आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय ६ वा आत्मसंयमयोग:
शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 6: ATMASYAMYOGA::
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावा॥आत्मसंयमयोग: ।
अध्याय सहावा
1-6
मग रायाते म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सागंती जो । योगरुप ॥1॥
मग संजय राजा धृतराष्ट्रस म्हणाला, जो अष्टांगयोगासंबंधी जो योगरूप अभिप्राय भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत, तो आता श्रवण करा.
2-6
सहजे ब्रह्मरसाचे पारणे । केले अर्जुनालागी नारायणे । की तेचि अवसरी पाहुणे । पातलो आम्ही ॥2॥
श्रीकृष्णांनी, नारायनांनी अर्जुनाकरिता भोजनाचा उत्तम प्रसंग सहज केला होता जणू ब्रम्हरसांचे पारणे केले होते, त्याचवेळी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो.
3-6
कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसे तान्हेलिया तोय सेविजे । की तेचि चवी करुनि पाहिजे । तव अमृत आहे ॥3॥
खरोखर दैव किती थोर आहे, हे कळत नाही. तहान लागलेल्या माणसाने पाणी पिण्यास घ्यावे आणि त्याची चव घेताच ते पाणी नसून अमृत आहे, असे कळावे.
4-6
तैसे आम्हा तुम्हा जाहले । जे आडमुठी तत्व फावले । तव धृतराष्ट्रे म्हणितले । हे न पुसो तूते ॥4॥
तसे आम्हाला आणि तुम्हाला झाले आहे. मिळण्याचा काही संबंध नसताना ब्रम्हज्ञान आपणास प्राप्त झाले. त्यावेळी धृतराष्ट म्हणाला, ” या ब्रम्हज्ञाना संबधी मी काही विचारले नाही. तर मग तू का बरे सांगतोस ?
(येथे मी पण आला आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, असो)
5-6
तया संजया येणे बोले । रायाचे हृदय चोजवले । जे अवसरी आहे घेतले । कुमारांचिया ॥5॥
या बोलण्यामुळे धृतराष्ट्राचे अंतःकरणं कसे आहे, हे संजयला कळून आले. धृतराष्ट्र आपल्या पुत्रांची हकीकत ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. (मुलांविषयीच्या स्नेहाने धृतराष्ट्राचे मन या वेळी घेरलेले त्याच्या लक्षात आले) हे त्याला कळाले.
6-6
हे जाणोनि मनी हांसिला । म्हणे म्हातारा मोहे नाशिला । एऱ्हवी बोलु तरी भला जाहला । अवसरी ये ॥6॥
हे लक्षात येताच संजय मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, हे वयोवृद्ध धृदत्तराष्ट्र मोहामुळे कामातून गेला आहे. एरवी विचार करून पहिले, तर श्रीकृष्णांनी सांगितलेले विचार अतिशय चांगले आहेत.
7-6
परि तै तैसे कैसेनि होईल । जात्यंधा कैसे पाहेल । तेवीचि येरु से घेईल । म्हणौनि बिहे ॥7॥
परंतु या सुखसंवादाची गोडी याला कशी लागणार ? कारण तो जन्मापासूनच आंधळा आहे, त्याला कसे उजाडेल ? ही गोष्ट जर धृतराष्ट्रस तशी उघड सांगितली तर तो मनामध्ये द्वेष धरील, म्हणून संजय स्पष्ट बोलायला घाबरला.
8-6
परि आपण चित्ती आपुला । निकियापरि संतोषला । जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥8॥
परंतु संजय मात्र आपल्याला श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद अनायासे प्राप्त झाला म्हणून अतिशय संतुष्ट झाला.
9-6
तेणे आनंदाचेनि धालेपणे । साभिप्राय अंतःकरणे । आता आदरेसी बोलणे । घडेल तया ॥9॥
त्या अलौकिक आनंदाच्या तृप्तीने आणि श्रीकृष्णाचा अभिप्राय अंतःकरणात दृढ झाल्यामुळे संजयकडून आता श्रद्धापूर्वक पुढील बोलणे घडेल.
10-6
तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा । जैसा क्षीरार्णवी अमृताचा । निवाडु जाहला ॥10॥
त्याप्रमाणे हा सहावा अध्याय गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-6
तैसे गीतार्थाचे सार । जे विवेकसिंधूचे पार । नाना योगविभवभांडार । उघडले का ॥11॥
त्याप्रमाणे हा सहावा अध्याय म्हणजे भगवतगीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विवेकरूपी (विचाररूपी) सागराच्या पलीकडचा किनारा आहे. अथवा (श्रोत्यांना म्हणतात) हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय.
12-6
जे आदिप्रकृतीचे विसवणे । जे शब्दब्रह्मासि न बोलणे । जेथूनि गीतावल्लीचे ठाणे । प्ररोहो पावे ॥12॥
जे मूळ मायेचे विश्रांतीस्थान आहे, ज्याचे वर्णन वेदलाही करता आले नाही, जेथून गीतारुपी वेलीचा अंकुराचे वाढीला लागलेले आहे,
13-6
तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा । सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥13॥
असा हा सहावा अध्याय सर्व रस-अलंकारांनी युक्त अशा भाषेत सांगितला जाईल. म्हणून श्रीत्यांनी एकाग्र चित्ताने तो श्रवण करावा.
14-6
माझा मराठाचि बोलु कौतुके । परि अमृतातेही पैजासी जिंके । ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ॥14॥
असे हे माझे मराठी प्रतिपादन मराठी भाषेत आहे. परंतु गोडीच्या बाबतीत ते अमृतादेखील प्रतिज्ञेने जिंकू शकेल. अशा तऱ्हेची रस-अलंकार युक्त अमृतमधुर शब्दांची रचना करेन.
15-6
जिये कोवळिकेचेनि पाडे । दिसती नादीचे रंग थोडे । वेधे परिमळाचे बीक मोडे । जयाचेनि ॥15॥
ज्या भावमधुर कोमल शब्दांच्या मनाने सप्तस्वरातून निर्माण होणारे स्वरदेखील कमी योग्यतेचे दिसतील आणि ज्या शब्दांच्या आकर्षणाने सुगंधाचे सामर्थ्यदेखील कमी भाषेल.
16-6
ऐका रसाळपणाचिया लोभा । की श्रवणींचि होति जिभा । बोले इंद्रिया लागे कळंभा । एकमेका ॥16॥
अशा रसमधुर्ययुक्त शब्दांच्या लोभाने कानांनादेखील जिभा निर्माण होतील. या अर्थपूर्ण शब्दांमुळे इंद्रियामध्ये परस्परात भांडण लागेल.
17-6
सहजे शब्दु तरि विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥17॥
वास्तविक पाहता शब्द हा कानाचा विषय आहे; परंतु जिव्हा म्हणेल, हा शब्द माझा रसविषय आहे. तसेच नाकाला वाटेल की, ह्या शब्दांच्या माध्यमातून मला विविध प्रकारचे सुवास प्राप्त होतील, तर हा शब्द रस आणि सुगंध होईल.
18-6
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखता डोळ्यांही पुरो लागे धणी । ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे ॥18॥
आश्चर्य असे की, या काव्यशब्दांतील भावंचित्रांची मालिका पाहून डोळ्यांनाही तृप्ती लाभेल आणि डोळे म्हणतील, ही तर रूपाची खाणच उघडली आहे.
19-6
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धावे बाहिरे । बोलु भुजाहि आविष्करे । आलिंगावया ॥19॥
ज्या वेळी मधुर शब्द जुळून अमृतमय वाक्य मुखातून प्रगटेल, त्या वेळी त्याला जाणण्यासाठी मन बाहेर धावेल आणि बाहुदेखील त्या चैत्यन्यमय शब्दांना आलिंगन देण्याकरिता सरसावतील.
20-6
ऐशी इंद्रिये आपुललिया भावी । झोंबती परि तो सरिसेपणेचि बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥20॥
याप्रमाणे सर्व इंद्रिय आपल्या विषयांच्या भावनेने या शब्दांना झोंबतील; परंतु ते शब्द सर्वाचे सारखे समाधान करतील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य आपल्या हजारो किरणांनी सर्व जगाला जागे करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-6
तैसे शब्दाचे व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातया भावज्ञा फावती गुण । चिंतामणीचे ॥21॥
त्याप्रमाणे या भावमधुर शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे, असे जाणावे. या शब्दांचे चिंतन करून त्यातील अभिप्राय जाणणाऱ्यास यामध्ये चिंतामणीसारखे अलौकिक गुण दिसून येतील.
22-6
हे असोतु या बोलाची ताटे भली । वरी कैवल्यरसे वोगरिली । ही प्रतिपत्ति मिया केली । निष्कामासी ॥22॥
हे असो. सारांश, ही शब्दरूपी उत्तम ताटे आहेत आणि त्यामध्ये मोक्षरूपी मिष्टान्न वाढलेली आहेत. निष्कमी लोकांना या ग्रंथरूपी मेजवणीची पर्वणी आहे.
23-6
आता आत्मप्रभा नीच नवी । तेचि करुनी ठाणदिवी । जो इंद्रियाते चोरुनि जेवी । तयासीचि फावे ॥23॥
या मेजवणीच्या उजेडासाठी नित्यनुतन अशी आत्मज्योतीची चिमणीसारखी दिवटी करून त्या प्रकाशात जो इंद्रियांना न कळत मेजवाणीचे सेवन करतो, त्यालाच मोक्षरूप आनंदाचा लाभ होतो.
24-6
येथ श्रवणाचेनि पांगे- । वीण श्रोतया होआवे लागे । हे मनाचेनि निजांगे । भोगिजे गा ॥24॥
शब्दाचे प्रयेक्ष ज्ञान होण्यासाठी श्रोतेंद्रियाची आवश्यकता असते, परंतु शब्दांचा जो अर्थ ब्रम्हरूप मोक्ष, त्याचा अनुभव होण्यासाठी मन अंतर्मुख करावे लागते.
25-6
आहाच बोलाचि वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगाघडिजे । मग सुखेसी सुरवाडिजे । सुखाचिमाजी ॥25॥
वरवर असलेले शब्दाचे कवच फोडले पाहिजे आणि आत असलेल्या ब्रम्हस्वरूपाशी एकरूप झाले पाहिजे. म्हणजे शब्दश्रवणजन्य सुखासह ब्रम्हसुखात रंगून जात येते.
26-6
ऐसे हळुवारपण जरी येईल । तरीच हे उपेगा जाइल । एरव्ही आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥26॥
असे जर ब्रम्हस्वरूपाशी एकरूप होता येईल, तरच मी सांगितलेल्या निरुपणाचा उपयोग होईल; नाहीतर मुक्याने सांगावे आणि बहिऱ्याने ऐकावे, अशी अवस्था होईल.
27-6
परी ते असो आता आघवे । नलगे श्रोतयाते कडसावे । जे एथ अधिकारिये स्वभावे । निष्कामकामु ॥27॥
परंतु आता हे सर्व असु दे. श्रोत्यांना सावध करण्याची आवश्यकता नाही. कारण या ठिकाणी निष्काम भावनेने परब्रह्मची इच्छा करणारे अधिकारसंपन्न श्रोते आहेत,
28-6
जिही आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराचि कुरोंडी । ते वाचुनी एथीची गोडी । नेणती आणिक ॥28॥
ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने, संसार व स्वर्ग यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे, अशा विरक्त मानवाशिवाय इतर लोक या अध्यात्मातील अमृतमधुर गोडी समजू शकणार नाहीत.
29-6
जैसा वायसी चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृती नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेवि खाजे । चकोराचे ॥29॥
ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्रांतून प्रगटणाऱ्या आनंददायी किरणांची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयामध्ये आसक्त लोकास हे प्रतिपादन समजणार नाही; आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे चकोराचे खाद्य आहे,
30-6
तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । अज्ञानासी आन गावो । म्हणौनि बोलावया विषय पहाहो । विशेषे नाही ॥30॥
त्याप्रमाणे जे अध्यात्मज्ञानी / आत्मज्ञानी आहेत, त्यांना हा ग्रन्थ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे आणि जे बाह्य विषयातच रमणारे अज्ञानी आहेत, त्यांना हा ग्रंथ परक्या गावाप्रमाणे आहे, म्हणून याविषयी विशेष बोलण्याचे कारण नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-6
परी अनुवादलो मी प्रसंगे । ते सज्जनी उपसाहावे लागे । आता सांगेन काय श्रीरंगे । निरोपिले जे ॥31॥
प्रसंगाने मी जे बोललो, त्याबद्दल सज्जनांनी मला क्षमा करावी, आता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितले, ते मी सांगेन.
32-6
ते बुध्दीही आकळिता सांकडे । म्हणऊनि बोली विपाये सांपडे । परि निवृत्तिकृपादीपउजियेडे । देखेन मी ॥32॥
ते परब्रम्ह बुद्धीला आकलन करण्यास कठीण आहे, परंतु शब्दातअधिकारसंपन्न पुरुषास सापडेल. परंतु मी सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपाप्रकाशात परब्रम्ह प्रत्यक्ष पाहीन आणि सर्वाना सांगेन.
33-6
जे दिठीही न पविजे । ते दिठीविण देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥33॥
जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त झाले, तर जे दृष्टीला दिसत नाही, ते दृष्टीशिवाय स्पष्टपणे पाहता येते.
34-6
ना तरी जे धातुवादाही न जोडे । ते लोहीचि पंधरे सापडे । जरी दैवयोगे चढे । परिसु हाता ॥34॥
जर दैवयोगाने हातात परीस आला, तर किमयागारास जे न मिळणारे, ते सोने लोखंडात सापडते.
35-6
तैसी सद्गुरुकृपा होये । तरी करिता काय आपु नोहे । म्हणौनि ते अपार माते आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥35॥
त्याप्रमाणे जर सद्गुरूंची कृपा होईल, तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही ? ज्ञानदेव म्हणतात, माझ्यावर ती कृपा अपार / अलोट आहे.
36-6
तेणे कारणे मी बोलेन । बोली अरुपाचे रुप दावीन । अतींद्रिय परि भोगवीन । इंद्रियांकरवी ॥36॥
त्या सद्गुरुंच्या कृपाप्रसादाने मी बोलू शकेन. ब्रम्ह हे अरुप असले, तरी मी त्याचे स्वरूप दाखवीण. ते अतेंद्रिय खरे; परंतु ते इंद्रियकडुन भोगवीन.
37-6
आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥37॥
हे पाहा, यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, आणि ऐश्वर्य हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात;
38-6
म्हणोनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु । तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होई आता ॥38॥
म्हणून त्या श्रीकृष्णाला भगवान असे म्हणतात. जो सर्वसंग परित्याग करणाऱ्यांच्या सोबती आहे, तो अर्जुनाला म्हणाला, आता माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दे.
श्रीभगवानुवाचः अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥6. 1॥
भावार्थ :-
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो कर्माच्या फलाची इच्छा न करता विहित कर्म करतो, तो संन्यासी व योगी आहे. केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी अथवा योगी नाही.
39-6
आइके योगी आणि संन्यासी जनी । हे एकचि सिनाने झणी मानी । एऱ्हवी विचारिजती जव दोन्ही । तव एकचि ते ॥39॥
हे अर्जुना ! ऎक. या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. ते वेगळे आहेत, असे तू मानू नकोस. सूक्ष्म विचार करून पहिले, तर दोन्ही एकच आहेत.
40-6
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगी तोचि संन्यासु । पहाता ब्रह्मी नाही अवकाशु । दोहीमाजी ॥40॥
संन्यास आणि योग या दोन नावांचा भ्रम टाकून दिला, तर योग संन्यास व संन्यास तोच योग होय. तत्वतः जाणले, तर ब्रम्हस्वरूपाच्या ठिकाणी या दोघात भेदाला अवकाश / अंतर नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-6
जैसे नामाचेनि अनारिसपणे । एका पुरुषाते बोलावणे । का दोही मार्गी जाणे । एकचि ठाया ॥41॥
ज्याप्रमाणे (अण्णा, काका, बाबा किंवा दादा) एकाच पुरुषास वेगवेगळ्या नावानी हाक मारतात, किंवा काही ठिकाणी दोन मार्ग असतात; पण दोन्ही मार्गानी एकाच स्थानास आपण पोहचतो,
42-6
नातरी एकचि उदक सहजे । परी सिनाना घटी भरिजे । तैसे भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचे ॥42॥
किंवा स्वभावतः सर्व पाणी एकच असते; परंतु निरनिराळ्या घागरीत भरले की ते वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे साधनमार्गाच्या भेदामुळे योग व संन्यास यांचा वेगळेपणा दिसण्यापूरता आहे.
43-6
आइके सकळ संमते जगी । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्मे करुनि रागी । नोहेचि फळी ॥43॥
हे अर्जुना ! ऎक. जो सत्कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही, तोच या जगी योगी होय. हे सर्व संत – म्हणतांना मान्य आहे.
44-6
जैसी मही हे उद्भिजे । जनी अहंबुध्दीवीण सहजे । आणि तेथीची तिये बीजे । अपेक्षीना ॥44॥
ज्याप्रमाणे पृथ्वी सहजपणे अनेक वृक्ष वेलींना जन्म देते; पण तिला कोणत्याही प्रकारच्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो, तसेच वृक्षाला लागलेल्या फळांची ती अपेक्षा करत नाही,
45-6
तैसा अन्वयाचेनि आधारे । जातीचेनि अनुकारे । जे जेणे अवसरे । करणे पावे ॥45॥
त्याप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि पूर्वजन्मातील कर्मप्रमाणे ज्या काळी जे विहित कर्म म्हणून प्राप्त झाले आहे,
46-6
ते तैसेचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरी । आणि बुध्दीही करोनि फळवेरी । जायेचिना ॥46॥
ते सर्व कर्म यथाविधी करून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ देत नाही आणि बुद्धीला फळाच्या अपेक्षेकडे जाऊ देत नाही,
47-6
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसी । तोचि भरवसेनिसी । योगीश्वरु ॥47॥
हे अर्जुना ! ऎक. असा जो पुरुष, तोच संन्यासी आणि निःसंशय योगीराज आहे असे समज.
48-6
वाचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयाते म्हणे हे सांडीन बध्दक । तरी टांकोटांकी आणिक । मांडिचि तो ॥48॥
याशिवाय जो कोणी प्रसंगाने प्राप्त जे विहित कर्म, त्याला बंधनकारक म्हणतो, तो पहिले कर्म त्यागताच दुसऱ्या कोणत्या तरी कर्माचा आरंभ करत असतो.
(दुसरे कर्म करण्याचे आरंभीतो)
49-6
जैसा क्षाळुनिया लेपु एकु । सवेचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वाया ॥49॥
जसे अंगाला लावलेला एक लेप धुऊन ताबडतोब दुसरा लेप लावावा, त्याप्रमाणे जो आग्रही असतो, तो व्यर्थच विवंचना करत बसतो. (कष्टात पडतो)
50-6
गृहस्थाश्रमाचे वोझे । कपाळी आधीच आहे सहजे । की तेचि संन्याससवा ठेविजे । सरिसे पुढती ॥50॥
आधीच डोक्यावर गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरिता संन्यास घेतला, तर त्याचबरोबर पुनः संन्यास – आश्रमातील कर्माचे ओझे डोक्यावर घेतो;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-6
म्हणौनि अग्निसेवा न सांडिता । कर्माची रेखा नोलांडिता । आहे योगसुख स्वभावता । आपणापाचि ॥51॥
म्हणून ग्रहस्थाश्रमात अग्निहोत्र न त्यागता, कर्मचरणाची मर्यादा उल्लंन्घन न करता योगसुख स्वभावतःच आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे.
यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विध्दि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्त्यसंकल्पो योगी भवनि कश्चन ॥6. 2॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! ज्याला संन्यास म्हणतात, त्यालाच तू योग असे समज. जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करत नाही, तो कोणी योगी होत नाही.
52-6
ऐके संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगी । गुढी उभविली अनेगी । शास्त्रांतरी ॥52॥
हे अर्जुना ! ऐक. जो संन्यासी, तोच योगी होय, अशी अनेक शस्त्रांनी एकवाक्यतेची गुढी उभारली आहे.
53-6
जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचे सार भेटे । ऐसे हे अनुभवाचेनि धटे । साचे जया ॥53॥
ज्या वेळी कर्म करीत असतानाही फळाचा त्याग करणारा संकल्प नाहीसा होतो, त्यावेळी कर्मसंन्यास योगाचे तत्व अनुभवाच्या तराजूने तंतोतंत प्राप्त होते.
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारुढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥6. 3॥
भावार्थ :-
योगप्राप्तीची इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे. योगप्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन आहे.
54-6
आता योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणी ॥54॥
अर्जुना ! योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्याला पोहचावयाचे असेल, त्याने कर्ममार्गाच्या पायर्यांनी चढून जाण्यास चुकू नये.
55-6
येणे यमनियमाचेनि तळवटे । रिगे असनाचिये पाउलवाटे । येई प्राणायामाचेनि आडकंठे । वरौता गा ॥55॥
तो यम- नियमाच्या पायथ्यापासून निघून आसनांच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने चढून वर येतो.
56-6
मग प्रत्याहाराचा आधाडा । बुध्दीचियाहि पाया निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥56॥
नंतर प्रत्याहार हा तुटलेला कडा लागतो. त्यावरून बुद्धीचेही पाय निसटतात. त्या ठिकाणी कडा चढून जाणारे हटयोगीदेखील योगपर्वताच्या माथ्यावर चढून जाण्याची प्रतिज्ञा मागे घेतात.
57-6
तरी अभ्यासाचेनि बळे । प्रत्याहारी निराळे । नखी लागेल ढाळे ढाळे । वैराग्याची ॥57॥
तरी आत्मस्वरूपाच्या अभ्यासाच्या बळाने, चढण्यास आधार नसलेल्या प्रत्याहाररुपी कड्यावर वैराग्यरूपी नखी ही घोरपडीसारखी हळूहळू चिकटेल; त्यामुळे वर चढण्यास आश्रय लाभेल.
58-6
ऐसा पवनाचेनि पाठारे । येता धारणेचेनि पैसारे । क्रमी ध्यानाचे चवरे । सांडे तव ॥58॥
अशा प्रकारे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारनेच्या विशाल मार्गाने वाटचाल करून तो ध्यानाचे शिखर गाठतो.
59-6
मग तया मार्गाची धाव । पुरेल प्रवृत्तीचि हांव । जेथ साध्यसाधना खेंव । समरसे होय ॥59॥
मग त्या योगमार्गाची धाव पूर्ण होते; मनाची हाव संपून जाते. त्या अवस्थेत ब्रम्हाशी एकरूपता प्राप्त झाल्यामुळे साधना व साध्य हे मिटून जातात.
60-6
जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावे ते ठाके । ऐसिया सरिसीये भूमिके । समाधी राहे ॥60॥
ज्या अवस्थेत पुढील भविष्यकाळाचा विस्तार बंद पडतो आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे स्मरण बंद होते, अशा ऐक्याच्या भूमिकेवर समाधी लागते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-6
येणे उपाये योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगेन आइके ॥61॥
जो (यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी) या उपायांनी / मार्गानी योगनिष्णात / योगारुढ झाला, त्या योगी पुरुषाची चिन्हे तुला निवडून सांगतो, ती श्रवण कर.
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसंकल्पसंन्यासी योगारुढस्तदोच्यते ॥6. 4॥
भावार्थ :-
जेंव्हा इंद्रियांच्या उपभोगात तो आसक्त होत नाही आणि कर्मातदेखील आसक्त होत नाही, त्या सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या पुरुषाला / योग्याला योगारुढ म्हणतात.
62-6
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाही विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाचिया वोवरा । पहुडला असे ॥62॥
तर ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे येणे- जाणे होत नाही. आणि जो आत्मबोधाच्या घरात शांत निजलेला असतो,
63-6
जयाचे सुखदुःखाचेनि आंगे । झगटले मानस चेवो नेघे । विषय पासीही आलिया से न रिगे । हे काय म्हणउनि ॥63॥
ज्याच्या मनाला सुख दुःखाणी कितीही धक्के दिले, तरी ते मन जागृत होत नाही. विषय जवळ आले तरी देखील हे काय आहे, म्हणून ज्याला स्मरणही होत नाही;
64-6
इंद्रिये कर्माच्या ठायी । वाढीनली परी कही । फळहेतूची चाड नाही । अंतःकरणी ॥64॥
ज्याची इंद्रिये कर्मे करीत असली परंतु ज्याच्या अंतःकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न होत नाही,
65-6
असतेनि देहे एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वोळखे तू ॥65॥
जो देहधारी असला, तरी विदेही अवस्थेला पोहचलेला असतो, जो व्यवहाराने जागा असूनदेखील परमात्म्यामुळे वृत्तीशून्य अवस्थेला पोहचलेला असतो, त्यामुळे तो निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य दिसतो, तोच श्रेष्ठ योगारूढ आहे, असे जाणावे.
66-6
तेथ अर्जुन म्हणे अनंता । हे मज विस्मो बहु आइकता । सांगे तया ऐसी योग्यता । कवणे दीजे ॥66॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे अनंता, तुझे बोलणे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. एवढी महान योग्यता त्या योगारूढाला कोणी दिली, ते आपण मला सांगा.
उध्दरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत ।
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥6. 5॥
भावार्थ :-
मानवाने स्वतः स्वतःचा उद्धार करावा. आपण आपला घात करू नये. मानव आपणच आपला हितकर्ता मित्र आहे आणि आपणच आपला अहितकर्ता शत्रू आहे.
67-6
तव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझे नवल ना हे बोलणे । कवणासि काय दिजेल कवणे । अद्वैती इये ॥67॥
त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही का ? अरे ! या अद्वैत स्थिती मध्ये कोणाकडून कोणाला काय देणे घडेल ?
68-6
पै व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रित होइजे । ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥68॥
अविवेकरूपी भ्रमाच्या शय्येवर प्रबळ अज्ञानाने जेंव्हा मनुष्य निजतो, त्यावेळी हे जन्ममरणरूपी दुःस्वप्न तो अनुभवत असतो.
69-6
पाठी अवसांत ये चेवो । तै ते अवघेंचि होय वावो । ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपाचि ॥69॥
ज्यावेळी स्वरूपाविषयी अकस्मात जागृती येते, तेंव्हा ते पूर्वीचे सर्व स्वप्न मिथ्या आहे, असे त्याला ज्ञान उत्पन्न होते. ते ज्ञानदेखील आपल्याच ठिकाणी आपणास प्राप्त होते.
70-6
म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥70॥
म्हणून हे धनंजया ! खोट्या /मिथ्या देहावर भरवसा ठेवला, म्हणजे आपणच आपला घात करत असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत ॥6. 6॥
भावार्थ :-
ज्याने स्वतः स्वतःला जिंकले आहे, तो स्वतः आपणच आपला मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियासहित शरीर जिंकले नाही, तो आपणच शत्रूप्रमाणे आपले शत्रुत्व करतो.
71-6
हा विचारुनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होइजे । तरी आपली स्वस्ति सहजे । आपण केली ॥71॥
सूक्ष्म विचाराने देहावरील अहंकार त्यागावा. त्यामुळे आपले मूळचे ब्रम्हस्वरूप प्रकट होते. असे झाले, म्हणजे आपले कल्याण आपणच केल्यासारखे होते.
72-6
एऱ्हवी कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी । जो आत्मबुध्दी शरीरी । चारुस्थळी ॥72॥
जो वरून दिसणाऱ्या शरीरालाच आत्मा मानतो, तो स्वतःच्या अंगाभोवती स्वतःला राहण्यास तयार केलेल्या कोशातील किड्याप्रमाणे आपणच आपला शत्रू होतो.
73-6
कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । की असते आपुले डोळे । आपण झांकी ॥73॥
लाभाच्या वेळी दुर्दैवी माणसाला आंधळेपनाचे डोहाळे कसे प्राप्त होतात, ते बघ. तो आपले डोळे आपणच झाकून घेतो.
74-6
का कवणु एकु भ्रमलेपणे । मी तो नव्हे गा चोरलो म्हणे । ऐसा नाथिला छंद अंतःकरणे । घेऊनि ठाके ॥74॥
किंवा एखादा वेड लागलेला मनुष्य, जो मी पूर्वीचा होतो, तो मी आता नाही, मी चोरला गेलो, असे म्हणतो आणि अंतःकरणात तोच खोटा भाव धरून बसतो.
75-6
एऱ्हवी होय ते तोचि आहे । परि काई कीजे बुध्दी तैशी नोहे । देखा स्वप्नीचेनि घाये । की मरे साचे ॥75॥
एरव्ही हल्ली तो जो आहे, तो पूर्वीचाच आहे; पण काय करावे ? त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही; पहा, स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय ?
76-6
जैसी ते शुकाचेनि आंगभारे । नळिका भोविन्नली एरी मोहरे । तेणे उडावे परी न पुरे । मनशंका ॥76॥
पारधी हा पोपटाला पकडण्यासाठी दोरीत नळी ओवून झाडाला बांधतो. पोपट त्यावर बसतात. नळी कोणत्या तरी एका बाजूला फिरते. त्यावेळी वास्तविक पाहता पोपटाने उडून जाणे आवश्यक आहे; परंतु नळी सोडल्यास आपण पडून मरून जाऊ, अशी शंका आल्यामुळे तो नळी सोडत नाही.
77-6
वायाचि मान पिळी । अटुवे हिये आंवळी । टिटांतु नळी । धरुनि ठाके ॥77॥
तो पोपट मानेला व्यर्थ पिळे देतो. छातीने व चवड्याने ती नळी चोचीने आवळून धरून ओरडतो.
78-6
म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडा । की मोकळिया पायांचा चवडा । गोवी अधिके ॥78॥
मग तो मनात समजतो की, खरोखरच मी बांधला गेलो आहे. अशा भ्रामक कल्पनेच्या खोड्यात तो सापडतो आणि मोकळ्या असलेल्या आपल्या पायाचा चवडा अधिकच गुंतवितो.
79-6
ऐसा काजेवीण आतुडला । तो सांग पा काय आणिके बांधला । मग नोसंडी जऱ्ही नेला । तोडुनि अर्धा ॥79॥
असा तो कारणाशिवाय अडकून राहतो. त्याला कोणी अर्धा तोडून नेण्याचा प्रयत्न जरी केला, तरी तो नळी सोडत नाही. आता तूच सांग की, त्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधून ठेवलं आहे काय ?
80-6
म्हणऊनि आपणया आपणचि रिपु । जेणे वाढविला हा संकल्पु । येर स्वंयबुध्दी म्हणे बापु । जो नाथिले नेघे ॥80॥
म्हणून ज्याने मी शरीर आहे, असा संकल्प वाढविलेला आहे, तो आपणच आपला शत्रू होय. परंतु जो मिथ्या देहाचा अभिमान धरत नाही, तो स्वतःच्या आत्मस्वरूपाचा विचार करणारा होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥6. 7॥
भावार्थ :-
शीत- उष्ण व सुख-दुःख वगैरेमध्ये, तसेच मान व अपमान यामध्ये ज्याच्या वृत्ती पूर्णपणे शांत, विकाररहित असतात, अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषाच्या ज्ञानामध्ये परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशाचेही अस्तित्व राहत नाही.
81-6
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दुरी नाही ॥81॥
ज्याने आपले मन जिंकलेले आहे, ज्याच्या सर्व विषयवासना नष्ट झाल्या आहेत, त्याला परमात्मा कोठे पलीकडे दूर नाही.
82-6
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरे तेचि होये । तैसे जीवा ब्रम्हत्व आहे । संकल्पलोपी ॥82॥
सोन्याचा हिणकस पणा अग्नीत तापवून नाहीसा झाल्यावर ते शंभर नंबरी सोने होते, त्याप्रमाणे संकल्प नाहीसे झाल्यावर अहंभाव, भ्रम नाहीसे होऊन जीव हा ब्रम्हस्वरूप आहे, याची जाणीव होते
83-6
हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळो जाणे आकाशा । आना ठाया ॥83॥
ज्याप्रमाणे घटाचा आकार नाहीसा झाल्यानंतर त्यातील पोकळीला महाआकाशाची एकरूप होण्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही.
84-6
तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधीचि आहे ॥84॥
त्याप्रमाणे ज्याच्या देहाच्या ठिकाणी असलेला मिथ्या अहंकार अज्ञानासह नष्ट झाला आहे, तो पुरुष अज्ञान-निवृत्तीपूर्वीसुद्धा परमात्माच होतो आणि नंतरही परमात्माच आहे.
85-6
आता शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणी । इये न समाती काही बोलणी । मानापमानांची ॥85॥
शीत उष्णचा ओघ, सुख दुःखाचा विचार, मान – अपमानाची बोलणी हे काहीही त्या पुरुषाच्या अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही; कारण त्याचे अंतःकरण परब्रम्हभावनेने परिपूर्ण भरलेले असते.
86-6
जे जिये वाटा सुर्यु जाये । तेउते तेजाचे विश्व होये । तैसे तया पावे ते आहे । तोचि म्हणऊनि ॥86॥
ज्या वाटेने सूर्य जात असतो, तिकडेच सर्व विश्व प्रकाशमान होत असते. त्याप्रमाणे योगी पुरुषाला जे जे प्राप्त होते, ते ते त्याचेच स्वरूप असते.
87-6
देखै मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैशी शुभाशभे योगीश्वरा । नव्हती आने ॥87॥
मेघातून सुटणाऱ्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला टोचत नाहीत, त्याप्रमाणे योगी पुरुषाला शुभ-अशुभ द्वंद्ववे आत्मस्वरूपापेक्षा भिन्न नसतात, म्हणून त्रास देत नाहीत.
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेद्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाज्चनः ॥6. 8॥
भावार्थ :-
ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आणि ज्याची स्थिती विकाररहित आहे, जो जितेंद्रिय आहे, तसेच ज्याला दगड, माती, सोने वगैरे सर्व समान वाटतात, असा योगी सिद्ध बनला जातो.
88-6
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विचारिता जाहला वावो । मग लागला जव पाहो । तव ज्ञान ते तोचि ॥88॥
जो योगरुढ पुरुष दृश्य प्रपंचाचा विचार करू लागतो, तेंव्हा त्याच्या दृष्टीने तो प्रपंच मिथ्या झालेला असतो. मग अनुभवाने तो ज्या वेळी आत्मस्वरूपाला पाहू लागतो, त्यावेळी ते अनुभव- ज्ञानदेखील त्याचे स्वरूप झालेले दिसते.
89-6
आता व्यापकु की एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली आपैशी । दुजेनवीण ॥89॥
मी व्यापक आहे का मर्यादित आहे, अशी चर्चा द्वैत संपल्यामुळे आपोआपच थांबलेली असते.
90-6
ऐसा शरीरीचि परी कौतुके । परब्रह्माचेनि पाडे तुके । जेणे जिंतली एके । इंद्रिये गा ॥90॥
ज्यांनी आपली सर्व इंद्रिये पूर्णपणे जिंकलेली आहेत, तो देहधारी असला, तरी त्याची परब्रह्मच्या बरोबरीने तुलना होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेद्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाज्चनः ॥6. 8॥
भावार्थ :-
ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आणि ज्याची स्थिती विकाररहित आहे, जो जितेंद्रिय आहे, तसेच ज्याला दगड, माती, सोने वगैरे सर्व समान वाटतात, असा योगी सिद्ध बनला जातो.
91-6
तो जितेंद्रियु सहजे । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणे साने थोर नेणिजे । कवणे काळी ॥91॥
ज्याने आपली सर्व इंद्रिय सहजपणे जिंकलेली असतात, त्याला योगयुक्त म्हणतात. त्याला हा लहान, हा मोठा अशा प्रकारचा भेद कोणत्याच वेळी जाणवत नाही.
92-6
देखे सोनियाचे निखळ । मेरुयेसणे ढिसाळ । आणि मातियेचे डिखळ । सरिसेचि मानी ॥92॥
असे बघ की, शुद्ध सोन्याचा मेरू पर्वताऐवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ जो सारखेच मानतो,
93-6
पाहता पृथ्वीचे मोल थोडे । ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे । देखे दगडाचेनि पाडे । निचाडु ऐसा ॥93॥
पृथ्वीची किंमत ज्याच्यापुढे काहीचं नाही, असे अनमोल रत्न देखील जो दगडासमान मानतो, त्याचे अंतःकरण निरिच्छ बनलेले असते.
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुध्दिर्विशिष्यते ॥6. 9॥
भावार्थ :-
सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेषी, बंधू, साधुपुरुष आणि पापिजनाविषयी जो समानबुद्धी ठेवतो, तो सर्वश्रेष्ठ होय.
94-6
तेथ सुहृद आणि शत्रु । का उदासु आणि मित्रु । हा भावभेद विचित्रु । कल्पु कैचा ॥94॥
त्याच्या ठिकाणी आप्त आणि शत्रू, उदासीन आणि मित्र अशा वेगवेगळ्या द्वैताच्या विचित्र कल्पना कशा येणार ?
95-6
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥95॥
मीच विश्वाच्या रूपाने सर्वत्र पसरलेलो आहे, असे ज्याला विश्वव्यापक ज्ञान प्राप्त झाले आहे, त्याला कोण कोणाचा बंधू असणार; आणि त्याला द्वेषी तरी कोण असणार ?
96-6
मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी । काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे ॥96॥
मग त्याच्या दृष्टीने अर्जुना ! (त्याच्या अंतःकरणात) हा चांगला हा वाईट, असा भेद असू शकेल काय ? परीसाच्या कसोटीवर घासले असता सुवर्णाचे चांगले – वाईट असे प्रकार करता येतील काय ?
97-6
ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाचि बुध्दी चराचरी । होय साम्याची उजरी । निरंतर ॥97॥
त्या कसोटीपासून जसे शुद्ध सोनेच निर्माण होते, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धिमध्ये चारचराविषयी समता उदय पावलेली असते.
98-6
जे ते विश्वाळंकाराचे विसुरे । जरी आहाती आनाने आकारे । तरी घडले एकचि भांगारे । परब्रह्मे ॥98॥
विश्वातील प्राणिरूप अलंकारचे समुदाय जरी वेगवेगळ्या आकाराचे असले, तरीपण ते एकाच परब्रम्हरूपी सोन्याचे बनलेले आहेत,
99-6
ऐसे जाणणे जे बरवे । ते फावले तया आघवे । म्हणौनि आहाचवाहाचे न झकवे । येणे आकारचित्रे ॥99॥
असे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान योगारूढ पुरुषाला प्राप्त झालेले असते; म्हणून तो वरवरच्या या विविध प्रकारच्या आकारांनी फसत नाही.
100-6
घापे पटामाजी दृष्टी । दिसे तंतूचि सैंघ सृष्टी । परी तो एकवाचुनि गोठी । दुजी नाही ॥100॥
सूक्ष्म दृष्टीने वस्त्र पहिले असता, त्यामध्ये उभ्या-आडव्या तंतूंची रचना दिसते. स्थूल दृष्टीने पट दिसत असला, तरीदेखील त्यात एका तंतूंवाचून दुसरी गोष्ट नसते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-6
ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयाते असे । तोचि समबुध्दी हे अनारिसे । नव्हे जाणे ॥101॥
अशा अतिव्यापक ज्ञानाने हे सारे विश्व व्यापलेले आहे, असा ज्याला ब्रम्हानुभव आहे, तो सर्वत्र समप्रमाणात चैत्यन्य पाहणारा योगारूढ आहे, असे जाणावे. या माझ्या बोलण्यात खोटे असे काही नाही.
102-6
जयाचे नांव तीर्थरावो । दर्शने प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासी ॥102॥
ज्याचे नाव तीर्थराज आहे, ज्याचे दर्शन घेतले असता अंतःकरणात प्रसन्नतेच्या, समाधानाच्या लहरी निर्माण होतात, तसेच ज्याच्या संगतीमुळे, अहंकाराने भ्रमित झालेल्या माणसाची भ्रांती संपून जाते व ब्रम्हरूप होतो,
103-6
जयाचेनि बोले धर्मु जिये । दिठी महासिध्दिते विये । देखे स्वर्गसुखादि इये । खेळु जयाचा ॥103॥
ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म प्रकट होत असतो, ज्याच्या कृपादृष्टीने महासिद्धी प्रकट होतात, ती स्वर्गातील सुखे ज्याच्या सहज लीला आहेत,
104-6
विपाये जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हे असो तयाते प्रशंसिता । लाभु आथि ॥104॥
अशा महापुरुषांचे नावाचं मनात जरी सहज स्मरण केले तरी तो आपली योग्यता देतो; हे राहू दे. त्याच्या बद्दल अधिक काय सांगावे ? त्याची स्तुती केल्यास निश्चितच (पारमार्थिक) लाभ होतो.
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥6. 10॥
भावार्थ :-
ज्याचे मन व इंद्रिय यांच्यासह शरीर जिंकले आहे, जो संपूर्ण वासनारहित आहे, ज्याने कसलाही संग्रह केला नाही, त्या योगी पुरुषाने एकांत स्थानी एकटेच बसून चित्ताला आत्मतत्वात स्थिर केलेले आहे.
(आत्मानुभवात तल्लीन असतो)
105-6
पुढती अस्तवेना ऐसे । जया पाहले अद्वैतदिवसे । मग आपणपाचि आपण असे । अखंडित ॥105॥
ज्याचा कधी अस्त होत नाही, असा अद्वैताचा दिवस ज्याच्या हृदयात उजडला आहे, तो पुरुष सदैव आपणच आपल्या ठिकाणी रममाण असतो.
106-6
ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजे अपरिग्रही जो तिही लोकी । तोचि म्हणऊनि ॥106॥
अशा व्यापक दृष्टीने जो विचारी बनलेला असतो, तो कोठेही सदैव एकटाच आहे, तो परिग्रह न करणारा आहे; कारण तोच तिन्ही लोकात ब्रम्हरुपाने भरलेला आहे.
107-6
ऐसिये असाधारणे । निष्पन्नाची लक्षणे । आपुलेनि बहुवसपणे । श्रीकृष्ण बोले ॥107॥
(ज्ञानेश्वर माऊली म्हणतात) अशी ही सिद्ध पुरुषाची असाधारण लक्षणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्वज्ञतेने सांगितली आहेत.
108-6
जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥108॥
जो ज्ञानी लोकाचा पिता आहे व सर्व पाहणाऱ्यांचा दृष्टीने प्रकाशक आहे आणि ज्या सामर्थ्याच्या केवळ संकल्पाने विशाल विश्वाची रचना होते,
109-6
प्रणवाचिये पेठे । जाहले शब्दब्रह्म माजिठे । ते जयाचिया यशा धाकुटे । वेढू न पुरे ॥109॥
ओंकाराच्या पेठेमध्ये तयार झालेले जे शब्दब्रम्ह म्हणजे वेद हे मर्यादित असल्यामुळे ज्याच्या अनंत यशाला लपेटु शकले नाहीत, त्या यशाचे संपूर्ण वर्णन करू शकत नाहीत.
110-6
जयाचेनि आंगीके तेजे । आवो रविशशीचिये वणिजे । म्हणौनि जग हे वेसजे- । वीण असे तया ॥110॥
ज्याच्या स्वयंभू प्रकाशावर चंद्र-सूर्याचे कार्य चालते. सूर्य – चंद्राला जर परमेश्वराचा प्रकाश नसता, तर त्यांना हे जग दिसले नसते. संपूर्ण जगच परमेश्वराच्या प्रकाशावर आधारित आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-6
हा गा नांवचि एक जयाचे । पाहता गगनही दिसे टांचे । गुण एकेक काय तयाचे । आकळशील तू ॥111॥
ज्ञानोबा माऊली स्वतःच्या मनाला म्हणतात, हे मना ! ज्या एका नामाचा विचार केला असता ते इतके व्यापक आहे की, त्याच्या पुढे विशाल आकाशदेखील ठेंगणे दिसते, त्या भगवंताचे एक – एक गुण तू कसे बरे जाणशील ?
112-6
म्हणोनि असो हे वानणे । सांगो नेणो कवणांची लक्षणे । दावावी मिषे येणे । का बोलिलो ते ॥112॥
म्हणून आता ही स्तुती पुरे. कारण अशा लक्षणांनी युक्त जो भगवान श्रीकृष्ण, तो स्वतः ज्या साधूचे वर्णन करतो, त्यांची लक्षणे आम्ही सांगू शकत नाही; परंतु ती सांगावीत म्हणून सांगितली. (कारण संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली हे आम्हाला सांगता येत नाही. )
113-6
ऐके द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरी अर्जुना पढिये हे गोडी । नासेल हन ॥113॥
(पण मला असे वाटते) ऐका. द्वैताचा ठावठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान, ते उघड उघड व्यक्त केले तर. अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल.
114-6
म्हणोनि ते तैसे बोलणे । नव्हे सपातळ आड लावणे । केले मनचि वेगळवाणे । भोगावया ॥114॥
म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत; परंतु मध्ये त्यांनी अगदी पातळ असा पडदा ठेवला. अर्जुनाचे मन त्याच्या व आपल्या प्रेमाचा उपभोग घेण्याकरता भगवंतांनी वेगळे ठेवले.
115-6
जया सोहंभाव अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणे कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥115॥
जे मी ब्रम्ह आहे अशा बोधात अडकलेले आहेत आणि जे मोक्षसुखासाठी दीन झालेले आहेत, त्यांच्या दृष्टीचा कलंक तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल.
116-6
विपाये अंहभाव ययाचा जाईल । मी तेचि हो जरी होईल । तरी मग काय कीजेल । एकलेया ॥116॥
आत्मज्ञानाच्या उपदेशाने अर्जुनाचा संपूर्ण अहंकार जर अकस्मात नाहीसा झाला आणि तो जर मीच होईल, तर मी एकट्याने काय बरे करावे ?
117-6
दिठीचि पाहता निविजे । का तोंड भरोनि बोलिजे । नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसे कोण आहे ॥117॥
ज्याला डोळ्यांनी पाहताच समाधान लाभावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा दृढ आलिंगन द्यावे, असा अर्जुनाशिवाय जगात दुसरा कोण बरे आहे ?
118-6
आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवी । ते कवणेसि चावळावी । जरी ऐक्य जाहले ॥118॥
जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले, तर आपल्या मनाला योग्य वाटणारी आणि अंतःकरणात न सामावणारी अशी गोष्ट कोणाला बरे सांगावी ?
119-6
इया काकुळती जनार्दने । अन्योपदेशाचेनि हातासने । बोलामाजि मन मने । आलिंगु सरले ॥119॥
अशा काकुळतीने भगवंतांनी योगारूढ पुरुषाची लक्षणे सांगण्याच्या हातोटीने बोलण्यामध्ये द्वैत ठेऊन आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले.
120-6
हे परिसता जरी कानडे । तरी जाण पा पार्थ उघडे । कृष्ण सुखाचेचि रुपडे । वोतले गा ॥120॥
हे ऐकण्यास जरी अवघड वाटत असले, तरीपण निश्चितपणे असे समज की, अर्जुन हा खरोखर भगवान श्रीकृष्णाच्या सुखाची ओतीव मूर्ती आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-6
हे असो वयसेचिये शेवटी । जैसे एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी । नाचो लागे ॥121॥
हे राहू दे, ज्याप्रमाणे वय झाल्यावर एखाद्या वांझ स्त्रीला जर बाळ झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो. (तशी देवाची स्थिती झाली)
122-6
तैसे जाहले अनंता । ऐसे तरी मी न म्हणता । जरी तयाचा न देखता । अतिशयो एथ ॥122॥
त्याचे अर्जुनाविषयी अतिशय प्रेम दिसून आले नसते, देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पहिला नसता तर मी असे (वांझोट्या बाईंसारखे) देवाला झाले, असे म्हंटले नसते.
123-6
पाहा पा नवल कैसे चोज । के उपदेशु केउते झुंज । परी पुढे वालभाचे भोज । नाचत असे ॥123॥
आश्चर्य पहा की, भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे !! कसला युद्धप्रसंग व कसल्या ठिकाणी हा उपदेश ! (माऊली म्हणतात युद्धाच्या प्रसंग अत्यन्त विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाच्या उपदेश करण्याला अगदी अयोग्य, परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाच्या उपदेश केला) परंतु निश्चयेकरुन भगवान श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे.
124-6
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसे आणि न भुलवी । तरी तेचि काइ ॥124॥
आवड आहे; पण लाज निर्माण करते, तर ती आवड कसली ? तसेच ते व्यसन आहे आणि त्याने कष्ट होत असतील, तर ते व्यसन कसले ? ते चक्क वेड आहे, परंतु भ्रम निर्माण करत नाही, तर ते वेड कसले ?
125-6
म्हणउनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । की सुखे श्रृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥125॥
म्हणून याचा भावार्थ असा की, अर्जुन हा भगवंताच्या मित्रत्वाचे आश्रयस्थान आहे किंवा सुखाने शृंगारलेल्या मनाचे प्रतिबिंब पाहण्याचा तो एक आरसा आहे.
126-6
यावरी बाप पुण्यपवित्र । जगी भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो कृष्णकृपे पात्र । याचिलागी ॥126॥
याप्रमाणे तो अर्जुन पुण्याने धन्य असून पवित्र आहे, या जगात भक्तिरूप बीज पेरण्यासाठी त्याची हृदयरुपी भूमी उत्तम आहे; आणि म्हणूनच तो भगवान श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र झाला आहे.
127-6
हो का आत्मनिवेदनातळीची । जे पीठिका होय सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिची । मातृका गा ॥127॥
अथवा आत्मनिवेदनाच्या अलीकडची सख्य नावाची जी आठवी भक्ती मानली जाते, त्या ठिकाणची अर्जुन हा प्रमुख देवता आहे.
128-6
पासीचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुने तो सहजे । पढिये हरी ॥128॥
जवळच असलेल्या प्रभूंचे वर्णन न करता भक्ताच्या गुणांचे वर्णन करावे, इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो.
129-6
पाहा पा अनुरागे भजे । जे प्रियोत्तमे मानिजे । ते पतीहून काय न वर्णिजे । पतिव्रता ॥129॥
पहा, असे बघ की, जी पतीची प्रेमभावाने सेवा करते आणि प्रियोत्तम हा जिला अतिशय मानतो, त्या पतीव्रतेचे पतीपेक्षाही अधिक केले जात नाही का ?
130-6
तैसा अर्जुनचि विशेषे स्तवावा । ऐसे आवडले मज जीवा । जे तो त्रिभुवनाचिया दैवा । एकायतनु जाहला ॥130॥
त्याप्रमाणे देवापेक्षही अर्जुनाची विशेष स्तुती करावी, असे माझ्या मनाला भावते, कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-6
जयाचिया आवडीचेनि पांगे । अमूर्तुही मूर्ति आवगे । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥131॥
ज्याच्या आवडीच्या अधीन होऊन निराकार परमात्मा (सगुण रूप घेऊन) आकाराला आला आहे, आणि तो परिपूर्ण असूनही त्याला अर्जुनाचा वेध लागला आहे.
132-6
तव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादाते हन बरव । जिणोनी आली ॥132॥
हे अर्जुनाचे वर्णन ऐकून श्रोते म्हणाले, ” आमचे काय भाग्य आहे, ते पाहा. उत्तमोत्तम शब्दांची रचना करून बोलण्याची शोभा वाढवली आहे. (काय बोलण्याचा रंग आहे). या बोलण्याच्या शैलीने नादब्रम्हालाही जिंकले आहे.
133-6
हा हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी । वाणे उमटताहे आकाशी । साहित्यरंगाचे ॥133॥
अशी ही परिशुद्ध मराठी भाषा बोलली जाते, हे सुद्धा आश्चर्य नाही का ? या भाषेच्या रस- अलंकारांत विविध रंगाचे प्रकार उसळतात.
134-6
कैसे उन्मेखचांदिणे तार । आणि भावार्था पडे गार । हेचि श्लोकार्थ -:कुमुदी तरी फार । साविया होती ॥134॥
या भाषारूपी आकाशात ज्ञानरूपी स्वच्छ टपोरे चांदणे पडले आहे. गूढ अशा अभिप्रायाचा गारवाही यामध्ये आहे. तसेच श्लोकाचा अर्थ हीच जणू काही चांद्रविकासी कमळे सहजच प्रफुल्लित होत आहेत.
135-6
चाडचि निचाडा करी । ऐसी मनोरथी ये थोरी । तेणे विवळले अंतरी । तेथ डोलु आला ॥135॥
त्या बोलण्याची थोरवी श्रेष्ठ आहे. ब्रम्हविद्या ऐकणाऱ्याची इच्छा या भाषेच्या श्रवणाने तृप्त होत असते. ” अशा या बोलांतून श्रोते अंतःकरणात प्रसन्न होऊन डोलू लागले.
136-6
ते निवृत्तिदासे जाणितले । मग अवधान द्या म्हणितले । नवल पांडवकुळी पाहले । कृष्णदिवसे ॥136॥
निवृत्तीनाथांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर माऊलीनी हे जाणले. मग ते श्रोत्यास म्हणाले, ” आता इकडे लक्ष द्या. पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी प्रकाशमान दिवस उगवला आहे.
137-6
देवकीया उदरी वाहिला । यशोदा सायासे पाळिला । की शेखी उपेगा गेला । पांडवासी ॥137॥
देवकीने श्रीकृष्णाला आपल्या पदरात वाढविले, यशोदेने मोठ्या कष्टाने याचे लालन-पालन केले; आणि तो शेवटी पांडवांच्या उपयोगी पडला.
138-6
म्हणऊनि बहु दिवस वोगळावा । का अवसरु पाहोनि विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥138॥
म्हणून खूप दिवस श्रीकृष्णाची सेवा करावी आणि योग्य वेळ पाहून उपदेश करण्यासंबंधी विनंती करावी, येवढेदेखील श्रम त्या भाग्येवंत अर्जुनाला पडले नाहीत.
139-6
हे असो कथा सांगे वेगी । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इये संतचिन्हे हन आंगी । न ठकती माझा ॥139॥
श्रोते म्हणाले, हे असू द्या. आता श्रीकृष्ण-अर्जुनाची कथा लवकर सांगावी. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणाले, सांगतो, ऐका. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा ! आपण सांगितलेली संतांची लक्षणे माझ्या अंगी प्राप्त होत नाहीत.
140-6
एऱ्हवी या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडे कीर अपुरा । परि तुमचेनि बोले अवधारा । थोरावे जरी ॥140॥
एरव्ही लक्षणांचा सारभूत विचार केला, तर मी त्या मानाने खरोखर अयोग्य, अपूर्ण आहे; परंतु हे भगवंता ! तुमच्या उपदेशानेच जर मला योग्यता आली, तर येऊ शकेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-6
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मिया होईजेल । काय जाहले अभ्यासिजेल । सांगाल जे ॥141॥
महाराज, तुम्ही जर माझे हित करण्याकडे लक्ष द्याल, तर मी ब्रम्ह होईन, तुम्ही मला जो अभ्यास करावयास सांगाल, तो करणे मला अशक्य आहे का ?
142-6
हा हो नेणो कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असो अंतःकरणी । ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥142॥
आहो, देवा ! आपण कोणाची कथा सांगत आहात हे कळत नाही; परंतु ती ऐकल्यापासून तिची स्तुती करावी, असे वाटते. अशी श्रेष्ठ लक्षणे ज्याच्या अंतःकरणात प्रकट झाली असतील, त्याचे महत्व केवढे बरे असेल.
143-6
हे आंगे म्या होइजो का । येतुले गोसावी आपुलेपणे कीजो का । तव हांसोनि श्रीकृष्ण हो का । करुं म्हणती ॥143॥
हे देवा ! याप्रमाणे माझ्या अंगी योग्यता प्राप्त होईल, एवढे आपण करू शकाल काय ? त्या वेळी भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करून म्हणाले, तुला आम्ही अवश्य ब्रम्हरूप करू.
144-6
देखा संतोषु एक न जोडे । तवचि सुखाचे सैंघ सांकडे । मग जोडलिया कवणीकडे । अपुरे असे ॥144॥
असे पहा की, जोपर्यंत संतोष प्राप्त होत नाही, तोपर्यंत चोहोकडे सुखाचा दुष्काळ असतो. एकदा का संतोष प्राप्त झाला, की मग सुखाला कुठे कमतरता आहे ?
145-6
तैसा सर्वेश्वरु बळिया सेवके । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुके । परि कैंसा भारे आतला पिके । दैवाचेनि ॥145॥
त्याप्रमाणे जो सर्वेश्वराचा पूर्णपणे सेवक बनला आहे, (येथे अर्जुन सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णाचा सेवक बनला आहे, हे आपण जाणले पाहिजे) तो सहजच ब्रम्हरूप होईल. परंतु अर्जुनाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. कारण तो भाग्यरूपी पिकाच्या भाराने कसा भारावला आहे, ते पाहा.
146-6
जो जन्मसहस्रांचियासाठी । इंद्रादिकाही महागु भेटी । तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुहि न साहे ॥146॥
इंद्रादिकांनी हजारो जन्म घेतले, तरी ज्याची भेट होणे दुर्लभ, तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे, ते पाहा. जो अर्जुनाने प्रश्न विचारण्यापूर्वीच अधीर होऊन प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रवृत्त होत आहे.
147-6
मग ऐका जे पांडवे । म्हणितले ब्रह्म म्या होआवे । ते अशेषही देवे । अवधारिले ॥147॥
मग आता ऐका. अर्जुनाने मी ब्रम्ह व्हावे असे जे म्हटले, ते सर्व भगवान श्रीकृष्णांनी ऐकले.
148-6
तेथ ऐसेचि एक विचारिले । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदरा वैराग्य आहे आले । बुध्दीचिया ॥148॥
आणि त्याविषयी देवाने असे अनुमान काढले की, अर्जुनाला ब्रम्हस्वरूप होण्याचे डोहाळे लागले आहेत, याचे कारण त्याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्यरूपी गर्भ राहिला आहे.
149-6
एऱ्हवी दिवस तरी अपुरे । परि वैराग्यवसंताचेनि भरे । जे सोंहभाव महुरे । मोडोनि आला ॥149॥
एरव्ही अर्जुनरूपी वृक्षला ब्रम्हप्राप्तीचे फळ येण्यासाठी अपुरे दिवस होते, तरीपण वैराग्यरूपी वसंत बहरून आल्यामुळे मी ब्रम्ह व्हावे, या इच्छेचा मोहराने तो फुलून आला आहे.
150-6
म्हणोनि प्राप्तिफळी फळता । यासि वेळु न लागेल आता । हो विरक्तु ऐसा अंनता । भरवसा जाहला ॥150॥
म्हणून ब्रम्हप्राप्ती हे फळ येण्यास आता याला फार काळ लागणार नाही. कारण, हा आता विरक्त झाला आहे, अशी भगवंताची पूर्ण खात्री झाली आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-6
म्हणे जे जे हा अधिष्ठील । ते आरंभीच यया फळेल । म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वाया ॥151॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हा अर्जुन ज्या ज्या साधनांचे आचरण करेल, ते ते साधन त्याला प्रारंभी फळ देईल; म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही.
152-6
ऐसे विवरोनिया श्रीहरी । म्हणितले तिये अवसरी । अर्जुना हा अवधारी । पंथराजु ॥152॥
असा विचार करून त्या वेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तुला आता योगमार्ग सांगणार आहे. तो सर्व मार्गांचा राजमार्ग आहे, त्याचे तू श्रवण कर.
153-6
तेथ प्रवृत्तितरुच्या बुडी । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनि ॥153॥
या मार्गामध्ये प्रवृत्तीरूप झाडाच्या बुडलाच निवृत्तीरूप कोट्यवधी मोक्षफळे दृष्टीस पडतात. या मार्गाचे भगवान श्रीशंकर आजही यात्रेकरू आहेत.
154-6
पै योगवृंदे वहिली । आडवी आकाशी निघाली । की तेथ अनुभवाच्या पाउली । धोरणु पडिला ॥154॥
योगीजन प्रारंभी हृदय – आकाशात आडव्या मार्गाने वाटचाल करू लागले. नंतर अनुभवाच्या आधारे त्यांना परब्रम्हप्राप्तीचा मार्ग सुलभ झाला.
155-6
तिही आत्मबोधाचेनि उजुकारे । धाव घेतली एकसरे । की येर सकळ मार्ग निदसुरे । सांडुनिया ॥155॥
तेंव्हा इतर सर्व अज्ञानरुप मार्गाचा त्याग करून योगी पुरुषांनी आत्मबोधाच्या सरळ मार्गाने धाव घेतली.
156-6
पाठी महर्षी येणे आले । साधकांचे सिध्द जाहाले । आत्मविद थोरावले । येणेचि पंथे ॥156॥
नंतर त्यांच्या मार्गाने महर्षी आले आणि साधकांचे सिद्ध झाले. आत्मज्ञानीसुद्धा याच मार्गाने महान झाले.
157-6
हा मार्गु जै देखिजे । तै तहान भूक विसरिजे । रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥157॥
या मार्गाने वाटचाल करताना अनुभव येऊ लागला की, तहान भूक यांची आठवणही होत नाही. या वाटेने चालताना रात्र कळत नाही, दिवस कळत नाही.
158-6
चालता पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । आव्हाटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥158॥
या मार्गाने चालताना जेथे पाऊल पडेल, तेथे मोक्षाची खाणच उघडते. कदाचित आडमार्गाने जरी पाऊल पडले, तरी स्वर्गसुख लाभते.
159-6
निगिजे पूर्वींलिया मोहरा । की येइजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणे धनुर्धरा । चालणे येथिंचे ॥159॥
पूर्व दिशेच्या मार्गाने चालावे आणि पश्चिम दिशेच्या घरात यावे, असे आहे. हे धनुर्धर ! मन स्थिर ठेवणे, हेच या मार्गाचे चालणे आहे.
160-6
येणे मार्गे जया ठाया जाइजे । तो गावो आपणचि होइजे । हे सांगो काय सहजे । जाणसी तू ॥160॥
या मार्गाने ज्या ठिकाणी जावयाचे, तो इश्वररूपी गाव आपणच होतो, हे काय सांगावे ? पुढे तुला ते सहजच कळेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-6
तेथ म्हणितले देवा । तरी तेचि मग केव्हा । का आर्तीसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥161॥
तेंव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा ! असे जर आहे, तर तू योगमार्ग केंव्हा सांगणार ? मी उत्सुकतेचा सागरात बुडत असताना तुम्ही मला बाहेर काढू नये काय ?
162-6
तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे । हे उत्संखळ बोलणे कायसे । आम्ही सांगतसो आपैसे । वरि पुशिले तुवा ॥162॥
तेंव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, असे उतावीळपणाचे बोलणे कशासाठी ? आम्ही आपणहुन सांगत आहोत, त्याशिवाय तुही विचारले आहेस.
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥6. 11॥
भावार्थ :-
शुद्धस्थानी, अति उंच नाही, अति सखल नाही असे, दर्भावर मृगदिकांचे चर्म व त्यांवर वस्त्र ठेवलेले, असे आपले स्थिर आसन स्थापन करून,
163-6
तरी विशेषे आताचि बोलिजेल । परि ते अनुभवे उपेगा जाईल । म्हणौनि तैसे एक लागेल । स्थान पहावे ॥163॥
तरी आत्ताच तुला सविस्तर सांगण्यात येईल, प्रत्येक्ष साधना करून अनुभव घेतला, तर उपयोगी होईल. यासाठी साधनेला योग्य असे स्थान पाहणे आवश्यक आहे.
164-6
जेथ आराणुकेचेनि कोडे । बैसलिया उठो नावडे । वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जे ॥164॥
ज्या पवित्र स्थानावर सुख – शांती मिळविण्यासाठी बसल्यानंतर तेथून उठावेसे वाटू नये आणि ते स्थान पाहताक्षणी वैराग्य दुप्पट वाढावे.
165-6
जो संती वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥165॥
जेथे संतांनी वास्तव्य केले आहे, जेथे संतोष वाढण्यास मदत होते, जेथे मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो,
166-6
अभ्यासुचि आपणयाते करी । हृदयाते अनुभव वरि । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥166॥
जेथील पवित्र वातावरण आपणाकडून साधना करून घेते, अनुभव हृदयाला माळ घालतो, अशी रम्यपणाची थोरवी ज्या ठिकाणी अखंड आहे.
167-6
जया आड जाता पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥167॥
हे अर्जुना ! ज्या स्थानाजवळ सहज जरी गेला असता, नास्तिकालादेखील तपश्चर्या करावी, अशी मनापासून आस्था वाटते.
168-6
स्वभावे वाटे येता । जरी वरपडा जाहला अवचिता । तरी सकामुही परि माघौता । निघो विसरे ॥168॥
सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्याठिकाणी (रमणीय ठिकाणी) आला व तो जरी विषयासक्त असला, तरीहि तो परत फिरण्याचे विसरतो.
169-6
ऐसेनि न राहतयाते राहावी । भ्रमतयाते बैसवी । थापटुनि चेववी । विरक्तीते ॥169॥
असे पवित्र रमणीय स्थान न राहणाऱ्यास देखील राहावयास लावते, भटकंती करणाऱ्यास एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागृत करते.
170-6
हे राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेचि असिजे । ऐसे शृंगारियांहि उपजे । देखतखेवो ॥170॥
हे पवित्र रमणीय स्थान पाहिल्यावर आपल्या राज्याचा त्याग करावा, येथे निवांत राहावे, असे श्रुंगारप्रिय विलासी राजालादेखील वाटावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-6
जे येणे माने बरवंट । आणि तैसेच अतिचोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळा दिसे ॥171॥
जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रम्ह स्पष्ट दिसते;
172-6
आणिकही एक पहावे । साधकी वसते होआवे । आणि जनाचेनि पायरवे । रुळेचिना ॥172॥
या स्थानाचे आणखी एक लक्षण पाहावे. त्या स्थानी साधकाने साधना केलेली असावी. फक्त प्रपंचात रममाण झालेल्या लोकांची येथे ये-जा नसावी.
173-6
जेथ अमृताचेनि पाडे । मुळेहीसकट गोडे । जोडती दाटे झाडे । सदा फळती ॥173॥
या स्थानात अमृतासमान मुळासह गोड असणारी फळे देणारी दाट झाडे पसरलेली आहेत.
174-6
पाउला पाउला उदके । वर्षाकाळेही अतिचोखे । निर्झरे का विशेखे । सुलभे जेथ ॥174॥
या स्थानात पावला-पावलावर जल आहे. ते पावसाळ्यात देखील शुद्ध असते, असे शुद्ध पाण्याचे झरे, विशेष करून पाणी काढण्यास सुलभ असावेत.
175-6
हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवन अति निश्चळु । मंद झुळके ॥175॥
जेथे सूर्याचे उनदेखील शीतल, सौम्य असावे, कदाचित स्वच्छ ऊन पडले, तरी त्यापासून ताप होऊ नये. वारादेखील शांत असून मंद झुळका असाव्यात.
176-6
बहुत करुनि निःशद्ब । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउते नाही ॥176॥
ते स्थान बहुत करून निःशब्द असावे, तेथे हिंस्त्र पशुंचा प्रवेश नसावा, आवाज करणारे पोपट व इकडे तिकडे फिरणारे भ्रमर नसावेत.
177-6
पाणिलगे हंसे । दोनी चारी सारसे । कवणे एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥177॥
ज्या ठिकाणी जलाशयाजवळ राहणारे हंस, दोन चार चक्रवाक पक्षी आणि एखादे वेळेस एखादा कोकीळ येऊन बसलेला चालेल.
178-6
निरंतर नाही । तरी आली गेली काही । होतु का मयुरेही । आम्ही ना न म्हणो ॥178॥
नेहमी नाही; परंतु अधून-मधून काही दिवस मोर आले गेले तरी चालतील. आमची त्याला ना नाही.
179-6
परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा । तेथ निगूढ मठ होआवा । का शिवालय ॥179॥
परंतु हे अर्जुना !! असले स्थान अवश्यही शोधून ठेवावे, की त्या ठिकाणी एखादा गुप्त मठ अथवा शिवालय असावे.
180-6
दोहीमाजी आवडे ते । जे मानले होय चित्ते । बहुतकरुनि एकांते । बैसिजे गा ॥180॥
या दोन्हीपैकी जे आवडेल आणि चित्ताला सुयोग्य वाटेल, असे असावे. विशेष करून त्या ठिकाणी एकांतात बसून साधना करता यावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-6
म्हणोनि तैसे ते जाणावे । मन राहाते पाहावे । राहेल तेथ रचावे । आसन ऐसे ॥181॥
म्हणून तसे स्थान पवित्र आहे की नाही, हे पाहावे. तेथे मन एकाग्र होते की नाही, हे पाहावे. मन एकाग्र व शांत होत असेल, तर तेथे असे आसन लावावे.
182-6
वरि चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी । तळवटी अमोडी । कुशांकुर ॥182॥
तळात साग्र कोवळे दर्भ घालावे व त्यावर शुद्ध कृष्णाजिन घालून त्यावर धूतवस्त्राची घडी घालावी
183-6
सकोमळ सरिसे । सुबध्द राहती आपैसे । एके पाडे तैसे । वोजा घाली ॥183॥
ते दर्भ कोवळे, सारखे आणि सहजपणे ऐके ठिकाणी राहील, अशा उत्तम प्रकारे असावे.
184-6
परि सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल । नीच तरी पावेल । भूमिदोषु ॥184॥
ते आसन जमिनीपासून फार उंच झाले, तर शरीर हलु लागेल. तसेच ते आसन जर फारच खाली झाले, तर जमिनीतील दगड, माती, कीटक यांच्या संसर्गाने साधनेमध्ये दोष निर्माण होतील.
185-6
म्हणौनि तैसे न करावे । समभावे धरावे । हे बहु असो होआवे । आसन ऐसे ॥185॥
म्हणून आसन उंच अथवा सखल करू नये. सम प्रमाणाचे आसन तयार करावे. आता हे वर्णन पुरे. सारांश, योग्य प्रकारे आसन करावे.
तत्रैकाग्नं मनः कृत्वा यतचित्तेद्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद योगमात्मविशुध्दये ॥6. 12॥
भावार्थ :-
त्या आसनावर बसून मनाला एकाग्र करावे, चित्ताच्या आणि इंद्रयाच्या क्रियांशी वश करावे आणि अंतःकरण्याच्या शुद्धीसाठी योगाची साधना सुरु करावी.
186-6
मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण । करुनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥186॥
त्या आसनावर बसून मन एकाग्र करावे आणि सद्गुरूंचे विनम्रभावे स्मरण करून आत्मनंदाच्या अनुभव घ्यावयास सुरुवात करावी.
187-6
तैसे स्मरतेनि आदरे । सबाह्य सात्विके भरे । जव काठिणपण विरे । अहंभावाचे ॥187॥
सद्गुरूंचे अत्यंत आदराने स्मरण करू लागलो, की अंतर्बाह्य अष्टसात्विक भाव दाटून येतात आणि अहंकार विरळ होत जातो.
188-6
विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजी ॥188॥
विषयांचा विसर पडतो, बाह्य गोष्टीत रममाण होणाऱ्या इंदर्यांची धाव कमी होते. अंतःकरणात मन हळूहळू विलीन होऊ लागते.
189-6
ऐसे ऐक्य हे सहजे । फावे तव राहिजे । मग तेणेचि बोधे बैसिजे । आसनावरी ॥189॥
अंतःकरण व मनाचे ऐक्य होईपर्यंत स्थिर रहावे. मग ऐक्य झालेल्या जाणिवेने आसनावरती बसलेले असावे.
190-6
आता आंगाते आंग करी । पवनाते पवनु धरी । ऐसी अनुभवाची उजरी । होचि लागे ॥190॥
अशा जाणिवेच्या आसनावर बसल्यानंतर अंगच अंगाला सावरते, प्राणवायू प्राणवायूला धारण करतो आणि अनुभवाचा उदय होऊ लागतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-6
प्रवृत्ती माघौति मोहरे । समाधि ऐलाडि उतरे । आघवे अभ्यासु सरे । बैसतखेंवो ॥191॥
त्या ठिकाणी कर्म करण्याची प्रवृत्ती मागे फिरून समाधी कडे येते. आसनावर बसल्यानंतर जणू काही सर्व अभ्यास संपून जातो.
192-6
मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आता परियेसी । तरी उरु या जघनासी । जडोनि घाली ॥192॥
आसनमुद्रेचे महत्व अशा प्रकारचे आहे. तेच आता सांगत आहे, तरी त्याचे श्रवण कर. पोटऱ्या मांड्यास लावून आसन घालावे.
193-6
चरणतळे देव्हडी । आधारद्रुमाचा बुडी । सुघटिते गाढी । संचरी पा ॥193॥
दोन्ही पायांच्या टाचा वर कराव्यात आणि आधारचक्ररुपी वृक्षाच्या बुडाशी असलेल्या गुदस्थानाचे शिवणीपाशी दोन्ही टाचा घट्ट व स्थिर कराव्यात.
194-6
सव्य तो तळी ठेविजे । तेणे सिवणीमध्यु पीडिजे । वरी बैसे तो सहजे । वामचरणु ॥194॥
उजव्या पायाची टाच खाली घालावी व टाचेने शिवणीचा मध्यभाग दाबावा, म्हणजे उजव्या पायांवर स्वाभाविकच डावा पाय बसतो.
195-6
गुद मेंढ्राआंतौति । चारी अंगुळे निगुती । तेथ सार्ध सार्ध प्रांती । सांडुनिया ॥195॥
गुद आणि शिश्न यामधील बरोबर जी चार बोटे जागा आहे त्यापैकी दीड बोटे खाली जागा सोडून.
196-6
माजि अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तराभागे । नेहेटिजे वरि आंगे । पेललेनि ॥196॥
मध्ये जी एकबोट जागा जागा राहते, तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग तोलून घट्ट दाबावे.
197-6
उचलिले का नेणिजे । तैसे पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेचि माने ॥197॥
शरीर उचललेले न कळेल अशा तऱ्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा आणि त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धारावेत.
198-6
मग शरीर संचु पार्था । अशेषुही सर्वथा । पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥198॥
अर्जुना ! मग हे शरीर घोटाच्या माथ्यावर आधाराशिवाय स्वतः सिद्ध राहते.
199-6
अर्जुना हे जाण । मूळबंधाचे लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ॥199॥
अर्जुना ! हे मूलबंधाचे लक्षण जाणून घे. याचेच वज्रासन असे गौण नाव आहे.
200-6
ऐसी आधारी मुद्रा पडे । आणि आधीचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतलीकडे । वोहोटो लागे ॥200॥
अशा प्रकारे आधारचक्रावर (मुळंबन्ध बरोबर लागला) वज्रसनाची मुद्रा पडते आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपानवायू आतल्या आत वर सरकू लागतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥6. 13॥
भावार्थ :-
शरीराचा मधला भाग, मस्तक, मान तमाम सरळ रेषेत ठेऊन स्थिर व्हावे आणि आपल्या नाकाच्या शेंड्याकडे दृष्टी ठेऊन अन्य दिशाकडे न पाहता योगाभ्यास करावा.
201-6
तव करसंपुट आपैसे । वाम चरणी बैसे । तव बाहुमुळी दिसे । थोरवी आली ॥201॥
नंतर सहजच डाव्या पायावर दोन्ही हात द्रोणाकर करून ठेवाव्यात. त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात.
202-6
माजी उभारलेनि दंडे । शिरकमळ होय गाढे । नेत्रद्वारीची कवाडे । लागू पहाती ॥202॥
उंचावलेल्या दंडाकार खांद्यामुळे शिरकमल दोन्ही खांद्यात घट्ट राहते. मग डोळ्यांच्या पापण्या हळूहळू मिटू लागतात.
203-6
वरचिले पाती ढळती । तळीची तळी पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥203॥
वरची पापणी खाली येते व खालची पापणी खालीच विकसित होते. त्यावेळी डोळ्यांची अर्धी उघडलेली व अर्धी मिलेली अशी दृष्टी होते.
204-6
दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडे । ते ठायी ठावो पडे । नासाग्रपीठी ॥204॥
दृष्टी ही आतल्याआत अंतर्मुख होऊनही स्वतःच्या इच्छेने बाहेर पाऊल टाकते आणि नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते.
205-6
ऐसे आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुते न वचे । म्हणौनि राहणे आधिये दिठीचे । तेथेचि होय ॥205॥
अर्धोन्मीलित स्थितीमध्ये दृष्टी आतच राहते, ती पुनः बाहेर येत नाही; म्हणून अर्धीच दृष्टी नाकाच्या शेंड्याच्या ठिकाणी स्थिर राहते.
206-6
आता दिशांचि भेटी घ्यावी । का रुपाची वाट पहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ॥206॥
आता दिशांची भेट घ्यावी म्हणजे चोहीकडे पाहावे अथवा रूपाची वाट पहावी, रूप या विषयाकडे धाव घ्यावी, ही इच्छा सहजच नाहीशी होते.
207-6
मग कंठनाळ आटे । हनुवटी हे हडौति दाटे । ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळी ॥207॥
मग कंठ संकुचित होत जातो. हनुवटी कंठच्या हाडांवर घट्ट बसते. ती जादा बळकट होऊन छातीवर दाब येतो.
208-6
माजी घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥208॥
हे अर्जुना ! त्या हनुवाटीच्या खाली गळ्याची घाटी दिसेनाशी होते. अशा प्रकारे हानुवाटीचा गळ्यावर जो बंध निर्माण होतो, त्याला जालंधरबंध असे म्हणतात.
209-6
नाभीवरी पोखे । उदर हे थोके । अंतरी फांके । हृदयकोशु ॥209॥
वोढियाना बंध बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जाऊन छोटे होते आणि हृद्यकमल आतमध्ये विकसित होते.
210-6
स्वाधिष्ठानावरिचिले कांठी । नाभीस्थानातळवटी । बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥210॥
यामुळे स्वाधिष्ठानचक्राच्या वरच्या बाजूला आणि बेंबीच्या खालच्या भागाला बंध पडतो, त्याला वोढीयानबंध असे म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥6. 14॥
भावार्थ :-
योगी पुरुषाने अंतःकरण प्रसन्न ठेऊन, निर्भय होऊन ब्रम्हचर्य व्रताचे पालन करावे आणि मनाचे संयमन करून माझे चिंतन करीत मत्परायन होऊन (आसनावर बसावे) राहावे.
211-6
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे । तव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥211॥
अशा प्रकाराने शरीराच्या बाहेर योग- अभ्यासाची छाया पसरते, त्यावेळी आतील मनाच्या चंचलतेच्या संस्काराचा जोर नाहीसा होतो,
212-6
कल्पना निमे । प्रवृत्ती शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥212॥
कल्पना नाहीशी होऊन जाते, बाह्य विषयाकडे धावणाऱ्या मनाची हाव थांबते आणि शरीर आणि मन सहजच शांत होते.
213-6
क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगा ॥213॥
भुकेचे काय झाले ? झोप कोठे निघून गेली ? याची आठ्वनदेखील नाहीशी होऊन जाते. त्याचा वेग दिसतदेखील नाही.
214-6
जो मुळबंधे कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेचि वरी सांकडला । फुगु धरी ॥214॥
मूळ बंधाने कोंडलेला अपान वायू ऊर्ध्व गतीने माघारी फिरतो आणि सहजच अवघडलेला होऊन वर फुगू लागतो.
215-6
क्षोभलेपणे माजे । उवाइला ठायी गाजे । मणिपुरेसी झुंजे । राहोनिया ॥215॥
तो अपानवायू क्षोभुन बलशाही होतो आणि अडकलेल्या ठिकाणी मोठ्याने आवाज करतो. तेथेच राहून तो मणिपूरचक्राला धक्के देतो.
216-6
मग थांवली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी । बाळपणीची कुहीटुळी । बाहेर घाली ॥216॥
अशा तऱ्हेने बळावलेली वावटळ पोटात चोहीकडे फिरून ढवळाढवळ करते आणि बालपणापासून शरीरात साचलेली कुजकी घाण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते.
217-6
भीतरी वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । कफपित्ताचे थारे । उरो नेदी ॥217॥
त्या अपानवायूला आत वळण घेण्यास कोठे जागा नसल्यामुळे तो कोठ्यात शिरतो वात, पित्त यांचा थारा राहून देत नाही.
218-6
धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥218॥
तो वायू सप्त धातूंची स्थाने ओलांडतो, मेदाचे पर्वत फोडून टाकतो आणि देहमध्ये हाडांत असलेली मज्जा ओरपुन बाहेर काढतो.
219-6
नाडीते सोडवी । गात्रांते विघडवी । साधकांते भेडसावी । परि बिहावे ना ॥219॥
तो नाड्यांच्या गाठी सोडुवून टाकतो, अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो, परंतु साधकाने भिऊ नये.
220-6
व्याधीते दावी । सवेचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥220॥
तो वायू शरीरात अचानक रोग निर्माण करतो आणि ताबडतोब नाहीसा करतो, शरीरातील पृथ्वी व पाण्याचे अंश एकमेकांत कालवितो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-6
तव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीते ॥221॥
हे अर्जुना !! त्यावेळी दुसरीकडे वज्रसनामुळे निर्माण झालेली शरीरातील उष्णता ही कुंडलिनी नावाच्या प्राणशक्तीला जागृत करते.
222-6
नागाचे पिले । कुंकुमे नाहले । वळण घेऊनि आले । सेजे जैसे ॥222॥
नागिनीच्या पिलाला कुंकवाने स्नान घातल्यावर ते ज्याप्रमाणे वेटोळे घालून निजते,
223-6
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥223॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे साडेतीन वेढे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे झोपी गेलेली असते.
224-6
विद्युलतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोटीव जैशी ॥224॥
ती कुंडलिनी म्हणजे जणू काय वाटोळी कडी, अग्नीच्या ज्वालांची घडी अथवा शुद्ध सोन्याची आटवून तयार केलेली चकचकित लगड होय.
225-6
तैसी सुबध्द आटली । पुटी होती दाटली । ते वज्रासने चिमुटली । सावधु होय ॥225॥
त्याप्रमाणे ती पद्धतशीर संकुचित झालेली, नाभिजवळच्या संकुचित जागेत दातून बसलेली असते, ती वज्रसनामुळे चिमटली जाते आणि जागृत होते.
226-6
तेथ नक्षत्र जैसे उलंडले । की सुर्याचे आसन मोडले । तेजाचे बीज विरुढले । अंकुरेशी ॥226॥
त्या वेळी नक्षत्र तुटून पडतेवेळी जसे तेजस्वी दिसते अथवा सूर्याने आपले आसन सोडून खाली यावे, अथवा तेजाचे बीज अंकुरासहित विकसित व्हावे,
227-6
तैशी वेढियाते सोडती । कवतिके आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥227॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती आपले वेटोळे सोडीत, लीलेने अंग मोडीत नाभिस्थानाजवळ स्वधिष्ठानचक्रावर उठलेली दिसते.
228-6
सहजे बहुता दिवसांची भूक । वरी चेवविली ते होय मिष । मग आवेशे पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥228॥
सहजच तिला अनेक दिवसांची; आणि तशातच वज्रसनाच्या उष्णतेने जागृत केलेली भूक हे एक कारण होते. त्यामुळे ती कुंडलिनी शक्ती सहजच आवेशाने सरळच वर तोंड पसरते.
229-6
तेथ हृदयकोशातळवटी । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥229॥
अर्जुना !! तेंव्हा हृद्यकमळाच्या खाली जो अपान वायू भरलेला असतो, त्या वायूंच्या सर्वागाला मिठी मारून पोटात घालते.
230-6
मुखीच्या ज्वाळी । तळी वरी कवळी । मांसाची वडवाळी । आरोगु लागे ॥230॥
मुखातील ज्वालाने खालचा- वरचा भाग व्यापते आणि मासांचे घास खाऊ लागते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-6
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घास । हियाही भरी ॥231॥
ज्या ज्या ठिकाणी मांसल भाग असेल, त्या त्या ठिकाणचा घास तिला वरवरच मिळतो आणि नंतर ती राहिलेल्या भागाचेही घास घेते.
232-6
मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वीचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥232॥
मग पायाचे तळवे आणि तळहात यांचा शोध घेत, तेथील मांसल भाग खाऊन प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते.
233-6
आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेशी ॥233॥
ती शक्ती आपली मूळ जागा न सोडता तेथेच राहून नखांतले सत्वदेखील बाहेर काढते. त्वचा धुऊन हाडांच्या सापळ्याशी चिकटवून देते.
234-6
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची ॥234॥
हाडांचे नळे निरपून घेते. शिरांच्या कड्यांना ओरपुन काढते, तेंव्हा बाहेरच्या केसांच्या मुळांची वाढ करपून जाते.
235-6
मग सप्तधांतूच्या सागरी । ताहानेली घोट भरी । आणि सवेचि उन्हाळा करी । खडखडीत ॥235॥
तहानेने व्याकुळ झालेली ती शक्ती रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सात धातूंच्या समुद्रात येऊन एका घोटाने पिऊन टाकते. त्यामुळे सर्व शरीर खडखडीत कोरडे होऊन जाते.
236-6
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळे बारा । तो गचिये धरुनि माघारा । आंतु घाली ॥236॥
दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जो बारा बोटे लांब वारा वाहत असतो, त्याला गच्च धरून पुनः आत घालते. ( नासापुटौनि म्हणजे नाकपुड्यातून)
237-6
तेथ अध वरौते आकुंचे । ऊर्ध्व तळौते खाचे । तया खेंवामाजि चक्राचे । पदर उरती ॥237॥
त्यावेळी खालचा अपाणवायू वर आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली जातो. त्या प्राण-अपानवायूच्या भेटीमध्ये शटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात.
238-6
एऱ्हवी तरी दोन्ही तेव्हाचि मिळती । परि कुंडलिनी नावेकु दुश्चित्त होती । ते तयाते म्हणे परौती । तुम्हीचि कायसी एथे ॥238॥
प्राण व अपान वायू हे दोन्ही त्याच वेळेस एके ठिकाणी मिळाले असते; परंतु कुंडलिनी शक्ती क्षणभर तेथे क्षोभलेली असते; म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही माघारे जा, तुमचे काय काम आहे ?
239-6
आइके पार्थिव धातु आघवी । आरोगिता काही नुरवी । आणि आपाते तव ठेवी । पुसोनिया ॥239॥
अर्जुना, ऐक. पृथ्वीपासून निर्माण झालेले शरीरातील जे धातू आहेत, ते खाऊन ती शक्ती काहीही शिल्लक ठेवत नाही आणि पाण्याचा भाग तर चाटून पार पुसून टाकते.
240-6
ऐसी दोनी भुते खाये । ते वेळी संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशी ॥240॥
याप्रमाणे शरीरातील पृथ्वी आणि जल ही दोन्ही भुते ज्यावेळी ती खाते, त्यावेळी ती पूर्णपणे तृप्त होते, मग सौम्य बनते आणि सुषुम्नेजवळ स्थिर होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-6
तेथ तृप्तीचेनि संतोषे । गरळ जे वमी मुखे । तेणे तियेचेनि पीयूषे । प्राणु जिये ॥241॥
त्यावेळी तृप्त होऊन संतोषाने तोंडाने गरळ ओकते. ते गरळ अमृत होऊन त्यामुळेच प्राण जगत असतो.
242-6
तो अग्नि आतूनि निघे । परि सबाह्य निववूचि लागे । ते वेळी कसु बांधिती आंगे । सांडिला पुढती ॥242॥
शक्तीच्या तोंडातून तो गरळरूपी अग्नी बाहेर निघतो आणि शरीराला आतून – बाहेरून शांत करू लागतो, त्यावेळी शरीराच्या गात्रांची गेलेली शक्ती पुनः येऊ लागते.
243-6
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायुचे । जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाही ॥243॥
नाडीची गती बंद पडते. शरीरातील (अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, देवदत्त, कृकल आणि धनंजय) स्नानभेदाने असणारे नऊ प्रकारचे वायू नष्ट होतात, त्यामुळे तहान भूक वगैरे शरीराचे धर्म नाहीसे होतात.
244-6
इडा पिंगळा एकवटती । गाठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥244॥
इडा आणि पिंगळा या दोन नाड्या एक होतात. (हृदयस्थानाची ब्रम्हग्रंथी, कंठस्थानाची विष्णूग्रंथी आणि भृमध्यस्थानी असलेली रुद्रग्रंथी) या तीन गाठी सुटतात. व सहा चक्राचेहि पदर फुटतात.
245-6
मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिवसिता न दिसे ॥245॥
डाव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला चंद्र असे म्हणतात. आणि उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला सूर्य असे म्हणतात. अशा अनुमाणिक कल्पनेने ठरवलेले दोन प्रकारचे वायू नाका पुढे कापसाची वात धरून पहिले, तरी ते सापडत नाहीत.
246-6
बुध्दीची पुळिका विरे । परिमळु घ्राणी उरे । तोही शक्तिसवे संचरे । मध्यमेमाजी ॥246॥
बुद्धीची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती विरून जाते. नाकामध्ये गंध घेण्याची जी शक्ती असते, ती कुंडलिनी शक्तीबरोबर सुषुम्नेमध्ये प्रवेश करते.
247-6
तव वरिलेकडोनि ढाळे । चंद्रामृताचे तळे । कानवडोनि मिळे । शक्तिमुखी ॥247॥
त्यावेळी वरच्या बाजूस आलेले चांद्रमृताचे तळे हळूहळू कलते होते आणि ते चांद्रमृत कुंडलिनी शक्तीच्या मुखात पडते.
248-6
तेणे नाळके रस भरे । तो सर्वागामाजी संचरे । जेथिचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥248॥
त्यामुळे शक्तीरूपी नळीत अमृतसर भरून जातो आणि तो रस सर्वागामध्ये पसरत राहतो. प्राणवायू जिथल्या तिथेच लय पावतो.
249-6
तातलिये मुसे । मेण निघोनि जाय जैसे । कोंदली राहे रसे । वोतलेनि ॥249॥
तापलेला रस मुशीमध्ये ओतला म्हणजे मुसदेखील तप्त होते आणि आतील मेण आपोआप निघून जाते; मग ती मुस ओतलेल्या रसानेच भरलेली राहते,
250-6
तैसे पिंडाचेनि आकारे । ते कळाचि का अवतरे । वरी त्वचेचेनि पदरे । पांगुरली असे ॥250॥
त्याप्रमाणे ते शरीर एवढे तेजुयक्त दिसते की, जणू काही त्वचेचे पदर पांघरलेले तेजच प्रकट झालेले आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-6
जैसी आभाळाची बुंथी । करुनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरू नये ॥251॥
सुर्यासमोर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते आणि ढग दूर गेल्यावर त्याचे तेज आवरून धरता येत नाही.
252-6
तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥252॥
त्याप्रमाणे शरीरावर त्वचेचा जो कोरडा पापुद्रा असतो, तो धान्यावरील कोंड्याप्रमाणे निघून जातो.
253-6
मग काश्मीराचे स्वयंभ । का रत्नबीजा निघाले कोंभ । अवयवकांतीचि भांब । तैसी दिसे ॥253॥
मग स्फटिकाचे मूर्तिमंत स्वयंभु लिंग जसे असावे अथवा रत्नरूप बिजाला जणू अंकुर निघावा, त्याप्रमाणे त्या अवयवांची शोभा दिसते
254-6
नातरि संध्यारागीचे रंग । काढूनि वळिले ते आंग । की अंतर्जोतीचे लिंग । निर्वाळिले ॥254॥
अथवा संध्याकाळी आकाशात पसरलेले रंग काढून जणू ते शरीर बनविले आहे किंवा देहातील आत्मज्योतीची तेजस्वी शिवलिंगच. !!!
255-6
कुंकुमाचे भरीव । सिध्दरसांचे वोतीव । मज पाहता सावेव । शांतिचि ते ॥255॥
केशराने पूर्ण भरलेला आकार अथवा शरीररूपी मुशीत अमृत ओतून झालेला आकार अथवा मला असे जाणवते की, देहाच्या रूपाने मोक्षरूपी शांतीच सर्व अवयवासह प्रगट झालेली आहे.
256-6
ते आनंदचित्रीचे लेप । नातरी महासुखाचे रूप । की संतोषतरूचे रोप । थांवले जैसे ॥256॥
योग्याचे शरीर म्हणजे जणू आनंदरुपी चित्रातील रंग अथवा महासुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे जणू विकसित झालेले रोप होय.
257-6
तो कनकचंपकाचा कळा । की अमृताचा पुतळा । नाना सासिन्नला मळा । कोवळिकेचा ॥257॥
तो देह म्हणजे जणू सोनचाफ्याची मोठी कळी, अमृताचा पुतळा अथवा कोवळीकतेचा बहरून आलेला मळा आहे.
258-6
हो का जे शारदियेचे वोले । चंद्रबिंब पाल्हेले । का तेजचि मूर्त बैसले । आसनावरी ॥258॥
अथवा शरद ऋतूतील पौर्णिमेच्या ओलाव्याने प्रफुल्लित झालेले चांद्रबिंबच किंवा आसनावर विराजमान झालेले तेजच होय.
259-6
तैसे शरीर होये । जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥259॥
ज्यावेळी कुंडलिनी शक्ती चंद्रामृत प्राशन करते, त्यावेळी शरीर असे तेजोमय होते, अशा देहाला पाहून यमदेखील घाबरतो.
260-6
वृध्दाप्य तरी बहुडे । तारुण्याची गाठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ॥260॥
वार्धक्य तर संपून जाते, तारुण्य नाहीसे होते आणि नाहीसे झालेले रसरशीत बालपण प्रगट होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-6
वयसा तरी येतुलेवरी । एऱ्हवी बळाचा बळार्थु करी । धैर्याची थोरी । निरुपम ॥261॥
एरवी वयाने तो एवढासा दिसतो; परंतु त्याचा पराक्रम मोठा असतो. त्याच्या धैर्याच्या थोरपणाला उपमा देता येत नाही.
262-6
कनकद्रुमाचा पालवी । रत्नकळिका नित्य नवी । नखे तैसी बरवी । नवी निघती ॥262॥
सोन्याच्या वृक्षाची पालवी अथवा रत्नांची नित्यनुतन कळी यावी, त्याप्रमाणे योगी पुरुषाला नवी उत्तम नखे येतात.
263-6
दांतही आन होती । परि अपाडे सानेजती । जैसी दुबाही बैसे पांती । हिरेयांची ॥263॥
दुसरे नवीन दातही येतात. परंतु ते फार छोटे असतात, जणू काही दोन्ही बाजुंनी हिऱ्यांची पंगत बसली आहे.
264-6
माणिकुलियांचिया कणिया । सावियाची अणुमानिया । तैसिया सर्वागी उधवती अणिया । रोमांचिया ॥264॥
ज्याप्रमाणे माणिकाचे बारीक कण असावेत आणि ते अनुऐवढे असावेत, त्याप्रमाणे सर्व शरीरावर रोमांचाची टोके वर येतात.
265-6
करचरणतळे । जैसी का रातोत्पळे । पाखाळी होती डोळे । काय सांगो ॥265॥
हाताचे आणि पायाचे तळवे लाल कमळाप्रमाणे लालसर आणि नाजूक होतात. डोळे किती स्वच्छ होतात, हे काय सांगू ?
266-6
निडाराचेनि कोंदाटे । मोतिये नावरती संपुटे । मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची ॥266॥
मोत्ये मोठी होऊन दाटल्यामुळे लहान शिंपीत मावत नाहीत, म्हणून जसा शिंपीच्या दोन भागांचा सांधा उकलतो,
267-6
तैशी पातिचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघो पाहे । आधिलीची परि होये । गगना कळिती ॥267॥
त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात मावत नाही; आणि त्या पात्यांना व्यापून बाहेर निघावायस पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते; परंतु ती आकाश व्यापणारी होते.
268-6
आइके देह होय सोनियाचे । परि लाघव ये वायूचे । जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाही ॥268॥
अर्जुना, ऐक. त्या योगी पुरुषाचा देह सोन्यासमान कंतीमय होतो; परंतु देह वायूसमान हलका होतो. कारण त्यातील पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश नाहीसे झालेले असतात.
269-6
मग समुद्रपैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत ओळखे । मुंगियेचे ॥269॥
मग तो समुद्राच्या पलीकडे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो.
270-6
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकी पाऊल न लागे । येणे येणे प्रसंगे । येती बहुता सिध्दी ॥270॥
वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालला तरी पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धी त्यास प्रसंगानुसार प्राप्त होतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-6
आइके प्राणाचा हातु धरुनि । गगनाची पाउटी करुनी । मध्यमेचेनि दादराहुनी । हृदया आली ॥271॥
अर्जुना, ऐक. जी प्राणाचा हात धरून हृदय-आकाशच्या पायऱ्या करून सुषुम्नेच्या जिन्याने हृदयात आली,
272-6
ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥272॥
ती कुंडलिनी संपूर्ण जगताची आई आहे, ती ब्रम्हचैत्यन्यरूप सार्वभॊम राजाची शोभा आहे, जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला शीतल सावली केली आहे,
273-6
जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची कंरडी । जे प्राणाची उघडी । जन्मभूमी ॥273॥
जी निराकार ब्रम्हाची साकार अशी मूर्ती, जी परमात्मा शिव ठेवण्याची करंडी, जी ओंकाराची प्रत्यक्ष जन्मभूमी आहे.
274-6
हे असो ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली । तव अनाहताचा बोली । चावळे ते ॥274॥
हे असो. ती कुंडलिनी अनाहत चक्रात आल्यानंतर तेथे अनाहत नाद सुरु होतो.
275-6
शक्तीचिया आंगा लागले । बुद्धीचे चैतन्य होते जाहले । ते तेणे आइकिले । अळुमाळु ॥275॥
कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे ज्ञानरुप चैत्यन्य, त्या साक्षीचैत्यन्याच तो अनाहत शब्द किंचित ऐकलेला असतो.
276-6
घोषाच्या कुंडी । नादचित्रांची रुपडी । प्रणवाचिया मोडी । रेखिली ऐसी ॥276॥
घोषच्या कुडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची अनेक रूपे उमटतात.
277-6
हेचि कल्पावे तरी जाणिजे । परि कल्पिते कैचे आणिजे । तरी नेणो काय गाजे । तिये ठायी ॥277॥
याची कल्पना केली, तर अनाहत नादाचे स्वरूप जाणले जाते. कारण, या अवस्थेत कल्पना करणारे मन तरी कोठून आणावे ? अनाहत चक्राच्या ठिकाणी कशाची गर्जना होते, हे योगी पुरुषाशिवाय इतरांना कळत नाही.
278-6
विसरोनि गेलो अर्जुना । जव नाशु नाही पवना । तव वाचा आथी गगना । म्हणोनि घुमे ॥278॥
हे अर्जुना ! एक गोष्ट सांगावयाची राहून गेली. जोपर्यंत हृदय- आकाशातील प्राणाचा नाश होत नाही, तोपर्यंत नाद असतो, म्हणून तो आकाशात घुमत असतो.
279-6
तया अनाहताचेनि मेघे । आकाश दुमदुमो लागे । तव ब्रह्मस्थानीचे बेगे । फिटले सहजे ॥279॥
त्या अनाहतरूपी मेघागर्जनेने हृदय – आकाश दुमदुम लागते, तेंव्हा ते ब्रम्हस्थानाचे द्वार सहजच उघडले जाते,
280-6
आइके कमळगर्भाकारे । जे महदाकाश दुसरे । जेथ चैतन्य आधातुरे । करुनि असिजे ॥280॥
अर्जुना, ऐक. त्याठिकाणी कमळगर्भाच्या आकारांचे जे दुसरे महादकाश आहे, ज्या ठिकाणी जीवचैत्यन्य सुखासाठी अतृप्त होऊन राहिलेले असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-6
तया हृदयाच्या परिवरी । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥281॥
त्या चैत्यण्याला हृदयाकशाच्या माजघरात (हृदयाच्या गुप्तस्थानी) आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. (ती कशी तर,)
282-6
बुध्दीचेनि शाके । हातबोने निके । द्वैत जेथ न देखे । तैसे केले ॥282॥
द्वैत ज्याला पाहणार नाही, असा बुद्धीच्या भाजीसह हातात असलेला उत्तम प्रकारचा नैवद्य अर्पण केला.
283-6
ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहली । ते वेळी कैसी गमली । म्हणावी पा ॥283॥
अशा प्रकारे तिने आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरूपच झालेली असते. तेंव्हा ती कशी दिसते (किंवा कशी भासते) म्हणाल तर,
284-6
हो का जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी । ते फेडुनिया वेगळी । ठेवली तिया ॥284॥
जणू काही ती वाऱ्याची पुतळी असावी व तिने पीतांम्बर नेसलेला असावा आणि नंतर तिने वस्त्र सोडून ठेवावे,
285-6
नातरी वारयाचेनि आंगे झगटली । दीपाची दिठी निमटली । का लखलखोनि हारपली । वीजु गगनी ॥285॥
किंवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याचा प्रकाश एकदम नाहीसा व्हावा अथवा आकाशामध्ये वीज चमकून ती अदृश्य व्हावी,
286-6
तैशी हृदयकमळवेऱ्ही । दिसे सोनियाची जैशी सरी । नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥286॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी हृद्यकमलापर्यंत जणू काही सोन्याची सरी अथवा प्रकाशरुपी पाण्याचा झरा जसा वाहत आलेला असतो, त्याप्रमाणे दिसते.
287-6
मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली का एके वेळे । तैसे शक्तीचे रुप मावळे । शक्तीचिमाजी ॥287॥
मग त्या कुंडलिनीचा प्रकाश रुपी झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरवा, त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते.
288-6
तेव्हा तरी शक्तीचि म्हणिजे । एऱ्हवी तो प्राणु केवळ जाणिजे । आता नाद बिंदु नेणिजे । कला ज्योती ॥288॥
अशी स्थिती झाल्यानंतर तिला शक्ती असेच म्हणतात; परंतु वास्तविक तो प्राणच आहे, असे जाण. परंतु त्या वेळेस त्याला नाद, बिंदू, कला, ज्योती असे चारी धर्म नसतात.
189-6
मनाचा हन मारु । का पवनाचा धरु । ध्यानाचा आदरु । नाही परी ॥289॥
त्या अवस्थेत मनाचा निग्रह, प्राणाचा निरोध, ध्यानाचा प्रयत्न हे काही प्रकार तेथे राहत नाहीत.
290-6
हे कल्पना घे सांडी । ते नाही इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी देखा ॥290॥
प्रारंभीच्या काळामध्ये अमुक घ्यावे, अमुक टाकावे, हा जो संकल्प असतो, तो त्या वेळी त्या अवस्थेत राहत नाही. त्या अवस्थेमध्ये पंचमहाभुतांची पूर्ण आटणी झालेली असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-6
पिंडे पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतीचा दंशु । परि दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु ॥291॥
देहानेच देहातील पंचमहाभुतांचा नाश करणे, हे आदिनाथ जे शंकर संप्रदायाचे गुप्त वर्म आहे; परंतु महाविष्णू भगवान श्रीकृष्ण ते वर्म प्रकट करून दाखविले आहे.
292-6
तया ध्वनिताचे केणे सोडुनी । यथार्थाची घडी झाडुनी । उपलविली म्या जाणुनि । ग्राहीक श्रोते ॥292॥
त्या संक्षेपरूपी कापडाच्या गठ्यावरचे दोर सोडून त्यातील कपड्याच्या घड्या साफ करून श्रोते हे गिर्हाईक आहे, असे जाणून उलगडून दाखविले, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी संक्षेपाने जे ध्वनित केले, त्याचेच मी विवरण केले. (असे माऊली म्हणत आहेत)
युञ्जन्नेनं सदाऽत्मानं योगी नियतमानसः ।
शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥6. 15॥
भावार्थ :-
ज्याचे मन निग्रहयुक्त झाले आहे, असा योगी सतत चित्त एकाग्र केल्याने प्रमानंदाची पराकाष्ठा अशी शांती प्राप्त करून घेतो.
293-6
ऐके शक्तीचे तेज लोपे । तेथ देहीचे रुप हारपे । मग तो डोळ्यांमाजी लपे । जगाचिया ॥293॥
अर्जुना ऐक. ज्यावेळी कुंडलिनी शक्तीचे तेज लोप पावते, त्यावेळी देहातील पंचमहाभूतांचे स्वरूप लय पावते. मग तो योगी जगाच्या डोळ्यामध्ये लपून बसतो. तो कोणाच्याही डोळ्याला दिसू शकत नाही.
294-6
एऱ्हवी आधिलाची ऐसे । सावयव तरी दिसे । परी वायूचे का जैसे । वळिले होय ॥294॥
एरवी तो पूर्वी प्रमाणे सावयव दिसत असतो; परंतु जणू काहि पण जणू काही तो वाऱ्याचाच बनविलेला आहे, असा होतो.
295-6
नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा । का अवयवचि नभा । निवडला तो ॥295॥
अथवा केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला, तर काहीच उरत नाही; किंवा आकाशाला जसे अवयव फुटावेत, असे त्याचे अवयव असूनदेखील नसल्याप्रमाणेच असतात.
296-6
तैसे होय शरीर । तै ते म्हणिजे खेचर । हे पद होता चमत्कार । पिंडजनी ॥296॥
याप्रमाणे शरीर बनल्यावर त्याला खेचर म्हणजे गगणामध्ये संचार करणारा म्हणतात. देहधारी लोकांमध्ये अशा प्रकारचे शरीर बनणे म्हणजे एक प्रकारचा चमत्कार आहे.
297-6
देखे साधकु निघोनि जाय । मागा पाउलांची वोळ राहे । तेथ ठायी ठायी होये । हे अणिमादिक ॥297॥
असा साधक योगाचा अभ्यास करून पुढे निघून गेलेला असतो. त्या मार्गावर साधनरूपी पावलांची ओळ मागे राहते. त्या ठिकाणी अणिमादिक (अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इष्टत्व, वाशित्व इत्यादी) सिद्धी प्राप्त होतात. (म्हणजेच साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या सिद्धी प्राप्त होतात)
298-6
परि तेणे काय काज आपणया । अवधारी ऐसा धनंजया । लोप आथी भूतत्रया । देहीचा देही ॥298॥
अर्जुना ! हे लक्षात ठेव की, या सिद्धिशी आपल्याला काय करायचे आहे ? देहातल्या देहातच पृथ्वी, आप, तेज या तिनी भुतांचा लोप होतो.
299-6
पृथ्वीते आप विरवी । आपाते तेज जिरवी । तेजाते पवनु हरवी । हृदयामाजी ॥299॥
पृथ्वीला पाणी नाहीसे करते. पाण्याला तेज नाहीसा करतो व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो.
300-6
पाठी आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारे । मग तोही निगे अंतरे । गगना मिळे ॥300॥
पाठीमागे वायू एकटाच उरतो. तो शरीराच्या आकाराने राहतो. मग तोही काही काळाने हृद्यकाशातून निघून मुर्धन्याकाशात जाऊन मिळतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
301-6
ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसे नाम होये । परि शक्तीपण ते आहे । जव न मिळे शिवी ॥301॥
त्या वेळी कुंडलिनी हे नाव राहत नाही, तिला मरुत म्हणजे वायूमय हे नाव प्राप्त होते. जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तिचे शक्तीपण असतेच.
302-6
मग जालंधर सांडी । ककारांत फोडी । गगनाचिये पाहाडी । पैठी होय ॥302॥
मग ती शक्ती जालंधर बंधाचे उल्लंन्घन ककार जाच्या अंती आहे, अशा कृकाटिकेचे तालुस्थानाचा भेद करून मुर्धन्याकाशाच्या पहाडावर प्रवेश करते.
303-6
ते ॐकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी । पश्यंतीचिये पाउटी । मागा घाली ॥303॥
ती ओंकाराच्या पाठीवर त्वरित पाय देऊन पश्यन्ती वाणीची पायरी मागे टाकते.
304-6
पुढा तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचा अंतरी । भरती गमे सागरी । सरिता जेवी ॥304॥
पुढे ज्याप्रमाणे सागरात नद्या मिसळलेल्या दिसतात, त्याप्रमाणे अर्धमात्रपर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मुर्धन्य – आकाशात मिळतात.
305-6
मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी । सोहंभावाच्या बाह्या पसरुनी । परमात्मलिंगा धावोनि । आंगा घडे ॥305॥
मग ती शक्ती ब्रम्हरंधराचे ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रम्ह मी आहे, या ज्ञानाच्या जणू बाह्या पसरून परब्रम्हरूपी लिंगाला अलिंगन देते, म्हणजे त्याच्याशी एकरूप होते.
306-6
तव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहीसि होय झटे । तेथ गगनासकट आटे । समरसी तिये ॥306॥
त्या वेळी पंचमहाभूताचा पडदा नाहीसा होतो आणि शिवशक्तीचे ऐक्य होते. त्या ऐक्यामध्ये मुर्धन्याकाशात शक्तीचे रूप लोप पावते.
307-6
पै मेघाचेनि मुखी निवडिला । समुद्र का वोघी पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपेया ॥307॥
ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघाच्या द्वारे समुद्रापासून वेगळे होऊन नदीच्या पात्रात पडून पुनः नदीच्या रूपाने समुद्रास मिळते,
308-6
तेवी पिंडाचेनि मिषे । पदी पद प्रवेशे । ते एकत्व होय तैसे । पंडुकुमरा ॥308॥
त्याप्रमाणे हे अर्जुना ! शरीराच्या द्वारे जेंव्हा शक्तीरूप त्यागून शिवच शिवात मिळते, ते अकत्वही समुद्राच्या पाण्याप्रमाणे होय.
309-6
आता दुजे हन होते । की एकचि हे आइते । ऐशिये विवंचनपुरते । उरेचिना ॥309॥
या अवस्थेमध्ये पूर्वी द्वैत होते का मुळातच अद्वैत होते, असा विचार करण्यापूर्वी काही राहत नाही.
310-6
गगनी गगन लया जाये । ऐसे जे काही आहे । ते अनुभवे जो होये । तो होऊनि ठाके ॥310॥
आकाशदेखील ज्या महशून्यामध्ये लय पावते, असे जे काही परमात्मतत्व आहे, तो अनुभवाने जो कोणी होतो, म्हणजे त्या तत्वाशी एकरूप होतो, त्यालाच ही अवस्था प्राप्त होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-6
म्हणोनि तेथिची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणे संवादाचिया गावाआंतु । पैठी कीजे ॥311॥
म्हणून ज्या शब्दांनी कोणतीही गोष्ट स्पष्ट करून सांगता येते, त्या शब्दांचे हात तेथील अवस्थेचे वर्णन करण्यापर्यंत पोचत नाहीत. (म्हणजे त्या स्थितीचे वर्णन शब्दात सांगताच येत नाही)
312-6
अर्जुना एऱ्हवी तरी । इया अभिप्रायाचा गर्वु धरी । ते पाहे पा वैखरी । दुरी ठेली ॥312॥
अर्जुना ! एरवी तरी ” या अलौकिक अवस्थेचे मर्म मी सांगू शकेन ” असा अभिमान धरणारी वैखरी वाणी त्या अवस्थेपासून दूरच राहते.
313-6
भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेचि आंग न मांडे । सडेया प्राणा सांकडे । गगना येता ॥313॥
भिवयांच्या आतल्या बाजूस म्हणजे आज्ञानचक्रात ओंकरातील मकार मात्राचादेखील प्रवेश होत नाही. इतकेच नाही,तर एकट्या प्राणवायूला गगणास येण्याला संकट पडते,
314-6
पाठी तेथेचि तो भासळला । तव शब्दाचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥314॥
नंतर तो प्राणवायू मुर्धन्य-आकाशात विरून जातो, तेंव्हा शब्दाचा दिवस मावळतो म्हणजे शब्दाचे बोलणे खुंटले जाते. मग त्यांनतर आकाशाचाही लय होतो.
315-6
आता महाशून्याचिया डोही । जेथ गगनसीचि ठावो नाही । तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया ॥315॥
परब्रम्हरूपी डोहात जेथे आकाशाचा थांग लागत नाही, तेथे वर्णन करण्याची नौका पलीकडे नेण्यासाठी या वैखरी वेळूचा लाग लागेल काय ?
316-6
म्हणोनि आखरामाजी सांपडे । की कानावरी जोडे । हे तैसे नव्हे फुडे । त्रिशुध्दी गा ॥316॥
म्हणून ही ब्रम्हस्थिती शब्दाने वर्णन करता येईल अथवा कानांनी ऐकता येईल, अशी नाही, हे त्रिवार सत्य आहे.
317-6
जै कही दैवे । अनुभविले फावे । तै आपणचि हे ठाकावे । होऊनिया ॥317॥
जे दैवयोगाने अनुभवास येते, त्या वेळी तो तद्रूप होऊन जात असतो.
318-6
पुढती जाणणे ते नाहीचि । म्हणोनि असो किती हेचि । बोलावे आता वायाचि । धनुर्धरा ॥318॥
ही अवस्था प्राप्त झाली म्हणजे जाणायचे असे काही शिल्लक राहत नाही. म्हणून हे अर्जुना ! आता उगीच किती बरे बोलावे ?
319-6
ऐसे शब्दजात माघौते सरे । तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥319॥
याप्रमाणे सर्व शब्द जेथून माघारी फिरतात, त्या ठिकाणी संकल्पही मावळतो आणि विचारांचा वारा देखील तेथे प्रवेश करू शकत नाही.
320-6
जे उन्मनियेचे लावण्य । जे तुर्येचे तारुण्य । अनादि जे अगण्य । परमतत्व ॥320॥
ते प्ररमतत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे, जे चौथ्या ज्ञानरूप तुर्या अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध अमर्याद आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-6
आकाराचा प्रांतु । जे मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनि गेले ॥321॥
तेथे आकाशाचा शेवट होतो; ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असुन समाधि अवस्थेचे तारुण्य होय; आणि ज्याला आदि नाही व जे मापता येत नाही,
322-6
जे विश्वाचे मूळ । जे योगद्रुमाचे फळ । जे आनंदाचे केवळ । चैतन्य गा ॥322॥
ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असुन ते विश्वाचा आधार व योगरूप वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन होय.
323-6
जे महाभूतांचे बीज । जे महातेजाचे तेज । एवं पार्था जे निज । स्वरुप माझे ॥323॥
ते ब्रह्म पंचमहाभुतांचे मूळ कारण व महातेजाचे तेज होय. सारांश, पार्था, ते ब्रह्म माझे मुळस्वरूप होय.
324-6
ते हे चर्तुभुज कोंभेली । जयाची शोभा रुपा आली । देखोनि नास्तिकी नोकिली । भक्तवृंदे ॥324॥
साधुवृंदांचा नास्तिकांनी जेव्हा छळ केला, तेव्हा हीच चतुर्भुज मुर्ति या स्वरुपापासुन आकाराला आली.
325-6
ते अनिर्वाच्य महासुख । पै आपणचि जाहले जे पुरुष । जयांचे का निष्कर्ष । प्राप्तीवेरी ॥325॥
अर्जुना, असे हे महासुख अवर्णनीयच, परंतु याची प्राप्ति होईपर्यंत ज्या पुरुषाचे प्रयत्न अव्याहत चालले, ते पुरुष स्वयमेव सुखरूप झाले.
326-6
आम्ही साधन हे जे सांगितले । तेचि शरीरी जिही केले । ते आमुचेनि पाडे आले । निर्वाळलेया ॥326॥
आम्ही हे जे अष्टांगयोगाचे साधन सांगितले,ते स्वतः शरीराने जे करितात, ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात.
327-6
परब्रह्माचेनि रसे । देहाकृतीचिये मुसे । वोतीव जाहले तैसे । दिसती आंगे ॥327॥
त्या योग्यांची शरीरे परब्रह्माच्या रसाने देहाकृतीच्या मुशींत ओतल्यासारखी सतेज दिसतात.
328-6
जरि हे प्रतीति हन अंतरी फाके । तरी विश्वचि हे अवघे झाके । तव अर्जुन म्हणे निके । साचचि जी हे ॥328॥
जर हा अनुभव अंतर्यामी प्राप्त झाला, तर हे सर्व विश्व त्याला मावळते. तेव्हा अर्जुन म्हणाला ” देवा, आपण बोललां, ते सत्य आहे.
329-6
का जे आपण आता देवो । हा बोलिलो जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥329॥
देवा, आपण आता जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे, म्हणुनच त्या ठिकाणी ब्रह्मसाक्षात्कार होतो.
330-6
इये अभ्यासी जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती । हे सांगतियाची रीती । कळले मज ॥330
आपण जो हा मार्ग सांगितला, त्याचा दृढ अभ्यास करणारे खरोखर ब्रह्मपदाला पावतात, हे आपल्या सांगण्यावरून मला समजले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-6
देवा गोठीचि हे ऐकता । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवे तल्लीनता । नव्हेल केवी ॥331॥
देवा, आपण सांगितलेली गोष्ट ऐकतानाच चित्तांत ज्ञान उत्पन्न होते, तर मग तिचा अनुभव घेणाराला तद्रूपता कशी बरे प्राप्त होणार नाही ?
332-6
म्हणऊनि एथ काही । अनारिसे नाही । परि नावभरी चित्त देई । बोला एका ॥332॥
म्हणुन, हे जे आपण सांगितले, यात काही संशय नाही. परंतु क्षणभर मी जी विनंति करतो, तिकडे लक्ष द्यावे.
333-6
आता कृष्णा तुवा सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शके करुं पांगु । योग्यतेचा ॥333॥
कृष्णा, आता तुम्ही जो मला योग सांगितला, तो माझ्या मनाला फार आवडला; परंतु माझी योग्यता कमी असल्याकारणाने माझ्या हातून काही तो होणार नाही.
334-6
सहजे आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिध्दि जाये । तरी हाचि मार्ग सुखोपाये । अभ्यासीन ॥334॥
माझ्या हातून काही तो होणार नाही. माझ्या अंगात जेवढी शक्ति आहे, तेवढी खर्च करूनही जरी हा शेवटाला जाईल, तरी देखील मी मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करीन.
335-6
नातरी देवो जैसे सांगतील । तैसे आपणपा जरी न ठकेल । तरी योग्यतेवीण होईल । तेचि पुसो ॥335॥
किंवा, देवा, तुम्ही जसे सांगता तसे माझ्याने जर न करवेल, तर आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे,
336-6
जीवीचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहले कारण । मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥336॥
अशी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाल्यामुळे आपल्याला विचारण्याचे कारण पडले. अर्जुन म्हणतो, ” तर मग देवा, आपण इकडे लक्ष द्यावे
337-6
हा हो जी अवधारिले । जे हे साधन तुम्ही निरुपिले । ते आवडतयाहि अभ्यासिले । फावो शके ॥337॥
महाराज, आपण हे जे योगसाधन सांगितले ते ऐकले; परंतु वाटेल त्याने याचा अभ्यास केला तर या योगाची प्राप्ति होईल काय ?
338-6
की योग्यतेवीण नाही । ऐसे हन आहे काही । तेथ कृष्णा म्हणती तरी काई । धनुर्धरा ॥338॥
किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे की काय ? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे तू काय विचारतोस ?
339-6
हे काज कीर निर्वाण । परि आणिकही जे काही साधारण । तेही अधिकाराचे वोडवेविण । काय सिध्दि जाय ॥339॥
हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष देणारा आहे; पण याशिवाय दुसरी साधारण जरी गोष्ट असली, तरी ती सुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाईल काय ?
340-6
पै योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे । का जे योग्य होऊनि कीजे । ते आरंभी फळे ॥340॥
परंतु योग्यता म्हणून जिला म्हणतात, ती प्राप्तीचे पूर्वी समजत नाही. कारण, अधिकारी होऊन आरंभिलेले काम तत्काल फलद्रप होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-6
तरी तैसी एथ काही । सावियाचि केणी नाही । आणि योग्यांची काई । खाणी असे ॥341॥
तरी या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही; आणि दुसरे असे पहा की, योग्यतेची एखादी खाण आहे की काय ?
342-6
नावेक विरक्तु । जाहला देहधर्मी नियतु । तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ॥342॥
जो थोडासा विरक्त किंवा विहित धर्म आचरण्यात जो नियमित झाला आहे, इतकेच नव्हे, तर सामान्यतः व्यवस्थेशीर वागणारा जो आहे; तो देखील अधिकारी होतो.
343-6
येतुलालिये आयणीमाजि येवढे । योग्यपण तूतेही जोडे । ऐसे प्रसंगे सांकडे । फेडिले तयाचे ॥343॥
अशा युक्तीने इतकी योग्यता तुझे ठिकाणींही आहे. याप्रमाणे अर्जुनाचा त्या समयाला संशय फेडला.
344-6
मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाही ॥344॥
मग श्रीकृष्ण म्हणाले :- पार्था, या योगप्राप्तीची अशी व्यवस्था आहे, परंतु अव्यवस्थित मनुष्याला त्याची प्राप्ति होण्याचा कधीही संभव नाही.
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥6. 16॥
345-6
जो रसनेद्रियाचा अंकिला । का निद्रेसी जीवे विकला । तो नाही एथ म्हणितला । अधिकारिया ॥345॥
या जिव्हेचा अंकित झाला, किंवा सर्वथैव झोपेच्या आधीन झाला, तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही.
346-6
अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहाराते तोडी । मारुनिया ॥346॥
अथवा, दुराग्रहाच्या आवेशांत जो भूक आणि तहान मारतो, आणि जेवन कमी करतो,
347-6
निद्रेचिया वाटा न वचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणे नाचे । ते शरीरचि नव्हे तयाचे । मा योगु कवणाचा ॥347॥
आणि झोपेचे नांव देखील न घेता बळकट अभिमान धरतो, त्याचे शरीर सुद्धा त्याच्या आधीन राहत नाही, मग त्याला योग कोठून साध्य होणार ?
348-6
म्हणोनि अतिशये विषयो सेवावा । तैसा विरोधु न व्हावा । का सर्वथा निरोधु करावा । हेही नको ॥348॥
म्हणून विषयांचे अति सेवन करण्याची किंवा त्यांच्या अगदीच त्याग करण्याची इच्छा करुं नये, अर्थात् सर्व गोष्टी नियमित असाव्या.
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥6. 17॥
349-6
आहार तरी सेविजे । परि युक्तीचेनि मापे मविजे । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥349॥
अन्न ग्रहण तर करावे, पण ते युक्तियुक्तीने परिमित करावे; त्याचप्रमाणे, जी जी कामे करावयाची तीही सर्व युक्तीनेच प्रमाणात आणावी.
350-6
मितला बोली बोलिजे । मितलिया पाउली चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरे एके ॥350॥
भाषण परिमित असावे, त्याचप्रमाणे व्यायामही माफक करावा; व झोपही नेमलेल्या वेळीच घ्यावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
351-6
जागणे जरी जाहले । तरी व्हावे ते मितले । येतुलेनि धातुसाम्य संचले । असेल सहजे ॥351॥
जाग्रण जरी करावयाचे झाले तरी ते नियमित वेळेपर्यंत करावे. अशा नियमित रीतीने आचरण केल्यावर शरीरांतील रक्तादिक सप्तधातू समतोल राहतील.
352-6
ऐसे युक्तीचेनि हाते । जे इंद्रिया वोपिजे भाते । तै संतोषासी वाढते । मनचि करी ॥352॥
अशा प्रकारे बेताबाताने इंद्रियांची तृप्ति केली, म्हणजे आपले मनच संतोषाची वृद्धि करिते.
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥6. 18॥
353-6
बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तव आत सुख वाढे । तेथे सहजचि योगु घडे । नाभ्यासिता ॥353॥
याप्रमाणे बाहेरील इंद्रियांची स्थिती नियमित ठेविली, तर अंतर्यामी सुख उत्पन्न होऊन, त्या मनुष्याला अभ्यास न करिता योग सहज घडतो.
354-6
जैसे भाग्याचिये भडसे । उद्यमाचेनि मिसे । मग समृध्दीजात आपैसे । घर रिघे ॥354॥
ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाचे निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी चालून येते.
355-6
तैसा युक्तीमंतु कौतुके । अभ्यासाचिया मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीची पिके । अनुभवु तयाचा ॥355॥
त्याप्रमाणे, जो नियमशील आहे, तो कौतुकाने जरी योगाभ्यासाकडे वळला, तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव येतोच.
356-6
म्हणोनि युक्ती हे पांडवा । घडे जया सदैवा । तो अपवर्गाचिये राणिवा । अळंकरिजे ॥356॥
म्हणुन, अर्जुना, ज्या दैववान पुरुषाला युक्तीचे साह्य असते, तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो.
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥6. 19॥
357-6
युक्ती योगाचे आंग पावे । ऐसे प्रयाग जे होय बरवे । तेथ क्षेत्रसंन्यासे स्थिरावे । मानस जयाचे ॥357॥
नियमित वागणाराला जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली, तर तो योग गंगा आणि यमुना यांचा संगम झालेल्या प्रयागतीर्थाप्रमाणे होय. त्या आत्मस्वरुपी प्रयागाचे ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षेत्रसंन्याशाप्रमाणे कायम राहते
358-6
तयाते योगायुक्त म्हण । हेही प्रसंगे जाण । ते दीपांचे उपलक्षण । निर्वातीचिया ॥358॥
त्याच मनुष्याला तू योगी म्हण. आणि प्रसंगानुरोधाने हेही पण लक्षात ठेव की, त्याच्या चित्ताला निवाऱ्यातील दिव्याची उपमा लागू पडते.
359-6
आता तुझे मनोगत जाणोनि । काही एक आम्ही म्हणोनि । ते निके चित्त देउनी । परिसावे गा ॥359॥
आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही तुला काही गोष्ट सांगतो ती चित्त देऊन ऐक,
360-6
तू प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासी दक्ष नव्हसी । ते सांग पा काय बिहसी । दुवाडपणा ॥360॥
तू योगप्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस, परंतु अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही; तर तो अभ्यास कठिण आहे अशी तुझ्या मनात भीति वाटते की काय, ते सांग.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-6
तरी पार्था हे झणे । सायास घेशी हो मने । वाया बागूल इये दुर्जने । इंद्रिये करिती ॥361॥
पार्था, कदाचित तू ही भीति मनात बाळगशील; पण तसे करू नको हो! कारण, ही दुर्जन इंद्रिये त्या अभ्यासाचा उगीच बागुलबोवा करून भीति दाखवितात!
362-6
पाहे पा आयुष्याचा अढळ करी । जे सरते जीवित वारी । तया औषधाते वैरी । काय जिव्हा न म्हणे ॥362॥
पहा की, जे आयुष्य स्थिर करते, वाढविते, आणि संपणाऱ्या जीविताला मागे आणते मृत्यु टाळते, त्या औषधाला देखील जिव्हा शत्रु समजत नाही का ?
363-6
ऐसे हितासि जे जे निके । ते सदाचि या इद्रिंया दुःखे । एऱ्हवी सोपे योगासारिखे । काही आहे ॥363॥
त्याचप्रमाणे, परलौकीक हितास जे चांगले, ते नेहमी इंद्रियांना दुःखदायक वाटते; येरवी या योगसाधनाइतके दुसरे काही सोपे साधन आहे कां ?
यत्रोपरमते चित्तं निरुध्दं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥6. 20॥
सुखमात्यन्तिकं यत् तद् बुध्दीग्राह्यमतीद्रिंय ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥6. 21॥
364-6
म्हणोनि आसनाचिया गाढीका । जो आम्ही अभ्यासु सांगितला निका । तेणे होईल तरी हो का । निरोधु यया ॥364॥
म्हणून आसनाच्या बळकटीने जो आम्ही खरा अभ्यास सांगितला, त्या योगानेच झाला तर या इंद्रियांचा निग्रह होईल.
365-6
एऱ्हवी तरी येणे योगे । जै इद्रिंया विंदाण लागे । तै चित्त भेटो रिगे । आपणपेया ॥365॥
येरवी या योगसाधनाने जेव्हा इंद्रियांचा निग्रह होतो, तेव्हा आपले आपणच चित्त हे आत्म्याची भेट घेण्याकरिता जाते.
366-6
परतोनि पाठिमोरे ठाके । आणि आपणियाते आपण देखे । देखतखेवो वोळखे । म्हणे तत्त्व हे मी ॥366॥
चित्ताची धाव नेहमी पुढे असते; ती मागे फिरून ज्या वेळेस त्या आत्म्याकडे पाहते, त्या वेळेस त्याला आत्मा व आपण हे दोन्ही एकच आहो अशी ओळख पटते.
367-6
तिये ओळखीचिसरिसे । सुखाचिया साम्राज्यी बैसे । मग चित्तपण समरसे । विरोनि जाय ॥367॥
ती ओळख झाल्याबरोबर ते सुखाच्या राज्यावर बसते, आणि मग ब्रम्हानंदाने आपल्या ठिकाणीच लय पावते;
368-6
जयापरते आणिक नाही । जयाते इद्रिंये नेणती कही । ते आपणचि आपुलिया ठायी । होऊनि ठाके ॥368॥
आणि ज्यापेक्षा दुसरे अधिक काही नाही व ज्याला इंद्रिये कधी जाणत नाहीत असे जे ब्रह्म, ते ते स्वतःच होऊन राहते.
यं लब्धा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥6. 22॥
369-6
मग मेरुपासूनि थोरे । देह दुःखाचेनि डोंगरे । दाटिजो पा परि भरे । चित्त न दटे ॥369॥
मग अशी स्थिती झाल्यावर, मेरु पर्वतापेक्षांही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला असता त्याच्या चित्ताला दुःख होत नाही;
370-6
का शस्त्रे वरी तोडिलिया । देह अग्निमाजी पडलिया । चित्त महासुखी पहुडलिया । चेवोचि नये ॥370॥
किंवा शस्त्राने जरी देह तोडला, अथवा अग्नीत जरी पडला, तरी महासुखात निमग्न झालेले त्यांचे चित्त जागृत होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-6
ऐसे आपणपा रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥371॥
याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो, आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टीचा त्याला विसर पडतो.
तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स् निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥6. 23॥
372-6
जया सुखाचिया गोडी । मग आर्तीची सेचि सोडी । संसाराचिया तोंडी । गुंतले जे ॥372॥
ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन वासनेची आठवणच सोडते,
373-6
जे योगाची बरव । संतोषाची राणीव । ज्ञानाची जाणीव । जयालागी ॥373॥
जे योगाची शोभा, संतोषाचे केवळ राज्य आणि ज्याच्याकरिता ज्ञानाची आवश्यकता,
374-6
ते अभ्यासिलेनि योगे । सावयव देखावे लागे । देखिले तरी आंगे । होईजेल गा ॥374॥
ते ब्रह्मसुख अभ्यासाचे योगाने मुर्तिमंत दिसु लागल्यावर ते पाहणारा तद्रूपच बनतो.
संकल्पप्रभवान् कामास्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेद्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥6. 24॥
375-6
तरि तोचि योगु बापा । एके परि आहे सोपा । जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥375॥
तथापि अर्जुना, एका परी हा योग सोपा आहे. संकल्पाचे पुत्र जे कामक्रोधादिक, त्यांचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्रशोक होईल, तेव्हाच तो साध्य होतो.
376-6
हा विषयाते निमालिया आइके । इंद्रिये नेमाचिया धारणी देखे । तरी हिये घालूनि मुके । जीवितासी ॥376॥
विषय लय पावले असे या संकल्पाने ऐकले, व इंद्रिये नियमितपणाने वागतात असे पाहीले, म्हणजे त्याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो.
377-6
ऐसे वैराग्य हे करी । तरी संकल्पाची सरे वारी । सुखे धृतीचिया धवळारी । बुद्धी नांदे ॥377॥
अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात, आणि धैर्याच्या मंदीरांत बुद्धिही सुखाने वास करते.
शनैः शनैरुपरमेत् बुध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत् ॥6. 25॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥6. 26॥
378-6
बुद्धी धैया होय वसौटा । तरी मनाते अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनी ॥378॥
बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला, म्हणजे मग ती मनाला हळू हळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करते.
379-6
याही एके परी । प्राप्ती आहे विचारी । हे न ठके तरी सोपारी । आणिक ऐके ॥379॥
या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते, आणि हेही घडत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो तो ऐक.
380-6
आता नियमुचि हा एकला । जीवे करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला । बाहेरा नोहे ॥380॥
साधकाने आपला एक नियम करावा की, एकदा केलेला निश्चय कधीही टाळावयाचा नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-6
जरी येतुलेनि चित्त स्थिरावे । तरी काजा आले स्वभावे । नाही तरी घालावे । मोकलुनी ॥381॥
अशा निश्चयाने जर चित्त स्थिर झाले, तर अनायासेंच काम झाले; पण असे जर न होईल तर त्या चित्ताला खुशाल स्वैर वर्तू द्यावे.
382-6
मग मोकलिले जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेऊनि येईल । ऐसेनि स्थैर्याची होईल । सवे यया ॥382॥
मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथुन निश्चय त्याला परत घेऊन येईल, आणि अशा रितीने ते तत्काल स्थिर होऊन राहील.
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतकल्मषम् ॥6. 27॥
383-6
पाठी केतुलेनि एके वेळी । तया स्थैर्याचेनि मेळे । आत्मस्वरुपाजवळे । येईल सहजे ॥383॥
नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिर राहण्याने ते सहज आत्मस्वरुपाजवळ येईल.
384-6
तयाते देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैती द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजे उघडेल । त्रैलोक्य हे ॥384॥
आणि त्या आत्मस्वरुपाला पाहून स्वतः तद्रूप होईल. होईल. मग अद्वैतामध्ये द्वैत बुडून जाईल, आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. (त्रैलोक्यभर ब्रह्मपद दिसू लागेल. )
385-6
आकाशी दिसे दुसरे । ते अभ्र जै विरे । तै गगनचि का भरे । विश्व जैसे ॥385॥
आकाशांत उत्पन्न झालेली अभ्रे ज्या वेळेस नाहीतशी होतात, त्या वेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसते;
386-6
तैसे चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवे होये । ऐसी प्राप्ति सुखोपाये । आहे येणे ॥386॥
त्याचप्रमाणे, चित्त लयाला जाऊन जीवात्मा ब्रह्मस्वरुप होणे ही प्राप्ति या उपायापासून सहज होते.
युञ्जन्नेवं सदात्मनं योगीविगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥6. 28॥
387-6
या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुती । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनिया ॥387॥
मनातील संकल्पविकल्प सोडून जे या सोप्या योगस्थितीचा पुष्कळ अनुभव घेऊन सुखी झाले
388-6
ते सुखाचेनि सांगाते । आले परब्रह्मा आंतौते । तेथ लवण जैसे जळाते । सांडु नेणे ॥388॥
ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदास येऊन पोहोचले. मिठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही,
389-6
तैसे होय तिये मेळी । मग साम्यरसाचिया राऊळी । महासुखाची दिवाळी । जगेसि दिसे ॥389॥
त्याप्रमाणे, जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्यांची स्थिती होते; आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी झाल्याप्रमाणे तो सर्व जग पहातो.
390-6
ऐसे आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हे पार्था नागवे तरी । आन ऐके ॥390॥
याप्रमाणे आपलेच पाय आपले पाठीवर घेऊन योगी चालतो. असा अवघड जो योग तो तुला घडत नसेल, तर आणखी दुसरा उपाय सांगतो
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
सर्वभूस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥6. 29॥
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥6. 30॥
391-6
तरी मी तव सकळ देही । असे एथ विचारु नाही । आणि तैसेति माझ्या ठायी । सकळ असे ॥391॥
मी सर्वाच्या देहांत आहे याविषयी शंका नाही; आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व आहे. अशा रीतीने जग व ईश्वर ही एकमेकांत मिसळलेली आहेत.
392-6
हे ऐसेचि संचले । परस्परे मिसळले । बुद्धी घेपे एतुले । होआवे गा ॥392॥
अशा रीतीने जग व ईश्वर ही एकमेकांत मिसळलेली आहेत. परंतु साधकाने आपल्या बुद्धीचा निश्चय मात्र करावा.
393-6
एऱ्हवी तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना । सर्वभूती अभिन्ना । माते भजे ॥393॥
अर्जुना, येरवी तरी, जो एकत्वभावनेने सर्व भूतांचे ठिकाणी मी व्यापक आहे असे मानून मला भजतो,
394-6
भूतांचेनि अनेकपणे । अनेक नोहे अंतःकरणे । केवळ एकत्वचि माझे जाणे । सर्वत्र जो ॥394॥
व्यक्तीमात्राच्या अनेकत्वाने ज्याचे अंतःकरणात अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे जाणतो,
395-6
मग तो एक हा मिया । बोलता दिसतसे वाया । एऱ्हवी न बोलिजे तरी धनंजया । तो मीचि आहे ॥395॥
तो आणि मी एक असे बोलनेच व्यर्थ होय. येरवी धनंजया, बोलून दाखविले नाही, तरी तो आणि मी एक आहो.
396-6
दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा । तो माझ्या ठायी तैसा । मी तयामाजी ॥396॥
ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश यांच्या एकत्वाची योग्यता असते, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याचे ठिकाणी आहे.
397-6
जैसा उदकाचेनि आयुष्ये रसु । का गगनाचेनि माने अवकाशु । तैसा माझेनि रुपे रुपसु । पुरुष तो गा ॥397॥
जसे पाण्याचे योगाने गोडी किंवा गगनाच्या योगाने पोकळी यांचे अस्तित्व असते, तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान दिसतो.
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥6. 31॥
398-6
जेणे ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी । देखिला जैसा पटी । तंतु एकु ॥398॥
अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रांत तंतु एक असतात, त्याप्रमाणे ज्याने ऐक्याचे दृष्टीने सर्व ठिकाणी माझी व्याप्ती आहे असे जाणले,
399-6
का स्वरुपे तरी बहुते आहाती । परि तैसी सोनी बहुवे न होती । ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणे ॥399॥
किंवा पुष्कळ जरी अलंकार घातले तरी अनेकत्व नसणाऱ्या सोन्याप्रमाणे ज्याने ऐक्यरुप पर्वताची स्थिती बनविली आहे,
400-6
ना तरी वृक्षांची पाने जेतुली । तेतुली रोपे नाही लाविली । ऐसी अद्वैतदिवसे पाहली । रात्री जया ॥400॥
अथवा, जितकी झाडाची पाने तितकी रोपे लाविलेली नसतात, अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञानरात्र उजाडली आहे,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
401-6
तो पंचात्मकी सांपडे । तरी मग सांग पा कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पाडे । मजसी तुके ॥401॥
तो पंचमहाभुतात्मक शरीरांत जरी सापडला, तरी मग तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरे प्रतिबंध पावेल ? कारण, अनुभवाच्या योगाने माझी एकता पावतो,
402-6
माझे व्यापकपण आघवे । गवसले तयाचेनि अनुभवे । तरी न म्हणता स्वभावे । व्यापकु जाहला ॥402॥
ज्या अनुभवाने माझे सर्व ठिकाणी व्यापकत्व आहे असे जाणले आहे, मग ‘ तो सर्वव्यापक झाला ‘ असे म्हटलेच पाहीजे असे नाही.
403-6
आता शरीरी तरी आहे । परि शरीराचा तो नोहे । ऐसे बोलवरी होये । ते करु ये काइ ॥403॥
हे पहा की, ह्याने जरी शरीर धारण केले आहे तरी तो शरीराचा नाही. ही गोष्ट बोलून दाखविता येण्यासारखी नव्हे. तेव्हा तिचे वर्णन करिता येईल काय ?
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥6. 32॥
404-6
म्हणोनि असो ते विशेषे । अथवा आपणपेयासारिखे । जो चराचर देखे । अखंडित ॥404॥
अर्थात् या विषयाबद्दल जास्त सांगणे नको. जो सदोदित आपल्यासारखेच सर्व जग मानतो.
405-6
सुखदुःखादि वर्मे । का शुभाशुभे कर्मे । दोनी ऐसी मनोधर्मे । नेणेचि जो ॥405॥
जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनात समजत नाही
406-6
हे समविषम भाव । आणिकही विचित्र जे सर्व । ते मानी जैसे अवयव । आपुले होती ॥406॥
हे सम आणि विषम असा मनात भाव न धरता, याशिवाय इतर सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या अवयवाप्रमाणे एकच आहेत, असे समजतो;
407-6
हे एकैक काय सांगावे । जया त्रैलोक्यचि आघवे । मी ऐसे स्वभावे । बोधा आले ॥407॥
यापेक्षा आणखी काय काय गोष्टी सांगाव्या ? ज्याला सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवाने समजले आहे,
408-6
तयाही देह एकु कीर आथी । लौकिकी सुखदुःखी तयाते म्हणती । परि आम्हाते ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ॥408॥
त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी, आणि तो सुखदुःख भोगतो असे लोक देखील म्हणतात; तथापि आमच्या अनुभवाने तो परब्रह्म आहे.
409-6
म्हणोनि आपणपा विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे । ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥409॥
म्हणून अर्जुना, ज्याच्या योगाने आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहता येईल, आणि आपणा स्वतःसच विश्वरूप होता येईल, त्या समदृष्टीची तू उपासना कर.
410-6
हे तूते बहुती प्रसंगी । आम्ही म्हणो याचिलागी । जे साम्यापरौति जगी । प्राप्ति नाही ॥410॥
आम्ही तुला पुष्कळ प्रसंगी याच कारणाकरिता असे सांगितले आहे की, समदृष्टीपेक्षा या जगतात दुसरी अधिक प्राप्ति नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अर्जुन उवाच –
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थित्तिं स्थिराम् ॥6. 33॥
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥6. 34॥
411-6
अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरो जी स्वभावा । मनाचिया ॥411॥
मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, देवा, तुम्ही आमची दया मनात आणून हा समतेचा मार्ग सांगितला परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही.
हे मन कैसे केवढे । ऐसे पाहो म्हणो तरी न सांपडे । एऱ्हवी राहाटावया थोडे । त्रैलोक्य यया ॥412॥
हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते सांपडत नाही. येरवी त्याला फिरण्याला त्रैलोक्यही पुरे होत नाही.
412-6
म्हणोनि ऐसे कैसे घडेल । जे मर्कट समाधी येईल । का राहा म्हणितलिया राहेल । महावातु ॥413॥
म्हणुन, माकडाला समाधि लागणे किंवा मोठ्या वाऱ्याला स्थिर हो म्हणतांच तो थांबणे ह्या गोष्टी कशा घडतील.
414-6
जे बुध्दीते सळी । निश्चयाते टाळी । धैर्येसी हातफळी । मिळऊनि जाय ॥414॥
जे मन बुद्धीला हलवते, निश्चय मोडते, आणि धैर्याचे हातावर हा हा म्हणता तुरी देऊन निघुन जाते
415-6,
जे विवेकाते भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥415॥
जे विचाराला चकविते, संतोषाला नादी लावते आणि मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दशदिशा हिंडविते,
416-6
जे निरोधले घे उवावो । जया संयमुचि होय सावावो । ते मन आपुला स्वभावो । सांडील काई ॥416॥
ज्याला कोंडले असता ते उसळून बाहेर येते, आणि निग्रह केला तर तो उलटा त्याला साह्य करतो, असे हे मन आपला स्वभाव सोडील का ?
417-6
म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हासी साम्य होईल । हे विशेषेही न घडेल । तयालागी ॥417॥
म्हणून, एक मन जर स्थिर राहील, तर मग आम्हाला समदृष्टी प्राप्त होईल; परंतु मनाची अशीच चंचल वृत्ति असल्यामुळे ती प्राप्त होणे दुर्घट आहे.
श्रीभगवानुवाच –
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥6. 35॥
418-6
तव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि ते तैसेचि । यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥418॥
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात :- तू जे बोललास, ते खरोखर तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे.
419-6
परि वैराग्यचेनि आधारे । जरि लाविले अभ्यासाचिये मोहरे । तरि केतुलेनि एके अवसरे । स्थिरावेल ॥419॥
परंतु याला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले, तर काही अवकाशाने हे स्थिर होईल.
420-6
का जे यया मनाचे एक निके । जे देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणोनि अनुभवसुखचि कवतिके । दावीत जाइजे ॥420॥
कारण, या मनाच्या ठिकाणी एक चांगला गुण आहे. ज्याची याला चटक लागेल, त्याच ठिकाणी राहावयास हे सोकावते ! म्हणून कौतुकाने आत्मसुखाकडेसच याला वळवावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
असंयतात्मना योगो दुष्पाप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥6. 36॥
421-6
एऱ्हवी विरक्ती जयासि नाही । जे अभ्यासी न रिघती कही । तया नाकळे हे आम्हीही । न मनू कायी ॥421॥
येरवी ज्याला वैराग्य नाही व जो अभ्यासही करीत नाही, त्याला हे मन आवरणार नाही असे आम्ही देखील कोठे मानीत नाही ?
422-6
परी यमनियमांचिया वाटा न वंचिजे । कही वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळी ठाकिजे । बुडी देऊनी ॥422॥
आणि जो यम, नियम, प्राणायाम, वैगेरेचा अभ्यास करीत नाही, ज्याला वैराग्याची कधी आठवण होत नाही, आणि जो केवळ विषयरूप जलांत माशासारखी बुडी देऊन राहीला आहे,
423-6
यया जालिया मानसा कही । युक्तीची कांबी लागली नाही । तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगे ॥423॥
आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला युक्तीचा चिमटा कधी लागला नाही, त्याचे मन निश्चल कसे होईल सांग बरे ?
424-6
म्हणोनि मनाचा निग्रह होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभी मग नोहे । कैसा पाहो ॥424॥
म्हणून, मनाचा निग्रह करणे हा जो उपाय आहे त्याला तू आरंभ कर; मग ते कसे निश्चल होत नाही ते पांहू !
425-6
तरी योगसाधन जितुके । के अवघेचि काय लटिके । परि आपणया अभ्यास न ठाके । हेचि म्हण ॥425॥
तर योगसाधने म्हणून जेवढी आहेत, तेवढी सर्व काय खोटी आहेत ? परंतु, आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण.
426-6
आंगी योगाचे होय बळ । तरी मन केतुले चपळ । काय महदादि हे सकळ । आपु नोहे ॥426॥
जर योगसाधनांचे बळ अंगात असेल, तर मनाच्या चंचलतेची काय बिशाद आहे ? महत्तत्वादिक स्वाधीन होत नाहीत काय ?
427-6
तेथ अर्जुन म्हणे निके । देवो बोलती ते न चुके । साचचि योगबळेसी न तुके । मनोबळ ॥427॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, ” देवा आपण जे म्हणता ते खरे आहे; खरोखर योगबलापुढे मनाचे बल टिकणार नाही.
428-6
तरी तोचि योगु कैसा केवी जाणो । आम्ही येतुले दिया याची मातुही नेणो । म्हणोनि मनाते जी म्हणो । अनावर ॥428॥
तरी तो योग कसा आहे व कशा रीतीने जाणावा त्याची गोष्ट इतके दिवस आम्हास माहीत नव्हती; म्हणून मन हे अनावर आहे असे आम्ही म्हणत होतो.
429-6
हा आता आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादे पुरुषोत्तमा । योगपरिचयो आम्हा । जाहला आजी ॥429॥
पुरुषोत्तमा, तुमच्या प्रसादाने आमच्या सगळ्या जन्मांत आज योगाचा परिचय आम्हास झाला.
अर्जुन उवाच –
अयतिः श्रध्दयोपेतो योगात् चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिध्दि कां गतिं कृष्ण गच्छति ॥6. 37॥
कच्चित् नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मणः पथि ॥6. 38॥
एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्दते ॥6. 39॥
430-6
परि आणिक एक गोसाविया । मज संशयो असे साविया । तो तू वाचूनि फेडावया । समर्थु नाही ॥430॥
परंतु, हे प्रभो, आणखी एक संशय सहज उत्पन्न झाला आहे, तो फेडण्यास आपल्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-6
म्हणोनि सांगे गोविंदा । कवण एकु मोक्षपदा । झोंबत होता श्रध्दा । उपायेविण ॥431॥
म्हणून गोविंदा, मला सांग की, कोणी एक मनुष्य मोक्षप्राप्तीकरता भक्तियुक्त अंतःकरणाने उपायाशिवाय इच्छा करीत होता.
432-6
इद्रिंयग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटा लागला । आत्मसिद्धीचिया पुढिला । नगरा यावया ॥432॥
इंद्रियरूपी गावाहून निघून मोक्षरूपी गावास जाण्याकरिता तो भक्तिरूप मार्गाला लागला
433-6
आत्मसिद्धी न ठकेचि । आणि मागुते न येववेचि । ऐसा अस्तु गेला माझारीचि । आयुष्यभानु ॥433॥
तोच मोक्ष प्राप्त होत नाही, आणि परतही येववत नाही, अशा स्थितीत त्याचा आयुष्यरूपी सुर्य मध्येच मावळला;
434-6
जैसे अकाळी आभाळ । अळुमाळु सपातळ । विपाये आले केवळ । वसे ना वर्से ॥434॥
सहज अकाली आलेला लहान पातळ ढग ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टीही करीत नाही,
435-6
तैसी दोन्ही दुरावली । जे प्राप्ती तव अलग ठेली । आणि अप्राप्तीही सांडवली । श्रध्दा तया ॥435॥
त्याप्रमाणे, ज्याला दोन्ही अंतरली, म्हणजे मोक्षप्राप्ति तर दुरच राहीली, आणि श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारासही तो मुकला
436-6
ऐसा वोलांतरला काजी (दोंला अंतरला) का जी । जो श्रध्देचाचि समाजी । बुडाला तया हो जी । कवण गति ॥436॥
असा दोन्ही गोष्टींना जो मुकला, परंतु भक्तीत निमग्न झाला, त्याला कोणती गति प्राप्त होते हे सांगा.
श्रीभगवानुवाच-
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति ॥6. 40 ॥
437-6
तव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखी आस्था । तया मोक्षावाचुनि अन्यथा । गती आहे गा ॥437॥
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले :-पार्था, ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे, त्याला मोक्षावाचुन दुसरी गति आहे काय ?
438-6
परि एतुलेचि एक घडे । जे माझारी विसवावे पडे । तेही परि ऐसेनि सुरवाडे । जो देवा नाही ॥438॥
परंतु त्याला मध्यंतरी विश्रांति घ्यावी लागते एवढेच काय ते ! पण त्या विश्रांतीत त्याला जे सुख होते ते देवांना सुद्धा मिळत नाही !
439-6
एऱ्हवी अभ्यासाचा उचलता । पाउली जरी चालता । तरी दिवसाआधी ठाकिता । सोऽहंसिध्दीते ॥439॥
येरवी, जर ह्याने अभ्यासाचे पाउल उचलून मार्ग क्रमिला असता, तर दिवस (आयुष्य) मावळण्याच्या पूर्वीच हा मोक्षप्राप्तीच्या गावाला पोहोचला असता.
440-6
परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणऊनि विसावा तरी निकाचि । पाठी मोक्षु तव तैसाचि । ठेविला असे ॥440॥
परंतु तितका त्याचा वेग नसल्यामुळे त्याला विसावा घेणे भाग पडले. तथापि मागाहून तरी मोक्षप्राप्ति ही ठेवलेलीच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥6. 41॥
441-6
ऐसे कवतिक हे कैसे । जे शतमखा लोक सायासे । ते तो पावे अनायासे । कैवल्यकामु ॥441॥
अरे हे कौतुक पहा, ज्या लोकांची प्राप्ती व्हावयास शंभर यज्ञ करणार्या इंद्रालाहि सायास पडतात, ते या मोक्षेच्छू पुरूषाला अनायासे प्राप्त होतात.
442-6
मग तेथिचे जे अमोघ । अलौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मन ॥442॥
मग तेथील निष्फळ न होणारे व अनुपम असे भोग भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो.
443-6
हा अंतरायो अवचिता । का वोढवला भगवंता । ऐसा दिविभोग भोगिता । अनुतापी नित्य ॥443॥
तेथ दिव्य भोग भोगत असता तेथे त्यास सुख मिळत नाही, व ” हे भगवंता, हे भोगाचे विघ्न माझ्यामागे का लागले ? ” असा तो सतत पश्चाताप करीत असतो.
444-6
पाठी जन्मे संसारी । परि सकळ धर्माचिया माहेरी । लांबा उगवे आगरी । विभवश्रियेचा ॥444॥
नंतर तो फिरून मृत्युलोकी जन्म पावतो, पण सर्व धर्माचे माहेरघर अशा कुलात जन्म पावतो. आणि शेत कापल्यावर पडलेल्या भातगोट्याचे शेत जसे जोराने फोफावते, तशी त्याच्या ऐश्वर्याची वृद्धी होते.
445-6
जयाते नीतिपंथे चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावे ते देखिजे । शास्त्रदृष्टी ॥445॥
जे कुल नीतिमार्गाने चालणारे,सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि शास्त्र रीतीने वागणारे,
446-6
वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु । सारासारविचारु । मंत्री जयाते ॥446॥
ज्या कुलात वेद नित्य जागृत असतो व स्वधर्माचे आचरण हा ज्याचा कुलाचा व्यवसाय आणि सारासार विचार हाच मंत्री.
447-6
जयाचा कुळी चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयाते गृहदेवता । आदि ऋध्दि ॥447॥
ज्या कुलात चिंतेने ईश्वरास वरिले, ज्या कुलात ईश्वरावाचून दुसर्या कशाचेही चिंतन होत नाही, आणि ज्याला संपत्ती हिच गृहदेवता आहे.
448-6
ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ॥448॥
असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखाची समृद्धी आहे, अशा कुलात तो योगभ्रष्ट पुरूष सुखाने जन्म घेतो.
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदिदृश्यम् ॥6. 42॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥6. 43॥
449-6
अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्य श्रोत्री । महासुखक्षेत्री । आदिवंत ॥449॥
अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे, व अध्यात्मसिद्धांतांत निष्णात, आणि परब्रम्हरुप गावाचे वतनदार
450-6
जे सिद्धांताचिया सिंहासनी । राज्य करिती त्रिभुवनी । जे कूंजते कोकिल वनी । संतोषाचा ॥450॥
जे एकमेवाद्वितीय या सिद्धांतात नेहमी निमग्न राहून त्रिभुवनाचे राज्य करतात, आणि संतोषरूप वनांत कोकिळेसारखा मधुर ध्वनि करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
451-6
जे विवेकग्रामींचा मुळी । बैसले आहाति नित्य फळी । तया योगियांचिया कुळी । जन्म पावे ॥451॥
आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळाचे सेवन करतात, अशा योग्यांच्या कुलांत तो (योगभ्रष्ट)पुरुष जन्म घेतो.
452-6
मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पाहाट फुटे । सूर्यापुढे प्रगटे । प्रकाशु जैसा ॥452॥
जन्म घेतल्यावर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उजेड पडतो; व ज्याप्रमाणे सुर्य उगवण्याच्या अगोदर चहुंकडे प्रभा फाकते,
453-6
तैसी दशेची वाट न पहाता । वयसेचिया गावा न येता । बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ॥453॥
त्याचप्रमाणे, पौढ वयाची वाट न पाहता ज्ञान हे त्याला बालपणीच वरते.
454-6
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे । मनचि सारस्वते दुभे । मग सकळ शास्त्रे स्वयंभे । निघती मुखे ॥454॥
पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात व त्याच्या मुखातुन सर्व शास्त्रे स्वयमेव निघू लागतात.
455-6
ऐसे जे जन्म । जयालागी देव सकाम । स्वर्गी ठेले जप होम । करिती सदा ॥455॥
असे जे उत्तम कुली जन्म, ते प्राप्त होण्याकरिंता स्वर्गवासी देव देखील मनात हेतु धरुन नेहमी जप, होम करीत असतात.
456-6
अमरी भाट होईजे । मग मृत्युलोकाते वानिजे । ऐसे जन्म पार्था गा जे । ते तो पावे ॥456॥
पार्था देवांनी स्तुतिपाठक होऊन मृत्युलोकाचे वर्णन करावे असे जे उत्तम कुली जन्म, ते तो योगभ्रष्ट पुरुष पावतो.
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥6. 44॥
457-6
आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि । मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे ॥457॥
आणि ज्या पूर्वजन्मांत आयुष्याचा शेवट झाला होता, त्या वेळची सद्बुद्धि त्याला पुन्हा प्राप्त होते.
458-6
तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळा । मग देखे जैसी अवलीळा । पाताळधने ॥458॥
त्या समयी, दैववान, पायाळू आणखी वर डोळ्यात दिव्यांजन घातलेल्या पुरुषास जसे भुमीतील धन सहज दृष्टीस पडते,
459-6
तैसे दुर्भेद जे अभिप्राय । का गुरुगम्य हन ठाय । तेथ सौरसेवीण जाय । बुद्धी तयाची ॥459॥
त्याप्रमाणे, गुरूमुखाशिवाय न कळणाऱ्या कठिण अशा अभिप्रायांच्या ठिकाणी त्याची बुद्धि अनायासे जाऊन पोहोचते.
460-6
बळिये इंद्रिये येती मना । मन एकवटे पवना । पवन सहजे गगना । मिळोचि लागे ॥460॥
इंद्रिये ही आपण होऊन मनाच्या आधीन होतात, मन प्राणवायुंत ऐक्य पावते व तो प्राणवायु चिदाकाशांत मिळतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-6
ऐसे नेणो काय आपैसे । तयातेचि कीजे अभ्यासे । समाधी घर पुसे । मानसाचे ॥461॥
आणखी काय गोष्टी असतील त्या असोत, परंतु योगाभ्यासही त्याला आपोआप प्राप्त होतो, आणि समाधिही त्याच्या मनाचे घर विचारीत येते.
462-6
जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय आरंभरंभेचा गौरवु । की वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रुपा आला ॥462॥
असे वाटते की, हा पुरुष योगस्थानाचा शंकर किंवा योग्याच्या आरंभीचे वैभवच अथवा वैराग्यरूप सिद्धीचा मुर्तिमंत अनुभवच आहे
463-6
हा संसारु उमाणिते माप । का अष्टांगसामग्रीचे द्वीप । जैसे परिमळेचि धरिजे रुप । चंदनाचे ॥463॥
हे संसार मोजण्याचे मापच, अथवा अष्टांगयोगसाहित्याचे बेटच होय. सुगंधानेच ज्याप्रमाणे चंदनाचे रुप धारण करावे,
464-6
तैसा संतोषाचा काय घडिला । की सिद्धिभांडारीहूनि काढिला । दिसे तेणे माने रुढला । साधकदशे ॥464॥
त्याचप्रमाणे,साधकदशेतच हा इतका धैर्ययुक्त झालेला असतो की, संतोषाचा पुतळा बनविल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारांतून काढल्यासारखा दिसतो.
प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परा गतिम् ॥6. 45॥
465-6
जे वर्षशताचिया कोडी । जन्मसहस्त्रांचिया आडी । लंघिता पातला थडी । आत्मसिद्धीची ॥465॥
कारण कोट्यवधि वर्षांनी हजारो जन्मांचा प्रतिबंध दूर करुन तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलेला असतो.
466-6
म्हणोनि साधनजात आघवे । अनुसरे तया स्वभावे । मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ॥466॥
म्हणून सर्व साधने त्याला स्वभावतःच प्राप्त होतात; आणि मग सहजच तो विचारांच्या गादीवर बसतो.
467-6
पाठी विचारितया वेगा । तो विवेकुही ठाके मागा । मग अविचारणीय ते आंगा । घडोनि जाय ॥467॥
नंतर, विचार करण्यामध्ये प्रबल असा विवेकही मागे राहतो, आणि अविचारणीय असे जे ब्रह्म, ते तो स्वतःच होतो.
468-6
तेथ मनाचे मेहुडे विरे । पवनाचे पवनपण सरे । आपणपा आपण मुरे । आकाशही ॥468॥
त्या ठिकाणी मनाचे ढग नाहींतसे होतात, प्राणवायूचे हालणे बंद होते व तो आपल्या ठिकाणीच चिदाकाशांत लीन होऊन,
469-6
प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे । म्हणोनि आधीचि बोलु बहुडे । तयालागी ॥469॥
ॐकाराच्या अर्धबिंदूत निमग्न होतो. अशा रीतीचे त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते, म्हणून त्या ठिकाणी बोलनेच बंद होते.
470-6
ऐसी ब्रह्माची स्थिती । जे सकळा गतींसी गती । तया अमूर्ताची मूर्ती । होऊनि ठाके ॥470॥
मग सगळ्या गतींना गति देणारी जी ब्रह्मस्थिती, त्या निराकार स्थितीचे रूपच तो बनून राहतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-6
तेणे बहुती जन्मी मागिली । विक्षेपांची पाणिवळे झाडिली । म्हणोनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ॥471॥
त्याने मागल्या अनेक जन्मांत, विक्षेप हाच कोणी पाण्यावरील मळ, तो झाडून टाकलेला असतो, म्हणून त्याची लग्नघटिका त्याचा जन्म होतांच बुडते
472-6
आणि तद्रूपतेसी लग्न । लागोनि ठेले अभिन्न । जैसे लोपले अभ्र गगन । होऊनि ठाके ॥472॥
आणि तद्रूपतेशी शुभ लग्न होऊन तो अभिन्नत्व पावतो. अभ्रे नाहीतशी झाली म्हणजे ती ज्याप्रमाणे आकाशरूपच होऊन राहतात,
473-6
तैसे विश्व जेथ होये । मागौते जेथ लया जाये । ते विद्यमानेचि देहे । जाहला तो गा ॥473॥
त्याप्रमाणे (विक्षेपादि विघ्ने नाहीतशी झाली म्हणजे,) ज्यापासून विश्वाची उत्पत्ति होते, व ज्या ठिकाणी ते पुनः लय पावते, ते ब्रह्म, तो या विद्यमान देहांत असतांनाच बनतो.
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥ 6. 46 ॥
474-6
जया लाभाचिया आशा । करुनि धैर्यबाहूंचा भरवसा । घालीत षट्कर्माचा धारसा । कर्मनिष्ठ ॥474॥
ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या धैर्यरूप बाहुबलाच्या भरंवशावर कर्ममार्गाच्या प्रवाहांत उडी घालतात
475-6
का जिये एकी वस्तुलागी । बाणोनि ज्ञानाची व्रजांगी । झुंजत प्रपंचेशी समरंगी । ज्ञानिये गा ॥475॥
किंवा ज्या एका वस्तुसाठी ज्ञानी पुरुष हे ज्ञानरुप कवच धारण करुन समरांगणात प्रपंचशत्रुशी झगडतात,
476-6
अथवा निलागे निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥476॥
अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निराश्रित व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरुन प्रवास करितात,
477-6
जे भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य । एवं जे पूज्य । सकळा सदा ॥477॥
जे भजन करणारांच्या भजनाचे अधिष्ठान, यज्ञ करणाऱ्यांच्या यज्ञीय विषय, अशा प्रकारे सर्वास पुज्य
478-6
तेचि तो आपण । स्वयं जाहला निर्वाण । जे साधकांचे कारण । सिद्ध तत्व ॥478॥
आणि साधकांचे सिद्धतत्त्व, ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो.
479-6
म्हणोनि कर्मनिष्ठा वंद्यु । तो ज्ञानियासि वेद्यु । तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥479॥
म्हणून, तो कर्मनिष्ठाना वंद्य व ज्ञान्यांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय.
480-6
पै जीवपरमात्मसंगमा । जयाचे येणे जाहले मनोधर्मा । तो शरीरीचि परि महिमा । ऐसी पावे ॥480॥
हे पहा की, जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे ऐक्य झाल्याकारणाने, तो देही असुनही अशा योग्यतेस पावतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-6
म्हणोनि याकारणे । तूते मी सदा म्हणे । योगी होई अंतःकरणे । पंडुकुमरा ॥481॥
म्हणून अर्जुना, याच कारणास्तव ‘ तू योगी हो. ‘ असे मनापासुन तुला मी नेहमी सांगत असतो.
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ 47 ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥6॥
482-6
अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देव जाणिजे । आणि सुखसर्वस्व माझे । चैतन्य तो ॥482॥
अरे योगी देवांचा देव, माझे सर्व सुखाचे आगर, आणि केवळ माझा प्राण असे समज
483-6
जया भजता भजन भजावे । हे भक्तिसाधन जे आघवे । ते मीचि जाहलो अनुभवे । अखंडीत ॥483॥
त्याच्या ठिकाणी भजन करणारा, भजनक्रिया व भज्य वस्तु ही भक्तीची त्रिपुटी सदोदित राहते.
484-6
मग तया आम्हा प्रीतीचे । स्वरुप बोली निर्वचे । ऐसे नव्हे गा तो साचे । सुभद्रापती ॥484॥
हे सुभद्रापते, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरुप वर्णन करिता येत नाही. तर असे समज की, तो म्हणजे प्रत्यक्ष मीच.
485-6
तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडे पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा । हेचि होय ॥485॥
अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते, त्याच्या तुलनेला उपमा पाहिजे असली तर मी देह व तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही!
486-6
ऐसे भक्तचकोरचंद्रे । त्रिभुवनैकनरेंद्रे । बोलिले गुणसमुद्रे । संजयो म्हणे ॥486॥
संजय म्हणतो :- राजा भक्तरूप चकोरांचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनाचा राजा, व गुणांचा समुद्र जो श्रीकृष्ण परमात्मा, तो असे बोलला.
487-6
तेथ आदिलापासोनि पार्था । ऐकिजे ऐसीचि आस्था । दुणावली हे यदुनाथा । पावो सरले ॥487॥
तेथे पार्थाला पूर्वीपासून योगाचे ऐश्वर्य ऐकण्याची आस्था होतीच; ती पुनः दुप्पट झाली, असे यदुनाथाने मनात जाणले,
488-6
की सावियाचि मनी तोषला । जे बोला आरिसा जोडला । तेणे हरिखे आता उपलवला । निरुपील ॥488॥
आणि ते पाहून श्रीकृष्णाच्या मनात सहज आनंद झाला की, मी जे सांगतो, ते प्रत्यक्ष पाहण्याचा अर्जुन हा आरसाच होय. तेव्हा आता या आनंदाचे भरात ते पुढील कथा सांगतील.
489-6
तो प्रसंगु आहे पुढा । जेथ शांतु दिसे उघडा । तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजांचा ॥489॥
तो प्रसंग पुढे असुन त्यात शांतिरस स्पष्ट दिसेल; व ज्ञानरुप बीजाचा मुढा उघडा होईल.
490-6
आनजे सात्विकाचेनि वडपे । गेले आध्यात्मिक खरपे । सहजे निरोळले वाफे । चतुरचित्ताचे ॥490॥
जे ज्ञानबीज पेरण्याकरिंता सत्त्वगुणाची वृष्टि होऊन, व आध्यात्मीक तापांचे गुंतडे वाहून जाऊन, चतुर श्रोत्यांच्या चित्तांचे वाफे सहज तयार झाले,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
491-6
वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा । म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृतीसी ॥491॥
त्यावर सोन्यासारखी अवधानाची वाफसा साधल्यामुळे श्रीनिवृत्तिनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्याची उत्कंठा उत्पन्न झाली.
492-6
ज्ञानदेव म्हणे मी चाडे । सद्गुरुंनी केले कोडे । माथा हात ठेविला ते फुडे । बीजचि वाइले ॥492॥
ज्ञानदेव म्हणतात :- ते बिज पेरण्याकरिंता सद्गुरूंनी माझी मोठ्या कौतुकाने चाड्याच्या ठिकाणी योजना केली, व माझ्या मस्तकावर हात ठेवून ते बीज चाड्यात घातले.
493-6
म्हणऊनि येणे मुखे जे जे निगे । ते संतांच्या हृदयी साचचि लागे । हे असो सांगो श्रीरंगे । बोलिले जे ॥493॥
म्हणून, या माझ्या मुखांतून जे जे काही निघेल, ते संतांच्या मनाला खरेच भासते. हे असो, आता श्रीरंग जे काही बोलले, ते पुढे सांगेन
494-6.
परी ते मनाचा कानी ऐकावे । बोल बुद्धीचा डोळा देखावे । हे सांटोवाटी घ्यावे । चित्ताचिया ॥494॥
परंतु ते लक्ष देऊन ऐका. बुद्धीने त्याचा विचार करा. त्याला चित्त अर्पण करुन त्याचा अर्थ घ्या,
495-6
अवधानाचेनि हाते । नेयावे हृदयाआंतौते । हे रिझवितील आयणीते । सज्जनांचिये ॥495॥
व अवधानरूप हाताने ते आपल्या ह्रदयात सांठवा; म्हणजे सज्जनांच्या मनाला हे रमविणारे आहे.
496-6
हे स्वहिताते निवविती । परिणामाते जीवविती । सुखाची वाहविती । लाखोली जीवा ॥496॥
ह्या बोलापासून नित्य आत्मप्राप्ति होईल, संकटातून मुक्तता होईल, व जीवाला सुखप्राप्ति होईल.
497-6
आता अर्जुनेसी श्रीमुकुंदे । नागर बोलिजेल विनोदे । ते वोवियेचेनि प्रबंधे । सांगेन मी ॥497॥
आता, श्रीमुकुंद अर्जुनाला विनोदाने जे काही सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगितील, ते मी ओवी नामक कवितेत तुम्हाला सांगेन.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकाया – आत्मसंयमयोगोनाम् षष्ठोऽध्यायः ॥6॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक


















