा नाव देखता बरवी । कोणी आड घाली काय अथावी । का सुपंथ जाणोनिया अडवी । रिगवत असे ॥240॥
हे पहा, उत्तम अशी नाव पाहिल्यावरही अथांग डोहांत कोणी उडी घालील काय ? किंवा राजमार्ग टाकून आडमार्गाला जाईल काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-8
जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडू शके । तेवि जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥ 241॥
जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो, तो अमृत टाकील का ? त्याचप्रमाणे, जो सरळ मार्ग पाहतो, तो आडमार्गाला जाणार नाही.
242-8
म्हणोनि फुडे । पारखावे खरे कुडे । पारखिले तरे न पडे । अवसरे कही ॥ 242॥
म्हणून प्रथम खऱ्या -खोट्याची पारख करावी. ती पारख झाली म्हणजे मग तो संकटात पडत नाही
243-8
एऱ्हवी देहाती थोर विषम । या मार्गाचे आहे संभ्रम । जन्मे अभ्यासिलियाचे हन काम । जाईल वाया ॥ 243॥
बाकी मरण समयी ह्या मार्गाची प्राप्ति होण्याला मोठमोठ्या संकटांची मोठी भीतिच आहे. अंतकाली याची प्राप्ति व्हावी म्हणून जन्मभर जरी अभ्यास केला तरी ते सर्व व्यर्थ होते.
244-8
जरी अर्चिरादि मार्गु चुकलिया । अवचटे धूम्रपंथे पडिलिया । तरी संसारपांती जुंतलिया । भंवतचि असावे ॥ 244॥
जर अर्चिरादि मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात् धूम्रमार्गात पडला, तर जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतून फिरत असतो.
245-8
हे सायास देखोनि मोठे । आता कैसेनि पा एकवेळ फिटे । म्हणोनि योगमार्गु गोमटे । शोधिले दोन्ही ॥ 245॥
अशी ही मोठाली संकटे पाहून, ती कशाने दुर होतील म्हणून, दोन्ही योगमार्गाचे चांगले स्पष्टीकरण केले.
246-8
तव एके बह्मत्वा जाइजे । आणि एके पुनरावृत्ते येइजे । परि दैवगत्या जो लाहिजे । देहाती जेणे ॥ 246॥
तेंव्हा, एका मार्गाने योगी मोक्षाला जातो, आणि दुसऱ्या मार्गाने जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो, परंतु देहावसानाच्या वेळेस दैवगतीने ज्याला जो प्राप्त होईल तो खरा.
नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्याति कश्चने ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगसुक्तो भवार्जुन ॥8. 27॥
247-8
ते वेळी म्हणितले हे नव्हे । वाया अवचटे काय पावे । देह त्यजुनि वस्तु होआवे । मार्गेचि की ॥ 247॥
अकस्मात् कोणत्या वेळेस काय प्राप्त होईल याचा काही नेम आहे ? म्हणून ही गोष्ट राहू दे. तर देहाती ब्रह्मप्राप्ती करून घेण्यास मार्गच कशाला हवा ?
248-8
तरी आता देह असो अथवा जावो । आम्ही तो केवळ वस्तूचि आहो । का जे दोरी सर्पत्व वावो । दोराचिकडुनी ॥ 248॥
तर देह मग राहो अथवा जावो, आम्ही केवळ ब्रह्मच आहो असे ज्ञानी समजतात. कारण, दोरीवरील सर्पाचा भास जसा दोरीचे सत्यत्व भासल्यावर दोरीचे ज्ञानासह व्यर्थ होतो;
249-8
मज तरंगपण असे की नसे । ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे । ते भलतेव्हा जैसे तैसे । उदकचि की ॥ 249॥
आपल्यावर लाटा येतात किंवा नाहींतशा होतात, याचा पाण्याला कधी भास होतो काय ? कारण ते केव्हांही पाहिजे तरी पाणीच्या पाणीच कायम असते,
250-8
तरंगाकारे न जन्मेचि । ना तरंगलोपे न निमेचि । ते विदेही जे देहेचि । वस्तु जाहले ॥ 250॥
ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही, किंवा लाटा नाहींतशा झाल्यावर ते नाश पावत नाही, त्याप्रमाणे, देहांत राहून जे देहासुद्धा ब्रह्म झाले,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-8
आता शरीराचे तयाचिया ठाई । आडनांवही उरले नाही । तरि कोणे काळे काई । निमे ते पाहे पा ॥251॥
देहासकट ब्रह्म झाल्यावर त्यांच्या ठिकाणी देहाचे नुसते आडनांव सुद्धा रहात नाही. मग असे पहा की, कोणच्या वेळेस कशाचा लय होतो.
252-8
मग मार्गाते कासया शोधावे । कोणे कोठूनि के जावे । जरी देशकालादि आघवे । आपणचि असे ॥252॥
जर देश, काल इत्यादि गोष्टी तो आपणच होऊन राहीला आहे, तर मग कोणीकडून कसे जावे ? इत्यादि ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा ?
253-8
आणि हा गा घटु जे वेळी फुटे । ते वेळी तेथीचे आकाश लागे नीटे वाटे । वाटा लागे तरि गगना भेटे । एऱ्हवी काय चुके ॥253॥
आणि ज्या वेळेस घट फुटतो, त्या वेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागल्यावरच आकाशाला भेटते, नाही तर चुकते की काय ?
253-8
पाहे पा ऐसे हन आहे । की तो आकारूचि जाये । येर गगन ते गगनीचि आहे । घटत्वाहि आधी ॥254॥
हे पहा -खरी गोष्ट अशी आहे की, त्या घटाच्या आकाराचाच नाश होतो; येरव्ही घटाकाश हे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून मूळचेच आकाशरूपी आहे.
255-8
ऐसिया बोधाचेनि सुरवाडे । मार्गामार्गाचे सांकडे । तया सोऽहंसिद्धा न पडे । योगियांसी ॥255॥
अशा ज्ञानाच्या साधनाने, आपण ब्रह्मच आहो असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या व वाईट मार्गाचे संकट पडत नाही
256-8
याकारणे पंडुसुता । तुवा होआवे योगयुक्ता । येतुलेनि सर्वकाळी साम्यता । आपणपा होईल ॥256॥
यास्तव, हे पंडुसुता, तू योगयुक्त हो, त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरुपता प्राप्त होईल.
257-8
मग भलतेथ भलतेंव्हा । देहबंध असो अथवा जावा । परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाही ॥257॥
मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असो वा जावो. परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्मस्वरूपाला अंतर पडणार नाही.
258-8
तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांती मरणे नाप्लवे । माजी स्वर्गसंसाराचेनि लाघवे । झकवेना ॥258॥
तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही, सृष्टीच्या अंती मरण पावत नाही, तसेच सृष्टीच्या स्थितीत स्वर्ग व संसारसुख यांच्या मोहाने कधी फसत नाही.
259-8
येणे बोधे जो योगी होये । तयासीचि या बोधाचे नीटपण आहे । का जे भोगाते पेलूनि पाहे । निजरूपा ये ॥259॥
त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते. कारण, तो विषयोपभोगाला तोलून पाहून ब्रह्मरूपाला मिळतो.
260-8
पै गा इंद्रादिका देवा । जया सर्वस्वे गाजती राणिवा । ते सांडणे मानूनि पांडवा । डावली जो ॥260॥
हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नेहमी सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग मिळतो, ते सुख त्याज्य मानून तो दूर लोटतो.
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदेत्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥8. 28॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः ॥8॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-8
जरी वेदाध्ययनाचे जाले । अथवा यज्ञाचे शेतचि पिकले । की तपोदानांचे जोडले । सर्वस्व हन जे ॥261॥
जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला, अथवा यज्ञ करून पुण्य पेरून ठेविले, किंवा तप आणि दान करून पुण्य जोडले,
262-8
तया आघवा पुण्याचा मळा । भार आंतौनि जया ये फळा । ते परब्रह्मा निर्मळा । सांटी न सरे ॥262॥
अशा प्रकारचा सर्व पुण्याचा मळा जरी फळांच्या भाराने व्यापून गेला, तरी त्या निर्मळ ब्रह्माचा बरोबरी कोणाच्यानेंही करवत नाही.
263-8
जे नित्यानंदाचेनि माने । उपमेचा कांटाळा न दिसे साने । पाहा पा वेदयज्ञादि साधने । जया सुखा ॥263॥
जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता लहान दिसते व ज्याच्या प्राप्ताकरता वेदयज्ञादि साधने करावी लागतात;
264-8
जे विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडे पुरे । पुढती महासुखाचे सोयरे । भावंडचि ॥264॥
जे स्वर्गसुख विटत नाही, व संपतही नाही, भोगणाराच्या इच्छा पूर्ण करते, व जे महासुखाचे (ब्रह्मसुखाचे) धाकटे भावंडच होय,
265-8
ऐसे दृष्टीचेनि सुखपणे । जयासी अदृष्टाचे बैसणे । जे शतमखाही आंगवणे । नोहेचि एका ॥265॥
अशाप्रमाणे वरकांती दिसनारे ते सुख, व जे मरणानंतरच प्राप्त होते, आणि जे शंभर यज्ञ करूनही साध्य होत नाही
266-8
तयाते योगीश्वर अलौकिके । दिठीचेनि हाततुके । अनुमानती कौतुके । तव हळुवार आवडे ॥266॥
योगोश्वर दिव्यदृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहू गेले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे सुक्ष्म वाटते.
267-8
मग तया सुखाची किरीटी । करुनिया गा पाउटी । परब्रह्मचिये पाटी । आरूढती ॥267॥
मग अर्जुना, त्या स्वर्गसुखाची पायरी करून ते ब्रह्मपदावर चढतात.
268-8
ऐसे चराचरैकभाग्य । जे ब्रह्मेशा आराधनेयोग्य । योगियांचे भोग्य- । भोगधन जे ॥268॥
याप्रमाणे स्थावरजंगमाचे मुख्य भाग्य, जे ब्रह्मदेव व शंकर यांनी आराधाना करण्यास योग्य, व योग्याची उपभोग घेण्याची वस्तु,
269-8
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । तो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ॥269॥
जो आद्य ज्ञानस्वरूप, जो परमानंदाची केवळ मूर्ति, जो सर्व विश्वातील प्राणिमात्राचे जीवन, जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा,
270-8
जो सवर्ज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळीचा कुळदिवा । तो श्रीकृष्णजी पांडवा- । प्रति बोलिला ॥270॥
जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा, व यादवकुलाचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाला बोलला.
271-8
ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु । तेचि परियेसा पुढा मातु । ज्ञानदेव म्हणे ॥271॥
असा कुरुक्षेत्रांतील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञानदेव म्हणतात, ती कथा पुढे ऐका.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
॥इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकाया अक्षरब्रह्म योगोनाम् अष्टमोऽध्याय:॥8॥
। सच्चिदानन्दार्पणमस्तु ।
—————संपुर्ण————
ज्ञानेश्वरी अध्याय 8 समाप्त
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक


















